मागील भागाकडे जाण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती
https://www.maayboli.com/node/78797
"अंकल , आशी ?"
" सॉरी बेटा, ती झोपलीय "
" पण तिला सांगितलं नाहीत का मी येणार ते ?"
" बेटा आता आलीच आहेस. विश्रांती घे. मग बोल तिच्याशी. प्रवास कसा झाला ?"
" मस्तच. एंजॉय केलं मी तर "
" अनामिका, तुला काही त्रास ?"
" नाही. मी मस्त झोप काढली. हीच जागी होती दोन्ही रात्र "
" सलोनी, अगं एव्हढं जागरण कशाला केलंस ?"
" अहो अंकल दुपारी डाराडूर झोपले होते. नका काळजी करू "
आम्ही दोघी प्रवासाचा शीण घालवायला आणि फ्रेश व्हायला आपापल्या खोलीकडे गेलो. प्रत्येक रूमला अॅटॅच्ड बाथरूम होते.
माझी खोली पाहता क्षणीच मी खूष झाले. रॉयल ब्ल्यू रंगाचा वॉलपेपर, त्यावर सोनेरी नक्षी. त्यावर तसविरी.
भिंतीवरचे कलात्मक दिवे.
सगळंच देखणं.
आणि इतकं सुंदर आणि प्रशस्त बाथरूम तर चित्रपटात पण पाहिलेलं नव्हतं.
टबबाथ बघताच इतर सगळे बेत रद्द करून फ्रेश व्हायचा निर्णय घेतला.
दीड दोन तासांनी बाहेर दार वाजत असल्याचा आवाज ऐकू आला म्हणून नाईलाजाने बाहेर आले.
तयार होऊन दार उघडलं तर जेवणासाठी बोलावलं होतं.
खरं तर आता फ्रेश झाल्यावर सणकून भूक लागली होती.
थंड हवेचाही परिणाम होता.
डायनिंग रूम ब्रिटीश पद्धतीची होती.
इथे टीव्ही नाही कि पुस्तक नाही. फक्त जेवणावर लक्ष द्यायचं. आणि गप्पा.
जेवताना मग मुखर्जी अंकल मामीला कुजबुजत्या आवाजात बंगालीत काही तरी सांगू लागले.
मला बंगाली अगदीच थोडी समजते हे माहीत असताना अंकल असे करतात म्हणजे मला न समजण्यासारखं काही असावं. आणि बंगाली समजत जरी असती तरी मुखर्जी अंकलच्या बंगालीचा लेहजा दुर्गापूरच्या भाषेपेक्षा निराळा होता. बाहेरून आलेल्याने एक रूप शिकलं तर दुसरं अगम्य वाटेल असं.
जेवायला पण आशी खाली का नाही आली ?
मी जेवण घाईत संपवून अंकलची परवानगी घेऊन वर गेले. त्यांनाही मोकळं वाटलं असं मला वाटलं.
आशी उठून बसली होती.
तिच्या चेह-यावर मला बघून कसलेच भाव नव्हते.
बाहुलीसारखी आशी कशी अस्ताव्यस्त दिसत होती. पंधरा सोळा वर्षांची असेल. आता परी व्हायला हवी तिची.
पण किती भयाण दिसत होती.
कसल्या तरी ताणाखाली वाटत होती.
मी "आशी " अशी प्रेमाने हाक मारली.
त्यातला भाव तिला पोहोचला.
डोळ्यात ओळख आली आणि "दिदी" म्हणत ती गळ्यात पडली.
हाताला काहीतरी गरम लागलं.
तिचे अश्रू होते !
मी तिला काय झालं म्ह्णून विचारत राहीले.
कदाचित खूप दिवसांनी तिला रडावंसं वाटलं असेल.
मामीने बरंच काही येताना सांगितलेलं होतंच.
आशीशी मला बोलायचं होतं.
पण आल्याबरोबर लगेच नको वाटलं. तिला पुन्हा माझ्याशी ट्युनिंग जमवण्यासाठी एक दिवस तरी द्यायला हवा.
दुपारी दोन वाजता मुखर्जी अंकल स्वत:च म्हणाले
" सलोनी, विश्रांती घे "
" नको अंकल. मी फ्रेश आहे "
" अरे वा ! दमलेली नसशील तर उत्तम आहे. जा आशीला घेऊन टाऊन हॉलपर्यंत पाय मोकळे करून ये. इकडे वर सुद्धा जाता येईल. पण माकडं खूप आहेत. तुला सवय नाही त्यांची "
माकडांचा उल्लेख ऐकून मला हसू आवरलं नाही.
आशीला घेऊन मग रीज, डाकघर , लक्कडबाजार असं करत करत आशिर्वाद लॉजच्या मागे असलेल्या मुखर्जींच्या लाकडी आणि काचेच्या तावदानाच्या घरापर्यंत जाऊन आलो.
आधी माहीत असतं तर चावी आणली असती. नाहीतर या घराची देखरेख करणा-या कुटुंबाला सांगून ठेवलं असतं.
खूप सुंदर घर. माझ्या मनात भरलं.
काहीतरी कारण काढून इथेच रहायला यावं असं मनाने घेतलं.
चांगला मोठा फेरफटका झाला होता.
अंधार पडायच्या आत परतायला हवं. चढण चढताना जास्त वेळ लागणार होता.
****************************************
रात्रीच्या जेवणानंतर मामीच्या खोलीत गेले.
मामीचं आशीला भेटून झालं होतं.
मी मामीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले.
मामीने डोळ्याने खुणावले.
अंकल बाहेर उभे होते. दोघींना गप्पा मारताना पाहून ते परत गेले.
" कशी वाटली आशी ?"
" तुला सांगितलं तर सगळं "
" हो. तरी ती चमत्कारीक वाटतेय "
" लगेच नको अंदाज करायला "
मग दोघी गप्प बसलो.
मी म्हणाले,
" गाडीत पण विचारीन म्हणताना राहून गेलं , तू कोलकत्याला गेली होतीस का ?"
" कशाला ?"
" अगं आशीचे उपचार चालू आहेत ना ?"
" ओह त्या डॉक्टर इंद्राणी देब ! "
" हो. काय म्हणाल्या त्या ? "
" त्या काय सांगणार अजून ?"
" नाही, सांगच ! "
" अगं त्या म्हणाल्या की मामीने तिला लहानपणापासून भीती घातली. खूप मोठी चूक केली. अगदी पाळण्यात असताना तिने रडून डिस्टर्ब करू नये म्हणून गोल फिरणा-या बाहुल्या बांधल्या होत्या"
" हं "
" तुला माहीत आहे ना ? अभिमन्यू तर पोटातून शिकून आला होता ते "
" अगं ती पुराणातली वांगी "
" अगं म्हणजे काही दृश्यं अशी लक्षात राहतात. नंतर संदर्भ आठवत नाहीत. डॉक्टर म्हणत होत्या असं. विशेषत: डोळ्यासमोर गोल फिरणा-या वस्तू. संमोहनावस्थेत गेल्यासारखं नाही का होणार ? त्या वयाच्या बाळाला आकार कितपत समजत असतील ? तिच्या डोक्यात त्या प्रतिमा ठसल्या असतील. मग नंतर बाहुल्या. कॉमिक्स. ज्यात असणारी चित्रं .."
" पण मामी "
" मला वाटलंच तू टोकणार. मलाही ते ऐकताना सुसंबद्ध वाटत होतं. पण हसण्याच्या आवाजाचं काय ? आणि ते पैंजणाचे आवाज ? ती बाई ?"
" हो."
" अजून ही ब-याच घटना आहेत. तुला सांगितलेल्या नाहीत. काही तर मलाही माहीत नाही"
आम्ही बराच वेळ गप्पा मारत राहिलो.
विषय अर्थातच आशी आणि आंटी होत्या.
********************************************************
आंटींना कुलूच्या जरासं पुढे असणा-या एका खासगी मनोचिकित्सालयात ठेवलं होतं.
तिथून पुढे नवीन मनाली.
पण मुळात आंटी तिथे का गेल्या ?
आणि मुखर्जी अंकल शिमल्याला यायला तयार का झाले.
काही उत्तरं मिळाली होती.
काहींसाठी चौकशी करावी लागणार होती.
*****************************************************
सकाळी अंथरूणातून बाहेर पडावंसं वाटत नव्हतं इतकी थंडी होती.
पण असं झोपून चालणार नव्हतं.
फिरायला जायचा शिरस्ता मोडून उपयोगाचं नव्हतं.
जरा वजन वाढलं की चेहरा मोठा दिसतो. कपडे सैल शिवावे लागतात. मग आहोत त्यापेक्षा वयाने मोठे दिसतो आपण.
स्वेटर, जर्कीन, कानटोपी असा जामानिमा करून मी फिरायला निघाले तर अंकल बाहेर फुलांशी बोलत होते.
गंमत वाटली.
दुर्गापूरला पण ते तसेच बोलायचे.
अंकल किती छान आहेत. सॉफ्ट बोलणं ..
का असे दारूच्या आहारी गेले असतील ?
इथे आल्यापासून दारूची कुठलीच निशाणी दिसत नव्हती चेह-यावर. चेहरा छान दिसत होता.
थोडे तरूण झाल्यासारखे वाटत होते.
" कुठे गं सकाळी सकाळी ?"
" अंकल फिरून येते "
" कुठे जाणार ? आपल्या इथेच फिर. इथे जागा आहे एव्हढी. हव्या तितक्या चकरा मार "
" नाही मला झक्कू टेंपल बघायचंय "
" तिकडे एकटी नकोस जाऊ. माकडं कधी कधी अंगावर येतात. हातातल्या वस्तू पळवतात. केस धरतात. नखाने बोचकारे काढतात "
" अंकल मी हनुमानचालिसा म्हणेन "
" बेटा, ऐक माझं. चल मी येतो तुझ्यासोबत"
असं म्हणत अंकलने आतून एक काठी आणली.
" अंकल तुम्ही कशाला येता वरती ? तुम्हाला त्रास होतो ना ?"
" तू ऐकत नाहीस मग ?"
" बरं वरपर्यंत नाही जात. मग ठीक ना ?"
" त्या लाकडी पुलाच्या पलिकडे नकोस जाऊ. पुढे माकडांचं राज्य आहे"
पडत्या फळाची आज्ञा म्हणत मी निघाले.
चढण चांगलीच दमवणारी होती. शिवाय उंचावर असल्याने जास्त श्रम पडत होते. तरीही सगळीकडे जंगल असल्याने उंचावर असून ऑक्सीजनची कमतरता नव्हती. नाहीतर लडाखला दोन पावलं चढलं की दम लागतो पहिल्या दिवशी.
सिल्वर फर, व्हाईट ओक, हरित ओक, पाईन, ब्ल्यू पाईन, देवदार आणि कितीतरी उंचच्या उंच वृक्ष, हजारो दुर्मिळ आणि औषधी वनस्पती. किती समृद्ध जंगल आहे हे !
मी रमत गमत चालले होते.
इतक्या सकाळी पहाडी लोक पाठीवर ओझं घेऊन वर चालले होते. पर्यटक कुणी नव्हते फारसे.
स्थानिक भाविकांची गर्दी होती. पण तुरळक.
श्वास फुलला म्हणून कठड्यावर बसले.
थोडासा रियाज करावा असं वाटलं. नोम तोम च्या रियाजाने फुप्फुसांचाही व्यायाम झाला.
पुन्हा चढायला सुरूवात केली.
इतक्यात कुठूनशी माकडांची धाड आली.
माझ्याच दिशेने.
झाडावरून. रस्त्यावरून , चारही बाजूंनी लांब लांब उड्या घेत, ढांगा टाकत हे सगळं सैन्य माझ्याच दिशेने येत होतं.
माझे हात पायच गळाले.
काहीच सुचेना.
त्या ही अवस्थेत मी मागे फिरले.
पण पाय भराभर उचलेच ना !
पायात गोळे आले होते.
इतक्यात माकडांच्या पळण्याचा आवाज जवळ आला.
आणि कुणीतरी मला धक्का देऊन जोरात खालच्या दिशेने धडपडत पळत गेलं.
मी तोल जाऊन कठड्यावरून पडणारच होते...
इतक्यात !!
क्रमश:
पुढील भागाकडे जाण्यासाठी कृपया खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा.
https://www.maayboli.com/node/78819
दिवे येत जात असल्याने छोटे
दिवे येत जात असल्याने छोटे छोटेच भाग सेव्ह केले जात आहेत. वाट बघायला लागत असल्याने क्षमस्व !
पुढील भाग लवकर येवू देत......
पुढील भाग लवकर येवू देत......
सगळेच भाग छान जमलेत.....
मस्त.
मस्त.
पटापट टाकते आहेस भाग. .. छान
पटापट टाकते आहेस भाग. .. छान चालू आहे कथा. .
मस्त सुरू आहे कथा... गुढ
मस्त सुरू आहे कथा... गुढ हळूहळू उलगडण्याची तुझी शैली नेहमी आवडते.
पुढील लेखनास शुभेच्छा!
उत्कंठा वाढलीयं.. पुढे काय
उत्कंठा वाढलीयं.. पुढे काय झालं असेल याची...!
छान चालू आहे कथा..!
छान....आता पुढील भागाची
छान....आता पुढील भागाची उत्सुकता..!
खूप सुंदर! पूर्णतया वेगळ्या
खूप सुंदर! पूर्णतया वेगळ्या वातावरणातिल कथा !
खाण्याचे जिन्नस, हवेली चे वर्णन, अनामिका मामी...सारेच अपूर्व!
वाट पहात आहोत......
सुंदर वर्णन केलंय, आवडतीये
सुंदर वर्णन केलंय, आवडतीये कथा
छान. गोमोह मिर्झापुर
छान. गोमोह मिर्झापुर .दुर्गापूर आठवत आता. ग्राफिक वर्णन.
मस्त सुरू आहे कथा.
मस्त सुरू आहे कथा.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
उत्सुकता ताणली जात आहे.
उत्सुकता ताणली जात आहे.
वाचायला मजा येत आहे.
सिल्वर फर, व्हाईट ओक, हरित ओक, पाईन, ब्ल्यू पाईन, देवदार, इतर माहिती चांगलीच परिणामकारक वाटत आहे.
मनाली, बंगाल परिसराचा मस्त अभ्यास आहे तुमचा.
वाचत आहे.