आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?

Submitted by पराग र. लोणकर on 16 April, 2021 - 05:31

आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?
(या माझ्या लेखावर मला अगदी प्रामाणिक प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. माझे येथे काही चुकत असेल तर तेही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.)

खरं तर हा लेख लिहायला मी योग्य व्यक्ती नाही असं मला वाटतं. कारण मी स्वत: किंचितसा लेखक आहे आणि बराचसा प्रकाशक. तरीही या विषयावर लिहिण्याची ओढ स्वस्थ बसू देत नाही म्हणून लिहित आहे. वाचकांनी त्याबद्दल मला मोठ्या मनाने क्षमा करावी.

आज कोरोनाच्या संकटामुळे आपल्यापैकी बरीच मंडळी घरी बसून आहेत (किंवा त्यांनी तसे बसणे अपेक्षित आहे.). वाचनासाठी आता नक्कीच आपण वेळ काढू शकतोय.

एरवी मात्र (कोरोना नव्हता तेव्हा, आणि नसेल तेव्हाच्या) आपल्या धावपळीच्या जगात नोकरी-व्यवसायासाठी धावपळ करण्यात आपण इतके व्यस्त असतो, की जो काही थोडासा वेळ मिळतो त्या वेळात मोबाईलवर Whatsapp, फेसबुक वगैरे ठिकाणी जे जे वाचायला मिळते, त्याचा आपण आस्वाद घेतो आणि आपल्यामध्ये अजूनही जी काही वाचनाची किंचीतशी भूक शिल्लक आहे ती भागवतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, या सगळ्यात आपण काही चुकतोय असं मला किंचितही वाटत नाहीये. त्याबद्दल एक लेखक-प्रकाशक असूनही मी कुणासही काडीचाही दोष देत नाही.

पुस्तकानं कसं ज्ञान मिळतं, ती कशी जीवनावश्यकच आहेत, ती कशी आपली खरी मित्र असतात वगैरेवरही मी माझं काहीही (अल्प असलं तरी) ज्ञान इथे पाजळणार नाही. हे सारं एक तर बहुतेकांना माहीत असतं, किंवा यावर काहींचा विश्वास नसतो, पुस्तकं एकूण आपल्या जीवनात तितकी काही महत्वाची नसतात असं काहींचं प्रामाणिक मत असू शकतं. मागे (पंधरा-एक वर्षांपूर्वी) एका व्यक्तीने मला `मी अजिबात पुस्तक वाचत नाही!` असं अगदी अभिमानाने सांगितल्याचं मला आठवतं. `ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला खेद वाटला पाहिजे, तीच गोष्ट तुम्ही अभिमानाने सांगताय,` असं बोलावंसं मला वाटूनही मी त्याला फक्त नमस्कार करता झालो.

आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का? हा माझा प्रश्न वेगळ्याच कारणाने आहे.

आज एकूण मराठी वाचू शकणाऱ्या मंडळींची लोकसंख्या लक्षात घेतली, तर त्या संख्येपुढे पुस्तक; तेही मराठी भाषेतील- विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या खूपच रोडावली आहे असे माझे निरीक्षण आहे. मी आज माझे जवळ-लांबचे नातेवाईक, मित्र, परिचित जेव्हा डोळ्यापुढे आणतो, तेव्हा यापैकी कुणीच गेल्या काही वर्षांत मराठीतील एखादे पुस्तक विकत आणल्याचे, त्यावर काही चर्चा केल्याचे मला किंचितही आठवत नाही. क्वचित एखाद्याने एखादे उपयुक्त ठरणारे (आरोग्य, व्यक्तिमत्व विकास इ.) ललितेतर पुस्तक विकत घेतले असेलही, परंतु एखादा चांगला कथासंग्रह, कादंबरी, प्रवास वर्णन असे ललित पुस्तक विकत आणलेले मला तरी आढळलेले नाही. तुमचेही निरीक्षण कदाचित असेच असू शकेल. (किंवा नसले, तर उत्तमच!)

आज मराठी ललित साहित्याच्या विश्वाचे जे अर्थकारण आहे, त्यात केवळ लेखक-प्रकाशकाचेच नाही, तर छपाई यंत्रणेशी निगडीत प्रत्येक घटक (कागद विक्री करणाऱ्यापासून पुस्तक बांधणी करणाऱ्यांपर्यंत, चित्रकारांपासून अक्षर जुळणी करणाऱ्यांपर्यंत), पुस्तक विक्रीच्या क्षेत्रात विविध पातळ्यांवर काम करणारे घटक, या वरील प्रत्येक घटकाकडे काम करणारा कर्मचारी वर्ग या सगळ्यांचे पोट, संसार अवलंबून आहे. या पुस्तक व्यवसायातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. साहित्य व्यवहाराशी संबंधित नसलेल्या मंडळींना याची व्याप्ती अनेकदा लक्षात येत नाही. आपण विकत घेतलेले प्रत्येक पुस्तक हे या मंडळींसाठी किती महत्वाचे असते याबाबत आपण तसे अनभिज्ञच असतो.

माझ्यापुढील भीती या साऱ्या (मीही यात आहेच!) मंडळींच्या पोटापाण्याची असली तरीही त्याने मी फारसा चिंतीत नाही. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. विचार केला तर अश्या अनेक गोष्टी आढळतील ज्या कालानुरूप लुप्त झाल्या. त्या गोष्टींवर अवलंबून असलेल्या मंडळींना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे सध्या साहित्य व्यवहाराच्या अर्थकारणावर अवलंबून असलेल्या आम्हा मंडळींचीही मला एका मर्यादेपलीकडे चिंता नाही. कारण जर वैयक्तिक (मराठी) वाचक वर्ग असा कमी होत गेला तर आम्हालाही नवीन, एकदम वेगळे मार्ग स्वीकारावे लागतील, अनेकांना स्वत:ला अथवा पुढच्या पिढीला वेगळ्या नोकरी-व्यवसायात शिरावे लागेल आणि हळूहळू अगदी निवडक व्यक्ती या व्यवसायात राहून अगदी लहानश्या स्वरूपात मराठी भाषेतील साहित्य संस्कृती जिवंत राहू शकेल. माझी खरी भीती हीच आहे.

आजची ललित साहित्याबाबतची उदासीनता मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि एकूणच मराठी लेखन-वाचनासंदर्भातील मराठी भाषा यांच्या भविष्याच्या दृष्टीने मला खूपच घातक वाटते. आजच्या तरुण पिढीतील आई-वडील जर घरामध्ये मराठी भाषेतील ललित साहित्याचे वाचनच करताना दिसली नाही तर पुढील पिढीला मराठी पुस्तकांबद्दल आत्मीयता कशी वाटणार? आई-वडील अश्या साहित्याचे वाचन करताना दिसले, सामान्यत: रोज किमान दोन-तीन पानांचे वाचन करताना दिसले, तरच त्यांच्या मुला-मुलींच्या मनात मराठी साहित्याविषयी, पुस्तकांविषयी उत्सुकता निर्माण होऊ शकेल.

पुस्तकं महाग झाली आहेत, अशीही ओरड (अगदी पूर्वीइतकी नसली तरी, काही प्रमाणात) आपल्याला ऐकू येत असते. आजकाल पुस्तक खरेदीबाबत उत्सुकताच कमी झाली असल्याने याबाबत तक्रारीचा सूर पूर्वी इतका येत नाही. पुस्तकांच्या किंमती बऱ्याचदा खरोखरच जास्त असतात, असे मानले, तरी अनेकदा वेगवेगळ्या सवलत योजना चालू असताना ही पुस्तकं अगदी योग्य किमतीत मिळू शकतात. आज आपण बाकी गोष्टींकरता किती किती आणि कसा कसा खर्च करत असतो याचे अंदाज पत्रक कुणीही सहज करू शकतो. घरातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दरमहा आपण टाकत असलेले data pack, T.V. साठी आपण दरमहा करत असलेले विविध प्रकारचे खर्च (डीश t.v. recharge, netflix किंवा तत्सम गोष्टींवरील दरमहा करायचे खर्च, (कोरोनापूर्व काळात) आपण करत असलेले Hoteling, Mallsमधील खरेदी, Multiplex चित्रपट गृहांमध्ये जाणे इत्यादी खर्च) हा सारा दर महिन्याचा खर्च आपण मोजला तर आपण मराठी ललित पुस्तकांच्या खरेदीसाठी २०० रुपयांचा नाममात्र खर्च खरंच करू शकत नाही का? याचा विचार व्हावा असं मला वाटतं. शिवाय यात खरेदी ही तुम्हाला हव्या असलेल्या लेखकाच्या, तुम्हाला आवडणाऱ्या विषयाच्या, तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकाचीच करायची आहे. आज गुगल मित्राच्या सहाय्याने मी महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांची संख्या काढली असता ती (२०११ मध्ये) पावणे आठ कोटी इतकी दर्शवली गेली. अगदी सहा लोकांचे एक कुटुंब गृहीत धरले तरी सव्वा कोटीहून अधिक मराठी कुटुंब महाराष्ट्रात आहेत. यातील प्रत्येकाने दर महिन्याला फक्त २०० रुपयांच्या मराठी ललित पुस्तकांच्या खरेदीचा निश्चय केला तर ते केवळ मराठी साहित्य विश्वावर अवलंबून असणाऱ्या मंडळींसाठी वरदान ठरणार नाही, तर भविष्यात मराठी भाषेवरच जे भयावह संकट आल्याचे मला जाणवत आहे, तेही निश्चित दूर होऊन, उलट मराठी साहित्य आणि संस्कृतीने जो उज्ज्वल भूतकाळ पाहिला आहे, तो पुढील काही दशकांत पुन्हा साकार झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. घरोघरी पुस्तक खरेदीची (मग ती कितीही अल्प किमतीच्या पुस्तकांची असो!) संस्कृती रुजवण्यासाठी लढा द्यायची आता वेळ आली आहे असे मला वाटते.

आज आपल्या शासनाकडून सर्वात दुर्लक्षित क्षेत्र जर कुठले असेल, तर ते मराठी साहित्य क्षेत्र आहे अशी परिस्थिती आहे. अर्थात मराठी भाषा, मराठी लेखन-वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला शासनावर अवलंबून रहायची वेळ येणे हीदेखील आपल्यासाठी खेद करावी अशीच परिस्थिती असेल. त्यामुळे आता प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीने यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.

आणि यासाठी दर महिन्याला किमान एक, २०० रुपयांचे, मराठी ललित पुस्तक खरेदी करणे, हा फार मोठा खर्च नसेल, असे वाटते.

- पराग लोणकर.

Group content visibility: 
Use group defaults

प्रत्येक भारतवारीत मराठी पुस्तकं विकत घेतली जातातच
मला स्वतःला ऑडिओ बूक्स पेक्षा छापील पुस्तकेच आवडतात. त्यामुळे पुस्तकांचा संग्रह आहे. मात्र नविन लेखकांविषयी फारशी काही माहिती नाही, त्यामुळे त्यांची पुस्तके घेतली जात नाहीत.
ही अशी नविन पुस्तकांची / लेखकांची माहिती कुठे मिळू शकेल का? वरती ‘पाचपाटील’ यांनी लेखकांची नावं दिली आहेतच, पण त्याचबरोबर या लेखकांची कोणती पुस्तके आली आहेत, आणि ती कोणत्या विषयावर आहेत हे कळलं तर बरं होईल.
थोडक्यात काय तर, नविन पुस्तकांची थोडी जाहिरात केली / झाली, तर त्याचा फायदा पुस्तकविक्रीलाच होइल, नाही का?

दुसऱ्या परिच्छेदासाठी धन्यवाद, यातले अनेक लेखक माहिती नव्हते.>>
@ वावे..
अलीकडची मला आवडलेली काही पुस्तकं मी आवर्जून सुचवू इच्छितो..जरूर वाचून पहा

उदाहरणार्थ..

दीडदमडीना, पेरूगन मुरूगन-- वर्जेश सोळंकी
(कादंबरी)

विवादे विषादे प्रमादे प्रवासे -- प्रशांत बागड
(लेखसंग्रह)

अतीत कोन? मीच-- प्रसाद कुमठेकर
(लेखसंग्रह)

बाकी शून्य- कमलेश वालावलकर
(कादंबरी)

सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे (कादंबरी)
तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण -- रंगनाथ पठारे
(कथासंग्रह)

आटपाट देशातल्या गोष्टी-- संग्राम गायकवाड (आयकर विभागाचा आणि एकूणच प्रशासनाचा सफाईदार क्रॉस सेक्शन घेणारी कादंबरी... सरकारी अधिकाऱ्यांनी उगाच टाईमपास करायला लिहिलेली रद्दी पुस्तकं आपल्याकडं काही कमी नाहीत.. पण संग्राम गायकवाडांची ही पहिलीच कादंबरी फार म्हणजे फारच 'तोडफोड' आहे)

संप्रति, उद्या -- नंदा खरे(कादंबरी)

विनाशवेळा- महेश एलकुंचवार (अनुवादित)

निकटवर्तीय सूत्र, रिबोट- जी के ऐनापुरे
(कादंबरी)
आलोक- आसाराम लोमटे (ग्रामीण/निमशहरी कथासंग्रह)
दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
(ग्रामीण/निमशहरी कथासंग्रह)
स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट- अवधूत डोंगरे (कादंबरी)
एन्कीच्या राज्यात- विलास सारंग (कादंबरी)
व्हाया सावरगाव खुर्द- दिनकर दाभाडे (कादंबरी)
राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी - किरण गुरव
(कथासंग्रह)

वरणभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा- जयंत पवार
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर-जयंत पवार

नाईन्टीन नाईंटी, कोबाल्ट ब्ल्यू- सचिन कुंडलकर
(कादंबरी)
दंशकाल- ह्रषिकेश गुप्ते (कादंबरी)

डॉ. मयांक अर्णव- आनंद विनायक जातेगावकर
(कादंबरी)
अच्युत आठवले आणि आठवणी- मकरंद साठे
(कादंबरी)

आणि कविता आवडत असतील तर ..
आणि खालचे दोन तरणेबांड, फुरफुरणारे कवी..
(पण एकेकच संग्रह काढून शांत बसलेत दोघेही.. माझा डोळा आहे त्यांच्यावर पुढं काय लिहितायत ते.. Happy )

१.धांदलमोक्ष- स्वप्नील शेळके

२.काळ्या जादूचे अवशेष- सत्यपालसिंग रजपूत ( नाव आपलं नाही वाटलं, तरी माणूस मराठीच आहे..!)

दंशकाल बेस्ट.
सातपाटलांचा कुलवृत्तांत ऐकून आहे.

पाचपाटिल, तुम्ही वेगळा धागा काढून या नवीन लेखकांविषयी आणि त्यांच्या पुस्तकांविषयी नक्की लिहा. वाचायला आवडेल. तुम्हाला हे लेखक कसे सापडले हे पण लिहा.>>>
@ जिज्ञासा: होय.. लिहायचं आहे पण लिहू लिहू म्हणत राहून गेलंय ते.. घेतो मनावर आता Happy

@ फारएण्ड >> माय प्लेझर Happy

पाचपाटील धन्यवाद. तुमचा प्रतिसाद उतरवून घेतलायं.
मी फेब्रुवारीत रसिक डॉट कॉम वरून सहा मराठी पुस्तकं घेतलीत. रोज रात्री चार पानं तरी वाचल्याशिवाय झोपत नाही. पुस्तकांचा स्पर्श व गंध आवडतो. Catholic लग्नाचा नियम आम्ही पुस्तकांना लावतो. Old, new , borrowed and blue..सगळी पुस्तकं घेत रहातो.
फा यांना मम.
दर भारतवारीत अर्धी सुटकेस मराठी पुस्तकांनी भरून आणते.
ऑनलाइन घेऊन ठेवते , सगळे जणं आधी वाचतात मगं मी आणते. मराठी वाचण्याचा वेग प्रचंड आहे त्यामानाने इंग्रजी थोडे हळूहळू आहे म्हणून मराठीला पहिली पसंती दिल्या जाते.
बाकी पुस्तकांच्या ओझ्याने शेल्फ सारखा कोसळतोयं. वर्गीकरण करणे होत नाही.. सगळं मराठी इंग्रजी एकत्र झालयं. तरीही मराठी पुस्तकांना जागा करण्यासाठी मी साड्या टाकून देऊ शकते, तेवढी चक्रम नक्कीच आहे.

धन्यवाद पाचपाटील! सातपाटील कुलवृत्तांताबद्दल ऐकून आहे. दंशकालबद्दलही ऐकलंय अर्थात. बाकी बघायला पाहिजेत.

पाचपाटील, आभार.

पुस्तके विकत घेत नाही. पण घेतली तर फक्त मराठीच घेतो आणि सहसा अनुवाद न घेता मराठीतली नवी पुस्तके घेतो. इतर पुस्तके किंडल अनलिमिटेड, लायब्ररी, दुसऱ्यांकडून मागून घेणे इत्यादी प्रकारांनी.

मराठीतले ललित साहित्य म्हणलं तर आधीचे ट्रायड अँड टेस्टेड असे सुप्रसिद्ध लेखनसुद्धा अजून वाचून पूर्ण झाले नाहीये.

आणखी एक डिस्क्लेमर देऊन ठेवतो..
वरची यादी मी माझ्या आवडीनिवडीप्रमाणे केलेली आहे, 'अलीकडची आवडलेली पुस्तके' हा एकच क्रायटेरीया लावून..

पण पुस्तकांच्या बाबतीतली आवडनिवड ही व्यक्तीपरत्वे, मूडनुसार, वयानुसार वेगवेगळी असू शकते...
त्यामुळे वरच्या लिस्टमधली पुस्तकं ऑनलाईन मागवण्यापुर्वी आणखी काही वाचणाऱ्या व्यक्तींचा अभिप्राय घेतला जावा.. किंवा मग शक्यतो पुस्तकांच्या दुकानात जाऊन ते पुस्तक ओंजळीत घेऊन, चाळून, एखादं अधलंमधलं पान वाचून 'क्लिक' झालं तरच घेतलेलं बरं होईल...
त्यामुळे होईल असं की ते पुस्तक नाही आवडलं तर त्यातून होणारं अपेक्षाभंगाचं दु:खही टळेल... आणि महत्वाचं म्हणजे अस्मादिकांचा उद्धारही टळेल.. Lol

पुस्तकांच्या दुकानात जाऊन ते पुस्तक ओंजळीत घेऊन, चाळून, एखादं अधलंमधलं पान वाचून 'क्लिक' झालं तरच घेतलेलं बरं होईल...> >हो, तसंच करणार आहे! Happy

असे एक निरीक्षण आहे की मोठ्या शहरातला म म व अलीकडे मराठी साहित्य वाचत नाही. मूलगामी आणि कसदार मराठी ललित साहित्य मुख्यत: ग्रामीण भागांतून अथवा ग्रामीण लेखकांकडून येते आणि ते ग्रामीण भागातच वाचले जाते. सोलापूर, बीड, नांदेड, नगर इथे साहित्यविषयक जागृती वाढती आहे. मुस्लिम समाजही वाचता लिहिता होऊ लागला आहे. इलाही जमादार आणि भीमराव पांचाळ ही जोडी जालावर खूप लोकप्रिय होती. अजूनही आहे. पण त्यातले इलाही जमादार सर काही महिन्यांपूर्वी वारले.
शरणकुमार लिंबाळे, सोनकांबळे, तांबोळी, पठारे हे काही दर्जेदार लेखक अजूनही शहरी म म व च्या परिघाबाहेर आहेत. रूचिभिन्नता हे एक कारण असू शकेल.

हीरा
हा फेसबुकवरचा ग्रुप आहे. ज्यात प्राध्यापक, होतकरू लेखक आणि प्रकाशक आहेत. या सर्वांना मग मराठी वाचू शकणारे जॉईन होत गेले. सतीश तांबे, गज्जू तायडे, रंगनाथ पठारे , ज्युनियर ब्रह्मे, सुनील तांबे , स्वाती ठकार, कविता महाजन असे सदस्य सक्रीय होते. या ग्रुपमधे येऊन बालाजी सुतार फेमस झाले. चव्हाटा नावाच्या ग्रुपमुळे ही मंडळी एकत्र आली.
यातल्या काहींची पुस्तके मी वाचली. पण ती छान म्हणता येत नाहीत. एक विकास गोडगे होते. त्यांचं पुस्तक असंच फेसबुक मार्केटिंगमुळे वाचलं. दुसरं डिलीट केलेलं आकाश तर चक्क शैलीचौर्य प्रकारातलं होतं. बालाजी सुतार मला अजिबात खास वाटले नाहीत. मायबोलीवर यापेक्षा दर्जेदार लेखक आहेत.
सतीश तांबे हे प्रस्थापित लेखक आहेत. ज्युनियर ब्रह्मेंचा वेगळा विनोद झेपला तरच त्यांचं पुस्तक वाचनेबल. पठारे शहरी भागात पण ठाऊक आहेत. सुनील तांबे लेखक नाहीत. पत्रकार आहेत.
गज्जू तायडे आवाजचे संपादक आणि व्यंगचित्रकार आहेत.
अशा प्रभावी लोकांमुळे काही लोकांचे सुरूवातीला नाव होते. यातले शोध कार मुरली खैरनार विशेष होते. लवकर गेले पण ते .

परदेशस्थ मराठी लोक महाराष्ट्राविषयी, मराठी भाषेविषयी पुष्कळ आस्था ठेवून असतात. पण कधी कधी जाणवते की ज्या काळात त्यांनी भारत सोडला त्या काळातच म्हणजे त्याच कालपटलामध्ये त्यांच्या महाराष्ट्र विषयक जाणीवा, संवेदना गोठून गेल्या आहेत. जणू सद्य मराठी संज्ञा प्रवाहात ही १९७०-८०-९०-२००० साली बनलेली बेटे अलिप्त अशी तरंगत राहिली आहेत. अजूनही यापैकी अनेकांचे वाचन पुलं, वपु, सावरकर, पेंडसे, पाडगावकर, सुरेश भट, फार तर ग्रेस यांपुरतेच मर्यादित राहिले आहे आणि तेच त्यांना अभिरूचीपूर्ण वाटते. अर्थात त्यांचा दोष अजिबात नाही. असे होणे अपरिहार्य आहे. स्वतः:ची अभिमुखता बदलणे सोपे नसते.
ही निरीक्षणे मायबोलीच्या अनिवासींवर बेतलेली नाहीत. उलट मला माबोवरचे परदेशस्थ मूळ महाराष्ट्रीय लोक त्यातल्या त्यात अधिक सजग, अद्यतन माहिती बाळगू इच्छिणारे वाटतात.

(पाल्हाळ पोस्ट अलर्ट)
छापील पुस्तकांचा मुख्य ऑडीयन्स वाचनालये हा होता.पण करोनाकाळात अश्या गोष्टी कमी होत जाणार.
माझ्याकडे भरपूर छापील पुस्तकं आहेत.लायब्ररी होती तेव्हा वीकेंड आधी घरात चांगलं पुस्तक हवंच असं असायचं.करोना भारतात येण्यापूर्वीच आमच्या जवळची सोयीची लायब्ररी बंद(म्हणजे एका मोठ्या चेन कडून टेकओव्हर) झाली..यात त्यांनी भरपूर फोन करून 'तुमचे पैसे कॉल सेंटर ला फोन करून जुन्या कंपनीतून परत घ्या आणि नव्यात परत गुंतवा' वगैरे चालू केलं.म्हणजे लायब्ररी चा पत्ता तोच, पुस्तकं तीच, त्यात वार्षिक पैसे माझें आणि मी अनेक ठिकाणी फोन करून आधी ते पैसे परत घ्यायचे आणि मग भरायचे.
करोना चालू झाल्यावर पहिल्यांदा लायब्ररी उघडली तेव्हा सर्व रद्द करून आले.

आता घर कामं, ऑफिस कामं यात शांत बसून छापील पुस्तकं वाचायची सवड मिळत नाही.ऑनलाईन मराठी संग्रह किंडल आणि बुकगंगा चा बराच आहे आणि आवडीनें वाचते.

अमेझॉन वगैरे सारख्या चेन वर पुस्तकं विकत, पार्सल देणे काही दोष असल्यास परत घेणे वगैरे उद्योग चालतातच.त्यांनीच काही जादा कष्ट घेऊन फिरती लायब्ररी काढावी.त्यांच्याकडे सर्व इन्फ्रा आधीपासूनच आहे.लॉकडाऊन मध्ये फिरायची परवानगी पण आहे.रेंटल मध्येही बरीच कमाई आहे.,लोकांना 'पुस्तक विकत घेतलं आणि आवडलं नाही तर पडून राहील, जागा घेईल' अशी भीती असते.

महिन्याला एक छापील पुस्तक विकत घेणार नाही.महिन्याला एक कींडल बुक घेते आणि घेईन.छापील पुस्तकं वाचायला अजूनही आवडतात.पण सध्या मिळणारा निवांत वेळ रात्री झोपताना असतो त्यामुळे त्यात ऑनलाईन पुस्तकंच वाचली जातात.

शोध भारीच होती. हो ना, दुर्दैवाने लवकर गेले मुरलीधर खैरनार. त्यांच्यावर नंतर एक चांगला लेख वाचला होता साधना किंवा अंतर्नादमध्ये.

गेल्या काही वर्षात नक्कीच बरीच पुस्तके खरेदी केली.
यातील बरीच पुस्तके जुनी, जुन्या लेखकांची होती तर काही नवीन लेखकांची देखील.
मी पुस्तके घेताना बहुतेक ललित, विज्ञानविषयक, निसर्गविषयक व मित्रमंडळींनी सुचवलेली अशी विकत घेतो. त्यातही मुख्यत्वे मराठी जास्त, परंतु काही माहितीपर व फिल्ड गाईड्स ही इंग्रजीमध्ये असतात.
संदर्भ व माहितीपर पुस्तकांची खरेदी जास्त. या खरेदीत घरी आहारविषयक व पाकशास्त्राची पुस्तके पण मागवली जातात. पुस्तके घेताना नवी, जुनी वापरलेली अशी कोणतीही घेतो.
सध्या भेट म्हणून पुस्तकेच पाठवतो.
असे असले तरी ऑनलाइन, पीडीएफ पुस्तके वाचली आहेत पण संख्या कमी.
दिलीप कुलकर्णी गतिमान संतुलन नावाचं निसर्गस्नेही जीवनशैलीवरील मासिक गेल्या १९ वर्षांपासून काढतायेत. त्याची वार्षिक वर्गणी ३० रुपये इतकी आहे (अजूनही) , परंतु आता घटत्या वर्गणीदारांमुळे हे मासिक बंद होणार आहे.
इथे व अजून काही धाग्यांवर बऱ्याच जणांनी आपल्याकडील पुस्तके रद्दीत वा वाचनालयाला देण्यासंदर्भातील अनुभव लिहिले आहेत, अश्या पुस्तकांची यादी, फोटो करून ते एका ठिकाणी एकत्रित दिल्यास इच्छुक वाचक त्यातील पुस्तके घेऊन जातील. यासारखा काही उपक्रम असल्यास त्याबद्दल माहिती द्यावी.
पाचपाटील, आपल्या यादी व प्रतिसादाबद्दल धन्यवाद. स्वतंत्र धाग्यात याविषयी अधिक माहिती द्यालच.
मायबोलीवरील या व यासारख्या अनेक धाग्यातून व त्यातील प्रतिसादांतून पुस्तकांबद्दल, इथल्या चोखंदळ वाचकांकडून नेहमीच मोलाची व अद्ययावत माहिती मिळत असते.

पाचपाटील, आपल्या यादी व प्रतिसादाबद्दल धन्यवाद. स्वतंत्र धाग्यात याविषयी अधिक माहिती द्यालच.
मायबोलीवरील या व यासारख्या अनेक धाग्यातून व त्यातील प्रतिसादांतून पुस्तकांबद्दल, इथल्या चोखंदळ वाचकांकडून नेहमीच मोलाची व अद्ययावत माहिती मिळत असते.
+१०८

@ हीरा,
मूलगामी आणि कसदार मराठी ललित साहित्य मुख्यत: ग्रामीण भागांतून अथवा ग्रामीण लेखकांकडून येते>>
सहमत आहे.. +११
उदाहरणादाखल दिनकर दाभाडेंची 'व्हाया सावरगाव खुर्द'
प्रसाद कुमठेकरांची 'बगळा' आणि 'अतीत कोन? मीच'
सदानंद बोरसेंची 'बारोमास' आणि 'चारीमेरा'
ही पुस्तकं..
आणि पठारेंची 'ताम्रपट', 'नामुष्कीचे स्वगत', 'सातपाटील', 'हारण' ह्या कादंबऱ्या आणि बाकीही पुस्तकं एक-दोन पिढ्यांत खतम होऊन जातील असं वाटत नाही..
आजचा काळ जोरकसपणे मांडणारं लिखाण आहे ते सगळं..

<<अजूनही यापैकी अनेकांचे वाचन पुलं, वपु, सावरकर, पेंडसे, पाडगावकर, सुरेश भट, फार तर ग्रेस यांपुरतेच मर्यादित राहिले आहे आणि तेच त्यांना अभिरूचीपूर्ण वाटते. अर्थात त्यांचा दोष अजिबात नाही... >>
ह्या नावांमध्ये अजून काही भर घालू शकतो.. खांडेकर, यादव, फडके,देसाई, इनामदार, सावंत.. !

आणखी सांगायचं तर ह्या लेखकांनी त्यांच्या पुस्तकांत जो काळ, जी माणसं, शहरं, गावं, खेडी मांडलेली आहेत, त्यातलं काहीच आज रिलेट होत नाही.
'तुंबाडचे खोत' मधला कोकण.... आणि आजच्या प्रवीण बांदेकरांच्या, ह्रषिकेश गुप्तेंच्या कादंबरीतला कोकण, यात फारच फरक आहे..

तसेच माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटलांच्या पुस्तकांतली गावं, खेडी आणि आजच्या पिढीतल्या लेखकांनी मांडलेली केलेली गावं, खेडी, तिथल्या माणसांचे आजचे जगण्यासाठीचे झगडे, यात जमीन अस्मानचा फरक पडलेला आहे.. आणि मी सोलापुर जिल्ह्यातल्या एका बारक्या गावातून 'पोटासाठी' पुण्यात स्थलांतरित झालेला असल्यामुळे मला हे सगळं फारच जाणवतं..

@ नारी घायाळकर,
फेसबुकचा दर्जा ढासळायला लागल्यामुळे मी सहा-सात वर्षांपूर्वीच फेसबुकला कायमचा टाटाबायबाय करून टाकलेला आहे. त्यामुळे त्या लेखकांनी फेसबुकवर काय पोस्टी पाडलेल्या आहेत, याची काहीच कल्पना नाही.
मी फक्त त्यांची पुस्तकं वाचून बघितली आहेत.. 'पुस्तक लिहिणं' ही फेसबुकवर उथळ पोस्टी पाडण्यापेक्षा अधिक मेहनत घेऊन केलेली 'गंभीर कृती' असेल असं वाटतं..
तुम्ही उल्लेख केलेल्या लेखकांपैकी सतीश तांबेचं ना. मा. निराळे आणि मॉलमध्ये मंगोल हे दोन कथासंग्रह पूर्वी वाचले होते. ठीक वाटले मला.
बालाजी सुतारांबद्दल तुमचं एक मत आहे आणि माझं एक मत आहे.. पण आपल्या दोघांचीही मतं आपापल्या परीने योग्य असू शकतात, ही शक्यता आहेच.. Lol Wink
सुनील तांबेंचे अक्षरनामावर काही लेख वाचलेले आहेत, आणि ते फक्त पत्रकार आहेत, याशी सहमत.. +१
आणि गज्जू तायडे, ज्युनियर ब्रह्मे,स्वाती ठकार, विकास गोडसे यांच्याबद्दल काहीही माहिती नाही.. त्यांचं काही वाचनात आलं नाही कधी.. मिळालं तर जरूर वाचून बघेन..
कविता महाजनांच्या 'ब्र' आणि 'भिन्न' ह्या दोन कादंबऱ्या मला वयाच्या बावीशीत प्रचंड आवडून गेल्या आहेत, कारण त्यावेळी ते सामाजिक कार्य, फेमिनीझम वगैरे बद्दल आकर्षण वाटायचं.. पण आता तसलं काही राहीलं नाही Happy

@ ऋतुराज, @ हर्पेन @ कॉमी .. _/\_ Happy

हा धागा आणि विशेषतः पाचपाटील यांचा प्रतिसाद वाचून जाणवलं की नवीन लेखकांचं मी विकत घेऊन क्वचित काही वाचलंय. (शोध - अपवाद) लायब्ररीतही नव्यांची पुस्तकं दिसली तर चाळून पाहतो व वाटलं तर घेतो. मुद्दाम मागून असं कधी घेतलेलं नाही. नवी पुस्तकं वितरीत करताना त्यांची यादी लावलेली असते, पण ती पाहूनही त्यातलं एखादं पुस्तक कधी मुद्दाम मागून वाचलेलं नाही.
अर्थात कथा कादंबरी हा माझा पहिला प्रेफरन्स नसतो. दिवाळी अंकांत यंदा पहिल्यांदाच कथा आवर्जून वाचल्या.

पाचपाटील, नव्या पुस्तकांच्या परिचयाचा स्वतंत्र धागा नक्की काढा.

विलास सारंगांना इतर नवीन लोकांबरोबर ठेवने चुकून झाले आहे का? ते मराठीतल्या साठोत्तरी साहित्याचे प्रतिनिधी. इतर लोक नव्वदोत्तरीचे दिसत आहेत. पण दुर्लक्षित राहिलेले साहित्यिक अशी थीम असेल तर ते बरोबर. त्यात चित्रे, चंद्रकांत खोत, वगैरे लोकसुद्धा येतील.

नवीन लेखकांमध्ये - श्रीधर तिळवे यांची "अ डॉ हॉ का बा ना सु ना" नावाची साहित्य कृती. तिला कादंबरी म्हणायचे की नाही तुम्ही ठरवा. तिळवे खुद्द तिला कादंबरी मानत नाहीत. काही लोक तिला अनेक कादंबऱ्यांनी बनलेली महाकादंबरी मानतात.

नवीन कवींमध्ये - नव्वदच्या दशकात हेमंत दिवटे यांनी "अभिधा" मग ते बंद झाल्यावर "अभिधा नंतर" अशी लिटल मॅगझीन चालवली. त्यातून अनेक नवीन कवी पुढे आले. खुद्द दिवटे, मंगेश नारायण काळे, सलील वाघ, मन्या जोशी, वर्जेश ईश्वरीलाल सोळंकी (यांचे नाव पाचपाटील यांच्या यादीत आहे), वगैरे.
नागराज मंजुळ्यांनीसुद्धा कवितासंग्रह लिहिला आहे.

@ नाबुआबुनमा
श्रीधर तिळवेंचं यू ट्यूब वर एक व्याख्यान ऐकलं होतं.. त्यानंतर "अ डॉ हॉ का बा ना सु ना" ह्या पुस्तकासाठी शोधाशोध केली होती काही ठिकाणी.. कुठे मिळालं नाही.. आऊट ऑफ प्रिंट होतं की काय कुणास ठाऊक तेव्हा..

मंजुळेंचा 'उन्हाच्या कटाविरुद्ध' वाचलाय आणि आवडलाय..

विलास सारंग साठोत्तरीतले असले तरी 'एन्कीच्या राज्यात' मला आजचंच वाटलं आहे, म्हणून मुद्दामच नवीन लोकांबरोबर ठेवलंय.. Happy

साठोत्तरीतला अजून एका भारी पुस्तकाकडं आपल्या लोकांनी दुर्लक्ष केलंय-- किरण नगरकरांचं 'सात सक्क त्रेचाळीस'

चंद्रकांत खोतांचं 'बिनधास्त' आणि 'उभयान्वयी अव्यय' अफलातून आहे... Wink .. त्याकाळी असलं लिहायचं म्हणजे बोंबाबोंबच झालेली असणार,.. पण नंतर नंतर ते फारच अध्यात्माच्या प्रांतात शिरले.. एवढे की ओळखूही येईनात.. आधीचे खोत आणि नंतरचे खोत.. डायरेक्ट यू टर्नच आहे..! Happy

अस्मिता.. मीपण रसिक वरून ऑर्डर करणार होतो पण मला शिपिंग पन्नास दाखवले..
पुस्तके वीस ची आणि शिपिंग पन्नास...

पाच पाटील , चंद्रकांत खोत आणि त्यांचे उभयान्वयी ह्याबद्दल + १
पूर्वी ते अ ब क ड ई चे संपादन करीत तो अंकही अफलातून निघे. दुर्गा भागवतांनीही त्यात लिहिले आहे.
अध्यात्माकडे वळल्यानंतरही दोन डोळे शेजारी ही रामकृष्ण परमहंस आणि सारदा माता यांच्यावर लिहिलेली कादंबरी, बिंब प्रतिबिंब आणि संन्याशाची सावली ही विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्यावर लिहिलेली कादंबरी रूपातली पुस्तके मला अतिशय आवडली होती. लहान मुलांसाठीचे चनिया मनिया बोर सुद्धा आवडले होते. संतांची आत्मचरित्रात्मक पुस्तकेही चांगली वाटली होती. नेहमीच्या संतचरित्रांसारखी नव्हती.

च्रप्स , महाग आहे खरं पण जरा जास्त पुस्तकं मागवायची थोडं बरं पडतं. त्यांचे वाचनालय पण आहे मी ते सुरू करणार आहे. प्रत्येक पुस्तक काही संग्रही ठेवण्यासारखे नसते. हे जरा स्वस्तही पडेल.

नवीन मराठी पुस्तकांसाठी एखादा धागा आहे का ? सध्या जो आहे त्यात इंग्रजी पुस्तकांचाच महापूर आहे, मला त्याचा पाठपुरावा करणेही होत नाही.

च्रप्स, हो नक्की .
हीरा, वरच्या प्रतिसादाची नोंद केली आहे. धन्यवाद.

Pages