आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?

Submitted by पराग र. लोणकर on 16 April, 2021 - 05:31

आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?
(या माझ्या लेखावर मला अगदी प्रामाणिक प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. माझे येथे काही चुकत असेल तर तेही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.)

खरं तर हा लेख लिहायला मी योग्य व्यक्ती नाही असं मला वाटतं. कारण मी स्वत: किंचितसा लेखक आहे आणि बराचसा प्रकाशक. तरीही या विषयावर लिहिण्याची ओढ स्वस्थ बसू देत नाही म्हणून लिहित आहे. वाचकांनी त्याबद्दल मला मोठ्या मनाने क्षमा करावी.

आज कोरोनाच्या संकटामुळे आपल्यापैकी बरीच मंडळी घरी बसून आहेत (किंवा त्यांनी तसे बसणे अपेक्षित आहे.). वाचनासाठी आता नक्कीच आपण वेळ काढू शकतोय.

एरवी मात्र (कोरोना नव्हता तेव्हा, आणि नसेल तेव्हाच्या) आपल्या धावपळीच्या जगात नोकरी-व्यवसायासाठी धावपळ करण्यात आपण इतके व्यस्त असतो, की जो काही थोडासा वेळ मिळतो त्या वेळात मोबाईलवर Whatsapp, फेसबुक वगैरे ठिकाणी जे जे वाचायला मिळते, त्याचा आपण आस्वाद घेतो आणि आपल्यामध्ये अजूनही जी काही वाचनाची किंचीतशी भूक शिल्लक आहे ती भागवतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, या सगळ्यात आपण काही चुकतोय असं मला किंचितही वाटत नाहीये. त्याबद्दल एक लेखक-प्रकाशक असूनही मी कुणासही काडीचाही दोष देत नाही.

पुस्तकानं कसं ज्ञान मिळतं, ती कशी जीवनावश्यकच आहेत, ती कशी आपली खरी मित्र असतात वगैरेवरही मी माझं काहीही (अल्प असलं तरी) ज्ञान इथे पाजळणार नाही. हे सारं एक तर बहुतेकांना माहीत असतं, किंवा यावर काहींचा विश्वास नसतो, पुस्तकं एकूण आपल्या जीवनात तितकी काही महत्वाची नसतात असं काहींचं प्रामाणिक मत असू शकतं. मागे (पंधरा-एक वर्षांपूर्वी) एका व्यक्तीने मला `मी अजिबात पुस्तक वाचत नाही!` असं अगदी अभिमानाने सांगितल्याचं मला आठवतं. `ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला खेद वाटला पाहिजे, तीच गोष्ट तुम्ही अभिमानाने सांगताय,` असं बोलावंसं मला वाटूनही मी त्याला फक्त नमस्कार करता झालो.

आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का? हा माझा प्रश्न वेगळ्याच कारणाने आहे.

आज एकूण मराठी वाचू शकणाऱ्या मंडळींची लोकसंख्या लक्षात घेतली, तर त्या संख्येपुढे पुस्तक; तेही मराठी भाषेतील- विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या खूपच रोडावली आहे असे माझे निरीक्षण आहे. मी आज माझे जवळ-लांबचे नातेवाईक, मित्र, परिचित जेव्हा डोळ्यापुढे आणतो, तेव्हा यापैकी कुणीच गेल्या काही वर्षांत मराठीतील एखादे पुस्तक विकत आणल्याचे, त्यावर काही चर्चा केल्याचे मला किंचितही आठवत नाही. क्वचित एखाद्याने एखादे उपयुक्त ठरणारे (आरोग्य, व्यक्तिमत्व विकास इ.) ललितेतर पुस्तक विकत घेतले असेलही, परंतु एखादा चांगला कथासंग्रह, कादंबरी, प्रवास वर्णन असे ललित पुस्तक विकत आणलेले मला तरी आढळलेले नाही. तुमचेही निरीक्षण कदाचित असेच असू शकेल. (किंवा नसले, तर उत्तमच!)

आज मराठी ललित साहित्याच्या विश्वाचे जे अर्थकारण आहे, त्यात केवळ लेखक-प्रकाशकाचेच नाही, तर छपाई यंत्रणेशी निगडीत प्रत्येक घटक (कागद विक्री करणाऱ्यापासून पुस्तक बांधणी करणाऱ्यांपर्यंत, चित्रकारांपासून अक्षर जुळणी करणाऱ्यांपर्यंत), पुस्तक विक्रीच्या क्षेत्रात विविध पातळ्यांवर काम करणारे घटक, या वरील प्रत्येक घटकाकडे काम करणारा कर्मचारी वर्ग या सगळ्यांचे पोट, संसार अवलंबून आहे. या पुस्तक व्यवसायातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. साहित्य व्यवहाराशी संबंधित नसलेल्या मंडळींना याची व्याप्ती अनेकदा लक्षात येत नाही. आपण विकत घेतलेले प्रत्येक पुस्तक हे या मंडळींसाठी किती महत्वाचे असते याबाबत आपण तसे अनभिज्ञच असतो.

माझ्यापुढील भीती या साऱ्या (मीही यात आहेच!) मंडळींच्या पोटापाण्याची असली तरीही त्याने मी फारसा चिंतीत नाही. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. विचार केला तर अश्या अनेक गोष्टी आढळतील ज्या कालानुरूप लुप्त झाल्या. त्या गोष्टींवर अवलंबून असलेल्या मंडळींना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे सध्या साहित्य व्यवहाराच्या अर्थकारणावर अवलंबून असलेल्या आम्हा मंडळींचीही मला एका मर्यादेपलीकडे चिंता नाही. कारण जर वैयक्तिक (मराठी) वाचक वर्ग असा कमी होत गेला तर आम्हालाही नवीन, एकदम वेगळे मार्ग स्वीकारावे लागतील, अनेकांना स्वत:ला अथवा पुढच्या पिढीला वेगळ्या नोकरी-व्यवसायात शिरावे लागेल आणि हळूहळू अगदी निवडक व्यक्ती या व्यवसायात राहून अगदी लहानश्या स्वरूपात मराठी भाषेतील साहित्य संस्कृती जिवंत राहू शकेल. माझी खरी भीती हीच आहे.

आजची ललित साहित्याबाबतची उदासीनता मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि एकूणच मराठी लेखन-वाचनासंदर्भातील मराठी भाषा यांच्या भविष्याच्या दृष्टीने मला खूपच घातक वाटते. आजच्या तरुण पिढीतील आई-वडील जर घरामध्ये मराठी भाषेतील ललित साहित्याचे वाचनच करताना दिसली नाही तर पुढील पिढीला मराठी पुस्तकांबद्दल आत्मीयता कशी वाटणार? आई-वडील अश्या साहित्याचे वाचन करताना दिसले, सामान्यत: रोज किमान दोन-तीन पानांचे वाचन करताना दिसले, तरच त्यांच्या मुला-मुलींच्या मनात मराठी साहित्याविषयी, पुस्तकांविषयी उत्सुकता निर्माण होऊ शकेल.

पुस्तकं महाग झाली आहेत, अशीही ओरड (अगदी पूर्वीइतकी नसली तरी, काही प्रमाणात) आपल्याला ऐकू येत असते. आजकाल पुस्तक खरेदीबाबत उत्सुकताच कमी झाली असल्याने याबाबत तक्रारीचा सूर पूर्वी इतका येत नाही. पुस्तकांच्या किंमती बऱ्याचदा खरोखरच जास्त असतात, असे मानले, तरी अनेकदा वेगवेगळ्या सवलत योजना चालू असताना ही पुस्तकं अगदी योग्य किमतीत मिळू शकतात. आज आपण बाकी गोष्टींकरता किती किती आणि कसा कसा खर्च करत असतो याचे अंदाज पत्रक कुणीही सहज करू शकतो. घरातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दरमहा आपण टाकत असलेले data pack, T.V. साठी आपण दरमहा करत असलेले विविध प्रकारचे खर्च (डीश t.v. recharge, netflix किंवा तत्सम गोष्टींवरील दरमहा करायचे खर्च, (कोरोनापूर्व काळात) आपण करत असलेले Hoteling, Mallsमधील खरेदी, Multiplex चित्रपट गृहांमध्ये जाणे इत्यादी खर्च) हा सारा दर महिन्याचा खर्च आपण मोजला तर आपण मराठी ललित पुस्तकांच्या खरेदीसाठी २०० रुपयांचा नाममात्र खर्च खरंच करू शकत नाही का? याचा विचार व्हावा असं मला वाटतं. शिवाय यात खरेदी ही तुम्हाला हव्या असलेल्या लेखकाच्या, तुम्हाला आवडणाऱ्या विषयाच्या, तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकाचीच करायची आहे. आज गुगल मित्राच्या सहाय्याने मी महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांची संख्या काढली असता ती (२०११ मध्ये) पावणे आठ कोटी इतकी दर्शवली गेली. अगदी सहा लोकांचे एक कुटुंब गृहीत धरले तरी सव्वा कोटीहून अधिक मराठी कुटुंब महाराष्ट्रात आहेत. यातील प्रत्येकाने दर महिन्याला फक्त २०० रुपयांच्या मराठी ललित पुस्तकांच्या खरेदीचा निश्चय केला तर ते केवळ मराठी साहित्य विश्वावर अवलंबून असणाऱ्या मंडळींसाठी वरदान ठरणार नाही, तर भविष्यात मराठी भाषेवरच जे भयावह संकट आल्याचे मला जाणवत आहे, तेही निश्चित दूर होऊन, उलट मराठी साहित्य आणि संस्कृतीने जो उज्ज्वल भूतकाळ पाहिला आहे, तो पुढील काही दशकांत पुन्हा साकार झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. घरोघरी पुस्तक खरेदीची (मग ती कितीही अल्प किमतीच्या पुस्तकांची असो!) संस्कृती रुजवण्यासाठी लढा द्यायची आता वेळ आली आहे असे मला वाटते.

आज आपल्या शासनाकडून सर्वात दुर्लक्षित क्षेत्र जर कुठले असेल, तर ते मराठी साहित्य क्षेत्र आहे अशी परिस्थिती आहे. अर्थात मराठी भाषा, मराठी लेखन-वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला शासनावर अवलंबून रहायची वेळ येणे हीदेखील आपल्यासाठी खेद करावी अशीच परिस्थिती असेल. त्यामुळे आता प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीने यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.

आणि यासाठी दर महिन्याला किमान एक, २०० रुपयांचे, मराठी ललित पुस्तक खरेदी करणे, हा फार मोठा खर्च नसेल, असे वाटते.

- पराग लोणकर.

Group content visibility: 
Use group defaults

किरण नगरकर, अरुण कोलटकर हे महान लेखक तितक्याच महानपणे दुर्लक्षित आहेत. दि. पु. चित्रेही त्यांच्यात येऊ शकतील. पण अर्थात आम पब्लिकवर असे लेखक वाचण्याची सक्ती कशी करता येईल, आणि नाही वाचले म्हणूनही बिघडत नाही पब्लिकचे. त्यांना आवडेल तेच ते वाचतील ना!

>>>>>>>>>अध्यात्माकडे वळल्यानंतरही दोन डोळे शेजारी ही रामकृष्ण परमहंस आणि सारदा माता यांच्यावर लिहिलेली कादंबरी, बिंब प्रतिबिंब आणि संन्याशाची सावली ही विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्यावर लिहिलेली कादंबरी रूपातली पुस्तके मला अतिशय आवडली होती.

नोटेड!!

मी सात्यत्याने पुस्तके विकत घेतो ... पूर्वी पुण्याच्या अत्रे सभागृहात भरणारे पुस्तक प्रदर्शन हे आमचे हक्काचे ठिकाण होते.
तसेच अक्षरधारा मध्ये निवांत बसून पुस्तके चाळणे आणि मग एकगठ्ठा विकत घेणे हा आवडता छंद होता ...

आयडियल कॉलनीतले पुस्तक पेठ ही आवडते ठिकाण ..

पुस्तके विकत घेऊनच वाचतो ... आणि भेट म्हणून पुस्तके आवर्जून देतो

सध्या करोनमुळे ह्या सगळ्याला मुकलोय

आता लक्षात आलं की सध्याच्या लेखकांत मिलिंद बोकील आणि श्याम मनोहर यांची पुस्तके विकत घेतली आहेत आणि लायब्ररीत मागून घेऊन वाचली आहेत.

आता लक्षात आलं की सध्याच्या लेखकांत मिलिंद बोकील आणि श्याम मनोहर यांची पुस्तके विकत घेतली आहेत आणि लायब्ररीत मागून घेऊन वाचली आहेत.>>
@भरत,
बोकीलांचं 'गवत्या' मला फारच आवडतं... आनंद नावाच्या तरूणाच्या आत्मशोधाचा प्रवास आहे त्यात.. तर तो असतो मुंबईत वाढलेला.. त्याचं कोणत्याच कामामध्ये मन रमत नसतं... मग ह्या अस्थिरतेतून तो शेवटी एका लहानशा गावात एका गांधीवादी आश्रमाचं काम सांभाळण्यासाठी जाण्याचं ठरवतो.. तिथं त्याला एक 'गुरूजी' भेटतात आणि त्याला रस्ता सापडत जातो.. शिवाय तिथं 'गवत्या' नावाचा एक डोंगर असतो, तर त्याच्याशी या आनंदचं एक सुंदर नातं जुळतं.. आणि एकूणच सगळ्या कादंबरीतली बोकीलांची भाषा एवढी काव्यात्म आणि प्रवाही आहे की ते थेट समोरासमोर बसून आपल्याशी बोलताहेत असं वाटत राहतं.. Happy

आणि श्याम मनोहरांची सगळीच पुस्तकं बौद्धिक, मानसिक आनंद देणारी आणि चिंतनशील आहेत..
खालच्या लिंकवर त्यांचं एकमेव व्याख्यान उपलब्ध आहे.. ते ऐकलं की वाटतं हा माणूस किती मोठ्या कॅनव्हासवर बघतो एखाद्या विषयाकडे, एखाद्या गोष्टीकडे .. Happy
https://youtu.be/vRGW-PQBRbE

Happy
बोकिलांचं कथा कादंबरी व्यतिरिक्त इतर लेखनही मला मस्ट रीड वाटतं.
मी अजून फार कमी बोकील वाचलेत.
गंमत म्हणजे त्यांच्या तीन दीर्घकथा/ लघुकाद़ंबऱ्यांत सुट्टी घालवायला दूर आलेलं जोडपं, विवाह बाह्य संबंध आणि
नात्यांचं microsnalysis या एका पॅटर्न मधल्या वाचनात आल्या.
सरोवर, समुद्र. तिसरी बहुतेक आता दिवाळी अ़ंकात वाचली.

मनोहरांच्या कादंबऱ्यांचाही एक पॅटर्न ठरलाय असं वाटतं. पण मला आवडतात. तुम्ही म्हणताय ते आहेच.

बोकिलांची 'सरोवर' दिवाळी अंकात वाचली आहे. उदकाचिया आर्ती ही कथाही वाचली. आवडल्या दोन्ही. शाळा तर आवडतेच. भरत म्हणतात तसं इतर लेखनही आवडतं त्यांचं.

बोकीलांचं 'गवत्या' मला फारच आवडतं...>> मला पण. गवत्या मी विकत घेतले आहे. आमच्या घरा समोरील इन्टर नॅशन ल बुक डेपो मधून. आज शोधून परत वाचते.

मिलिंद बोकीलांच्या 'रण' आणि 'दुर्ग' ह्या दोन दीर्घकथा किंवा लघुकादंबऱ्याही छान आहेत... (मौज प्रकाशन)

मराठीत वेगळ्या पठडीच्या कादंबऱ्या थोड्या असल्या तरी येत राहतात. जातेगावकरांची 'अस्वस्थ वर्तमान' आणि ररु पंढरीनाथांची 'खेळघर' ही दोन उदाहरणे देता येतील. कविता महाजनही चांगले लिहायच्या पण त्या फार लवकर गेल्या. अजून थोडीफार नावे आहेत तशी.

आता धागा 'मराठी पुस्तकांची चर्चा' इकडे सरकू लागला आहे. तो कुणी नवीन काढा.
_______________________________
आज आपल्या शासनाकडून सर्वात दुर्लक्षित क्षेत्र जर कुठले असेल, तर ते मराठी साहित्य क्षेत्र आहे अशी परिस्थिती आहे.
हे अगदी पटलं.
________________
मी विकत घेतलेलं(३० वर्षांत) मराठी पुस्तक - सोहोनींचा इंग्रजी मराठी शब्दकोश. कारण कामाचा संदर्भ ग्रंथ आहे. विरकरांचा अगोदरपासून होता तो शाळेत असल्यापासून वापरत होतो.
पांडुरंग पाटणकरांची दोन पुस्तके गुजरात,मप्र सहलींची. कामाची पुस्तकं. विरंगुळ्याची नाहीत.
________________________________
मग प्रश्न असा येतो की बाकी काही मराठी पुस्तकं वाचन केलंच नाही का? - केलं. रग्गड वाचलीत.
कशी? वाचनालयांतून. साधारणपणे एका कादंबरीच्या किंमतीच्या वर्गणीत ( subscription मध्ये )चार पाच वाचता येतात आणि इतर बरीच वाचनालयातच चाळायला मिळाल्याने 'ही आपल्यासाठी नाहीत' हे लगेच ठरवता येतं.
जागेची अडचण राहात नाही, छापील पुस्तक वाचायचा आनंद मिळतो.

म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुस्तके विकत घेऊन वाचली नाहीत.
महिना २०० रुपये(पूर्वीचे १५०/१००/८० वगैरे ) खर्च केले का पुस्तकांसाठी? - होय.

______________________
आता प्रकाशन व्यवसाय तरंगत राहावा याबद्दल मी एक सामान्य वाचक काय सांगणार - नव्या वाटा शोधा.
* स्थानिक तरुणांना वाचनालयासाठी सहाय्य करा.
____________________
तुम्हाला आणि तुमच्या प्रकाशन व्यवसाय बंधुंना शुभेच्छा. मराठी पुस्तक प्रकाशन सुरू राहावे.

गुजराती भाषेतला साहित्य व्यवहार पुष्कळच अर्थसंपन्न आहे. त्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहून आपले डोळे पांढरे होतात. कुठल्याही समाजाची आर्थिक स्थिती, आर्थिक दृष्टिकोन, उद्यमशीलता ह्यावर त्या समाजाची एकंदर संस्कृती उभी असते किंवा त्याच्याशी समप्रमाणात समृद्ध असते असे विधान केले तर ते धारष्ट्याचे (रफार समजावा) होईल काय? मात्र, गुजराती समाज हा वाचनशील नाही.(आणि तरीही लेखक, प्रकाशक, साहित्यकर्मी, नाटककार, नाट्यकर्मी हे फायद्यात असतात.)

.......गुजराती समाज हा वाचनशील नाही.(आणि तरीही लेखक, प्रकाशक, साहित्यकर्मी, नाटककार, नाट्यकर्मी हे फायद्यात असतात.)>>>>>>
ही जादू कशी काय होते?

मध्यरात्रीची मुंबई / ईब्लीस / पैंजण इत्यादी चांगली खपत असतानाही त्यावर बंदी आणली. कामसूत्रही मिळत नाही कुठे.
स्त्री- वशीकरण / मोहिनीविद्या / काला जादू या साहित्याला प्रचंड मागणी आहे पण प्रतिष्ठा मिळू देत नाहीत. मग ओरडा कशाला ?

हा धागा "वाचू आनंदे" ग्रुपमध्ये हवा.
----------

सध्याच्या लक्षणीय लेखकांच्या यादीत भर - किरण गुरव ( एका वाचत्या मित्राने सांगितलेलं नाव.)

सध्याच्या लक्षणीय लेखकांच्या यादीत भर - किरण गुरव>>
+११
राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी हे त्यांचे कथासंग्रह वाचले आहेत.. आणि आवडलेही आहेत..
शिवाय 'जुगाड' ही आहे अगदी लेटेस्ट, या वर्षातला..

त्या लेखकांच्या यादीत कमल देसाई हेही नाव हवं.>
+१

उन्हाळी सुट्टीत कुमार वयातील मुलांनी नेमकं काय वाचायला हवं, याबद्दल विविध क्षेत्रांतील १०० मान्यवरांनी ‘लोकसत्ता’ला केलेली ‘पुस्तक शिफारस’:
https://www.loksatta.com/lokrang-news/read-creative-people-computer-comp...

Pages