आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?

Submitted by पराग र. लोणकर on 16 April, 2021 - 05:31

आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का?
(या माझ्या लेखावर मला अगदी प्रामाणिक प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. माझे येथे काही चुकत असेल तर तेही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.)

खरं तर हा लेख लिहायला मी योग्य व्यक्ती नाही असं मला वाटतं. कारण मी स्वत: किंचितसा लेखक आहे आणि बराचसा प्रकाशक. तरीही या विषयावर लिहिण्याची ओढ स्वस्थ बसू देत नाही म्हणून लिहित आहे. वाचकांनी त्याबद्दल मला मोठ्या मनाने क्षमा करावी.

आज कोरोनाच्या संकटामुळे आपल्यापैकी बरीच मंडळी घरी बसून आहेत (किंवा त्यांनी तसे बसणे अपेक्षित आहे.). वाचनासाठी आता नक्कीच आपण वेळ काढू शकतोय.

एरवी मात्र (कोरोना नव्हता तेव्हा, आणि नसेल तेव्हाच्या) आपल्या धावपळीच्या जगात नोकरी-व्यवसायासाठी धावपळ करण्यात आपण इतके व्यस्त असतो, की जो काही थोडासा वेळ मिळतो त्या वेळात मोबाईलवर Whatsapp, फेसबुक वगैरे ठिकाणी जे जे वाचायला मिळते, त्याचा आपण आस्वाद घेतो आणि आपल्यामध्ये अजूनही जी काही वाचनाची किंचीतशी भूक शिल्लक आहे ती भागवतो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, या सगळ्यात आपण काही चुकतोय असं मला किंचितही वाटत नाहीये. त्याबद्दल एक लेखक-प्रकाशक असूनही मी कुणासही काडीचाही दोष देत नाही.

पुस्तकानं कसं ज्ञान मिळतं, ती कशी जीवनावश्यकच आहेत, ती कशी आपली खरी मित्र असतात वगैरेवरही मी माझं काहीही (अल्प असलं तरी) ज्ञान इथे पाजळणार नाही. हे सारं एक तर बहुतेकांना माहीत असतं, किंवा यावर काहींचा विश्वास नसतो, पुस्तकं एकूण आपल्या जीवनात तितकी काही महत्वाची नसतात असं काहींचं प्रामाणिक मत असू शकतं. मागे (पंधरा-एक वर्षांपूर्वी) एका व्यक्तीने मला `मी अजिबात पुस्तक वाचत नाही!` असं अगदी अभिमानाने सांगितल्याचं मला आठवतं. `ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला खेद वाटला पाहिजे, तीच गोष्ट तुम्ही अभिमानाने सांगताय,` असं बोलावंसं मला वाटूनही मी त्याला फक्त नमस्कार करता झालो.

आपण दर महिन्याला एक पुस्तक विकत घेऊ शकतो का? हा माझा प्रश्न वेगळ्याच कारणाने आहे.

आज एकूण मराठी वाचू शकणाऱ्या मंडळींची लोकसंख्या लक्षात घेतली, तर त्या संख्येपुढे पुस्तक; तेही मराठी भाषेतील- विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या खूपच रोडावली आहे असे माझे निरीक्षण आहे. मी आज माझे जवळ-लांबचे नातेवाईक, मित्र, परिचित जेव्हा डोळ्यापुढे आणतो, तेव्हा यापैकी कुणीच गेल्या काही वर्षांत मराठीतील एखादे पुस्तक विकत आणल्याचे, त्यावर काही चर्चा केल्याचे मला किंचितही आठवत नाही. क्वचित एखाद्याने एखादे उपयुक्त ठरणारे (आरोग्य, व्यक्तिमत्व विकास इ.) ललितेतर पुस्तक विकत घेतले असेलही, परंतु एखादा चांगला कथासंग्रह, कादंबरी, प्रवास वर्णन असे ललित पुस्तक विकत आणलेले मला तरी आढळलेले नाही. तुमचेही निरीक्षण कदाचित असेच असू शकेल. (किंवा नसले, तर उत्तमच!)

आज मराठी ललित साहित्याच्या विश्वाचे जे अर्थकारण आहे, त्यात केवळ लेखक-प्रकाशकाचेच नाही, तर छपाई यंत्रणेशी निगडीत प्रत्येक घटक (कागद विक्री करणाऱ्यापासून पुस्तक बांधणी करणाऱ्यांपर्यंत, चित्रकारांपासून अक्षर जुळणी करणाऱ्यांपर्यंत), पुस्तक विक्रीच्या क्षेत्रात विविध पातळ्यांवर काम करणारे घटक, या वरील प्रत्येक घटकाकडे काम करणारा कर्मचारी वर्ग या सगळ्यांचे पोट, संसार अवलंबून आहे. या पुस्तक व्यवसायातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. साहित्य व्यवहाराशी संबंधित नसलेल्या मंडळींना याची व्याप्ती अनेकदा लक्षात येत नाही. आपण विकत घेतलेले प्रत्येक पुस्तक हे या मंडळींसाठी किती महत्वाचे असते याबाबत आपण तसे अनभिज्ञच असतो.

माझ्यापुढील भीती या साऱ्या (मीही यात आहेच!) मंडळींच्या पोटापाण्याची असली तरीही त्याने मी फारसा चिंतीत नाही. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. विचार केला तर अश्या अनेक गोष्टी आढळतील ज्या कालानुरूप लुप्त झाल्या. त्या गोष्टींवर अवलंबून असलेल्या मंडळींना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला. त्यामुळे सध्या साहित्य व्यवहाराच्या अर्थकारणावर अवलंबून असलेल्या आम्हा मंडळींचीही मला एका मर्यादेपलीकडे चिंता नाही. कारण जर वैयक्तिक (मराठी) वाचक वर्ग असा कमी होत गेला तर आम्हालाही नवीन, एकदम वेगळे मार्ग स्वीकारावे लागतील, अनेकांना स्वत:ला अथवा पुढच्या पिढीला वेगळ्या नोकरी-व्यवसायात शिरावे लागेल आणि हळूहळू अगदी निवडक व्यक्ती या व्यवसायात राहून अगदी लहानश्या स्वरूपात मराठी भाषेतील साहित्य संस्कृती जिवंत राहू शकेल. माझी खरी भीती हीच आहे.

आजची ललित साहित्याबाबतची उदासीनता मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि एकूणच मराठी लेखन-वाचनासंदर्भातील मराठी भाषा यांच्या भविष्याच्या दृष्टीने मला खूपच घातक वाटते. आजच्या तरुण पिढीतील आई-वडील जर घरामध्ये मराठी भाषेतील ललित साहित्याचे वाचनच करताना दिसली नाही तर पुढील पिढीला मराठी पुस्तकांबद्दल आत्मीयता कशी वाटणार? आई-वडील अश्या साहित्याचे वाचन करताना दिसले, सामान्यत: रोज किमान दोन-तीन पानांचे वाचन करताना दिसले, तरच त्यांच्या मुला-मुलींच्या मनात मराठी साहित्याविषयी, पुस्तकांविषयी उत्सुकता निर्माण होऊ शकेल.

पुस्तकं महाग झाली आहेत, अशीही ओरड (अगदी पूर्वीइतकी नसली तरी, काही प्रमाणात) आपल्याला ऐकू येत असते. आजकाल पुस्तक खरेदीबाबत उत्सुकताच कमी झाली असल्याने याबाबत तक्रारीचा सूर पूर्वी इतका येत नाही. पुस्तकांच्या किंमती बऱ्याचदा खरोखरच जास्त असतात, असे मानले, तरी अनेकदा वेगवेगळ्या सवलत योजना चालू असताना ही पुस्तकं अगदी योग्य किमतीत मिळू शकतात. आज आपण बाकी गोष्टींकरता किती किती आणि कसा कसा खर्च करत असतो याचे अंदाज पत्रक कुणीही सहज करू शकतो. घरातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दरमहा आपण टाकत असलेले data pack, T.V. साठी आपण दरमहा करत असलेले विविध प्रकारचे खर्च (डीश t.v. recharge, netflix किंवा तत्सम गोष्टींवरील दरमहा करायचे खर्च, (कोरोनापूर्व काळात) आपण करत असलेले Hoteling, Mallsमधील खरेदी, Multiplex चित्रपट गृहांमध्ये जाणे इत्यादी खर्च) हा सारा दर महिन्याचा खर्च आपण मोजला तर आपण मराठी ललित पुस्तकांच्या खरेदीसाठी २०० रुपयांचा नाममात्र खर्च खरंच करू शकत नाही का? याचा विचार व्हावा असं मला वाटतं. शिवाय यात खरेदी ही तुम्हाला हव्या असलेल्या लेखकाच्या, तुम्हाला आवडणाऱ्या विषयाच्या, तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकाचीच करायची आहे. आज गुगल मित्राच्या सहाय्याने मी महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांची संख्या काढली असता ती (२०११ मध्ये) पावणे आठ कोटी इतकी दर्शवली गेली. अगदी सहा लोकांचे एक कुटुंब गृहीत धरले तरी सव्वा कोटीहून अधिक मराठी कुटुंब महाराष्ट्रात आहेत. यातील प्रत्येकाने दर महिन्याला फक्त २०० रुपयांच्या मराठी ललित पुस्तकांच्या खरेदीचा निश्चय केला तर ते केवळ मराठी साहित्य विश्वावर अवलंबून असणाऱ्या मंडळींसाठी वरदान ठरणार नाही, तर भविष्यात मराठी भाषेवरच जे भयावह संकट आल्याचे मला जाणवत आहे, तेही निश्चित दूर होऊन, उलट मराठी साहित्य आणि संस्कृतीने जो उज्ज्वल भूतकाळ पाहिला आहे, तो पुढील काही दशकांत पुन्हा साकार झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. घरोघरी पुस्तक खरेदीची (मग ती कितीही अल्प किमतीच्या पुस्तकांची असो!) संस्कृती रुजवण्यासाठी लढा द्यायची आता वेळ आली आहे असे मला वाटते.

आज आपल्या शासनाकडून सर्वात दुर्लक्षित क्षेत्र जर कुठले असेल, तर ते मराठी साहित्य क्षेत्र आहे अशी परिस्थिती आहे. अर्थात मराठी भाषा, मराठी लेखन-वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला शासनावर अवलंबून रहायची वेळ येणे हीदेखील आपल्यासाठी खेद करावी अशीच परिस्थिती असेल. त्यामुळे आता प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीने यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.

आणि यासाठी दर महिन्याला किमान एक, २०० रुपयांचे, मराठी ललित पुस्तक खरेदी करणे, हा फार मोठा खर्च नसेल, असे वाटते.

- पराग लोणकर.

Group content visibility: 
Use group defaults

घेउ शकतो. नवी पुस्तके आवडतात पण. पण आपल्या माघारी रद्दी काढून टाकायचा कहार नको म्हणून असले सर्व खर्च कमी केले आहेत. जे
ऑन लाइन फुकट तेच वाचतो. ब्लूम बर्ग . कॉम ची किंवा न्युज लाँड्रीची पण सब स्क्रिप्शन हवी आहे पण खर्च करवत नाही. फार पूर्वी पासून
रद्दीच्या दुकानातून पुस्तके दिवाळी अंक घेतो किंवा मग लायब्ररीतून. आहे ती बुक केस खाली करायच्या मोड मध्ये आहे. दुसरे म्हणजे हार्ड कॉपी वाचायला त्रास होतो टेक्स्ट मोठे करता येत नाही. असे माझ्या सारखे उत्तम मराठी वाचायला आवडणारे बरेच असतील पण वयस्कर व
रिटायरमेंट इन कम वर जगणारे हे घेउ शकत नाहीत. घेउ इच्छित नाहीत.

मी साधारण २००० ते २०१७ महिन्याला किमान एक (बहुतेक २+) पुस्तक विकत घेतलंय पण इंग्रजी + मराठी. त्यात मराठी कमी (२० -२५%) इंग्रजी जास्त.

त्यांनतर वाचन अचानक कमी झाले आहे.
आता आवर्जून मराठी पुस्तके घ्यायचा विचार करतोय, बरेच वाचायचे आहे आणि हैद्राबादला मी जिथे रहातो, मराठी ग्रंथालय खूपच लांब आणि प्रचंड रहदारीच्या रस्त्याने जावे लागेल अशा ठिकाणी आहे. तेव्हा विकतच घ्यावे लागेल.
सुरवात करतो.

विकत घ्यायला काहीच हरकत नाही पण मुंबईसारख्या ठिकाणी एका चौ. फू. ला ३०-३५हजार रुपये पडत असताना पुस्तकांसाठी घरात जागा उपलब्ध करून देणे अत्यंत कठीण आहे. पुस्तक वाचून झाल्यावर संदर्भासाठी ठेवायचेसुद्धा जीवावर येते. आजकाल ग्रंथा लयांनासुद्धा जागा पुरत नाही. जुनी पुस्तके काढून टाकली तरच नवी ठेवायला जागा मिळते. त्यामुळे खाजगी संग्रह ठेवून घेण्यास ग्रंथालये सुद्धा उत्सुक नसतात.
नाईलाज आहे.

मी या जानेवारीत प्रदर्शनात जाऊन तीन मराठी विकत घेतली.
आता थेट पुढच्या वर्षी बघेन.
या विषयावरील मनोगत मी इथे व्यक्त केले आहे :

https://www.maayboli.com/node/72314

चांगले पुस्तक लिहिणारे कधीच मेलेत , त्यांचे साहित्य फुकट उपलब्ध आहे , आपल्या 200 ने त्यांचे आता काही बिघडत नाही

पुस्तकं घ्यायला हरकत नाही. पण जागेचा प्रॉब्लेम आहेच. त्यामुळे इच्छा असून पुस्तकं कमी घेतली जातात. मराठी पुस्तकं डिजीटल झाली तर उत्तम. आत्ता नाहीत असं नाहीये पण त्यांचा डिजीटल दर्जा सुमार असतो हा स्वानुभव. शिवाय सगळीच पुस्तकं डिजीटाईझ्ड नाहीत.

दुसरं म्हणजे इंग्रजीमधे नॉन फिक्शनमधे किंवा बालसाहित्यामधे प्रचंड वैविध्य आहे आणि उत्तम दर्जाची डिजीटाईझ्ड पुस्तकं मिळतात. त्यामुळे ती जास्त घेतली जातात.

यावर प्रकाशन व्यवसाय विचार करणार आहे का?

हिरा तुम्ही विचार केला असेलच पण नसेल तर ग्रामीण भागातील ग्रंथालयांना पुस्तके देऊ शकता. तिथे कायम पुस्तके कमी असतात आणि जागा भरपूर.

>>>>पुस्तकं घ्यायला हरकत नाही. पण जागेचा प्रॉब्लेम आहेच. त्यामुळे इच्छा असून पुस्तकं कमी घेतली जातात.>>> पुस्तक वाचून पास ऑन करायचे असते. अमेरीकेत तरी फुकट ग्रंथालये असतात. जाउन मुकाट्याने पुस्तक तिथे ठेउन यायचे, एखादे उचलून घेउन यायचे. क्वचीत सुंदर पॅक केलेले पुस्तक बस स्टॉपवरती सापडलेले आहे. ज्यात चिठ्ठी होती की ज्याला हे पुस्तक सापडेल त्याने वाचून परत असेच एखाद्या सार्वजनिक स्थळी सोडून द्यावे..

नवलेखकांच्या साहित्यनिर्मितीसाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत तेही सांगा.
गतवर्षी तुम्ही तसे आश्वासन इथे दिलेले आहे
https://www.maayboli.com/node/73934

मला स्वतःला छापिल पुस्तके वाचायला आवडत नाही. (फॉन्ट मोठा करता येत नाही, जागा खुप लागते, कसर/वाळवी लागते, इतर जण मागुन नेतात पण परत करत नाहीत, मला जेव्हा मोकळा वेळ असतो त्या ठिकाणी उपलब्ध नसणे, पर्यावरणाला हानीकारक इत्यादी बरीच कारणं आहेत)

छापिल पुस्तकांची सवय असलेल्या सध्याच्या पिढीतल्या बर्‍याच जणांसाठी त्या पुस्तकांचा स्पर्श, गंध हा एक हळवा मुद्दा असतो. पण विविध स्क्रीन्सना सरावलेली (चटावलेली?) नविन पिढी लवकरच ( फार तर फार १०-१५ वर्षांत) त्यांचं बहुतेक वाचन (? की कंटेंट कंझंप्शन) डिजीटल स्वरुपात करणार याबद्दल मला अजिबात शंका नाही.

>> या पुस्तक व्यवसायातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
हा फारच लंगडा मुद्दा आहे. या मुद्द्याचं उत्तर तुम्हीच लेखात दिलं आहे. (अश्या अनेक गोष्टी आढळतील ज्या कालानुरूप लुप्त झाल्या. त्या गोष्टींवर अवलंबून असलेल्या मंडळींना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला.)

>>हळूहळू अगदी निवडक व्यक्ती या व्यवसायात राहून अगदी लहानश्या स्वरूपात मराठी भाषेतील साहित्य संस्कृती जिवंत राहू शकेल. माझी खरी भीती हीच आहे.
साहित्य संस्कृती फक्त छापिल पुस्तकांद्वारेच जिवंत राहू शकते या गृहितकाशी असहमत. दुर्दैवाने मराठीत अजुनही डिजीटल माध्यमात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची संख्या मर्यादीत आहे.

माझ्या मते महिन्याला २०० रुपये खर्च करायची ऐपत हा मुळ मुद्दा नसुन तुम्ही फुकट जरी पुस्तकं उपलब्ध करुन दिली तरी लोकांना वाचायची इच्छा आहे का हा आहे. मधे कोणीतरी व्हॉट्सअ‍ॅपवर मराठी (छावा, मृत्युंजय पासुन ते व्यक्ती आणि वल्ली, पार्ट्नर पर्यंत बरीच काही गाजलेली) पुस्तकं असलेल्या गुगल ड्राईव्हची लिंक पाठवलेली. बर्‍याच जणांनी अधाशासारखी डाउनलोड पण केली आणि लिंक पाठवणार्‍याचे आभार मानले गृपवर. पण साधारण महीन्याभराने कोणीतरी चौकशी केली असता कळलं की कोणीच एकही पुस्तक वाचलेलं नाहिये.

तुमची काळजी मराठी साहित्य विश्वावर अवलंबून असणाऱ्या मंडळींच्या उदरनिर्वाहाची असेल तर छापिल पुस्तके हा बुडित खात्यातला व्यवहार आहे हे त्यांच्या जेवढं लवकर लक्षात येईल, तेवढ्या लवकर ही मंडळी इतर मार्ग चोखाळतील.
पण जर मराठी लेखन-वाचन संस्कृती टिकवून ठेवणे (डिजिटल माध्यमात का होईना) हा उद्देश असेल तर नेट्फ्लिक्स, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी व्यसन लावणार्‍या मंडळींशी स्पर्धा आहे हे लक्षात घेउन विचारमंथन करणे गरजेचे आहे. लोकांना महिन्याला २०० रुपये खर्च करण्याच्या त्यांच्या क्षमतेची आठवण करुन देणे हा त्यावर नक्कीच उपाय नाही.

@साद :- आपण जी लिंक येथे दिली आहे तो माझा लेख `प्रकाशक शोधताना` - एखाद्या लेखकास त्याच्या लेखनाच्या पुस्तक रुपात प्रकाशनासाठी प्रकाशक शोधताना - लेखकास मदतनीस ठरावा या हेतूने लिहिला होता. जानेवारी २०२० पासून आज पर्यंत (संपूर्ण कोरोनाच्या आव्हानात्मक काळात) आम्ही एकूण २७ पुस्तकं प्रकाशित केलेली असून त्यातील १९ पुस्तकं ही तुलनेने नवीन लेखकांची प्रकाशित केलेली आहेत. यातील ८ पुस्तकं ही त्या लेखकांची पहिली पुस्तकं आहेत.

नवीन लेखकाची पुस्तके छापताना अटी कशा असतात ?

छपाईचा खर्च तो देतो ना ? मग पुस्तके 40,60 वगैरे वाटून आपापली विकतात ना ? प्रकाशकाला त्याची वाटणी फुकटच मिळते ना ? आणि सगळे दुकानदार तर प्रकाशकाकडूनच घेणार , कारण ओळख असते.

लेखकाची पुस्तके तो बिचारा मुंजी लग्नात भेट देऊन संपवतो,
असेच असते ना ?

भले भले पुलं आणि वपु प्रकाशकांनी गुंडाळलेत

नवीन लेखकाची पुस्तके छापताना अटी कशा असतात ?
छपाईचा खर्च तो देतो ना ? मग पुस्तके 40,60 वगैरे वाटून आपापली विकतात ना ?

कदाचित वर साद यांनी दिलेल्या लिंक मध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

पुस्तकक्षेत्राशी संबंधित म्हणून प्रत्येकाने २०० रूपयाचे एक पुस्तक विकत घ्यावे ही तुमची अपेक्षा.

मराठी चित्रपट काढणा-याने आम्ही चित्रपट काढतो पण कुणी बघतच नाही ही ओरड करणे. प्रत्येकाने २०० रूपये घालवून मराठी चित्रपट बघायचा म्हटला तर महिन्याला चार पाच चित्रपट बनतात. घरात किमान चार जण. त्याचे झाले ८०० रूपये + जाणे येणे मिळून १०००.

नाटकवाल्यांची अपेक्षा हीच आहे. - त्यांचे तिकीट महाग असते. आताचे माहीत नाही. पण किमान ५०० रूपये आहे. - ५०० * ४ = २००० रूपये

मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम ( ऑर्केस्ट्रा नाही म्हणायचं) - किमान तिकीट ८०० रूपये ते १००० रूपये . १००० * ४ = ४००० रूपये

आता लोकनाट्याने काय पाप केलं ? - त्यांचे ५०० * ४ = २००० रूपये धरा

प्रत्येकाने हे केले तर हे सगळे उद्योग जगतील. फक्त हा जो तिकीट काढून जाणार आहे त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लागावी म्हणून या प्रत्येक उद्योगाने शासनावर दबाव आणावा. त्याला पगारपाणी मिळाले तर का नाही तो खर्च करणार ?

मी प्रकाशन क्षेत्र थोडंफार पाहिलं आहे .
म्हणलं तर अवघड व्यवसाय आहे . पण प्रकाशन व्यवसाय असायलाच हवा . नाहीतर पुढच्या काळात मराठी पुस्तकांचं भवितव्य काय ? हि भीती रास्त आहे .

खरं तर पुस्तकं वाचणं , ऑनलाईन वाचण्यापेक्षा केव्हाही उत्तम . प्रामाणिक वाचन आनंदासाठी तेच आवश्यक आहे .

लोक वाचतात पण मोबाईल वर . जे पटकन अन फुकट उपलब्ध आहे , ( नेटपॅक बद्दल मी बोलत नाही . कारण तो तसाही भरावाच लागणार असतो . )
लोकांचं वाचन कमी झाले आहे पुस्तकांचे . अन त्याची अनेक कारणे आहेत - सामाजिक सुद्धा . पूर्वी तुलनेने जितका वेळ मिळायचा तितका आज बहुतेक लोकांना मिळत नाहीय .
खूप पूर्वी टीव्ही फार थोडा वेळ असायचा . मग उरलेला वेळ रेडिओ न वाचन यासाठी मिळायचा . अशी अनेक कारणे आहेत .

थोड्याफार फरकाने मराठी सिनेमांच्या बाबतीत तेच आहे . इतर भाषांतले सिनेमे खुप न सहज उपलब्ध आहेत . खेद वाटायला लावणारीच परिस्थिती आहे
मालिका मात्र पहिल्या जातात . कारण स्पष्ट आहे . सहज उपलब्धता .
आणि लोकांना आताशा पाहायला जास्त आवडतं .

आणि एकूण प्रकाशन व्यवहारा मध्ये अनेक लोकांची साखळी कार्यरत असते . ती टिकायला हवी असं मलाही वाटत . पण एक मुद्दा आहे - या सगळ्यात ज्या लेखकांच्या जीवावर हे सगळं उभं राहणार असतं तो मात्र उपेक्षित असतो . लेखनावर जगणारी किती लेखक मंडळी आज घडीला मराठीत आहेत ? दोन चार नावं फेकून जमणार नाही . कारण स्पष्ट आहे . लेखन हा हौसेचा व्यवसाय झाला आहे . अगदी मालिका लेखकाचे सुद्धा अनुभव फार काही चांगले नाहीत .
मागे भानू काळे यांचा यावर सकाळ मध्ये एक लेखच होता -
पैशाच्या रांगेत त्या साखळीमध्ये लेखक सगळ्यात शेवटी असतो .
मग लेखक का लिहिल ? ज्याला फार हौस आहे तो लिहिल अन अर्थात त्याला जसं जमेल जेव्हा जमेल तस लिहिल. मग चांगलं साहित्य का निर्माण होईल ? किंवा मुळात पुढेच येणार नाही .
एके चांगल्या मोठ्या ग्रंथालयामध्ये मुख्य टेबलावर इतकी टुकार पुस्तक असायाची कि दोन पाने वाचली जाणार नाहीत . अन सगळी चांगली पुस्तकं बाहेर . ही टुकार पुस्तकं कशी निर्माण होतात - हे बऱ्यच लोकांना माहित असेल

शेवटी एक उदा . - मराठीमध्ये एकेक करत चांगली चांगली मासिके बंद पडली . या कोरोना काळाच्या आधीपासूनच . काय कारण ? तर - ते एक मराठी वाचन अन लेखन याची सध्याची सामाजिक काय परिस्थिती आहे याचे निदर्शक होते .

विषय महत्त्वाचा च आहे आणि विचार करण्याचाच आहे . आपण तो पुढे आणला , हे योग्य केलं !
मी माझी मतं मांडली . बरोबर असतील -नसतील. इतरही खूप कंगोरे या विषयाला आहेत .
माहितगारांनी आणखी प्रकाश टाकावा
आभार

मी घेतो. एका भारतवारीत जितकी पुस्तके विकत घेतो ती महिन्याला सरासरी एक पेक्षाही जास्त होत असतील. तेथे बहुतांश मराठीतीलच घेतो (कारण इंग्रजी कोठेही मिळतात).

परवा वीकेण्डला सहज तुंबाडचे खोत पुन्हा वाचायला लागलो आणि सुमारे ५-६ तास सलग वाचत होतो. व्हॉट्सॅप, फेबु काहीही मिस केले नाही इतका वेळ बघितले नाही तर. मी आणि माझ्यासारख्या अनेकांना लहापणापासून छापील पुस्तकांची सवय आहे. अगदी नवीन लोकांना इतका इण्टरेस्ट असेल का माहीत नाही. पण एक मात्र आहे - ज्याला मुळात वाचनाची आवड आहे त्याच्या समोर चांगले पुस्तक आले तर तो/ती त्यात गर्क आपोआप होतो.

मी आणि माझ्यासारख्या अनेकांना लहापणापासून छापील पुस्तकांची सवय आहे. >>>
मी घेतो. एका भारतवारीत जितकी पुस्तके विकत घेतो ती महिन्याला सरासरी एक पेक्षाही जास्त होत असतील. तेथे बहुतांश मराठीतीलच घेतो (कारण इंग्रजी कोठेही मिळतात). >>>>> +१

मी आणि माझ्यासारख्या अनेकांना लहापणापासून छापील पुस्तकांची सवय आहे >>+१.
स्क्रीनवर पुस्तक वाचणे नाही आवडत. दोन चार पानी लेख वगैरे ठीक वाटते.

भारतवारीत बरीच घेतो. +१ इथे असताना काही आवडली आणि ऑनलाईन उपलब्ध असली तर भारतात घरी मागवुन ठेवतो.
हल्ली चालायला गेल्यावर/ गाडीत स्टोरीटेल अ‍ॅपवर मराठी पुस्तकं (जुनीच जास्त आहेत) ऐकतो. ती ही आता संपणार आहेत वाटू लागतं आणि एखादं नविन दिसतं. ते ऐकुन होईतो दुसरं हिंदी दिसतं, असं अजुन तरी होतंय. हल्ली ऑडिओ बुक्स आवडू लागली आहेत, कारण दुसरी काम करत असतानाच्या वेळात वाचता येतात. मराठी ऑडिओ बुक्स सहज उपलब्ध होऊ शकली तर मला विकत घेऊन ऐकायला आवडेल. अर्थात त्याने छापिल - प्रकाशक इ. चेन मोडीत निघेल, त्याला काय इलाज नाही.
डिजिटल रीडरवर पुस्तक वाचण्याऐवजी मात्र फिजिकल पुस्तक वाचायला जास्त आवडतं.

पुण्याला गेल्यावर आम्ही अक्षरधारा/रसिक वगैरे दुकानांमध्ये चक्कर टाकून मराठी पुस्तकं विकत घेतो. गेलं दीड वर्ष पुण्याला फेरी न झाल्यामुळे यावर्षी बुकगंगा आणि अक्षरधारावरून ऑनलाइन काही मराठी पुस्तकं मागवली. एकदोन Amazon वरही मागवली. किंडलवर काही मराठी पुस्तकं विकत घेऊन वाचली. (मुख्यतः फास्टर फेणे आणि नारायण धारप Happy ) स्टोरीटेल ही ॲप सध्या माझी आवडती झाली आहे मराठी पुस्तकं ऐकण्यासाठी. तिथे काही नवीन (मी न वाचलेली) पुस्तकं ऐकलीच, शिवाय आधी वाचलेली दोन पुस्तकं केवळ narrator चं नाव बघून (त्या आवाजात ऐकण्यासाठी) ऐकली ( एका कोळियाने- विक्रम गोखले आणि सत्तांतर- संदीप कुळकर्णी). ही ॲप सशुल्क आहे.
शिवाय इथली महाराष्ट्र मंडळाची लायब्ररी आहे तिथूनही काही पुस्तकं आणून वाचते. पण ती काही विकत घेत नाही, त्यामुळे आर्थिक उलाढाल होत नाही त्यात.

पण हा धागा आणि अजून असाच एक धागा वाचून विचार मनात आला की ही जी पुस्तकं आपण विकत घेतो, त्यात पूर्णपणे नवीन प्रकाशित झालेली, मूळ मराठीत लिहिली गेलेली पुस्तकं त्या मानाने कमी आहेत. भैरप्पांच्या कादंबऱ्यांची मराठी भाषांतरं आहेत. नरहर कुरुंदकरांची पुस्तकं आता नव्याने प्रसिद्ध झालेली असली, तरी मूळ लेखन चांगलंच जुनं आहे. बाकीही अनेक पुस्तकं अशी आहेत की जी तशी जुनीच आहेत. अगदी गेल्या पाच वर्षात प्रसिद्ध झालेली एकदोनच पुस्तकं विकत घेतली गेली असतील.

मी घेत आलोय...
थोडेसे आधीचे, पण अजून मला आवडायचे बंद न झालेले नेमाडे मास्तर, रंगनाथ पठारे, नंदा खरे, जीए, मिलिंद बोकील, गौरी देशपांडे, श्याम मनोहर, दि.पु.चित्रे, कोलटकर.. हे लोक संग्रही आहेतच आधीपासून..

शिवाय अलीकडच्या काही वर्षांत मराठीतल्या बऱ्याच नवनवीन, फ्रेश, पहिल्या धारेचं लिहिणाऱ्यांची पुस्तकंही माझ्याकडं जमा होत राहतात.. उदाहरणार्थ प्रसाद कुमठेकर, प्रशांत बागड, वर्जेश सोळंकी, मकरंद साठे, बालाजी सुतार, सत्यपालसिंग रजपूत, आसाराम लोमटे, किरण गुरव, स्वप्नील शेळके, अवधूत डोंगरे, विलास सारंग, जयंत पवार, सचिन कुंडलकर, जी के ऐनापुरे, कमलेश वालावलकर, दिनकर दाभाडे... हे सगळे लोक मला 'लंबी रेस के घोडे' वाटतात..

हो मीही शक्यतो गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेली व मराठीतून लिहीली गेलेलीच आधी शोधतो. काही अपवाद अगदी लोकप्रिय असलेल्या पुस्तकांचे अनुवाद (हुसैन झैदी, पियुष झा, पियुष पांडे ई.) .

लेखक सगळे आठवत नाहीत आत्ता पण हृषिकेश गुप्ते व प्रणव सखदेव हे दोन आठवले.

पाचपाटील लिस्ट बद्दल आभार. कमलेश वालावलकर सोडले तर इतर कोणाची विकत घेतल्याचे लक्षात नाही.

मी पण मराठी पुस्तके घेत असते जशी जमतील तशी. अर्थात गेल्या दिड वर्षांत नाही घेतली इतकी. पुस्तकप्रेमी कुटुंबात आहे त्यामुळे सगळ्या निमित्ताने पुस्तकं किंवा खाद्यपदार्थ हेच भेट देते गेली पाच एक वर्षं. अर्थात सगळे वाचणारे असल्याने सरप्राईज वगैरे नाही देता येत! आम्ही एकमेकांना विचारूनच देतो भेटी!
वाचन कमी झालंय पण आवड कायम आहे - चांगले पुस्तक हातात आले की बाकिच्या गोष्टी आपोआप मागे पडतात.
पाचपाटिल, तुम्ही वेगळा धागा काढून या नवीन लेखकांविषयी आणि त्यांच्या पुस्तकांविषयी नक्की लिहा. वाचायला आवडेल. तुम्हाला हे लेखक कसे सापडले हे पण लिहा.

बालाजी सुतार ब-याच जणांना आवडतात. त्यांचे पुस्तक पण आले नव्हते तेव्हांपासून.
फेसबुक पोस्टीतून लेखक झाले ते. दवणीय वाटतात मला.

Pages

Back to top