आमचे दास काका आणि दास भाभी
माझ्या वयाच्या दहा-पंधरा वर्षांपर्यंतचा काळ अदभूत होता. आमच्या कॉलनीतील कुठल्याही घराचा दरवाजा दिवसभर उघडाच असायचा. आमच्यापैकी कुणीही कुणाच्याही घरात (बेल वाजवणं, आत येऊ का? वगैरे विचारणं न करता) थेट स्वयंपाकघरापर्यंत शिरू शकत होतं. आम्ही मुलंच नाही, तर कॉलनीतील महिलावर्गही असाच थेट कोणत्याही घरात अगदी आतपर्यंत शिरू शकत होता.
दास काकांचं घरही असंच कायम प्रत्येकाचं स्वागत करणारं. त्यांच्या घराचं आणखी एक विशेष होतं. त्यांच्या घराला दोन दरवाजे होते. त्यामुळे पलीकडच्या बंगल्यात जायचं असलं, तर रस्त्यावरून जाण्याऐवजी आम्ही कुणीही थेट त्यांच्या एका दरवाजातून आत शिरून दुसऱ्या दरवाजातून पलीकडे जात होतो. त्यात आम्ही काही गैर करत आहोत हे तेव्हा आम्हालाही कधी वाटलं नाही आणि दास कुटुंबीयांनाही.
कधीही आईचा एखादा निरोप अथवा पदार्थ भाभींना द्यायचा असला तर थेट त्यांच्या स्वयंपाकघरात शिरायचं. अश्या प्रत्येक वेळी काहीना काही खाऊ खाण्याचा भाभींचा प्रेमभरा आग्रह ठरलेलाच!
आख्ख्या कॉलनीत तेव्हा आम्ही दोघेच मुलगे. आमची थट्टामस्करी करणे हा दास काकांचा आवडीचा उद्योग. त्यातली माया मात्र आज लक्षात येतेय.
त्या काळात फोन निवडक घरांत असायचा. दास काकांकडे तो होता. मग आमचे फोन त्यांच्याकडे यायचे. फोन आला की दास काका धावत मधले घर ओलांडत बोलवायला यायचे. यात आपण काही विशेष करतोय असं त्यांनाही जाणवायचं नाही, आणि आश्चर्य म्हणजे आम्हालाही. त्यातला greatnessही नंतरच्या बदलेल्या काळात लक्षात आला.
१ एप्रिलला `फोन आलाय` असे सांगत दास काका यायचे, आणि आम्हीही त्यांच्या घरी धावत सुटायचो. मग त्यांनी आम्हाला `एप्रिल फुल` केल्याचे लक्षात यायचे. असे दोन-तीन वर्षे झाल्यावर आम्ही एक एप्रिलची तारीख लक्षात ठेऊ लागलो.
अनेकदा त्यांच्याकडे गेल्यावर दास काका सतार वाजवत त्यांच्या खोलीत बसलेले दिसायचे. आजही त्यांची ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांना तसं सतार वाजवताना पाहून त्या लहान वयातही खूप भारी वाटायचं. एक प्रकारचं भारलेलं वातावरण असायचं.
कॅमेरा ही अशीच एक त्या काळातली नवलाईची गोष्ट. दास काकांकडे तो होता. किती हौसेनं या दास मंडळींनी आम्हा साऱ्या आजूबाजूच्या पोरांचे त्या काळात फोटो काढलेत. त्या फोटोंच्या copies देखील आम्हाला दिल्या गेल्या. आज हे फोटो आहेत म्हणूनच त्या काळातले क्षण डोळे भरून पाहता येत आहेत, त्या काळाची काहीतरी आठवण जवळ जपून ठेवता येतेय.
तो सारा काळच अगदी अगदी वेगळा होता, आणि त्या काळाच्या आठवणीत दास काका आणि भाभी यांचं अगदी खास स्थान आहे हे निश्चित!
**
छोटेसे आणि छान लिहिले आहे.
छोटेसे आणि छान लिहिले आहे.
पहिला पैरा तर अगदी रिलेट झाला.
तो सारा काळच अगदी अगदी वेगळा
तो सारा काळच अगदी अगदी वेगळा होता, >>
खरंय. आमच्याकडेही असेच होते लहानपणी.
खूप सुंदर आठवणी जपल्यात
खूप सुंदर आठवणी जपल्यात बालपणीच्या..
सुरेख पण त्रोटक लिहिलंय.
सुरेख पण त्रोटक लिहिलंय.
छान लिहिलीय आठवण. खरेच अशी
छान लिहिलीय आठवण. खरेच अशी साधी प्रेमळ माणसे लाभणे ही बालपणातील मोठी चैन असते.