चामुंडराय ह्यांचा "तुम्ही चहा / कॉफी कशी पिता" हा धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचले आणि माझा हा लेख आठवला. मायबोलीकरांसाठी पेश करीत आहे. मायबोलीवरचा माझा पहिलाच लेख आहे, तेव्हा मंडळी सांभाळून घ्या.
______________________________________________________________________________________________________________________________
रविवार दुपार. जेवण करून वामकुक्षी साठी आदर्श वेळ. अचानक आपल्या पत्रिकेतील ग्रह फिरतात आणि ओळखीच्या कोणाचं तरी पुढच्या आठवड्यात 'कार्य निघतं'. 'आहेर म्हणून आपण पाकिटात पैसे घालून देऊ' असं ओठांवर आलेलं वाक्य पूर्वानुभवामुळे गिळावं लागतं. "फक्त मित्रांबरोबर बाहेर हिंडायला आवडतं, देण्याघेण्याचे व्यवहार अजिबात कळत नाहीत" वगैरे वाक्यं आपलीच वाट बघत असतात. लक्ष्मी रोड वर दुपारी (त्यातल्या त्यात) गर्दी कमी म्हणून दुपारी २ ला आपण अर्धांगिनी बरोबर 'आहेर म्हणून बाहेर' पडतो.
पहिल्या २-३ दुकानात काहीच पसंत पडत नाही. मग 'हस्तकला' मध्ये पंजाबी ड्रेस मटेरियल चा नवीन स्टॉक आलाय तर तिकडे जाऊ, असं ठरतं. दुपारी ३:३० ची वेळ. डोळ्यावर झोप आणि 'ह्यामध्ये अजून कुठले कलर आहेत?' हे ऐकून विटलेले कान. अश्या वेळी तळमजल्यावरील अमृततुल्य च्या दिशेने 'चहाचा वास' येतो. 'तू बघ तोपर्यंत मी जरा चहा (आणि माझी अनावर झोप!) मारून येतो" असं म्हणून आपण खाली सटकतो. पांढऱ्या जाड कपात तो (देवदूत) चहा ओततो. पहिल्या घोटातच सगळा शीण नाहीसा होऊन तरतरी येते. ह्या चहाच्या दुकानांना 'अमृततुल्य' इतकं समर्पक नाव दुसरं नाही! देव-दानवांना बायकोबरोबर दुपारी खरेदीला बाहेर पडायची वेळ आली नसावी. नाहीतर चहा सारखं पेय असताना अमृतमंथनाच्या भानगडीत ते कधीच पडले नसते.
पुण्याच्या मध्यवस्तीतील ही अमृततुल्ये केवळ चहाची दुकाने नाहीत. तिथला धगधगता स्टोव्ह चहा रुपी देवाची साधना करण्यासाठी मांडलेला यज्ञ आहे. मोठ्या पातेल्यात चहा पावडर, साखर ह्याची आहुती टाकली जाते. पितळेच्या खलबत्त्यात आलं-वेलदोडे कुटून घंटानाद होतो. सराईत पुजाऱ्याप्रमाणे सगळ्या कृती सुरु असतात. कापडातून चहा गाळून भक्तांना ‘Tea-र्थ’ वाटप करण्यात येते.
दिवसाच्या कुठल्याही वेळेला 'चहा घेणार का?' ह्या प्रश्नाला जर “घोटभर चालेल” अशी तुमची प्रतिक्रिया असेल तर समजा की तुम्ही (माझ्यासारखेच) चहाबाज आहात. पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- ‘बायकांनी कुंकवाच्या बोटाला आणि पुरुषांनी चहाच्या घोटाला कधी नाही म्हणू नये’. दारू न पिणाऱ्यास teetotaler म्हणतात. तर मग चहा न पिणाऱ्या लोकांना tea-totaler म्हणायला काय हरकत आहे? डिक्शनरी बनवणाऱ्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज वगैरे मंडळींनी ह्याची कृपया दखल घ्यावी.
गोर-गरिबांपासून अतिश्रीमंतापर्यंत सर्वत्र संचार करणारं हे एक महान द्रव्य आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या 'चहा-पोळी' नाश्त्यापासून ते अगदी श्रीमंतांच्या 'High Tea’ पर्यंत ह्याचा वावर असतो.
एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वाचे विविध प्रसंगात अनेक पैलू समजतात तसंच चहाचं देखील आहे. सुट्टीच्या दिवशी सकाळी पेपर वाचत चहा एखाद्या निवांत माणसासारखा वाटतो. तर तोच चहा ऑफिस ला जाण्याच्या घाईगडबडीत 'लवकर मला पिऊन टाका' असा म्हणत असतो. ऑफिस मधला मशीन चा चहा रोजच्या रुटीन सारखा बेचव लागतो. तोच ऑफिसच्या रटाळ मीटिंग मध्ये 'करमणुकीचा आधार' वाटतो.
हॉस्पिटल मध्ये रात्रभर जागरण झाल्यावर सकाळी येणारा चहा हवाहवासा वाटतो. त्याचप्रमाणे रेल्वेप्रवासात येणारा 'चाय गरम'. टपरीवरचा ‘कटिंग’ चहा, सर्दी-खोकला झाल्यावर 'गवती चहा', कॉलेज कँटीनला मित्रांबरोबर 'चाय पे चर्चा', पाऊस न्याहाळत खिडकीतला चहा, ट्रेकिंग ला चूल मांडून केलेला चहा. मस्का-पाव बरोबरचा इराणी चहा, स्पेशल 'मलई मारके' चहा, उन्हाळ्यातला 'Ice Tea' अशी अनेक रूपे. सगळीच त्या-त्या वेळी हवी-हवीशी वाटणारी.
'फुकट ते पौष्टिक' हे बऱ्याच वेळा खरं असलं तरी दर वेळी फुकटात मिळणारा चहा चांगला असेलंच असं नाही. लांबच्या विमानप्रवासात रात्रीच्या जेवणानंतर मिळणारा चहा ह्याचं उत्तम उदाहरण आहे. रात्री १:३० ची फ्लाईट. विमानातील जेवण होईपर्यंत ३ वाजतात. आता ही वेळ काही चहाची आहे का हो? अश्या (अ)वेळी 'कोरा चहा' घेऊन तितक्याच कोऱ्या चेहेऱ्याची हवाई सुंदरी येते. कोरा चहा कपात ओतून कृत्रिम हसून निघून जाते. मग आपणच त्यात साखर आणि दुधाची पावडर घालून 'चहा(सदृश पदार्थ) बनवायचा. चहा ह्या पेयाचा इतका अपमान दुसऱ्या कोणीच केला नसेल!
चहाचा अजून एक अपमान म्हणजे authentic चायनीज रेस्टारंटसमध्ये जेवणानंतर मिळणारा 'जस्मिन टी'. चिनी लोकांनी एकही प्राणी आणि भाजीपाला सोडला नाही खायचा. सगळे प्राणी आणि भाज्या संपल्यावर फुलांकडे त्यांची (मिचमिची) दृष्टी पडली असावी. मोगरा, शेवंतीचा वास चांगला म्हणून त्याचा चहा? 'च्या'यला! ज्या देशात चहाचा शोध लागला त्याच लोकांनी असं करावं ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं? कटिंग चहा आणि फूल चहा माहिती होतं. पण फुलं घातलेला चहा 'Is not my Cup of Tea'! चहा कसा करायचा हे समजत नसल्याने देशाचं नाव 'चाय'ना पडलं असावं.
चहाची कधी तलफ येते, कधी सवय होते, कधी शिष्टाचार म्हणून, तर कधी कंटाळा आला म्हणूनही चहा घेतला जातो. पूर्वी स्मार्ट-फोन्स नव्हते तेव्हा चहा हे उत्तम वेळ घालवण्याचं साधन होतं. जीवन सुरक्षेसाठी LIC ला आणि एखाद्या ठिकाणी अर्धा-पाऊण तास काढायचा असेल तर चहाला पर्याय नाही. प्रवासात पाय मोकळे करायला उतरतो तेव्हा भूक नसेल तर टाइम पास म्हणून चहा. भूक लागली असेल पण खायला नसेल तरी चहा. आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा. लग्नाची बोलणी करायला देखील 'इसीलिये मम्मी ने मेरे तुझे चाय पे बुलाया हैं'. सहज घरी भेटायला या सांगायचं असेल तर 'चहाला या ना' असंच म्हणतो.
'चहाला आलंच पाहिजे' असं आग्रहाचं निमंत्रण मोडवत नाही म्हणून आपण जातो. मात्र चहात ‘आलंच’ नसेल तर हिरमोड होतो. सरकारी ऑफिसातली आपली कामे करून घेण्यासाठी जी चिरीमिरी द्यावी लागते त्यालाही 'चायपानी'चे आवरण मिळते. शुल्लक भांडणांना 'चहाच्या पेल्यातील वादळ' म्हणतात. जेम्स वॅट ला चहाची आवड नसती तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागायला अजून 'वॅट' पहावी लागली असती.
चहा उत्तम साथीदार आहे. कंटाळवाण्या प्रवासात जसा साथ देतो तसा बिस्किटापासून वडापाव पर्यंत सगळ्या पदार्थांना देखील उत्कृष्ट साथ देतो. मूळ पदार्थाच्या चवीवर कुरघोडी न करता. असा बहुगुणी आहे (च)हा.
केरळ, तामिळनाडू भागांत एका कपातून उंचावरून दुसऱ्या कपात ओतून ‘फेसाळता’ चहा देतात. कापडाच्या दुकानात गजाने कापड मोजताना जेवढा लांब हात नेतात तितक्या उंचीवरून चहा ओततात. बहुधा 'मिलीलीटर' ऐवजी 'मीटर' वर चहा विकत असावेत.
कालानुरूप चहा बनवायची पद्धत बदलली तशी चहा द्यायची देखील. अमृततुल्य मध्ये पांढऱ्या जाड कपात चहा. टपरीवर काचेच्या छोट्या ग्लास मध्ये 'कटिंग' चहा. दाक्षिणात्य हॉटेलात स्टीलचा ग्लास आणि वाटी. लग्नकार्यात आणि ऑफिसात चॉकलेटी रंगाच्या कपात चहा. असा सुटसुटीत प्रकार असायचा. आधुनिकतेच्या जमान्यात चहाचा कान उपटला गेला आणि प्लास्टिकच्या छोट्या ग्लासात चहा देऊ लागले. हायवे वरील फूड मॉल्स वर तर इतक्या लहान कपात चहा देतात कि 'चहा कपात' चा चुकीचा अर्थ त्यांनी लावला असावा बहुधा.
Middle East ला नोकरी निमित्त स्थायिक झालो तेव्हा 'कडक चहा' च्या दुकानांवर चहाचे विविध प्रकार प्यायला मिळाले. दालचिनी आणि काळी मिरी वाला 'येमेनी' चहा जबरदस्त. Turkish रेस्टारंट मध्ये कोऱ्या चहात पुदिन्याचं पान घातलेला Turkish Tea देखील आवडला. इस्तंबूल (टर्की) ला तर चहा-कॉफी चे मोठे शौकीन आहेत. तिथल्या इस्तिकलाल स्ट्रीट वर तिथल्या स्पेशल कप-बशीत चहा पिणे एक सोहळा होतो. चहाला इतका मान देणारे 'चहा'ते बघून धन्यता वाटते.
'हमेशा तुमको चहा' ह्या गाण्याचा गर्भितार्थ देवदासच्या आई ने लक्षात घेतला नाही. नाहीतर तिने पारो ला टाकण्याऐवजी पोराला 'चहा टाकला' असता. देवदास ला ब्लॅक लेबल ऐवजी (ब्रुक बॉण्ड) रेड लेबल चा नाद लागला असता.
चहाची एवढी महती कळल्यावर एका अमृततुल्य बाहेर लिहिलेलं वाक्य मला अगदी पुरेपूर पटतं - 'चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो'~~=
~ चहाबाज सरनौबत
येस कोहराम ... लाल बादशाह,
येस कोहराम ... लाल बादशाह, इन्सानियत, मृत्युदाता वगैरे अमिताभचे सेकंड इनिंग सुरू व्हायच्या आधीचे छळपट होते त्यातलाच एक होता.
याकचे दूध खारट असते जरासे आणि
याकचे दूध खारट असते जरासे आणि प्रचंड स्निग्ध.
तिथे चहा बनवताना, चहा, दूध,कसलेतरी पीठ, याक बटर..
तिथल्या हवामानात ठिक आहे आणि गरजेचे आहे. आपल्या पोटाला पचणार नाही..
मी , म्हशीचे दूध आणून, भाजलेले कुटटू आटा पीठ आणि बटर टाकले.. मला भयानक अॅसीडीटी झाली, पण तिथला चहा प्याले तेव्हा न्हवती झाली अॅसीडीटी ..
ते मिशन काश्मीरमध्ये सलीमभाई
ते मिशन काश्मीरमध्ये सलीमभाई कावा, जावेदभाई कावा करत तो एक पोरगा फिरताना दाखवलाय ते कावा काय असते? चहाचा प्रकार आहे का?
मिळाला kahwahttps://youtu.be
मिळाला kahwa
https://youtu.be/w5jzIApbZ38
Pages