'हमेशा तुमको चहा'

Submitted by सरनौबत on 17 August, 2020 - 06:28

चामुंडराय ह्यांचा "तुम्ही चहा / कॉफी कशी पिता" हा धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचले आणि माझा हा लेख आठवला. मायबोलीकरांसाठी पेश करीत आहे. मायबोलीवरचा माझा पहिलाच लेख आहे, तेव्हा मंडळी सांभाळून घ्या.
______________________________________________________________________________________________________________________________
रविवार दुपार. जेवण करून वामकुक्षी साठी आदर्श वेळ. अचानक आपल्या पत्रिकेतील ग्रह फिरतात आणि ओळखीच्या कोणाचं तरी पुढच्या आठवड्यात 'कार्य निघतं'. 'आहेर म्हणून आपण पाकिटात पैसे घालून देऊ' असं ओठांवर आलेलं वाक्य पूर्वानुभवामुळे गिळावं लागतं. "फक्त मित्रांबरोबर बाहेर हिंडायला आवडतं, देण्याघेण्याचे व्यवहार अजिबात कळत नाहीत" वगैरे वाक्यं आपलीच वाट बघत असतात. लक्ष्मी रोड वर दुपारी (त्यातल्या त्यात) गर्दी कमी म्हणून दुपारी २ ला आपण अर्धांगिनी बरोबर 'आहेर म्हणून बाहेर' पडतो.

पहिल्या २-३ दुकानात काहीच पसंत पडत नाही. मग 'हस्तकला' मध्ये पंजाबी ड्रेस मटेरियल चा नवीन स्टॉक आलाय तर तिकडे जाऊ, असं ठरतं. दुपारी ३:३० ची वेळ. डोळ्यावर झोप आणि 'ह्यामध्ये अजून कुठले कलर आहेत?' हे ऐकून विटलेले कान. अश्या वेळी तळमजल्यावरील अमृततुल्य च्या दिशेने 'चहाचा वास' येतो. 'तू बघ तोपर्यंत मी जरा चहा (आणि माझी अनावर झोप!) मारून येतो" असं म्हणून आपण खाली सटकतो. पांढऱ्या जाड कपात तो (देवदूत) चहा ओततो. पहिल्या घोटातच सगळा शीण नाहीसा होऊन तरतरी येते. ह्या चहाच्या दुकानांना 'अमृततुल्य' इतकं समर्पक नाव दुसरं नाही! देव-दानवांना बायकोबरोबर दुपारी खरेदीला बाहेर पडायची वेळ आली नसावी. नाहीतर चहा सारखं पेय असताना अमृतमंथनाच्या भानगडीत ते कधीच पडले नसते.

पुण्याच्या मध्यवस्तीतील ही अमृततुल्ये केवळ चहाची दुकाने नाहीत. तिथला धगधगता स्टोव्ह चहा रुपी देवाची साधना करण्यासाठी मांडलेला यज्ञ आहे. मोठ्या पातेल्यात चहा पावडर, साखर ह्याची आहुती टाकली जाते. पितळेच्या खलबत्त्यात आलं-वेलदोडे कुटून घंटानाद होतो. सराईत पुजाऱ्याप्रमाणे सगळ्या कृती सुरु असतात. कापडातून चहा गाळून भक्तांना ‘Tea-र्थ’ वाटप करण्यात येते.

दिवसाच्या कुठल्याही वेळेला 'चहा घेणार का?' ह्या प्रश्नाला जर “घोटभर चालेल” अशी तुमची प्रतिक्रिया असेल तर समजा की तुम्ही (माझ्यासारखेच) चहाबाज आहात. पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- ‘बायकांनी कुंकवाच्या बोटाला आणि पुरुषांनी चहाच्या घोटाला कधी नाही म्हणू नये’. दारू न पिणाऱ्यास teetotaler म्हणतात. तर मग चहा न पिणाऱ्या लोकांना tea-totaler म्हणायला काय हरकत आहे? डिक्शनरी बनवणाऱ्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज वगैरे मंडळींनी ह्याची कृपया दखल घ्यावी.

गोर-गरिबांपासून अतिश्रीमंतापर्यंत सर्वत्र संचार करणारं हे एक महान द्रव्य आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या 'चहा-पोळी' नाश्त्यापासून ते अगदी श्रीमंतांच्या 'High Tea’ पर्यंत ह्याचा वावर असतो.

एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वाचे विविध प्रसंगात अनेक पैलू समजतात तसंच चहाचं देखील आहे. सुट्टीच्या दिवशी सकाळी पेपर वाचत चहा एखाद्या निवांत माणसासारखा वाटतो. तर तोच चहा ऑफिस ला जाण्याच्या घाईगडबडीत 'लवकर मला पिऊन टाका' असा म्हणत असतो. ऑफिस मधला मशीन चा चहा रोजच्या रुटीन सारखा बेचव लागतो. तोच ऑफिसच्या रटाळ मीटिंग मध्ये 'करमणुकीचा आधार' वाटतो.

हॉस्पिटल मध्ये रात्रभर जागरण झाल्यावर सकाळी येणारा चहा हवाहवासा वाटतो. त्याचप्रमाणे रेल्वेप्रवासात येणारा 'चाय गरम'. टपरीवरचा ‘कटिंग’ चहा, सर्दी-खोकला झाल्यावर 'गवती चहा', कॉलेज कँटीनला मित्रांबरोबर 'चाय पे चर्चा', पाऊस न्याहाळत खिडकीतला चहा, ट्रेकिंग ला चूल मांडून केलेला चहा. मस्का-पाव बरोबरचा इराणी चहा, स्पेशल 'मलई मारके' चहा, उन्हाळ्यातला 'Ice Tea' अशी अनेक रूपे. सगळीच त्या-त्या वेळी हवी-हवीशी वाटणारी.

'फुकट ते पौष्टिक' हे बऱ्याच वेळा खरं असलं तरी दर वेळी फुकटात मिळणारा चहा चांगला असेलंच असं नाही. लांबच्या विमानप्रवासात रात्रीच्या जेवणानंतर मिळणारा चहा ह्याचं उत्तम उदाहरण आहे. रात्री १:३० ची फ्लाईट. विमानातील जेवण होईपर्यंत ३ वाजतात. आता ही वेळ काही चहाची आहे का हो? अश्या (अ)वेळी 'कोरा चहा' घेऊन तितक्याच कोऱ्या चेहेऱ्याची हवाई सुंदरी येते. कोरा चहा कपात ओतून कृत्रिम हसून निघून जाते. मग आपणच त्यात साखर आणि दुधाची पावडर घालून 'चहा(सदृश पदार्थ) बनवायचा. चहा ह्या पेयाचा इतका अपमान दुसऱ्या कोणीच केला नसेल!

चहाचा अजून एक अपमान म्हणजे authentic चायनीज रेस्टारंटसमध्ये जेवणानंतर मिळणारा 'जस्मिन टी'. चिनी लोकांनी एकही प्राणी आणि भाजीपाला सोडला नाही खायचा. सगळे प्राणी आणि भाज्या संपल्यावर फुलांकडे त्यांची (मिचमिची) दृष्टी पडली असावी. मोगरा, शेवंतीचा वास चांगला म्हणून त्याचा चहा? 'च्या'यला! ज्या देशात चहाचा शोध लागला त्याच लोकांनी असं करावं ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं? कटिंग चहा आणि फूल चहा माहिती होतं. पण फुलं घातलेला चहा 'Is not my Cup of Tea'! चहा कसा करायचा हे समजत नसल्याने देशाचं नाव 'चाय'ना पडलं असावं.

चहाची कधी तलफ येते, कधी सवय होते, कधी शिष्टाचार म्हणून, तर कधी कंटाळा आला म्हणूनही चहा घेतला जातो. पूर्वी स्मार्ट-फोन्स नव्हते तेव्हा चहा हे उत्तम वेळ घालवण्याचं साधन होतं. जीवन सुरक्षेसाठी LIC ला आणि एखाद्या ठिकाणी अर्धा-पाऊण तास काढायचा असेल तर चहाला पर्याय नाही. प्रवासात पाय मोकळे करायला उतरतो तेव्हा भूक नसेल तर टाइम पास म्हणून चहा. भूक लागली असेल पण खायला नसेल तरी चहा. आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा. लग्नाची बोलणी करायला देखील 'इसीलिये मम्मी ने मेरे तुझे चाय पे बुलाया हैं'. सहज घरी भेटायला या सांगायचं असेल तर 'चहाला या ना' असंच म्हणतो.

'चहाला आलंच पाहिजे' असं आग्रहाचं निमंत्रण मोडवत नाही म्हणून आपण जातो. मात्र चहात ‘आलंच’ नसेल तर हिरमोड होतो. सरकारी ऑफिसातली आपली कामे करून घेण्यासाठी जी चिरीमिरी द्यावी लागते त्यालाही 'चायपानी'चे आवरण मिळते. शुल्लक भांडणांना 'चहाच्या पेल्यातील वादळ' म्हणतात. जेम्स वॅट ला चहाची आवड नसती तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागायला अजून 'वॅट' पहावी लागली असती.

चहा उत्तम साथीदार आहे. कंटाळवाण्या प्रवासात जसा साथ देतो तसा बिस्किटापासून वडापाव पर्यंत सगळ्या पदार्थांना देखील उत्कृष्ट साथ देतो. मूळ पदार्थाच्या चवीवर कुरघोडी न करता. असा बहुगुणी आहे (च)हा.

केरळ, तामिळनाडू भागांत एका कपातून उंचावरून दुसऱ्या कपात ओतून ‘फेसाळता’ चहा देतात. कापडाच्या दुकानात गजाने कापड मोजताना जेवढा लांब हात नेतात तितक्या उंचीवरून चहा ओततात. बहुधा 'मिलीलीटर' ऐवजी 'मीटर' वर चहा विकत असावेत.

कालानुरूप चहा बनवायची पद्धत बदलली तशी चहा द्यायची देखील. अमृततुल्य मध्ये पांढऱ्या जाड कपात चहा. टपरीवर काचेच्या छोट्या ग्लास मध्ये 'कटिंग' चहा. दाक्षिणात्य हॉटेलात स्टीलचा ग्लास आणि वाटी. लग्नकार्यात आणि ऑफिसात चॉकलेटी रंगाच्या कपात चहा. असा सुटसुटीत प्रकार असायचा. आधुनिकतेच्या जमान्यात चहाचा कान उपटला गेला आणि प्लास्टिकच्या छोट्या ग्लासात चहा देऊ लागले. हायवे वरील फूड मॉल्स वर तर इतक्या लहान कपात चहा देतात कि 'चहा कपात' चा चुकीचा अर्थ त्यांनी लावला असावा बहुधा.

Middle East ला नोकरी निमित्त स्थायिक झालो तेव्हा 'कडक चहा' च्या दुकानांवर चहाचे विविध प्रकार प्यायला मिळाले. दालचिनी आणि काळी मिरी वाला 'येमेनी' चहा जबरदस्त. Turkish रेस्टारंट मध्ये कोऱ्या चहात पुदिन्याचं पान घातलेला Turkish Tea देखील आवडला. इस्तंबूल (टर्की) ला तर चहा-कॉफी चे मोठे शौकीन आहेत. तिथल्या इस्तिकलाल स्ट्रीट वर तिथल्या स्पेशल कप-बशीत चहा पिणे एक सोहळा होतो. चहाला इतका मान देणारे 'चहा'ते बघून धन्यता वाटते.

'हमेशा तुमको चहा' ह्या गाण्याचा गर्भितार्थ देवदासच्या आई ने लक्षात घेतला नाही. नाहीतर तिने पारो ला टाकण्याऐवजी पोराला 'चहा टाकला' असता. देवदास ला ब्लॅक लेबल ऐवजी (ब्रुक बॉण्ड) रेड लेबल चा नाद लागला असता.

चहाची एवढी महती कळल्यावर एका अमृततुल्य बाहेर लिहिलेलं वाक्य मला अगदी पुरेपूर पटतं - 'चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो'~~=

~ चहाबाज सरनौबत

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडला लेख ! बहुतेकांच्या मनकी बात मांडलीय. ऑफिसमधे चहाचे निवांत घुटके घेतच वाचला.(एरवीही मी निवांतच असतो जादा काम नसल्याने)

मस्त खुसखुशीत लेख.

पण Tea-totaler व्हायचं असेल तर इतर सर्व चहांसोबत कोरा चहा, बिन साखरेचा कोरा चहा आणि चिनी चहा पण आवडले पाहिजेत.
आवडतीलही आयुष्यात पुढे तुम्हाला.

मजेशीर लेख
मी पण हमेशा तुमको चहा क्लब ची मेम्बरा आहे.

धन्यवाद @ जिद्दू. तुमच्या ऑफिसमध्ये चांगला चहा मिळतो ऐकून हेवा वाटला.
@ मानव पृथ्वीकर - कोरा चहा पूर्वी आवडायचा नाही. गल्फ मध्ये आल्यापासून सुलेमानी (कोरा चहा) प्यायची सवय लागली. पुदिन्याचे पान घालून छान लागतो. बिनसाखरेचा साधा चहा मात्र अजिबात आवडत नाही.
@mi_anu - धन्यवाद. तुम्हांला कश्या प्रकारचा चहा आवडतो ते देखील ऐकायला आवडेल.

मस्त लिहिलय..
लक्ष्मी रोड वरच्या होटेलांमधला जाड पांढर्या कपातला चहा आठवला. आईसोबत नेहमी लक्ष्मी रोडवर जाणं व्हायचं.तेव्हा चहाची ईतकी सवय नव्हती. पण आईला हवा असायचा म्हणून चहा घेणं व्हायचे. आणि तो चहा टेबलावर आणून देईपर्यंत थोडा कोमट झालेला असायचा.
चहाची सवय जॉब आल्यानंतर लागली. ऑफिसमधला टि.बैग वाला चहा कागदी कपातला, कॉन्फरन्स वगैरे असेल तर स्पेशल कपातला चहा.
तुमचे चहाचे वर्णने वाचून सगळे चहा आठवले.

वाह,

मी बऱ्याच वेळा चहा बरोबर break up करण्याचा प्रयत्न केला.
(रिक्षा https://www.maayboli.com/node/71744 )
पण आमचे हे इतका अप्रतिम चहा बनवतात(*?) ना की बास!
सगळे संकल्प चुलीत जातात.

लकी गर्ल.
आयता चहा मिळतो.

नवरा लाख देईल मागाल ते बनवून पण मी रिस्क घेत नाही पूर्वानुभवावरुन. Proud

छान लेख. खुशखुशीत

दिवसाच्या कुठल्याही वेळेला 'चहा घेणार का?' ह्या प्रश्नाला जर “घोटभर चालेल” अशी तुमची प्रतिक्रिया असेल तर समजा की
>>>>>
येस.
चहाला नाही म्हणवत नाही
आई म्हणायची, पाण्याला कधी नाही म्हणू नये
हे मी चहाबाबतही पाळतो

वडील म्हणायचे की आपल्याकडे कोणी प्लंबर इलेक्ट्रिशिअन कोणीही काम करायला आला की त्याला आधी मस्त चहा विचारावा. मग मनापासून आणि छान काम करतो.
. एखाद्याचे मीठ खाणारा त्याच्याशी गद्दारी करू शकतो पण चहा पिणारा नाही.

माझा असाही दिवसातून सात आठ वेळा चहा होतो. चहाशिवाय आयुष्याची कल्पनाही करवत नाही

खरी चहाची चव पाहिजे असेल तर त्यात आलं,लसुण, मिरे वगैरे पदार्थ टाकू नयेत...
चहाची चव घालवतात त्यांचा फ्लेवर डोमीनेट करून...

Khup chan lihile aahe.Chahachi chahati nahi pan lekh mast aahe.aawadala.

@च्रप्स - अगदी खरंय. मसाल्याचा फार मारा केल्यास मूळ चव बिघडते. माझा एक मित्र दालचिनी, मिरी, लवंगा वगैरे पदार्थ घालतो चहात. त्याची बायको म्हणते चहा उकळताना भात घातला तर मस्तपैकी पुलाव होईल.

चहा उकळताना भात घातला तर मस्तपैकी पुलाव होईल.>>>> Lol आवडली तुमची "चा" हत Happy
माझ्या एका मैत्रिणीचा किस्सा सांगते, तिच्या नवऱ्याला इतका गरम चहा लागायचा कि ती म्हणायची डायरेक्ट तोंडातच गाळते चहा आता, जरा सुद्धा वेळ नको जायला Lol

@ऋन्मेऽऽष - एखाद्याचे मीठ खाणारा त्याच्याशी गद्दारी करू शकतो पण चहा पिणारा नाही >>>> पूर्णपणे सहमत. तिबेट मध्ये खारट चहा मिळतो म्हणे (याक च्या दुधाचा). ते एकाच दगडात दोन पक्षी मारत असावेत Happy

अप्रतिम लेख! मनापासून आवडला. पत्र्या मारुती चौकात चहा आणि मालपाणी चा क्रीम रोल अनेक वेळा खाल्लाय त्याची आठवण आली. आम्ही सकाळी दोन-दोन किमी चालत जायचो विशिष्ठ अमृततुल्य चा चहा पिण्यासाठी.

तिबेट मध्ये खारट चहा मिळतो म्हणे (याक च्या दुधाचा
>>>>

याकचे दूध खारट असते की काय?
बाकी चहात घातलेल्या फरसाणमध्ये नमक असेल तर नंतर उरलेला चहा पिताना तो खारट लागतो. पण आवडतो मला तो.

@निनाद आचार्य - पत्र्या मारुती चौकात चहा >>>>> मी देखील पुणे मराठी ग्रंथालयात अभ्यास करायचो तेव्हा दुपारी चारच्या सुमारास तिकडेच चहा प्यायचो.

@ ऋन्मेऽऽष - याकचे दूध खारट असते की काय? >>> तिबेटच्या चहात चहा पावडर, पाणी याकचे बटर आणि मीठ घालतात. मला बटरवाला चहा कितपत आवडेल शंका आहे. परंतु जीरा-बटर बुडवून चहा प्रचंड आवडतो.

हैद्राबाद ला चारमिनार च्या बाजूला शादाब मध्ये खडे चम्मच की चाय नावाचा प्रकार मिळतो...
लाईफ मध्ये एकदा ट्राय करावाच...

मी टी हेटर्स ग्रुपची मेम्बर आहे, पण तुमची चहा/कॉफी धाग्यावरची पोस्ट अतिशय आवडली होती, म्हणून हा लेख वाचला. खूप मस्त आणि खुसखुशीत लिखाण. चहा न पिता प्रत्येक वाक्य आणि संदर्भाशी रिलेट करू शकले कारण माझा *तेव्हाचा बेस्ट बेस्ट फ्रेंड आणि आता झालेला दीर पक्का चहाबाज आहे. मी तेव्हा आणि आतासुद्धा त्याच्या चहा व्यसनाला पुरेपूर साथ दिली आहे ( मी स्वतः न पिता). त्याला आग्रह करून हा लेख वाचायला दिला आहे कारण मला अतिशय आवडलेला लेख आहे.

*तेव्हाचा बेस्ट बेस्ट फ्रेंड आणि आता झालेला दीर ( Kissing booth मुव्हीची स्टोरी आमच्या तिघांवरच लिहिल्यासारखी सेम आहे Happy )

हैद्राबाद ला चारमिनार च्या बाजूला शादाब मध्ये खडे चम्मच की चाय नावाचा प्रकार मिळतो>>
हे मला इथे २५ वर्षे राहूनही माहीत नाही.
अर्थात तिकडे जाणेही होत नाही. गेलो ते नक्की ट्राय करेन.

खडे चम्मच की चाय नावाचा प्रकार >> अमिताभच्या कोणत्या तरी मुव्हीमध्ये हा प्रकार पहिल्यांदा पाहिला होता. चहात एवढी साखर घालायची की चहात चमचा उभा राहायला हवा अशा प्रकारचा काही सिन होता.

मानव व्हेज आहात का?>>
नाही. विविध आहार ट्राय करताना कधी व्हेगनही होतो, ती गोष्ट वेगळी, तत्त्वत: कुठल्याही खाण्याचे वावडे नाही.
नक्की ट्राय करेन.

अमिताभच्या कोणत्या तरी मुव्हीमध्ये हा प्रकार पहिल्यांदा पाहिला होता. >>> हा तो नाना पाटेकरवाला.. बंडल होता म्हणून नाव विसरलो

अमिताभच्या कोणत्या तरी मुव्हीमध्ये हा प्रकार पहिल्यांदा पाहिला होता.>> कोहराम सिनेमात आहे हा सीन. नाना-अमिताभची मस्त जुगलबंदी आहे.

Pages