देव साहेब गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे तेव्हा त्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा दर्जा फार वेगळा होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यानंतर सबकुछ देव आनंद होऊ लागले. १९७० साली आलेल्या "प्रेम पुजारी" चित्रपटात तर देवसाहेब नायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. अशावेळी जेव्हा संगीताची बाजु एसडी सारखा कसलेला संगीत दिग्दर्शक सांभाळतो आणि गीतं ही गोपालदास सक्सेना "नीरज" कवीकडून लिहून घेतली जातात तेव्हा एक तर्हेचे असंतूलन निर्माण होते. गीत, संगीत अत्युच्च प्रतीचे आणि त्यामानाने दिग्दर्शन त्या पातळीवर न पोहोचणारे. "प्रेम पुजारी" पाहताना हे वारंवार जाणवते. यातील काही गाणी ही त्या गायकाच्या कार्किर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. किशोरच्या गाण्यांमध्ये "फूलों के रंग से" टाळता येईल का? खुद्द एस्डी ने गायलेल्या गाण्यांत " प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी" याचा उल्लेख करावाच लागेल. लताचे "रंगीला रे" तर ग्रेटच आहे. पण हे सर्व डोक्यात ठेवून आपण गाणं जर पाहायला घेतलं तर फारसं काही पदरी पडत नाही.
वहिदा आणि देव आनंद एका ठिकाणी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे धावताना दिसतात. या दृष्यात एका ठिकाणी चक्क वहिदा धडपडताना दिसते तरीही हा सीन तसाच ठेवलेला आहे. इतकं धावूनही कुणाला धाप लागलेली नाही. गाणे सुरेल आवाजात सुरुच आहे. इतक्या तरल गाण्याच्या सुरुवातीलाच चमकिल्या मजबूत दातांची जाहिरात केल्याच्या थाटात वहिदा उसाचे कांडे काडकन फोडून खाताना दाखवली आहे. कशासाठी? ठावूक नाही. कपड्याच्या दुकानात जाऊन एकाच तागाने दोघांचे ड्रेस शिवले असावेत इतके ते एकाच लालजर्द भडक रंगाचे आहेत. त्या रंगाचाही डोळ्यांना त्रासच होतो. गवताच्या पेंढ्या असलेले लोकेशनही वायाच घालवले आहे. त्यातून चमकदार असे काही केलेले नाही. एका ठिकाणी मात्र सुरेख संधी होती. अलिकडे काय चूंबन सरळ सरळ दाखवले जाते. पण या गाण्यात ती एक जागा आहे. पण तेथेही देवसाहेब फारसे काही करु शकलेले नाहीत. सरधोपट, आग आणि खळाळते पाणी दाखवले आहे. पण येथे एसडी आणि किशोरने मात्र कमाल केली आहे.
आणि नेमके याचसाठी हे गाणे जबरदस्त झाले आहे.
चुंबन घेण्याच्या क्षणी "वो प्यार..." असे म्हणून किशोरने सार्या उत्कट भावना आवाजात आणून ती ओळ अर्धवट सोडली आहे. आणि पुढे एसडीने कमाल करीत सूचक म्युझिक पीसचा वापर केला आहे. ही एकच जागा काही क्षणांसाठी पाहण्याजोगी. कारण वहिदा मचाणावरून खाली वाकलेली असते आणि नायक खालून येतो.....
बाकी वहीदासारखे सौंदर्य असले म्हणजे बर्याच गोष्टी सुसह्य होतात हे देखिल तितकेच खरे. पडद्यावर वहीदा म्हणजे निव्वळ नेत्रसूख. देवसाहेबांची मान हलण्यास सुरुवात झालेला तो काळ. त्यांनी फार काही केलेलं नाही. येथे विजय आनंद असता तर बहार आली असती असं वाटत राहतं. त्याने देव आनंदकडून काहीतरी वेगळं करून घेतलं असतं. गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.
पडद्यामागील गायक गायिकांची केमिस्ट्री ही पडद्यावरील नायक नायिकांच्या केमिस्ट्रीइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ही बाब हे गाणं अगदी अधोरेखित करतं. लताचा प्रेयसीचा, प्रीतीने भरलेला, तरल, कोवळा आवाज. काहीसा अवखळ आणि खेळकरही. लता म्हटल्यावर किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. स्त्रीच्या या बारीक सारीक भावना लताच आवाजात पकडू जाणे. आणि किशोरने देवाअनंद बनूनच गायिलेलं गीत याच या गाण्याच्या भरभक्कम बाजु. सुरुवातीलाच नीरजजी प्रेमाची रेसिपी सांगतात. प्रेम काय आहे?
शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब
उसमें फिर मिलाई जाये, थोड़ी सी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है
बस हेच खरं. काव्याचा आस्वाद घ्या, गाण्यातील संगीताचा आस्वाद घ्या. आणि गायक गायिकेतील सुरेख केमिस्ट्री अनुभवा. काही एका जागेसाठी गाणे पाहायलाही हरकत नाही. कारण गाण्यात वहीदा असली कि आपले लक्ष तिच्याकडेच असते. निदान माझे तरी...
अतुल ठाकुर
मुकेशची बरीच गाणी आवडतात.
मुकेशची बरीच गाणी आवडतात.
दिल जलता है तो जलने दो,
भूली हुई यादो मुझे इतना ना सताओ,
मेरे हमसफर - लता मुकेश,
किसीं की मुस्कुराहटो पे हो निसार,
चलरी सजनी अब क्या सोचे,
कयी बार युंही देखा है,
कही दूर जब दिन ढल जाये
आणि अजून बरीच
Pages