शोखियोंमें घोला जाये फूलों का शबाब...

Submitted by अतुल ठाकुर on 24 April, 2020 - 21:45

download_2.jpg

देव साहेब गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे तेव्हा त्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा दर्जा फार वेगळा होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यानंतर सबकुछ देव आनंद होऊ लागले. १९७० साली आलेल्या "प्रेम पुजारी" चित्रपटात तर देवसाहेब नायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. अशावेळी जेव्हा संगीताची बाजु एसडी सारखा कसलेला संगीत दिग्दर्शक सांभाळतो आणि गीतं ही गोपालदास सक्सेना "नीरज" कवीकडून लिहून घेतली जातात तेव्हा एक तर्‍हेचे असंतूलन निर्माण होते. गीत, संगीत अत्युच्च प्रतीचे आणि त्यामानाने दिग्दर्शन त्या पातळीवर न पोहोचणारे. "प्रेम पुजारी" पाहताना हे वारंवार जाणवते. यातील काही गाणी ही त्या गायकाच्या कार्किर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. किशोरच्या गाण्यांमध्ये "फूलों के रंग से" टाळता येईल का? खुद्द एस्डी ने गायलेल्या गाण्यांत " प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी" याचा उल्लेख करावाच लागेल. लताचे "रंगीला रे" तर ग्रेटच आहे. पण हे सर्व डोक्यात ठेवून आपण गाणं जर पाहायला घेतलं तर फारसं काही पदरी पडत नाही.

वहिदा आणि देव आनंद एका ठिकाणी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे धावताना दिसतात. या दृष्यात एका ठिकाणी चक्क वहिदा धडपडताना दिसते तरीही हा सीन तसाच ठेवलेला आहे. इतकं धावूनही कुणाला धाप लागलेली नाही. गाणे सुरेल आवाजात सुरुच आहे. इतक्या तरल गाण्याच्या सुरुवातीलाच चमकिल्या मजबूत दातांची जाहिरात केल्याच्या थाटात वहिदा उसाचे कांडे काडकन फोडून खाताना दाखवली आहे. कशासाठी? ठावूक नाही. कपड्याच्या दुकानात जाऊन एकाच तागाने दोघांचे ड्रेस शिवले असावेत इतके ते एकाच लालजर्द भडक रंगाचे आहेत. त्या रंगाचाही डोळ्यांना त्रासच होतो. गवताच्या पेंढ्या असलेले लोकेशनही वायाच घालवले आहे. त्यातून चमकदार असे काही केलेले नाही. एका ठिकाणी मात्र सुरेख संधी होती. अलिकडे काय चूंबन सरळ सरळ दाखवले जाते. पण या गाण्यात ती एक जागा आहे. पण तेथेही देवसाहेब फारसे काही करु शकलेले नाहीत. सरधोपट, आग आणि खळाळते पाणी दाखवले आहे. पण येथे एसडी आणि किशोरने मात्र कमाल केली आहे.

आणि नेमके याचसाठी हे गाणे जबरदस्त झाले आहे.

चुंबन घेण्याच्या क्षणी "वो प्यार..." असे म्हणून किशोरने सार्‍या उत्कट भावना आवाजात आणून ती ओळ अर्धवट सोडली आहे. आणि पुढे एसडीने कमाल करीत सूचक म्युझिक पीसचा वापर केला आहे. ही एकच जागा काही क्षणांसाठी पाहण्याजोगी. कारण वहिदा मचाणावरून खाली वाकलेली असते आणि नायक खालून येतो.....

बाकी वहीदासारखे सौंदर्य असले म्हणजे बर्‍याच गोष्टी सुसह्य होतात हे देखिल तितकेच खरे. पडद्यावर वहीदा म्हणजे निव्वळ नेत्रसूख. देवसाहेबांची मान हलण्यास सुरुवात झालेला तो काळ. त्यांनी फार काही केलेलं नाही. येथे विजय आनंद असता तर बहार आली असती असं वाटत राहतं. त्याने देव आनंदकडून काहीतरी वेगळं करून घेतलं असतं. गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.

पडद्यामागील गायक गायिकांची केमिस्ट्री ही पडद्यावरील नायक नायिकांच्या केमिस्ट्रीइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ही बाब हे गाणं अगदी अधोरेखित करतं. लताचा प्रेयसीचा, प्रीतीने भरलेला, तरल, कोवळा आवाज. काहीसा अवखळ आणि खेळकरही. लता म्हटल्यावर किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. स्त्रीच्या या बारीक सारीक भावना लताच आवाजात पकडू जाणे. आणि किशोरने देवाअनंद बनूनच गायिलेलं गीत याच या गाण्याच्या भरभक्कम बाजु. सुरुवातीलाच नीरजजी प्रेमाची रेसिपी सांगतात. प्रेम काय आहे?

शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब
उसमें फिर मिलाई जाये, थोड़ी सी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है

बस हेच खरं. काव्याचा आस्वाद घ्या, गाण्यातील संगीताचा आस्वाद घ्या. आणि गायक गायिकेतील सुरेख केमिस्ट्री अनुभवा. काही एका जागेसाठी गाणे पाहायलाही हरकत नाही. कारण गाण्यात वहीदा असली कि आपले लक्ष तिच्याकडेच असते. निदान माझे तरी...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पायोजी मैने राम रतन धन पायो. <<
त्याच अल्बम मधलं (भजन अर्पण?), लताबाईंचं "ठुमक चलतं रामचंद्र"... हे भजन हि अतिशय गोऽऽड आहे...

"गाणी चित्रित होताना नट नट्या कोण यावर देखील गायक ठरविले जात. महानायक अमिताभ साहेबांनी रफिंसारख्या सुरेख गायकाला घरी बसवून फुटकळ किशोरदाला हिट केलं हे लै मोठ्ठं पाप बरं. >>> ह्यावर कुरुक्षेत्र होउ शकेल बरं फेफ." - मी नाही हो असं काही म्हणालो. लाहोर व्हाया कुवेत!! .. काकुळतीला आलेली बाहुली. Happy

मला रफी आणि किशोर अशी चर्चा सुरु झाली की मी कट्टर रफी फॅन असुनही एक नेहेमी वाटतं कि ज्याला काव्यमूल्य फारसे नाही अशी गाणी किशोरने लोकप्रिय करून दाखवली. रफीच्या लोकप्रिय झालेल्या बहुतेक गाण्यांना समर्थ अशा काव्यशक्तीचे पाठबळ होते. किशोरसाठी गुलजारने लिहिलेली गाणी नंतरच्या काळातील. पण जेथे हळुवार पणा आहे, शायराना अंदाज आहे, उर्दू शब्दांची रेलचेल आहे, ती गाणी रफीकडेच गेली. आणि हा सिलसिला किशोरचे वादळ आल्यावरदेखिल तसाच राहिला. पर्दा है पर्दा ही "अमर अकबर अँथनी" मधली कव्वाली रफीकडेच गेली. तेव्हा मेरे सपनोंकी रानी हे गाणे किशोरने गाऊन आठ वर्षे उलटली होती. तरीही किशोर गात होता "माय नेम इज अँथनी गोन्साल्वीस". मला ही गाणी वाईट आहेत असं म्हणायचं नाही. पण किशोरच्या आवाजात ही जादू असणार की ज्यामुळे त्याच्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे काव्य म्हणून मूल्य फारसे नाही याकडे कुणाचे लक्षंच गेले नसावे.

त्याच्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे काव्य म्हणून मूल्य फारसे नाही याकडे कुणाचे लक्षंच गेले नसावे.>> किशोर म्हणून आपल्यातला वाटतो. तो
आपल्या सारखाच दंगा मस्ती कर णार. गोंधळ घालणार, दु:खी झालाच तर साध्या शब्दात व्यक्त होणार. उदा जहां चार यार मिल जाये...
पांच रुपैया बारा आना. सामान्या प्रेक्षकांच्या साध्या सुध्या भावना. बुजुर्गो ने फर्माया है. ... पग घुंगरु बांध ऐका.

रफी - लत ड्युएट्स किंवा सोलो रफी म्हणजे असं कराय्चं असतं प्रेम. अश्या भावना अस्तात हे समजा वुन देणारी गाणी. दिल का भंवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल,

पायो जी मैंने राम रतन धन पायो व ठुमक चलत रामचंद्र माझी पण वर्ल्ड बेस्ट फेवरिट भजने आहेत. ह्याची पहिल्यांदा कॅसेट मी ८७ मध्ये बहुतेक, हैद्राबादला बिर्ला मंदिर आहे तिथे टेकडीच्या पायथ्याशी एक धार्मिक पुस्तके कॅसेट , माळा वेंकटेशाचे फोटो मुर्ती वगैरे विकणारे एक दुकान आहे कार पार्किन्ग च्या समोर, तिथुन घेतलेली. व आल्यावर पाहुण्यांची ब्याद गेल्यावर लूप मध्ये ऐकलेली.

पायो जी मध्ये ते रामच आहे. नाम नाही. व पूर्ण अल्बम श्रीरामावरच आहे. नि:संदेह. ठुमक चलत रामचंद्र ह्यात लता च्या स्वरात वात्सल्य पुरेपूर व्यक्त होते. दीड दोन वर्शाच्या रामचंद्राचे( राम लल्ला ) चे वर्णन आहे. मला मूल उशीरा झाले त्यामुळे तो परेन्त ह्या गाण्यातुनच वात्सल्या चा अनुभव घेता येत असे. पण ह्यावर कोणीतरी बनवलेला व्हिडीओ अतिशय बेकार आहे. त्यापेक्षा लता फोटो व श्री रामाचे चित्र ठेवले असते तरी चलले असते. ह्यातील इतर भजने पण उत्तम टॉप क्लास आहेत. पण आता पूर्न लिस्ट हरवली. स्पॉटिफाय वर शोधला पाहिजे अल्बम

'पायो जी' ही मीरेची रचना आहे. ती कृष्णभक्त होती.

मागे काही राजस्थानी folk singers नी गायलेलं ऐकायला मिळालं होतं, त्यात 'नाम' होतं.

>> The Lata album in question has Ram . >>

हा अल्बम आहे.... आणि रामच आहे. रचना मीराबाईंची !

Lata

वहिदाला धडपडताना पाहिले. एरवी तसे लक्षात आले नसते पण तुम्ही उल्लेख केला म्हणुन एकदम स्ट्राईक झाले. वहिदाने शॉटनंतर नक्की देवानंद ला शिव्या दिल्या असणार. पडले असते ना मी म्हणुन.
दुसरी लक्षात आलेली गोष्ट म्हणजे गाण्याचा मूखडाच शबाब शराब संबंधीत आहे आणि पूर्ण शूटींग शेतात केले आहे. एखाद्या बार मध्ये सुंदर मदनिकांसोबत दारूचे घूट रिचवत नायकाला दाखवले असते तर ते समर्प्क दिसले असते.

भिकार दिग्दर्शनाचा उत्तम नमुना! गाण्यामुळे आणि वहिदाच्या हसण्यामुळे सुसह्य झाले.

गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.>>>> अतुल ठाकूर,+१

>>भिकार दिग्दर्शनाचा उत्तम नमुना! गाण्यामुळे आणि वहिदाच्या हसण्यामुळे सुसह्य झाले.

+१. गाणं बघायला सुरुवात केली पण पूर्ण बघावेसे वाटले नाहॉ. ऐकायलाच छान आहे.

मूर्तिभंजक आणि ब्लास्फेमस लेखनावर ' स्तब्ध', ' निस्तब्ध', ' नि:शब्द', ' निश्चल' अशाच प्रतिक्रिया येणार होत्या. Bw
कसं आहे, लताबाईंचा आवाज म्हणजे एखाद्या कमलनलिनीसारखा कोमल, नितळ नाजुक( या बद्दल नक्की पुन्हा ती विशेषणे!) त्याला धारा किंवा कडा नाहीत. काही तुळशींचे खोड चौधारी असते, काहींचे पंचधारी; पण हे अगदी वर्तुळ. मुलायम स्पर्शसुखद. त्रिकोण वगैरे असे कंगोरे नाहीत. किंवा असं असेल की वर्तुळ हे केंद्रबिंदुपासून परिघापर्यंतच्या रेषांनी बनलेल्या अनेक त्रिकोणांचे मिळून बनलेले असते. पण या वर्तुळाकारात त्रिकोणाच्या गुणांचे स्वतंत्र अस्तित्व राहात नाही. किंवा शुभ्र प्रकाशात अनेक रंगाच्या प्रकाशलहरी समाविष्ट असल्या तरी अंतिम दृश्य परिणाम शांतधवल असाच असतो. तसेच लताबाईंच्या आवाजाचे आहे. आता इथे उदाहरणे दिली तरी डाय हार्ड चाहत्यांना त्यात " जीव ओतून दिल खोलून गायलेले " गाणेच दिसणार. सारी सारी रात तेरी याद सताये आणि याद तेरी आयी मैं तो छम छम रोयी रे ह्या दोन गाण्यांत मला आशाचे याद तेरी अधिक भावपूर्ण वाटते. Bw . आजकल तेरेमेरे प्यारके चर्चे मधे पुरुष गायक किती उत्फुल्ल गातो! रुक जा ऐ हवा (शागिर्द) मध्ये भाव भावना कुठे दिसतात? अर्थात लिरिक्स स्ट्रॉंग नाहीत हे मान्य. पण गोरी चलो ना हंस की चाल या द्वंद्वगीतात आशा प्रभाव पाडून जातेच, तेही भावपूर्णतेचा बादशहा रफीसमोर! किंवा ये रात भीगी भीगी मधला मन्ना डेचा खुला आवाज आणि शब्द फेक. त्यांच्यासमोर लताबाई. सहसा द्वंद्वगीतात पुरुषगायकांसमोर मोकळेपणात लताबाई फिक्या पडल्या आहेत ह्या यापूर्वी अनेकांनी केलेल्या दाव्याशी मी सहमत आहे. किंवा मोरा नादान बालमा हे सोलो. किंवा दिल एक मंदिर है, दिल विल प्यार प्यार, दीदी तेरा देवर दीवाना, अजी रूठकर तुम कहां जाइयेगा, चल संन्यासी मंदिर में यामधे भावना कुठे दिसते? गाणी उत्तमच आहेत, वाद नाही. जसं कॉंपोझिशन तसं बरहुकूम सुरेल आणि श्रवणीय गाणं.
लताबाईंच्या खूपश्या गाण्यांत शांत किंवा करुण रस पाझरत राहातो. करुण विरहाची गीते, सावन, बरखा, रैन यावरची गीते(च) भावपूर्ण वाटतात. नंतर नंतर त्यांच्या आवाजाला खूपशी तंत्राची जोड दिली जात असे. आवाजाचा पोत बदलण्यासाठी. असो. मी माझे मत सोडणार नाही आणि चाहतेही नाही सोडणार त्यांची मते.
ता. क. : ठुमक चलत आणि पायो जी मैं ने ही भजने पंडित दि वि पलुसकरांनी गायलेली आधी कानांवर पडली. त्यांचा खूपच ठसा उमटला. लताबाईंची नंतर ऐकली. रागगायनात किंवा उपशास्त्रीय संगीतात भाव शोधू नये म्हणतात. पण ठसा पंडित पलुसकरांचाच राहिला.

लताबाईंचा आवाज म्हणजे एखाद्या कमलनलिनीसारखा कोमल, नितळ नाजुक
हीरा, फार सुरेख उपमा दिलीत. कमलनलिनी. क्या बात है!

जुन्या गाण्यात त्यांचा आवाज अगदी ब्लेंड ईन व्हायचा.
आठवा .... रुक जा रात ठेहर जारे चंदा (मीना कुमारी व राज कुमार) आणि तेरा मेरा प्यार अमर (बहुतेक साधना ) आवडती गाणी. All time favorite and epic songs. No one can match.
पण माझ्या लहानपणी मात्र तो डिस्टींक्ट ओळखू यायचा.
माईन माईन मुंडेर पे तेरी व जिया जले जान जले नैनो तले
ह्यातही गोडवा आहे पण edges जाणवतात. अर्थात ते वयामुळे असेल.
माझे मत आहे आहे आणि मला गाण्यातले काही कळत नाही हं. Happy

>> किंवा मोरा नादान बालमा हे सोलो. किंवा दिल एक मंदिर है, दिल विल प्यार प्यार, दीदी तेरा देवर दीवाना, अजी रूठकर तुम कहां जाइयेगा, चल संन्यासी मंदिर में यामधे भावना कुठे दिसते? <<
"दिल एक मंदिर है" हे सुमन कल्याणपूर यांचं गाणं आहे, परंतु त्यातहि आणि पुढे तुम्ही दिलेल्या गाण्यांमध्ये तुम्हाला कुठलीच भावना आढळत नसेल तर विषय संपला...

बाय्दवे, दिल एक मंदिर याच चित्रपटातली लताबाईंची दोन गाणी - "रुक जा रात ठहर जा रे चंदा"... आणि "हम तेरे प्यार मे सारा आलम"... हि गायकिच्या विद्यार्थ्यांकरता वस्तुपाठ आहेत...

लता मंगेशकरांनी गायलेल्या लुकछुपी बहोत हुई या रंग दे बसंती मधील गाण्यात पण भावना जाणवत नाहीत ? अलिप्त वाटते ?

राज, दिल एक मंदिरबद्दल कान पकडले आणि उठाबश्याही काढल्या. बाकी रुक जा रात आवडते. तेरे प्यार मे सारा आलम तितकंसं नाही.

>> दिल एक मंदिरबद्दल कान पकडले आणि उठाबश्याही काढल्या.<<
अहो, कशाला लाजवतांय. तुमच्याशी संवाद साधुन (विरोधी मतं असुनहि) माझेहि गैरसमज दूर होत आहेत...

आणखी एक किशोर चे तडकते फडकते नसलेले -

तुझे बिन जाने, बिन पहचाने मैंने हृदय से लगाया
पर मेरे प्यार के बदले में तूने मुझको ये दिन दिखलाया
जैसे बिरहा की रुत मैंने काटी
तड़प के, आहें भर-भर के
जले मन तेरा भी किसी के मिलन को
अनामिका, तू भी तरसे

आग से नाता, नारी से रिश्ता काहे मन समझ ना पाया?
मुझे क्या हुआ था, एक बेवफ़ा पे हाय, मुझे क्यों प्यार आया?
तेरी बेवफ़ाई पे हँसे जग सारा
गली-गली गुज़रे जिधर से
जले मन तेरा भी किसी के मिलन को
अनामिका, तू भी तरसे
मेरी भीगी-भीगी सी...

साठी आणि सत्तर दशकातील लता म्हणजे नव्वदीतला शाहरुख . इतकी उत्तुंग कलाकारी कि समोर प्रतिस्पर्धीच नसायचा . जसा आपला तेंडुलकर .

राम रतन धन पायो अल्ब म लताजींनी गायलेला १९८३ मध्ये रिलीज झालेला आहे. हा स्पॉटिफाय वर उपलब्ध आहे. आज पहाटे, पायो जी व नंतर
ठुमक चलत रामचंद्र ऐकले. अगदी वात्सल्य पूर्ण गाणे आहे.

साधा माणुस, लुकाछुपी बहुत हुई हे गाणं कानांना छान वाटतं. पण त्यात खूप इफेक्ट्स वापरलेत. रहमानला तंत्राशी खेळायला आवडतं. टेक्नीक वापरून वॉइस मॉड्युलेशनस हा त्याचा स्ट्रॉंग किंवा वुइक पॉइंट ज्याच्या त्याच्या आवडीनुसार.
जाता जाता: देवकी, फिल्मी, चीकू, भरत, आदिश्री सर्वांचे आभार. भक्कम पाठिंब्याबद्दल. सर्व स्तब्ध नि:शब्द निश्चल आणि धक्काग्रस्तांचेही आभार Happy कां की त्यांनी विचार करायला प्रवृत्त केले आणि लताबाईंची अनेक वेगळी गाणी दाखवून दिली

सुरवातीला वर वरच वाचला होता धागा, अत्ता नीट वाचून काढला. बरेच धक्के बसत त्याचं स्पष्टीकरण ही मिळालं, रोलरकोस्टर सारखं वाटलं. पण शेवटी प्रत्येकाचं मत आहे. कुणाला कुणाचा आवाज का आवडू शकतो आणि का नाही हे आपण नाही सांगू शकत. मला पूर्वी मुकेश ची गाणी एवढी आवडत नसत, पण एकदा एका मैत्रिणीच्या तोंडून मुकेश चं "वक्त करता जो वफा " हे गाणं ऐकलं. आणि त्या गाण्याच्या प्रेमात पडले. मग ओरिजनल गाणं ऐकलं. केवढं दर्दभरं आहे, "वरना जिती हुइ बाजी तो ना हा sss रे होते" हि ओळ काय म्हंटलीये त्याने.
मुकेशचंच अजून एक ऑल टाईम फेवरेट गाणं म्हणजे " तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी

मला आवडणारी मुकेशची गाणी म्हणजे...

मै ढुंढता हूं जिनको रातों को खयालोंमें - ठोकर

गुजरा जमाना बचपन का - देवर

हाले दिल हमारा जाने ना बेवफा ये जमाना - श्रीमान सत्यवादी

ये तो कहो कौन हो तुम कौन हो तुम - आशिक

जिक्र होता है जब कयामत का तेरे जलवों की बात होती है - माय लव्ह

कहीं करती होगी वो मेरा इंतजार - फिर कब मिलोगी

आणखीही खुप आहेत

Pages