शोखियोंमें घोला जाये फूलों का शबाब...

Submitted by अतुल ठाकुर on 24 April, 2020 - 21:45

download_2.jpg

देव साहेब गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे तेव्हा त्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा दर्जा फार वेगळा होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यानंतर सबकुछ देव आनंद होऊ लागले. १९७० साली आलेल्या "प्रेम पुजारी" चित्रपटात तर देवसाहेब नायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. अशावेळी जेव्हा संगीताची बाजु एसडी सारखा कसलेला संगीत दिग्दर्शक सांभाळतो आणि गीतं ही गोपालदास सक्सेना "नीरज" कवीकडून लिहून घेतली जातात तेव्हा एक तर्‍हेचे असंतूलन निर्माण होते. गीत, संगीत अत्युच्च प्रतीचे आणि त्यामानाने दिग्दर्शन त्या पातळीवर न पोहोचणारे. "प्रेम पुजारी" पाहताना हे वारंवार जाणवते. यातील काही गाणी ही त्या गायकाच्या कार्किर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. किशोरच्या गाण्यांमध्ये "फूलों के रंग से" टाळता येईल का? खुद्द एस्डी ने गायलेल्या गाण्यांत " प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी" याचा उल्लेख करावाच लागेल. लताचे "रंगीला रे" तर ग्रेटच आहे. पण हे सर्व डोक्यात ठेवून आपण गाणं जर पाहायला घेतलं तर फारसं काही पदरी पडत नाही.

वहिदा आणि देव आनंद एका ठिकाणी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे धावताना दिसतात. या दृष्यात एका ठिकाणी चक्क वहिदा धडपडताना दिसते तरीही हा सीन तसाच ठेवलेला आहे. इतकं धावूनही कुणाला धाप लागलेली नाही. गाणे सुरेल आवाजात सुरुच आहे. इतक्या तरल गाण्याच्या सुरुवातीलाच चमकिल्या मजबूत दातांची जाहिरात केल्याच्या थाटात वहिदा उसाचे कांडे काडकन फोडून खाताना दाखवली आहे. कशासाठी? ठावूक नाही. कपड्याच्या दुकानात जाऊन एकाच तागाने दोघांचे ड्रेस शिवले असावेत इतके ते एकाच लालजर्द भडक रंगाचे आहेत. त्या रंगाचाही डोळ्यांना त्रासच होतो. गवताच्या पेंढ्या असलेले लोकेशनही वायाच घालवले आहे. त्यातून चमकदार असे काही केलेले नाही. एका ठिकाणी मात्र सुरेख संधी होती. अलिकडे काय चूंबन सरळ सरळ दाखवले जाते. पण या गाण्यात ती एक जागा आहे. पण तेथेही देवसाहेब फारसे काही करु शकलेले नाहीत. सरधोपट, आग आणि खळाळते पाणी दाखवले आहे. पण येथे एसडी आणि किशोरने मात्र कमाल केली आहे.

आणि नेमके याचसाठी हे गाणे जबरदस्त झाले आहे.

चुंबन घेण्याच्या क्षणी "वो प्यार..." असे म्हणून किशोरने सार्‍या उत्कट भावना आवाजात आणून ती ओळ अर्धवट सोडली आहे. आणि पुढे एसडीने कमाल करीत सूचक म्युझिक पीसचा वापर केला आहे. ही एकच जागा काही क्षणांसाठी पाहण्याजोगी. कारण वहिदा मचाणावरून खाली वाकलेली असते आणि नायक खालून येतो.....

बाकी वहीदासारखे सौंदर्य असले म्हणजे बर्‍याच गोष्टी सुसह्य होतात हे देखिल तितकेच खरे. पडद्यावर वहीदा म्हणजे निव्वळ नेत्रसूख. देवसाहेबांची मान हलण्यास सुरुवात झालेला तो काळ. त्यांनी फार काही केलेलं नाही. येथे विजय आनंद असता तर बहार आली असती असं वाटत राहतं. त्याने देव आनंदकडून काहीतरी वेगळं करून घेतलं असतं. गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.

पडद्यामागील गायक गायिकांची केमिस्ट्री ही पडद्यावरील नायक नायिकांच्या केमिस्ट्रीइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ही बाब हे गाणं अगदी अधोरेखित करतं. लताचा प्रेयसीचा, प्रीतीने भरलेला, तरल, कोवळा आवाज. काहीसा अवखळ आणि खेळकरही. लता म्हटल्यावर किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. स्त्रीच्या या बारीक सारीक भावना लताच आवाजात पकडू जाणे. आणि किशोरने देवाअनंद बनूनच गायिलेलं गीत याच या गाण्याच्या भरभक्कम बाजु. सुरुवातीलाच नीरजजी प्रेमाची रेसिपी सांगतात. प्रेम काय आहे?

शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब
उसमें फिर मिलाई जाये, थोड़ी सी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है

बस हेच खरं. काव्याचा आस्वाद घ्या, गाण्यातील संगीताचा आस्वाद घ्या. आणि गायक गायिकेतील सुरेख केमिस्ट्री अनुभवा. काही एका जागेसाठी गाणे पाहायलाही हरकत नाही. कारण गाण्यात वहीदा असली कि आपले लक्ष तिच्याकडेच असते. निदान माझे तरी...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, अगदी सहमत. माला सिंह खूपच गोड दिसते. गाणी एक से एक आहेत. साधी प्रेमकहाणी आहे ती. गुमराहमध्येसुद्धा माला आवडली होती. मुख्य म्हणजे चोपडांनी तिच्याकडून थोडाफार अभिनय करून घेतला होता.

रसिक बलमा इतर कुणी म्हणू नये हे मान्यच! पण अनेक गाणी अशी आहेत की तिथे तिथे त्या त्या गायिकेचा आवाज अगदी शोभून दिसला. ....जोरदार सहमती.

स्वरातून मात्र नाही. म्हणजे कोरडेपणा आहे असंही नाही. उलट स्वर मधाळ, सहज तीन्ही सप्तके गाठणारा,पुरेसा तीव्रही, घनगंभीरही, तरी अलिप्त. सुरमायेचा सर्व पसारा आणि सप्तरंगी मोरपिसारा आपल्यासमोर मांडूनही नामानिराळा. .........इतक्या नेमक्या शब्दात तुम्हीच मांडू जाणे.लताच्या गाण्याबद्दल नेहमी मी म्हणायचे की एक दूरस्थ भाव जाणवतो. त्यांच्या उलट आशा भोसलेंच्या गाण्यांमधून हा दूरस्थ भाव जाणवत नाही.एक आपुलकी जाणवते.

बाकी लेख वाचायचा आहे.

स्वरातून मात्र नाही. म्हणजे कोरडेपणा आहे असंही नाही. उलट स्वर मधाळ, सहज तीन्ही सप्तके गाठणारा,पुरेसा तीव्रही, घनगंभीरही, तरी अलिप्त. सुरमायेचा सर्व पसारा आणि सप्तरंगी मोरपिसारा आपल्यासमोर मांडूनही नामानिराळा. .........इतक्या नेमक्या शब्दात तुम्हीच मांडू जाणे.लताच्या गाण्याबद्दल नेहमी मी म्हणायचे की एक दूरस्थ भाव जाणवतो. त्यांच्या उलट आशा भोसलेंच्या गाण्यांमधून हा दूरस्थ भाव जाणवत नाही.एक आपुलकी जाणवते.>> सहमत! गीता दत्तची गाणीही आतून आलेली वाटतात.

उदा. आशाचं अब के बरस भेज किंवा गीताचं आज सजन मोहे अंग लगालो.. इतका आर्त भाव, उदासी, व्याकुळता सुरासुरातून डोकावते आहे जसं त्या ते गाणं जगत आहेत. लतादीदींच्या गाण्यात का कोण जाणे पण एक अलिप्तपणा तटस्थपणा जाणवतो..गाणी कितीही प्रिय असली तरी!

लतादीदींच्या गाण्यात का कोण जाणे पण एक अलिप्तपणा तटस्थपणा जाणवतो..गाणी कितीही प्रिय असली तरी!>>

काही अपवाद म्हणजे रुक जा रात ठेहेर जा रे चंदा किंवा ओ बसंती पवन पागल..पण अपवाद हे बहुतेक नियमच सिद्ध करतात Happy

>>माझ्या मते लता आशा नंतर स्व तंत्र मोहोर उठवलेली गायिका गीताच.<<
सुरैया. गीता दत्तला एव्हढं फुटेज मिळतंय तर सुरैयाला विसरुन चालणार नाहि. पण तिच्याहि काहि मर्यादा होत्या, गीता दत्त सारख्याच. तिची काहि गाजलेली, संग्रहातली -
बिगडी बनानेवाले... (बडि बेहेन)
तुम मुझको भूल जाओ... (बडि बेहेन)
वो पास रहे या दूर रहे... (बडि बेहेन)
धडकते दिल कि तमन्ना... (शमा) पिलू रागावर आधारीत
मुरली वाले मुरली बजा... (दिल्लगी)
नुक्त चीन है... (मिर्झा घालिब)
ये न थी हमरी किस्मत... (मिर्झा घालिब) भिमपलास रागावर आधारीत
नैन दिवाने इक नहि माने... (अफसर)
तेरे नैनो ने चोरी किया... (प्यार कि जीत) पहाडि रागावर आधारीत

>>लतादीदींच्या गाण्यात का कोण जाणे पण एक अलिप्तपणा तटस्थपणा जाणवतो..गाणी कितीही प्रिय असली तरी!<<
मंडळी, वानगीदाखल उदाहरणं द्या. आम्हि उपकृत होउ...

मेरा साया, वो कौन थी, लेकिन, रेश्मा और शेरा... किती नांवं लिहु? तुर्तास या चित्रपटां मधल्या गाण्यांचा डोळे मिटुन आस्वाद घ्या. ट्रँक्विलिटि गाणं आंत भिनल्याशिवाय येत नाहि...

सुरैय्या च्या यादीत ‘यह कैसी अज़ब दास्ताँ हों ग़यी है, छुपाते छुपाते बयाँ हो ग़यी हैं’ हे रुस्तम सोहराब मधलं गाणं राहीलं. Happy

नरेन्द्र चंचल च्या गाण्यांत, ‘चलो बुलावा आया हैं’, ‘बेशक मंदिर मसजिद तोड़ो (Bobby), ‘ मैं बेनाम हो ग़या’ (बेनाम मधला सस्पेन्स ओपन होतो तेव्हाचं गाणं हे पण येतील. त्यामुळे, अप्रसिद्ध असला तरी अगदी वन साँग वंडर नाही म्हणता येणार.

हं..... "तारों की जुबांपर" हे प्रेमगीत आहे हे बरोबरच आहे. त्यात केलेला "प्ले ऑफ वर्ड्स" अतिशय ब्रिलियंट आहे पण ते मराठीत कसं भाषांतर करायचं विचारलं ना.... मग येतो धार्मिक संबंध. कसा? -
इदेला चंद्र दिसल्यावर लोक आपापसात अनेक अभिनंदनपर वाक्ये वापरतात - जसं इद मुबारक, खैर मुबारक इ. त्यात एक "चांद मुबारक" (कुठली फ्रेज कधी वापरायची याचे ही काही संकेत आहेत.). मात्र प्रेमाने भरलेली रात्र आल्यावर चंद्रालाच मुबारक म्हणायचे ही फार सुंदर रचना आहे. आता हे मराठीत आणायचं तर अनेक प्रश्न येतात ज्याने धागा भरकटू शकतो.
पहिला प्रश्न मराठीत "मुबारक" ला प्रतिशब्द काय? त्या शब्दात नुसत्या शुभेच्छा असं अभिप्रेत नाही. नॉन-रिलीजियस अ‍ॅनॉलॉजी म्हणून - "आई तुझा आर्शिवाद" ला जसा एक मराठीजनात सामूहीक संदर्भ आहे तो संदर्भ इतर भाषेत कसा पकडणार? "आई तुझा आर्शिवाद" चे "अम्मा की दुवा" हे हिंदी/उर्दू भाषांतर बरोबर पण त्यातील सामूहीक संदर्भ आहे असं नाही वाटतं. ज्या ज्या मातीत भाषा निपजली त्या त्या पद्धतीची 'महक' घेवून ती येणार. भाषांतराच्या नादात अर्थांतर होते....
(आता "आर्शिवाद" वरून कुणी प्लीज धागा भरकटवू नका. Happy मुद्दाम लिहीलयं. एक सामुदायिक आठवण आहे! Happy )

मन्नाडे च्या गाण्यांचा विचार करताना पटकन आठवत नाही, पण, शोलेतलं, यह दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’ हे ड्युएट मन्नाडे-किशोर जोडीचं आहे. पडोसन च्या एक चतुर नार चा उल्लेख झालाय की नाही ते आठवत नाही. तसंच मन्ना डे - सुमन कल्याणपूर चं ना जाने कहाँ हम थे, ना जाने कहाँ तुम थे’ पण अवीट गोडीचं गाणं आहे. ‘दिल कीं गिरह खोल दो’ वर तर माबो वरच खूप चर्चा झालीये.

चलत मुसाफिर मोह लिया रे
लागा चुनरी मे दाग
एक चतुर नार
पूछो ना कैसे मैने रेन
जिंदगी कैसी हैं पहेली
ए मेरी जोहराजबी
ये रात भिगी भिगी
आज सनम मधुर चांदणी मे
चुनरी संभाल गोरी.. उडी उडी जाय रे..

मन्ना डे चं आवडत नाही असं गाणं शोधावं लागेल. तसं रफी, किशोर , मुकेशबाबत होणार नाही.
रफीचं बाबुल की दुवाएं हे एक आणि नौशादकडच्या काही गाण्यांत गळा काढलाय ती किंचित आवडत नाहीत.
किशोरची जितेंद्रच्या साउथ पिक्चरमधली (यात आशाही आली) एटीजमधली बरीच.
मुकेशबाबत आवडत्या गाण्यांपेक्षा खटकणार्‍या गाण्यांची संख्या जास्त आहे.

हर तरफ अब यही अफसाने है...
फिर कहीं कोई फूल खिला...
तेरे नैना तलाश करे जिसे
जिंदगी कैसी है पहेली हाये...
...आणि बरीचशी मन्नाडेंची मराठी गाणी

लताच्या आवाजात अलिप्तता जाणवते हे वाचून धक्का बसला... इंफॅक्ट, भावना ओतून गायल्यामुळे तिच्या त्या स्वर्गीय आवाजातली गाणी लोकांच्या काळजात अजूनच रुतून बसली असेच बहुतेकांचे मत आहे. 50-60-70 ची दशके तर सोडाच, तेव्हा तर हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळच होता पण 80चे दशक जेव्हा संगीतकरांमध्ये एकसोएक फालतू गाणी द्यायची स्पर्धा सुरू होती तेव्हाही केवळ लतामुळे कित्येक मिडिओकर गाणी ऐकली गेली, प्रसिद्ध झाली. गाण्यात भाव ओतून तिने प्रत्येक गाणे गायले.

नुकत्याच तारुण्यात पाय ठेवलेल्या तरुणीची अधीरता असो, प्रेमात पडून लग्न केलेल्या स्त्रीच्या मनीचा शांत भाव असो की प्रेमात फसून कोसळलेली स्त्री असो,
नटखट बहीण असो, प्रेमळ आई असो की मुलापासून दुरावलेली व्याकुळ आई असो, प्रत्येक रुपात लताचा तोच आवाज भावना अचूक दाखवत गात राहिला....

इथे तुलना करायची नाही पण हा तटस्थपणा उषा मंगेशकरच्या आवाजात अनेकदा जाणवलाय. गाणे आहे ते गाऊन मोकळे व्हायचे हा एक भाव तिच्या खूप गाण्यात प्रत्ययास येतो.

आता लता मुकेश टॉप 100 ऐकतेय.. संगम ह्या माझ्या नावडत्या चित्रपटातील तिची दोन गाणी कानी पडली...
हर दिल जो प्यार करेगा मधला दिवाना हा शब्द कसला उच्चारते ती.. केवळ तीच करू शकते... ओ मेरे सनम मध्ये मुकेशला पूर्ण झाकोळून टाकलेय.

पुरुष गायकांच्या मंदियाळीत मन्ना डे हे एकमेव ट्रेन्ड गायक होते, हिंदुस्थानी क्लासिकल गायकिमधे. त्यांची काहि गाजलेली ड्युएट्स, रागांवर आधारीत -
केतकि गुलाब जुहि... (बसंत बहार) - बसंत बहार (भिमेसेन जोशीं सोबत)
भोर गइ गया अंधियारा... (अल्हिया बिलावल) - बावर्ची (हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय सोबत)
पुछों ना कैसे... (अहिर भैरव) - मेरी सूरत तरी आंखे (एस्डी बतीश सोबत)
प्रीतम दरस दिखाओ... (ललित) - चाचा झिंदाबाद (लताबाईं सोबत)
रितु आये रितु जाए... (गौड सारंग) - हमदर्द (लताबाईं सोबत)
शाम ढले जमुना किनारे... (खमाज) - पुष्पांजली (लताबाईं सोबत)
तु छुपी है कहां... (मालकंस) - नवरंग (आशाताईं सोबत)
तुम गगन के चंद्रमा... (यमन) - सती सावित्री (लताबाईं सोबत)
उड जा भंवर माया कमल का... (ब्रिंदावनी सारंग) - रानी रुपमती (लताबाईं सोबत)
ये रात भीगी भीगी... (किरवानी) - चोरी चोरी (लताबाईं सोबत)

अजुन खुप आहेत, सिंगल्स सुद्धा. नंतर कधी तरी...

>>केवळ तीच करू शकते...<<. +१
मी वर उल्लेख केलेल्या परख सिनेमातल्या गाण्यात प्रत्येक वेळेस "सजना" ला बाईंनी अशी सूक्ष्म गिरकि घेतलेली आहे कि ती ऐकुन कोणिहि विरघळेल...

लताच्या आवाजात अलिप्तता जाणवते हे वाचून धक्का बसला.
अगदी. मी अजुनही त्या धक्क्यातच आहे.
मंजिल मधलं लताने गायिलेलं "रिमझीम गीरे सावन सुलग सुलग जाये मन" मध्ये लताचा आवाज पावसाने चिंब भिजल्यासारखा वाटतो.

तिचे शब्दोच्चारच असे होते ...

कुठल्याही सप्तकात गाणे हा प्रकार तिच्यासाठी तिच्या श्वासासारखा सहज होता. त्यामुळे शब्दांकडे लक्ष देऊन त्यात योग्य त्या भावना दाखवायला तिला भरपूर वेळ मिळत असे हेमाप्राम. Happy बाकीची मंडळी गाणे नीट होतेय का, सूर नीट लागतोय का ह्या विवंचनेत असल्यामुळे भावाकडे थोडे दुर्लक्ष होत असणार.

मी लता मंगेशकरची फॅन मात्र नाहीये. मी आशावादी ग्रुपमध्ये आहे Happy Happy

अलिप्तता म्हणजे भावना पोचवत नाही असं नाही. तिला त्यात अगदी प्राण ओतून गायची गरज भासत नाही.
म्हटलं तर गुण.
म्हणजे अभिनेते भूमिका जगतात तसं . डॉ लागू असलं काही मानत नव्हते बहुतेक.
ते अभिनय करतानाही दूर उभं राहून स्वत: ला पाहू शकत तसं.

लता दीदींच्या गाण्यात अलिप्तपणा? बात कुछ हजम नहीं हुई! आज कल पांव मध्ये बोलो विचारणं किंवा आपकी आँखोंमें कुछ मध्ये गाण्यात हसणं! गाण्यात इतकं सुंदर हसूच शकणार नाही इतर कोणी! ही अलिप्ततेची कोणती परिभाषा आहे?
मला खरंतर उषा मंगेशकर यांची पण गाणी expression च्या दृष्टीने खूप आवडतात!
छबीदार छबी गाण्यात बांधावरनं चालू कशी ही ओळ नीट ऐकली तर कोणीतरी बाई शेतातल्या बांधावरून तोल सांभाळत चालते आहे असं चित्र डोळ्यासमोर उभंच राहतं! https://youtu.be/zWoTi6-6u7Q

बाकी या धाग्यावर इतकी मजा येते आहे! सगळ्यांच्या पोस्ट्स खूप छान Happy ओळखीची/अनोळखी अनेक गाणी कळताएत.

मला वाटतंय जस जसे प्रतिसाद वाढत जातील तस तशी आलिप्ततेची व्याख्या आणि परिभाषा बदलत जाणार आहे... Lol

बाय्दवे, मंडळी प्लीज उदारहण शोधा.

Nice original post and subsequent responses by many users.
I would like to add the ones I quickly remembered
Manna Dey : Kasme Vaade Pyaar Vafa ....
Lata : Ae Dil e Naadan .....

गीता दत्तचे 'हौले हौले हवा चले' एक भुरळ घालणारे नॉन-फिल्मी गाणे आहे. एके काळी माझ्या रीपीट लिस्टवर असे.
तसेच लता चे भुरळ घालणारे नॉनफिल्मी - बरसे बुंदिया सावन की ...
आशाचे - सलोना सा सजन है और मै हूं

Pages