रातभूल..(मी मुसाफिर एकटा..)

Submitted by अ'निरु'द्ध on 19 April, 2020 - 06:43

रातभूल..(मी मुसाफिर एकटा..)

ती शरदामधली रात्र 
अन मी गावाकडल्या घरी
पहुडलो बाजेवरती 
लिंब ढाळे चवरी वरी

ती शिशिरामधली रात्र
अन मी उघड्या माळावरी
तृणपाती हलवी वारा
मज भरे थंड शिरशिरी

ती अचंद्र काळी रात्र
अन मी रानवाटे वरी
काजऽवे लगडले तरुला
ठिणग्या हलती खाली वरी

ती चांदणकाळी रात्र 
अन् मी उजाड दुर्गावरी 
आसमंती मी एकटा
पेटत्या दिवट्या दिसती दुरी

ती लखलखणारी रात्र 
अन मी उघड्या व्योमाखाली
चांदणफुले चमकती गगनी
उधळण रत्नांची अंबरी

ती अथांग काळी रात्र
अन् मी अरण्यवाटेवरी
बाजुने घुबडाऽचा घुत्काऽर
मागुनि डरकाळी भयकारी

ती मध्य सागरी रात्र 
अन मी विराट नौकेवरी
ते अथांग गहिरे पाणी
प्रतिबिंबे काळी रजनी उरी

ती गूढ गारुडी रात्र 
मी रेताड वाळूच्या रणी
दूरऽवर उंटांचा काफिला
सरके काळ्या छायेपरी
 
ती चंद्रकोरीची रात्र 
अन मी श्रांत रुद्रमंदिरी
शेजारी माझ्या नंदी
अन् व्याधाचा तारा शिरी..

अचंद्र : अमावस्येची

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉलिडा!! एकेक कडवं शब्दचित्र आहे.

सुंदर Happy काय सुंदर शब्द वापरले आहेत.
ती लखलखणारी रात्र
अन मी उघड्या व्योमाखाली => व्योम हा शब्द फार कमीवेळा वापरला जातो.

द्वैत, प्रगल्भ.... प्रतिसादाबद्दल आभार..

<<<तुमच्या 'माझी ओळख' मधील, आवडीची वाक्ये तर इतकी खास आहेत. तीन्ही अप्रतिम.>>>
@ सामो, ती वाक्यं माझ्याही भयंकर आवडीची आहेत.
आवर्जून कळवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..

प्रत्येक कडव्यागणिक बदलणारे दृश्य आणि ते खुलवताना केलेली शब्दसंपदेची उधळण ही शक्तीस्थानं आहेत तुमच्या कवितेची. अतिशय आवडली. खूप दिवसांनी सशक्त कविता वाचायला मिळाली.