#दिग्याच्या_लेखणीतून
दि. २६.०३.२०२०
Self Quarantine Day ६
मोदींनी दिलेल्या २१ दिवसाच्या तमाम सुट्टीच्या निम्मिताने सगळेच घरी आहेत.
जर तुम्हीही माझ्यासारखे पुणे किंवा समांतर शहरातून कोरोना च्या कारणास्तव स्वतःच्या घरी ( गावी )आला असाल, तेंव्हा या २१ दिवसात घरी (बसून) राहण्यासंदर्भात माझी काही निरीक्षण वजा सूचना :
१. तुम्ही घरात आहेत . इथे ना तुमची ना मोदींची चालते . इथे फक्त तुमच्या आईची चालते .
तुम्हाला २१ दिवस जर आरामात (?) काढायचे असतील तर तिची मर्जी राखायला शिकावं (च..??) लागेल.
२. तुम्ही पुण्यात जरी स्वतःच्या हाताने जेवण बनवून खात असाल तरी घरी त्याचे गुणगान गाऊ नयेत अथवा तुमच्या so called किचन टिप्स इथे लागू पडत नाहीत. इथे तिच्या मर्जीने जे बनेल अन जस बनेल तेच खावं लागत. " हे असही बनवता येत" याच उत्तर मग तूच बनव वगैरे मिळू शकत. (जे ह्या सुट्टीच्या हंगामात तुम्हाला परवडणार नाही.)
३. बुधवार व रविवार या दिवशी नॉन-व्हेज न खाताही माणूस जगू शकतो. ( अरे इतर अफवा पसरवत होता तिथपर्यंत ठीक होत , त्या बिचार्या (..??) कोंबड्यानी तुमचं काय बिघडवल होत ..?? (..त्याचं नेहमीच गिर्हाईक जरी असलो तरी त्याचा आदर हा आहेच ..!!) वाघाला गवत खाण्यावाचून पर्याय उरला नाहीय.. जय व्हाट्सअँप युनिव्हर्सिटी..!!
४. तुम्हाला कपडे धुता येत नाहीत, हे तुम्ही मान्य करायला हवं . तुम्ही जरी कपडे हल्लीच धुतले असतील तरी ते पुन्हा धुतले जातील. तुम्ही त्याला विरोध करू नये. ( मी हल्लीच माझ्यादृष्टीने उत्तम धुतलेल्या कपड्यांवर मम्मीने थोडाफार हात फिरवल्यानंतर एक छोटा गणपती तयार होईल एवढी धूळ/ मळ कुठून आली याचा सध्या मी अभ्यास करतोय.)
५. घेतलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवाव्या लागतात. फक्त कंपनी मध्ये 5S च्या फुशारक्या न मारता घरी सुद्धा ते फॉलो केलं जात हे समजून घ्या. ( जर तुम्ही साखरेचा डबा घेतला न तो चुकून दुसऱ्याजागी ठेवला अन आईच्या ते निदर्शनास आले तर मग तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग नाही.) मग भले तुम्ही मॅनेजर असाल पण तिला तिच्या वस्तू रोजच्या अंतरावर सापडायला हव्यात.
६. वर्क फ्रॉम होम वगैरे करायला हरकत नाही पण सगळं काम सोडून जेंव्हा आज्ञा होईल तेव्हा लसूण सोलायला नकार देऊ नका . ते काम तुमच्या कामापेक्षा महत्वाचं आहे.
७. अन लास्ट बट नॉट द लीस्ट, घराचा उंबरा ( हल्लीच्या घरांना असतो ..??) हि तुमची लक्ष्मणरेखा आहे हे लक्ष्यात असू द्या. कोरोना नावाचा बागुलबुवा तर आहेच पण गल्लीतील लोक तुम्ही परगावावरून न येत परग्रहावरून आल्यासारखे तुमची परीक्षा करू लागतील. कधी-कधी आपण पुण्यात काम करतो कि चीन मध्ये असा तुम्हालाही प्रश्न पडेल. अन त्यात जर चुकून तुम्हाला दिवसातून एकदा जरी खोकला आला तर मग .. असो ..!!
म्हणून सांगतोय या कठीण समयी घरीच राहा, घरच्यांची काळजी घ्या, त्यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधा , चांगले अन काळाच्या ओघात हरवलेले छंद जोपासा.
स्वतःचीही काळजी घ्या अन एकमुखाने म्हणत राहा, Go कोरोना Go ..!!
तुमचाच,
दिग्विजय बळजी
मस्तच
नाय ओ. याच्या उलट आहे गावी.
नाय ओ. याच्या उलट आहे गावी. लेकाला काय खाऊ घालू आणि काय नको असं झालय आईला. वजन वाढलय तरी दिवसातून चार वेळा आई म्हणतेच की पार वाळलय पोरगं. कधी पोराचा पाय घरात टिकत नाही, तुझ्यामुळं तरी घरी बसलाय असं म्हणत दोनदा तरी करोनाचे आभार मानते ती. बाकी पसारा केल्यावर मात्र शिव्या खाव्या लागतात. त्या लहानपणापासूनच खातोय.
आई शब्द काढुन व दोन तीन
आई शब्द काढुन व दोन तीन मुद्दे वगळले तर बायको या शब्दासाठी ही पर्फेक्ट बसेल हा लेख :((
आवडलं.
आवडलं.