कॅमेर्‍यातून पाहताना

Submitted by अरिष्टनेमि on 6 April, 2020 - 07:33

नाकासमोर पाहून मी आपल्या सरळ वाटेनं जात होतो. जाता जाता एका कोरड्या ठक्क नाल्यातून पाखरं उडाली. अरेच्या, इथं पाणी आहे? मी थांबून नाल्यात उतरलो. रस्त्यावरून दिसणार्‍या पहिल्या वळणाशी आलो. पुढं नाला वळून डावीकडं गेला होता. इथं वीसेक फूट अंतरावर पाणी पाझरून पात्रात छोटं डबकं झालं होतं. वर मोवईनं सावली धरली होती. हिवाळा सरत आला की मोवई फुलावर येते. चैत्राच्या आजू-बाजूला तिची फळं पिकू लागतात. पानझडीमुळं द्राक्षांचे घोस लोंबावेत असे लिंबोळीसारख्या फळांचे फांदी-फांदीला घोस लगडलेले दिसतात. मग बहू पाखरांची इथं चंगळ होते. आताही इथं तमाशातल्या गवळणी डौलात चालाव्यात तशा नखर्‍यात काही भांगपाड्या मैना उतरून मुरडत नाचत होत्या. शोधून शोधून पिक्की-पाडाची फळं पाहून खात होत्या. ही त्यातलीच एक नखरेल नार.
Brahminy-Mynajpg.jpg

दुपार असावी. रस्त्यानं चालता चालता नाला आला. दोहों काठांनी धिप्पाड गोर्‍यापान अंगाच्या कहूच्या झाडांचं सांधण. लग्नात नव्या नवरीनं चेहर्‍यावर हातभर पुढं ओढलेल्या पदरातून क्वचितच चेहरा दिसावा असा नाला त्या कहूखाली दडलेला. डाव्या हातच्या झाडाखाली निळा प्रकाश चमकला. मी पाहिलं. नाल्यात आडव्या पडलेल्या झाडाच्या वाळलेल्या फांदीवर निळाशार बसलेला हा तर छोटा खंड्या. मी नाल्यात उतरलो. झुडुपाआडच्या मोठ्या दगडाशी स्थिर बसलो. मान वरखाली करत त्यानं पहिलं. उडून जाण्यासारखं त्याला काही वाटलं नाही. कहूच्या दाट पानोळ्यातून खाली उतरलेल्या कवडशात तो छान बसून राहिला. कसा म्हणताय? हा असा.
Common-Kingfisher.jpg

सुजानगड कधी ऐकलंय का? शोलेतल्या ‘रामगड’ सारखं एकदम भारदस्त वगैरे वाटतं ना! तर या सुजानगडचं काय? माहित मलाही नव्हतं. रंजा, माझा मित्र म्हणाला, "चल तालछप्परला पक्षी पाहायला." मी म्हटलं, "चलूयात की." तो एक दिवस आधीच पोहोचणार होता. मी अहमदाबादवरून बसनं या सुजानगडला गेलो तो या निमित्तानं. तालछप्पर म्हणजे 'बोलती बंद' जागा. अहाहा! काय महाराज ते पक्षी! इथं एका तळ्यावर गेलो कलहंस पाहायला. जाता जाता तिथं एक छोटी पाणकोंबडी दिसली. पाहता पाहता तिनं बुडी मारली अन चक्क एक मोठा बेडूक धरून आणला. चोच केवढी? बेडूक केवढा? 'लहान तोंडी मोठा घास' चा आद्य संशोधक बहुधा आमच्या आधी पोहोचून त्यानं सारं पाहिलं आणि म्हण शोधून पण टाकली. पण पायाभूत संशोधन दृढ करण्यासाठी ठोस पुरावे असावे लागतात. ते काम मात्र मी प्रामाणिकपणे केलं. या म्हणीसाठी साक्षात प्राणार्पण करणार्‍या लढवय्या बेडकाचं हे शेवटचं छायाचित्र.
Dabchick.jpg

संध्याकाळ झाली होती. ऊन्हं उतरली होती. वाघाची एक अट्टल जागा होती. तिथून जाताना वाघ-बिघ तर नाही दिसला. पण जागा घुबडासाठी बढिया. म्हणून बघता बघता एका सुकून मोडलेल्या बारीकशा झाडावर बसलेली आणि तिरप्या उन्हाच्या कवडशात चुकून सापडलेली कवडी दिसली. आता खोटं नाही सांगत पण स्टुडिओत मॉडेल फोटोग्राफीसाठी विशिष्ट कोनात स्पॉट लाईट्स लावून मग सांगितल्यानुसार मॉडेलनं मान-बिन वळवून बसावं आणि उत्तम फोटो साधावेत अशी परिस्थिती इथं. आजचा दिवस काही औरच. हा असा योग कधी-कधीच एखाद्याला लाभतो. आज माझ्या नावे होता. बघा ही झोकात बसलेली कवडी.
Dove.jpg

रोज आपण इमाने इतबारे नागरी आयुष्य जगतो. आपण घड्याळ हाताला बांधतो आणि घड्याळ आपल्याला काट्याला बांधतं. त्यातल्या त्यात आपण आपली सोय अशी पाहिली की बाबा कशाला सकाळी सकाळी टर्रर्रर्रर्रर्रर्र किंवा ट्रिंग-ट्रिंग-ट्रिंग किंवा टण-टण-टण किंवा असल्या कुळातले आवाज ऐकून झोपेतून उठायचं? मग सुमधुर कुळातले आवाज आपण गजर म्हणून ऐकू लागलो. पण काहीही वाजलं तरी ते यंत्रच आणि हा माणूसच. झोपेतच अंथरुणातून हात बाहेर काढून गजराचा गळा आवळला की काम खतम. माणूस एवढा उत्क्रांत (किंवा अधोक्रांत* म्हणा) झाला पण झोपेशी त्याची लढाई अजून काही तो निर्णायक नाही जिंकला. पण जर तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊन रहाल तर अनुभव वेगळाच येतो. कसलाच गजर तिथं लावायची गरज नाही. सूर्याच्या आधी उठून महाभृंगराज असे असे आलाप घेतो की ते ऐकून झोप जागेवर ठरतच नाही. थोडंसं शोधलंत तर हा गानसम्राट असा रियाजाला बसलेला दिसू पण शकतो.
*टीप – अधोक्रांत हा शब्द सर्वप्रथम अरिष्टनेमी या लेखकूने सन २०२० साली वापरला. Happy

Drongo.jpg

निसर्गात प्रत्येकानं आपला बचाव कसा करायचा हे ठरवलं आहे. कोणी बसून, कोणी पळून, कोणी उडून, कोणी दडून. ज्या प्रजातीचा ज्या तंत्रावर विश्वास बसला ते त्यांनी स्वीकारलं. गरुडासारखे शिकारी आपल्याला दुरूनच पाहून उडून जातात. तर रातवे, लावर्‍या असे छद्मावरणावर (camouflage) अवलंबून असणारे पक्षी, जवळ गेलं तरी उडतच नाहीत. त्यांना भयंकर विश्वास असतो की 'काही झालं तरी मला कोणी पाहू शकणार नाही.' थोडाफार याच वर्गात बसणारा असतो करवानक (stone curlew). एक दिवस या बेट्यानं मला चांगलं पळवलं आणि नंतर असा काही गवतात मुरून बसला की ज्याचं नाव ते. मला काही सापडला नाही. नंतर लक्षात आलं की एकानं मला चांगलंच खेळवलं, पण दुसरा पक्का लपून राहिला. हललाच नाही. तो इतका जवळ होता की त्याच्या डोळ्यातलं नसांचं जाळं मी कॅमेर्‍यातून पाहू शकलो.
Eye.jpg

फुलपाखरू, छान किती दिसते, फुलपाखरू.
या वेलीवर, फुलांबरोबर गोड किती हसते.
अशा कविता आणि गाणी ऐकून वाढलेलो आम्ही. नेहमीच फुलपाखरू म्हणजे फुलावर बसून मकरंद पिणार अशा कल्पनेत. पूर्वी एकदा नागझिर्‍यात काटेथुव्याला वाघिणीचे बच्चे आहेत म्हणून पाहायला गेलो. नाल्याच्या पात्रात कोळसुंदे. आता कुठली हो वाघीण दिसायला? तिथं त्यांनी सांबराचा फडशा पाडलेला. सांबराच्या रक्ताळलेल्या पायाच्या नळीवर बसून अनेक बिट्टया (Common Leopard) ही फुलपाखरं रस पित होती. मी अवाकच. हे माहितीच नव्हतं चक्क. नंतर अशा अनेक रोचक गंमतगोष्टी कळत गेल्या. त्यातली एक चांगली लक्षात राहील अशी गोष्ट म्हणजे नावात नवाब, राजा वगैरे असल्यामुळं जी फुलपाखरं मनात थोर पदावर असतात ती मला जास्तीत जास्त कायम वाघ-बिबटाच्या विष्ठेवरच आढळली. 'नाव सोनाबाई, हाती कथलाचा वाळा.' बघा ना आता हा नवाब! काय राव हे? नवाबशाही तुम्ही बुडवलीत की हो. चक्क रानकुत्र्याच्या विष्ठेवर बसून रसपान चाललंय की.
Nawab.jpg

मंजूळ आवाजासाठी ज्यांची ख्याती आहे त्या पक्ष्यांमध्ये हळद्याचा नंबर लागतोच. दिसायला सुंदर, गायला मधुर. असा हा हळद्या ना रूपाने लपतो, ना आवाजाने झाकतो. याचे महाराष्ट्रात दिसणारे प्रकार तीन; साधा हळद्या (पूर्ण पिवळा), काळटोप हळद्या किंवा बुरखाधारी हळद्या (डोकं काळं), सुरमा हळद्या (दोन्ही डोळ्यांवर काळी पट्टी). तर एका धुमधाम पावसाच्या दिवशी गाडी अडकली चिखलात. पुढं जाईना, मागं येईना. सारे उपाय थकले. शेवटी ट्रॅक्टर हाच उपाय राहिला. ट्रॅक्टर आणणे म्हणजे गेला दिवस. मी म्हटलं आता काय? इथं बसण्यापेक्षा निघा पायी पायी. निघालो. जाता जाता जाता एका ठिकाणी हिरव्याकंच रानात हळद्याची शीळ घुमली. अहाहा! अहो जीभेवर पिठी साखर विरघळावी असा गोड आवाज कानाला तृप्त करून गेला. मी थांबून पक्ष्याचा ठिकाणा शोधला. हिरव्या पानात तो पिवळा सूर्यपुत्र एका क्षणी लपत होता, दुसर्‍या क्षणी चमकत होता. त्यानं माझी नजर बांधली. होता होता, एका फांदीवर चोचीत खजिना घेऊन तो माझ्याकडं पाहू लागला. तो क्षण सुंदर की पक्षी सुंदर हे ठरवणं कठीणच. तुम्हाला सांगता आलं तर बघा.
Oriole1.jpg

याच पोरगेल्या नाल्यात फिरताना मला नीलमणी आणि स्वर्गीय नर्तक दिसले होते. म्हणून म्हटलं की एकदा सवडीनं जायला पाहिजे. असं ठरवून मी गेलो. फिरत फिरत बरंच काही पाहिलं. दुसर्‍या एका मोठ्या नाल्याच्या काठाशी पिवळ्या गळ्याच्या चिमण्या येणं-जाणं करत होत्या. म्हणून तिथं रेंगाळलो. इथं काठ चांगलाच उंच होता. इथून नाला पात्र नाही म्हटलं तरी तीस फूट खोल असेल. मे महिना होता म्हणून पाणी थोडंस जीव धरून होतं. एरवी या ओढ्याला पाणी भक्कम. अशा उंच काठावर थांबण्याचा फायदा असा होता की उंचावर बसलोय म्हणून पक्षी काठाच्या झाडावर जरी बसला तरी ती ऊंची नालापात्रातून होती. माझ्या जागेवरून पाहिलं तर पक्षी मला समोरच दिसत. अशातच झाडांच्या दाटीत न लपणार्‍या केशरी रंगाचा स्वर्गीय नर्तक मला दिसला. दूर होता. दिसत होता पण कॅमेर्‍याच्या टप्प्यात गवसण्यासारखा नव्हता. मी आहे तिथूनच किडे पकडतानाच्या त्याच्या हवाई कसरती पहात राहिलो. नेमका किड्यांच्या मागे भुलून तो इकडं इकडं येत गेला आणि अल्लद समोरच आला की हो. हे अनपेक्षित होतं.
Paradise-Flycatcher.jpg

ऑगस्ट महिन्याची गोष्ट. पावसाची झड उघडली पण हलकी भुरभुर चालू होती. ओढ्या-नाल्यांची वरच्या बाजूची माती धुवून आता नितळ पाणी येऊ लागलं होतं. रस्ता ओलांडून जाणारा एक नाला फारच मोहक होता. झुळझुळ पाणी. हलका पाऊस. वरुन श्रावणातल्या हळदी उन्हाचा शिडकावा. एकच नंबर. छत्रीखाली कॅमेरा धरून नाल्याकाठी दगड पाहून बसलो. फोटो-बिटो झाले. पाणी ऐकत बसलो. पाऊस ऐकत बसलो. पानं ऐकत बसलो. इथं घटकाभर बसायला मिळावं यापरतं सुख काय? अद्भुत अनुभव.
Stream.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्ग!!! काय सुरेख वर्णन आहे.
वाघाच्या जाळीजवळून जाताना , तुमच्याकडे बंदूक असते की नाही? म्हणजे स्वसंरक्षणार्थ.

मस्तच...

सुंदर छायाचित्रे आणि तितकेच आकर्षक वर्णन

अप्रतिम!
पाणी ऐकत बसलो. पाऊस ऐकत बसलो. पानं ऐकत बसलो. इथं घटकाभर बसायला मिळावं यापरतं सुख काय? अद्भुत अनुभव.>>
सहमत! अगदी मायबोलीच्या भाषेत भा पो Happy

वा..!! क्या बात..
निरीक्षण, वर्णन , छायाचित्रांची सुरेख मैफल

Pages

Back to top