लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : -
https://www.maayboli.com/node/72801
https://www.maayboli.com/node/72846
हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.
१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले. एतद्देशीय शासकांचे वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी खच्चीकरण करून त्यांना मांडलिक बनवण्यात आले, काहींचे पूर्ण राज्यच खालसा करून तेथे कंपनीचा थेट अंमल सुरु झाला. १८१८ साली मराठी सत्तेचे शेवटचे आव्हान संपुष्टात आले आणि पूर्ण भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची एकहाती सत्ता स्थापन झाली. भारतात लुडबुड करणाऱ्या अन्य युरोपीय वसाहतवाद्यांना त्यांनी तोवर आवर घातला होता. आता भारतातील सर्वशक्तिमान सत्ताकेंद्र म्हणून फारसे आव्हान कंपनीपुढे राहिले नाही.
कंपनीची ताकद प्रचंड पटीत वाढली, कोलकाता त्यांच्या राजधानीचे शहर असल्यामुळे त्याच पटीत शहराचे महत्वही वाढले. गव्हर्नर जनरल, मोठे मुलकी आणि सैन्याधिकारी, श्रीमंत व्यापारी, स्थानिक मांडलिक राजे-जहागीरदार यांची भव्य निवासस्थाने कोलकात्यात स्थलांतरित झाली. तालेवार सावकारी आणि व्यापारी पेढ्या, नाणी पाडण्याची टाकसाळ, सरकारी कोषागार आणि लेखागार, न्यायालय, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालये यांनी शहर सजले. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आणि सुरक्षा पुरवणाऱ्या लोकांची वस्तीही आपसूकच वाढली.
ही वर्षंशंभरी बंगाल प्रांतासाठी आणि विशेषतः कोलकाता शहरासाठी प्रचंड धामधुमीची आणि सामाजिक बदलांची ठरली. ह्या काळात कलकत्ता मदरसा (१७८१), एशियाटिक सोसायटी (१७८४) आणि फोर्ट विल्यम कॉलेज (१८००) अशा नामवंत संस्था कोलकात्यात स्थापन झाल्या आणि भरभराटीला आल्या. स्थानिकांबद्दल फार ममत्व निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांना आपल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी ब्रिटिश सत्ता पुढे सरसावली असा मामला नव्हता. ब्रिटिशांना आपले शासन व्यवस्थित चालवण्यासाठी स्थानिक लोकांची गरज होती. सुरवातीला काही दशकं शिक्षण व्यवस्था दुपेडी होती - ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षकांनी स्थानिक भाषा आणि कायदेकानू शिकवणे आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्थानिकांना शासनतंत्रासाठी योग्य असे प्रशिक्षण देणे अशी एकमेकांना पूरक व्यवस्था. त्यासाठी एतद्देशीय भाषांचा अभ्यास गरजेचा होता. संस्कृत, अरेबिक, पर्शियन, बंगाली, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषांचे विद्वान शिक्षक कोलकात्याच्या शाळा-विद्यालयांमध्ये काम करू लागले. बंगाली स्थानिकजन इंग्रजी भाषा शिकले. याकाळात अक्षरशः शेकडो पुस्तके, ग्रंथ आणि शासकीय कागदपत्रे अन्य भाषांमधून इंग्रजी आणि बंगालीत भाषांतरित करण्यात आलीत, त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांची मोठी जमात कोलकात्यात तयार झाली. १७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती ! यावरून विषयव्याप्तीचा एक अंदाज यावा.
कंपनी सरकारसाठी सरकारी आणि महसुली कागदपत्रांची हाताळणी करणाऱ्या लेखनिकांची आणि कारकुनांची संख्या तर प्रचंडच वाढली. ह्या मंडळींना काम करण्यासाठी शहरात २५ एकर क्षेत्रफळाच्या ‘लाल दिघी’ तळ्याकाठी भव्य 'रायटर्स बिल्डिंग' बांधण्यात आली. ही कोलकात्यातील पहिली ३ मजली इमारत. त्यावेळच्या काही ब्रिटिश प्रवासी अधिकाऱ्यांनी इमारतीचे डिझाईन गचाळ आणि ओबडधोबड असल्याची टीका केली आहे, गुरांच्या गोठ्याशी तुलना करायलाही कमी केले नाही. पण राज्यकर्त्यांची पसंती रायटर्सला सदैव लाभली आहे. ब्रिटिश सत्तेच्या वाढत्या वैभवाला अनुकूल असे बदल वेळोवेळी घडून रायटर्स बिल्डिंग एक इमारत राहिली नसून १३ वेगवेळ्या इमारतींचा समूह झाला आहे. बदलली नाही ती रायटर्सची 'सरकारी मुख्यालय' म्हणून असलेली वट आणि इमारतीचा लाल रंग !
आज २४० वर्षांनंतर रायटर्स बिल्डिंग मध्ये पश्चिम बंगाल सरकारचे मुख्यालय आहे. सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून रायटर्सचे स्थान आजही अबाधित आहे.
सुप्रसिद्ध 'रायटर्स बिल्डिंग' कोलकाता.
कंपनीची सत्ता जसजशी मजबूत होत होती तसे तसे ब्रिटन आणि युरोपच्या अन्य भागातून अधिक लोक नशीब काढण्यासाठी कोलकात्यात दाखल होऊ लागले. त्यात व्यापारी होते, शिक्षक होते, धर्मप्रचारक, कलाकार, सैनिक, हौशी प्रवासी - पर्यटक सगळेच होते. त्यातलाच एक विल्यम करे (William Carey). १७९३ मध्ये तो ख्रिती धर्मप्रसारक म्हणून कोलकात्याला आला आणि इथलाच झाला. त्याने बायबलचा पहिला बंगाली अनुवाद केला आहे. (त्याला बायबलच्या प्रथम मराठी अनुवादासाठीसुद्धा ओळखले जाते.) विल्यमने उडिया, असामी आणि संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवले आणि इंग्रजी आणि बंगालीसोबत ह्या अन्य भाषा शिकवणासाठी सेरामपूर कॉलेज स्थापून तेथे अनेक वर्षे अध्यापन केले. बहुभाषाकोविद विल्यमने बंगाली लिपीचे प्रमाणीकरण, बंगाली व्याकरणाची आधिकारिक नियमावली आणि बंगाली-इंग्रजी शब्दकोश सिद्ध करण्यात पुढाकार तर घेतलाच पण स्थानिक दर्जेदार साहित्याचा सखोल अभ्यास करून इंग्रजीत अनुवादही केला. रामायणासारख्या महाकाव्याचा इंग्रजीत आणि बायबलचा अनेक भारतीय भाषा आणि बोलीभाषांमधे अचूक अनुवाद करण्याच्या कामांमध्ये मोठे योगदान दिले. विल्यमने कोलकात्यात स्थापन केलेले सेरामपूर कॉलेज 'लेखी पदवी' देणारी आशियातील पहिलीवहिली शिक्षणसंस्था म्हणून प्रसिद्ध झाले. शिक्षक आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक म्हणून त्याने मोठा लौकिक मिळवला. कोलकात्यात पहिला छापखाना सुरु करून रोमन, देवनागरी आणि बंगाली लिपीत साहित्य प्रकाशित करण्याची मुहूर्तमेढ रोवली. विल्यमची कर्मभूमी असलेला कोलकात्याच्या भाग आज सेरामपूर युनिव्हर्सिटी नावाने ओळखला जातो.
सेरामपूर युनिव्हर्सिटीची दोनशे वर्षे जुनी इमारत, कोलकाता.
पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण आणि देशविदेशातील विद्वान शिक्षकांचा संपर्क ह्यामुळे कोलकात्यातील समाजजीवन आमूलाग्र बदलले. पारंपरिक विद्याभ्यास करणारे शेकडो भारतीय लोक ब्रिटिश शासनप्रणीत संस्थांशी जोडले गेले. इंग्रजी भाषा आत्मसात करून अधिक ज्ञान मिळवण्यासाठी अनेकजण विलायतेत शिकायला गेले. तत्कालीन ब्रिटिश / युरोपीय विचारसरणीचा आणि जीवनपद्धतीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तेथून कोलकात्यात परत आल्यावर अनेकांनी अध्ययन-अध्यापन-संशोधनाचे काम हाती घेतले. ह्या संवादामुळे कोलकात्याच्या अभिजनांना नवीन संकल्पनांची तोंडओळख जलद गतीने झाली. राज्यकर्त्यांची भाषा असल्यामुळे इंग्रजीला अधिकच मान मिळाला तरी बंगाली भाषेचे महत्व काही कमी झाले नाही. संवादाची भाषा म्हणून समाजात इंग्रजीसोबत बंगाली भाषेलाही प्रतिष्ठा मिळत राहिली. बंगाली-इंग्रजी शब्दकोश आणि बंगालीत भाषांतर झालेल्या उत्तमोत्तम पुस्तकांनी बंगाली भाषकांना मातृभाषेतून नवीन विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. १८१३ पासून कोलकाता आणि जवळपासच्या भागात अर्मेनियन, डच आणि ब्रिटिश ख्रिस्ती धर्मगुरूंचा ओघ वाढला. त्यांनीही स्थानिकांशी संबंध वाढवण्यावर जोर दिला. बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर झाले आणि चर्चमधल्या प्रार्थना बंगालीत करायला सुरुवात झाली.
मागील भागात सांगितल्याप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या मिशनरी शाळांची मोठी मालिका कोलकाता शहरात स्थापन झाली. ह्या मिशनरी शाळांमध्ये होणारे ख्रिस्ती धर्माचे गुणगान पसंत नसलेल्या काही स्थानिक धनपतींनी हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या इंग्रजी आणि बंगाली शिक्षण संस्थांची स्थापना केली. पारंपरिक भारतीय ज्ञानवारसा न सोडता आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे असा त्यांचा प्रयत्न. ओरिएंटल सेमिनरी ही अशीच एक विख्यात संस्था. सरकारी किंवा चर्चचा हस्तक्षेप अजिबात न होऊ देता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था अल्पावधीतच लोकप्रिय झाली.
ओरियंटल सेमिनरीची इमारत, कोलकाता.
ह्याचवेळी ब्रिटन-युरोपमध्ये पहिल्या उद्योगक्रांतीला (१७६०-१८४०) लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रचंड पुरवठा करणाऱ्या भारतीय भूभागातील प्रमुख बंदर म्हणून कोलकात्याने एक आगळीवेगळी औद्योगिक-व्यापारी क्रांती अनुभवली. सहभाग फक्त कच्च्या मालाच्या पुरवठ्यापर्यंतच सीमित असला तरी विदेशी व्यापाऱ्यांबरोबरच देशी जमीनदार आणि व्यापारीसुद्धा त्यात उतरले. एकमेकांशी स्पर्धा करत, भांडत, जुळवून घेत एकमेकांचा वापर करून श्रीमंत झाले. राज्यकर्ते आणि धनको-सावकार-व्यापारी यांच्या परस्पर गरजेतून १८०६ साली 'बँक ऑफ कलकत्ता' शहरात स्थापन झाली. शहरात १७५७ सालीच नाणी पाडण्यासाठी ब्रिटिश टाकसाळ 'मिंट ऑफ कलकत्ता' उभारण्यात आली होती, पुढे ३३ वर्षांनी इंग्लंडमधून मागवण्यात आलेल्या नवीन यंत्रांनी मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्याचे काम सुरु झाले. १८२९ सालापासून नवीन भव्य इमारतीतून दररोज ६ लाख नाणी पडणारी व्यवस्था क्रियान्वित झाली. (ही देखणी इमारत मात्र बेल्जियममधल्या जुन्या कापड बझाराची हुबेहूब नक्कल आहे.) कोलकात्यात ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यांच्या मालकांना विम्याची हमी देण्यासाठी भारतातील पहिलीवहिली विमा कंपनी 'ओरियंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी' स्थापन झाली (१८१८). मालाची साठवणूक आणि खरेदी-विक्री यासाठी 'कमोडिटी एक्सचेंज' आणि लिलावाच्या खास सोई-सुविधा शहरात निर्माण करण्यात आल्या. या सर्व व्यापात स्थानिकांच्या हातातही पैसा आला.
कोलकाता शहराची ब्रिटिश 'व्हाईट टाऊन' आणि उरलेले 'नेटिव्ह ब्लॅक टाऊन' अशी सुरवातीला झालेली विभागणी जाऊन हळूहळू स्थानिक जमीनदार आणि धनिकांचे महाल आणि व्हाईट टाऊनच्या राजेशाही इमारती यांची सरमिसळ झाली. ह्या भव्य महालांनी कोलकात्याला 'सिटी ऑफ पॅलेसेस' अशी ओळख मिळवून दिली. अनेकविध देशातून, वेगवेगळ्या समाजातून आलेल्या लोकांच्या आणि त्यांच्या संस्कृतींच्या अभिसरणातून कोलकात्याच्या स्वतःचे असे व्यक्तिमत्व तयार झाले. आपसात चर्चा-संवाद आणि प्रसंगी वादविवाद करणे कोलकात्याच्या संस्कृतीत रुजले. चर्चा - संवाद -वादविवाद करणे हा शहराचा गुण जुनाच.
यथावकाश ब्रिटिश विचारांचा पगडा असणारा, त्यांच्याच पद्धतीचे जीवन जगू इच्छिणारा, स्थानिक भाषा आणि संस्कृती समजणारा, नोकरी-व्यापारउदीम करून श्रीमंत झालेला असा इंग्रजी भाषक अभिजनांचा एक वेगळा वर्ग कोलकात्यात निर्माण झाला. काहींच्या मते असा 'ब्राऊन साहेब' वर्ग आजही शहरात आहे.
एक मात्र खरे. कोलकात्याच्या ह्या इंग्रजाळलेल्या बंगाली भद्राजनांनी खऱ्या अर्थाने 'बंगालेर नबोजागरण' म्हणजे सर्व क्षेत्रात बंगालच्या नवजागरणाचा सूत्रपात केला - त्याबद्दल पुढच्या भागात.
(क्रमशः)
(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)
छान झाला आहे लेख. पु भा प्र
छान झाला आहे लेख.
पु भा प्र
बहोत खूब! मस्त ओळख करून देत
बहोत खूब! मस्त ओळख करून देत आहे तुमची लेखमालिका
फार छान. आवडला हा भाग पण.
फार छान. आवडला हा भाग पण. ब्राऊन साहेब वर्गाबद्दल वाचायला फार उत्सुक आहे.
छान. वाचत आहे.
छान. वाचत आहे.
@ कुमार१,
@ कुमार१,
@ टवणे सर,
@ सस्मित
आभार.
@ सीमा,
@ सीमा,
.... ब्राऊन साहेब वर्गाबद्दल वाचायला फार उत्सुक आहे....
पुढच्या काही भागांमध्ये याबद्दल आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
आवडला हा भाग पण
आवडला हा भाग पण
मालिका छानच चालू आहे. पण
मालिका छानच चालू आहे. पण सवयीने आता अन्न: वै प्राणा: चा पुढचा भाग चालू होईल असे उगीचच वाट्त राहते. ते हि नो दिवसा: गता:
@ हर्पेन
@ हर्पेन
नियमित प्रतिसादांबद्दल आभार.
@ अमा,
आभार.
.... ते हि नो दिवसा: गता: .... हे समजले नाही.
ज्यांनी इथपर्यंत वाचले आहे
ज्यांनी इथपर्यंत वाचले आहे त्यांच्यासाठी पुढील चौथा भाग इथे आहे :-
https://www.maayboli.com/node/72977
Ha hi chan bhag.
Ha hi chan bhag.
@ वेडोबा,
@ वेडोबा,
आभार.
पुढचे भागही वाचावेत असा आग्रह.
खूप छान लिहीले आहे.
खूप छान लिहीले आहे.
मला कोलकात्याचे ठराविक भाग माहीत आहेत.
फिरायला वेळ नाही मिळत. तुमच्या लेखमालिकेमुळे आता पुढच्या वेळी वेळ काढून पाहून येईन.
अतिशय सुंदर लिहिले आहे...
अतिशय सुंदर लिहिले आहे... किती देखण्या इमारती आहेत.
हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता. यावर एक स्वतंत्र लेख लिहू शकता का. ते मंदिर व परिसर , नदी .... जिथे जिथे विवेकानंद आणि गुरूबंधू घडले त्या जागांविषयी जमले तर लिहा. सेरामपुर कॉलेज व सेरामपुर या दोहोंचा उल्लेख परमहंस योगानंदांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मध्ये वारंवार आला आहे. त्यामुळे एक उत्सुकता होती.
@ रानभुली,
@ रानभुली,
.... तुमच्या लेखमालिकेमुळे आता पुढच्या वेळी वेळ काढून पाहून येईन....
अवश्य करा. मी सुद्धा दर कोलकाता भेटीत कामातून थोडा वेळ काढून काहीतरी जुने - नवीन बघण्याचा प्रयत्न करतोच.
@ अस्मिता.,
@ अस्मिता.,
... ते मंदिर व परिसर , नदी ....
ती जागा मनावर गारुड करते खरी. लेखातला दक्षिणेश्वर घाटाचा फोटो मी ज्यादिवशी तिन्हीसांजेला काढला तो दिवस फारच छान गेला होता, ६-७ वर्षांनंतर आजही लख्ख आठवतो. तसे शहरात विवेकानंदांचे जन्मस्थान स्मारक केले आहे, पण ती वास्तू अगदीच प्राणहीन वाटली मला. नो लाईफ देयर
सेरामपूर भागात आता डेन्मार्कच्या संस्कृती मंत्रालयातर्फे जुन्या खुणांच्या संवर्धनाची कामे होत आहेत, गती संथ असली तरी फारच उत्तम पद्धतीने.
प्रतिसादाबद्दल आभार.