दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावळा
कावळा हुशार असतो हे नक्की पण तो पोपट किंवा पाणकोंबडीसारखाच पायांचा वापर करतो हे मी आजच पाहीले. तसेच मला वाटायचे की कावळा हा फक्त खरकटे अन्न, प्राण्यांची मृत शरीरे, किडे वगैरे खातो. पण मी त्याला आज झाडावरील बोरे खाताना पाहिले. बोरे खाताना तो पिकलेली फळेच निवडत होता. एका फांदीवरचे बोर त्याच्या चोचीच्या टप्प्यात येत नव्हते तेंव्हा त्याने एका पायाने ती लहानशी फांदी जवळ ओढली व ते बोर तोडले. माझ्यासाठी हे सगळेच नविन होते. कावळा सतत आजुबाजूला असुनही त्याच्याविषयी मला काहीही माहित नाही हे समजले आज.

House Crow (Corvus splendens)
Pune (Pashan Lake)
25 Dec (8:00 am)

बोरे मात्र निवडून खाल्ली महाशयांनी.

भांगपाडी मैना
या दोन मैना कुठूनतरी आल्या, अर्धा मिनिट तारेवर बसल्या व निघून गेल्या.

Brahminy Starling
Pune (Pashan Lake)

आज देवराईतील शेताला नांगरल्यानंतर प्रथमच पाणी सोडले होते. नेमका मी तेथेच होतो. पाणी सोडल्यानंतर पंधरा मिनिटात जंगल मैना (Jungle Myna), भांगपाडी मैना (Brahminy Starling), कावळा (Jungle Crow), चिपका (Yellow eyed Babble), बुलबुल (Red vented Bulbul), सातभाई (Large grey Babbler), पांढरा धोबी (White Wagtail), पिवळा धोबी (Yellow Wagtail) या पक्ष्यांनी त्यांच्या अंघोळी उरकल्या. मला वाटते अंघोळ करायला या पक्ष्यांना कुठलेही पाणी चालत असावे पण शेतातल्या मातीत असलेले पाणी त्यांना विषेश आवडत असावे. बुलबुल तर पाईपमधून उडणाऱ्या पाण्याच्या तुषारांमधे अंघोळ करत होते. एकून आजची या सर्व पक्ष्यांची अंघोळ स्वच्छतेसाठी नसुन मजा, आनंद म्हणून असावी असे स्पष्ट जाणवत होते.

या शेताशेजारी एक जाहिराताची बोर्डची मोठी फ्रेम आहे. यावर आज भांगपाडी मैनांचा खुप मोठा थवा बसला होता. मोजायचा प्रयत्न केला तर २३ मोजता आल्या. जास्त होत्या पण त्या सारख्या जागा बदलत असल्याने मोजता आल्या नाहीत. बोर्डच्या अगदी वरती एक खंड्या बसला होता. या भांगपाडी मैना आज वेगळ्याच मुडमधे दिसत होत्या. जवळ जवळ प्रत्येकीने आपल्या डोक्यावरचे केस पिंजारले होते. त्यातील काही नर मावळत्या सुर्याकडे छाती काढून उभा रहात होता व सर्व पिसे पिंजारुन आकाशाकडे अतिशय रागाने पहात होता. माद्या त्यांच्यावर ओरडत होत्या. (एकून पक्ष्यांमधे नरांचेच वागणे असे असल्याने मी त्यांना नर समजतो आहे. आकारावरुनही नर मोठा वाटतो) जवळ सहा सात नरांनी या आविर्भावात पोझ दिली. ते त्यांचे प्रणयाराधनही असावे. फिसकारलेली पिसे व डोळे यामुळे मला ते रागावल्यासारखे वाटले असतील. पण एकत्र प्रियाराधन करायचे कारण काही कळले नाही. पंधरा मिनिटांमधे अनेक नरांनी ती पोझ दिली. प्रत्येकाचे तोंड सुर्याकडेच होते. पण या वेळात एकाही जोडीने प्रेम केले नाही. येथे तिन वेगवेगळ्या नरांचे फोटो डकवतो आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, उभे रहायची पद्धत व एकूनच देहबोली पहाण्यासारखी आहे. मी या अगोदर भांगपाडी मैनांचे हे रुप कधीही पाहिले नव्हते. विशेष म्हणजे प्रत्येक नर सुर्याकडे तोंड करुन या पोझ देत होता. (या मैना आय लेव्हलला असत्या तर फोटो जरा बरे मिळाले असते.

Brahminy Starling
Pune (Devrai)
26 Dec (5:00 pm)
१.

२.

३.

जाहीरातीच्या बोर्डच्या फ्रेमवर बसलेल्या मैना व खंड्या.

हा फोटो सहज गम्मत म्हणून डकवत आहे. मी नेहमी या मैनेला 'भांग पाड गं मैना' म्हणतो ते याच मुळे. Lol

अकराव्या आणि बाराव्या पानांवरचे फोटो फारच आवडले. वडाची टेटु खाणारे कावळे पाहिलेत पण बोरे खाणारे नाहीत. कावळ्याचा क्लोजप भारी. मैनाराजेश आवडले.

Srd, रॉनी धन्यवाद!

मुग्धबलाक(Indian Openbill)

पांढऱ्या पोटाचा निखार, गोमेट
साधारण १५ सेंमि आकार असलेला हा पक्षी दिसायला देखणा आहे. नर व मादी वेगवेगळे दिसतात. आवाज मंजुळ. मी आजवर याला जोडीनेच पाहीले आहे पण नर व मादी अगदी शेजारी कधी पाहिले नाही. मादी जरा अंतर ठेवून नराच्या आसपास दिसली. म्हणजे नर दिसला तर आजुबाजूला मादी असणार यांचा अंदाज करायला हरकत नाही अशा बेताने. नराची छाती किंचीत शेंदरी व पोट पांढरे, तर मादी करड्या व पांढऱ्या रंगाची. आज मला यांच्या दोन जोड्या दिसल्या. एका जागी अजिबात स्थिर नव्हत्या. अगदी सेकंदा सेकंदाला जागा बदलत खेळत होते चारही पक्षी. मी जेथे उभा होतो त्याठिकाणाला त्यांनी दोन चक्कर मारल्या व सुगरणींचे रिकामे खोपे असलेल्या काटेरी झाडावर विसावल्या. नर व मादी अंतर ठेवूनच बसले.

White-bellied Minivet (Pericrocotus erythropygius)
Size: 15 cm
Pune (ksnd)
27 Dec (9:00 am)

Male

Female

कंठी होला
हा जेंव्हा जेंव्हा दिसतो मी फोटो काढतोच. मला हे कबूतर आवडते. का माहित नाही पण हे देवराईत एकदा गवतात दिसले होते पण पुन्हा कधीही हे तिकडे फिरकले नाही. अगदी देवराईच्या शेजारील शेतात देखील याच्या काही जोड्या मला आढळल्या. घराच्या मागील टेकडीवरही अनेक कॉलर डव्ह दिसतात पण देवराईत मात्र अजिबात येत नाहीत. (मी शक्यतो प्रत्येक वेळी पक्ष्याचे शास्त्रीय नाव देतो आहे कारण माझ्या अजिबात लक्षात रहात नाही ही नावे. कदाचित सारखे लिहून तरी लक्षात राहतील. Wink )

Eurasian collared dove (Streptopelia decaocto)
Pune (ksnd)
27 Dec (9:00 am)

चिपका (पीतनयन गुपिल)
पावसाळ्यातही कधी इतका खराब दिवस नव्हता एवढा खराब दिवस होता आज पुण्यात. गेले दोन तिन दिवस हेच वातावरण आहे. आज घरामागील टेकडीवर फिरायला गेलो होतो तेंव्हा नेहमीचे पक्षी दिसले. वातावरण ढगाळ असुनही सगळ्यांचा दिवस वेळेवर सुरु झाला होता. यात सुगरण, शिंजीर, कंठी होला, वटवट्या, गांधारी, खाटीक, साळूंकी, चिरक, रॉबीन हे नेहमीचे पक्षी दिसले. यात काळा गोविंदची गैरहजेरी चटकण जाणवली. कारण या भागात कोतवाल व खाटीक यांची संख्या डोळ्यात भरेल इतकी जास्त आहे. आज मात्र खाटीक होते पण कोतवाल कुठेही आढळला नाही.

सुगरणींचा खुप मोठा थवा ज्वारीच्या शेतावर उतरला होता. नेहमी पक्ष्यांचा थवा पाहून आनंद होतो पण आज ज्या संख्येने सुगरणी पिकावर उतरल्या व कणसांवर तुटून पडल्या ते पाहून मला वाटले की जर हे शेत माझे असते तर मी नक्कीच कॅमेरा खाली ठेवून गोफण हातात घेतली असती व एकाही सुगरणीला शेताच्या आसपासही फिरकू दिले नसते. अगदी अधाशासारख्या सगळ्या सुगरणी शेतावर तुटून पडल्या होत्या. बिचारा शेतकरी. Sad

या शेताच्या जवळच असलेल्या जाळीवर व रुईच्या झाडावर मला चिपकांचा लहान थवा दिसला. हा चिपका मला नेहमीच चकवत आला आहे. देवराईतील विहिरीजवळ यांचा एक थवा राहत होता. पण त्या चिपक्यांनी मला कधीच व्यवस्थित निरिक्षण करु दिले नाही. मला तर वाटले की हा पक्षी माणसाच्या जवळपासही फिरकत नसणार. पण आजमात्र मी शेतातच मांडी घालून बसलो व कॅमेरा खाली ठेवला. एकून ९ चिपका होते. जरा वेळ सगळे बुजले. दहा मिनिटांनंतर त्यांना काय वाटले माहित नाही पण ते सगळे शेतातल्या गवतात फिरत माझ्या भोवती अन्न शोधत फिरत राहीले. त्यातले चारपाच चिपके तर माझ्या समोर अगदी दिड फुटांपर्यंत येऊन बिनधास्त बागडत होते. मी इतक्या जवळून कधीच हा चिपका पाहीला नव्हता. त्याला नेहमी दुरुनच पाहील्यामुळे मला त्याचे मान नसलेले शरीर व आकार आवडायचा नाही. चिपका मला नेहमीच बेढब वाटायचा. पण आज त्यांना दिड फुटांवरुन अगदी शांत व व्यवस्थित पाहील्यावर मला तो एकदम देखणा दिसला. मला सदैव वाटायचे की याच्या डोळ्याभोवती लाल रिंग असतानाही याला Yellow-eyed Babble का म्हणत असावेत? पण आज अगदी जवळून मी त्यांचे डोळे पाहीले तेंव्हा बुबूळाभोवतीचा भाग पिवळा असल्याचे लक्षात आले. मी कॅमेरा उचलायची रिस्क घेतली नाही. त्यांचे पोट भरल्यानंतर सगळे चिपके उडाले व समोरच्या कंपाऊंडच्या जाळीवर बसले. मग प्रत्येक जोडीचा खेळ सुरु झाला. ते एकमेकांचा पाठलाग करत होते, पाठशिवणीचा खेळ खेळावा तसे इकडे तिकडे उडत एकमेकांच्या मागे धावत होते. हे बॅबलर असल्याने सातत्याने त्यांची बडबड सुरु होती. Grey Babbler चा आवाज अक्षरशः वैताग आणतो पण यांचा आवाज अतिशय मंजूळ होता. ते मेलडीत गात होते. आज त्यांचा आवाजही रेकॉर्ड करता आला. एकून ढगाळ दिवस असुनही या चिपकामुळे माझा आजचा दिवस सार्थकी लागला. कामावर जायला उशीर झाला पण त्याबदल्यात छान निरिक्षणे पदरात पडली.

Yellow-eyed Babbler (Chrysomma sinense)
Size: 18 cm
Pune (ksnd)
27 Dec (9:30 am)
१.

२.

३.

४.

५.

६.

जाता जाता ही नोंद गम्मत म्हणून करतोय. सोसायटीत अनेक खारुताई आहेत. दोन हातात एखादे फळ धरुन ते चुटूचुटू खाताना त्या फार मजेदार व गोड दिसतात. त्यांच्याकडे पहात राहणे हा मस्त विरंगुळा असतो माझा. आज चिपकांकडे पहात असताना मला डावीकडे सारखी हालचाल जाणवत होती. चिपका उडतील म्हणून मी अगदी शांत बसलो होतो. पण शेवटी नजर टाकली तर एक खारुताई ज्वारीच्या धाटावर (झाडावर) चढत होती व कणसातले चारपाच दाणे घेवून पुन्हा खाली येत होती. कणसांपर्यंत जाणारी खारुताई मी प्रथमच पाहीली. मजेदार दृष्य होते. पण ती नेहमीपेक्षा जास्त सावधान होती, चौकस होती. का ते समजले नाही. कदाचीत कणसावर तिला शिक्रा, घार यांची जास्त भिती वाटत असावी.
या धाग्यात पक्ष्यांव्यतिरिक्त प्रथमच एखाद्या प्राण्याचा फोटो टाकतोय. Happy

चिपका म्हणजे बैरागी नाही.
बैरागी म्हणजे सातभाई (Large grey Babbler). अर्थात दोन्हीही Babbler आहेत.
Jungle Babbler म्हणजे रानभाई (सातबहिणी हे सुद्धा नाव आहे त्याला.)

कंठवाला पोपट
काल जेथे गेलो होतो त्याच रस्त्याने आज फिरुन आलो पण आज फारसे पक्षी दिसले नाही. सुगरण, कोतवाल व इतरही दिसले नाहीत. वातावरण ९:०० वाजेपर्यंत ढगाळच होते. पण सोसायटीच्या बागेत मात्र पोपटांचा थवा दिसला. हा थवा आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर गोंधळ करत असतो. आज सगळे पोपट संकासुराच्या झाडावर बसुन शेंगा सोलत होते. लहानपणी पोपटाने उष्टी केलेली फळे अनेकदा पाहीली आहेत, पण आज प्रत्येक पोपट शेंगेमधला अगदी एकून एक दाणा खात होता. काहीही वाया जात नव्हते. महत्वाचे म्हणजे पोपट एखादी टपोरी शेंग तोडून आणून एका जागी बसुन पायात धरुन खात होता. संपली की पुन्हा दुसरी शेंग आणून त्याच जागेवर बसून खात होता. मला वाटले ते झाडावर लटकलेली शेंग फोडून खातील. पण हे तोडून आणने व व्यवस्थित जागा पाहून, बसून काळजीपुर्वक खाणे हे मला नविन होते. शेंगा सोलण्यात अतिशय सफाई होती.

पक्षी निरीक्षण करण्याचा ज्याचा त्याचा वेगळा दृष्टीकोन असतो हे आज पुन्हा समजले.
पोपटाला शेंगांमधले दाणे अगदी सहज काढताना पाहिले तेंव्हा मनात विचार आला की आपल्याला दहा बोटांनी सहज सोलता न येणारी शेंग हे इतक्या सहज सोलत असतील तर त्यांच्या चोचीच्या आकाराचा उपयोग आपण काही टुल्स बनवायला करुन पहायला हवा. काम सोपे होईल. हा झाला माझा दृष्टीकोन.
बायको म्हणाली “असे दहा पोपट जर भाजी मोडायला किंवा मटार सोलायला बसले तर अर्ध्या तासात किलोभर मटार अगदी सहज सोलतील” अपना अपना नजरिया. Lol

Rose-ringed parakeets (Psittacula krameri)
Size: 42cm
Pune (ksnd)
28 Dec (8:00 am)


२.

पांढऱ्या पोटाचा निखार
काल जेथे निखार (गोमेट) पाहीले होते त्याच झाडावर आज त्यांचा थवा होता. इकडे तिकडे नाचणे सुरुच होते. दहा ते बारा गोमेट असावेत. विशेष म्हणजे दहा बारा पक्ष्यांमध्ये फक्त एकच नर होता व बाकी सगळ्या माद्या होत्या. काल मी दोन जोड्या पाहील्या होत्या. आज मात्र फक्त माद्या दिसत होत्या. आज जरा बरे फोटो मिळालेत पुन्हा देतो आहे.

White-bellied Minivet (Pericrocotus erythropygius)
Size: 15cm
Pune (ksnd)
28 Dec (8:30 am)

Male

Female

.

.

तिन चार दिवसांपुर्वी निळा कस्तुरच्या मादीला तिच्या जागेवरुन हुसकावून लावून तेथे बसणारा सातभाई पाहिला होता. तोच प्रकार आज पाहीला. गोमेटची मादी झाडाची सर्वात उंच फांदी पाहून बसली होती. तिकडून एक काळा गोविंद आला व त्याने त्या गोमेटला तेथून उठवले व तेथेच निवांतपणे बसला. दुर असल्याने फोटो व्यवस्थित आले नाही पण ती जागा स्पष्टपणे समजतेय म्हणून फोटो देतो आहे. एकून आपण समजतो तेवढे काही पक्ष्यांचे आयुष्य सोपे नसते व पक्षीही आपल्याला वाटतात तेवढे साधे भोळे नसतात. त्यांच्या जगातही 'बळी तो कान पिळी' या न्यायाने व्यवहार चालतात. विनाकारण त्रास देणे, शत्रूत्व बाळगणे, घाबरणे, फसवणे, प्रेम करणे, खेळणे, शिकार करणे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्यातही दिसतात.

गोमेट

तिला हुसकाऊन तिची मोक्याची जागा हडपणारा काळा गोविंद (कोतवाल)
कोतवालच अन्याय करायला लागल्यावर दाद कोणाकडे मागायची गोमेटने? Lol

धन्यवाद आऊटडोअर्स. चुक दुरूस्त केली आहे. Happy
बरेच दिवस spot-billed हातात बसलेय त्यामुळे गडबड झाली असावी.

झकास. काही पोपट डावरे असतात. पोपटाची जोडी पेरूच्या झाडावर बसली की धमाल असते. फांद्यांवर फिरतात आणि पेरू शोधतात. चांगला (छोटा पिकलेला, बिया जास्ती) सापडला की तो शिट्ट्या मारतो आणि दुसरा तिथे येतो. त्याला देऊन हा पोपट आणखी शोधतो. पेरूचा गर टाकून पोपट आतल्या बिया फोडून मगज खातात हे माहिती असेलच सर्वांना.
निखार समोरून छानच.

छोटा खंड्या, धिंदळा
याला कॉमन किंगफिशर म्हणतात पण हा फार क्वचित दिसतो. आज या खंड्या मुळे एका दुष्टचक्रात अडकता अडकता वाचलो. तरीही एक रायफल, एक गाडीवर माऊंट केलेली गन आणि स्नायपरच्या नजरेखाली तासभर काढावाच लागला. आणि एवढे होऊन फोटो चांगला मिळाला नाहीच. या खंड्याला मी कधी विसरणार नाही.

Common Kingfisher, Eurasian Kingfisher, River Kingfisher, Small Blue Kingfisher (Alcedo atthis)
Pune (Lohgaon)
29 Dec (10:00 am)

चक्रवाक (Ruddy Shelduck)
शेकाट्या (Black-winged Stilt)
ठिपकेवाला तुतवार (Wood Sandpiper)
टिटवी (Red-wateled lapwing)
Pune (Yerwada)
29 Dec (10:30 am)

Pages