हमिंगबर्ड सोहळा

Submitted by स्वाती२ on 16 August, 2019 - 07:07

नुकताच माझा अमेरीकेतला नव्या नवलाईचा संसार सुरु झाला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलो. रस्ता एका हाउंसिंग सबडिविजनमधून जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे छोट्या फुलबागा बहरल्या होत्या. मला सगळेच नविन त्यामुळे गाडीच्या खिडकीच्या काचेला अगदी नाक लावून बाहेर बघत होते. एका घराच्या पोर्चबाहेर काचेचे लाल झाकणाचे काहीतरी टांगलेले दिसले. पुढे गेल्यावर तसेच एका आवारातील झाडाच्या फांदीला देखील टांगलेले दिसले.
"ते झाडाला लाल झाकणाचे बाटली सारखे काय टांगलय?" मी कुतुहलाने विचारले.
"हमिंगबर्ड फिडर." रस्त्यावरची नजरही न हटवता नवर्‍याने उत्तर दिले. कुतुहल शमायच्या ऐवजी वाढले.
"त्यात हमिंगबर्डसाठी साखरेचे पाणी भरुन ठेवतात." नवरा बापडा त्याला असलेली तुटपुंजी माहिती पुरवत होता. त्यानेही साखरपाणी पिणारा हमिंगबर्ड फक्त चित्रातच बघितला होता.
त्यानंतर या ना त्या निमित्ताने हमिंगबर्ड बद्दल माहिती गोळा होत गेली पण साखरपाणी पिणारा हमिंगबर्ड मात्र हुलकावणी देत राहीला. बागकामाचा कोर्स केला तेव्हा पुन्हा एकदा हा हमिंगबर्ड टपकला, त्याला आवडणार्‍या फुलझाडांची यादी घेवून. उत्साहाने कोलंबाईन आणि बी बाम लावले. चार वर्षात ४ प्रकारच्या कोलंबाईनचा छान वाफा झाला. मात्र एवढे करुनही फक्त एकदाच हमिंगबर्डचे ओझरते दर्शन झाले. मैत्रीणीकडच्या हमिंगबर्ड फिडर मधले साखर पाणी मधमाशांनीच मटकावले. मीही कंटाळून नाद सोडला. मात्र हमिंगबर्डने माझा पिच्छा काही सोडला नव्हता. अरीझोनाच्या ट्रिपमधे अनपेक्षितपणे एक छोट्याशा बागेत हमिंगबर्ड्सनी दर्शन दिले. हे पक्षी मेक्सिकोला स्थलांतर करत आहेत असे तिथल्या पार्क रेंजरनी सांगितले. पुन्हा एकदा हमिंगबर्डचे वेड लागले. योगायोगाने स्प्रिंग फेस्टिवलमधे हमिंगबर्डबद्दल एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्याच वेळी आमच्या राज्यातील हमिंगबर्ड फेस्टिवलची माहिती मिळाळी. मात्र काही अडचणींमुळे आम्हाला काही फेस्टिवलला जाता आले नाही. त्यामुळे यावर्षी जेव्हा दोन महिन्यांपूर्वी तारखा कळल्या तेव्हा जायचे पक्के केले.
आमच्या गावापासून साधारण तासाभराच्या अंतरावरच्या पक्षी अभयारण्यात सकाळी ९ ते दुपारी ३ असा भरगच्च कार्यक्रम होता. कुठली लेक्चर्स ऐकायची, कुठले डेमो बघायचे याचे टाईमटेबल आखले. मुख्य आकर्षण होते ते हमिंगबर्ड बॅंडिंगचे. आमच्या राज्यात रुबी थ्रोटेद हमिंगबर्ड आढळतो. जेमतेम ३ ग्रॅम वजनाचा हा पिटूकला पक्षी. त्याचे बँडिंग करणे हे फार कौशल्याचे काम. त्याचे खास लायसन्स आणि प्रशिक्षण असते. आख्ख्या अमेरीकेत सुमारे १५० लोकांना हमिंगबर्ड बॅडिंगचे परमिट आहे यावरुन लागणार्‍या कौशल्याची कल्पना यावी. हमिंगबर्डचे स्थलांतर, त्यांचे जीवनमान याबद्दलच्या संशोधनात बँडिंगचा महत्वाचा वाटा आहे.
हमिंगबर्ड फिडर्सना जाळी लावून हमिंगबर्ड न दुखवता पकडला जाईल अशी सोय केलेली असते. काही हुशार हमिंगबर्ड याला फसत नाहीत पण तरी बरेच पक्षी या पद्धतीने पकडले जातात. पकडलेला पक्षी नेटच्या पिशवीतून अलगद बाहेर काढतात आणि स्टॉकिंग्ज पासून बनवलेल्या नाजूक पिशवीत ठेवून त्याचे मोजमाप घेतले जाते, वयाचा अंदाज बांधला जातो, लिंगाची नोंद होते. पिटुकला बॅड पायात अडकवला जातो आणि त्याला सोडून दिले जाते.
हमिंगबर्डसच्या जन्मचक्रात मादीला स्पर्म देणे यापलीकडे नराचा काहीही सहभाग नसतो. कोळ्याचे जाळे, मॉस, इतए गवत यांचा वापर करुन घरटे बांधणे आणि अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर त्याला किटकांच खुराक देवून त्याचे संगोपन करणे हे काम मादी एकटीच करते. त्यामुळे स्थलांतर होतानाही पूर्ण वाढ झालेले नर पक्षी आधीच निघून जातात. साहाजिकच यावेळच्या बँडिंगसाठी उपलब्ध पक्षात बहूतेक माद्या होत्या किंवा या वर्षी जन्मलेले नर होते.
IMG_7690 (640x480).jpg

स्टॉकिंग्ज्च्या पिशवीतून पक्षी बाहेर काढताना
IMG_7685 (640x480).jpg

या वर्षी जन्मलेला नर हमिंगबर्ड. गळ्याशी छोटासा लाल पट्टा आहे. जसा पक्षी वाढेल तसा हा पट्टा मोठा होईल
IMG_7684 (640x480).jpg

चोचीची लांबी मोजताना
IMG_7686 (640x480).jpg

वर्निअर कॅलीपरने शेपटीचे मोजमाप
IMG_7691 (640x480).jpg

पक्षाची लांबी मोजणे
IMG_7693 (640x480).jpg

नोंद करणे
IMG_7683 (640x480).jpg

साधारण मोठ्या सुईच्या व्यासाचा बँंड असतो.

IMG_7687 (640x480).jpg

पायात बँंड अडकवताना
IMG_7694 (640x480).jpg

मादी हमिंगबर्ड
IMG_7688 (640x480).jpg

भरारी घेण्याआधी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवढास्सा आहे हा पक्षी! खूपच काळजीपूर्वक करायला लागत असणार हे सगळं. बँड म्हणजे रिंग ना? खुणेसाठी घातलेली? किरण पुरंदऱ्यांच्या पुस्तकात याला 'वाळा' असा छान शब्द ते वापरतात. Happy

हे काय नवीनच. मस्त माहिती.
कित्ती छोटास आहे पक्षी.
आपल्याकडच्यासारखं पक्ष्यांना हात लावला आणि सोडुन दिलं की दुसरे पक्षी त्याला टोचुन मारतात अशी पद्धत नाही वाटतं तिकडच्या पक्ष्यांमधे Happy

अय्या ! कसला मस्त अनुभव! फोटो पण मस्त ! किती पिटुकला आहे तो .
किरण पुरंदऱ्यांच्या पुस्तकात याला 'वाळा' असा छान शब्द ते वापरतात>> Happy
सस्मित >> +११ Happy

कसला क्यूट पक्षी आहे.....व्हर्नीअर केलिपर किती वर्षांनी पाहिलं. तरी अजून पोटात धडकी भरते पाहिल्ं की. Happy मस्त माहिती दिलीत.

परवा दुसऱ्या वेबसाईटवर हा लेख वाचल्यापासून एक प्रश्न पडला आहे. इतकुसे पक्षी त्याना हाताळल्याने केव्हढ्या trauma मध्ये जात असतील? काही तर हा धक्का सहनही करू शकत नसतील! असा काही अनुभव कोणाला आला का हे काम करताना?

तुमच्या नेबरहुडमध्ये हमिंगबर्ड येतात म्हणजे मस्तच. हा चिटुकला पक्षी आम्हि खुप वर्षांपुर्वि बहुतेक कॅलवे गार्डन्स किंवा सॅन डिअ‍ॅगो झू मध्ये बघितलेला. तिथे एका छोट्या कपमधे नेक्टर घालुन देतात. त्या कपातला नेक्टर हे पक्षी अक्षरशः हवेत तरंगत चाखतात. त्यांच्या पंखांची फडफड इतकि वेगात होत असते कि ते दिसंतच नाहि, त्यांची फक्त बॉडि दिसते. मस्त सोहोळा असतो तो, मुलं खुप एंजॉय करतात...

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!

>>हमींगचा एखादा फोटो हवा होता.
तुम्हाला दिसलाच की नाही हमींग बर्ड तुमच्या बागेत?>>
अजून आमच्या बागेत नाहीच पण काल मैत्रीणीकडे दोन हमिंगबर्ड आले होते. माझ्या आवारात मोठी झाडे नाहीत त्यामुळे त्यांना तितकेसे सुरक्षित वाटत नसावे.

वावे,
किरण पुरंदरे यांनी वापरलेला ' वाळा' शब्द किती गोड आहे. या कामातला अपेक्षित नाजुकपणा, काळजी वाळा शब्दात आपोआपच येते.

सस्मित,
इथे पक्षांना बँडिंग करणे बर्‍याच मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे कोण कुणाला टोचा मारणार म्हणून पद्धत बंद झाली असावी. Happy

वत्सला,
मलाही हाच प्रश्न पडला होता. थोडा त्रास होतच असणार. पण त्या बाई म्हणाल्या की त्यांनी त्याच भागात नंतरच्या वर्षीही तेच पक्षी परत पकडले आहेत. एक पक्षी सलग ५ वर्षे पकडला. अतिशय कौशल्याचे काम आहे. म्हणूनच फार कमी लोकांना या कामाचे परमिट मिळते .हे काम फार हलक्या हाताने आणि तरीही पटकन केले जाते. माझी फोटो घेताना धांदल उडाली. इथल्या फोटोत प्रत्येक स्टेप वेगवेगळ्या पक्षावर चित्रीत केलेय. पक्षांना शक्य तेवढा कमी त्रास होईल हे बघितले जाते. जाळ्यावर सतत लक्ष ठेवतात जेणे करुन पक्षी पकडला गेला की जास्त वेळ अडकून पडणार नाही. जेवढे पक्षी लगोलग बँडिंग करता येतील तेवढेच पकडायचे असे असते. प्रत्येक जातीच्या हमिंगबर्ड साठी योग्य प्रकारचाच बॅड आणि पक्कड वापरतात. एवढे करुनही इजा झालीच तर काय वगैरे बाबत मार्गदर्शक तत्वे असतात.
http://www.nabanding.net/wp-content/uploads/2012/04/NABC_HummingbirdManu...
वरच्या दुव्यातील माहितीवरुन एकंदरीत हे काम करताना किती काळजी घेणे अपेक्षित आहे त्याच अंदाज यावा.

छान स्वाती २
हमिंग बर्ड ची फुलझाडे, हमिंग बर्ड चा फिडर यांचे फोटो टाका की

सुवासिक फुले बागेत असली की हमखास येतातच.
पॅशन फ्लॉवर लावलेली मी तिथे असतना, रोज यायचे.
गावठी गुलाब, अनंत माझ्याकडे तेव्हा तिथे होता त्यावर सुद्धा भिरभिरायचे.

छान माहितीपूर्ण लेख आहे !!! अगोदरच्या हमिंगबर्ड सोहळयामध्ये बँड लावलेला एखादा पक्षी मिळाला होता का जाळ्यात.

फारच मस्त अनुभव. गेले काही महिने फेसबुकवर एक जण हमिंगबर्डचे फोटो टाकत आहे ते बघितल्यापासुन एकदा तरी कोस्टरिका ला जायचय.

आपल्याकडच्यासारखं पक्ष्यांना हात लावला आणि सोडुन दिलं की दुसरे पक्षी त्याला टोचुन मारतात अशी पद्धत नाही वाटतं तिकडच्या पक्ष्यांमधे-> हे फक्त चिमण्या मधे असते..बाकिच्याना चालत बहुतेक...

मस्त माहिती.

माझ्या बाल्कनीत जास्वंद किंवा जरबेरा फुलला की सनबर्ड येतो बर्‍याचदा. त्याला बघतानाच मला कोण आनंद होतो. हमिंग बर्ड तर स्वर्गिय पक्षी!

Pages