नुकताच माझा अमेरीकेतला नव्या नवलाईचा संसार सुरु झाला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलो. रस्ता एका हाउंसिंग सबडिविजनमधून जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे छोट्या फुलबागा बहरल्या होत्या. मला सगळेच नविन त्यामुळे गाडीच्या खिडकीच्या काचेला अगदी नाक लावून बाहेर बघत होते. एका घराच्या पोर्चबाहेर काचेचे लाल झाकणाचे काहीतरी टांगलेले दिसले. पुढे गेल्यावर तसेच एका आवारातील झाडाच्या फांदीला देखील टांगलेले दिसले.
"ते झाडाला लाल झाकणाचे बाटली सारखे काय टांगलय?" मी कुतुहलाने विचारले.
"हमिंगबर्ड फिडर." रस्त्यावरची नजरही न हटवता नवर्याने उत्तर दिले. कुतुहल शमायच्या ऐवजी वाढले.
"त्यात हमिंगबर्डसाठी साखरेचे पाणी भरुन ठेवतात." नवरा बापडा त्याला असलेली तुटपुंजी माहिती पुरवत होता. त्यानेही साखरपाणी पिणारा हमिंगबर्ड फक्त चित्रातच बघितला होता.
त्यानंतर या ना त्या निमित्ताने हमिंगबर्ड बद्दल माहिती गोळा होत गेली पण साखरपाणी पिणारा हमिंगबर्ड मात्र हुलकावणी देत राहीला. बागकामाचा कोर्स केला तेव्हा पुन्हा एकदा हा हमिंगबर्ड टपकला, त्याला आवडणार्या फुलझाडांची यादी घेवून. उत्साहाने कोलंबाईन आणि बी बाम लावले. चार वर्षात ४ प्रकारच्या कोलंबाईनचा छान वाफा झाला. मात्र एवढे करुनही फक्त एकदाच हमिंगबर्डचे ओझरते दर्शन झाले. मैत्रीणीकडच्या हमिंगबर्ड फिडर मधले साखर पाणी मधमाशांनीच मटकावले. मीही कंटाळून नाद सोडला. मात्र हमिंगबर्डने माझा पिच्छा काही सोडला नव्हता. अरीझोनाच्या ट्रिपमधे अनपेक्षितपणे एक छोट्याशा बागेत हमिंगबर्ड्सनी दर्शन दिले. हे पक्षी मेक्सिकोला स्थलांतर करत आहेत असे तिथल्या पार्क रेंजरनी सांगितले. पुन्हा एकदा हमिंगबर्डचे वेड लागले. योगायोगाने स्प्रिंग फेस्टिवलमधे हमिंगबर्डबद्दल एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्याच वेळी आमच्या राज्यातील हमिंगबर्ड फेस्टिवलची माहिती मिळाळी. मात्र काही अडचणींमुळे आम्हाला काही फेस्टिवलला जाता आले नाही. त्यामुळे यावर्षी जेव्हा दोन महिन्यांपूर्वी तारखा कळल्या तेव्हा जायचे पक्के केले.
आमच्या गावापासून साधारण तासाभराच्या अंतरावरच्या पक्षी अभयारण्यात सकाळी ९ ते दुपारी ३ असा भरगच्च कार्यक्रम होता. कुठली लेक्चर्स ऐकायची, कुठले डेमो बघायचे याचे टाईमटेबल आखले. मुख्य आकर्षण होते ते हमिंगबर्ड बॅंडिंगचे. आमच्या राज्यात रुबी थ्रोटेद हमिंगबर्ड आढळतो. जेमतेम ३ ग्रॅम वजनाचा हा पिटूकला पक्षी. त्याचे बँडिंग करणे हे फार कौशल्याचे काम. त्याचे खास लायसन्स आणि प्रशिक्षण असते. आख्ख्या अमेरीकेत सुमारे १५० लोकांना हमिंगबर्ड बॅडिंगचे परमिट आहे यावरुन लागणार्या कौशल्याची कल्पना यावी. हमिंगबर्डचे स्थलांतर, त्यांचे जीवनमान याबद्दलच्या संशोधनात बँडिंगचा महत्वाचा वाटा आहे.
हमिंगबर्ड फिडर्सना जाळी लावून हमिंगबर्ड न दुखवता पकडला जाईल अशी सोय केलेली असते. काही हुशार हमिंगबर्ड याला फसत नाहीत पण तरी बरेच पक्षी या पद्धतीने पकडले जातात. पकडलेला पक्षी नेटच्या पिशवीतून अलगद बाहेर काढतात आणि स्टॉकिंग्ज पासून बनवलेल्या नाजूक पिशवीत ठेवून त्याचे मोजमाप घेतले जाते, वयाचा अंदाज बांधला जातो, लिंगाची नोंद होते. पिटुकला बॅड पायात अडकवला जातो आणि त्याला सोडून दिले जाते.
हमिंगबर्डसच्या जन्मचक्रात मादीला स्पर्म देणे यापलीकडे नराचा काहीही सहभाग नसतो. कोळ्याचे जाळे, मॉस, इतए गवत यांचा वापर करुन घरटे बांधणे आणि अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर त्याला किटकांच खुराक देवून त्याचे संगोपन करणे हे काम मादी एकटीच करते. त्यामुळे स्थलांतर होतानाही पूर्ण वाढ झालेले नर पक्षी आधीच निघून जातात. साहाजिकच यावेळच्या बँडिंगसाठी उपलब्ध पक्षात बहूतेक माद्या होत्या किंवा या वर्षी जन्मलेले नर होते.
स्टॉकिंग्ज्च्या पिशवीतून पक्षी बाहेर काढताना
या वर्षी जन्मलेला नर हमिंगबर्ड. गळ्याशी छोटासा लाल पट्टा आहे. जसा पक्षी वाढेल तसा हा पट्टा मोठा होईल
चोचीची लांबी मोजताना
वर्निअर कॅलीपरने शेपटीचे मोजमाप
पक्षाची लांबी मोजणे
नोंद करणे
साधारण मोठ्या सुईच्या व्यासाचा बँंड असतो.
पायात बँंड अडकवताना
मादी हमिंगबर्ड
भरारी घेण्याआधी
केवडुसा जीव!! छान लेख.
केवडुसा जीव!!
छान लेख.
Pages