तू फक्त भेट तिला एकदा किनारा बनून

Submitted by प्रतिक सोमवंशी on 13 June, 2019 - 05:22

तू फक्त भेट तिला किनारा बनून
फिरू दे ना थोड तिला
तुझ्या प्रेमाच्या किनाऱ्यावर,
भिजू दे ना तिला थोड,
त्या तुझ्या बऱ्या वाईट लाटांतुन उडणाऱ्या तुषारांमध्ये,
कळू देत तिला काय देण लागते ती या समुद्राच
भेट तिला एकदा किनारा बनून...
रेखाटू देत तिला ही
तिच्या मनात लपून ठेवलेल्या जखमा
तुझ्या मनाच्या रेतीवर,
पण हो लाटांनी त्या पुसायचा प्रयत्न मात्र नको करुस
मग बघ बांधेल तीही,
तिच्या स्वप्नांचा महल.
तू मात्र शंख शिंपल्यांची आरास करून तिला थोडीफार मदत मात्र कर.
आलेच तिच्या डोळ्यात अश्रू तर वारा बनून ते पुसायचा प्रयत्न मात्र कर
एकटा असतो रे किनारा,
आणि त्या किनाऱ्यावर एकटच फिरणारे सर्वजण
बघ,
मनसोक्त गप्पा मार तिच्यासोबत
त्या चंद्र ताऱ्याना सोबत घेऊन,
तिने सांगितलेले सर्व गुपितं,
त्या शिंपल्यांच्या पेटीमध्ये जपून ठेव
तिच्या नकळत,
कुणालाही न सांगता,
कालांतराने मोती होतील बघ त्यांचे
आणि त्याच मोत्यांचा हार करून भेट दे तिला
तिच्या डोळ्यात येणारी चमक
आणि त्या हास्यातून निर्माण झालेल्या वेडेपणात हरवून जा दोघे.
खूप वेळ झाली तर ती जाईलही तुला सोडून
पण लक्षात ठेव
तू किनारा आहेस तिथेच राहा
उद्याची वाट बघत
तू फक्त दिल फेक रे
ती झेलन, नाही झेलन हा तिचा प्रश्न
वेळ घेईल जरा ती, विचार करेल पण
किनाऱ्यावर येण काय विसरणार नाही ती
फक्त भेट तिला एकदा किनारा बनून
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users