तुंबाड: अंगावर येणारी लालसा(स्पॉयलर्स नाहीत)

Submitted by mi_anu on 14 October, 2018 - 02:54

"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं."
सतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.

'डिल विथ द डेव्हील/सैतानाचा सौदा','इझी मनी' या संकल्पनेवर आज पर्यंत अनेक चित्रपट, कथा, मालिका बनल्या आहेत.कारण ती कल्पना नैसर्गिक आणि तितकी सार्वत्रिक आहे.हाती येणारा खूप पैसा, त्यासाठी अगदी थोडा वेळ पत्करावी लागणारी एक भयंकर जिवावरची जोखीम आणि त्यानंतर तो पैसा आटेपर्यंत मिळवलेलं ऐशआरामाचं आयुष्य-सुख-निवांतपणा.परत एकदा ती किळसवाणी आणि शहारवणारी जोखीम पत्करेपर्यंतच.एखादा विवेकी माणूस ही जोखीम फक्त पोटाची अडचण दूर होण्यापुरतीच पत्करेल.त्यानंतर कष्टाचे पैसे कमवून देणारा व्यवसाय चालू करून त्या मोहापासून आयुष्यभर लांब राहील.पण तुम्हा आम्हाला माहिती आहे- असं आतापर्यंत कधीच घडलं नाही.ही पैश्याची भूक, स्वतः वाढवलेल्या गरजा वाढतच जातात.परत परत त्या सैतानाकडे माणसाला घेऊन जातात.त्या मोबदल्यात गहाण ठेवलेलं आयुष्य, आत्मा, विवेक याबद्दलचे विचार कोपऱ्यात भिरकावून देऊन.

'हॅ, हे काय, अजिबातच भीती वाटली नाही' म्हणून बाहेर येणाऱ्या साठी हा चित्रपट नाही.त्या अपेक्षेने येत असाल तर बहुधा तुम्हाला ट्रेलर कळलं नाही.तुंबाड हा रूढ अर्थाने 'भयपट' नाही.त्यातले चेहरे तुम्हाला घाबरवणार नाहीत, रात्रीमागून रात्री स्वप्नात येऊन झपाटणार नाहीत.पण त्यातली माणसं, त्यांची पैश्याबद्दल लालसा, आणि त्यासाठी जे करावं लागेल ते करत राहण्यामागची अतृप्ती तुम्हाला जास्त घाबरवेल.हादरवेल.शेवट त्यातल्या अगतिकतेने, डिसगस्ट ने आणि हा शेवट माहीत असूनही परत परत त्या मोहात सापडणाऱ्या प्रवृत्ती बद्दल च्या संतापाने डोळ्यात पाणी आणेल.स्पॉईलर द्यायचे नाहीत त्यामुळे जास्त लिहीत नाही.पण असे चित्रपट बनायला हवेत, जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवेत.रंगीबेरंगी रक्त, घाबरवणारे चेहरे दिसतील म्हणून नाही, तर यातली कथा नक्की काय सांगायचा प्रयत्न करते आहे ते ऐकण्यासाठी. एका छोट्या कथेत अनेक पदर आहेत, एका सरळ साध्या कथे मध्ये बऱ्याच घेण्यासारख्या गोष्टी आहेत.अनर्थ केव्हा झाला?जेव्हा भूक धान्य सोडून धनाकडे वळली.सगळंच गमावणार होतं तेव्हा किमान अर्धं वाचलं ते कशामुळे?धान्यामुळे.शेवटी जे हातात उरलं ते इतकी मोठी जोखीम घेण्याच्या बरोबरीचं तरी होतं का?खूप प्रश्न पडतात.मिळणारी उत्तरं स्वतःला हलवून जातात.

आणि तरीही मला खात्री आहे.पत्करलेली जोखीम मोठी आणि मोबदला खूप मोठा असेल तर आयुष्यात तुम्हीही त्या मोहाच्या आणि मृत्यूच्या दारात पुन्हापुन्हा जाल- थोडीशी चूक किंवा उशीर समोर काय भविष्य घेऊन येतोय हे उघड्या डोळ्याने पाहूनही.

- अनुराधा कुलकर्णी

(नवा लेख लिहायचा मोह आवरला नाही.मी एक्स्पर्ट परीक्षक नाही.पण असे पिक्चर लोकांनी बघायला हवेत.हे नाव जास्तीत जास्त वेळा डोळ्याखालून जायला हवं.मोठे स्टार, चकमकाट बघून थिएटर मध्ये एका दिवशी 8 शो ठेवणारे आणि शेवटी हाती भ्रमाचा मोठा भोपळा ठेवणारे चित्रपट सोडून.)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहेत,
माबो याचे मध्यम प्रायोजक आहे का असे वाटायला लागलंय आता.

अरे वा!!
अनु ताईंना लिहायचा मोह आवरला नाही, म्हणजे दम आहे चित्रकृतीत.

माझ्यामते या चित्रपटातून काही संदेश देण्याचा दिग्दर्शकाचा हेतू नसावा.
हा चित्रपट म्हणजे एक गूढकथा तिच्या काळासकट किती प्रभावीपणे पडद्यावर उभी करावी याचा उत्कृष्ट नमुना आहे.

mi_anu, छान लिहीलंय. सिनेमा बघायचा योग केव्हा येईल कोण जाणे!

नावावरुन प्रथम असं वाटलं की "तुंबाडचे खोत" या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे की काय? पण ट्रेलरवरुन काहीच संदर्भ लागेना.

श्री. श्री. ना. पेंडसे यांची कन्या माझी चांगली मैत्रीण आहे. तिला विचारुन खात्री केली.

मस्त लिवलंय अनु. जरा कमी लिहिलंय पण. Happy

मानव यांना अनुमोदन.
शहाणे कथाकार नि दिग्दर्शक कधीही संदेश द्यायच्या भानगडीत पडत नाहीत. कारण प्रेक्षक आपल्यापेक्षा हुशार असू शकतात हे त्यांना माहिती असतं. संदेश ‘द्यायचा’ नसून ‘घ्यायचा’ असतो हे त्यांना नीट कळतं.

आणि ही कथा, निव्वळ कथा म्हणूनच एक ग्रेट नमुना आहे. बाकी स्क्रीनप्ले, डायरेक्शन, प्राॅडक्शन डिझाईन, प्राॅपर्टी, सिनेमॅटोग्राफी हे सारे बोनस.
(— नारायण धारपांचा डायहार्ड फॅन)

होहो बरोबर, त्यांनी दिला नाहीय संदेश.मीच घेतलाय.पिक्चरभर ती संकल्पना खूप सध्याच्या गोष्टींशी कंपेयर करत होते.(एका स्टेज ला नवऱ्याने ही ग्रीड 'मीटू' मधल्या पुरुषांशी पण कंपेयर केली.)
मुद्दाम कमी लिहिलंय.जास्त लिहिलं तर पब्लिक वेगवेगळी कंकल्युजन काढून हा पिक्चर त्यांच्या टाईप चा नाही असं ठरवून नंतर नेटफ्लिक्स वर बघायचं ठरवतील.
मी शेवटी रडले.(तशी मी सिम्बॅ लायन किंग मध्ये मुफासा मरतो आणि धूम 3 मध्ये 2 आमिर खान हात धरून इंपोर्टेड ब्रिज वरून मरतात तेव्हा पण दर वेळी रडते.)पूर्ण वेळ 'आता नको, पुरे करा, मागे फिरा' असं पडद्यावरच्या लोकांना सांगत होते ☺️☺️☺️त्यानी काय ऐकलं नाही.
तुंबाड पिक्चर आणि तुंबाडचे खोत याचा काहीही संबंध नाही.तसेच 2 धारप कथांवरून थोडे बीज असले तरी कथा वेगळी आहे.(श्रेय दिलेले आहे.)
ज्या 2 कथांवरून थोडे बीज घेतले आहे त्या वाचलेल्या नसल्या तरी पिक्चर बघण्यापूर्वी वाचू नका.

BtW ती गानू आजी कथा जवळपास तशीच्या तशी वापरली आहे. अगदी कथा उचलली म्हणावी इतकी सारखी.
ती मूळ कथा बर्वेनीच लिहिलेली का?

गानू आजी उचललीय का पण नक्की ? या सिनेमाची कथा (स्टोरी बोर्ड) २००८ साली तयार होती. तेव्हां नवाझुद्दीनला करारबद्ध देखील केले होते. १९९६ साली राही बर्वे ने धारपांच्या कथेवरून ही कथा लिहून काढली होती. त्या वेळी गानू आजी ची कथा होती का अस्तित्वात ?

आपण सारी धरणीमातेचीच लेकरं या कथेत पण अशीच अजागळ बाई आहे. अजून एक दोन कथांमधे अशी वर्णने आहेत.

इकडचे 2 3 review वाचून पिक्चर पाहायला गेलेलो, पाहताना लै ग्रेट वाटला, पण संपल्यावर इफेक्ट फारच लवकर ओघळतो,
नक्की कशाची भीती दाखवतायत हे कळल्यावर तर भय हा रसच निघून जातो.
हेडर मध्ये स्पोईलर नाही म्हणून लिहिलंय, त्यामुळे 1 2 दिवसांनी खटकलेल्या गोष्टी लिहितो

सिमबा, गानू आजी आणि नारायण धारप आजी ही दोन्ही स्टीफन किंग च्या ग्रॅमा कथेची मेकअप आणि दागिने बदललेली भावंडे आहेत.मात्र तुंबाड मधली आजी जास्त क्लोज टू धारप आजी.
जाऊदे स्पॉईलर नकोत.

इथे अजून काही दिवसांनी स्पॉयलर्स,कथा, शेवट लिहिणार का?
भीती वाटेल असा सिनेमा मी बघत नाही. स्त्री चुकून बघितला कारण त्या सिनेमातलं भूत खरं आहे हे कोणीच सांगितलं नव्हतं. ट्रेलरमध्ये दिसणारं भूत हे खोटं, अंधश्रद्धा असेल अशा समजुतीने गेले होते. निम्मा सिनेमा डोळ्यावर हात ठेवून, बोटांच्या फटीतून पाहिला.
भूत नसलं तरी ओंगळपणा, दुष्टपणा, भीती पण मी टाळते. 'अग्ली' तेवढ्यासाठीच बघितला नाही.
तुंबाडचा ट्रेलर बघूनच तो नक्की बघणार नाही हे ठरवलंय.
सगळ्यांचा बघून झाला की इथे कथा लिहा नक्की.

की इथे कथा लिहा नक्की.
>>>
पीनी, मग त्यापेक्षा धारपांची मूळ कथाच वाचा की. इथं कुणीही सांगेल त्यापेक्षा भारी पद्धतीने सांगितलीय त्यांनी.
इथं स्क्रीनवर माध्यमांतर कसं झालं, त्याची चरचा है Happy

भापो भापो
तुम्ही जे काही वर ळ च्या भाषेत लिहिलं त्याला आमचा पाठिंबा आहे ☺️☺️

अहो ती आपली उगाच नवीन स्टाईल. नेहेमीच काय ‘डबल पोस्ट’ असं टॅक्स ड्यू असल्याच्या आणि भरला नसल्याच्या गिल्ट मधे लिहायचं. काहीतरी नवीन नको?

बघितला. बराचसा समजला नाही. बराच अंधार आहे पूर्ण सिनेमात, त्यात पाऊस आणि संवाद काही कळले नाहीत. ईंग्रज अधिकारी काय बोलतात ते तर अजिबात समजलं नाही. जेवढंं कौतुक चाललंय माबोवर त्यामानाने तर काहीच खास वाटला नाही. असेल बुवा काहीतरी विशेेष जे माझ्या डोक्यावरून गेलंय.

संवाद स्पष्ट नव्हते.फार कान देऊन ऐकावे लागत होते.बऱ्याच ठिकाणी सब टायटल्स असते तर बरं असं वाटलं.कोणी हा फीडबॅक त्यांच्यापर्यंत पोहचवेल का?

छान लिहिलं आहे.
पण चित्रपट बघेन कि नाही शंका आहे. कारण मिक्स रिव्ह्यूज येतायत.

===
बादवे कधी, कुठे पाहिला हा चित्रपट? आम्ही स्पॉट 18 मधल्या सिटीप्राइड स्क्रीन 1 मध्ये अंधाधुन मॉर्निंग शो बघत होतो ८.४५ चा.

Pages