तुंबाड: अंगावर येणारी लालसा(स्पॉयलर्स नाहीत)

Submitted by mi_anu on 14 October, 2018 - 02:54

"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं."
सतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.

'डिल विथ द डेव्हील/सैतानाचा सौदा','इझी मनी' या संकल्पनेवर आज पर्यंत अनेक चित्रपट, कथा, मालिका बनल्या आहेत.कारण ती कल्पना नैसर्गिक आणि तितकी सार्वत्रिक आहे.हाती येणारा खूप पैसा, त्यासाठी अगदी थोडा वेळ पत्करावी लागणारी एक भयंकर जिवावरची जोखीम आणि त्यानंतर तो पैसा आटेपर्यंत मिळवलेलं ऐशआरामाचं आयुष्य-सुख-निवांतपणा.परत एकदा ती किळसवाणी आणि शहारवणारी जोखीम पत्करेपर्यंतच.एखादा विवेकी माणूस ही जोखीम फक्त पोटाची अडचण दूर होण्यापुरतीच पत्करेल.त्यानंतर कष्टाचे पैसे कमवून देणारा व्यवसाय चालू करून त्या मोहापासून आयुष्यभर लांब राहील.पण तुम्हा आम्हाला माहिती आहे- असं आतापर्यंत कधीच घडलं नाही.ही पैश्याची भूक, स्वतः वाढवलेल्या गरजा वाढतच जातात.परत परत त्या सैतानाकडे माणसाला घेऊन जातात.त्या मोबदल्यात गहाण ठेवलेलं आयुष्य, आत्मा, विवेक याबद्दलचे विचार कोपऱ्यात भिरकावून देऊन.

'हॅ, हे काय, अजिबातच भीती वाटली नाही' म्हणून बाहेर येणाऱ्या साठी हा चित्रपट नाही.त्या अपेक्षेने येत असाल तर बहुधा तुम्हाला ट्रेलर कळलं नाही.तुंबाड हा रूढ अर्थाने 'भयपट' नाही.त्यातले चेहरे तुम्हाला घाबरवणार नाहीत, रात्रीमागून रात्री स्वप्नात येऊन झपाटणार नाहीत.पण त्यातली माणसं, त्यांची पैश्याबद्दल लालसा, आणि त्यासाठी जे करावं लागेल ते करत राहण्यामागची अतृप्ती तुम्हाला जास्त घाबरवेल.हादरवेल.शेवट त्यातल्या अगतिकतेने, डिसगस्ट ने आणि हा शेवट माहीत असूनही परत परत त्या मोहात सापडणाऱ्या प्रवृत्ती बद्दल च्या संतापाने डोळ्यात पाणी आणेल.स्पॉईलर द्यायचे नाहीत त्यामुळे जास्त लिहीत नाही.पण असे चित्रपट बनायला हवेत, जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवेत.रंगीबेरंगी रक्त, घाबरवणारे चेहरे दिसतील म्हणून नाही, तर यातली कथा नक्की काय सांगायचा प्रयत्न करते आहे ते ऐकण्यासाठी. एका छोट्या कथेत अनेक पदर आहेत, एका सरळ साध्या कथे मध्ये बऱ्याच घेण्यासारख्या गोष्टी आहेत.अनर्थ केव्हा झाला?जेव्हा भूक धान्य सोडून धनाकडे वळली.सगळंच गमावणार होतं तेव्हा किमान अर्धं वाचलं ते कशामुळे?धान्यामुळे.शेवटी जे हातात उरलं ते इतकी मोठी जोखीम घेण्याच्या बरोबरीचं तरी होतं का?खूप प्रश्न पडतात.मिळणारी उत्तरं स्वतःला हलवून जातात.

आणि तरीही मला खात्री आहे.पत्करलेली जोखीम मोठी आणि मोबदला खूप मोठा असेल तर आयुष्यात तुम्हीही त्या मोहाच्या आणि मृत्यूच्या दारात पुन्हापुन्हा जाल- थोडीशी चूक किंवा उशीर समोर काय भविष्य घेऊन येतोय हे उघड्या डोळ्याने पाहूनही.

- अनुराधा कुलकर्णी

(नवा लेख लिहायचा मोह आवरला नाही.मी एक्स्पर्ट परीक्षक नाही.पण असे पिक्चर लोकांनी बघायला हवेत.हे नाव जास्तीत जास्त वेळा डोळ्याखालून जायला हवं.मोठे स्टार, चकमकाट बघून थिएटर मध्ये एका दिवशी 8 शो ठेवणारे आणि शेवटी हाती भ्रमाचा मोठा भोपळा ठेवणारे चित्रपट सोडून.)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या आईच्या रिअल लाईफ नवऱ्याला विचारता येईल पण जाऊदे ☺️☺️ लईच होईल ते.. पार्ट 2 मध्ये असेल संदर्भ कदाचित ..

हो रे, एकट्यानेच पाहावा लागला. >>>>>> Lol

<<<<<< यात हसण्यासारखं काय आहे, म्हणजे जाब नाही विचारत जस्ट क्युरिओसिटी यु नो Wink

लंपन अन मी जाणार होतो पण तो अगोदर पाहून आला म्हणून मी तस बोललेलो Lol

अहो, सरकार मेल्यानंतर वाड्यात होतेच कोण? ती जाते अन नाणे घेऊन येते मुर्तीपुढचे. सदाशिवला वापरण्याचा संबंधच कुठे येतो?

ह्म्म..मग खरंच माहित नाही.
कदाचित दु:खात 'डोंगरावरच्या घरी चला' ऐवजी वाड्यावर चला म्हणाली असेल. Happy
किंवा दुसरं कारण इथे लोक सांगतायत ते, दहनाची लाकडं किंवा व्यवस्था वाड्यात होत असेल.
हेही राहीनाच विचारावे लागेल.
लकडनानी म्हणजे काय? भूत दादी सरकारची लकडनानी असते.

यात हसण्यासारखं काय आहे, म्हणजे जाब नाही विचारत जस्ट क्युरिओसिटी यु नो >>>>>>> मला वाटल , तुम्हाला एकटयाला पाहताना भीती वाट ली की काय.

लंपन अन मी जाणार होतो पण तो अगोदर पाहून आला म्हणून मी तस बोललेलो >>>>>> ओहो, असे होते काय. क्षमस्व हा.

तुम्हाला एकटयाला पाहताना भीती वाट ली की काय.
>>>> सही पकडे है Lol

पण पब्लिक लै इरिटेट करत राव. पुढच्या ओळीतील एक जण कायप्पा चेक करत होता सारखा, त्या मोबाइलची लाइट डोळ्यावर यायची, मागच्या रांगेतील ४-५ विदुषी सतत कमेंट करायच्या, ह्या अस कुठ असतय का, पुणेरी पाटी, अजुन बरच काही. सुदैवानं रिकामी सीट्स भरपुर होत्या मग वैतागुन जागा बदलली.

विधवा सरकार कडे जाते.ती करते ते काम सोडून इतर कामं(खाणं बनवणे वगैरे) कोण करत असतं?किंवा मग ती फुल डे नोकरी करत असेल.येऊन झाडू पोछा स्वयंपाक, जेवण वाढणे वगैरे.इतके काही वर्षे करण्या साठी 1 मुद्रा हे त्या काळात पण खूप कमी किंमत आहे.
दुसरं म्हणजे ती त्या आजीची नखं का कापत असते?आजी हेटवर्दी राक्षस असेल तर नखं वगैरे कापायची गरज नाही.आजी ही तिची आजेसासू असेल तर दयेखातर नखं कापणे शक्य आहे.(किंवा आजी उठल्यास ओव्हर ऑल आपल्या जीवाला रिस्क कमी करायला तिची नखं कापत असेल.
जी व्यक्ती एक वाक्याचा पासवर्ड बोलल्यावर घोरत पडते तिला खाणं शिजवून खाऊ घालायची तरी काय गरज आहे?
खाण्याचे काही ठराविक स्पेक् आहेत का(खिचडीच पाहिजे, इतकीच शिजलेली पाहिजे वगैरे)?नुसती घरातली फळं, पोहे चिवडा दिला तर अडी अडचणीला?

इतके काही वर्षे करण्या साठी 1 मुद्रा हे त्या काळात पण खूप कमी किंमत आहे.
>>>>>> कदाचीत अजुन खजिना असेल अशी आशा असेल तिला

त्या काळात घरात चिवडा असण इतकं सहज वाटत नाही. म्हातारीचे तोंड पाहिले नाही का? ते बंद केलेले असते. आहे त्या फटीतून अन्न जाईल असेच पातळ, मऊ पाहिजे.

बाय द वे...ती म्हातारी एका पुरुष कलाकाराने साकरलीये Happy

किंवा आजी उठल्यास ओव्हर ऑल आपल्या जीवाला रिस्क कमी करायला तिची नखं कापत असेल. >> मला तरी हेच कारण वाटतय

बाय द वे...ती म्हातारी एका पुरुष कलाकाराने साकरलीये >>पांडुरंग ची भुमिका केलेल्या मुलानेच ही आजी साकारली आहे.

पण त्या पांडुरंग च्या इंटरव्ह्यू मध्ये त्याने आजीची भूमिका साकारली असं म्हटलंय.

अरे हो खरंच की.त्याचं नाव राघव आहे विसरले.
विनायक ने ज्या थंडपणे त्याचा बळी दिला ते बघण्या सारखं आहे.

विनायक च्या मुलाने आजी चा रोल केलाय.मुस्लिम मुलगा आहे तो. मागे पण मी हे लिहिलेलं. कुठल्यातरी इंटरव्ह्यू मध्ये त्याने सांगितलेलं

विनायक ने कुठे राघव चा बळी दिला? उलट त्याला मुक्ती देतो, कंदिल फेकून मारतो आणि राघव जळून मरतो भिंतितल्या भिन्तित.
राघव किती उत्सुक असतो विनायक सोबत पार्टनरशिप करायला, पण तो (विनायक) त्याला ताकास तूर लागू देत नाही. त्या अर्धवट उत्सुकतेपोटी तर तो वाड्यात जातो ना. आणि स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरतो.

मी रविवारी दुसर्यांदा पाहिला सिनेमा. आजीचे संवाद निट कळत नाहीत, त्यामुळे मी तिथे सब टायटल्स वाचली. त्याने खूप मदत झाली.

अजून एक म्हणजे विनायक ला लुभावून २ दिवस घरात डांबून ठेवणाऱ्या स्त्रीला त्याची (विनायक ची बायको) मोरनी चोरली म्हणून घरातून हाकलून देते. पण पैशाचा अनोखा ओघ नंतर तिला परत पतीची रखेल म्हणून स्वीकारायला भाग पाडतो. जेव्हा मोरणी चोरली म्हणून (राधिका) तिला घराबाहेर काढते तेव्हा विनायक थंड दाखवलाय, बहुधा त्यानेच ती मोरणी तिच्या सामानात ठेवली असेल, कारण राघव तर गेला होता आधीच मग तिला घरात ठेवून काय उपयोग? बायको करवी तिला घरातून बाहेर काढतो बहुधा..

विनायक ला माहीत असतं राघव तिथे आहे.तो मुद्दाम येऊन काठी वाजवून आवाज करून मग विहिरीत जातो.बाहुली वाला डबा न उघडता ठेवतो.सावकार नंतर उतरून डबा नक्की उघडून बघणार आणि बेसावधपणे हस्तर चा बळी होणार.
नंतर हस्तर राघव चे पाय वगैरे उखडून खायला लागतो तेव्ह त्याला अती झालं असं वाटतं आणि तो मुक्ती देतो.

हा पिक्चर इकडे थिएटरला आलेलाच नसावा. कुठेही दिसला नाही आणि ऐकू आला नाही. आता टिव्हीवर बघता येईल तोवर वाट बघणं आलं.

टीव्हीवर पाहण्यात मजा नाही. मोठ्या स्र्कीन वर जास्त चांगला इफेक्ट जाणवतो.
पण तू दुसऱ्या देशात आहेस का?

Pages