(मागे लिहिलेल्या लेखाचाच हा एक भाग आहे.त्यामुळे तीच तीच नावे येतील लेखात. सर्व लेखाचे तुकड्या तुकड्यात टाकले तर आठ दहा भाग होतील सहज. 'मैत्र' नावाने काही भाग येथे टाकतो आहे.)
सकाळचे साडेनवू वाजले असावेत. आई पोळ्या करत होती. बाबा काहीतरी लिहित होते त्यांच्या कामाचे. मी जमिनीवरच पेपर अंथरून, पालथे पडून कोडं सोडवत होतो, इतक्यात दाराची कडी वाजली. मी बाबांकडे पहिले. त्यांनीही भुवया उडवून नुसतेच माझ्याकडे पहिले. मग मी आत पहात ओरडलो “आई, कडी वाजतेय. दार उघड.”
आई म्हणाली “अरे कडी वाजतेय म्हणजे दत्ताच असणार. पहा बरं कोणे ते.”
“अरे हे लक्षातच आलं नाही” म्हणत मी पेपर बाजूला सारून उठलो आणि दार उघडले. दत्ताच होता. मी बाजूला होऊन दत्ताला घरात घेणारच होतो पण त्याचा चेहरा पाहून जरा चरकलो. “आई दत्ताच आहे ग” म्हणत मी त्याला डोळ्यानेच विचारले “काय झालं?” पण त्याचे हुं नाही की चू नाही. उलट जरा जास्तच गंभीर झाला. मला बळेच बाजूला सारून आत आला. हा दत्त्या जेंव्हा जेंव्हा गंभीर होतो तेंव्हा तेंव्हा माझ्या पोटात अक्षरशः गोळा येतो. बरं याच्या गंभीरपणाची ‘संक्रात’ नक्की कोणावर येईल ते काही सांगता येत नाही. तो आत आला आणि बाबांच्या समोरच्या लाकडी सोफ्यावर पाय वर घेऊन, दोन्ही हातांच्या मुठींवर हनुवटी ठेउन बसला. त्याची ती ‘दत्तमुद्रा’ पाहील्यावरच मला साधारण पुढच्या दंगलीचा अंदाज येवून मी बाबा आणि दत्ता यांच्यामध्ये अस्ताव्यस्त विखुरलेले पेपर गोळा करायला घेतले. कुस्तीच्या अगोदर आखाडा साफ करावा तसे.
दत्ताकडे पाहून बाबा म्हणाले “बस रे दत्ता, दोन मिनिटात होईल माझे.”
दत्ता “हां” असं हुंकारला आणि तसाच बसून राहिला. माझ्या पोटातला गोळा मोठा होऊन वर छातीकडे सरकला. साडीच्या शोरुममधला माणूस जितक्या काटेकोरपणे विस्कटलेल्या साड्यांच्या घड्या घालतो तितक्याच काटेकोर आणि निर्विकारपणे मी पेपरच्या घड्या घालायला सुरवात केली. कारण आता जे काही बोलायचे ते दत्ताच बोलणार होता. ‘वळला तर सुत नाही तर भूत’ या वर्गात मोडणारा हा प्राणी. तसा इतकाही वाह्यात नाही म्हणा. वळला तरी आणि कुणी अगदी विस्कटला याला तरी हा सुतच. पण अवसे पुनवेला झटके यावेत तसे याला वर्षातून एकदा मित्रोध्दाराचे किंवा लोकोध्दाराचे झटके येतात. मग हे भूत वळलेल्या माणसाचाही पार विस्कोट करते हे मला चांगले माहीत होते. फक्त आज ‘कोणाची पाळी’ याचा विचार करताना मला नको तिथे मुंग्या यायला सुरवात झाली होती. त्यामुळे कूस बदलावी तशी मी जमिनीवर बसल्या बसल्या बुड बदलत होतो. बरं, येताना एखादा मित्र सोबत घेऊन आला असता तर माझी चिंता जरा तरी कमी झाली असती. पण एवढ कुठलं भाग्य माझे! एवढ्यात आई मदतीला आल्यासारखी म्हणाली “दत्ता, गरम गरम पोळी आहे, चहा टाकू का थोडा? दोघेही खा. बस, टाकतेच.”
‘तव्यावरची गरम चपाती आणि गोड चहा’ म्हणजे दत्त्याला जीव की प्राण. पण मुनिवर काही चहा-चपातीने चळतील असे चेहऱ्यावरुन वाटेना.
“नको मोठ्याई, मी भाकर खाऊनच निघालोतो घरून.” दत्ता गंभीरपणे म्हणाला.
तोवर बाबांचे काम उरकले होते. पेन, पेपर्स, फाईल्स वगैरे आवरताना बाबा म्हणाले “मग! काय दत्तोबा! आज कशी काय इकडे फेरी सकाळी सकाळी?” त्यावर दत्ताने ऊत्तर म्हणून मांडी मोडली आणि पाय खाली सोडून उजवा पाय हलकेच नाचवायला सुरवात केली.
त्याच्याकडे पहात बाबा म्हणाले “कारे, बोलेना तो आज अगदी. गोदी झाली का खाली? नारायण म्हणत होता, दोन एक दिवसात खाली होईन म्हणून.”
“खाली झाली असती तर खरवसाचा डबा नसता का आला घरी गुर्जी?” शेवटी दत्तू बोलला एकदाचा.
‘नाही व्याली अजून’ इतक्या सरळ उत्तराऐवजी त्याचे तिरकस बोलणे ऐकून आई आतूनच म्हणाली
“कुणाबरोबर भांडला आता दत्तू तू? नारायणशी? अरे मोठा भाऊ ना तुझा तो? मग?
“तसं नाही मोठ्याई, दादाशी नाय भांडलो. मला गुर्जींशी बोलायचय थोडं.”
ते ऐकूण बाबा म्हणाले “हे बघ दत्ता, माझ्या लक्षात आहे पण मध्ये दोन दिवस जाऊदे जरा. मग मी बोलतो सोसायटीच्या चेअरमनबरोबर. ते काही माझ्या शब्दाबाहेर नाही.”
“सोसायटीचं नाय ओ टेन्शन गुर्जी, मला अप्पाविषयी बोलायचय.” म्हणत दत्ताने माझ्याकडे पाहिलं.
दत्ता आल्यापासून दहा मिनिटात मी भीतीच्या वेगवेगळ्या भावावस्थेतून जात होतो आणि शेवटी ‘वाघ म्हटलं तरी खातो’ किंवा ‘मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही’ या भावात स्थिरावत होतो. ‘तुझं चालुदे’ या नजरेने मी त्याच्याकडे पहिले.
बाबा त्याला थांबवत म्हणाले “हे पहा दत्तू, आता कुठे तो दुसऱ्या वर्षाला आहे. इतक्यात काही त्याला दुचाकी घेऊन देणार नाही मी.”
“पण गुर्जी, माझं ऐका तर...”
“पण नाही नी बिन नाही. त्याचे शेवटचे वर्ष होऊ दे. मग उत्तम मार्क मिळो की नापास होवो. त्याला गाडी घेऊन देणार. निकाल आणायलाच गाडीवरून जाऊदे. काय गं!”
“हो बरोब्बरे, इतक्यात नकोच. आणि तू कशाला अप्पाची वकीली करतोय येवढी” इति आई.
“अहो मोठ्याई, पण मला काय म्हणायचं की...”
“काही म्हणू नको, अगोदर ही गरम पोळी आणि चहा घे. येवढी खा मग गरम गरम वाढते दुसरी”
दत्ता आता पार हताश दिसायला लागला. त्याच्या त्या दीनवाण्या चेहऱ्याकडे पाहून मला मात्र फार आनंद होत होता. दत्ता नक्की कशाला आलाय हे जरी माझ्या अजून लक्षात आलं नव्हत तरी कशावरुनतरी तो पेटलाय हे दिसत होतं. त्यामुळे आईने चहा चपाती आणून समोर ठेवल्यावर मला जरा सुटल्यासारखं झालं हे नक्की. दत्ताने केवीलवाणेपणाने एकदा बाबांकडे व एकदा आईकडे पहिले. त्याला माहित होते कि एकदा का चहा चपाती खाल्ली, पोटात भर पडली की मग जे सांगायला आलोय त्यातला निम्मा जोर कमी होणार. त्याने चपातीची डिश बाजूला सारली. चहा चक्क बशीत ओतला आणि फुंकर न मारताच पिला. तोंड पुसून त्याने कप बशी आत ओट्यावर नेवून ठेवली. मनातल्या मनात सगळं जुळवत त्याने नव्याने सुरवात केली. एकूण दत्ता आज ‘शेंडी तुटो की पारंबी तुटो’ या मुडमध्ये होता एकदम. तो काही मनातला विचार मांडल्याशिवाय जाणार नाही हे माझ्या लक्षात आलं.
"गुर्जी, मी काय म्हनतो... अप्पा काल घरी आल्ता. बराच वेळ बसलो होतो, गप्पा मारत. मला त्याने सगळं सांतीतलं पण तो पडला तुमचा पोरगा. तुमच्यापुढं तो काही बोलणार नाही. मला माहितीये. त्यामुळे मीच सांगायला आलोय."
इतक्यात आई बाहेर आली. चपाती तशीच पाहून म्हणाली "हे काय दत्तू, पोळी का नाही खाल्ली? जेवायची वेळ असून तुझ्यासाठी चहा ठेवला होता ना मी? असा कसा रे!"
"अगं, तो कशाला खाईल आता तुझ्या हातची पोळी? अप्पा आहे तोवर यांच्या मळ्यात मस्त पार्टी बिर्टी चालत असणार. काय दत्तू." बाबा दत्तूला उद्देशून पण माझ्याकडे मिश्कीलपणे पहात म्हणाले.
आई पदराला हात पुसत सोफ्यावर बसत म्हणाली "काय रे हे उद्योग सुरु केलेत तुम्ही. शेकोट्या काय पेटवता, काय काय भाजून खाता. अरे त्या श्यामच्या बाबांना कळले तर काय वाटेल त्यांच्या जीवाला? अरे ज्याचा त्याचा धर्म असतो. पाप लागेल अशाने."
"तसं नाही मोठ्याई, त्या शाम्याचाच पुढाकार अस्तो सारखा."
"अरे मग तुम्ही सांगायचं ना, की बाबारे आमच्यात चालते हे. तू नको करू असले काही. पुढच्यावेळी आला की मीच सांगते त्याला." इति आई.
दत्ता आता मात्र चिडला. निकरावर आल्यासारखा एकदम उठलाच. "ओ गुर्जी, मोठ्याई, मी कितीवेळ कायतरी सांगायचा प्रयत्न करतोय आणि तुमचं भलतंच कायतरी चाललंय. आपल्या पोराची काळजी नाय आणि त्या शाम्याचं काय घेऊन बसला तुम्ही? मरुंदे, मी कशाला सांगतोय उगाच तुम्हाला. मी चाल्लो."
मला एकदम काल दत्त्याच्या अंगणातल्या गप्पा आठवल्या. बोलायच्या भरात, भाव खायच्या नादात मी जरा अघळ-पघळ बोललो होतो. अर्थात त्या सगळ्याच फुशारक्या होत्या असं नव्हे, त्यात काही तथ्यही होते. पण एकूनच तो ‘गप्पांना रंग’ भरायचा प्रकार होता. सगळ्यांनीच ते हसुन, टाळ्या देवून-घेवून एन्जॉय केलं होतं. पण एकूणच दत्ताने ते फारच मनावर घेतलेलं दिसत होतं. “अप्पाचा हा प्रश्न आपण नाही सोडवायचा तर कोणी” या अत्यंत ऊदात्त भावनेने प्रेरीत होउन दत्तराया माझ्या घरी आल्याच्या माझ्या लक्षात आणि मला हसुच फुटले. पण दत्ताच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून मी ते आवरले. एक मात्र झाले, इतक्यावेळ टांगणीला लागलेला माझा जीव धप्पकन् भांड्यात पडला. पण आई बाबा मात्र एकदम चकितच झाले. त्यांना सुरवातीला दत्ता काय म्हणतोय ते समजलेच नाही…
आई घाईने उठून दत्ताकडे जात म्हणाली “अरे असं काय करतो दत्तू, आम्ही आपले नेहमीसारख्या गप्पा मारत होतो. तु नाहीस का सांगायचे मग कशासाठी आला होता ते. बस पाहू इथे सोफ्यावर आणि सांग सगळे काय झाले ते. अप्पा बोलला का काही तुला टाकून?”
अगदी रडकूंडीला आलेल्या दत्त्याला एकदम हायसे वाटले, भरल्या आवाजात तो म्हणाला “अप्पाला जायला सांगा बाहेर मग सांगतो सगळं”
बाबा म्हणाले “काही नको अप्पाने कुठे जायला. त्याचीच चुक असणार. तुझ्यासमोरच त्याला ओरडतो. नाहीतरी सुट्टीवर आल्यापासून पहातोय मी त्याचं वागणं”
मला वाटलं आता दत्ता नक्की कोसळणार. इतक्यात आईने बाबांना डोळ्यानेच गप्प रहायला सांगीतले आणि मला म्हणाली “तू जारे गावात. इन्नीला सांग आईने विरजन मागीतलय म्हणून”
बाबांनी माझ्याकडे पाहिले. गंभीर दिसत होते. मी निमूट उठलो आणि दार उघडुन बाहेर आलो. बाबांची ‘चेतक’ काढली आणि आता अर्धा तास दत्त्याचे भुत आई-बाबांच्या मानगुटीवर कसे बसेल त्याची कल्पना करत गाडीला किक मारली आणि गावात जायला वळवली. जाताना आई-बाबांची किवही येत होती आणि हसुही.
मैत्र - २
https://www.maayboli.com/node/66717
क्रमशः
मस्त सुरुवात
मस्त सुरुवात
लवकर येवू दे पुढील भाग.
दत्तू काय सांगतोय त्याची उत्सुकता लागलीय.
मस्त सुरुवात. पुढचे भाग पटापट
मस्त सुरुवात. पुढचे भाग पटापट येऊ देत.
अंवज्ञ, वावे धन्यवाद!
अंबज्ञ, वावे धन्यवाद!
पुढील भाग लवकरच टाकेन.
लवकर येवू दे पुढील भाग देवा!
लवकर येवू दे पुढील भाग देवा!
दत्तू काय सांगतोय त्याची
दत्तू काय सांगतोय त्याची उत्सुकता लागलीय. ->ंमला पण.
मस्त सुरुवात Happy
मस्त सुरुवात Happy
लवकर येवू दे पुढील भाग.
दत्तू काय सांगतोय त्याची उत्सुकता लागलीय.+११११११
जोरदार सुरवात, येऊ द्या पुढचा
जोरदार सुरवात, येऊ द्या पुढचा भाग लवकर
छान सुरूवात. पुभाप्र!
छान सुरूवात. पुभाप्र!
लवकर येवू द्या पुढील भाग.
लवकर येवू द्या पुढील भाग.
दत्तू काय सांगतोय त्याची
उत्सुकता लागलीय.
लवकर येवू द्या पुढील भाग.
लवकर येवू द्या पुढील भाग.
दत्तू काय सांगतोय त्याची
उत्सुकता लागलीय. >>> मी टू.. +१
मस्तच तुमच्या लिखाणाची
मस्तच तुमच्या लिखाणाची आतुरतेने वाट पहातो नेहमी
पुभाप्र
मस्त सुरुवात. पुढील भाग टाका
मस्त सुरुवात. पुढील भाग टाका लवकर
सगळ्यांचे धन्यवाद!
सगळ्यांचे धन्यवाद!
पटकन टाका पुढील भाग.
पटकन टाका पुढील भाग.
बरे लिहिताय!! लिहित रहा अजुन!
बरे लिहिताय!! लिहित रहा अजुन!
पहिल्या लेखात चाहता झालो आहे.
पहिल्या लेखात चाहता झालो आहे. निराश करणार नाही ही अपेक्षा.
पुढे लिहा लवकर
पुढे लिहा लवकर
मस्त लिहिता तुम्ही...
मस्त लिहिता तुम्ही...
मस्तच हो. जमलय अगदी.
मस्तच हो. जमलय अगदी.