भाज्यांचे आणि फळांचे देठ, साली, बिया, उरलेले, नासलेले अन्न, अंड्यांची टरफले, मांसाहारी स्वैपाकातून उरणारे हाडांसारखे टाकाऊ पदार्थ ही नावे उच्चारली तर प्रथम काय डोळ्यासमोर येतं ? भरून वाहणारी कचराकुंडी आणि दुर्गंध, हो ना? पण या सगळ्या घटकांमध्ये फक्त अजून २ घटक मिसळा- जीवाणू आणि थोडीशी इच्छाशक्ती- मग पहा काय तयार होतं ? झाडांसाठी अत्यंत पोषक असं कंपोस्ट!
मार्च महिन्यात मला कंपोस्टिंग सुरू करून एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात मी माझ्या घरात तयार होणार्या ओल्या कचर्यापासून जवळजवळ पन्नासएक किलो कंपोस्ट खत तयार केलं. मी कुंडीत लावलेल्या झाडांसाठी तर ते खत वापरलंच, पण शिवाय सोसायटीतल्या अनेकांनी माझ्याकडून कंपोस्ट खरेदी केलं. शिवाय, माझं पाहून सोसायटीतल्या अजून दोघीजणी त्यांच्या घरी कंपोस्ट तयार करू लागल्या.
हे घरगुती कंपोस्ट वापरून आम्ही घरी कुंड्यांमध्ये टोमॅटो, अळू, पालक, गाजर, बीटरूट, कोथिंबीर, पुदिना अश्या भाज्या पिकवल्या.
हा आमच्या कुंडीतला पालक.
हे टोमॅटो!
मुळात कंपोस्ट म्हणजे काय?
कंपोस्ट म्हणजे ओल्या कचर्याचे विघटन होऊन तयार झालेले खत. कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती सतत निसर्गात चालू असते. जंगलात झाडांची पाने जमिनीवर पडल्यावर हळूहळू त्यांचे विघटन होते. या विघटन होत असलेल्या पानांमधील पोषक द्रव्ये झाडाच्या मुळांकडून शोषली जातात. असं हे नैसर्गिक रिसायक्लिंग आहे.
आता घरात कंपोस्ट तयार करायचे असेल तर काय करायचं?
आपल्या घरात तयार होणार्या कचर्यापैकी सुमारे ७०% कचरा हा जैवविघटनशील असतो. भाज्यांचे देठ, साली, उरलेले अन्न, वापरलेले टिश्यू पेपर्स, सुकलेली फुले, चहा/ कॉफी पावडर/ टीबॅग्स, अंड्याची टरफले, मांसातील हाडे, नारळाच्या शेंड्या हा सगळा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करता येतो. हा सगळा कचरा एका वेगळ्या टोपलीत/ प्लॅस्टिकच्या डस्ट्बिनमध्ये ठेवायचा. बाकी प्लॅस्टिकचा, रबराचा वगैरे कचरा यात मिसळायचा नाही. दिवसातून एकदा हा ओला कचरा कंपोस्टिंग बिनमध्ये घालायचा. ही कंपोस्ट बिन विकत मिळते किंवा घरीही तयार करता येईल. ( घरी तयार करायची असेल तर एखादा झाकण असलेला प्लॅस्टिकचा उभट डबा/ झाकणवाली बादली घ्या आणि त्याला खालपासून वरपर्यंत ठराविक अंतरावर छोटी छोटी छिद्रं पाडा. आत हवा खेळती राहण्यासाठी ही छिद्रं आवश्यक आहेत). मग या कचर्याचं विघटन होण्यासाठी त्यात ' विरजण’ किंवा कल्चर घालायचं. हेही विकत मिळतं. कचर्याचं विघटन करून त्याचं कंपोस्ट्मध्ये रूपांतर करणारे हे जीवाणू असतात. कोकोपीट ( नारळाच्या शेंड्यांची पावडर) आणि हे जीवाणू एकत्र करून आपल्या ओल्या कचर्यात घालायचे. वर एक वर्तमानपत्राचा कागद घालायचा आणि झाकण लावून टाकायचं. बास, रोज २ ते ३ मिनिटं लागतात फक्त हे सगळं करायला! एकदा आपलं कंपोस्ट तयार झालं की हे कल्चर विकत आणण्याचीही जरूर नाही. आपलं कंपोस्टच नव्या ओल्या कचर्यात मिसळायचं की झालं!
अशा दोन तरी बिन्स आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे एक बिन भरली की दुसरीत कचरा टाकायला सुरुवात करता येते. साधारणपणे २ महिन्यांनी कंपोस्ट तयार होतं. मधून मधून ते ढवळावं, म्हणजे सगळीकडे हवा लागते आणि कंपोस्टिंग चांगलं होतं.
गेल्या वर्षी सोसायटीत कंपोस्ट्चा स्टॉल लावला होता. तेव्हाचा हा फोटो. या फोटोत डावीकडे प्लॅस्टिकचा स्टॅक टाईपचा कंपोस्टर आहे आणि त्याच्या बाजूला स्टँड अलोन कंपोस्टर ( जो माझ्याकडे आहे)
बंगळूरमध्ये रहायला आल्यापासून आपणही घरी कंपोस्टिंग करावं असा विचार डोक्यात मधूनमधून घोळत असे. बंगळूरमध्ये डेली डंप ही कंपनी या कंपोस्ट बिन्स बनवण्यात आघाडीवर आहे. सुरुवातीला ते फक्त टेराकोटाचे कंपोस्टर विकत असत. बंगळुरात अगदी मध्यमवर्गीयांमध्येही स्वत:चं स्वतंत्र घर असणं आणि घराभोवती जागा असणं हे आत्ताआत्तापर्यंत कॉमन होतं, त्यामुळे टेराकोटाचे भलेमोठे जड कंपोस्टरही विकत घेणारी बरीच मंडळी होती.
यात टेराकोटाचा स्टॅक टाईप कंपोस्टर दिसतोय.
आम्ही मात्र फ्लॅटमध्ये राहणारे. त्यामुळे ते शक्यच नव्हतं. शिवाय, त्या कचर्याचा वास तर घरभर पसरणार नाही ना, मुलंही लहान आहेत, ती त्या कचर्याजवळ जाऊन त्यांना काही इन्फेक्शन वगैरे तर होणार नाही ना, अशा शंकाही मनात येत होत्याच. शेवटी गेल्या वर्षी या सगळ्या शंका बाजूला सारून कंपोस्टिंग सुरू करायचं ठरवलं. तोवर डेली डंपने प्लॅस्टिकचे कंपोस्टरही विकायला सुरुवात केली होतीच. त्यांच्या २ बिन्स आणल्या. चुकत माकत सुरुवात झाली. कचरा आणि कोकोपीटचं मिश्रण खूप ओलसर झालं तर त्यात भरपूर अळ्या (maggots ) होतात, दुर्गंधही येतो. मिश्रण खूप कोरडं झालं तर कचर्याचं विघटन होत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या चुका करून हळूहळू आम्ही शिकत गेलो. आता मात्र हे काम अगदी अंगवळणी पडलं आहे. रोज सकाळी किंवा रात्री दिवसभराचा ओला कचरा बिनमध्ये टाकायचा, साधारणपणे ३ आठवड्यांनी दोन्ही बिन्स भरल्या की आधीच्या बिनमधलं अर्धवट तयार झालेलं कंपोस्ट दुसर्या एका मोठ्या बादलीत काढायचं, पूर्णपणे तयार झालं की चाळून ठेवून द्यायचं. तोपर्यंत सोसायटीतल्या मैत्रिणींचे ’ कंपोस्ट तयार आहे का?’ असं विचारणारे फोन येऊन गेलेलेच असतात. खरंतर कंपोस्ट जितकं जुनं (मुरलेलं) तितकं जास्त चांगलं. पण बाल्कनीत जागा मर्यादित. त्यामुळे मी फार काळ ते ठेवून देत नाही.
हे चाळून तयार झालेलं फायनल प्रॉडक्ट
खरंतर अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे. त्यात खूप वेळही जात नाही. आपण रोज जो ओला कचरा महानगरपालिकेच्या ताब्यात देतो, तो जर घरीच कंपोस्ट केला तर तब्बल ३०० किलो कचरा ( हा आकडा चौघांच्या कुटुंबासाठी आहे ) आपण लॅन्ड्फिलमध्ये जाण्यापासून वाचवतो. पण कंपोस्टिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असतात, दुर्गंध येईल याची धास्ती असते, वेळखाऊ प्रकरण असेल असं वाटत असतं. त्यामुळे सहजासहजी कुणी कंपोस्टिंग करू धजत नाही. हे काम वाटतं तितकं कठीण आणि वेळखाऊ नाही हे सांगावं आणि कंपोस्टचं १ वर्ष पूर्ण झाल्याचं ’ सेलिब्रेट’ करावं असं वाटलं म्हणून हे लिहावंसं वाटलं!
मी पण एक वर्षांपासून कंपोस्ट
मी पण एक वर्षांपासून कंपोस्ट करतेय. डेली डंप वरूनच मागवले होते टेराकोटाचे खंबा कंपोस्टर.
हिवाळ्यात मात्र आमच्याकडे तिन्ही भांडी भरलेली आणि कंपोस्टिंग चा वेग कमी अशी स्थिती झाली होती काही दिवस. मग अजून एक साधी बादली पण घेतली कंपोस्टिंगला.
डेली डंप च्या साईटवरचे व्हिडीओ आणि ट्रबल शूटिंग वाली माहिती खूप चांगली आहे . दिल्लीतल्या व्हेण्डरनी पण खूप मदत केली. अगदी छोटे छोटे प्रश्न असतात--- मुंग्यां झाल्यात काय करू , कंपोस्ट स्पीड कमी होतेय इ. पहिली कंपोस्ट बॅच झाल्यावर मग आत्मविश्वास येतो करायला.
अंड्यांची टरफलं तशीच रहातात.
अंड्यांची टरफलं तशीच रहातात. बाकीच्यांचा काय अनुभव?
कंपोस्ट मध्ये अंड्यांची टरफलं
कंपोस्ट मध्ये अंड्यांची टरफलं तशीच रहातात. त्यामुळे ह्याचा चुरा करून (मिक्सर किंवा हाताने कुस्करून) डायरेक्ट कुंडीतील झाडांना दिला तर अधिक बरे.
पंचगयामृत आणायचे केरला
पंचगयामृत आणायचे केरला आयुर्वेदिज दुकानातून.
काही वास वगैरे मला तरी नाही जाणवत. केरला आयुर्वेद ह्यांचे क्लासेस सुद्धा असतात. ते औषध म्हणून माणसांना आणि झाडांना वापरु शकता.
मी फक्त झाडांनाच वापरलेय.
मी शिकले त्या रेसीपीत पंचगयामृत मध्रे, बेसन तर नक्कीच न्हवते.
जीवामृत काहीतरी वेगळेच दिसतेय/असावे.
तसाही मला शेणाचा वास आवडतो. घाण वास हा नीट फरमेंट नाही झाले तरच येतो.
अल्पना, शेवटच्या परिच्छेदाला
अल्पना, शेवटच्या परिच्छेदाला +१
आमचेही डेली डंपचे व्हेंडर खूपच चांगले आहेत. खूप सहकार्य करतात.
मला माहित नाही पण पंचगयाअमृत
मला माहित नाही पण पंचगयाअमृत आणि जीवामृत हे वेगळे प्रकार असावेत.
जीवामृत ही झिरो बजेट नॅचरल फार्मिंग मधली संकल्पना आहे.गाय असलेले शेतकरी हे बनवून शेतात वापरून खतांची गरज कमी पैशात भागवू शकतात असे काहीतरी.
http://agriplaza.in/jeevamrut.html
मस्त धागा!
मस्त धागा!
गेली ३-४ वर्षे घरी कंपोस्टिंग करत आहोत. अधुन मधुन थोडं दुर्लक्ष/ आळशीपणा होतो.
कल्चर कधी घालतो कधी नाही. पण टेरस वरची बरीचशी झाडे आता ओल्या कचर्यावरच आहेत.
~साक्षी.
वावे, तुम्हाला संपर्कातून एक
वावे, तुम्हाला संपर्कातून एक ईमेल केलं आहे. वाचून उत्तर द्यावे ही विनंती.
@ ललिता-प्रीति, उत्तर दिले
@ ललिता-प्रीति, उत्तर दिले आहे
कंटेनर कचऱ्याने भरल्यावर
कंटेनर कचऱ्याने भरल्यावर म्हणजे शेवटचा कचरा घालून झाल्यानंतर किती दिवसांनी खत व्यवस्थित तयार होते? तोपर्यंत डबा उघडा ठेवायचा का?
कचरा बारीक असेल(निर्माल्य,
कचरा बारीक असेल(निर्माल्य, कापलेले गवत इ. तर १५ दिवस, जर जाड असेल(कलिंगड साल, कांदे साल आणि टोक,पालक वगैरे पालेभाजी कचरा ज्यात आर्द्रता जास्त असते) तर किमान २ किंवा ३ महिने. सब्जेक्ट टू सूर्य उष्णता.आणि दर ३ दिवसांनी कचरा तळापासून हलवून उलट सुलट करून हवा सर्व कचर्यात मिसळणे.
उघडा ठेवू शकता, सूर्य प्रकाश
उघडा ठेवू शकता, सूर्य प्रकाश चांगला मिळेल.जर गार्डन मध्ये किंवा साप बेडूक विंचू जायची लपायची शक्यता असेल तर जाळी/चाळण//फडकं बांधून बंद ठेवणे
माझा एक डबा साधारणपणे १० ते
माझा एक डबा साधारणपणे १० ते १२ दिवसात भरतो. दुसरा डबा भरेपर्यंत पहिला डबा बंद असतो. नंतर पहिल्या डब्यातलं हाफ-डन मिश्रण एका बादलीत काढून ती उघडीच ठेवते. पाऊस-बिऊस पडायला लागला तर मात्र झाकून ठेवते. रोज शक्यतो एकदा ढवळते. कधीकधी विसरतेही. पण एकंदरीत हवेशीर ठेवायचं मिश्रण. २ महिने लागतात मला.
कोकोपीट ( नारळाच्या
कोकोपीट ( नारळाच्या शेंड्यांची पावडर) कुठे विकत मिळते का?
कोकोपीट पावडर, कोकोपीट ब्लॉक
कोकोपीट पावडर, कोकोपीट ब्लॉक अमेझॉन वर मिळतात.कल्चर, शेणखत, गांडूळ खत पण मिळते.
तसेच पुण्यात सर्व शेतकी उपकरण दुकानांमध्ये मिळते.मला वाकड चे माणकेश्वरी ऍग्रो, शालनदत्त माहीत आहे.स्वारगेट ला पण २ दुकाने आहेत.
धन्यवाद अनु.
धन्यवाद अनु.
Bigbasket var pan sagla milta
Bigbasket var pan sagla milta
वावे, 'पहिल्या डब्यातलं हाफ
वावे, 'पहिल्या डब्यातलं हाफ-डन मिश्रण एका बादलीत काढून ती उघडीच ठेवते. '
ह्या बादलीतले अर्धकच्चे खत पूर्ण तयार व्हायला दोन महिने लागत असतील तर निदान चार बादल्या या साठी ठेवाव्या लागत असतील ना? की आधीच्या लॉटचे पूर्ण खत होण्याआधीच कचऱ्याचा दुसरा अर्धकच्चा लॉट त्या बादलीत ओतता येतो?
वावे, मनःपूर्वक धन्यवाद व
वावे, मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन. खूप छान माहिती दिली आहे. बाकी सदस्यांचे पण आभार. खूप छान आणी मौल्यवान सुचना दिल्याबद्दल. हळू हळू सुरुवात करणार आहे,
हीरा, सध्या माझ्याकडे एका
हीरा, सध्या माझ्याकडे एका बादलीत चाळण्यासाठी तयार असं कंपोस्ट आहे आणि २ बादल्यांमधे २ वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेलं मिश्रण आहे
एक जस्ट परवा काढलेलं आणि एक १५ दिवसांपूर्वी.
(कंपोस्ट चाळलंच पाहिजे असं नाही. तसंच वापरलं तरी चालतं. पण त्यात जर काही मोठे तुकडे राहिले असतील, तर ते बाजूला काढावे लागतात. ते परत नव्या कचर्यात टाकायचे.)
कुठल्याही टप्प्यांवरचं मिश्रण एकत्र केलं तरी चालतं. ( विघटनाचा वेग वाढतो, कमी होत नाही) . पण बादली पूर्ण भरली किंवा अगदी पाऊण भरली, तरी ढवळणं कठीण होऊन बसतं. खालपर्यंत ढवळता येत नाही. ( त्यामुळे वास येऊ लागतो, स्लो होते प्रक्रिया). त्यामुळे मी आधी वेगवेगळं ठेवते. नंतर एकत्र करते ( say ८०% तयार झाल्यावर). पसरट टबसारखं भांडं असेल तर आधीच एकत्र करायलाही हरकत नाही.
डेली डंपचे स्टॅक टाईप कंपोस्टर असतात त्यात सर्वात वरचा डबा भरला की तो मधे ठेवतात आणि मधला वरती. तोही भरला की मधला ( म्हणजे मुळातला वरचा) खालच्या डब्यात रिकामा करतात आणि तो वर ठेवतात. कचर्याचं आकारमान कमी होत जातं, त्यामुळे सर्वात खालचा डबा जरी आकाराने वरच्या डब्यांएवढाच असला, तरी त्यात हा सगळा in process असलेला कचरा मावू शकतो.
रश्मी, धन्यवाद
वावे, वाचल्या पासून हे खुपच
वावे, वाचल्या पासून हे खुपच करून बघावस वाटत आहे. तू सगळं लिहिलं पण अगदी व्यवस्थित आहेस. सगळे प्रतिसाद ही माहितीपूर्ण च।
मनीमोहोर, धन्यवाद नक्की
मनीमोहोर, धन्यवाद
नक्की ट्राय करा. यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत. डेली डंपच्या वेबसाईटवरही आहेत.
मला हे करून बघायच आहे. सध्या
मला हे करून बघायच आहे. सध्या हिंमत गोळा करतेय.
१- साधारणपणे ४ माणसांच्या कुटुंबाला किती बादल्या लागतात ?
२ - मुंबईत हे करणारं कोणी आहे का ? बनलेल्या खताचं काय करता ? माझी बाग नाही /बाग वाली कोणी व्यक्ती ओळखीची नाही
मला हे करून बघायच आहे. सध्या
चुकून दोनदा पोस्ट झाली
जर इनिशीयल ट्रायल म्हणून
जर इनिशीयल ट्रायल म्हणून करायचं असेल तर थोडी लहान जाळी वाली पिंप आकाराची प्लास्टिक लॉनड्री बास्केट स्वस्त मिळाली तर बघा.पाणी साठवायची मोठी प्लास्टिक पिंप मिळतात त्या आकाराची.घर 4 जणांचं आणि चारिठाव स्वयंपाक करणारं असेल तर साधारण 1 किलो रोज जमा होईल.पिंप एकदा ठेवल्यावर सारखं हलवावं लागणार नाही अश्या जागी ठेवा(स्वस्त प्लास्टिक चं असेल तर कंपोस्ट भरलं पिंप उचलून इथून तिथे ठेवायला गेल्यास फुटेल.पिंप आधीच गॅलरीत कुंड्या असतात तिथे चांगलं ऊन मिळेल अश्या जागी ठेवा.
खाली एखादा गोणपाट ठेवा.पिंपात खाली साधे न्यूजपेपर चे तुकडे, वाळकी पाने, लाकडी भुसा यापैकी जे मिळेल ते 2 इंच लेयर ने ठेवा.आणि रोज जमणारा कचरा(पालेभाजी देठ, कांदा साले, फळे साले इ.) त्यात टाकायला चालू करा.प्रोसेस फास्ट हवी असेल तर साधारण 1 इंच तुकडे करून टाका.यावर रेडिमेड मिळणारे गांडूळ खत/शेणखत पावडर/कंपोस्ट कल्चर पसरून शिंपडा.2-3 दिवसांनी हे 3 दाते वाल्या गार्डनिंग उपकरणाने किंवा गार्डनिंग च्या खुरप्याने नीट तळापासून वर खाली करा.रोज चा कचरा यात टाकत राहा.दुधाची प्रोडक्ट नाहीत.अंड्याची सालं चालतील.लिंबाची सालं नक्की टाका, त्याने वास असेलच तर कमी होईल.
नीट ऊन, मिश्रणात मिसळणारी हवा याने ते लवकर कुजायला चालू होईल.कल्चर नीट प्रमाणात असेल तर वास येणार नाही.वास आला तरी तो कचरा दुर्गंध नसून साधा जंगलातला थोड्या ओल्या वाळक्या पानांसारखा असेल.कंपोस्ट तयार होताना पाणी वाळते, व्हॅल्यूम कमी होत जातो.हे तयार झालेले कंपोस्ट 3 महिन्यात भुसभुशीत माती सारखे दिसायला लागले की ते एखाद्या कुंडीत टाकून त्यात सरळ झाड लावता येईल.स्वतःला नको असल्यास खाली सोसायटीत झाडांना टाकता येईल.
एकदम विस्ताराने लिहिलय ..
एकदम विस्ताराने लिहिलय .. मनापासून धन्यवाद ...
एक अजून प्रश्न - जाळीच्या पिंपातून कचरा बाहेर नाही का येणार ?
बारीक जाळी असेल तर कचरा बाहेर
बारीक जाळी असेल तर कचरा बाहेर येणार नाही, पण जर जास्त ओला राहिला आणि पाणी सुटले तर ते बाहेर येईल आणि त्याचा दुर्गंध सुटेल.
कडेला वर्तमानपत्र लावता येईल.
मातीची ( सिमेंटची नाही) कुंडी वापरू शकता.
कचर्याला नीट हवा लागणं महत्त्वाचं.
उंच पिंप/ बादली असेल तर ढवळायला कठीण जाईल. त्यापेक्षा २ लहान बादल्या बर्या.
एकदा www.dailydump.org या साईटला भेट देऊन पहा. तिथे बरीच माहिती आहे, व्हिडिओही आहेत.
एक वेगळा प्रयोग म्हणून मोठा
वावे म्हणतेय ते लॉजिकल आहे.
एक वेगळा प्रयोग म्हणून मोठा मातीचा माठ विथ पसरट नळ वापरता येईल. या नळातून बाहेर येणारे लिक्विड कंपोस्ट टी म्हणून झाडांना.पण नळात कचरा अडकू शकतो कंपोस्ट चाच.
हा माझ्याकडे होता, यात खाली कंपोस्ट काढायला शटर चे झाकण आहे.
https://www.tradeindia.com/fp2792806/Compost-Bin.html
अर्थात इनिशियल हौशी स्केल कंपोस्टिंग ला प्लास्टिक चे जाळीदार पिंप, आंब्याची लाकडी फळ्या फळ्या वाली पेटी, फुटकी मोठी बादली जी तुम्ही किवा आणि कोणी टाकून दिलीय्,मोठी मातीची कुंडी, प्रॉपर ज्युट गोणपाट खाकी पोतं अर्धं दूमडून यापैकी काहीही चालेल. नंतर कंपोस्ट वारंवार करायला लागल्यावर आणी जमल्यावर डेली डंप किंवा कंपोस्टर किंवा अजून २-३ घरं पैसे शेअर करणार असतील तर ९००० चा आडवा टंबलर घेता येईल.
धन्यवाद वावे आणि अनु ...काय
धन्यवाद वावे आणि अनु ...काय केलं ते इथे लिहिनच ...
अर्रे वाह! भारी आहे हे सगळं _
अर्रे वाह! भारी आहे हे सगळं _/\_
Pages