कंपोस्टिंगचे एक वर्ष

Submitted by वावे on 6 June, 2018 - 08:45

भाज्यांचे आणि फळांचे देठ, साली, बिया, उरलेले, नासलेले अन्न, अंड्यांची टरफले, मांसाहारी स्वैपाकातून उरणारे हाडांसारखे टाकाऊ पदार्थ ही नावे उच्चारली तर प्रथम काय डोळ्यासमोर येतं ? भरून वाहणारी कचराकुंडी आणि दुर्गंध, हो ना? पण या सगळ्या घटकांमध्ये फक्त अजून २ घटक मिसळा- जीवाणू आणि थोडीशी इच्छाशक्ती- मग पहा काय तयार होतं ? झाडांसाठी अत्यंत पोषक असं कंपोस्ट!

मार्च महिन्यात मला कंपोस्टिंग सुरू करून एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात मी माझ्या घरात तयार होणार्या ओल्या कचर्यापासून जवळजवळ पन्नासएक किलो कंपोस्ट खत तयार केलं. मी कुंडीत लावलेल्या झाडांसाठी तर ते खत वापरलंच, पण शिवाय सोसायटीतल्या अनेकांनी माझ्याकडून कंपोस्ट खरेदी केलं. शिवाय, माझं पाहून सोसायटीतल्या अजून दोघीजणी त्यांच्या घरी कंपोस्ट तयार करू लागल्या.
हे घरगुती कंपोस्ट वापरून आम्ही घरी कुंड्यांमध्ये टोमॅटो, अळू, पालक, गाजर, बीटरूट, कोथिंबीर, पुदिना अश्या भाज्या पिकवल्या.

21oct2017 977_0.jpeg

हा आमच्या कुंडीतला पालक.

phone photos 128.jpg

हे टोमॅटो!


मुळात कंपोस्ट म्हणजे काय?

कंपोस्ट म्हणजे ओल्या कचर्याचे विघटन होऊन तयार झालेले खत. कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती सतत निसर्गात चालू असते. जंगलात झाडांची पाने जमिनीवर पडल्यावर हळूहळू त्यांचे विघटन होते. या विघटन होत असलेल्या पानांमधील पोषक द्रव्ये झाडाच्या मुळांकडून शोषली जातात. असं हे नैसर्गिक रिसायक्लिंग आहे.

आता घरात कंपोस्ट तयार करायचे असेल तर काय करायचं?
आपल्या घरात तयार होणार्या कचर्यापैकी सुमारे ७०% कचरा हा जैवविघटनशील असतो. भाज्यांचे देठ, साली, उरलेले अन्न, वापरलेले टिश्यू पेपर्स, सुकलेली फुले, चहा/ कॉफी पावडर/ टीबॅग्स, अंड्याची टरफले, मांसातील हाडे, नारळाच्या शेंड्या हा सगळा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करता येतो. हा सगळा कचरा एका वेगळ्या टोपलीत/ प्लॅस्टिकच्या डस्ट्बिनमध्ये ठेवायचा. बाकी प्लॅस्टिकचा, रबराचा वगैरे कचरा यात मिसळायचा नाही. दिवसातून एकदा हा ओला कचरा कंपोस्टिंग बिनमध्ये घालायचा. ही कंपोस्ट बिन विकत मिळते किंवा घरीही तयार करता येईल. ( घरी तयार करायची असेल तर एखादा झाकण असलेला प्लॅस्टिकचा उभट डबा/ झाकणवाली बादली घ्या आणि त्याला खालपासून वरपर्यंत ठराविक अंतरावर छोटी छोटी छिद्रं पाडा. आत हवा खेळती राहण्यासाठी ही छिद्रं आवश्यक आहेत). मग या कचर्याचं विघटन होण्यासाठी त्यात ' विरजण’ किंवा कल्चर घालायचं. हेही विकत मिळतं. कचर्याचं विघटन करून त्याचं कंपोस्ट्मध्ये रूपांतर करणारे हे जीवाणू असतात. कोकोपीट ( नारळाच्या शेंड्यांची पावडर) आणि हे जीवाणू एकत्र करून आपल्या ओल्या कचर्यात घालायचे. वर एक वर्तमानपत्राचा कागद घालायचा आणि झाकण लावून टाकायचं. बास, रोज २ ते ३ मिनिटं लागतात फक्त हे सगळं करायला! एकदा आपलं कंपोस्ट तयार झालं की हे कल्चर विकत आणण्याचीही जरूर नाही. आपलं कंपोस्टच नव्या ओल्या कचर्यात मिसळायचं की झालं!
अशा दोन तरी बिन्स आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे एक बिन भरली की दुसरीत कचरा टाकायला सुरुवात करता येते. साधारणपणे २ महिन्यांनी कंपोस्ट तयार होतं. मधून मधून ते ढवळावं, म्हणजे सगळीकडे हवा लागते आणि कंपोस्टिंग चांगलं होतं.

21oct2017 979.jpg

गेल्या वर्षी सोसायटीत कंपोस्ट्चा स्टॉल लावला होता. तेव्हाचा हा फोटो. या फोटोत डावीकडे प्लॅस्टिकचा स्टॅक टाईपचा कंपोस्टर आहे आणि त्याच्या बाजूला स्टँड अलोन कंपोस्टर ( जो माझ्याकडे आहे)

बंगळूरमध्ये रहायला आल्यापासून आपणही घरी कंपोस्टिंग करावं असा विचार डोक्यात मधूनमधून घोळत असे. बंगळूरमध्ये डेली डंप ही कंपनी या कंपोस्ट बिन्स बनवण्यात आघाडीवर आहे. सुरुवातीला ते फक्त टेराकोटाचे कंपोस्टर विकत असत. बंगळुरात अगदी मध्यमवर्गीयांमध्येही स्वत:चं स्वतंत्र घर असणं आणि घराभोवती जागा असणं हे आत्ताआत्तापर्यंत कॉमन होतं, त्यामुळे टेराकोटाचे भलेमोठे जड कंपोस्टरही विकत घेणारी बरीच मंडळी होती.
21oct2017 1041.jpg

यात टेराकोटाचा स्टॅक टाईप कंपोस्टर दिसतोय.

आम्ही मात्र फ्लॅटमध्ये राहणारे. त्यामुळे ते शक्यच नव्हतं. शिवाय, त्या कचर्याचा वास तर घरभर पसरणार नाही ना, मुलंही लहान आहेत, ती त्या कचर्याजवळ जाऊन त्यांना काही इन्फेक्शन वगैरे तर होणार नाही ना, अशा शंकाही मनात येत होत्याच. शेवटी गेल्या वर्षी या सगळ्या शंका बाजूला सारून कंपोस्टिंग सुरू करायचं ठरवलं. तोवर डेली डंपने प्लॅस्टिकचे कंपोस्टरही विकायला सुरुवात केली होतीच. त्यांच्या २ बिन्स आणल्या. चुकत माकत सुरुवात झाली. कचरा आणि कोकोपीटचं मिश्रण खूप ओलसर झालं तर त्यात भरपूर अळ्या (maggots ) होतात, दुर्गंधही येतो. मिश्रण खूप कोरडं झालं तर कचर्याचं विघटन होत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या चुका करून हळूहळू आम्ही शिकत गेलो. आता मात्र हे काम अगदी अंगवळणी पडलं आहे. रोज सकाळी किंवा रात्री दिवसभराचा ओला कचरा बिनमध्ये टाकायचा, साधारणपणे ३ आठवड्यांनी दोन्ही बिन्स भरल्या की आधीच्या बिनमधलं अर्धवट तयार झालेलं कंपोस्ट दुसर्या एका मोठ्या बादलीत काढायचं, पूर्णपणे तयार झालं की चाळून ठेवून द्यायचं. तोपर्यंत सोसायटीतल्या मैत्रिणींचे ’ कंपोस्ट तयार आहे का?’ असं विचारणारे फोन येऊन गेलेलेच असतात. खरंतर कंपोस्ट जितकं जुनं (मुरलेलं) तितकं जास्त चांगलं. पण बाल्कनीत जागा मर्यादित. त्यामुळे मी फार काळ ते ठेवून देत नाही.
21oct2017 902.jpg

हे चाळून तयार झालेलं फायनल प्रॉडक्ट Happy

खरंतर अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे. त्यात खूप वेळही जात नाही. आपण रोज जो ओला कचरा महानगरपालिकेच्या ताब्यात देतो, तो जर घरीच कंपोस्ट केला तर तब्बल ३०० किलो कचरा ( हा आकडा चौघांच्या कुटुंबासाठी आहे ) आपण लॅन्ड्फिलमध्ये जाण्यापासून वाचवतो. पण कंपोस्टिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असतात, दुर्गंध येईल याची धास्ती असते, वेळखाऊ प्रकरण असेल असं वाटत असतं. त्यामुळे सहजासहजी कुणी कंपोस्टिंग करू धजत नाही. हे काम वाटतं तितकं कठीण आणि वेळखाऊ नाही हे सांगावं आणि कंपोस्टचं १ वर्ष पूर्ण झाल्याचं ’ सेलिब्रेट’ करावं असं वाटलं म्हणून हे लिहावंसं वाटलं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णिता Lol मी मधे 4 5 महिने त्या माठा बद्दल साफ विसरून गेली होती..मग आज अचानक आईने आठवण करून दिली तेव्हा पाहिलं तर अशी स्थिती होती. मागे पावसात पाणी साचून तुडुंब भरला होता माठ..मग खराब झालं अस समजून लक्षच दिलं नाही..
हा माझा पहिला प्रयत्न होता म्हणून बऱ्याच चुका झाल्या. पुढल्या वेळी चांगल करण्याचा प्रयत्न करेल

Mi_anu thank u..
भाजीपाला लावायचा विचार चालू आहे त्या कुंडी मधे वापरते हे खत आता..

वर्णिता Lol
अनुने म्हटलंय तसं हलवून घे वरखाली. होईल हळूहळू कोरडं सगळं.

आमच्या पण कंपोस्ट ला वेळ लागतो.
एक म्हणजे ऊन मिळत नाही दुसरं म्हणजे खूप ओला कचरा पडतो(खराब पपई, खरबूज सालं,कलिंगड सालं,आमटी वगैरे).
एक frp बिन पूर्ण भरला की उचलून बाजूला ठेवून विसरून जायचा, मग दुसरा भरायला सुरुवात.कधीतरी 1 दीड वर्षाने पहिल्याची आठवण आली की त्याला रिकामा करून कुंड्यात टाकायचा.
बारीक तुकडे करण्या इतका पेशन्स ठेवला, नीट मध्येमध्ये कल्चर वापरून उलट सुलट केलं तर ती बॅच लवकर बनते.एकंदर कंपोस्ट या फायद्यापेक्षा ओला कचरा घरातून बाहेर नाही, कचरा 4 दिवसांनी एकदा टाकावा लागतो, वास नाही असे फायदे जास्त बरे वाटतात.
आता सध्या बराच ओला लगदा आहे.वास नाही.वाळवायला झाकण उघडत नाही, आत पाल किंवा गोगलगाय किंवा झुरळे जातील म्हणून.कोरडं होईल तेव्हा होईल.

IMG-20210410-WA0002.jpg अशा पांढऱ्या अळ्या झाल्या आहेत कंपोस्ट मध्ये
काय करावे
IMG-20210410-WA0003.jpg

हा धागा पाहूनच कंपोस्ट करु लागलो
आता लेखातील प्र चि दिसत नाहीयेत
परत टाकू शकलात तर नवीन करणाऱ्यास उपयोग होईल

काही नाही करायचं.कंपोस्ट कल्चर टाकून ढवळत राहायचं आणि अळ्या बाहेर येणार नाहीत ही काळजी घ्यायची.अळ्या कंपोस्ट वेग वाढवतात.आणि कंपोस्ट पूर्ण झाल्यावर त्यांना आर्द्रता आणि खाणं मिळत नाही म्हणून मरून जातात.
अळी चा एक बराच झूम फोटो टाका.

मी हल्ली ओलसर अर्धवट कंपोस्ट सरळ बाल्कनीत एका बाजूला ओतून ठेवते. नाही तरी वास येत नसतोच त्याला. वाळलं की चाळते.
निलुदा, हो, फोटो दिसत नाहीत खरे. पण आता मला ते मूळ लेखात टाकता येणार नाहीत. मी प्रतिसादात टाकते नंतर. अळ्या maggots असतील तर काहीच बिघडत नाही, उलट त्या मदतच करत असतात. पण तुमचं कंपोस्ट एवढं सपाट का दिसतंय?

mi-anu आणि वावे आभार

आज रविवार , सकाळी कंपोस्टची कुंडी टेरेस मध्ये ओतून ठेवली होती सकाळी आता परत भरुन ठेवले. इथे 40℃ आहे एकदम कोरडे ठाक Happy

कालचा फोटो झुम करून खाली दिला आहे
कंपोस्ट हलवताना त्या अळ्या दिसल्या होत्या .
बाहेर काढून फोटो काढला होता

20210405_184444_0.jpg

त्यांना राहुद्या.अळ्या(कोणत्याही) ओल्या पदार्थात वाढतात.त्याची ओल वाढत्या तापमानाने कमी होईल.शिवाय अजून कोरडे करायला जवळपास मिळाल्यास लाकडाचा भुसा, घरात रद्दीसह लहान तुकडे(पेपर श्रेडर असल्यास उत्तम, नसल्यास हाताने करा टीव्ही बघत), आंब्याच्या पेटीत कागदाचे। लहान रिबीन्स चे सॉफ्ट पॅकिंग असते ते, स्वयंपाक व डायनिंग मध्ये वापरलेले टिश्यूज हे सर्व तुकड्यात टाका.एक दोन वेळा खालपासून वरपर्यंत हलवा.जमल्यास कोकोपीट पावडर मागवून आणि गोमूत्र एक दोन झाकण टाका.पतंजली दुकानात किंवा मेडिकल मध्ये 60 रु बाटली मिळते.
एकदा उष्णता आली, ते कोरडं व्हायला लागलं की अळ्या आपोआप मरतील.(या अळ्या नवीन नवीन बघत असल्यास त्या स्वप्नात पण दिसतात.पण सवय झाल्यावर काही वाटत नाही.)

आभार

आता कोरडे झाले आहे आता अळ्या दिसत नाहीयेत .

पेपर तुकडे टाकले तर त्याच्या शाईचा काही परिणाम होईल ?

अजून एक प्रश्न
ओलसर वाटेल त्यावेळी कोरडी माती टाकली तर ?

काळा पांढरा पेपर असेल तर शाई म्हणजे बराचसा कार्बन.तितके चालते.फक्त आर्ट पेपर पुरवणी, कलर पेपर शक्यतो नको(मी इतके पाळत नाही, हाताने फाटणारा आणि भिजून चोळामोळा होणारा कोणताही कागद टाकते.)

मी कागद घालतच नाही. कोरडं करण्यासाठी आधी कोकोपीट घालायचे, आता हल्ली लाकडाचा भुसा आणते तो घालते. वाळलेला पालापाचोळा पण चालेल.

माझ्या कंपोस्ट बीन मध्ये घातलेले ओला कचरा सगळं वाळून जाते. मी पालेभाज्यांचे देठ जास्त करून घालते आणि झाडांची वाळलेली पाने १-२मूठ महिन्यातून एकदा. मध्ये मध्ये ताक घालूनही काही झाले नाही.बीन झाकलेली असते थोडी फट ठेऊन. आता तर बीन गच्च भरलेले आहे. काय करावे?

उन्हाळ्यात मी चहाचा चोथा कंपोस्ट मध्ये घालते. कारण कितीही कोरडे केले तरी थोडा ओलसरपणा राहतोच. पावसाळ्यात नाही घालत मग.
कंपोस्ट कोरडे होत असेल तर हे करून बघा.
आणि ओलेपणा जाण्यासाठी मला एकीने सांगितले की एक्स्पायरी झालेली किंवा जाळी धरलेली पिठं टाकायची. तेवढीच मनाला टोचणी कमी आणि कोरडेपणा यायला मदत होते.

हो हो.
आम्ही जाळी धरलेली पिठं, थोड्या पोरकिडे पडलेल्या डाळ्या, जुना चिक्का झालेला गूळ असं सर्व टाकतो कंपोस्ट मध्ये.
अगदी आदर्श कंपोस्ट होत नाही. पण कचर्‍यात शून्य ओला कचरा या धोरणाला मदत होते.
माझ्या २ कंपोस्ट पैकी एका बिन ममध्ये कंपोस्ट चांगलं तयार झालंय, पण एक झुरळ आहे आत. त्यामुळे भिती वाटते. कंपोस्ट बिन कायम बंद ठेवतो. त्या बिन ला खालच्या बाजुला अतिरिक्त कंपोस्ट टी वाहून जायला ३ मिलीमीटर ची भोकं आहेत त्यातून ते झुरळ बाळ असताना आत आलं असावं.
आता हिट मारावं तर कंपोस्ट चं इको फ्रेंडलीत्व नष्ट होणार. कंपोस्ट उघडून झुरळ बाहेर काढून मारायची हिंमत नाही असा तिढा झालाय.
काय करावं?

बिन उघडून आतल्या काठाच्या थोडं खाली लक्ष्मणरेखा ( किंवा तत्सम) खडूने पूर्ण गोल रेषा काढून पहा.
मी कीड लागलेलं धान्य की डाळ एकदा कंपोस्टमध्ये टाकल्यावर महा वैतागवाणे काळे किडे झाले होते. कितीतरी महिने भयंकर डोक्याला ताप झाला होता. त्यामुळे मी नाही टाकत तेव्हापासून असं धान्य. तेवढं खालच्या कॉमन ओल्या कचऱ्यात नेऊन टाकते.
@जयु, अगदी थोडं पाणी शिंपडून पहा. ओतायचं अजिबात नाही. हातावर घेऊन शिंपडायचं आणि मग ढवळायचं. असं रोज किंवा एक दिवसाआड करून पहा काही दिवस.

चालेल, हे लक्ष्मणरेखा चं लक्षात नाही आलं.
पण तोवर ते झुरळ हातावर चढलं तर?
एकदा हिंमत करावी लागणार आहे.किंवा तो पुठ्ठ्याचा झुरळ ट्रॅप असतो तो.

अगदी थोडं पाणी शिंपडून पहा. ओतायचं अजिबात नाही. हातावर घेऊन शिंपडायचं आणि मग ढवळायचं. असं रोज किंवा एक दिवसाआड करून पहा काही दिवस.>> करून बघते.
कंपोस्ट कोरडे होत असेल तर हे करून बघा.>> मी टाकते चहा पावडर मधे मधे. पण सगळंच वाळून जाते. माझा कंपोस्ट बीन ड्रायर झालाय. Happy जे काही टाका,ड्राय होते.

धन्यवाद.

पण तोवर ते झुरळ हातावर चढलं तर?>> हातमोजे घालून काम करा. हातावर चढले तर शांतपणे हात झटकता येतील आणि हातातले टाकून किंचाळत पळण्याचा प्रसंग टळेल Happy

कचरा कोरडा रहायला हवा की ओला? वरचे प्रतिसाद पाहून आता गोंधळायला झालं. म्हणजे काही म्हणतात कोरडाच रहातो, काही म्हणतात ओलाच रहातो. करू तर माती कशी करू नक्की? (आमच्या घरी कंपोस्ट बनवणे उपक्रम चालुये हे कळलं असेलच) Happy

ओके Happy
इथे ऊन फार त्यामुळे काही दिवसांनी रोज पाणी टाकावे लागणार.

आमचा कचरा ओलाच राहतो, कारण त्यात राहिलेल्या आमटीपासून खरबूज कलिंगड सालं असे अनेक जास्त द्रव असणारे आयटम पडतात.
६ महिने एका बाजूला ठेवल्यावर तो कंपोस्ट म्हणायच्या लायकीचा होतो.
हात्मोजे घालून लक्ष्मणरेखा.. बघते. घरात आहेत ते अफझलखान पंजा टाईप गार्डनिंग ग्लोव्ह.

बिन मध्ये खाली जमलेला कंपोस्ट टी नियमीत पणे काढून झाडांना भरपूर पाण्याबरोबर देतेय.त्याचा फायदा होतो असे दिसते आहे.कंपोस्ट कल्चर फार पट्पट संपते आहे. त्यामुळे सध्या पतंजली गोमूत्र, ताक असे काय वाटेल ते टाकून मिक्स करते आहे.
तमालपत्राला नवी पाने आली गुलाबी कोवळी.विड्याचा वेल चांगला वाढला.
३ स्ट्रॉबेरी आल्या. त्यातली १ आता मोठी झालीय.अर्थात हा फार पेशन्स चा भाग आहे. नर्सरी लाइव्ह ऑफर मध्ये मागवलेल्या ६ झाडांपैकी फक्त १ जगले (कारण अर्थातच आमचे दुर्लक्ष.)
1619584013721.jpg

बिन मध्ये खाली जमलेला कंपोस्ट टी नियमीत पणे काढून झाडांना भरपूर पाण्याबरोबर देतेय त्याचा फायदा होतो असे दिसते आहे.>>> हो हे मी पण पाहिल आहे . कंपोस्ट काही नीट बनत नाहीये . सगळा गिचका झालाय . पण त्यातल पाणी काढून बाटलीत भरून ठेवल होत. जवळमहिने३ महिने झाले , पालकाला अजूनही नवीन नवीन पान येतातेय . २-२ आठवड्यानी काढून हिरव्या चटणीत वापरते .
स्ट्रॉबेरी मस्त आहे , अनु .

बिन मध्ये खाली जमलेला कंपोस्ट टी नियमीत पणे काढून झाडांना भरपूर पाण्याबरोबर देतेय.>>>>मी अनु,तुमच्या कम्पोस्ट बीनचा फोटो टाकाल का?
मलाही सुनिधी सारखाच प्रश्न पडलाय!

आमचे असे २ आहेत
https://mygreenbin.in/product/grc-50-frp-50-ltr-set-2-nos-with-10-ltr-mi...
(आम्हाला पिंपरी चिंचवड, सोसायटी, स्मॉल बिझनेस असे बरेच डिस्काऊंट एकत्र करुन ५६०० ला २ मिळाले होते, ३ वर्षं झाली.)
किंमत जास्त आहे पण क्वालिटी चांगली.एफ आर पी(कार बॉनेट बनते ते) मटेरिअल आहे.कमी कचरा असेल तर २ ऐवजी १ घेऊ शकतो. त्याच्या १इंच बेस ला खालच्या बाजूला कंपोस्ट टी साचतो. तो काढायला लहान छिद्रे आणि १ नळ आहे. बिन कलता करुन किंवा पुर्ण लिक्वीड भरले असल्यास नळ सोडून कंपोस्ट टी निघतो.

बडोदा मध्ये डॉक्टर सुमित दाबके पण बिन विकतात, कन्सेप्ट बायोटेक ब्रँड मध्ये.त्यांचे इको ब्रिक पासून बेंच वगैरे बरेच चांगले उद्योग चालू असतात.
http://www.conceptbiotech.org/products.html

बाकी छोट्या साईझ चा बिन हवा असेल तर ट्रस्ट बास्केट, डेली डंप बर्‍याच कंपनीज चे स्वस्तात आहेत.
छोट्या बारीक जाळीची लाँड्री बॅग/मोठी कुंडी/पाणी साठवणीचे खालून तुटलेले निकामी पिंप हेही वापरता येईल कंपोस्ट ला. ठराविक बिन हवाच असे नाही.

बीन्स छान आहेत.पण जागेअभावी नाही घेऊ शकणार..मागे छोटा डबा ठेवला होता.त्यातले ओलसर खत झाडांना घातल्यावर बुरशी आली होती.त्याआधी केळीची साले सुकायला मगमधे ठेवली असता कावळ्याने तो मग उपडी केला.नशीब माझे की सर्व काही कुंड्यात पडले,नाहीतर खाली जाऊन साफ करायला लागले असते.

सध्या एक छोटासा डबा ग्रीलमधे ठेवलाय .बघते त्याच्यातच काय झाले तर!

एक रिकामी कुंडी घेऊन त्यात चालू करता येईल. गॅलरीतच इतर कुंड्यांच्या जागी ठेवायची.आणि कंपोस्ट कल्चर थोडं आणून ठेवायचं. मध्येमध्ये मिसळत रहायचं.
कुंडी भरत आली की त्यात मेथी/ धने/ आवडत्या बिया पेरुन झाड तयार करता येईल.
मग दुसरी कुंडी अश्याच प्रकारे तयार.
घरात तेल/मसाले यांची प्लस्टिक मोठी बरणी असेल तीही वापरता येईल.खाली २-३ भोकं पाडून.
काही जणांनी ग्रो बॅग्स (म्हणजे झाडं लावायलाच, पण थोड्या दणकट पिशव्या) किंवा गोणपाट पोत्यातही कंपोस्ट केलेय. फक्त खाली मोठी डिश ठेवावी लागेल.

Pages