चित्रं!

Submitted by जीवनगंधा on 26 April, 2018 - 01:09

काही काही चित्रं असतात… स्वप्नांमधली.. आठवणींमधली.. ती असतात आपल्याबरोबर. नेहमी. त्यांचं असणंही पुरेसं असतं कधी कधी, दिलासा द्यायला, दिशा द्यायला...

रात्री झोपताना असंच एक चित्र हल्ली बऱ्याच वेळा माझ्या डोळ्यासमोर येतं...

...चांदण्यांनी भरलेली रात्र असते. दुधट, शुभ्र प्रकाश सगळ्या आकाशात भरून राहिलेला असतो. डोक्यावर लांबवर दिसणाऱ्या त्या आकाशाकडे, त्यातल्या असंख्य ताऱ्यांकडे बघत मी आमच्या घराच्या मागच्या अंगणात उभी असते. एकटीच. बराच वेळ.
मग अचानक आकाशातल्या त्या शुभ्र चांदण्यांचा चुरा अगदी अलगद खाली बरसायला लागतो...
परीकथेतली परी, चांदणी लावलेली जादूची कांडी घेऊन, एकदम अचानक अवतरते, तेव्हा जसा प्रकाशाचा झोत येतो, तसाच शुभ्र झोत मग आमच्या अंगणात येतो. तो शुभ्र प्रकाशझरा आणि त्यातला थोडा चांदणचुरा, हळूच माझ्या मनात झिरपतो. त्या थंडाव्यामध्ये सुकून असतो. प्रसन्नता असते. रोजच्या त्याच त्या चक्रात फिरून गरगरलेलं डोकं, सुकलेले डोळे, हळूहळू निवायला लागतात....

हे चित्र मनासमोर रंगवताना अनेकदा मला नकळत झोप लागून जाते. मनाविरुद्ध गोष्टी घडत राहतात, तेव्हा मनासारखी चित्र मनातल्या मनात रंगवत राहण्याची कला फार उपयोगी ठरते.

अजून एक चित्र आहे आठवणीमधलं... yellow stone national park ला गेलो तिथलं.. निसर्गाचं काही आगळंच रूप आहे तिथे. तर तिथल्या एका हिरव्यानिळ्या डोहाच्या काठावर आम्ही उभे होतो. खाली दिसणाऱ्या त्या खोल डोहामध्ये एक वाफाळतं, सुंदर हिरवं-नीळसर द्रव्य दिसत होतं. काहीसं गूढ. पण रम्य. रहस्य कथेतलं वाटावं असं. त्या डोहाकडे पाहिलं आणि क्षणात एक अनामिक ओढ जाणवली. वाटलं, ह्या क्षणी उडी घ्यावी डोहात आणि जवळून पाहावं काय आहे त्यात...
अज्ञाताचं उगीच आकर्षण... तीव्र...
माझा भाऊ होता त्यावेळी बरोबर. त्याला म्हटलं, "अरे, कसं दिसतंय हे! उडीच मारावीशी वाटली मला एकदम…"
तो पट्कन म्हणाला, "हा हा! वाटतंच तसं! पण सांभाळून. क्षणात संपेल सगळं. पृथ्वीच्या पोटातलं रसायन आहे ते.."
मला वाटलं होतं, तो मला वेड्यात वगैरे काढेल, पण त्याचं असं उत्तर अनपेक्षित होतं! म्हणजे त्यालाही असं कधीतरी वाटून गेलेलं होतं तर! पण त्याच्या त्या उत्तरात, मला अचानकपणे त्यावेळी माझ्या मनात सुरू असलेल्या गोंधळाचं उत्तर सापडल्यासारखं वाटलं! अशा एखाद्या वेड्या क्षणी, मनाला आवर घालणंच योग्य असतं, त्या क्षणी कितीही अवघड वाटलं तरीसुद्धा... खरं जगावेगळं असं काहीच तत्त्वज्ञान नव्हतं त्यात, पण मनाचा वेडेपणा असतो, असंबद्ध वाटणाऱ्या गोष्टीतही आपण संबंध जोडत राहतो, आणि उत्तरं शोधून स्वतःलाच समजावत राहतो... तर त्याच सुमाराला झालं असं होतं की एका मित्राबरोबर बिनसलं होतं. म्हणजे खर तर कायमचं बिनसू नये, म्हणून आम्हीच काही काळ संपर्कच थांबवून टाकू असं ठरवलं होतं. पण बोलणं थांबलं, म्हणून आठवणी संपत नाहीत. भेटीची आस कमी होत नाही. एवढ्या वर्षांची मैत्री, जिव्हाळा, रात्रंदिवस नुसता घोळत राहायचा मनात. कित्येक क्षण यायचे.. एखादी ओळ लिहावी.. आपणच केलेला निश्चय आणि दुखावलेला स्वाभिमान, सगळं बाजूला सारून, पुन्हा एक phone, email टाकावं, असं वाटायचं.. एक तीव्र ओढ.. दुखरी सल... भेटीची आस.. अज्ञाताचं उगीच आकर्षण... पण अशा क्षणी, कितीही अवघड वाटलं तरीसुद्धा, मनाला आवर घालणंच योग्य असतं, हे पुन्हा एकदा तीव्रतेनं जाणवून दिलं त्या चित्रानं. त्याअनुषंगाने झालेल्या बोलण्यानं. त्यामुळे ते चित्रच मनात कोरलं गेलं.

जेव्हा केव्हा ते दुरावलेलं मैत्र सलत राहतं, आमच्यातलं अंतर बोचत राहतं, तेव्हा आणखी एक चित्रंच सावरायला येतं...
... दूरवर कुठेतरी अवकाशात एक मोठ्ठ प्रतल असतं.. असंख्य बिंदूनी बनलेलं.. विस्तृत आणि एकसंध. त्यावरच्या प्रत्येक बिंदूला स्वतःच असं अस्तित्त्व असतं, पण ते वेगळं काढून दाखवता येत नाही! त्याच प्रतलावर एकेक बिंदू आहे असतो, माझा, त्याचा.. आम्ही बोलत नाही. संपर्काच्या कुठल्याच माध्यमातून प्रत्यक्षात आम्ही जोडलेलो नाही… पण तरीही आम्ही जोडलेलो असतो! कायम. त्या प्रतलावरचे दोन बिंदू म्हणून… शब्द, स्पर्शाच्या पलीकडच्या कुठल्यातरी घट्ट नात्यानं….
एखादा एखादा दिवस असा येतो.. कधी काही मिळवल्याचा, कधी सांत्वनापलीकडच्या दुःखाचा, कधी कोणत्या विलक्षण आणि अनपेक्षित अनुभूतीचा, की अशी संग सुटलेल्यांची तीव्र आठवण येत राहते. दिवस जातो. रात्र जात नाही. मग पलंगावर पडल्या पडल्या त्या प्रतलाचं चित्र डोळ्यासमोर येतं! सलग, एकसंध.. कायम सगळ्यांना जोडून ठेवणारं....

अशी किती चित्रं! कधी कल्पनेत रंगवलेली... काही आठवणीत जपून ठेवलेली...

एकदा एका दुपारी, अगदी न ठरवता एक सुंदर मैफिल जमून आली. वाजवणारा एक आणि ऐकणारे आम्ही दोघंच! एक मित्र अनेक वर्षांनी घरी आला. पूर्वी तो बासरी शिकायला जात असे. ती साधना अजूनही चालू आहे कळल्यावर आम्ही उत्साहानं ऐकायला बसलो.
"जे सूर कानावर येतील ते 'मी' वाजवत आहे, हे विसरून जायचा प्रयत्न करा आणि ऐका." असं म्हणून त्यानं वाजवायला सुरुवात केली.
मी डोळे मिटले आणि कुठून, कसं ते माहीत नाही, पण अचानक एक चित्र मनात तरळलं....
... नदीच्या काठावर मी उभी होते. समोर नदीचं विशाल पात्र होतं..
वेगानं वाहणारं पाणी… दुपारची वेळ… लख्ख ऊन..
मंदिरापासून नदीकडे उतरत जाणाऱ्या अनेक पायऱ्यापैकी एका पायरीवर मी उभी होते... समोरच्या पाण्याकडे, पलीकडच्या काठावरच्या झाडांकडे पाहत..
काही वेळानं हळूच वाऱ्याची एक झुळूक आली. मग आणखीन एक… मग दुसरी, तिसरी…
किती सुंदर होतं ते वातवरण! भाजणारं ऊन नाही, बोचणारा वारा नाही. गार हवेच्या मंद हलक्या झुळूका. दुपारच्या वेळी येणाऱ्या. आणि बासरीचे सूर त्या प्रत्येक झुळुकेबरोबर जणू वाहत येत होते…
मनासमोरचं ते दृश्य सुंदर की कानावर पडणारे ते सूर? की दोन्हीचं एकाच वेळी एकाच ठिकाणी असणं? भान हरवून मी ते अनुभवत राहिले. कितीतरी वेळ…..
..... भानावर येऊन डोळे उघडले, तर समोर दिसणारं प्रत्यक्षातलं दृश्यही किती आल्हाददायक होतं! घराच्या खिडकीतून समोर एक झाडं दिसत होतं… पारंब्यांसारख्या दिसणाऱ्या त्याच्या अनेक कोवळ्या हिरव्या फांद्या, अन त्यावरची पोपटी पालवी वाऱ्यावर हलकेच लहरत होती. मागे स्वच्छ निळं आकाश, लख्ख ऊन आणि प्रकाशमान झालेले एकदोनच शुभ्र पांढरे ढग… किती देखणी चौकट होती! त्याकडे नजर लावून मी निवांत बसले होते, समोर आमचा मित्र तल्लीन होवून बासरी वाजवत होता! मी भाग्यवान आहे, असं क्षणभर माझं मलाच वाटून गेलं… इतकी सुंदर खिडकी असलेलं ते घर माझंच होतं! इतकं सुंदर वाजवणारा तो, माझाच जिव्हाळ्याचा मित्र होता आणि हा सगळा विलक्षण अनुभव, माझ्याबरोबर आणि माझ्याइतक्याच उत्कटतेनं अनुभवायला, माझा नवरा माझ्याबरोबर होता… ती मैफिल रंगली नसती तरच नवल होतं. हळूहळू सुरांची लय वाढत गेली. त्या सुरांनी सगळं घर भरून टाकलं. मन भारून टाकलं. उत्कंठापूर्तीच्या समेच्या त्या एका क्षणी, शब्दात पकडता न येण्यासारखं असं, काहीतरी गवसल्यासारखं वाटलं...
आणि ती चित्रं... एक प्रत्यक्षातलं आणि दुसरं, डोळे मिटल्यावर मनात तरळलेलं, त्या साध्याशाच पण अतिशय सुंदर अशा अनुभवाची आठवण म्हणून कायमची मनात कोरली गेली आहेत. संचित बनून राहिली आहेत!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, प्रतिक्रियेबद्दल Happy
गुलमोहरच्या मुख्य पानावर हा लेख का दिसत नाहीये? मी लेख टाकताना काही setting राहिलं असावं का?

dear admin
गुलमोहर -> लेख ह्या मध्ये हा लेख का दिसत नाहीये? माझ्याकडून काही setting राहिले असल्यास कृपया कळवावे, किंवा लेख तिकडे हलवावा ही विनंती. फक्त गुलमोहर -> गद्यलेखन मध्ये दिसत आहे.

धन्यवाद स्वाती२

छान लिहीलाय लेख...
(अ‍ॅडमिन नक्की ईथली विनंती वाचुन बदल करतील Light 1 )