जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_5

Submitted by अन्नू on 6 April, 2018 - 13:15

वर्ष संपत आलं होतं. एग्झामच्या प्रिपरेशनचं ओझं डोक्यावर पडायला लागलं होतं. आमची नोट्स पुर्ण करायची धडपड चालू झाली होती. त्यात इकोचे प्रोजेक्ट डोकं खात होतं. वेळेत पुर्ण केलं तर ठीक. नाहीतर त्याचे मार्क्स कट! त्यामुळे लायब्रेरित बसून अभ्यास करायचं प्रमाण वाढलं होतं. निदान दीड तास तरी लायब्रेरित घालवायचाच असा अलिखित नियम बनला होता. याच दरम्यान आमचा क्लासमेट्सचा एक कंपू तयार झाला होता. आणि याच कंपुत भर पडली होती ती एका नव्या मुलीची- मितालीची!

हो- तीच ती गोरी-गोरी पान..!!

नाही नाही. यावेळी ती म्युझिक वगैरे वाजत नव्हती. तर ती चांगली मैत्रीण झाली होती. बोला-चालायला चांगली होती. मुली म्हणून कंपूत जे अवघडलेपण असते ते हिच्याबाबतीत कधी जाणवलं नाही. कोणत्याही ग्रुपमध्ये ही तितक्याच सहज मिसळून जायची. तीच्या बोलण्यात एक मॅच्युअरपणा होता. समजुतदारपणा होता. महत्त्वाचं म्हणजे, हिच्याबाबतीत तो मुला-मुलीचा वाद- मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ असं कधी जाणवलंच नाही. इव्हन एकदा तर मी तिची टर उडवण्याकरता म्हणालो देखील होतो की-

‘बरं झालं तू रक्षा बंधनला आली नाहीस. नाहीतर मला धरून तू राखी बांधली असतीस!’

तर ती तितक्याच निर्विकार अन सहजपणे बोलली होती,

‘घाबरु नकोस, मला ती सवय नाही. आणि मुळात राखी बांधल्याने असा काय फरक पडतो मला समजत नाही. मी जर एखाद्याला राखी बांधली आणि त्याच्या मनात माझ्याविषयी त्या भावनाच नसतील तर, त्या राखीचा काय उपयोग?

उगीच कोणी आवडत नाही म्हणून त्याला जबरदस्तीनं राखी बांधून भाऊ बनवायचं का? इतर मुलीं करत असतीलही असं. पण वेड्यासारखं दुसर्‍यांना राखी बांधत सुटणं मला तरी पटत नाही!’

तीच्या उत्तराने मी अवाक् झालो होतो. त्यावेळी प्रथमच मला तीचा वेगळेपणा जाणवला होता. नंतर अशा कित्येक प्रसंगांनी तो जाणवत राहीला.
हिच्याबरोबर कोणत्याही विषयावर वाद घाला. प्रत्येक विषयात ती समोरच्याला अगदी पद्धतशीरपणे गारद करणार. आणि मुद्देही असे मांडणार की कोणी ते खोडून काढूच शकणार नाही.

एकदा असंच बोलताना सहज विषय निघाला- मी म्हणालो, ‘शिवाजी महाराज हे चित्रात दाखवतात तसे मुळीच नव्हते. त्यांची उंचीही खुपच कमी होती- नाही?’
बस्स!
या वाक्यावर तीने जवळ-जवळ अर्धा तास माझी खरडपट्टी काढली! अफजल खानाच्या उंचीपासून सुरवात करुन शिवाजींची उंची किती होती हे तीनं अगदी फूट-सेंटीमिटर- इंचने सिद्ध करुन दाखवलं! शेवटी हात जोडत मीच माघार घेतली. इतिहास तीच्या तोंडपाठ होता. त्यात मी तीचा हात कधीच धरु शकत नव्हतो. तसं इतरही विषयाचं ज्ञान तीला होतं. ज्यात नव्हतं, ते ती अगदी सहज कबुल करत होती.

याच मितालीने नंतर माझ्या मनातले मुलींबद्दलचे अनेक गैरसमज दूर केले. मैत्रिणीचा खरा अर्थ सांगितला आणि मुलींच्या एका वेगळ्या विश्वाची, स्वभावाची ओळखही करुन दिली!

त्या दिवशी आम्ही चौघेजण साडे अकरापर्यंत लायब्रेरीमध्ये थांबलो होतो. कॉलेजची बहुतांश मुलं-मुली घरी गेली होती. उरलेली टाईमपास म्हणून इकडे-तिकडे उंडारत होती. काहीजणांनी लायब्रेरीच्या विंडोजवळ पुस्तकासाठी गर्दी केली होती.
बरोबर अकरा पस्तीसला आम्ही बॅगा आवरायला घेतल्या. मिताली तोपर्यंत वॉशरुमला गेली. जाताना तीने पर्स तशीच आमच्याजवळ ठेऊन दिली. त्याच्यावर मग माझा मित्र आणि मी उगीच चेष्टा मस्करी करु लागलो. ‘गरम मसाला’ सिनेमातल्या जॉन-अक्षय सारखे आमचे संवाद सुरु झाले.

“अरे!! ये.. तेरी है?” मध्येच त्यानं आश्चर्यानं पर्स उचलत विचारलं-

“ह्.. हाँ! ये- म्-मेरी पर्स है!.. वो लडकीयों जैसी दिखती है, लेकीन लडकीयोंकी नहीं है... ज्-जेंट्स की है.. इसमें मै स्-सब रखता हूँ.. कंगी- ब्रश- ब्लेड- शेविंग क्रिम, नॅपकीन, नेलकटर..”

आमचं हे चालू असताना जवळच बसलेल्या काही मुली आमच्याकडे बघत खुदखुदत होत्या. इतक्यात ती आलीच.

“हे काय चाललंय?” निर्दयपणे तीच्या पर्सची ओढाताण बघून तीनं बारीक नजरेनं आमच्याकडे बघत विचारलं.

“हे.. आ.. आपलं.. तु.. तुझी प्-पर्स याला खूप आवडली ना, म्हणून हा बोलतोय मलापण अशीच पाहिजे!!” पटकन पर्सचा बेल्ट सोडत (निष्ठूर) मित्र बडबडला. तीनं संशयानं माझ्याकडं बघितलं, “प्.. प्रेझेंट द्यायला!”

गडबडत मी स्वत:ला सावरलं. काही न बोलता तीने पर्स तशीच बाजुला सारली.

“मिताली, तुला भीती नाही वाटत का गं?”

“कशाबद्दल?”

“अगं- पर्स अशीच इथे ठेवून गेलीस. आम्ही काय काढून घेतलं असतं तर मग?”

“का?!!”

बावळट्ट! क्षणात तीने मला बावळट ठरवलं होतं. आता ‘का’- याचं काय उत्तर देणार मी?

“अगं, म्हणजे पैसे, सोने, दागीने काही महत्त्वाचं असलं तर-”

“काही नाहीए, मोकळी आहे ती!”

“पैसे पण नाहीत?” मी उगीच भल्या मोठ्या फुगलेल्या तीच्या पर्सकडे बघत विचारले.

“हं. दीडशे रुपये असतील फक्त”

“हा! मग- तेच काढून घेतले असते तर?”

“घेऊन काय करणार?”

“पार्टी करु, खाण्यावर उधळू, नाहीतर वाटून घेऊ- काय रे?” मी मित्राकडे बघितलं तशी त्यानेही संमतीने मान डोलावली.

“असं? मग घ्या!” तीनं पर्स पुढे ठेवली आणि मित्राचा आणि माझा चेहरा उभ्या- गोल- आडव्या- कशाही शेपमध्ये फिरायला लागला. आंम्ही मख्खासारखं तिच्या तोंडाकडे बघत राहीलो.

“घेतले असते मी म्हणतोय!” मी उगीच स्पष्टीकरण देत बोललो.

“मीही तेच म्हणतेय तुम्ही घेणारच नाही!”

“का?”

“अरे तुम्ही दीडशे रुपये बघितले नाहीत का कधी? की तुम्हाला भेटलेच नाहीत, यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला घरी देत असतील! आणि देत नसले तरी तुम्ही चांगल्या खात्यापित्या घरचे आहात. तुमच्या सगळ्या बेसिक गरजा पुर्ण होत आहेत. प्रत्येक सणाला- निदान वर्षाला नवीन कपडे मिळतात.

आता चोरी कोण करत, ज्याला गरज असते तो!- पण तुम्हाला तर अगोदरच सगळं मिळतंय, तुम्ही या दीडशे रुपयेसाठी हावरापणा कराल का? नाही ना- मग? करायचंच नसलं तर उगीच बोलून कशाला दाखवता?”

“ठिक आहे खरंच घेतो आता- दे!” चिडीला येऊन मी उद्गरलो.

“घे!” ती थंडच! “घे-घे माझी फुल्ल परमिशन आहे. मला लागणारही नाहीत ते पैसे, तूच घेऊन टाक!”

“आणि तू कशी जाणार?”

“मी सुनिलला कॉल करेन, तो पिकअप करेल मला!”

“राहू दे नाहीतर. उगीच कशाला. सोने हिरे असते तर विचार तरी केला असता. याचं काय करु मी? नेक्स टाईम!” मी ऐटीत म्हणालो. ती विजयी हसली.

जाण्यासाठी उठत तीने पर्समधून पाण्याची बाटली काढली.

“तुला हवंय?”

“नको-” मी मान डोलावली. तीनं झाकण काढलं. बाटली तोंडाला लावली. “मी मघाशीच पिलं” मी स्पष्टीकरण देत म्हणालो आणि पाण्याचा घोट घेता-घेता ती मध्येच नापसंतीदर्शक हुंकारली!

“ह्म्म...!.... हे पिल्लं काय असतं रे?” गडबडीत पाणी गिळत ती आठ्या पाडत म्हणाली “ – प्या-य-लो असं नीट म्हण!”

“हो?” मी उगीच डोकं खाजवलं.

“पण त्याला ‘पिलं’ असंपण म्हणतात, मी कुठेतरी कादंबरीत वाचलं होतं”

“नाही!” ती ठामपणे उद्गरली. “पिल्लं हा शब्दच नाही कुठे”

झक मारली अन् शिक्षिकेच्या नादाला लागलो असं झालं!
काही न बोलता मी सरळ आपली बॅगेतली गोळ्याची डबी काढली. झाकणात चार गोळ्या काढून घेऊन तोंडात टाकल्या.

“अय्या! होमिओपथीच्या गोळ्या का?” (हीला चेकळायला काय झालं?)

मी विचित्रपणे तीच्याकडे बघत मान डोलावली.

“मलापण दे न”

“अगं, ह्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आहेत मला केसावरच्या. त्या कोणीही खायच्या नसतात”

“माहीत आहे रे, तू दे तर खरं- काही होत नाही. मी एकदा खाल्ल्या होत्या. मस्त गोड लागतात” जिभळ्या चाटून ‘चट्ट’ असा आवाज काढत तीने माझ्यापुढे हात धरला.

“हातावर नाही घ्यायच्या- हे असंच घे” मी तीच्याकडे डबी दिली. तीनं ती घेत माझ्यासारख्याच, झाकणात चार गोळ्या काढून घेतल्या-

“हे असं खायचं ना?”

“ह्म्म” मी मान डोलावताच तीने झाकणातल्या गोळ्या तोंडात टाकल्या.

“व्वा! मस्त आहेत!” लहान मुलासारख्या भुवया उडवून दाद देत ती उद्गरली.

“चावून खायच्या का?”

“नाही- चूकून”

“चूकून??” तीनं आलीबाबाच्या काळातल्या प्राण्याला बघावं तसं माझ्याकडे रोखून बघितलं. (ही सदानकदा अशीच का बघत असते मला?)

“अगं- चूकून. म्हणजे.. चू-कू-न!- चावायच्या नाहीत, असंच..”

“चूपून म्हणातोयस का?”

आता भंजाळायची वेळ माझी होती.

“चोपून?”

तीनं डोक्यालाच हात लावला.

“चोपून नाही रे. चू-पू-न! त्याला चूपून खाणं म्हणतात” (या मस्तरणीला चूका दाखवण्याशिवाय चैन पडत नाही का?)

ती हसायला लागली. मी आपला खांद्यावर क्रॉस बॅग घेत लायब्रेरिच्या बाहेर आलो.

“ए थांबा हं जरा, मी पुस्तक चेंज करुन आले”

तीच्या वाक्याने आम्ही तिघेही थबकलो. लायब्रेरिच्या विंडोजवळ मरणाची गर्दी असताना हीचा नंबर कधी यायचा?

“ए अगं मिताली- गर्दी किती आहे? तास जाईल इथेच. नको- त्यापेक्षा आंम्ही जातो, तू थांब” कंटाळत भूषण म्हणाला

“हो बरोबर” मीही त्याची रि ओढली.

“थांब रे, आले लगेच” आंम्हाला गप्प करत ती पटापट चालत गेलीसुद्धा. पुढे जाऊन तीने एकदा गर्दीवरुन शेवटपर्यंत हीSS.. अशी नजर फिरवली. मग घोळक्यातनं नेमका ओळखीचा चेहरा शोधून काढावा, तसं सेकंड नंबरवरच्या मुलाकडे बघितलं आणि सरळ त्याच्यासमोरच जाऊन ठेपली! तीनं त्याला आवाज देताच तो ओळखीच हसला. हालचाल विचारावी तशी ती त्याच्याशी काहीतरी बोलू लागली. तोही तीला काहीतरी सांगू लागला. मग त्याचा नंबर येताच तीनं हातातलं जाडजुड पुस्तक त्याच्याकडे दिलं. त्यानं तीला ते बदलून दिलं. तोंडभर हसून तीनं त्याचा निरोप घेतला आणि अवघ्या एक मिनिटाच्या आत बया दुसरं पुस्तक घेऊन आमच्यासमोर हजर झाली!

“ओळखीचा होता का?”

“नाही रे”

“मग? पुस्तक कसं काय लगेच घेऊन दिलं?”

“मी त्याला सांगितलं दे. त्यानं दिलं!”

“असंच?”

“हो” आम्ही तिघेही बावळट चेहरा करुन एकमेकांकडे बघू लागलो. उगीच डोक्यावर दोन कान आणि मागे शेपूट हलत असल्याचा भास झाला. इतक्यात मी खाऊ की गिळू अशा नजरेनं त्या उपकारकर्त्या प्राण्याला बघून घेतलं. हेच जर का माझ्यासारखा एखादा सालस मुलगा(!) गेला असता, आणि त्याला पुस्तक देण्याविषयी विनंती करुन बोलला असता तर त्याने आम्हाला पै ची भीक घातली नसती. पण तेच एक मुलीनं सांगितलं म्हटल्यावर लगेच याची दया माया उतू आली!

दात-ओठ खात मी मित्रांबरोबर पायर्‍या उतरु लागलो. लॉनवरुन चालताना तीने हातातली बॅग तपासली.

“तुझं पुस्तक माझ्याकडे आहे रे, मी तुला उद्या देणार आहे.” तिने परत एकदा आठवण ताजी करुन दिली.

“अगं हो! किती वेळा सांगणार आहेस?”

“हो रे राजा, पण आता थोड्या वेळानं विसरशील आणि घरी गेल्यावर शोधत बसशील- म्हणून सांगितलं, एवढंच” ती समजुतीच्या सुरात म्हणाली.

“राजा?.. हॅ!! माझं नाव काय राजा नाही.” मी बुचकळ्यात पडत म्हणालो.

“अरे ती बोलायची पद्धत असते, राजा!” ती हसत म्हणाली.

‘अच्छा-अच्छा ते सोन्या-राजा त्यातलं विशेषण का!’ माझ्या डोक्यात लेट करंट लाईट पेटली.

“तुझी बर्थडेट काय ग?” मध्येच डोकं खाजवत मी विचारलं.

“का?”

“नाही, म्हणजे अस्सचं” मी अडखळत म्हणालो.

“नाईन्टीन एटी ***” हसून ती म्हणाली आणि नेहमीप्रमाणे मी हाताची बोटे मोजू लागलो. मी काय करतोय हे ओळखून पुन्हा ती माझ्याकडे बघत हसली.

“दोन वर्षांनी मोठी आहे मी तुझ्यापेक्षा!” माझ्याकडे पाहत ती म्हणाली आणि मी दाताखाली जिभ चावली!

बोलता बोलता आंम्ही कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडत एस एन कॉलेजच्या रोडवरुन पुढे आलो. चौकात चंदूने आमचा निरोप घेतला. मितालीला काही भाज्या घ्यायच्या होत्या म्हणून भूषण आणि मी तिच्याबरोबर रस्ता क्रॉस करुन पलिकडे आलो. चालताना तिच्याबरोबर आमचे बोलणे चालूच होते. त्या बोलण्यातून आंम्हाला तिच्याबद्दल अनेक गोष्टी कळल्या. त्यातच आंम्हाला तिने तिच्या अलिबागच्या जमिनीच्या वादाबद्दल सांगितलं. त्यांच्या नात्यातला कोणीतरी चुकीचे कागद बनवून त्यांची जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यात मितालीने हस्तक्षेप करुन वडीलांना सावध केलं होतं.

“अरे वा! तुला जमिनीच्या कागदांमधलं समजतं तर”

“आपण सुशिक्षित आहोत, निदान आपल्याला तरी हे कळायलाच हवं ना”

मी नुसतीच मान डोलावली. पण तिच्या गावाबद्दल मला भलतीच उत्सुकता जागी झाली.

“काय गं, अलिबागच्या लोकांना अक्कल नसते का?” मी सहजच एक बालिशप्रश्न केला आणि-

“काय..??” जवळजवळ किंचाळतच तीनं माझ्याकडे नजर टाकली. माझ्या प्रश्नाने भलताच अर्थ निघाल्याने काही वेळ मीपण बावचाळलो.

“म्हणजे.. त्यांना मुंबईची माहीती नसते का?” आवंढा गिळत तोच प्रश्न शक्य तितका हलका करत मी म्हणालो.

“नाही तर! तुला कोणी सांगितल असं?” मघाचा तिचा त्वेष काहीसा निवळला. निदान आवाजावरुन तरी तसा भास होत होता.

“अगं ते कोणीही फसवायला लागल्यावर नाही का बोलत, ‘मी काय अलिबागवरुन आलो नाही!’ ” माझ्या या उत्तरावर ती खळखळून हसली.

“अरे त्याचा अर्थ अलिबागचे अडाणी असतात असाच नाही काही होत, वेड्या.” ती हसत म्हणाली.

“असं का?” मीही विषय सोडला. खरं तर तिच्या या बोलण्यावर एक वाक्य तिव्रपणे माझ्या तोंडातून बाहेर येणार होतं, की-

'इथे तरी त्याचा अर्थ अलिबागचे सगळे बिनडोक असतात असाच घेतात, वेडे!' पण पुढच्या घटनांची भयानकता लक्षात घेत मी माझ्या त्या प्रश्नाची तोंडातल्या तोंडातच वाचा बंद केली!!

आत्तापर्यंत तीच्या संसारासाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू माझ्या जोडीदाराच्या हातात आल्या होत्या. त्यात बटाटे, पालक, शेपू, कोबी, भेंडी, मेथी या स्वस्तूंचा समावेश होता. या पिशव्या वागवत मग आमची वरात तिच्या मागून स्टेशनला पोहोचली.

“हा पप्पा..” मध्येच फोन उचलत तीने मला थांबण्याचा इशारा केला.

तीच्या पप्पांना जागेचे कागद घेऊन कुठेतरी ऑफिसात जायचं होतं. इकडेतिकडे भटकण्यापेक्षा पप्पांना समजावत तीने ही जबाबदारी स्वत:कडे घेतली.
यासाठी कोणाला भेटायला लागेल. आणि प्रकरण कसे हाताळावे लागेल हे तीने तीच्या पप्पांना समजावून सांगितले. मग ‘तुम्ही थांबा. मी आल्यावर आपण जाऊ’ असं सांगत तीने फोन ठेवला.

“काय- पप्पा होते?”

“हो. मी मघाशी सांगितलं ना- त्या जागेचंच काम आहे- त्यासाठी वकीलांना भेटायचं आहे. मी म्हटलं वकीलाला पैसे देण्यापेक्षा आमचे एक ओळखीचे गृहस्थ आहेत त्यांना अगोदर भेटू, बघू काय सल्ला देतात” ती स्पष्टीकरण देत म्हणाली.

“ह्म्म्.. मग काय- आमचा आवाज ऐकला असता तर रागावले असते का?” मध्येच तीची खेचत मी म्हणालो.

“का?”

“तू कोणा मुलांबरोबर फिरते आहेस असं वाटलं असतं ना त्यांना!”

आम्ही हसायच्या आत तीच आम्हाला वेड्यात काढत खदाखदा हसायला लागली!

“असं कसं रे तुम्ही सगळ्यांना एकसारखं समजता? सगळ्यांचे वडील काही हुकूमशहा हिटलर नसतात आणि तसेही ते माझे पप्पा आहेत, ते का असं वाटून घेतील बरं? त्यांना आत्ता जरी कळलं की मी कोणाबरोबर आहे, तरी ते काही बोलणार नाहीत. कारण त्यांनी आम्हाला आमची स्पेस, आमचं फ्रिडम दिलं आहे. ते इतरांसारखं आम्हाला कधी- बंधनात ठेवत नाहीत. हे वातावरण पहिल्यापासून आमच्या घरात आहे. तिथे मुलगा मुलगी, हा कमी हा जास्त- असा कधी फरकच केला गेला नाही. मी आजही त्यांचा मुलगाच आहे. एव्हन मुलापेक्षा जास्तच! म्हणूनच तर, बाहेरचे सगळे व्यवहार ते माझ्यावर सोपवून निश्चिंत असतात.

आता हेच बघ ना- तू म्हणालास पप्पा रागावतील. पण मला खात्री आहे- ते एका शब्दानंही मला असं विचारणार नाहीत की ‘ही मुलं कोण आहेत’ किंवा ‘कुठली आहेत’. कारण त्यांचा माझ्यावर पुर्णपणे विश्वास आहे.. खात्री आहे की- त्यांची मुलगी कधी चुकीच्या संगतीने- चुकीच्या मार्गाने जाणार नाही. चुकीचं पाऊल टाकणार नाही. आणि मीही त्या लिमिट्स ओळखते. तशी वागते. म्हणून तर आमच्यात छान अन्डरस्टँडींग आहे. आता हेच सुनीलच्या बाबतीतही लागू पडतं. आणि म्हणूनच आमचं जमून आलं ना- काय?

चल निघते मी. उद्या भेटू. आज मला जरा बाहेर जायचं आहे, उशीर होतोय- ह्म? बाय!”

हसून तीने आमचा निरोप घेतला. खांद्यावरची पर्स नीट करुन भाज्यांच्या पिशव्या संभाळत ती रस्ता क्रॉस करुन स्टेशनच्या दिशेनं चालत राहिली. मी स्तब्धपणे तीच्याकडे एकटक पहात राहीलो. एका मुलीचं आज एक नवं रुप मला पहायला मिळालं होतं. त्यात एक जबाबदार मुलगी होती, विश्वासू मैत्रीण होती, प्रेमळ पत्नी होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं- एक चांगली व्यक्ती होती. अ‍ॅन्ड...

आय वॉज डॅम राईट-

‘शी वॉज अ पर्फेक्ट वूमन!’

यानंतर मितालीची स्मरणात राहील अशी निरोपाची भेट वगैरे मला आठवत नाही. पण आमच्या म्हणण्यानुसार तीने वेस्टला, स्टेशनलगत असलेल्या हॉटेलमध्ये आंम्हाला परिक्षेच्या अगोदर लग्नाची अ‍ॅडव्हान्स पार्टी जरुर दिली होती. त्यात तीनं आग्रह कर-करुन आम्हाला खायला दिलं होतं. तीनं मात्र काहीच घेतलं नाही. सुनिल येणार म्हणून ती थांबली होती. त्याला नेमका यायला उशीर झाला होता. सहा वाजून गेले होते. शेवटी उशीर होतोय म्हणून आम्ही जायला निघालो. ती आम्हाला हॉटेलच्या बाहेरपर्यंत सोडायला आली.

“ओके- जा आता तुंम्ही. संभाळून जा हं” निरोपाचा हात हलवत ती म्हणाली. आंम्ही रस्ता क्रॉस करुन दादर्‍याकडे निघालो. मध्येच मी मागे वळून बघितले. हॉटेल एन्ट्रन्सच्या थोडं बाजुलाच, ती हाताची घडी घालून अस्वस्थपणे त्याची वाट पाहत थांबली होती. बस्स!

तीच तीची शेवटची भेट आणि तीच तीची शेवटची प्रतिमा, मनावर कायमची कोरली गेली.

त्यानंतर पंधरा-वीस दिवसांचा पुर्व परीक्षेचा कालावधी गेला. हॉलतिकीट मिळाले. एका टीपिकल वातावरणात सगळ्यांनी एकमेकांना भेटत बेस्ट विशेस दिल्या. मग एग्झाम्स चालू झाल्या. संपल्या..

पण मितालीची गाठभेट झाली नाही ती नाहीच..

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌+++++++++++++++++++++++++++++++++++

खूप दिवसानंतर मी त्या दिवशी रिलॅक्स झालो होतो. नुकतीच एग्झाम संपली होती. सुट्ट्या चालू झाल्या होत्या. मित्र मैत्रीणी आपापल्या मार्गाने पांगले होते. एखादा कंप्युटर क्लास जॉईन करुन मीही निदान बेसिक शिकून घ्यावं असा विचार करत होतो. त्यासाठी शोधमोहीम चालू होती. मुलींच्या बाबतीतली माझी मते चमत्कारीकरित्या बदलली किंवा चांगली झाली नसली तरी, मितालीमुळे काही अढी, पुर्वग्रह तरी दूर झाले होते. त्यांच्याबाबतीत मी जास्त विचार करणं सोडून दिलं होतं. इव्हन मुलीं, रिलेशनशीप, कमिटमेंटचा विचारही आता माझ्या डोक्यातून हद्दपार झाला होता. आता फोकस करायचं होतं ते फक्त फ्युचरवर.

त्या रात्री मस्तपैकी खाडीवर वगैरे फिरुन आलो होतो. मोकळ्या हवेत मस्त फ्रेश वाटलं. दहाला घरी आलो. चांगल्या कंप्युटर क्लाससाठी आज इस्टचे क्लासेस पालथे घातले होते. उद्या भाईंदर वेस्टची पाळी होती. त्यामुळे टी.व्ही पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा सरळ जेवून झोपून गेलो. आणि कधीतरी रात्रीच मला ते स्वप्न पडलं...

आता फारसं काही आठवत नाही पण- माझ्यासोबत स्वप्नात कोणीतरी होतं.
कोण? माहीत नाही. चेहरा धड आठवत नाही. पण तीच्या तोंडावर घरंगळलेले उदास केस आणि त्या केसांतून दिसणार्‍या डोळ्यांखाली वाळलेली अश्रूची एक सर मात्र अंत:करण पिळवटून टाकत होती. विरहाच्या कल्पनेनंच मनाची तडफड-तडफड होत होती.

ती कोण होती माहीत नाही, पण कोणीतरी होती, आपली होती. अगदी जवळची- हक्काची होती. आणि तीच आता तोंड फिरवून माझ्यापासून दूर चालली होती. गळा वगैरे दाटून येत होता. वाटत होतं ओरडून सांगावं, ‘थांब गं... मी विखरुन जाईन तुझ्याशिवाय, माझ्यासाठी थांब...’

पण मुळात असल्या स्वप्नांना स्वत:चा आवाज नसतो. अधिकार नसतो आणि आपल्याच स्वप्नात आपण जगातले सगळ्यात जास्त दुबळे झालेले असतो!

तीचा चेहरा दु:खातिरेकाने पिळवटून निघत असतानाच तीनं डोळ्यांतून नव्यानं येऊ पाहणार्‍या अश्रूंना उलट्या हातानं पुसलं. आणखीन मनाची तडफड नको म्हणून कसाबसा हुंदका देत ती जायला उठली.
मी जीवाच्या आकांताने तीचा हात पकडायला गेलो...
हात काही भेटला नाही! तीच्या ओढणीची हलकीशी किनार तेवढी हाताला लागली...
क्षणात तीही निसटून गेली!.....

खाडकन् डोळे उघडले मी.
डोळ्यांसमोर पंख्याची घरघर जाणवली. हळूहळू आकृती स्पष्ट होत गेली.

अंधार असूनही, बाहेर लोकांचा हलकासा कोलाहल ऐकू येत होता. घरात कामाला जाणार्‍यांच्या डब्यांची तारांबळ चालू होती.. मी वास्तवात आलो होतो. स्वप्नातली ‘ती’ मात्र-

स्वप्नातच कुठेतरी विरघळून गेली होती!

तसा मी स्वप्नांचा जास्त विचार करत नाही. पण- सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दिल्यानंतर- आज इतक्या दिवसांनी, ध्यानीमनी नसताना, हे असं- विचित्र स्वप्न का पडावं? हे काही मला कळत नव्हतं.

उशाजवळचं पालथं घड्याळ मी सरळ करुन बघितलं. पहाटेचे सव्वा पाच वाजत आले होते. घामाने डंवरलेला चेहरा बाहिने पुसत मग मी कुस बदलत झोपायचा प्रयत्न करु लागलो...

झोप लागणं अशक्य होतं..

मन एका घट्ट निर्भेद उदासीनतेच्या आवरणाखाली वावरायला लागलं होतं.... उगीचच!
============================================================
क्रमशः

भाग=>> 6

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा! योगायोग इथेही आहेच का?
भाग ३, प्रतिसाद= ३
भाग ४, प्रतिसाद= ४
भाग ५, प्रतिसाद= ५ Lol

@पाफा, वावे, साधना, मेघा, कऊ>>> धन्यवाद Happy