शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धावण्याचा व्यायाम.
पळणें हे क्रियापद 'पळ काढणें' या अर्थीच वापरायला हवे.
ही दोन क्रियापदं समानार्थी नाहीत.

सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात. >> हरवलेले सजीव परत सापडतात किंवा मिळतात जसे हरवलेला कुत्रा सापडला>>>> हो ते बरोबरच आहे.सजीव भेटतात वगैरे लिहिताना,पेन् भेटले,साडी भेटली असे बरेचजण म्हणतात तेच डोक्यात होते.

सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात. >> हे तुम्ही कुठे राहतात यावर अवलंबुन आहे... मुम्बईत सजीव, निर्जीव सगळेच भेटतात. काका पण भेटतात ... पेन पण भेटते.
पुण्यात मात्र सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात

अजुन एक अशुद्ध ट्रेंड प्रचलितपणे वापरला जातोय जसे - मी लक्षात ठेवेल >> खरे तर मी लक्षात ठेवेन असे हवे पण बरेचवेळा समोरून विशेषतः नवीन पिढीकडून अशीच वाक्य रचना आदळत असते आपल्या मोबाईल स्क्रीनवर Sad

देवकी :
पेन् भेटले,साडी भेटली असे बरेचजण म्हणतात....

>>>>>>>>>

खरच कि काय... ??? भेट हि सहसा दोन सजीवांची होते.. साडी भेटली... हा हा... Happy

पुण्यात मात्र सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात>>>>>>>साहिल, शब्दांच्या योग्य रुपाबाबत हा बाफ आहे,इथे मुंबई-पुणे आले कुठे? रच्याकने , केसं विंचरली,दगडं मारली हे शब्दप्रयोग पुण्याच्या उपनगरात प्रथम ऐकले होते.

म्हटले, म्हणले ह्यात योग्य शब्द कुठला? मूळ धातू काय आहेत आणि त्याची काय रूपे होतात? म्हणाला केव्हा होते?

६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ : हे बरोबर वाटत नाही. ष्ठ हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा प्रत्यय आहे; कनिष्ठ, वरिष्ठ, वसिष्ठ, बलिष्ठ अशा शब्दांत तो असतो, स्वादिष्ठ ही सुपरलेटिव्ह डिग्री नाही, त्यामुळे इष्ट, शिष्ट, चविष्ट, स्वादिष्ट अशा शब्दांमध्ये ष्ट असतो, ष्ठ नव्हे! (चू.भू. द्या.घ्या.)

६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी : हेही बरोबर वाटत नाही. प्रकरणी हा शब्द मराठी शब्दयोगी अव्यय आहे, अव्यय जोडण्यापूर्वी आधीच्या शब्दाचे सामान्य रूप होणार. हत्याचे सामान्यरूप हत्ये, त्यामुळे हत्येप्रकरणी हाच शब्द बरोबर. हत्या हा शब्द संस्कृत आहे, `प्रकरण'ही संस्कृत. हत्या आणि प्रकरण हेच शब्द वापरायचे असतील तर `हत्याप्रकरणे' असे रूप होईल. (चू.भू. द्या.घ्या.)

प्रकरण हे नाम आहे. शब्दयोगी अव्यय नाही.
हत्येचे प्रकरण =हत्याप्रकरण असा सामासिक शब्द असेल का तो?

शब्दकोशांत (मोल्सवर्थ, दाते) स्वादिष्ट, स्वादिष्ठ दोन्ही आहेत.

"प्रकरण हे नाम आहे. शब्दयोगी अव्यय नाही. " मग हत्येविषयी, हत्येसंबंधात, हत्येबाबत या शब्दांमध्ये 'हत्ये' कसे येते.? प्रकरण हे नाम असले तरी प्रकरणीं हे नक्कीच नाम नाही! हात, बदल, विषय ही नामे आहेत, परंतु हातीं, बदलीं, विषयीं ही शब्दयोगी अव्यये आहेत.

"हत्येचे प्रकरण =हत्याप्रकरण असा सामासिक शब्द असेल का तो?" असू शकेल. मग प्रकरणीं ही प्रकरणची सप्तमी विभक्ती समजावी लागेल. त्यानुसार हा शब्द सामान्यतः 'हत्याप्रकरणात' असा लिहिला जाईल. पण यावरून 'हत्येप्रकरणी' चूक आहे हे सिद्ध होत नाही.

'शब्दकोशांत (मोल्सवर्थ, दाते) स्वादिष्ट, स्वादिष्ठ दोन्ही आहेत." मला माहीत नव्हते; मग तसे असेल तर या लेखारंभी 'स्वादिष्ट' चूक दिले आहे त्याचे काय?

स्वादु + इष्ठ (तमभाववाचक ) = स्वादिष्ठ

घन + इष्ठ (तमभाववाचक) = घनिष्ठ

हत्या + प्रकरणी = हत्याप्रकरणी

चिनूक्स, या संधी आहेत का?

असतील तर

स्वाद्वेष्ठ
घनेष्ठ

अशा संधी व्हायला हव्यात ना?

सुविद्य बद्दल शंका -
विद्यमान - सध्याचा/ची/चे ह्या अर्थाने वापरला जातो. सुविद्य तसेच असावे असे वाटते. विद् - जाणणे ह्या अर्थाने पहायला गेले तर त्याचे रूप विद्वान (पु) आणि विदुषी(स्त्री) अशी होत असावीत. विद् धातूचे सुविद्य हे रूप करायला गेले तर ते तद्धित न होता अव्यय (सु+ विद् + ल्यबंत ) = चांगल्या प्रकारे जाणून - अशा अर्थाचे होते. त्यामुळे ते तसे नसावे.

" चिनूक्स, या संधी आहेत का?
असतील तर स्वाद्वेष्ठ, घनेष्ठ अशा संधी व्हायला हव्यात ना?"

या संधी नाहीत, स्वादु-स्वादीयस्-स्वादिष्ठ. विशेषणाच्या पाॅझिटिव्ह-कंम्पॅरेटिव्ह-सुपरलेटिव्ह अशा तीन डिग्रीज असतात त्यातला हा प्रकार आहे.

घन-घनतर-घनतम किंवा घन-घनीयस्-घनि़ष्ठ.

ओके.

संस्कृतमध्ये आणि मराठीतही पूर्वरूप संधी आणि पररूप संधी नावाचे दोन प्रकार आहेत.

पूर्वरूप संधी : कधीकधी दोन स्वर एकापुढे एक आल्यास पहिला (पूर्व) स्वर न बदलता तसाच राहतो, व दुसरा स्वर लोप पावतो, व संधी होतो..

उदा0
लाडू + आत = लाडूत
चांगले + असे = चांगलेसे
नदी + आत = नदीत
लोके + अस्मिन् = लोकेSस्मिन्
लोको (लोक: ) + अयम् = लाेकोSयम्

पररूपसंधी : या प्रकारात पहिल्या पदातला पहिला स्वर लोप पावतो आणि दुसऱ्या पदातला पहिला स्वर (परस्वर) कायम राहून संधी होतो.
उदा0
जा + ऊन = जाऊन
घर + ई + घरी
चिंधी + ओटी = चिंधोटी
स्वादु + इष्ठ(न्) = स्वादिष्ठ. स्वादु->स्वाद् + इष्ठ = स्वादिष्ठ.

पररूपसंधी : या प्रकारात पहिल्या पदातला पहिला स्वर लोप पावतो आणि दुसऱ्या पदातला पहिला स्वर (परस्वर) कायम राहून संधी होतो.
उदा0
जा + ऊन = जाऊन
घर + ई + घरी
चिंधी + ओटी = चिंधोटी

>> चिंधी आणि चिंधोटी हे समानार्थी शब्द आहेत असे मी समजत होते. चिंधी + ओटी असे असेल तर चिंधोटीचा अर्थ काय आहे नेमका ?

जा( णे) हे क्रियापद आहे ना ? मग त्याला विभक्ती कशी काय? जाऊन हे क्रियापदाचे रूप नव्हे काय ?

Pages