शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चर्चा.
'पुनःस्वास्थ्यप्राप्ती' अशी असेल तर घरीच बरं होईल माणूस, तोही फायदाच. Wink
वरच्या यादीतल्या ११ व १२ व्या शब्दानुसारच आहे की हे.

नागपूरामधात Lol
शहराच्या भूमितीनुसारही मधोमध असलेले विमानतळ वाटते आहे.

उभारला आहात - हे सोलापुरी.

माझा सारथी (मूळचा सोलापूरकर) असे सांगतो - सर, तिथे २ बशी उभारल्यात, त्याच्या मागे गाडी पार्क केली अन मी रस्त्यावर येऊन उभारलो आहे Happy

नको करायला, करायला नको
नको करूयात, करुयात नको
नको करूया, करूया नको

प्रमाण मराठीनुसार यापैकी नक्की कोणत्या रचना बरोबर आहेत कृपया मार्गदर्शन करावे

हे सर्व बोली भाषेत आहेत असं वाटतं आहे. बोलताना यातील काहीही वापरायला हरकत नसावी. प्रमाण भाषेत लिहायचं असेल तर कुठल्या संदर्भात हवं आहे? तांत्रिक बाबतीत हवं असेल तर वरील सर्वांसाठी "करू नये" असं वापरता येईल. कुठले संवाद लिहीत असाल तर बोली भाषाच वापरायला हरकत नाही.

धन्यवाद हपा
प्रमाण भाषेत लिहिताना, आपण (तीन चार लोकांची टीम किंवा ग्रुप) एखादी गोष्ट करूया किंवा नको या संदर्भात.

इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मलाही चटकन उत्तर सापडले नाही. हपाशी सहमत.

"करू नये" हे मी/आपण याबद्दल फक्त "आपण हे करू नये असे मला वाटते" असे वाचले आहे आणि ते प्रमाण मराठी वाटते. कदाचित "आपण हे करायला नको" हे ही बरोबर असेल.

"नको" आणि "करूया/करूयात" हे एकत्र फक्त बोलीभाषेत ऐकले आहेत.

कदाचित "आपण हे करायला नको" हे ही बरोबर असेल.>>>
+१ पण हे तितके आज्ञार्थी नाही वाटत, जसे 'आपण हे करू नये' थोडे वाटते. किंचित विनवणी केल्यासारखा 'टोन' वाटतो. Happy

आपण हे करणे नको.
आपण हे करू नये.
आपण हे करू.
आपण हे करूया. हेही प्रमाण मराठी नाही पण बोलीभाषेत ऐकलेय.
'करूयात' मात्र चुकीचे/अनावश्यक वाटते. शेवटी 'त' ची गरज वाटत नाही.

"आपण हे करायला नको" >> हा संवाद आहे, त्यामुळे इथे प्रमाण वापरणं अपेक्षित नाही. कुठलंही बोली रूप चालेल.

फारएण्ड, अस्मिता, हपा thanks
बरोबर..संवाद आहे आणि सहज बोलताना, आपण हे करायला नको किंवा नको करायला असंच जास्त ऐकलं आहे.
आणखी काही उदाहरणं - Let's not do this किंवा let's not discuss it now याचं भाषांतर करताना काय जास्त योग्य होईल असे वाटलं होतं, पण हपा म्हणाले तसं संवाद असल्याने बोलीभाषेत काहीही चालत असावं

टीव्ही चॅनल्स वरती आणि मुलाखतींमध्ये अनेकदा जाऊया नको, बोलूया नको, नको बोलूयात असं काही जण वापरतात.

टीव्ही चॅनल्स वरती आणि मुलाखतींमध्ये अनेकदा जाऊया नको, बोलूया नको, नको बोलूयात असं काही जण वापरतात. >> खरं आहे

.. जाऊया, बोलूया, बोलूयात

असाच शब्दप्रवास :

करतो
करतो आहे
करतोय
करतोयस

कोणते रुप कुठे योग्य हे नीट समजत नसल्याने आणि “करतो आहे” यात पुरेसा अर्थबोध होत असल्याने ते जास्त वापरतो.

Pages