जगणे परंतु गमले नाही...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझं मीपण हरवतंय का? मी स्वप्नात माझ्या मन:शांतीच्या मागे पळत राहते आणि दिवसा आयुष्याच्या. हल्लीची सकाळ फारशी ताजी, उत्साहवर्धक नसतेच. डोळे उघडायच्या आणि मेंदूचा पिसी पूर्ण बूट अप व्हायच्या आतच काय काय करायचं राहिलंय याची यादी मनात तयार व्हायला लागते. एकूणच आपण ठरवलं तसं काही घडत नाहीये किंवा त्यापेक्षा आपण त्यासाठी प्रयत्न करत नाहीये याचं टेन्शन येतं.
सकाळ गेली काही वर्षं ही अशीच होतेय. आठवड्यात ऑफिशियल कामांची यादी, वीकेंडला पर्सनल कामांची. एके काळी महिना महिना आधीपासून मेंदूचा रिमाईंडर चालू करणारे मित्रमैत्रिणींचे वाढदिवस या यादीतून पूर्ण निसटलेत. सण समारंभ खाण्यापिण्यापुरते उरलेत. रविवार दुपारचे कॉलनी सुस्तावलेली असताना जमलेले गप्पांचे अड्डे इतिहासजमा झालेत. आता मैत्र भेटतं ते सगळ्यांना सारख्या अंतरावर पडेल अशा हॉटेलात. कुठल्याही दिवशी दुपारची बसायला म्हणून येणारी चुलत आजी, संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर सहकुटुंब बसायला येणारे वडलांचे आत्तेभाऊ असल्या मंडळींचं नीट चाललंय एवढंच समजतं पण कित्येक वर्षात भेट नाही.
आत्ता आहे त्याहून कुठलं तरी दुसरं वर्तमान मला हवं होतं. मॉलमधे फिरण्यात काही निखळ आनंद आहे असं वाटणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. मी काहीतरी वेगळी आहे का? आपल्या पिढीला मिळालेली नवी मनोरंजनाची साधनं, भाषेचे नवे रंग, एका दशकात कित्येक शतकांची मजल गाठणारं नवं तंत्रज्ञान यापेक्षा मला शांत जगणं जास्त महत्वाचं वाटतं. जीवनाला शांत, निरामय अशी विशेषणं आपल्या पूर्वजांनी का लावली असतील? आपलं तर मनोरंजन, विश्रांतीही धकाधकीची आणि गोंधळाची असते.
मन प्रसन्न करणार्‍या, मधुर संगीताऐवजी ते आता आवाजी, उत्तेजित करणारं झालंय. विश्रांतीसाठी घेतले जाणारे ब्रेक्स छोटे, त्यातही खूप काही कव्हर करणारे झालेत. रिसॉर्टवर जाऊन रहायचं म्हटलं तरी तिथं काय काय फॅसिलिटीज आहेत हे लोक आधी बघतात. जागं असलेलं प्रत्येक मिनिट धापा टाकत, काहीतरी करत जगून घ्यायच्या व्यापात जगण्याचा वेग कारण नसताना वाढतोय.
पैसा येतोय आणि त्यामागं त्याला हजार नव्या वाटाही फुटल्या आहेत. पूर्वी फुकट मिळणार्‍या गोष्टी आता आपण जास्त पैसे टाकून वाजवून घेतो. उदा. माणसं, मामाचे गाव,संस्कार. पण नैसर्गिक गोष्टी पैसे टाकून मिळतात कुठं? पैशांनी त्या लगेच लार्ज साईझ होतात, त्यांचा दर्जा उंचावतो. फक्त त्यांचं नैसर्गिकपण मागच्या दारानं हळूच सटकतं एवढंच.
विज्ञानात जशी प्रगती झाली तशी संस्कृतीत का होत नाही? केवळ पैसा नसल्यामुळं आपण बंधनात पडलो होतो आणि आता मोकळे झालो आहोत अशा आविर्भावात दोर सुटलेल्या, कानात वारं भरलेल्या वासरासारखी आपली पिढी धावत सुटते. न जाणे कुठल्या स्वप्ननगरीकडं, कुठल्या क्षितिजाकडं.
आख्ख्या जनतेलाच आऊटस्टॅंडींग व्हायचंय. यामुळं फक्त कोल्ह्याची द्राक्षं उंच उंच होत जातायत. दहाजणीत एखादीनं हिर्‍याचे दागिने घातले तर ते उठून दिसतील पण सगळ्यांनी तेच केलं तर त्याची गरजच होऊन बसेल. हे इन आहे, त्याची फॅशन आहे, धिस इस खूल(ळ?) असली लेबलं लावत अनेक वेगवेगळ्या रेंजचे अनेक युनिफॉर्म आपण हल्ली रोज पांघरतोय. जीन्स, मोबाईल, फोर व्हीलर, जिम, क्लब, गॅजेट्स आणि अजूनही कितीतरी.
कालच्या चैनीच्या वस्तूंना आपण धडाधड गरजेच्या वस्तू करून टाकतोय. वी आर रेझिंग द बार फॉर आरसेल्झ. प्रत्येक जण तितका केपेबल असेलच असं नाही. मग त्या बारमधे फिट होण्यासाठी त्यानं काय करावं? वेगळे मार्ग धुंडाळावेत? आणि नसेल जमत तर बारच्या पारच बाहेर पडावं?
मोबाईल नंबर आपला आयडेंटिफिकेशन नंबर झालाय. नवी ओळख झाल्यावर जर तुम्ही समोरच्याला पुढे ओळख ठेवण्याच्या लायकीचे वाटलात की तो नाव विचारलं की लगेच मोबाईल नंबर पण विचारतो. एखाद्यानं माझ्याकडं मोबाईल नाही म्हटलं की लोक तो चुकून इकडे फिरकताना शहराचा शोध लागलेला आदिवासी असावा असे बघतात.
इतक्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सगळं भारंभार. बाथरूममधे चार नळ, दोन शॉवर्स. शेल्फवर पाच शॅम्पू, तीन कंडीशनर्स, चार वेगवेगळे साबण शिवाय शॉवर जेल, फ़ेस वॉश. आणि या सगळ्या पल्याड केसगळती मात्र थांबत नाहीये, डोळ्यांखालची काळी वर्तुळं आपली त्रिज्या वाढवत नेतायत.सोयीसुविधा मानसिक तणावाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असव्यात बहुतेक.
खूप काही पहाण्यासारखं असलेल्या जागी अगदी थोडे दिवसांचा मुक्काम असेल तर एखादा टुरिस्ट जसा आधी खटाखट फोटो काढतो आणि मग निवांत घरी पोचल्यावर फोटोंमधून पाहतो की आपण काय काय पाहिलं नक्की. तसं आपण आधी भराभर जगून घेतोय. मग वेळ उरला पुढे कधी तर बघता येतील क्षणचित्रं घडून गेलेल्या आयुष्याची. तोपर्यंत मेंदूचा कॅमेरा धड असावा आणि आठवणींचा रोल एक्स्पोज झालेला नसावा एवढंच.
आमच्या सोलापुरात "काय कस्काय चाल्लंय?" या प्रश्नाला "निवांत" हे उत्तर यायचं पूर्वी. आता बहुधा "जोरात" असं येत असणार.

'मी पाठीवर धूड वागवत तुझ्यासंगती चालत रहाते.
मुक्कामाला पोचेतोवर मोबाईलवर बोलत रहाते.
मग जाणवते जो नव्हता सोबत, त्याची कळली सारी खुशाली.
अन जो होता सतत बरोबर, त्याची तशीच राहून गेली.
अवतीभवती जे घडले ते अनुभवायला जमले नाही.
किती वाचले, कितीक शिकले, जगणे परंतु गमले नाही.'

विषय: 
प्रकार: 

खूप सुंदर लिहीलंय, जमलंय एकदम! ती टूरिस्ट फोटो उपमा एकदम चपखल. शेवटच्या ओळीही अतिशय आवडल्या.

हे मनमोकळं मालिकेत न लिहीता स्वतंत्र का लिहीलेस?

खुप छान
खुप आवडलं Happy

मी पाठीवर धूड वागवत तुझ्यासंगती चालत रहाते.
मुक्कामाला पोचेतोवर मोबाईलवर बोलत रहाते.
मग जाणवते जो नव्हता सोबत, त्याची कळली सारी खुशाली.
अन जो होता सतत बरोबर, त्याची तशीच राहून गेली.
अवतीभवती जे घडले ते अनुभवायला जमले नाही.
किती वाचले, कितीक शिकले, जगणे परंतु गमले नाही.'<<<<<< Sad

हे अगदी अस्सच होतय न हल्ली Sad

डोळे उघडायच्या आणि मेंदूचा पिसी पूर्ण बूट अप व्हायच्या आतच काय काय करायचं राहिलंय याची यादी मनात तयार व्हायला लागते. एकूणच आपण ठरवलं तसं काही घडत नाहीये किंवा त्यापेक्षा आपण त्यासाठी प्रयत्न करत नाहीये याचं टेन्शन येतं. >> अगदी खर आहे.

मग जाणवते जो नव्हता सोबत, त्याची कळली सारी खुशाली.
अन जो होता सतत बरोबर, त्याची तशीच राहून गेली. >> छान

आवडले.

केवळ पैसा नसल्यामुळं आपण बंधनात पडलो होतो आणि आता मोकळे झालो आहोत अशा आविर्भावात दोर सुटलेल्या, कानात वारं भरलेल्या वासरासारखी आपली पिढी धावत सुटते. न जाणे कुठल्या स्वप्ननगरीकडं, कुठल्या क्षितिजाकडं. >>
हे अन अशी बरीच वाक्य.. अगदी थेट मनातून उतरली आहेत.. संघमित्रा, विचार फार स्पष्ट, नितळपणे मांडता येतात गं तुला! शेवटच्या चार ओळी तर वास्तवच!

रिसॉर्टवर जाऊन रहायचं म्हटलं तरी तिथं काय काय फॅसिलिटीज आहेत हे लोक आधी बघतात
विशेषत; तिथं टीव्ही आहे का अन तिथे ए.सी. आहे का? खरं सांगू का माझं एक साधं स्वप्न आहे मस्तं पैकी अंगणात अथवा टेरेसवर आभाळाच्या खाली रात्री झोपावं पहाटेची थंडी अंगावर घ्यावी (ती अगदी उन्हाळ्यातही पडते). गेले कियेक वर्षे नाही ते पूर्ण होत. कारण गमतीचे आहे ते म्हणजे डास . अगदी खेड्यात देखील डास आहेत हो ! Angry

संघमित्रा , आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख आहे खरा....

खूप काही पहाण्यासारखं असलेल्या जागी अगदी थोडे दिवसांचा मुक्काम असेल तर एखादा टुरिस्ट जसा आधी खटाखट फोटो काढतो आणि मग निवांत घरी पोचल्यावर फोटोंमधून पाहतो की आपण काय काय पाहिलं नक्की. तसं आपण आधी भराभर जगून घेतोय. मग वेळ उरला पुढे कधी तर बघता येतील क्षणचित्रं घडून गेलेल्या आयुष्याची. तोपर्यंत मेंदूचा कॅमेरा धड असावा आणि आठवणींचा रोल एक्स्पोज झालेला नसावा एवढंच.
पटले. छान लेख.
दुसर्‍याचे अनुकरण न करता जीवन जगले तर यातील खूप गोष्टी टाळता येतील असे वाटते.

आमच्या सोलापुरात "काय कस्काय चाल्लंय?" या प्रश्नाला "निवांत" हे उत्तर यायचं पूर्वी. आता बहुधा "जोरात" >>> ह्म्म्म खरंय. आपलं आपल्यापुरत ठरवून ठेवता यायला पाहिजे. किती अन् कशासाठी / कशापाठी धावायच ते.
जमत नाही Sad जमवायलाच हवं.

अगदी पटलं. असंच झालं आहे खरं !
विश्रांतीसाठी घेतले जाणारे ब्रेक्स छोटे, त्यातही खूप काही कव्हर करणारे झालेत >>> या वरुन आठवलं, अमेरिकेत आल्यावर सुरुवातीला ज्या काही ट्रिप्स केल्या त्या सगळ्या लाँग वीकेंडस गाठून. मग भसाभसा सगळं बघायचा हव्यास त्या तीन दिवसांत. आणि परत आल्यावर येणारा प्रचंड थकवा आणि सगळीकडे नुसते भोज्जे लावून आलो असं फीलिंग ! ... त्याचा कंटाळा येऊन एक ट्रिप फक्त 'निवांत पर्यटनासाठी' केली. डोंगराच्या कड्यावर असलेलं कॉटेज. काहीही टाईमटेबल न आखता मनात येईल तेव्हा उठायचं. गार, कोवळ्या उन्हात, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत वाफाळत्या कॉफीचे घुटके घेत निवांत बसायचं. अजिबात दमवणूक करुन न घेता प्रत्येक ठिकाणी भरपूर वेळ घेऊन भटकायचं. रात्री कॉटेजच्या बाल्कनीत बसून पिठूर चांदणं आणि त्या चांदण्यात चमचमणारी डोंगरावरुन खाली खोल दिसणारी नदी बघत छान गप्पा मारायच्या. त्या ट्रिपची नुसती आठवण जरी काढली तरी इतकं रिफ्रेशिंग वाटतं की बस्स !

सन्मी, नेहमीसारखच... खूप आतल... खूप आतवर पोहचणारे.... सगळा तळ ढवळुन टाकणारं.
हेच तर चाललय मनात... पण शब्दात उतरवता न आलेलं.

मग जाणवते जो नव्हता सोबत, त्याची कळली सारी खुशाली.
अन जो होता सतत बरोबर, त्याची तशीच राहून गेली. >>>>>>>> क्या बात !!! क्या बात!!! क्या बात !!!

वाचल्याबद्दल मनापासून आभार. मी लिहीलं ते तुम्ही वाचलंत म्हणूनच नाही केवळ. तर फारसं काही ग्लॅमर, ग्लॉस नसलेला हा विषय तुम्ही वाचलात पेशन्सनी म्हणून पण.
आणि ही जी खळब़ळ आहे ती तुमच्यापैकी पण बर्‍याच जणांना स्वतः जाणवतेय याचं समाधानही.

लिहिलय चांगल . पण का कुणास ठाउक खुप प्रवीण दवणे (ह्यांची पुस्तके मी कधी विकत घेत नाही पण सकाळ मधले लेख वाचले आहेत.)छापाचे वाटले.

डोळ्यांखालची काळी वर्तुळं आपली त्रिज्या वाढवत नेतायत.सोयीसुविधा मानसिक तणावाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असव्यात बहुतेक. हे प्रमाण फक्त

In mathematics, the exponential function is the function ex, where e is the number (approximately 2.718281828) such that the function ex equals its own derivative.[1][2] The exponential function is used to model phenomena when a constant change in the independent variable gives the same proportional change (increase or decrease) in the dependent variable. The exponential function is often written as exp(x), especially when the input is an expression too complex to be written as an exponent.

अस असाव अस वाटत. बाकी सर्व अत्यंत सत्य, प्रामाणिक आवि वास्तव आहे.
संघमित्रा, मित्रा तु फारच छान लिहील आहेस. लिहित रहा. पुलेशु.

वास्तव! Sad

कुठल्याही दिवशी दुपारची बसायला म्हणून येणारी चुलत आजी, संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर सहकुटुंब बसायला येणारे वडलांचे आत्तेभाऊ असल्या मंडळींचं नीट चाललंय एवढंच समजतं पण कित्येक वर्षात भेट नाही.>>>>>>>>>गेल्या बर्‍याच वर्षात उगीच उठुन कोणाकडे अशी गेले नाहीये आणि माझ्याकडेही नाही आलयं कोणी... नातेवाईक तर फक्त लग्न-बारसे अशा समारंभाला भेटतात आता आणि मित्र-मैत्रिणी चॅटवर! Sad

खूप काही पहाण्यासारखं असलेल्या जागी अगदी थोडे दिवसांचा मुक्काम असेल तर एखादा टुरिस्ट जसा आधी खटाखट फोटो काढतो आणि मग निवांत घरी पोचल्यावर फोटोंमधून पाहतो की आपण काय काय पाहिलं नक्की. तसं आपण आधी भराभर जगून घेतोय. मग वेळ उरला पुढे कधी तर बघता येतील क्षणचित्रं घडून गेलेल्या आयुष्याची. तोपर्यंत मेंदूचा कॅमेरा धड असावा आणि आठवणींचा रोल एक्स्पोज झालेला नसावा एवढंच. >>> उच्च!!

खटाखट फोटो वाला पॅरा एकदम रिलेट झाला.
साधारण रोबो किंवा ऑटो पायलट मोड वर सगळे चालू असते.
आयुष्यात फार वेळ उरलेला नाही.कधी मोबाईल/इंटरनेट/वाचन याशिवाय एकटा वेळ मिळाला तर आपण काय करू याचं जवळ उत्तरच नाही.

Pages