जगणे परंतु गमले नाही...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझं मीपण हरवतंय का? मी स्वप्नात माझ्या मन:शांतीच्या मागे पळत राहते आणि दिवसा आयुष्याच्या. हल्लीची सकाळ फारशी ताजी, उत्साहवर्धक नसतेच. डोळे उघडायच्या आणि मेंदूचा पिसी पूर्ण बूट अप व्हायच्या आतच काय काय करायचं राहिलंय याची यादी मनात तयार व्हायला लागते. एकूणच आपण ठरवलं तसं काही घडत नाहीये किंवा त्यापेक्षा आपण त्यासाठी प्रयत्न करत नाहीये याचं टेन्शन येतं.
सकाळ गेली काही वर्षं ही अशीच होतेय. आठवड्यात ऑफिशियल कामांची यादी, वीकेंडला पर्सनल कामांची. एके काळी महिना महिना आधीपासून मेंदूचा रिमाईंडर चालू करणारे मित्रमैत्रिणींचे वाढदिवस या यादीतून पूर्ण निसटलेत. सण समारंभ खाण्यापिण्यापुरते उरलेत. रविवार दुपारचे कॉलनी सुस्तावलेली असताना जमलेले गप्पांचे अड्डे इतिहासजमा झालेत. आता मैत्र भेटतं ते सगळ्यांना सारख्या अंतरावर पडेल अशा हॉटेलात. कुठल्याही दिवशी दुपारची बसायला म्हणून येणारी चुलत आजी, संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर सहकुटुंब बसायला येणारे वडलांचे आत्तेभाऊ असल्या मंडळींचं नीट चाललंय एवढंच समजतं पण कित्येक वर्षात भेट नाही.
आत्ता आहे त्याहून कुठलं तरी दुसरं वर्तमान मला हवं होतं. मॉलमधे फिरण्यात काही निखळ आनंद आहे असं वाटणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. मी काहीतरी वेगळी आहे का? आपल्या पिढीला मिळालेली नवी मनोरंजनाची साधनं, भाषेचे नवे रंग, एका दशकात कित्येक शतकांची मजल गाठणारं नवं तंत्रज्ञान यापेक्षा मला शांत जगणं जास्त महत्वाचं वाटतं. जीवनाला शांत, निरामय अशी विशेषणं आपल्या पूर्वजांनी का लावली असतील? आपलं तर मनोरंजन, विश्रांतीही धकाधकीची आणि गोंधळाची असते.
मन प्रसन्न करणार्‍या, मधुर संगीताऐवजी ते आता आवाजी, उत्तेजित करणारं झालंय. विश्रांतीसाठी घेतले जाणारे ब्रेक्स छोटे, त्यातही खूप काही कव्हर करणारे झालेत. रिसॉर्टवर जाऊन रहायचं म्हटलं तरी तिथं काय काय फॅसिलिटीज आहेत हे लोक आधी बघतात. जागं असलेलं प्रत्येक मिनिट धापा टाकत, काहीतरी करत जगून घ्यायच्या व्यापात जगण्याचा वेग कारण नसताना वाढतोय.
पैसा येतोय आणि त्यामागं त्याला हजार नव्या वाटाही फुटल्या आहेत. पूर्वी फुकट मिळणार्‍या गोष्टी आता आपण जास्त पैसे टाकून वाजवून घेतो. उदा. माणसं, मामाचे गाव,संस्कार. पण नैसर्गिक गोष्टी पैसे टाकून मिळतात कुठं? पैशांनी त्या लगेच लार्ज साईझ होतात, त्यांचा दर्जा उंचावतो. फक्त त्यांचं नैसर्गिकपण मागच्या दारानं हळूच सटकतं एवढंच.
विज्ञानात जशी प्रगती झाली तशी संस्कृतीत का होत नाही? केवळ पैसा नसल्यामुळं आपण बंधनात पडलो होतो आणि आता मोकळे झालो आहोत अशा आविर्भावात दोर सुटलेल्या, कानात वारं भरलेल्या वासरासारखी आपली पिढी धावत सुटते. न जाणे कुठल्या स्वप्ननगरीकडं, कुठल्या क्षितिजाकडं.
आख्ख्या जनतेलाच आऊटस्टॅंडींग व्हायचंय. यामुळं फक्त कोल्ह्याची द्राक्षं उंच उंच होत जातायत. दहाजणीत एखादीनं हिर्‍याचे दागिने घातले तर ते उठून दिसतील पण सगळ्यांनी तेच केलं तर त्याची गरजच होऊन बसेल. हे इन आहे, त्याची फॅशन आहे, धिस इस खूल(ळ?) असली लेबलं लावत अनेक वेगवेगळ्या रेंजचे अनेक युनिफॉर्म आपण हल्ली रोज पांघरतोय. जीन्स, मोबाईल, फोर व्हीलर, जिम, क्लब, गॅजेट्स आणि अजूनही कितीतरी.
कालच्या चैनीच्या वस्तूंना आपण धडाधड गरजेच्या वस्तू करून टाकतोय. वी आर रेझिंग द बार फॉर आरसेल्झ. प्रत्येक जण तितका केपेबल असेलच असं नाही. मग त्या बारमधे फिट होण्यासाठी त्यानं काय करावं? वेगळे मार्ग धुंडाळावेत? आणि नसेल जमत तर बारच्या पारच बाहेर पडावं?
मोबाईल नंबर आपला आयडेंटिफिकेशन नंबर झालाय. नवी ओळख झाल्यावर जर तुम्ही समोरच्याला पुढे ओळख ठेवण्याच्या लायकीचे वाटलात की तो नाव विचारलं की लगेच मोबाईल नंबर पण विचारतो. एखाद्यानं माझ्याकडं मोबाईल नाही म्हटलं की लोक तो चुकून इकडे फिरकताना शहराचा शोध लागलेला आदिवासी असावा असे बघतात.
इतक्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सगळं भारंभार. बाथरूममधे चार नळ, दोन शॉवर्स. शेल्फवर पाच शॅम्पू, तीन कंडीशनर्स, चार वेगवेगळे साबण शिवाय शॉवर जेल, फ़ेस वॉश. आणि या सगळ्या पल्याड केसगळती मात्र थांबत नाहीये, डोळ्यांखालची काळी वर्तुळं आपली त्रिज्या वाढवत नेतायत.सोयीसुविधा मानसिक तणावाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असव्यात बहुतेक.
खूप काही पहाण्यासारखं असलेल्या जागी अगदी थोडे दिवसांचा मुक्काम असेल तर एखादा टुरिस्ट जसा आधी खटाखट फोटो काढतो आणि मग निवांत घरी पोचल्यावर फोटोंमधून पाहतो की आपण काय काय पाहिलं नक्की. तसं आपण आधी भराभर जगून घेतोय. मग वेळ उरला पुढे कधी तर बघता येतील क्षणचित्रं घडून गेलेल्या आयुष्याची. तोपर्यंत मेंदूचा कॅमेरा धड असावा आणि आठवणींचा रोल एक्स्पोज झालेला नसावा एवढंच.
आमच्या सोलापुरात "काय कस्काय चाल्लंय?" या प्रश्नाला "निवांत" हे उत्तर यायचं पूर्वी. आता बहुधा "जोरात" असं येत असणार.

'मी पाठीवर धूड वागवत तुझ्यासंगती चालत रहाते.
मुक्कामाला पोचेतोवर मोबाईलवर बोलत रहाते.
मग जाणवते जो नव्हता सोबत, त्याची कळली सारी खुशाली.
अन जो होता सतत बरोबर, त्याची तशीच राहून गेली.
अवतीभवती जे घडले ते अनुभवायला जमले नाही.
किती वाचले, कितीक शिकले, जगणे परंतु गमले नाही.'

विषय: 
प्रकार: 

वाह.. एकदम मनातलं! अस्लेच विचार येत असतात..
वेगवेगळ्या रेंजचे युनिफॉर्म, सोयी,मानसिक तणाव डायरेक्टली प्रपोर्शनल इत्यादी खूप आवडले !!

अगदी, अगदी.
>>>मी पाठीवर धूड वागवत तुझ्यासंगती चालत रहाते.
मुक्कामाला पोचेतोवर मोबाईलवर बोलत रहाते.
मग जाणवते जो नव्हता सोबत, त्याची कळली सारी खुशाली.
अन जो होता सतत बरोबर, त्याची तशीच राहून गेली.
अवतीभवती जे घडले ते अनुभवायला जमले नाही.
किती वाचले, कितीक शिकले, जगणे परंतु गमले नाही.'<<<
अगदी पटले.

आयुष्याच्या कॅनव्हासवर आठवणींचा पिसारा काढायच राहूनच गेलयं... निवांत काय ते विसरूनच गेलोय... Sad

सन्मी अगदी मनातून आलयं... मनापासून Happy

सन्मे!
>>पैसा येतोय आणि त्यामागं त्याला हजार नव्या वाटाही फुटल्या आहेत. पूर्वी फुकट मिळणार्‍या गोष्टी आता आपण जास्त पैसे टाकून वाजवून घेतो. उदा. माणसं, मामाचे गाव,संस्कार. पण नैसर्गिक गोष्टी पैसे टाकून मिळतात कुठं? पैशांनी त्या लगेच लार्ज साईझ होतात, त्यांचा दर्जा उंचावतो. फक्त त्यांचं नैसर्गिकपण मागच्या दारानं हळूच सटकतं एवढंच.
कित्ती खरं Sad
तुझं हे आत्मचिंतनपर, कानपिचक्या देणारं लेखन आवडतं मला.

<विज्ञानात जशी प्रगती झाली तशी संस्कृतीत का होत नाही?>

संस्कृति शब्द फार मोठा आहे. शिवाय बराच वादग्रस्त आहे.

सध्या फक्त सामाजिक शिस्त, परस्परांबद्दल आदर, व्यवहारात प्रामाणिकपणा, फसवण्यापेक्षा कष्ट करून पैसा मिळवणे, स्वार्थ कमी, परोपकार बुद्धि जास्त, हक्कापेक्षा कर्तव्याची जास्त जाणीव, इ. साधे पण महत्वाचे गुण कसे वाढीला लागतील याचा विचार व्हावा. त्यासाठी जे काय विज्ञान, अध्यात्म लागेल त्याचा अभ्यास व्हावा.

डी एन ए ची अदलाबदल करून जर हे गुण वाढीला लागणार असतील तर तसे असो बापडे. फक्त अशी अदलाबदल करू शकणारा शास्त्रज्ञ, स्वतः फ्रँकेनस्टाईन तर निर्माण करणार नाही, याची काय खात्री? दुसरा काही मार्ग असेल का?

झक्की अहो अगदी हे हेच अभिप्रेत होतं मला. बाकीची जरीच्या साड्यांनी आणि एथनिक दागिन्यांनी मिरवणारी संस्कृती आहेच अजून शिल्लक.
एकमेकांशी असलेली देवाणघेवाण मानसिक, भावनिक हीच काहीतरी बांधून ठेवेल.
प्रगती नाही झाली तरी चालेल आहे ती जपली तरी खूप आहे.
खरंच फार काहीतरी करायला हवंय हो या संपत चाललेल्या गोष्टीसाठी. माणसाच्या एकूण चैतन्याची इम्युन सिस्टीम आहे ती. ती खिळखिळी झाली की पुढच्या पिढ्यांना जगण्याला काही कारणच उरणार नाही स्वतः सोडून. असो.. आपली तळमळ न संपणारी .. कारण गाडी उताराला लागलीय आणि पायातली शक्ती गेलीय...

छान लिहिलय... अगदी मनातलं...

Merovingian: Yes, of course, who has time? Who has time? But then if we do not ever take time, how can we ever have time?
[Matrix Reloaded]

... journey is more important than destination... सारखे सुविचार आपण या कानानी ऐकुन त्या कानानी सोडुन देतो... मला नेहमी वाटतं, एखाद दिवशी बाईक घ्यायची मोबाईल घरी ठेवायचा आणि एकट्याने रस्ता फुटेल तिकडे जायचं...

छान लिहिलय.. आवडलं..
पण कदाचित अजून मुलं नसल्यानं आवडीच्या गोष्टी, माणसं हे सगळं सांभाळू शकतेय.. त्यामुळे को-रिलेट नाही करू शकले..
पण खरचच खूप छान लिहिलय!

आवडले!

छान आहे पण तितकीच बोचणी पण आहे बरोबर नाईलाजही डोकावतोच आहे ..... हे कसे आणि कधी झाले हे कळण्याआगोदर आपण पलिकडे पोचलेलो असतो Sad

आवडले.
आयुष्यातले ताण तणाव खुप वाढ्लेत.
पण काही relax करु शकु आणि मनातले बोलु शकु अशा जागा ही आहेत ह्या नवीन जगात ;
मायबोली त्यापैकी एक असे मला वाटते.

आपलं तर मनोरंजन, विश्रांतीही धकाधकीची आणि गोंधळाची असते.>>>> How true!

चांगलं(? :() लिहिलं आहेस. पण इतपतही जाणवतंय हेही नसे थोडके! यातून आपणच मुद्दाम मार्ग काढायचा! थेंबे थेंबे तळे साचे!

अगदी मनातलं (तुमच्या, माझ्या आणि अनेकांच्या) लिहिलतं.. खरच असं कसं होत जात ते कळतंच नाही.. आणि झाल्यावर मागे जायचं धाडसही होत नाही.. Sad

Pages