कबड्डी....खेळ बदलणार

Submitted by मी चिन्मयी on 11 July, 2016 - 15:04

क्रिकेट....फुटबाॅल....ऑलिंपिक....या मोठ्या मोठ्या नावांमधे एक नाव पुसट होत गेले ते म्हणजे कबड्डी. आज अगदी पहिल्या इयत्तेत शिकणार्या मुलाला विचारले 'बाळा तुझा आवडता खेळ कोणता?' तर 'बाळ' पापणी लवायच्या आत उत्तर देतो..'क्रिकेट'!!! अगदी एका जागी बसणारा बाळ असेल तर काही विडिओ गेम्सची पण नावं सांगेल. पण त्याला कबड्डी या खेळाचे नावही माहिती नसेल.

कबड्डी हा खर्या अर्थाने मातीशी जोडलेला खेळ आहे. पूर्वी मातीतच खेळला जायचा. काळानुसार आता मातीच्या जागी 'मॅट' आली. पण खेळाची मजा आणि चुरस काही बदलली नाही. फारशी(माझ्यामते थोडीही) प्रसिद्धीची झलक न लाभलेला हा खेळ आणि तो खेळणारे नव्हे जिवंत करणारे खेळाडू यांच्याबद्दल थोडेसे बोलावे म्हणून हा प्रयत्न.मी काही खेळातली उत्तम जाणकार वगैरे नाही किंवा खेळाडूही नाही. तरीही मागील 2 वर्षांत कबड्डीने चाहते खेचून आणलेत त्यापैकी मी एक.

इथे नक्की कबूल करावेसे वाटते की 2 वर्षांपूर्वी पर्यंत कबड्डी ही national च नाही तर international level ला खेळली जाते हे मला माहिती नव्हते. आणि कबड्डीचा world cup असतो हे तर त्याहून माहिती नव्हते. अशी परिस्थिती असताना भारताने आजपर्यंत जवळजवळ 7 वेळा हा world cup जिंकलाय हे कुठुन माहिती असणार? Asian cup, South asian cup यात सुद्धा भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे, हे आता इंटरनेट चाळल्यावर कळते आहे. आणि अशी स्थिती फक्त माझी नाही तर अनेक लोकांची आहे. कारण हा खेळ फक्त तो खेळणार्या खेळाडूंनाच माहिती असल्यासारखा होता. आणि खेळच ओळखीचा नाही तर खेळाडू कुठून ओळखीचे असणार. क्रिकेटीअर्सची नावे घडाघडा बोलून दाखवता येतात पण कबड्डीपटू कोण आहेत याचा पत्ताच नाही.

पण आज हे चित्र थोड्या प्रमाणात का होइना बदलताना दिसते आहे. आणि त्याचे पूर्ण श्रेय जाते '' प्रो कबड्डी लीग" ला. या लीग ने खेळाला एक नवीन प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून दिला आहे. आणि हा खेळ लोकांच्या आणखीन जवळ आणून ठेवला आहे. प्रेक्षक गर्दी करत आहेत. आणि खेळाडू आता हिरो बनत आहेत. या लीगच्या मागे अनेक लोकांची मेहनत आणि चिकाटी आहे. कारण लीग उभी करणेच पुरेसे नव्हते. तर प्रेक्षकांची पसंती आणि उपस्थिती सुद्धा गरजेची होती. आता हे उद्दिष्ट साध्य होताना दिसते आहे. 8 टीम्स सोबत कबड्डी लीग चे 3 सीजन पूर्ण झाले. चौथा सीजन आता थाटात सुरू आहे. परिस्थिती चांगल्याकरिता पालटली आहे...खेळाची आणि खेळाडूंचीही.

एका माहितीपटात मी प्रो कबड्डीच्या एका सदस्याची मुलाखत पाहिली. त्यांचे एक वाक्य अगदी छान लक्षात राहिले.."जेव्हा प्रेक्षक फक्त खेळ न पाहता अंपायर होतात,तिथे आमची सगळी मेहनत सफल होते. कारण त्यांनी खेळ फक्त पाहिलेला नसतो तर समजून घेतलेला असतो." याच माहितीपटात अनुप कुमार या एका उत्तम खेळाडूने आपले मनोगत मांडले. तो म्हणाला, " आधी आम्हाला फार कोणी ओळखतच नव्हते. World cup जिंकल्यावरही त्याची दखल घेतली गेली नव्हती. पेपरच्या एका कोपर्यात एक छोटीशी बातमी एवढेच त्याचे महत्त्व होते. पण आता वेळ बदलली आहे. आता प्रसिद्धी मिळते आणि पैसाही. आता आम्हालाही कळू लागले आहे मोठ्या लोकांमधे कसे उठा-बसायचे."

टीव्हीवर ही लीग अगदी सर्रास पाहिली जाते. 4 भाषांमधे अनेक देशांमधे याचे प्रसारण केले जातेय.आमच्या घरात तर जेवणाच्या वेळासुद्धा पुढे-मागे सरकल्यात. 40 मिनीटे डोळ्यांच्या पापण्यासुद्धा लवताना विचार करतात. 'सुपर रेड', 'सुपर टॅकल', डू ऑर डाय रेड' असे शब्द ओठी खेळू लागलेत. लीग संपल्यावर टीव्हीवर काय बघायचे असे प्रश्न पडू लागलेत. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आपली एक जागा निर्माण करण्यास हा खेळ पुढे सरसावला आहे. आणि त्यात तो यशस्वी होईल यात शंका नाही...कारण खिळवून ठेवेल तोच खरा खेळ!!!

ता.क.- मनजीत छिल्लर आणि अजय ठाकूर माझे पर्सनल फेवरेट आहेत. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी १० वर्षाची लेक कबड्डीच्या प्रेमातच पडली आहे, मलाही मनापासून आवडतो तो खेळ. Happy

शाळेत असताना कबड्डी चॅम्पियन होते. शाळा सुटली तशी कबड्डीहि मागे पडली, नंतरच्या काळात फार काही क्रेझ दिसली नाही मुलांमध्ये पण प्रो कबड्डीने ती लाट पुन्हा आणली आहे याचे खुप कौतुक वाटते. निदान विडीयो गेमच्या ह्या जमान्यातल्या मुलांना हा आपल्या मातीतला रांगडा खेळ समजु लागला आहे तसेच आवडुही लागला आहे.
आमच्या घरी आम्ही सगळेच जण आई आणि आम्ही भावंड अगदी डोळ्यांची पापणीहि न लवता ही मॅच बघतो. आत्तापर्यंतचे सगळे सिजन पाहीले आहेत. मज्जा येतेय खुप रोज तो थरार अनुभवायला.

आजची पटना विरुद्ध पुणे मॅच एकतर्फी होता होता शेवटी छान रंगली. पटना 3 पाॅइंट्स ने जिंकले. पुण्याच्या टीमने संघर्ष केला पण खूप उशीर झाला. आजही मनजीत चिल्लर नव्हता.. Sad आता पुणेरी पलटन सेमिफायनल मधे जाताना कठीणच आहे.

यु मुम्बा Vs बेंगलुरू बुल्स...what a match!!!!
शेवटच्या क्षणी मुंबाच्या तोंडून विजयाचा घास पळवला मोहित चिल्लरने...
सामना रंगणे म्हणजे काय ते दाखवून दिले.. Lol

यू मुंबा Sad

मोहितची मुसंडी पाहून राकेशकुमार अगदी पळभर थबकला, तिथेच घात झाला.

त्यांचा आता एकच सामना शिल्लक आहे. पुणेरी पलटणचे दोन. त्यामुळे पुण्याला संधी आहे. मुंबाचा सामना साखळी फेरीतला शेवटचा सामना आहे. तोवर थोडी वाढलेली नखं चावायची वेळ त्या सामन्यात येऊ नये.

आजची मॅच... दबंग दिल्ली Vs पटना पायरेट्स... पटनाने शेवटच्या क्षणी एका पाॅइंटने जिंकली.
पण मॅचवर वर्चस्व गाजवले 'मिराज शेख'ने....एक खराखुरा 'ऑलराउंडर' काय आणि कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण झाला तो आज...दिल्लीच्या सेमिफायनलमधे जायच्या आशा मावळत आल्या तरी आजचा त्यांचा खेळ विसरणे अशक्य आहे.

आजचा हिरो... दिपक निवास हुड्डा...17 रेड पाॅईंट्स...
बाकी पुणेरी पलटण ची कामगिरी अगदी सरासरीपेक्षाही खाली म्हणता येईल. तरीही जिंकलेत. पण 'ड्रिम टीम' ला शोभणारा हा खेळ नाही. उद्याच्या मॅचमधे उत्तमच कामगिरी हवी.

पुणेरी पलटण चौथ्या क्रमांकावर आलेत. म्हणजे यू मुंबा सेमीफायनलमध्ये पोचण्याची शर्यत आणखी अवघड झाली.
आजच्या सामन्यानंतर आशा कायम राहील का ते ठरेल.

अरे वाह! मस्त धागा आणि प्रतिसाद.

केबल टीव्ही नसल्याने हे सामने पाहिले जात नाहीयेत. पण वाचायला मजा येत्ये. मंडळी फोटो वगैरे टाका जरा...

मनजीत....मनजीत....मनजीत... Lol
अप्रतिम खेळला आज. मस्तच. पण अजय ठाकूरपेक्षा नितिन तोमरला बक्षिस मिळायला हवे होते.. त्याचे पाॅईंट्स जास्त होते..

दोन्ही सेमीफायनल्स खतरनाक होत्या. खूप इंटेसिटी होती. अनेक पॉइंट्समध्ये स्किलपेक्षा ताकदीचा प्रताप दिसला.

पहिल्या सामन्यात पटनाच्या इराणी खेळाडूला फाउल म्हणून बाहेर काढलं तो निर्णय कळला नाही. तिथून पुणेकर वरचढ ठरत होते, पण प्रदीप नरवालने सामना खेचून आणला. दीपक निवास हुडा पुणेरी पलटणचा अनसंग हिरो. अजय ठाकुरला ग्लॅमर, फॅन फॉलोइंग आहे. पण मी पाहिलेल्या सामन्यांत त्याने क्वचितच चांगला खेळ दाखवलाय.

दुसर्‍या सामन्यात एका खेळाडूने (जो मूळचा पैलवान आहे) एकट्याने केलेली पकड भारी होती. तेलगू टायटन्स राहुल चौधरीवर जरा जास्तच अवलंबून आहेत. या सीझनमध्ये त्याने सर्वाधिक रेड पॉइंट्स कमावलेत खरे. पहिल्या सीझनमध्ये तर तो फक्त चढाया करायचा. बचावाच्या वेळी त्याला दर अर्ध्या मिनिटासाठी सबस्टिट्यूट करायचे. पण त्या सीझनमध्ये त्याच्या चढाया खरंच बघण्यासारख्या असायच्या. तीन वर्षांपूर्वी तो इतका बलदंडही नव्हता. काल जिथे टायटन्स मागे पडू लागले ती चढाई जरा जास्तच खोलवर जाऊन आणि लांबवून केलेली वाटली. समोर चारच खेळाडू होते. संदीप नरवाल टायटन्सकडून खेळताना झाकोळून गेल्यासारखा दिसतोय. आधीच्या सीझन्समध्ये तो एकहाती सामने फिरवायचा.

अनुपकुमारशिवाय आणखी कोणी टो टच करताना दिसत नाही. किक आणि हँड टचपेक्षा जास्त पॉइंट पकडीतून निसटून मिळवलेले दिसतात. तेही एक कौशल्य आहेच.

काल सेमीफायनचे सामने चालू असताना आमच्या टाटास्कायच्या रिमोटवर चॅनेल बदलताच येत नव्हतं. चॅनेलचा नंबर दाबा, रेकॉर्ड केलेला दुसरा प्रोग्राम सुरू करा, स्क्रीनवर स्टार स्पोर्ट्सच. त्यांनी काही गडबड केली होती का?

पहिल्या सामन्यात पटनाच्या इराणी खेळाडूला फाउल म्हणून बाहेर काढलं तो निर्णय कळला नाही. >>>> फझलने त्याला पायांच्या कात्रीत पकडल ते नियमात बसत नाही म्हणुन त्याला येल्लो कार्ड दिले

13645162_843698125764712_1593811209421435066_n.png.jpg (17.13 KB)पुणेरी पलटणने तिसरे स्थान पटकावले... ग्रेट मॅच & ग्रेट परफाॅरमन्सेस...सगळ्यात उत्तम दिपक निवास हुड्डा...अप्रतिम खेळ आहे त्याचा...13668756_843693675765157_4010392180527795318_o.jpg (19.23 KB)

वुमन्स कबड्डी चॅलेंज स्टाॅर्म क्विन्सनी जिंकले....मस्त मॅच होती....शेवटच्या रेडमध्ये कॅप्टन तेजस्विनी बाईने मॅच जिंकून दिली...13680397_1028269957291746_4667483176973533353_o.jpg (24.48 KB)

कालच्या सगळ्या मॅचेस जबरीच झाल्या.. पण फायनल पटणानी जयपूरला आरामात हारवले... एक डिसिजन जाम चुकला. फर्स्ट हाफ मधे पाटणा ऑल आऊटच्या मार्गावर होते तेव्हा बाजीराव होडगे बाहेर गेलेला होता.. तरी त्याला बाहेर काढले नाही.. आणि तेव्हा पाटण्याला एक सुपर टॅकल मिळाला... तिथेच मॅच फिरली... तेव्हा जयपूरच्या लक्षातच आले नाही की बाजीराव बाहेर गेला होता..

चला....तयार होऊ कबड्डी विश्वचषकासाठी.... यंदा 'Glorious' अवतार बघायला मिळेल आंतरराष्ट्रीय कबड्डीचा...☺☺

अलीकडेच कबड्डी विश्वचषकाची बातमी वाचली/ऐकली तेव्हा या धाग्याची आठवण आलेली.
वेगळा धागा काढा हो त्यासाठी.

Pages