क्रिकेट....फुटबाॅल....ऑलिंपिक....या मोठ्या मोठ्या नावांमधे एक नाव पुसट होत गेले ते म्हणजे कबड्डी. आज अगदी पहिल्या इयत्तेत शिकणार्या मुलाला विचारले 'बाळा तुझा आवडता खेळ कोणता?' तर 'बाळ' पापणी लवायच्या आत उत्तर देतो..'क्रिकेट'!!! अगदी एका जागी बसणारा बाळ असेल तर काही विडिओ गेम्सची पण नावं सांगेल. पण त्याला कबड्डी या खेळाचे नावही माहिती नसेल.
कबड्डी हा खर्या अर्थाने मातीशी जोडलेला खेळ आहे. पूर्वी मातीतच खेळला जायचा. काळानुसार आता मातीच्या जागी 'मॅट' आली. पण खेळाची मजा आणि चुरस काही बदलली नाही. फारशी(माझ्यामते थोडीही) प्रसिद्धीची झलक न लाभलेला हा खेळ आणि तो खेळणारे नव्हे जिवंत करणारे खेळाडू यांच्याबद्दल थोडेसे बोलावे म्हणून हा प्रयत्न.मी काही खेळातली उत्तम जाणकार वगैरे नाही किंवा खेळाडूही नाही. तरीही मागील 2 वर्षांत कबड्डीने चाहते खेचून आणलेत त्यापैकी मी एक.
इथे नक्की कबूल करावेसे वाटते की 2 वर्षांपूर्वी पर्यंत कबड्डी ही national च नाही तर international level ला खेळली जाते हे मला माहिती नव्हते. आणि कबड्डीचा world cup असतो हे तर त्याहून माहिती नव्हते. अशी परिस्थिती असताना भारताने आजपर्यंत जवळजवळ 7 वेळा हा world cup जिंकलाय हे कुठुन माहिती असणार? Asian cup, South asian cup यात सुद्धा भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे, हे आता इंटरनेट चाळल्यावर कळते आहे. आणि अशी स्थिती फक्त माझी नाही तर अनेक लोकांची आहे. कारण हा खेळ फक्त तो खेळणार्या खेळाडूंनाच माहिती असल्यासारखा होता. आणि खेळच ओळखीचा नाही तर खेळाडू कुठून ओळखीचे असणार. क्रिकेटीअर्सची नावे घडाघडा बोलून दाखवता येतात पण कबड्डीपटू कोण आहेत याचा पत्ताच नाही.
पण आज हे चित्र थोड्या प्रमाणात का होइना बदलताना दिसते आहे. आणि त्याचे पूर्ण श्रेय जाते '' प्रो कबड्डी लीग" ला. या लीग ने खेळाला एक नवीन प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून दिला आहे. आणि हा खेळ लोकांच्या आणखीन जवळ आणून ठेवला आहे. प्रेक्षक गर्दी करत आहेत. आणि खेळाडू आता हिरो बनत आहेत. या लीगच्या मागे अनेक लोकांची मेहनत आणि चिकाटी आहे. कारण लीग उभी करणेच पुरेसे नव्हते. तर प्रेक्षकांची पसंती आणि उपस्थिती सुद्धा गरजेची होती. आता हे उद्दिष्ट साध्य होताना दिसते आहे. 8 टीम्स सोबत कबड्डी लीग चे 3 सीजन पूर्ण झाले. चौथा सीजन आता थाटात सुरू आहे. परिस्थिती चांगल्याकरिता पालटली आहे...खेळाची आणि खेळाडूंचीही.
एका माहितीपटात मी प्रो कबड्डीच्या एका सदस्याची मुलाखत पाहिली. त्यांचे एक वाक्य अगदी छान लक्षात राहिले.."जेव्हा प्रेक्षक फक्त खेळ न पाहता अंपायर होतात,तिथे आमची सगळी मेहनत सफल होते. कारण त्यांनी खेळ फक्त पाहिलेला नसतो तर समजून घेतलेला असतो." याच माहितीपटात अनुप कुमार या एका उत्तम खेळाडूने आपले मनोगत मांडले. तो म्हणाला, " आधी आम्हाला फार कोणी ओळखतच नव्हते. World cup जिंकल्यावरही त्याची दखल घेतली गेली नव्हती. पेपरच्या एका कोपर्यात एक छोटीशी बातमी एवढेच त्याचे महत्त्व होते. पण आता वेळ बदलली आहे. आता प्रसिद्धी मिळते आणि पैसाही. आता आम्हालाही कळू लागले आहे मोठ्या लोकांमधे कसे उठा-बसायचे."
टीव्हीवर ही लीग अगदी सर्रास पाहिली जाते. 4 भाषांमधे अनेक देशांमधे याचे प्रसारण केले जातेय.आमच्या घरात तर जेवणाच्या वेळासुद्धा पुढे-मागे सरकल्यात. 40 मिनीटे डोळ्यांच्या पापण्यासुद्धा लवताना विचार करतात. 'सुपर रेड', 'सुपर टॅकल', डू ऑर डाय रेड' असे शब्द ओठी खेळू लागलेत. लीग संपल्यावर टीव्हीवर काय बघायचे असे प्रश्न पडू लागलेत. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आपली एक जागा निर्माण करण्यास हा खेळ पुढे सरसावला आहे. आणि त्यात तो यशस्वी होईल यात शंका नाही...कारण खिळवून ठेवेल तोच खरा खेळ!!!
ता.क.- मनजीत छिल्लर आणि अजय ठाकूर माझे पर्सनल फेवरेट आहेत.
खरच खुप प्रगती आहे. मी ही
खरच खुप प्रगती आहे. मी ही पाहाते
हुश्श!!! मला खरंच वाटायला
हुश्श!!!
मला खरंच वाटायला लागलेलं मी एकटीच आहे कबड्डीची फॅन..आणि इथे हा लेख लिहून चूक केलीये..
मला हि आवडतो
मला हि आवडतो
हे प्रो लिगचे सामने टिव्हीवर
हे प्रो लिगचे सामने टिव्हीवर दाखवतात ते फारच रंजक असतात. सर्वच खेळाडू रांगडे आणि जिद्दीने खेळतात,
अनेक वर्षे खेळापासून दुरावलेल्या मला ( क्रिकेटचा अतिरेक झाल्याने ) पण ते खेचून घेतात.
अर्थात वर्ल्ड कप असतो, हे माहितही नव्हते.
आम्हीपण बघतो. माझा नवरा भारत
आम्हीपण बघतो.
माझा नवरा भारत वि. पाकिस्तान मॅच असेल तरच क्रिकेट बघतो मात्र प्रोकबड्डीचे चारही सिझन त्याने फॉलो केलेत/करतोय, त्यामुळे सोबत मीपण जर तो घरी नसेल तर फोन रुन माहिती विचारतो.
चिन्मयी, तिसरा पॅराबद्दल सहमत. याआधी माहीतीच नव्हते की कबड्डी नॅशनल लेव्हल, इंटरनॅशनल लेव्हलवर खेळली जाते मला तर वाटलेलं फक्त शाळेतच स्पर्धा असतात.
पुणेरी पलटनचा मनजित चिल्लर माझापण फेव्हरेट. आणि तेलगु टायटन्सचा राहुल चौधरी
हम्म....आता तर यंदाचा world
हम्म....आता तर यंदाचा world cup भारतातच होणार आहे असं वाचनात आलंय...बघु...निदान टिव्हीवर तरी इंटरनॅशनल लेव्हलची मॅच बघायला मिळते का ते...आणि बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडू खेळतील(म्हणजे सगळ्यांचेच आवडते स्टार्स)
कबड्डीच्या सगळ्या वर्ल्ड कप
कबड्डीच्या सगळ्या वर्ल्ड कप स्पर्धा भारतातच झाल्यात. खेळ मूळ भारताचा त्यामुळे भारतानेच सगळी विजेतेपदे जि़कल्याचे नवल नाही.
प्रो कबड्डी धमाल आहे. अनुपकुमार कूलेस्ट captain आहे.
काही इराणी, काही कोरियन खेळाडूही आहेत. पाकचे खेळाडूसुद्धा होते. यंदा दिसले नाहीत किंवा बेंचवरच राहत असतील.
दरवर्षी नवे नवे खेळाडू चमकतात. पहिल्या सीझनला राहुल चौधरी चमकलेला. सध्या रोहित कुमार मैदान गाजवतोय.
पाकिस्तानचे नाहियेत कोणी
पाकिस्तानचे नाहियेत कोणी यंदा..
कोरियाचा जान कुन ली, ईराणचे फजल अत्राचली, मिराज शेख, मोहम्मद मघसूदलू, हे त्यांच्या टीमचे पहिल्या सात मधले खेळाडू आहेत..
यंदा पुणे बाजी मारायचे चान्सेस फारच जास्त आहेत.. पण नेमका मध्यातच मनजीत चिल्लर दुखापतग्रस्त झाला आहे.
माझा फेवरेट अनुप
माझा फेवरेट अनुप कुमार
पप्पांना आवडते मह्णुन आम्ही पण बघतो
काल पटना पायरट्सनी यु मुंबाची
काल पटना पायरट्सनी यु मुंबाची डाळ शिजू दिली नाही.
काल जान कुन ली ने विरोधी संघावर लोण चढवला ती चढाई, आणि त्याहीपेक्षा त्याचे पकडीतून सुटणे अशक्य होते.
कोरियाचा आणखी एक खेळाडू आहे, जो अगदी बेडकासारख्य उड्या मारतो.
कालच्या दोन्ही मॅचेस मस्त
कालच्या दोन्ही मॅचेस मस्त होत्या. बंगाल वाॅरियर्सनी अखेर कंबर कसली म्हणायची. गमावण्यासारखे काहीच नाही त्यांच्याकडे,मात्र कसब आहे. फक्त गेल्यावर्षीचा फाॅर्म दाखवण्याची गरज आहे.
पटनाने सुद्धा सावध पण धमाकेदार खेळ करायला पुन्हा सुरूवात केली आहे.
कालच्या मॅचमध्ये अनुपकुमारने
कालच्या मॅचमध्ये अनुपकुमारने चढाया तर केल्याच, शिवाय पकडीही केल्या. रेडरगणिक तो आपली जागाही बदलत होता.
हात घट्ट धरून पकड. याआधी कधीही असं काही पाहिल्याचं आठवत नाही.
आम्ही शाळेत असताना करायचो अशी
आम्ही शाळेत असताना करायचो अशी पकड....तेव्हा ankle-hold, thigh-hold असलं काही जमायचंच नाही....पण त्यानंतर कालंच मिळाली बघायला...आणि जाम हसायला पण आलं..:D
प्रो कबड्डी खरच जबरदस्त आहे ,
प्रो कबड्डी खरच जबरदस्त आहे , मी टोटली हुक्ड .
धागा काढुन भारी काम केलं.
जयपुर पिंक पँथर सेमीफाइनल ला पोहोचली .
प्रो कबड्डी इथे अमेरिकेत कुठे
प्रो कबड्डी इथे अमेरिकेत कुठे बघता येईल?
आमच्या (सांगली/सातारा/कोल्हाप्पूर) भागातली पण काही खेळाडू आहेत ना? आमचे वडिल हूक्ड असतात प्रो-कबड्डीला. कुस्तीच्या खालोखाल गावातून कबड्डी लोकांचा आवडता खेळ असतो/असे.
टण्या hotstar वर बघता येइल .
टण्या hotstar वर बघता येइल .
मी हायलाईट्स पाहते आवर्जुन.
मी हायलाईट्स पाहते आवर्जुन. मला स्वतःला हा खेळ आवडतो. मी शाळेकडून खेळायचे पण. लेफ्ट कॉर्नर पोझिशनला.
माझे आई-बाबा लहानपणी आम्हाला कबड्डीच्या मॅचेस (स्टेट /नॅशनल) पहायला न्यायचे. काय खेळायचे लोक.. अफाट !
प्रो- कबड्डी चा स्पीड, टेक्नीक्स, खेळ... धमाल आहे.
टण्या, सेम विथ माय बाबा. तालमीतली जडण्घडण असल्याने कुस्ती, कबड्डी खास आवडते.
मला बाबांना 'सुलतान' दाखवायचाय. त्यातल्या पहिल्या हाफ मधले मातीतले/आखाड्यातले काही डाव मला बरोबर नाही वाटले, त्यांना विचारायचे आहेत.
श्री, हॉटस्टार दिसतंय का? मधे बंद होतं. सहीच. धन्यवाद
भारीच रार बंगाल टीम मध्ये
भारीच रार
बंगाल टीम मध्ये बरेच प्लेयर आणि कोच मराठी आहेत .
रार, मिरजेत पुर्वी (७०-८०
रार, मिरजेत पुर्वी (७०-८० पर्यंत बहुतेक) राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा होत असत. पार पंजाब/हरयाणातले क्लब यायचे असे मी ऐकले आहे. तेव्हा सातार्यातले सांगलीतले काही संघ बलवान होते.
दाभोलकर बंधू (नरेंद्र आणि अजून एक त्या भावांपैकी) फार भारी खेळत असत म्हणे.
मी लहान असताना महाराष्ट्रातले संघ बघितलेत पण बाकी भारतातले संघ येण्याचे प्रमाण जवळपास संपले होते.
आजच्या दोन्ही मॅचेस भारी
आजच्या दोन्ही मॅचेस भारी होत्या. पहिली जयपूरने 'रडीचा डाव' करत जिंकली. पंचांच्या चुकीच्या निर्णयांचा आणि गोंधळाचा फटका पटना पायरेट्सच्या मनोधैर्याला बसला आणि ते हरले.
दुसरी मॅच मात्र एकदम भारी झाली.
यु मुंबाला प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यांदा त्यांच्या 'घरेलू' मैदानावर हार पत्करावी लागली. ती पण कोणाकडून??? लीगमधून बाद झालेल्या बंगाल वाॅरियर्स कडून. आज बंगालने काही चुका सोडल्या तर mindblowing tackles केले. जँग कुन ली नेहमीप्रमाणे मस्तच. असा खेळ जर बंगालने आधी दाखवला असता तर चित्र वेगळे असते.
टोटली. माझे बाबा-काका गप्पा
टोटली. माझे बाबा-काका गप्पा मारायला बसले, की आपण जश्या क्रीकेटच्या इनिंग्स डीस्कस करतो, तश्या कबड्डीच्या इनिंग्स डिस्कस करताना ऐकलेत मी. कोण खेळाडू, कोणाच्या काय स्पेशालीटीज, कुठला रोमहर्शक सामना, कोणाचे काय डावपेच.
मिरज वॉज कल्चरली आणि स्पोर्ट्सवाईज पण खूप एनरीच्ड असं वाटायचं आम्हाला ह्या स्टोरीज ऐकताना.
कालची शेवटी दोन किंवा तीन
कालची शेवटी दोन किंवा तीन खेळाडू उरलेले असताना , यू मुबाने पिछाडी भरून काढून टाय केलेली match भारी होती. Super tackle साठी यू मुंबाला एकच गुण मिळाल्याचं दिसलं. डिफेण्डरपण आउट झाला तर super tackle ठरत नाही का?
मी नाही पहात, भाऊ आलाकी बघते.
मी नाही पहात, भाऊ आलाकी बघते. पण बंगाल टीममधला निलेश शिंदे आमच्या डोंबिवलीचा आहे आणि आमच्या शाळेचाही.
आजची बघायला हवी होती, बंगाल आणि यु मुंबाची. भावाने आत्ता fb वर लिहिलं त्यावरून मी नाही बघितली ह्याचं वाईट वाटतंय.
@ टण्या काशिलिंग अडके आणि
@ टण्या
काशिलिंग अडके आणि सचिन शिंगाडे(दबंग दिल्ली)आहेत ना सांगली चे..
आणि जयपुर पिंक पँथर्स मधला तुषार पाटील सातारचा आहे.
बरोबर चिन्मयी. काशिलिंग अडके.
बरोबर चिन्मयी. काशिलिंग अडके. कासेगावचा आहे. गजानन ओळखतो का विचारा, तो पण कासेगावचा आहे.
ओह्ह सांगलीचे खेळाडू...मस्तच.
ओह्ह
सांगलीचे खेळाडू...मस्तच. तरुण भारतचे असण्याची शक्यता.
शाळा कॉलेजात धुमसून कबड्डी खेळलीये. त्या मुळे आता या खेळाला आलेली ऊर्जितावस्था बघून भारी वाट्तं.
टीव्हीवर बघायला मज्जा येते!
ओह्ह सांगलीचे खेळाडू...मस्तच.
ओह्ह
सांगलीचे खेळाडू...मस्तच. तरुण भारतचे असण्याची शक्यता.
>>>
का हो सगळे जिल्ह्यातले खेळाडू तरुण भारतचेच का असतील? आमच्या इथले अंबाबाई आणि भानू तालीम संघ तुमच्या तरुण भारतला भारी पडते हो!
टण्या.....................!!!
टण्या.....................!!!!! हो क्का?? बर्रर्र बर्रर्र!!!
टण्या ...अरे जुन्या आठवणी! आठवतं असं आजकाल कायबाय!
शाळा कॉलेजात धुमसून कबड्डी
शाळा कॉलेजात धुमसून कबड्डी खेळलीये. >>> भारीच .
जँग कुन ली मस्त खेलतो .
सांगलीचे खेळाडू...मस्तच. तरुण
सांगलीचे खेळाडू...मस्तच. तरुण भारतचे असण्याची शक्यता >> मी खेळायचो तरूण भारतमधे.. एक राष्ट्रीय स्पर्धा तरूण भारतमधेच झाली होती.
त्यावेळी जयमातृभूमी, सम्राट, तरूण भारत यांच्यात जोरदार चुरस असायची.. राजू भावसार आणि गणेश शेट्टी दोघे जयमातृभूमीचेच..
Pages