हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - २: कालो आणि हालोआची कथा

Submitted by maitreyee on 7 July, 2016 - 06:16

भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>

कालो आणि हालोआ ची कथा

ही खूप खूप जुनी आख्यायिका आहे. आद्य दंतकथा म्हटले तरी चालेल.
हवाईयन संस्कृतीत "कालो" ( टारो प्लॅन्ट) म्हणजेच आपल्या अळू ला फार महत्त्वाचं स्थान आहे.
या बेटांवर फारसे काहीही खाण्यालायक उगवत नसताना आद्य हवाई लोकांना या झाडाने जगवलं आहे.
या लोकांच्या कल्पनाशक्तीच्या भरार्‍या मात्र अफाट आहेत. अळूच्या झाडाबद्दल कुणाला काही कथा सुचेल असं मला कधीही वाटलं नसतं! पण हवाईयन लोकांना सुचली ! Happy तर अशी ही गोष्ट :

पापा उर्फ पापाहानामोकु (जिच्यातून जमीन जन्मते अशी - म्हणजे भूमी माता) आणि वाकिआ (आकाश पिता) यांनी लग्न केले. त्यांच्या मीलनातून हवाई बेटे जन्मली. त्यांना एक सुंदर मुलगीही झाली - तिचे नाव हूहोकुलानी (तार्‍यांनी बनलेली, स्वर्गीय अशी).
ही कन्या तरुण झाल्यावर वाकिआ चे मन तिच्यावर गेले. पापाच्या नकळत त्याने तिला प्राप्त केलेच.
** त्यावेळच्या हवाईयन समाजात भावा बहिणीचे संबंध सर्रास प्रचलित होते हे इतर कथांतून वाचलेय पण बाप -मुलीच्या संबंधांचे हे एकच उदाहरण आहे की तेही समाजमान्य होते याची कल्पना नाही. असो. **

तर वाकिआ आणि हूहो च्या मीलनातून हूहोला मातृत्वाची चाहूल लागली. पापा(भूमी)ला हे अर्थात आवडले नाही. तिच्या शापाने हूहो अपुर्‍या दिवसाची बाळंत झाली. तिला एक वेडावाकडा विद्रुप आणि जन्मतः मृत मुलगा झाला. हूहो आणि वाकिआ दु:खी झाले. त्यांनी त्या बाळाचं नाव हालोआनाका ठेवलं आणि त्याला भूमीच्या कुशीत दफन केलं.
हूहोला दु:खाचा विसर पडत नव्हता. ती रोज बाळाला दफन केल्याच्या जागी जाऊन मातीतून हलकेच हात फिरवी, तिथली जमीन सारवून स्वच्छ करी. आणि त्या जागेवर अश्रू ढाळत राही.
शेवटी भूमी ही हूहोची आईच! तिचे मन द्रवले. जे झाले ते तिला बदलता येणार नव्हते. पण तिने एक मार्ग शोधला हूहोचे सांत्वन करण्याचा.
बाळाला दफन केल्याजागी एक दिवस एक सुंदर हिरवा कोंब आला. तेच कालो चे म्हणजे अळूचे झाड! हूहो नेहमीप्रमाणे त्या जागी येऊन मातीतून हलकेच हात फिरवत होती. जणू काही तिच्या बाळाचे पांघरुण सारखे करीत होती! तेव्हा अचानक तिला तो हिरवा कोंब दिसला. ती हर्षभरित झाली! वाकिआला म्हणू लागली, बघ बघ आपलं बाळ किती भराभरा वाढतंय! त्याला उभं पण राहता यायला लागलं!!

kalo.JPG
(हे चित्र एका व्हिजिटर पँप्फ्लेटवर होतं, त्याचा मी फोटो घेतलाय. योग्य नसल्यास काढून टाकेन)

दोघे त्या कोंबाची नीट काळजी घेऊ लागले. त्या कोंबाचे रोप झाले. त्याची पानं हृदयाच्या आकाराची होती. त्याच वेळी हूहोला पुन्हा दिवस गेल्याची चाहूल लागली! लवकरच तिला एक छानसं सुदृढ मानवी बाळ झालं. त्याचं नाव थोरल्या भावाच्या आठवणीसाठी "हालोआ" असं ठेवलं . हाच आद्य हवाईयन मानव आणि आपला आद्य पुरुष असे हवाईयन लोक मानतात.

हालोआदेखिल आपल्या भावाची म्हणजे त्या अळूच्या झाडाची काळजी घेऊ लागला, त्याला पाणी देऊ लागला. मोठ्या भावानेही त्याला कधी उपाशी राहू दिले नाही आणि त्याच्या अन्नपाण्याची काळजी शेवटपर्यन्त घेतली.

अजूनही अळूच्या झाडांची हवाई बेटावर सगळीकडे लागवड केली जाते.
ज्याच्याकडे भरपूर अळूची झाडं तो सुखी असं हवाईयन समजतात. वार्‍यावर ती हिरवीगार पाने डोलतात तेव्हा ती हुला नृत्य करतायत असं हवाईयन लोकांना वाटतं! त्या हृदयाकृती पानांच्या मध्यभागी खूपदा पावसाच्या पाण्याचे मोत्यासारखे थेंब जमतात ते त्यांना हालोआच्या आईचे अश्रू वाटतात.

taro.JPG

कालोच्या मुळापासून, पानापासून बनलेले पदार्थ हवाईयन लोकांचे आवडते अन्न आहे. पोइ हा घट्ट खिरीसारखा पदार्थ कालोच्या मुळापासून बनवतात, तो एक पवित्र पदार्थ समजला जातो. जेव्हा जेव्हा हवाईयन घरात पोइ बनवलं जातं तेव्हा घरात वादाला, भांडणाला मनाई असते. कारण मोठ्यांच्या समोर जोरजोरात बोलणे, वाद घालणे हे कापु आहे! आणि पोइ म्हणजे कालो हा तर सगळ्या हवाईयन लोकांचा मोठा भाऊच आहे!

--क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा.

न्यू झीलंडच्या किवी लोकांचे पण टॅरो हे प्रमुख खाद्य आहे. कदाचित त्यांच्यामधेही अशी एखादी कथा असेल.

चनस , ह ची बाराखडी Lol सो ट्रु! एकेक नावे म्हणताना बोबडी वळते Happy
दिनेश, बरोबर. टण्या मागच्या भागात म्हणाला तसे पॉलिनेशियन त्रिकोण खूप मोठा भाग आहे. न्यूझीलन्ड्चा भागही त्या त्रिकोणात येतो , या सगळ्या भागांतून लोक हवाईला मायग्रेट झाले अशी थिअरी असल्यामुळे त्या त्या भागातल्या लोककथा इथे मिक्स झाल्या असतीलच.

फदफदं जरा कटकटीचं होईल पण गेला बाजार अळूवड्या शिकवायच्या की मैत्री करून. कुणीतरी आपल्या शेतातून अळूची पानं तोडून एअरपोर्टला तुझ्या परतीच्या फ्लाईटला पोचवणारं भेटलं असतं मग. Wink

Pages