नमस्कार मायबोलीकरहो,
गेली तीन वर्षे समाजात काही सकारात्मक करण्यासाठी धडपडणारी, तळमळणारी मंडळी मायबोलीच्या माध्यमातून एक अनौपचारिक उपक्रम सातत्याने चालवत आहेत. मातृभाषेबरोबरच इंग्रजीचे ज्ञान असणे हे शैक्षणिक प्रगतीसाठी भारतात आवश्यक आहे. परंतु तळागाळांतील, आर्थिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या कमकुवत वर्गांतील मुलांना इंग्रजीची वाटणारी भीती, परकेपणाची भावना व रोजच्या जीवनात इंग्रजीचा अजिबातच वापर नसणे हे त्यांच्या मार्गातले अडसर ठरतात. त्यांच्या मनातील ही भीती, परकेपणा काढून त्यांना हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवण्याचा मायबोलीकरांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा उपक्रम नूतन समर्थ शाळेतील मुलांसाठी खूपच फायद्याचा ठरला आहे.
नूतन समर्थ विद्यालय प्राथमिक शाळेत येणारी मुले ही आजूबाजूच्या भागांतील देवदासींची व कष्टकरी पालकांची मुले आहेत. शाळेत दोन वेळा मिळणारे जेवण, मोफत शैक्षणिक साहित्य - गणवेश - वह्या पुस्तके आणि विनामूल्य शिक्षण हे शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी सोयीचे आहे. शाळा सरकारमान्य असली तरी विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्येमुळे फक्त दोनच शिक्षकांचा पगार सरकारतर्फे होतो. बाकी इयत्ता पहिली ते सातवीच्या उर्वरित शिक्षकांचा पगार सावली सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेकडून दिला जातो. शाळा मराठी माध्यमाची आहे व बुधवार पेठेतील अतिशय जुन्यापुराण्या वाड्याचे तीन मजले शाळेच्या वर्गांसाठी वापरले जातात. त्या भागातील मराठी माध्यमाची, विनामूल्य शिक्षण देणारी व भर रेडलाईट एरियात असणारी ती एकमेव शाळा आहे. किंबहुना ती शाळा तिथे आहे म्हणूनच आजूबाजूच्या भागांत व्यवसाय करणार्या देवदासी आपली मुले शाळेत पाठवतात.
यावर्षीही शाळेचे सेक्रेटरी व मुख्याध्यापिका यांनी आपल्याला स्पोकन इंग्लिशचा उपक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चालूच ठेवावा अशी विनंती केली आहे. त्यांच्या अनुभवानुसार शाळेतील मुलामुलींना या उपक्रमाचा खूप फायदा होतो. त्यांच्या इंग्रजी भाषेसंबंधीच्या आत्मविश्वासात, संवाद कौशल्यात व इंग्रजीबद्दलच्या ज्ञानात खूप फरक पडतो असे त्यांचे शिक्षक सांगतात.
तर, तुम्हांला या मुलांना शिकवण्यात रस असेल, वेळ देता येणे शक्य असेल तर उपक्रमासाठी स्वयंसेवक शिक्षक म्हणून नाव द्यायला आपले स्वागतच आहे!
स्वयंसेवक शिक्षक हे पूर्णतः स्वयंसेवा म्हणून हे काम करतात. त्यांना कोणताही भत्ता, मानधन अथवा पगार मिळत नाही किंवा प्रशस्तिपत्रकही मिळत नाही. स्वयंसेवकांकडून असणारी अपेक्षा म्हणजे त्यांना वर्षभर वेळ देता यायला हवा, इंग्रजी भाषेचे व संभाषणाचे आवश्यक ज्ञान हवे आणि मुलांशी संवाद साधण्याचे कसब हवे.
या वर्गांमधून मुले फक्त इंग्रजी भाषाच शिकतात असे नव्हे; तर त्यांना त्यांच्या चाकोरीबाहेरील वेगवेगळ्या विषयांची ओळख होते, नवीन काहीतरी शिकायला मिळते, त्यांना शिकवायला येणारे ताई-दादा हे त्यांच्यासाठी रोल मॉडेल्स ठरतात आणि चांगला अभ्यास केला तर आपणही आयुष्यात वेगळे काही बनू शकतो हा विश्वास त्यांना वाटू लागतो. गाणी-गप्पा-गोष्टी-खेळ-कोडी इत्यादींच्या माध्यमातून हसत खेळत शिकलेली इंग्रजी भाषा त्यांना आपलीशी वाटू लागते.
शाळेविषयी :
नूतन समर्थ विद्यालय शाळा ही बुधवार पेठेत सिटी पोस्ट किंवा सोन्या मारुती चौकापासून अगदी जवळ आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग शाळेत भरतात. इयत्ता सातवी पास झालेली मुले आजूबाजूच्या मोठ्या शाळांत सावली सेवा ट्रस्टच्या मदतीने इयत्ता आठवीसाठी प्रवेश घेतात. सध्या शाळेत साधारण १०० ते १२० विद्यार्थी पटावर आहेत. तरी वर्गात उपस्थित राहाणारे विद्यार्थी कमीच असतात. बरेचसे विद्यार्थी शोषित गटात मोडणारे असल्यामुळे त्याचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत असतो. कुपोषण, मारहाण, रात्री झोप न मिळणे, अनारोग्यकारक सवयी, पीडित असणे या सर्व आव्हानांतून मार्ग काढत शाळेत येणारी ही मुले नेहमीच्या विद्यार्थ्यांसारखी निश्चितच नाहीत. त्यांच्या तोंडची भाषा, त्यांचे वातावरण हे सर्व भिन्न आहे. शाळेतील शिक्षक त्यातून मार्ग काढत त्यांना अभ्यासाची, शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न करत असतात. कधी कधी खूप सुन्न करणारे अनुभव येतात किंवा खूप वाईट वाटणार्या घटना या मुलांच्या बाबतीत घडतात. तरीही त्यातून मार्ग काढत, अशा घटनांतून शिकत शाळेतील शिक्षक मुलांना ज्ञानदान करत राहातात.
यावर्षी शाळेत कर्वेनगर झोपडपट्टी भागात वास्तव्य करणार्या वडारी समाजातील ३० मुले दाखल झाली आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वयोगटातील ही मुले या अगोदर कोणत्याही शाळेत गेलेली नाहीत वा त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांच्या घरांतून शाळेत जाणारी त्यांची ही पहिलीच पिढी आहे. मुलांचे आईबाप कष्टाची, मोलमजुरीची कामे करतात. मुले दर शनिवारी व कधी कधी इतर वारीही रस्त्यांवर लिंबू-मिरचीच्या माळा विकतात व पैसे कमावतात. त्यामुळे आईवडिलांची या मुलांना शाळेत पाठवायला सुरुवातीला नाराजीच होती. (उत्पन्न बुडणार म्हणून!) परंतु त्यांना शाळेचे सेक्रेटरी, शिक्षक व मुख्याध्यापिका गेले अनेक महिने समजावत होते. शेवटी आपल्या मुलांनी शिकायला हवे हे काहीसे पटल्यावर सदर मुले शाळादाखल झाली असून सिटीपोस्टाजवळील स्वाधार संस्थेने त्यांची जेवणाखाण्याची व राहाण्याची शाळेजवळच सोय केली आहे. या मुलांना सर्वच विषय शिकवणे हे आव्हानात्मक काम आहे व शाळेला या कामीही कोणी स्वयंसेवक शिक्षक मिळाल्यास हवे आहेत, जे या मुलांकडे विशेष लक्ष देऊ शकतील व त्यांना विषय समजावून सांगू शकतील. या मुलांना जे शिकवतील त्यांची आठवडाभरात सोयीच्या दिवशी शाळेच्या वेळेत जाऊन या मुलांना मार्गदर्शन करण्याची तयारी हवी.
स्पोकन इंग्लिश वर्गाचा वार व वेळ : दर शनिवारी, साधारण दुपारी ११:३० ते १.
कधीपासून : साधारण १५ जुलै २०१६ पासून मार्च २०१७ पर्यंत (शाळेच्या सुट्ट्या व सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
शाळेचा पत्ता :
नूतन समर्थ विद्यालय प्राथमिक शाळा,
बुधवार पेठ, चेतना लॉजचे जवळ,
सोन्या मारुती चौकाजवळ, पुणे २.
ज्यांना शिकवायची इच्छा व वेळ आहे त्यांनी कृपया मला किंवा मायबोलीकर साजिरा ह्यास विपूत किंवा संपर्कात आपले खरे नाव, माबो आयडी, मोबाईल क्रमांक, ईमेल, व्यवसाय वगैरे तपशील कळवावेत. लवकरच सर्व इच्छुक स्वयंसेवक शिक्षकांची मीटिंग घेऊन शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती देणे, शाळेला भेट, शिकवण्याच्या मटेरियलसंबंधी माहिती व देवघेव इत्यादी चर्चा-गोष्टी करायच्या आहेत. सध्या व्हॉट्सपवरही एक ग्रूप केला असून तिथे सर्व शिक्षक नित्य संपर्कात असतात.
काही शंका, प्रश्न वगैरे असल्यास इथेच विचारा. यथाशक्ती त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
शाळेविषयी व या उपक्रमाविषयी अधिक माहिती
संदर्भासाठी हा अगोदरचा धागा
शाळेविषयी याअगोदर मायबोलीवर लिहिलेले काही...
तीन वर्षे सातत्याने उपक्रम
तीन वर्षे सातत्याने उपक्रम राबविल्याबद्दल स्वयसेवकांचे अभिनंदन, आणि या वर्षी साठी हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
नितांत सुंदर उपक्रम ! सलग
नितांत सुंदर उपक्रम !
सलग चौथ्या वर्षात पदार्पणाबद्दल हार्दीक अभिनंदन!
आणि अनेकानेक शुभेच्छा !
आणि अनेकानेक शुभेच्छा ! खरंतर शुभेच्छा नेहेमीच आहेत पण तरी!
धन्यवाद अतरंगी व हर्पेन! आता
धन्यवाद अतरंगी व हर्पेन! आता स्वयंसेवक हवेत. अगोदर काम केलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला उपक्रमांतून व मुलांकडून खूप काही शिकायला मिळालं असं ते सांगतात. म्हणजेच फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांनाही येथे अनमोल अनुभव मिळतो.
याअगोदर स्वयंसेवक शिक्षक
याअगोदर स्वयंसेवक शिक्षक म्हणून काम केलेले काही मायबोलीकर: (सर्वांचे माबो आयडी आता आठवत नाहीत.)
साजिरा, मुग्धमानसी, शकुन, अनया, अश्विनी डोंगरे, सायली, नानबा, समीर देश, मुक्ता, सिध्देश, पूर्णिमा, तेजस्विनी, शैलजा.
आणखीही काहीजण होते.
अकु, काउंट मी इन सध्या वर्षभर
अकु, काउंट मी इन सध्या वर्षभर तरी जमूच शकेल मला.
मस्त! थँक्स गं श्यामली. तुला
मस्त! थँक्स गं श्यामली. तुला फोन करते.
मी एकच वर्ष करू शकले हे काम.
मी एकच वर्ष करू शकले हे काम. अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. ज्याला शक्य असेल त्यांंनी कृृपया सहभाग घ्या.
शुभेच्छा पुण्यात असते तर
शुभेच्छा
पुण्यात असते तर नक्की केलं असत हे काम