गुरु बिन ग्यान!

Submitted by kulu on 15 April, 2016 - 01:39

गुरु बिन ग्यान!

गुरु विषयी अनेकांनी अनेक ठिकाणी बोलून ठेवलं आहे. पण तरीही प्रत्येकाला स्वत:च्या अनुभवांविषयी सांगावस वाटत असतंच! त्याला मी काही अपवाद नाही. म्हणून हा खटाटोप!

तसं भारतात होतो त्यावेळी अधूनमधून शास्त्रीय संगीत शिकत होतोच. कधी काही ऐकलं नाही गायलं नाही असा एकही दिवस गेला नाही. पण स्वित्झर्लंडला गेल्यावर त्यात खंड पडू लागला. आता आपण संगीतापासून(शास्त्रीय) वेगळे होतो की काय असा प्रश्न पडला. आणि तिथे व्होकल शिकायला काही पर्याय नव्हता. सगळे कर्नाटकी गाणारे. म्हटलं निदान एखादे वाद्य वाजवणारे कोणी भेटताय का बघू. सारंगी, व्हायोलीन अस शोधत शोधत शेवटी सतारीवर येऊन गाडी स्थिरावली. दोन सतारवादक होते तिथे एक इतवाहा घराण्याचा आणि दुसरा मैहर चा! तोपर्यंत मी नुसते व्होकलच ऐकल होतं, आता दोन घराण्यापैकी एक निवडायच म्हणजे त्याविषयी वाचणं, ऐकणं आलं. मग उस्ताद विलायत खान आणि पंडित रवी शंकर अशा दोघांच्या सतारी ऐकल्या. बरंच वाचन केलं. आणि एवढं करूनही रवी शंकर भावले. त्यामुळे मैहर फिक्स केल!

त्याचं नाव थॉमस नीगली. पेशाने मनोविकारतज्ञ! झुरिक च्या मध्यवर्ती भागात तीन मजली सुंदर इमारतीत त्याचा निवास. जरा घाबरत घाबरत गेलो. कारण बाहेरचा माणूस मला माझ्या देशाचं संगीत शिकवणार त्याला किती माहित असेल, कसं शिकवेल वगैरे वगैरे शंका! आणि पहिली शिकवणी झाली ती टेस्ट शिकवणी. म्हणजे मला जर आवडलं नाही तर थांबवता येईल मध्येच म्हणून! पण माणूस म्हणून त्याने जी छाप पाडली त्यानंतर मी दुसरीकडे कुठे क्लास लावयचा प्रश्नच नाही! महागोड माणूस! बोलण साधं! कुठेही कशाचाही बडेजाव नाही! अरेतुरे बोलावायाच वर.. अगदी सर बीर नाही. पहिल्याच वेळी सांगितलं त्यांनी की मला गुरु बिरू काही म्हणायचं नाही! त्याला ते आवडायचं नाही. भारतात गुरुबाजीचे फार वाईट अनुभव त्याला आले. सगळं एकदम प्रोफेशनल. ही एव्हढी एव्हढी महिन्याची फी आणि हे मी असंअसं शिकवणार. मला लोक म्हणतात कधीकधी की त्याने फी कशी घेतली. म्हणजे हा किती वाह्यात प्रश्न आहे. त्याचा तो पेशा आहे, तो शिकवतो मला, मग त्याने फी घेऊ नये? फुकटात शिकवावं ?

पहिला राग नेहमीप्रमाणे यमन सुरु झाला. आणि इथे ती गुरुची भूमिका येते. कुठलेही वाद्य शिकवायचे म्हणजे सुरुवातीला किती संयम लागतो एखाद्याकडे. म्हणजे सतार कशी धरायची, मग ती धरायची विलायत खानांची पद्धत कशी, रवी शंकरांची कशी आणि निखीलदांची कशी! मग स्ट्रोक नेमका कुठे द्यायचा, दोन स्ट्रोक्स मध्ये अंतर कसं ठेवायचं. आणि याच्याही आधी वेगवेगळ्या सतारींचे आवाज कसे असतात, मग क्लोज्ड साऊंड म्हणजे काय आणि ओपन म्हणजे काय. मग यातलं मला कुठलं हवाय. त्याच्याकडे जेवढ्या सतारी होत्या तेवढ्या सगळ्या मी वाजवून पाहिल्या आणि मगच मी मला हवी ती सतार घेतली. हे मी करताना त्याने कुठेही चिडचिड दाखवली नाही की वैताग नाही. त्यामुळेच खरं मी भारतात आल्यावर माझी सतार खरेदी करायला हरिभाऊ विश्वनाथ मध्ये गेलो तेव्हा सतार निवडायला मला मोजून दोन मिनिटे लागली. कारण थॉमसने मला सतारीत नेमकं बघायचं काय हे शिकवलं होतं. एक ८ महिन्यात मी यमन, भीमपलास, भूप, चारुकेशी, जनसंमोहिनीच्या बर्याच बंदिशी मी शिकलो. हे करताना संगीताचा बडेजाव कुठेही कसाही नाहीच. म्हणजे शास्त्रीय संगीत हे असं गंभीर आहे, आणि बाब तू आता काय अगदी शिवधनुष्य पेलायला चालला आहेस असा आव नाही.

आणि पुन्हा हा हरहुन्नरी माणूस! भारतातून कलाकारांना बोलावून त्यांच्या मैफली घरी करणार, पदरमोड बरीच. येणाऱ्या लोकासांठी चहा, खानपान वगैर होतंच. शिवाय अटेंड करायला १० फ़्रॅंक फी. ते पण कटोरा बाहेर ठेवलेला असायचा ज्याचे त्याने जबाबदारीने पैसे टाकायचे. आणि आजपर्यंत एकदा ही जेवढी लोक आली त्याला १० ने गुणून जेवढे पैसे जमायला हवे होते तेवढे झाले नाहीत! म्हणजे लोक त्यातही कंजुषी करतातच! शिवाय येणाऱ्या कलाकाराची आणि नौटंकी! मी असताना एक फेमस सतारवादक आले होते. त्यांच्या घराण्यात अगदी किती तरी पिढ्या (n = infinity) सतार वाजवत आले लोक, म्हणजे स्वत:चा मुलगा, पुतण्या, भाचा, जावई, मुलगीच्या नणंदेचा मुलगा वगैरे अस जिथे पर्यंत रेंज जाते तिथेपर्यंत त्याच्या घराण्यात सगळे प्युअर रागदारी सतार वाजवतात. त्यांनी ऐनवेळी दोन तबलावादकाची मागणी केली. का ते त्याना आणि त्यांच्या पिढीजात इतिहासाला माहित. म्हणजे असले जे महाभाग येतात त्यांचा बडेजाव ठेवा. हे सगळं तो करायचा. आणि ते करताना त्या सगळ्याचे बारीक सारीक डीटेल्स पण मला सांगायचा. कारण ते सगळं मी शिकलं पाहिजे. म्हणजे नुसतं संगीत सोडूनही आजुबाजूच बरंच जे शिकवायचं असतं ते त्याने शिकवलं! त्याच्या घरी जाऊन मी किती वेळा स्विस जेवण झोडल आहे.

सुरुवातीला जेव्हा शिकायला लागलो तेव्हा द्रुत लय हवी असायची, सगळ फास्ट पाहिजे असायचं. तो मला कधीच म्हटला नाही की नको जाऊन द्रुत मध्ये वगैरे. मला म्हणायचा अजून दोन महिन्याने आपोआप द्रुत वरून विलंबित वर येशील. आणि तसच झालं. सतारीवर हात माझा त्याने छान बसवला. म्हणजे लोकाना सतार शिकताना बोटावर जाड त्वचा तयार होईपर्यंत त्रास होतो असं ऐकल आहे. पण त्याने मला असं शिकवल की मला तसला काही त्रास झालाच नाही कधी! एकदा पुण्याहून कोणतरी पाहुणे आले त्याच्याकडे. त्याला त्याने सांगितलं की हा माझा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम स्टुडंट! माझ्या अंगावर किलोभर मास. पुलं नी एका भाषणात म्हटलं आहे , जेव्हा गुरु शिष्याला म्हणतो की “चाल आता आपण बागेश्री मध्ये काय मज्जा आहे ती शोधुया” तेव्हा तो गुरु! आणि थॉमस एकदम तसाच. आज ह्या बंदिशीची मजा बघुया आणि उद्या त्या. आणि परवा आणि वेगळ्या! सतार सुरु करताना च पहिला गुरु असा मिळाला की सतार मी थांबवणार नाही हे ठरूनच गेलं!

आणि मग मी भारतात आलो! इथे शोबाजीचा बाजार भरलेला. जो तो सतारवाला तालाबरोबर दंगा करण्यात गुंग! आता शिकू कुणाकडे हा प्रश्न. त्यात मला मैहर च हवं होतं! आणि मी म्हणजे त्यावेळी अशा जोशात होतो की मला सगळ सोडून आता सतारच करायची आहे वगैरे, शिक्षक तर कोण दिसेना. शेवटी अगदी धिटाईने पं. नित्यानंद हळदीपूर याना मेल करून याबाबत मार्गदर्शन करायची विनंती केली. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी लगेच उत्तरातून डॉ. हेमंत देसाई यांचा संपर्क पाठवला!

मी क्षणाचाही विलंब न लावता देसाई सरांची भेटायची वेळ मागून घेतली आणि पुण्याला दाखील झालो. मनात भीती होतीच. गुरुमा अन्नपूर्णादेवींकडे ज्याचे ३५ वर्षे शिक्षण झाले अशा माणसाला मी बावळटासारखं विचारायचं की “मला बी शिकवशिला का वो तुमी?” ! काय नव्हेच ते अशी परिस्थिती. पण भेटलो आणि बोललो त्यावेळी दडपण गेलं. आणि सरांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं पण एक अट घालून. मला म्हटले "सतार शिकण्यासाठी बाकी सोडायची काही गरज नाही. बाकीचं शिक्षण चालू ठेवायचं. तुला शिकवायचं कसं ते मी बघतो." आणि का हे नंतर बोलताना कळल. सर स्वत: कॅलिफोर्निया विद्यापीठामधून पीएच्डी घेतलेले. संशोधनाचा विषय इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग आणि कंट्रोल थिअरी! नंतर भारतात एका अतिशय महत्वाच्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी! शेअर मार्केट मध्ये व्यवस्था डीजीटाईज करताना कमिटीच्या हेड्स पैकी सर एक. शिवाय संसारी माणूस. आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना गुरुमाकडून शिक्षण चालू होतंच! माझी बोलतीच बंद! आणि सगळं बोलताना फी च काहीच सांगेनात सर. मी विचारायच कसं! शेवटी जरा अडखळत विचारलं की सर ...उम्म्म....फी.....! सर म्हटले काही फी नाही, नियमित रियाज कर तीच फी. काय बोलणार मी. जबाबदारीची जाणीव वगैरे जे असतं ते मला त्यावेळी कळलं! आणि आमच सगळं बोलण इंग्रजीत कारण सरांच मराठी आणि माझं हिंदी दोन्ही बिन अस्तराच!

थॉमसच्या एकदम विरुद्ध इथे! शिकण आणि शिकवणे दोन्हीमध्ये एक खानदानी गंभीरता! तिथे कशाचा बडेजाव नाही पण थिल्लरपणा पण नाही! सुरुवात इथे पण यमन ने. पण तो अजून सुरु आहे. सरांनी सुरुवातीला जेव्हा यमन वाजवून दाखवला तेव्हाच मला कळल की अरे मी हेच शोधात होतो. शिकवायची एकदम पारंपारिक पद्धत. एकच राग सुरुवातीला परफेक्ट करायचा! थॉमस ने जे टेक्निक्स शिकवले होते, त्यात आणि सरांकडे मी येण्यात नाही म्हटलं तरी दोन महिन्यांचा काळ लोटला होता. त्या वेळात रियाज करताना चुकीच्या काही गोष्टी माझ्या हातात बसल्या होत्या. त्या आधी सरांनी काढल्या. डाव्या हाताची माझी बोटे जोपर्यंत पूर्ण गोल होऊन सूर काढत नाहीत तोपर्यंत तेच टेकनिक सर मला शिकवत होते. मग स्ट्रोक क्लीअर कसे येतील तिकडे लक्ष्य, मिंडे मधले कणसूर वगैरे!

एखादा गुरु असतो तेव्हा त्यालआ किती धीराने काम घ्यावं लागत असेल. म्हणजे विचार करा, मी एकच सुरावट कितीही वेळा बेसुरी वाजवली तरी सराना ती ऐकावी लागते, दरवेळी त्यातल्या चुका सांगायच्या. त्याना स्वत:ला किती मनस्ताप तो. बरं त्या चुका अशा सांगायच्या की शिष्याला नेमकी चूक कळली पाहिजे. आणि सतारीवर तर अजून जास्त. एकच सानिरेसानिसानि ही जागा, सतारी वर क्रीन्तनाने येते, मीन्डेने येते, शिवाय त्यातल्या ज्या सुरावर जोर दिला त्यानुसार तिचा आवेश बदलतो. ते सानिरे सानिसानि असं पण होऊ शकतं आणि सानिरेसा निसानि असं पण. ते सगळ दाखवायच शिष्याला आणि पुन:पुन्हा! कोण करेल! खरा गुरूच!

एकदा आलाप सुरु झाला. खर्जाच्या तारेवर आलाप सुरु होता. गमधपमप अशी एक छोटीशी सुरावट मला सर दीड महिना शिकवत होते. म्हणजे अक्षरश: दर वेळी मी न सर सतार घेऊन बसायचो . त्या सुरावटीपर्यंत आलाप व्हायचा आणि ती सुरावट मी चुकायचो आणि सर मला नव्याने ती शिकवायचे. म्हणजे माझा मंदपणा आणि सरांचा संयम याची जुगलबंदीच ती. पण एकदा शिष्याची जबाबदारी घेतली म्हणजे एखादी गोष्ट त्याला येत कशी नाही, माझा शिष्य आहे आणि तस कधी होणारच नाही अशा लेव्हल चा तो विश्वास असतो. जेव्हा ती सुरावट मला जमली तेव्हाच सरांनी पुढंच शिकवायला सुरु केलं! म्हणजे गुरुचं गुरुतत्व किती अगाध!

असंच आलापात रेगरे अशी जागा आहे, ती यमनचे पेटंट असल्याने पूर्ण आलापात येते सारखी सारखी. तर एकदा रियाज करताना मी चुकून तो ग जरा लांबवला आणि मला असं वाटलं तो ग लांबवला तर त्यात भावना वगैरे दिसते. झाऽऽऽलं! मी पुढच्या वेळी सर शिकवत होते तेव्हा पण तो ग लांबवला. सर म्हटले लांबवू नकोस. पण मी रियाज तसाच केल्याने तो ग हातात बसला आणि तसाच यायला लागला. सरांनी तिसर्यांदा सांगून पण जेव्हा ग लांबला तेव्हा सर म्हटले “ तू काय करतोयस मला काय कळत नाही काय. तुला वाटतंय तो ग लांबला म्हणजे त्यात भावना वगैरे येते. (मी चाट पडलो. माझ्या मनातलं याना कळलंच कसं!) पण तुला का जबरदस्ती करायचीय स्वत:च्या भावनेची त्या स्वरावर. त्या स्वराला म्हणून अंगभूत भावना आहे की. त्या स्वरांना त्यांच त्याना होऊ दे की एक्स्प्रेस. तो रेगरे च वाजव. रेगऽऽऽरे करायचं नाही.” म्हणजे गुरु जेव्हा काही करू नको असं सांगतो तेव्हा त्यामागची कारणमीमांसा किती गहन असते. म्हणजे किशोरीताई म्हणतात माध्यम व्हायचं आणि स्वराला स्वत: प्रकट होऊ द्यायचं ते हेच की!

आणि नुसतं संगीतातच नाही तर बाकीच पण सगळं ज्ञान! म्हणजे एकदा मला सर सतार तयार करण्या साठीच गणित समजाऊन सांगत होते. मग ते लांबी, साऊंड वेव्हज, जवारीचा कोन आणि आणि ब्रिजची तबलीवरची (सतारीच्या भोपळ्याचा सपाट भाग) जागा यांच मिळून एक डिफ़रन्शीअल इक्वेशन कसं करायचं, मग त्यात वापरलेलं लाकूड आणि ब्रिज च मटेरियल यांचे व्हॅरीएबल्स कसे ठेवायचे, वगैरे. एकदा मान्सून कसा फेल जातो हे सांगताना मला एल निन्यो म्हणजे काय, मग ते डीटेक्ट करायला भारतात काय मोडेल वापरतात आणि बाहेर काय मोडेल वापरतात. मग त्यातला फरक काय. मग त्यातला अचूकपणा कसा वाढू शकतो. असाच एकदा इंटरनेट च्या स्पीड विषयी बोलाताना तो स्पीड कसा चेंज होतो, मग त्याची टेस्ट कशी करायची, मग सगळे हब्ज कुठे कनेक्टेड असतात वगैरे वगैरे! म्हणजे ह्या माणसाला कशाकशाच आणि किती किती ज्ञान आहे ते!

वर हे सगळं मला शिकवताना त्याना मनात काही ग्यारंटी पण नाही की मी हे पुढे कितपत पचवेन आणि पुढे नेईन. पण एकजण शिकायला आलेला आहे आणि त्याला मनापासून शिकवायचं ही भावना किती जबरी असेल. घरचा एक मेंबर आत आजारी असून विव्हळत असताना सर मला बाहेर शिकवत आहेत हा अनुभव मी घेतलेला आहे! काय बोलणार आपण अशा उदात्त व्यक्तीमत्वाविषयी!

वर क्लासला गेलो की स्वत;च घर असल्यासारख दुपारच जेवण , चहा वगैरे आणि आहेच बरं का! वेळेचं तर भानच नाही. म्हणजे ११ जायचं फिक्स बाकी परत यायचं कधी ४ कधी ६! कधी सर क्लास झाल्यावर बाकीच्या रागांची माहिती सांगायचे कधी कामोद, केदार आणि छायानट मधला फरक सतारीवर कसा ठेवायचा कधी श्री च्या अवखळ जागा, कधी सुरबहार वर भैरव ऐकवायचं. नुसत तिथे बसलो तरी संपन्न होतो मी! अजून यमन सुरु आहे. दीड वर्ष झालं. आणि त्याचा कंटाळा आलेला नाही, हे पण त्यांचीच कृपा! गुरु मार्ग दाखवतो वगैरे ऐकलं होतं. पण माझे गुरु बोट हातात धरून त्या मार्गावर चालायला शिकवत आहेत! मी धडपडतो, चुकतो पण दरवेळी ते मला उठवतात आणि त्याचं उम्मेदिने पुन्हा हातात बोट धरून मार्गक्रमण करायला शिकवताहेत! एवढा चांगला गुरु मिळावा म्हणून मागच्या जन्मी काय पुण्य केलं असेल मी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलु

खुपच छान लिहिले आहेस. अगदी मनापासून. असे कलेला पूर्ण वाहून घेतलेले गुरु मिळायला देखिल भाग्य लागतं. आणि ते टिकवायला शिष्याची तयारी. तुझ्या बाब तीत या दोन्हींचा छान संगम झाल्याचे जाणवतय
लेखातून. या कलेच्या सुरमयी उपासनेसाठी तुला खुप खुप शुभेच्छा.

अरे पण तु ऑस्ट्रेलियाला आला होतास ना पर्थ मधे? कधी परत गेलास?

सर्वांचे खुप खुप आभार! शुभेच्छांबद्दल धन्यवाद! Happy

चैतन्य काय सुंदर प्रतिसाद! लेख संपन्न झाला तुझ्या प्रतिसादामुळे असं वाटलं! Happy
युद्धाचा प्रसंग>>>> आधि व्याक्रण शिकायचं मग विसरायचं>>>> अगदी खरंय!

प्रियस मी अजुन ऑस्ट्रेलियातच आहे! Happy

कुलू, खूप सुरेख लेख. भाग्यवान आहेस. मला माझ्या गुरुजींची आठवण आली.
चैतन्य, तुझ्या प्रतिसादासाठी तुला साष्टांग नमस्कार!

अहाहा, किती सुंदर लेख - केवळ अप्रतिम...

आणि प्रतिक्रियाही तितक्याच उच्च ....

कुलू - हेवा वाटतोय रे तुझा ... Happy

!!!!

हे असले महान गुरु मिळायला भाग्य लागतं. आणि तसाच शिष्य मिळायलाही तितकंच भाग्य लागतं... तिघांनाही नमस्कार..

दाद, पुरंदरे काका, हिमस्कुल खुप खुप धन्यवाद! प्रतिसाद वाचुन प्रोत्साहन मिळतं! Happy

सरांनी आणि पं. नित्यानंद हळदीपुरांनीही लेख वाचला! Happy

!!!!!!> परागकण +१०००००

सुंदर अनुभव कथन! तुझ्या संगीत प्रवासाला माझ्या शुभेच्छा!

सूरांमधलं नातं समजावून घेण्याबद्द्ल तुझे आणि तुझ्या गुरुजनांचे विचार जाणून घ्यायला आवडतील.

उदा - यमन गाताना किंवा वाजविताना नीषाद षड्ज कण घेऊन का गावा, किंवा पंचम-ष्ड्ज संवाद कसा असावा हे ऐकायला आवडेल.

अरे कुलु, काय लिहिलंस रे तू, अगदी ओघवतं आणि प्रसन्न. शब्दात सांगणं एवढं मला जमत नाहीरे, आतून काय वाटतं ते. फील करते बास.

तुझ्या दोन्ही गुरुंना वंदन, ग्रेट आहेत ते आणि तू फार भाग्यवान आणि गुणी शिष्य आहेस म्हणून तुलाही वंदन.

प्रतिसादही सुरेख. चैतन्य यांचा प्रतिसाद अप्रतिम.

मस्त लिखाण Happy नशीबवान आहेस. मी इथे येऊन ९ महिने झाले, पण व्हायोलीन शिकण्यासाठी (रीयाज आणि शास्त्रीय संगीत शिक्षण कंटीन्यू करण्यासाठी) अजीबात (की अजिबात Uhoh ) प्रयत्न केले नाही.
लेख वाचून स्फूर्ती मिळाली Happy

अमेय , सुलु, अंजु खुप खुप धन्यवाद! Happy

ण व्हायोलीन शिकण्यासाठी (रीयाज आणि शास्त्रीय संगीत शिक्षण कंटीन्यू करण्यासाठी) अजीबात (की अजिबात अ ओ, आता काय करायचं ) प्रयत्न केले नाही. लेख वाचून स्फूर्ती मिळाली >>>>> लेखाचा उद्देश सफल झाला! तुमचं शास्त्रीय संगीत शिक्षण पुढे कंटीन्यु व्हावे यासाठी आम्हासर्वांकडुन खुप खुप शुभेच्छा! Happy

गुरु गोविंद दोनो खडे, का के लागू पाय।
बलिहारी गुरुदेवकी, गोविंद दियो मिलाय।।>>>>> आगाऊ काय सुंदर रचना दिलीत तुम्ही . खुप खुप आभार Happy

सुंदर लेख!
खरच तु खूपच नशीबवान आहेस. गुरु आणि शिष्य दोघांच्याही चिकाटीला सलाम! पुढील शिक्षणाला शुभेच्छा! Happy

मी सतारीचा क्लास लावला पण, वेळेअभावी सोडावा लागला, पण अजूनही सतार बघीतली तिचे सूर ऐकले, किंवा इतर कोणतही वाद्य ऐकताना, गलबलून येतं. कधी शिकणार मी देव जाणे. Sad

कधी शिकणार मी देव जाणे. >>>> असा विचार कधी करायचा नाही! मी शिकणार असं म्हणायचा ज्या ज्या पद्धतीने शिकता येईल त्या त्या पद्धतीने शिकायचं. Happy तुला शुभेच्छा!

ज्या ज्या पद्धतीने शिकता येईल त्या त्या पद्धतीने शिकायचं. स्मित तुला शुभेच्छा!>>>>.तु पुण्यात कधी स्थायीक होणार ते सांग. मग मी तुझी पहिली शिष्या. Happy

सचिन, वर्षु, अनिल, फूल सर्वांचे खरच खूप आभार!

अरे, तू असं काही लिहिलंस की परत परत वाचतानाही वेगळाच आनंद अनुभवायला मिळतोय......>>>थांक्यु पुरंदरे काका!

Pages