कोरडी चटणी करायची असेल तर बरेचदा मी खोबऱ्याची किंवा मग तीळ+खोबर+दाणे अशी एकत्र करते. आज सकाळी बरेच दिवसांनी थोडी जाडसर अशी फक्त दाण्याचीच केली. आणि मग खाताना आमच्या लहानपणी जवळच राहणाऱ्या एका काकूंची आठवण आली म्हणजे आलीच. त्यांच्या घरी ही चटणी रोssssज असायची. अगदी कमी तिखट करायच्या त्या. ती रोज असण्याची दोन कारणं होती. पहिले, मुलांना कधीही भूक लागली की त्यांना चटणी-पोळी खाता यावी हे आणि दुसरे म्हणजे ते काका 'पाटबंधारे' खात्यात नोकरीला होते, त्यामुळे शेंगदाण्याची पोती 'घरपोच' यायची. असो.
.
सगळ्यांच्याच जिभेवर आपापल्या आईच्या 'हाताची' चव रेंगाळत असतेच. पण तरी असे अनेक पदार्थ असतात जे खाल्ल्यावर किंवा नुसतेच समोर किंवा बोलण्यात आल्यावर एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण हमखास येते. म्हणजे अक्षरशः एकेका व्यक्तींची नावं एकेका पदार्थाला कायमचीच जोडली गेलेली असतात.
.
घरी मुलांसाठी वेगळा स्वयंपाक होत नसल्याने बहुतेक सगळ्या भाज्या आम्ही खात असू तरी पुष्कळ लहान होते तेंव्हा 'गवार' माझी नावडती होती. ताटात वाढलेल्या आमटी / कोशिंबीर / कढी कशावर तरी भार टाकून पहिल्यांदा वाढलेली तेवढी संपवायची, इतकेच. एकदा सुट्टीत आत्याकडे गेले होते. बाहेर पटांगणात चिक्कार धुडगूस घालून आल्यावर जेवायला बसले. त्यादिवशीचा स्वयंपाक माझ्या आत्येबाहीणीने, अंजुताईने, केला होता. कडकडून भूक लागली होती. एकीकडे पोळ्या करता करताच तिने ताट वाढले. ताटात गरम पोळी आणि भाजी मात्र गवारीची. भूक तर प्रचंड लागलेली, त्यात 'कुणाकडे गेल्यावर हट्ट करायचा नसतो' हे वाक्य अगदी तोंडीपाठ. त्यामुळे गुपचूप जेवायला सुरुवात केली. पण मग भाजी मात्र खूपच आवडली. तेंव्हापासून आजपर्यंत गवार आवडतेच. आणि तिची जशी किंचित पिवळसर झाली होती तसा कढईतल्या भाजीचा रंग दिसला की लगेचच तिची आठवण पण येतेच.
.
आंबट-गोड आमटी अनेकांच्या हातची खाल्ली. पण आमची एक मामी आहे तिच्या सारखी आमटी होणे नाही. तिच्याघरी मी नेहमीच घासभर पोळी कमी खाऊन मनसोक्त आमटी भात खायचे. मी अनेकदा 'ती' आमटी डोळ्यासमोर आणून करायचा प्रयत्न करते, तरीही तशी चव काही येत नाही. पण आठवण मात्र येतेच.
.
आमच्या बाबांचे एक मित्र होते. त्यांना आम्ही, आमचे आई-बाबा, आणि गावातले बहुतेक सगळेच मामा म्हणायचे. ते श्रीरामपूर पासुन जवळच टिळकनगर शुगर फॅक्टरीवर राहायचे. आम्ही कधीतरी शनिवार-रविवार मामींकडे रहायला जायचो. ताटात काहीतरी गोड हवेच असा मामींचा नियम असायचा. त्यामुळे वेगळे काही केलं नसेल तर त्या साखरआंबा वाढायच्या. इतर सगळे करतात त्याच पद्धतीने केलेल्या त्यांच्या साखरआंब्याची चव काही वेगळीच असायची. इतकी मधुर चव पुन्हा कधीच कुठेच खायला मिळाली नाही. पण कैरी किसून केलेला साखरआंबा आणि मामींची आठवण हे समीकरणच होऊन बसले आहे.
.
आमच्या कॉलनितल्या एका काकुंचे माहेर गुलबर्ग्याचे होते. त्यामुळे त्या बरेचदा चित्रान्न करयच्या. तेव्हा एकमेकांच्या घरी 'चव' देण्याची पद्धत होती. आणि मग नंतर मला आवडते हे कळाल्यावर त्या आवर्जून आमच्या घरी पाठवायच्या. म्हणजे श्रीरामपूरला असे पर्यंत मी चित्रान्न खाल्ले ते फक्त त्या काकूंच्या हातचेच. आता माझ्या करण्यात पण ते नेहमीच असते पण अजूनही त्याला नाव मात्र आंबेकर काकुंचेच आहे.
.
अजुनही बरेच पदार्थ असतील. पण ट्रेनची वेळ होईपर्यंत झरझर सुचले ते हे इतकेच .........
.
आता बाकी सगळ्यांचे ऐकते
.
पदार्थांच्या आठवणी. .....
Submitted by आरती on 12 March, 2016 - 13:34
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.Swara@1, पाणी अजिबात न
.Swara@1,
पाणी अजिबात न वापरता केलेलं सुक चिकनची रेसिपी लवकरात लवकर देणे.
निल्सन, गुलाबी रंगाची बासुंदीची कृती, गुढीपाडव्याआधी देणे.
Swara@1, पाणी अजिबात न वापरता
Swara@1,
पाणी अजिबात न वापरता केलेलं सुक चिकनची रेसिपी लवकरात लवकर देणे.>>>>+१
खुप छान आठवणी सगळ्यांच्या...
गजाभाऊ तुरीची डाळ घालून
गजाभाऊ
तुरीची डाळ घालून कारल्याच्या चकत्यांची अशी भाजी करते की बास!>> रेसिपी टाका योग्य जागी प्लीज
इथे पाकृ टाकली आहे : http://www.maayboli.com/node/58087
मागे एका डॉक्युमेंटरीत 'चव
मागे एका डॉक्युमेंटरीत 'चव आणि वास यांचा स्मृतींशी खूप संबंध असतो' हे दाखवले होते. ती चव / वास अनुभवताना हमखास त्या स्मृती जाग्या होतात आणि त्या स्मृती आठवल्यावर जीभेवर / नाकात ती चव / वास दरवळतो.
मस्त बाफ आहे.
मला रोजच्या पोळ्या खायला आवडत
मला रोजच्या पोळ्या खायला आवडत नाही .
पण पोळ्यांची बेस्ट आठवण म्हणजे - कॉलेज ला किन्वा नंतर नविन नविन नोकरी असताना , सकाळी साडेसात वगैरे वाजता चहा पीताना किचनमध्ये ठाण मांडून बसायचे . आई - गरम्गरम , थोडीशी खुसखुशीत , करकरीत पोळी ताटात द्यायची. ताजी ताजी पोळी चहात बुडवून खायला मज्जा यायची.
साबांच्या हातचे - मुळ्याचे सांबार , गोडाचा शिरा आणि कांदा-बटाटा रस्सा भाजी - एक्दम ब्येश्ट !!
निल्सन, गुलाबी रंगाची
निल्सन, गुलाबी रंगाची बासुंदीची कृती, गुढीपाडव्याआधी देणे. :: अरेरे शनिवारी रात्रीच बनविली होती पण फोटो नाही काढला. त्या बासुंदीतच थोडा मावा घालुन कुल्फी मोडमध्ये घालुन मावा कुल्फीही बनविली होती.
मेधा इथे मेथिच्या भाजिची
मेधा इथे मेथिच्या भाजिची क्रुती लिहलिय..http://www.maayboli.com/node/58117
गजा भाऊ, प्राजक्ता धन्यवाद.
गजा भाऊ, प्राजक्ता धन्यवाद. या आ स्व पू मधे दोन्ही प्रकार करण्यात येतील . मेथी आणि कार्ली दोन्ही आवडत्या भाज्या आहेत
Pages