कोरडी चटणी करायची असेल तर बरेचदा मी खोबऱ्याची किंवा मग तीळ+खोबर+दाणे अशी एकत्र करते. आज सकाळी बरेच दिवसांनी थोडी जाडसर अशी फक्त दाण्याचीच केली. आणि मग खाताना आमच्या लहानपणी जवळच राहणाऱ्या एका काकूंची आठवण आली म्हणजे आलीच. त्यांच्या घरी ही चटणी रोssssज असायची. अगदी कमी तिखट करायच्या त्या. ती रोज असण्याची दोन कारणं होती. पहिले, मुलांना कधीही भूक लागली की त्यांना चटणी-पोळी खाता यावी हे आणि दुसरे म्हणजे ते काका 'पाटबंधारे' खात्यात नोकरीला होते, त्यामुळे शेंगदाण्याची पोती 'घरपोच' यायची. असो.
.
सगळ्यांच्याच जिभेवर आपापल्या आईच्या 'हाताची' चव रेंगाळत असतेच. पण तरी असे अनेक पदार्थ असतात जे खाल्ल्यावर किंवा नुसतेच समोर किंवा बोलण्यात आल्यावर एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण हमखास येते. म्हणजे अक्षरशः एकेका व्यक्तींची नावं एकेका पदार्थाला कायमचीच जोडली गेलेली असतात.
.
घरी मुलांसाठी वेगळा स्वयंपाक होत नसल्याने बहुतेक सगळ्या भाज्या आम्ही खात असू तरी पुष्कळ लहान होते तेंव्हा 'गवार' माझी नावडती होती. ताटात वाढलेल्या आमटी / कोशिंबीर / कढी कशावर तरी भार टाकून पहिल्यांदा वाढलेली तेवढी संपवायची, इतकेच. एकदा सुट्टीत आत्याकडे गेले होते. बाहेर पटांगणात चिक्कार धुडगूस घालून आल्यावर जेवायला बसले. त्यादिवशीचा स्वयंपाक माझ्या आत्येबाहीणीने, अंजुताईने, केला होता. कडकडून भूक लागली होती. एकीकडे पोळ्या करता करताच तिने ताट वाढले. ताटात गरम पोळी आणि भाजी मात्र गवारीची. भूक तर प्रचंड लागलेली, त्यात 'कुणाकडे गेल्यावर हट्ट करायचा नसतो' हे वाक्य अगदी तोंडीपाठ. त्यामुळे गुपचूप जेवायला सुरुवात केली. पण मग भाजी मात्र खूपच आवडली. तेंव्हापासून आजपर्यंत गवार आवडतेच. आणि तिची जशी किंचित पिवळसर झाली होती तसा कढईतल्या भाजीचा रंग दिसला की लगेचच तिची आठवण पण येतेच.
.
आंबट-गोड आमटी अनेकांच्या हातची खाल्ली. पण आमची एक मामी आहे तिच्या सारखी आमटी होणे नाही. तिच्याघरी मी नेहमीच घासभर पोळी कमी खाऊन मनसोक्त आमटी भात खायचे. मी अनेकदा 'ती' आमटी डोळ्यासमोर आणून करायचा प्रयत्न करते, तरीही तशी चव काही येत नाही. पण आठवण मात्र येतेच.
.
आमच्या बाबांचे एक मित्र होते. त्यांना आम्ही, आमचे आई-बाबा, आणि गावातले बहुतेक सगळेच मामा म्हणायचे. ते श्रीरामपूर पासुन जवळच टिळकनगर शुगर फॅक्टरीवर राहायचे. आम्ही कधीतरी शनिवार-रविवार मामींकडे रहायला जायचो. ताटात काहीतरी गोड हवेच असा मामींचा नियम असायचा. त्यामुळे वेगळे काही केलं नसेल तर त्या साखरआंबा वाढायच्या. इतर सगळे करतात त्याच पद्धतीने केलेल्या त्यांच्या साखरआंब्याची चव काही वेगळीच असायची. इतकी मधुर चव पुन्हा कधीच कुठेच खायला मिळाली नाही. पण कैरी किसून केलेला साखरआंबा आणि मामींची आठवण हे समीकरणच होऊन बसले आहे.
.
आमच्या कॉलनितल्या एका काकुंचे माहेर गुलबर्ग्याचे होते. त्यामुळे त्या बरेचदा चित्रान्न करयच्या. तेव्हा एकमेकांच्या घरी 'चव' देण्याची पद्धत होती. आणि मग नंतर मला आवडते हे कळाल्यावर त्या आवर्जून आमच्या घरी पाठवायच्या. म्हणजे श्रीरामपूरला असे पर्यंत मी चित्रान्न खाल्ले ते फक्त त्या काकूंच्या हातचेच. आता माझ्या करण्यात पण ते नेहमीच असते पण अजूनही त्याला नाव मात्र आंबेकर काकुंचेच आहे.
.
अजुनही बरेच पदार्थ असतील. पण ट्रेनची वेळ होईपर्यंत झरझर सुचले ते हे इतकेच .........
.
आता बाकी सगळ्यांचे ऐकते
.
पदार्थांच्या आठवणी. .....
Submitted by आरती on 12 March, 2016 - 13:34
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातात धरून मारायची ढेकळं
हातात धरून मारायची ढेकळं झालीत आणि तुला ते यम्मी लागतंय होत. चांगलं तेलातुपातलं उप्पीट केलं तर नक्को, मम्माच हवी">>>
पण हे असं होतं खरंच.
मंजूडीने काय मस्त खजिना
मंजूडीने काय मस्त खजिना दिलाय. धन्यवाद मंजूडी.
आईच्या हातचे अनेक
आईच्या हातचे अनेक पदार्थः
१.डाळीची आमटी
२.पापलेटची/कोलंबीची आमटी,रसाच्या सर्व आमट्या तेही खूप कमी खोबरे वापरून
३.फ्राय फिश,वेगवेगळ्या कचर्या,भजी
४.वेगवेगळे पुलाव
५.चकली,बे.ला.
६.गूळपोळी,तिळाचा लाडू.
मैत्रिणीच्या आईच्या हतचे मटार पॅटिस्,नाजूक ,एकसारखे आकाराचे आणि सारणातले मटार जर्रासे झेझरलेले.
माझ्या आईच्या आत्याकडची साधी पोळी.शांताई म्हणत तिला.त्यांच्या घरातला देव्हारा बघताना भान हरपून जायचे.किती देव होते ते आठवत नाही.आठवते ती एक पिंपळपानावर पहुडलेल्या,पायाचा अंगठा तोंडात घातलेल्या बाळ्कृष्णाची मोठठी तसबीर.फुलांनी सजलेली.त्यातून लक्ष गेले की नावाप्रमाणे शांत असलेल्या शांताईची गोरी,प्रसन्न मुद्रा कौतुकाने विचारपूस करीत असे.ती आणी तिची सून या दोघीही पोळी सुरेख करीत.
माझ्या नवर्याच्या हातचा चहा,डाळीची आमटी.चहा तर माझ्या आईला,आमच्या वनिताला खूप आवडतो.अर्धा-पाउण तास थांबायची तयारी हवी.वनिता आता बराचसा चहा तसा करू लागलीय.
कांदा,बटाटा,टॉमेटो यांची सुरेख रस्साभाजी,नवरा करतो ती माझ्या मुलाला आवडते.
माझा नवरा चहा मस्त करतो पण मी
माझा नवरा चहा मस्त करतो पण मी चहा पितच नाही ;). मी कॉफीप्रेमी.
तर नवरे लोकांना फक्त चहाच
तर नवरे लोकांना फक्त चहाच बहुधा जमतो तर
सग्ळ्यांना आपापल्या आईच्या हातचे प्रथम आवडत असावे.. मग पुढे इतर सुगरणी.
हम्म्म अनघा. माझ्या मोठ्या
हम्म्म अनघा. माझ्या मोठ्या दिरांनी काही नाही शिकवलं कुकिंग भावाला. ते सर्व उत्तम करतात. नवरा सांगतो ब्वा मला वरण-भात कुकर लावता येतो पण कधी लावला नाही, .
बायका चान्स कमी देतात ना
बायका चान्स कमी देतात ना अंजू. माझी बहिणही अंजूच.
(No subject)
कालच लिहिताना माझ्या मनात
कालच लिहिताना माझ्या मनात विचार आला होता. माझी मुले माझ्या बद्दल काही लिहू शकतील का ? >>>
माझ्या लेकानं एकदा इंडियन रेस्टॉरंटमध्ये मोठ्यानं 'मला नको दोसा, माझी आई वल्ड्स बेस्ट दोसा करते' असं सांगितलं होतं. त्याच्या मते पोहे, छोले आणि चिकन डॅडीनं बनवलेलं, पावभाजी माझ्या मैत्रिणीच्या हातची, गुळपोळ्या आजीच्या हातच्या बेस्ट असतात. मला असं वाटतं जे काही बरं-वाईट खाऊ घालू त्या चवीवर ती मोठी होणार आणि त्यातल्या त्यात आवडी जोपासणार तेव्हा असा कुठला धागा निघाला तर कौतुकानं लिहितीलच
१०० वी पोस्ट टाकायला मिळाली
१०० वी पोस्ट टाकायला मिळाली म्हणुन टाकली!
माझ्या मनात चवीपेक्षा आठवणीच
माझ्या मनात चवीपेक्षा आठवणीच दाटल्या. आरती धन्यवाद !
प्राजक्ता तसच मेथिची दाणे
प्राजक्ता
तसच मेथिची दाणे कुट घात्लेली पातळ भाजी पण फार चविची होते... >>
गजाभाऊ
तुरीची डाळ घालून कारल्याच्या चकत्यांची अशी भाजी करते की बास!>> रेसिपी टाका योग्य जागी प्लीज
सगळ्यांच्या आया आणि आज्यांची
सगळ्यांच्या आया आणि आज्यांची कौतुकं वाचुन काही मिस झालं वाटलं.
मला समजायला लागेपर्यंत माझी आजी blind झाली होती. तिच्या तरुणपणी ती तेव्ह्याच्या काळी नोकरी करणारी आणि शिवाय मॉडर्न विचारांची होती, त्यामुळे फार स्वयंपक घरात नसावी. त्यामुळेच कदाचित माझी आई पण स्वयंपाकात अगदीच 'ढ' आहे. तरीही शनिवारी शाळेतुन आल्यावर लंचमधे मिळणार्या आंबेमोहोर भात आणि गरम गरम उकळणार्या आमटीचा वास आठवला कि अजुनही प्रचंड भुक लागते. या शनिवार दुपारी इतक्या मनात रुतल्या आहेत कि वॉशिंग मशिनच्या साबणाचा विशिष्ठ सुगंध किंवा एखादं विशिष्ठ मराठी भावगीतं लागलं असलं कि आपोआप आमटी भाताची, आईच्या साडीच्या स्पर्शाची, तिच्या अंगाला येणार्या विशिष्ठ साबणाच्या वासाची आठवण येते.
आईच्या स्वयंपाकातल्या 'न' कौशल्यामुळे माझं वासरात लंगडी गाय असणारे कुकिंग स्कील्स माझ्या नवर्यला आणि मुलाला इम्प्रेस करु शकतात. माझा मुलगा त्याचं लग्न होइपर्यंत तरी माझ्या स्वयंपकाच्या आठव्णी सांगेल अशी खात्री आहे. बाबा तर भारीच इम्प्रेस्ड आहे.
माझ्या मुलाला बोलता किंवा नीट
माझ्या मुलाला बोलता किंवा नीट व्यक्त होता येत नाही पण तो राग लोभ काहीही माझ्या केसांवर व्यक्त करतो, लहानपणापासूनच. त्यामुळे त्याला माझा एखादा पदार्थ आवडला की तो माझ्या केसाची पप्पी घेतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा माझे डोळे भरून येतात.
चहा त्याला माझ्या हातचा आवडत नाही त्याच्या बाबांच्या हातचा आवडतो. तो बाबाला किचनमध्ये नेतो आणि कप किंवा चहापावडरची बरणी त्याच्या हातात देतो आणि कर सांगतो.
अन्जू,
अन्जू,
हा धागा वाचताना ईतक्या आठवणी
हा धागा वाचताना ईतक्या आठवणी येतात कि डोळ्यात आपोआप पाणीच येते. फारच सुरेख धागा आरती.
सो स्वीट अंजू
सो स्वीट अंजू
हा धागा वाचताना ईतक्या आठवणी
हा धागा वाचताना ईतक्या आठवणी येतात कि डोळ्यात आपोआप पाणीच येते. फारच सुरेख धागा आरती.
मम charcha.
पहिली आठवण मी ज्या काकूंची लिहिली त्यांना जाऊनपण २० वर्ष झाली त्यामुळे मला पहिली पोस्ट इथे टाकतांना अगदी रडू आलं होतं.
एक ठक्करभाभी राहायच्या आम्ही लहान असताना शेजारी, त्या खाटा ढोकळा मस्त करायच्या आणि नेहेमी द्यायच्या. त्यांनापण जाऊन काही वर्ष झाली. मध्यंतरी त्यांच्या सुनेशी गप्पा मारताना हि आठवण सांगितली तर सुनेने अगदी आम्हाला बोलावले घरी आणि तसा ढोकळा केला.
धन्यवाद आरती. फार छान एकेकाचं वाचायला मिळतंय.
अन्जु
अन्जु
अन्जु किती गोड!
अन्जु किती गोड!
अन्जू, खूपच टचिंग आहे हे
अन्जू, खूपच टचिंग आहे हे
रानात जाऊन तिथेच मसालेभात
रानात जाऊन तिथेच मसालेभात करून हाणायचा अनुभव भारी असतो. आम्ही असा भात अनेकदा केला आहे. विशेषत: हिवाळ्यात शेतात जेंव्हा वाटाण्याच्या शेंगा, हिरव्या हरभर्याचे दाणे, पावटे, इत्यादी आलेले असते तेंव्हा अश्या ताज्या ताज्या जिन्नसा घालून केलेला गरम गरम भात म्हणजे. :स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प !
याशिवाय माझ्या शाळेतल्या वनभोजनाच्या आठवणीही जाग्या झाल्या. मी मागे माझ्या रंगीबेरंगी पानावर त्या लिहिल्या होत्या.
खुप छान धागा. तोपासु होत
खुप छान धागा. तोपासु होत वाचताना.
चटणी वरून मला लहानपणीची पाट्यावर वाटालेली चटणी आठवते. ओल्या खोबर्याचे तुकडे, करवंद किंवा कैर्यज, जाडे मिठ आणि मिरची, जराशी कोथिंबीर असे सगळे वाटून अगदी तोपासू चटणी लागायची.
माझी आजी ताकाची कढी, लोणच छान बनवायची. आई वालाच बिरड बनवायची ते मी नुसत खायचे. आई केकही छान बनवायची, पॅटीस तर काय चवदार करायची. आता तिला होत नाही तेवढ नाहीतर आजच माहेरी जाऊन करुन मागीतले असते.
वडील भर पावसात गरमागरम तव्यावर बोंबील तळून द्यायचे तेही अप्रतिम.
माझी एक मैत्रीण ज्वारीची भाकरी आणे ठेचा आणते. इतका चविष्ट असतो ना. मला तसा जमतच नाही प्रमाण इकडे तिकडे करून केल तरी. ती सगळ अंदाजेच करते पण खुप चविष्ट.
एक मैत्रीण आप्पे छान बनवते तर एक सुरळीच्या वड्या. काही जणांचे अगदी साधे साधे पदार्थही खुप रुचकर लागतात.
गजानन मसालेभात सॉलीड, तों पा
गजानन मसालेभात सॉलीड, तों पा सु.
जागु चटणीचं वर्णन भारी.
गजानन यांनी लिहीलेला मसालेभात आणि सोबत जागुची चटणी असं वनभोजन करायला जाम मज्जा येईल.
धाग्याचा विषय सेंटी करणारा
धाग्याचा विषय सेंटी करणारा आहे.
आईच्या हातचे डाळवांगे, कांदेपोहे, साबूदाण्याची खिचडी, पाकातल्या पुर्या, आमटी भात, मुगाच्या डाळीची खिचडी, चाकवताची भाजी इ. आता थांबते नाहीतर बाकीच्या नातेवाईकांसाठी जागा पुरणार नाही.
आजीच्या हातची गव्हाची खीर, डिंकाचे लाडू. दुसर्या आजीच्या हातच्या पोळ्या, कुळीथ पिठी.
आत्याने केलेले दडपे पोहे. चुलतभावाच्या बायकोने, वहिनीने केलेले आलूपराठे, इंदोरी पद्धतीचे पोहे.
काकूने केलीली भाताची पेज, आंब्याची डाळ, कोकम सरबत. मोठ्या काकूच्या हातची आमटी व कोणतीही पालेभाजी.
मामींच्या हातचे छोले भटुरे. मावशीच्या हातचे रव्याचे ताक घातलेले आप्पे, मुडाखि.
वरच्या मजल्यावर राहणार्या काकूंनी केलेला शिरा.
दक्षिण भारतीय मैत्रिण राधिकेच्या हातची इडली चटणी, दुसर्या मैत्रिणीच्या हातची पावभाजी.
सासूबाईंच्या हातचे पिठले, रस्सा भाजी.
जाऊबाईंकडे स्वयंपाकास येणार्या बाईंच्या हातची मिसळ व वरील सगळे पदार्थ त्या त्या माणसांनी केले की अप्रतिम, बाकी काही नाही.
स्वहस्ते केलेले सगळेच पदार्थ
स्वहस्ते केलेले सगळेच पदार्थ मला आवडतात.
जेव्हा करण्यत काही चुक झाली तर च आवडत नाहीत.
माझ्या सासूबाई
माझ्या सासूबाई पीठवांगं(वांगयाची पीठ भरलेली भाजी नव्हे, पीठा त सारण भरुन खमंग परतलेले वांग्याचा आकार दिलेले गोळे. एकदम एक नंबर.
mi_anu पा.कृ. हव्वीच
mi_anu पा.कृ. हव्वीच पीठ्वांग्याची.
माझ्या हातानी केले नाही कृती
माझ्या हातानी केले नाही कृती पण विचारुन टाकते इथे☺☺
मला माझ्या मम्मीच्या हातचे
मला माझ्या मम्मीच्या हातचे सगळेच पदार्थ फार आवडतात. आत्ता कोणाला सांगून खर वाटणार नाही पण ती जेव्हा लग्न करून आली तेव्हा ती फक्त १६-१७ वर्षांची होती आणि जेवण अजिबातच बनवता येत नव्हत. पण पप्पांनी तिला शिकवलं आणि माझ्या आज्जीनेही. आणि थोड्याच वर्षात ती अगदी सुगरण झाली इतकी कि गावी आमच्या घरी ती एका वेळेला ५० - ५० जनांचा स्वयंपाक एकटी करायची.
माझी मम्मी सगळेच पदार्थ छान बनवते. त्यातल्याच काही पदार्थांची यादी:
१. लाल मिरचीची चटणी अगदी क्लास
२. पातळ पोह्यांचा चिवडा
३. खमंग कांदेपोहे
४. पाणी अजिबात न वापरता केलेलं सुक चिकन
५. कोलंबी मसाला
५. फिश फ्राय
६. दडपे पोहे
७. सांभर
८. वांग फ्राय (कुट आणि मसाला लावलेलं)
अजून बरेच आहेत.
माझी ताई पण छान जेवण बनवते काही पदार्थ तिच्या हाताचेच छान लागतात. (मम्मीला जमत नाही तसे ) ताईच्या हातचा हिरव्या मिरचीचा ठेचा, वांग्याचं भरीत, मंचुरियन मस्तच लागत.
आणि माझ्या मम्मीला जिने स्वयंपाक शिकवला ती माझी आज्जी (दुर्दैवाने ती आज हयात नाही आहे)
मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल कि किती मज्जा यायची. माझी आज्जी सकाळपासून चुलीजवळ बसून असायची. सकाळी सकाळी चुलीवर्ती मस्त गरम गरम भाकरी भाजायची आणि त्या लुसलुशीत भाकरी बरोबर कधी कधी साखर घातलेलं दुध नाहीतर दही किवा कधी मस्त पाट्यावर वाटलेली लाल मिरचीची चटणी नाहीतर त्याच तव्यावर परतलेली सुकत नाहीतर मस्त चुलीत भाजलेला बोंबील. अहाहा... स्वर्गसुख. पावसाळ्यात खेकडी मिळायची आज्जी पीठ भरलेली खेकडी बनवायची आणि आम्ही जास्तच लाळघोटेपणा केला कि मग एखादा खेकडा चुलीत भाजून द्यायची.
आज्जी गेली आणि हे सगळ संपल. आजहि कधी गावी गेल कि अस वाटत कि चुलीजवळ ती बसली आहे आणि मला गरम गरम भाकरी भाजून देते आहे. (तो परातीत भाकरी बडवण्याचा आवाज आजही कानात आहे)
Pages