कोरडी चटणी करायची असेल तर बरेचदा मी खोबऱ्याची किंवा मग तीळ+खोबर+दाणे अशी एकत्र करते. आज सकाळी बरेच दिवसांनी थोडी जाडसर अशी फक्त दाण्याचीच केली. आणि मग खाताना आमच्या लहानपणी जवळच राहणाऱ्या एका काकूंची आठवण आली म्हणजे आलीच. त्यांच्या घरी ही चटणी रोssssज असायची. अगदी कमी तिखट करायच्या त्या. ती रोज असण्याची दोन कारणं होती. पहिले, मुलांना कधीही भूक लागली की त्यांना चटणी-पोळी खाता यावी हे आणि दुसरे म्हणजे ते काका 'पाटबंधारे' खात्यात नोकरीला होते, त्यामुळे शेंगदाण्याची पोती 'घरपोच' यायची. असो.
.
सगळ्यांच्याच जिभेवर आपापल्या आईच्या 'हाताची' चव रेंगाळत असतेच. पण तरी असे अनेक पदार्थ असतात जे खाल्ल्यावर किंवा नुसतेच समोर किंवा बोलण्यात आल्यावर एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण हमखास येते. म्हणजे अक्षरशः एकेका व्यक्तींची नावं एकेका पदार्थाला कायमचीच जोडली गेलेली असतात.
.
घरी मुलांसाठी वेगळा स्वयंपाक होत नसल्याने बहुतेक सगळ्या भाज्या आम्ही खात असू तरी पुष्कळ लहान होते तेंव्हा 'गवार' माझी नावडती होती. ताटात वाढलेल्या आमटी / कोशिंबीर / कढी कशावर तरी भार टाकून पहिल्यांदा वाढलेली तेवढी संपवायची, इतकेच. एकदा सुट्टीत आत्याकडे गेले होते. बाहेर पटांगणात चिक्कार धुडगूस घालून आल्यावर जेवायला बसले. त्यादिवशीचा स्वयंपाक माझ्या आत्येबाहीणीने, अंजुताईने, केला होता. कडकडून भूक लागली होती. एकीकडे पोळ्या करता करताच तिने ताट वाढले. ताटात गरम पोळी आणि भाजी मात्र गवारीची. भूक तर प्रचंड लागलेली, त्यात 'कुणाकडे गेल्यावर हट्ट करायचा नसतो' हे वाक्य अगदी तोंडीपाठ. त्यामुळे गुपचूप जेवायला सुरुवात केली. पण मग भाजी मात्र खूपच आवडली. तेंव्हापासून आजपर्यंत गवार आवडतेच. आणि तिची जशी किंचित पिवळसर झाली होती तसा कढईतल्या भाजीचा रंग दिसला की लगेचच तिची आठवण पण येतेच.
.
आंबट-गोड आमटी अनेकांच्या हातची खाल्ली. पण आमची एक मामी आहे तिच्या सारखी आमटी होणे नाही. तिच्याघरी मी नेहमीच घासभर पोळी कमी खाऊन मनसोक्त आमटी भात खायचे. मी अनेकदा 'ती' आमटी डोळ्यासमोर आणून करायचा प्रयत्न करते, तरीही तशी चव काही येत नाही. पण आठवण मात्र येतेच.
.
आमच्या बाबांचे एक मित्र होते. त्यांना आम्ही, आमचे आई-बाबा, आणि गावातले बहुतेक सगळेच मामा म्हणायचे. ते श्रीरामपूर पासुन जवळच टिळकनगर शुगर फॅक्टरीवर राहायचे. आम्ही कधीतरी शनिवार-रविवार मामींकडे रहायला जायचो. ताटात काहीतरी गोड हवेच असा मामींचा नियम असायचा. त्यामुळे वेगळे काही केलं नसेल तर त्या साखरआंबा वाढायच्या. इतर सगळे करतात त्याच पद्धतीने केलेल्या त्यांच्या साखरआंब्याची चव काही वेगळीच असायची. इतकी मधुर चव पुन्हा कधीच कुठेच खायला मिळाली नाही. पण कैरी किसून केलेला साखरआंबा आणि मामींची आठवण हे समीकरणच होऊन बसले आहे.
.
आमच्या कॉलनितल्या एका काकुंचे माहेर गुलबर्ग्याचे होते. त्यामुळे त्या बरेचदा चित्रान्न करयच्या. तेव्हा एकमेकांच्या घरी 'चव' देण्याची पद्धत होती. आणि मग नंतर मला आवडते हे कळाल्यावर त्या आवर्जून आमच्या घरी पाठवायच्या. म्हणजे श्रीरामपूरला असे पर्यंत मी चित्रान्न खाल्ले ते फक्त त्या काकूंच्या हातचेच. आता माझ्या करण्यात पण ते नेहमीच असते पण अजूनही त्याला नाव मात्र आंबेकर काकुंचेच आहे.
.
अजुनही बरेच पदार्थ असतील. पण ट्रेनची वेळ होईपर्यंत झरझर सुचले ते हे इतकेच .........
.
आता बाकी सगळ्यांचे ऐकते
.
पदार्थांच्या आठवणी. .....
Submitted by आरती on 12 March, 2016 - 13:34
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त धागा आहे. आजोळी ,
मस्त धागा आहे.
आजोळी , बेळगाव ला भरपूर पाहुणे मंडळी असली की आजी भाकर्यांसाठी एका गुब्बी नावाच्या मावशीना बोलवायची. टम्म फुगलेल्या , , गार झाल्यावरही वातड न होणार्या , बेस्ट , तांदळाच्या भाकर्या करायची ती.
काळे वाटाने घातलेल तांदळाच्या रव्याच उपिट. - ही पण आजोळ स्पेशालीटी. आजी इतकच भारी मामी ही करते. तितक्यात मायेनी अन मला आवडत म्हणून आठवण ठेउन.
माझ्या लहानपणी घरी कांदालसूण ही नसे सहसा जेवणात. उकडलेल्या बटाट्याची , मसाला डोश्याची भाजी म्हणजे माझ्या घरी वाढदिवसाची फिस्ट ! अजूनही ती भाजी म्हणजे फिस्ट वाटते.
ट्रेक ची खिचडी! - ती काटक्या जमवून , प्रयत्नांती विस्तव करून , दहा जणांनी आणलेला शिधा एकत्र करून केलेली खिचडी! अहाहा. पहिल्यांदा हीची चव घेतली तेव्हा, मी आठवीत होते, रस्ता चुकला होता राजगडावर जाताना. त्यामुले रात्रीचा गड चढलो होतो, अतीभयंकर भूक लागली होती. फार छान खिचडी होती अन शिध्याचा अंदाज चुकल्यानी ते एकमेव भरपेट जेवण असणार होतं . कॅम्प फायर मधे भाजलेले कांदे , बटाटे ! गाणीच आठवायला लागतात, अन दिसतात पिवळ्या केशरी उजेडात दिसणारे रापलेले , दमलेले पण उत्साहानी ओसंडून वाहणारे चेहरे.
कोकणातल्या गणापतीला केलेल्या पातोळ्या , मोदक , कंदमूळ, आंबाड्याच रायत ं, अगदी सेम सामग्री घेउन त्याच लोकांनी पुण्याच्या घरात केलं तर चव बदलते.
अजूनही बर्याच आहेत आठवणी- एक निगेटिव्ह आठवणलहा नपणी आईबरोबर लक्ष्मी रोड तुळशीबाग ,पिशव्या ओझी घेउन कावरे मधे थंडाइ घेतली होती. घरी येइपर्यंत सणसणू न ताप आला, अन शेवटी टाय्फॉइड्च निदान झाल होत. त्या कावर्यांच्या थंदाइचा काहीच दोष नसला तरी ती बडीशोप , खसखस वगैरेची चव मला फार नकोशी वाटाते अजूनही.
"थंडीतले शेंगोळे" लहान
"थंडीतले शेंगोळे"
लहान पणापासुन आमच्या घरी थंडीत शेंगोळे केले जातत. हुलग्याच्या पिठाचे हे शेंगोळे लसणाची फोडणी घालुन नुसतेपण खायला खुप छान लगतात. माझी आजी फार सुरेख स्वय्ंपाक करायची, तिच्या हाताच्या शेंगोळ्यांची चव आमच्या हातला येत नाही.
माझ्या शाळेत एक गुजराती
माझ्या शाळेत एक गुजराती मुलगी होती. बसनी जाताना एकत्र जायचो आम्ही. तिच्या डब्यात खाकर्याचा चुरा अन दाण्याची चटणी असायची. तिला कधीच खाउ दिला नाही आम्ही तिचा डबा.
लहाणपणी आजोळची आजी जाड साय
लहाणपणी आजोळची आजी जाड साय भरपूर घालून मला दूधभात भरवायची. नुसते दोनच पदार्थ - दूध आणि भात. त्या दूधभातासारखी चव आणण्याचा पुढे असंख्यवेळा प्रयत्न केला, पण ती तशी चव काही कधी जमली नाही.
इकडची आजी रोज ताक करून झाल्यावर हाक मारून बोलावायची आणि हातावर लोण्याचा गोळा खायला द्यायची आणि नंतर माठाला आणि रवीला चिकटलेले लोणी बोटाने पुसून काढून चाटवायची. त्यामुळे कुठेही लोणी असा शब्द ऐकला/वाचला तरी मला माझी आजी आठवते.
तसेच तांदळाच्या पिठाचे उकडलेले कानवले करताना सारण न घालताच आजीने केलेल्या छोट्या छोट्या वाटीच्या आकाराच्या "फळांची" चवपण पुनर्निर्मिती न करता येणार्या कॅटेगिरीतली.
आमच्या जन्मापर्यंत मुख्य स्वयंपाकातून दोन्ही आज्या बर्यापैकी बाहेर पडलेल्या असल्याने त्यांचे पदार्थ सध्या एवढेच आठवले.
वरची इन्नाची पोस्ट वाचून आठवले. अभियांत्रिकीला आमच्या वर्गात एक आंध्राचा मुलगा होता, निरंजन. तो टोमॅटो, वांगी आणि बटाट्याची मिक्स पातळ भाजी प्लॅस्टीकच्या बंद पिशवीतून आणायचा. त्याची चव एकदम वेगळी आणि मस्त असायची. किती खाऊ असे वाटायचे.
आम्हाला पण बटाट्याचं सारण
आम्हाला पण बटाट्याचं सारण भरून केलीली शिम्ला मिर्ची आणि उपवासाची कचोरी म्हटलं की त्या ह्यांचीच आठवण होते
कितीही वेळा केली तरी त्यांच्या हाताची चव येत नाही हे सांगायला नकोच.
लहाणपणी आजोळची आजी जाड साय भरपूर घालून मला दूधभात भरवायची >>> माझी आई असं मला, धाकट्या बहिणीला आणि भावाला भरवायची. खरं तर ती दोघं आईनं भरवून जेवायच्या वयाची होती तेव्हा मी घोडबाळ म्हणायच्याही पार होते (असं आत्ता ही पोस्ट लिहितानाच जाणवलं :)) तरी बसून नेटानं साय चांगली कुस्करून घातलेली दूध-पोळी किंवा दूध-भाकरी आणि खास ल्हान्यांसाठी केलेली कमी तिखटाची खोबर्याची चटणी चापायचे.
आईच्या हातचा दूध-दही-साय भात.
आईच्या हातचा दूध-दही-साय भात. किंचित हिरव्या मिरचीचा ठेचा / तळलेली सांडगी मिरची चुरडून किंवा मिरचीच्या लोणच्याचा खार चवीला. कधी आंब्याच्या लोणच्याची फोड. ती चव अशक्य व स्वर्गीय.
आजीच्या हातचा ताक-भात. त्यात ती चवीला मिठासोबत चिमटीभर साखरही घालायची, आणि दाण्याची चटणी. तिने कालवलेला भात फार जबरी लागायचा.
आईच्या हातचा बेसनलाडू, मसालेभात, कां ब टो रस्सा, दडपे पोहे, तिळाच्या मऊ वड्या, कैरीचे पन्हे
काकूच्या हातचे बहुतेक सर्वच पदार्थ स्वादिष्ट असतात. पण आम्ही लहान असताना सणासुदीला ती जो साखरभात करायची तो फार सुंदर चवीचा असायचा.
काय पण आठवण काढलिएस! आईच्या
काय पण आठवण काढलिएस!
आईच्या हातचं कार्ल्याचे काप खरपूस करून मग ते वापरून केलेलं फोडणीचं वरण; चिंच/कोकम, गूळ आणि अगदी थोडा काळामसाला घातलेली आमटी, गरम पराठे, लसणाची, तिळाची, दाण्याची चटणी, पूडचटणी असे बरेच आहेत. आजीच्या हातची साबुदाण्याची खिचडी, मेथीची गोळाभाजी, मिरच्यांचा खुडा, उरलेल्या वरणाचा कालवलेला गोळा, फोडणीची पोळी, गूळपोळी, अनरसे, लोण्याचं मोहन घातलेल्या चकल्या इ इ
हे प्रकार मी करत नाही असे नाहीच पण 'ती' चव काही केल्या येत नाही.
फारच सुंदर लिहिलं आहेस आरती.
फारच सुंदर लिहिलं आहेस आरती. मन एकदम काहूरलं आठवणींनी. माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग म्हणजे त्याचं पोट हे कित्ती खरं आहे हे तुझ्या लेखावरून पुन्हा एकदा पटलं.
मी फार खाण्याची शौकिन नाही पण काही मोजके पदार्थ ज्या त्या व्यक्तिच्या हातचेच आवडतात खूप.
सर्व स्वयंपाक - माझी बहिण सई फार सुंदर स्वयंपाक करते आणि तो मला प्रचंड आठवतो. तिच्याकडे गेलं की आपल्याला एकच पोट का आहे असा प्रश्न जरूर पडतो. तिचं निगुतीनं चिवडे करणं, प्रेमाने ते भाजणं. जनसेवा सारखा उपमा करून पाहणं. तुप कढवणं हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसून सुद्धा तिच्या तुपाची चवच वेगळी. तिने कालवून दिलेला आमटी भात असो, अथवा दुध भात, त्याला तोड नाही.
तिने काहीही कढईत फेकावं, हलवावं, मीठ साखर घालावी. भाजी अप्रतिम झालीच पाहिजे. खव्याच्या पोळ्या, बेसनाचे लाडू असे कोणकोणते पदार्थ सांगू? विशेष म्हणजे कित्येक वर्ष माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तीने माझ्या आवडीचा सुधारस करून खाऊ घातला आहे.
कांदा पोहे - माझी खुप जवळची मैत्रिण सीमा, पोहे खूप सुंदर बनवते, तसे पोहे मी तिच कृती अवलंबून करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती चव येत नाही, माझ्या बाई ने पोहे केले तर आवर्जुन विचारते शीमा मॅडम सारखे झलेत का? मि उंहू म्हणलं की बिचारी हिरमुसते. गेली ३.५ वर्ष ती शीमा मॅडम सारखे पोहे करायचा प्रयत्न करते आहे. या शिवाय सांडग्यांची भाजी, साबुदाणा खिचडी, थालिपीठ पण ती उत्तम करते.
खांतोळ्या आणि पुरणाची दिंडी - करावी तर माझ्या काकूने असाच माझा समज अजूनही आहे. ती आज या जगात नाही पण या पदार्थांच्या आठवणी तिच्या हातच्याच आहेत आणि त्या कायम राहतील.
वा, काय मस्त मस्त आठवणी
वा, काय मस्त मस्त आठवणी सांगितल्या आहेत सगळ्यांनी. मजा आली वाचायला.
सगळ्यांचे मनापासुन आभार.
बटाट्याचं सारण भरून केलीली शिम्ला मिर्ची >> सिंडरेला, लेटेस्ट रिपोर्ट नाही का तुझ्याकडे
दक्षिचं वाचून आता सईकडे
दक्षिचं वाचून आता सईकडे जेवायला जावसं वाटतंय. नक्की जाईन एकदा. मस्त लिहिलंय.
सर्वांनी छान लिहिलंय.
फार सुंदर आठवणी, सर्वांच्याच.
फार सुंदर आठवणी, सर्वांच्याच. यापैकी बहुतेक पदार्थ साधे, नेहमीच्या करण्यातले.. पण त्यावर पसरलेला जिव्हाळा, प्रेम, निगुती, आपुलकी.. अहाहा !!!
दक्षे, खव्याच्या पोळ्या सांग
दक्षे, खव्याच्या पोळ्या सांग ना विचारून.
मेधे तु विपु करून विचार की.
मेधे तु विपु करून विचार की. गुळाच्या पोळ्या लिहायच्या राहिल्या. त्याची पण रेसिपी विचारून टाक तिला लगेच .
एक (सख्ख्या) काकू होत्या..
एक (सख्ख्या) काकू होत्या.. त्यांच्या हातची 'कढी' (ताकाची) हा एक अजब प्रकार होता. ना आईला कधी जमली ना अजून कुणाला. साध्या भातावर गरम गरम ताकाची कढी.. आ हा हा...
तसेच आजी कुंडल्यात (मातीच्या मडकीत) डाळ करायची. असली डाळ पुन्हा कधीच कुठेच खायला मिळाली नाही.
मस्त आहेत सर्व पदार्थांच्या
मस्त आहेत सर्व पदार्थांच्या आठवणी ..
माझ्या आईच्या पुर्या सगळ्यात बेस्ट, दडपे पोहे ही ..चिंच गुळाच्या आमटीलाही तिच्या हातची चव दुसरीकडे येणे नाही .. मी जरी तीनेच केलेला गोडा मसाला वापरत असले तरिही नाही ..
माझ्या आजेसासूबाईंनीं असाच फक्त माझ्यासाठी म्हणून स्पेशल केलेला दुधी हलवा होता .. माझ्या मावशीने एकदा दिल्ली गाजरांचा हलवा केला होता आम्ही जाणार म्हणून .. त्या दोन्हीं हलव्यात खरंतर खवा बेतास बातच होता पण चव मात्र काय अप्रतिम होती .. मी करते तर कधीही तशी चव येत नाही .. हर प्रकारे खवा घातला, तुपावर भाजून, नुसताच, कमी, जास्त पण अजिबात तशी चव नाही ..
माझ्या सासूबाई लोण्याखालचं ताक हमखास पालकाच्या ताकातल्या पातळ भाजीकरता वापरतात .. हे लोण्याखालचं ताक खरंतर एकदम "सेकंडरी" इम्पॉर्टन्स चं पण त्या पालकाच्या भाजीला काय चव असते!
माझी मावशी सगळे चमचमीत, चटपटीत पदार्थ अगदी खास करते .. आणि तिची अजून एक स्पेशाल्टी म्हणजे तळलेल्या खार्या पुर्या (शेवपुरीच्या असतात तशा ) .. बेस्ट!
माझं सासर, विशेषतः नवर्याचं आजोळ, आईकडचे सगळे नातेवाईक कोकणातले .. सगळेच कोकण स्पेशल पदार्थ माझ्या आवडीचे आहेत असं नाही आणि ज्या पदार्थाबद्दल आता लिहीत आहे तो काही खास कोकणा तला असंही नाही म्हणता येणार .. पण नात्याने माझ्या मावस सासुबाई असलेल्या नवर्यापेक्षा अगदी काहीच वर्षे मोठ्या असलेल्या सासुबाईंच्या मामे बहिणीच्या स्वैपाकालाही एक खास अशी चव असते असं खूप ऐकून होते .. जेव्हा त्यांच्याकडे देवरुखला पहिल्यांदा गेलो तेव्हा तीने वांग्याचं कच्चं भरीत (वरून हिंगजीर्याची फोडणी, कच्चा कांदा घातलेलं) केलं होतं .. त्याची चव अजूनही जीभेवर आहे .. भन्नाट होती चव ..
दीराचं लग्न होतं त्यादिवशी सर्व जण नव्या नवरीला घेऊन घरी परत आलो पण लाईट नाहीत (मुंबईतल्या घरी!!) .. गृहप्रवेश मेणबत्त्यांत आणि बॅटरी पॉवर्ड लॅन्टर्न मध्ये .. सगळे खूप दमले होते .. मग रात्रीच्या जेवणाला मावशी बाई (इन लॉ ) नीं साधं चण्याच्या डाळीचं पिठलं आणि भात केला होता .. काय अप्रतिम चव!!!
आणि शेवटची विचित्र आठवण म्हणजे आमच्याकडे तेराव्या च्या जेवणांत एक आमसुलाची चटणी करतात .. मी काय अशी जेवणं खूप जेवलेले नाही .. फक्त मोजून दोनदा आणि स्वैपाक करणारी माझी आईच .. तर त्या आमसुलाच्या चटणीची चवही भारी आवडली होती मला .. ह्या दोन जेवणांव्यतिरीक्त कधीही झाली नाही ती चटणी ..
आमसुलाची चटणी >> +१ एकदाच
आमसुलाची चटणी >> +१ एकदाच खाल्लेली आठवते. पण एकदम भारी.
घरी आजी पासून सगळे म्हणायचे ती चटणी तेराव्यालाच केली पाहिजे असं नाही, सगळ्यांना आवडायची. पण केली मात्र कुणी नाही.
ह्या दोन जेवणांव्यतिरीक्त
ह्या दोन जेवणांव्यतिरीक्त कधीही झाली नाही ती चटणी>>> एरवी करु नये असा सन्केत असल्याने असेल.
माझी आई अतिशय निगुतिची आणी उरकाची, त्यात ७० च्या पुढे आहे तरी वेगवेगळ पदार्थ करुन बघायचा प्र्च्न्ड उत्साह ... त्यामूले तिच्या हातच सगळच खास असत.. तरी तिच्या हातच तिळ-दाणेकूट घातलेले पन्चाम्रुत माझ्या अतिआवडिच, तोन्डात अगदी विरघळणारे बेसन लाडु करावे ते तिनेच, तसच मेथिची दाणे कुट घात्लेली पातळ भाजी पण फार चविची होते...
माझी एक मैत्रीण हापुस आन्ब्याचा साखराबा करते , अतिशय सुमधुर असतो तो.
लहानपणी आम्ही सुट्टित आजिकडे जायचो ...तिथल चुलिवर केलेले साध वरण अतिशय चविष्ट लागायच ... साध्या वरणाची तशी चव परत अनुभवली नाही.
ती आमसुल चटणी माझ्या एक
ती आमसुल चटणी माझ्या एक नात्यातल्या आजेसासूबाई (मिस्टरांची मावसआजी) करतात. त्या कधीही करतात ती...असं तेराव्यालाच करायची असं नाहीये. यम्मी असते ती चटणी..मीही घरी ट्राय केली पण तशी चव नाही आली.
आमसुलाची चटणी ही आजारी
आमसुलाची चटणी ही आजारी माणसाना(ही) खायला देतात. तेव्हा 'तेरावे' असण्याची गरज नाही..
गोगा, म्हणजे कणेकर म्हणतात
गोगा, म्हणजे कणेकर म्हणतात तसं, माणूस जायच्या आधीच फडफडायला दिवा लावतात हिंदी पिक्चारात तसं झालं का? :D:
नंतर खाणारे आपणच म्हणून
नंतर खाणारे आपणच म्हणून आजार्याला आधीच देत असावेत
ए चला हटा, इस्टर्न टायमातले
ए चला हटा, इस्टर्न टायमातले फाको राइट्स माझ्याकडे आहेत सांगितलं ना.
अमित, इकडे कोणी नावडत्या
अमित,
इकडे कोणी नावडत्या आठवणी लिहीत नाही आहे ..
बेसन भरून केलेल्या भरल्या भोपळी मिरच्या आणि भरलं पडवळ अशा भाज्या मी दोन (वेगळ्या) कोकण स्पेशल घरी खाल्ल्या आहेत .. पण मला अजिबात आवडत नाहीत अशा बेसन भरून केलेल्या भरल्या भाज्या ..
अजून एक म्हणजे, एका मानलेल्या नणंदेकडे आम्हाला फार प्रेम, माया ममतेने बोलावलं होतं .. आलू पराठे होते चटणी आणि दह्यासोबत .. मस्त झाले होते .. मग डेझर्ट करता त्यांनीं कोबीचा कलाकंद केला होता .. आता खरंतर कोबी घालून कलाकंद केला आहे ह्या कल्पनेनेच तो आवडेनासा होईल .. पण चव इतकी गयीगुजरी नव्हती .. (तरिही भाज्या खायचा अट्टाहास म्हणून अशी ट्रीटमेन्ट कलाकंदाला देऊ नये असंच म्हणेन मी .. ;))
फडफडायला दिवा लावतात हिंदी
फडफडायला दिवा लावतात हिंदी पिक्चारात तसं झालं का? >>>> इतके दिवस नाही टिकत ती चटणी....
कोबीचा कलाकंद केला होता >> नाते लक्षात घेऊन केला असेल..
गोगा, (असंच काही नाही हां ..
गोगा,
(असंच काही नाही हां .. प्रेम माया ममता वहाँ भी थी, और यहाँ भी ..
)
(No subject)
(No subject)
पण नात्याने माझ्या मावस
पण नात्याने माझ्या मावस सासुबाई असलेल्या नवर्यापेक्षा अगदी काहीच वर्षे मोठ्या असलेल्या सासुबाईंच्या मामे बहिणीच्या स्वैपाकाला <<< बापरे, सशल! कसली कोडी घालतेस?

मामे सासुबाई की मावस सासूबाईच म्हणायचे आहे?
मी मागच्या वविमधे सईच्या
मी मागच्या वविमधे सईच्या डब्यातला एक पोळ्यांचा लाडू खाल्ला होता तो इतका अप्रतिम झाला होता तेंव्हाच ओळखले होते की सई सुगरण आहे. ते आता दक्षिणाकडून उघडकीस आलेच आहे. सई तू जर हे वाचत असेल तर पुढल्या वेळी तुझ्याकडे मी हे सगळे पदार्थ खायला येऊ का
सशल, अजून एक म्हणजे, एका मानलेल्या नणंदेकडे आम्हाला फार प्रेम, माया ममतेने बोलावलं होतं>> बापरे नंदा वगैरे पण मानल्या जातात का?
आई बट्ट्या छान
आई बट्ट्या छान करते.(राजस्थानी दाल बाटी नव्हे, नुसत्या कणकेच्या तुपावर खरपूस भाजलेल्या कुकीज सारख्या सपाट बाट्या.) या बट्ट्या, फोडणीचे वरण आणि थोडे तूप...आवडते फ्रायडे नाईट मेनु.
आईचा मेजवानी परीपूर्ण किचन मध्ये १० मिनीटाचा कार्यक्रमही झाला होता मसाला बाटी वर ३ वर्षापूर्वी.
Pages