पदार्थांच्या आठवणी. .....

Submitted by आरती on 12 March, 2016 - 13:34

कोरडी चटणी करायची असेल तर बरेचदा मी खोबऱ्याची किंवा मग तीळ+खोबर+दाणे अशी एकत्र करते. आज सकाळी बरेच दिवसांनी थोडी जाडसर अशी फक्त दाण्याचीच केली. आणि मग खाताना आमच्या लहानपणी जवळच राहणाऱ्या एका काकूंची आठवण आली म्हणजे आलीच. त्यांच्या घरी ही चटणी रोssssज असायची. अगदी कमी तिखट करायच्या त्या. ती रोज असण्याची दोन कारणं होती. पहिले, मुलांना कधीही भूक लागली की त्यांना चटणी-पोळी खाता यावी हे आणि दुसरे म्हणजे ते काका 'पाटबंधारे' खात्यात नोकरीला होते, त्यामुळे शेंगदाण्याची पोती 'घरपोच' यायची. Happy असो.
.
सगळ्यांच्याच जिभेवर आपापल्या आईच्या 'हाताची' चव रेंगाळत असतेच. पण तरी असे अनेक पदार्थ असतात जे खाल्ल्यावर किंवा नुसतेच समोर किंवा बोलण्यात आल्यावर एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण हमखास येते. म्हणजे अक्षरशः एकेका व्यक्तींची नावं एकेका पदार्थाला कायमचीच जोडली गेलेली असतात.
.
घरी मुलांसाठी वेगळा स्वयंपाक होत नसल्याने बहुतेक सगळ्या भाज्या आम्ही खात असू तरी पुष्कळ लहान होते तेंव्हा 'गवार' माझी नावडती होती. ताटात वाढलेल्या आमटी / कोशिंबीर / कढी कशावर तरी भार टाकून पहिल्यांदा वाढलेली तेवढी संपवायची, इतकेच. एकदा सुट्टीत आत्याकडे गेले होते. बाहेर पटांगणात चिक्कार धुडगूस घालून आल्यावर जेवायला बसले. त्यादिवशीचा स्वयंपाक माझ्या आत्येबाहीणीने, अंजुताईने, केला होता. कडकडून भूक लागली होती. एकीकडे पोळ्या करता करताच तिने ताट वाढले. ताटात गरम पोळी आणि भाजी मात्र गवारीची. भूक तर प्रचंड लागलेली, त्यात 'कुणाकडे गेल्यावर हट्ट करायचा नसतो' हे वाक्य अगदी तोंडीपाठ. त्यामुळे गुपचूप जेवायला सुरुवात केली. पण मग भाजी मात्र खूपच आवडली. तेंव्हापासून आजपर्यंत गवार आवडतेच. आणि तिची जशी किंचित पिवळसर झाली होती तसा कढईतल्या भाजीचा रंग दिसला की लगेचच तिची आठवण पण येतेच.
.
आंबट-गोड आमटी अनेकांच्या हातची खाल्ली. पण आमची एक मामी आहे तिच्या सारखी आमटी होणे नाही. तिच्याघरी मी नेहमीच घासभर पोळी कमी खाऊन मनसोक्त आमटी भात खायचे. मी अनेकदा 'ती' आमटी डोळ्यासमोर आणून करायचा प्रयत्न करते, तरीही तशी चव काही येत नाही. पण आठवण मात्र येतेच.
.
आमच्या बाबांचे एक मित्र होते. त्यांना आम्ही, आमचे आई-बाबा, आणि गावातले बहुतेक सगळेच मामा म्हणायचे. ते श्रीरामपूर पासुन जवळच टिळकनगर शुगर फॅक्टरीवर राहायचे. आम्ही कधीतरी शनिवार-रविवार मामींकडे रहायला जायचो. ताटात काहीतरी गोड हवेच असा मामींचा नियम असायचा. त्यामुळे वेगळे काही केलं नसेल तर त्या साखरआंबा वाढायच्या. इतर सगळे करतात त्याच पद्धतीने केलेल्या त्यांच्या साखरआंब्याची चव काही वेगळीच असायची. इतकी मधुर चव पुन्हा कधीच कुठेच खायला मिळाली नाही. पण कैरी किसून केलेला साखरआंबा आणि मामींची आठवण हे समीकरणच होऊन बसले आहे.
.
आमच्या कॉलनितल्या एका काकुंचे माहेर गुलबर्ग्याचे होते. त्यामुळे त्या बरेचदा चित्रान्न करयच्या. तेव्हा एकमेकांच्या घरी 'चव' देण्याची पद्धत होती. आणि मग नंतर मला आवडते हे कळाल्यावर त्या आवर्जून आमच्या घरी पाठवायच्या. म्हणजे श्रीरामपूरला असे पर्यंत मी चित्रान्न खाल्ले ते फक्त त्या काकूंच्या हातचेच. आता माझ्या करण्यात पण ते नेहमीच असते पण अजूनही त्याला नाव मात्र आंबेकर काकुंचेच आहे. Happy
.
अजुनही बरेच पदार्थ असतील. पण ट्रेनची वेळ होईपर्यंत झरझर सुचले ते हे इतकेच .........
.
आता बाकी सगळ्यांचे ऐकते Happy
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारंच सुंदर लिहिलंय.

ह्यानिमित्याने आठवेल बरंच. सुरुवातीला थोडं आठवतं ते सांगते. मऊसुत पोळ्या माझी मोठी आते करायची. आमच्या शेजारच्या एक जोशीकाकू त्यांचे बरेच पदार्थ रेंगाळतात अजूनही जिभेवर. त्या कुडाळच्या, मस्त तिखट जेवण (ओलं खोबरं घालून) करायच्या त्यांच्या हातची चवळीची(कडधान्य) आमटी आणि आप्पे अजूनही आठवतात. त्या चवीच्या जवळपास जाणारे आप्पे श्रीरामपूरला (आम्ही होतो पाहुणे चार वर्ष तिथे नवऱ्याच्या नोकरीनिमित्याने) नवऱ्याच्या सरांच्या बायकोच्या हातचे खाल्ले.

माझी आई ऋषीपंचमीची भाजी आणि एक वांगे-ओले वाल भाजी छान करते (तसं आई सर्वच छान करते Happy ) तशीच त्या जवळपास जाणारी वरच्या दोन भाज्यांची चव मला नालासोपारा येथे शेजारी वहिनी राहायच्या त्यांची वाटायची. जाऊबाईंची आई मिरचीचा ठेचा फार सुंदर करायच्या, शेगदाणे घातलेला.

तीन नंबरच्या आतेचं आईस्क्रीम आणि शेव बटाटा पुरी आठवते.

बेळगावचे माहेर असलेल्या माहेरच्या जुन्या शेजारी त्यांची इडली आणि लाल मिरच्यांची चटणी सुंदर. अर्थात त्या डोंबिवलीतच राहतात थोड्या लांब त्यामुळे वर्षातून एकदा खायला मिळते अजूनही.

श्रीरामपुरच्या मालकीणबाईंच्या हातच्या शेंगोळ्या, पहिल्यांदाच खाल्ला हा प्रकार तिथे. त्यांच्या अगदी साध्या. फोडणी, रस काहीही नाही. कुळथाच्या पिठात काय काय ते घालून शिजवलेल्या पण चविष्ट.

सध्या इतकंच. बरंच लिहिलं तसं. Happy

कांद्याच्या पातीची भाजी माझ्या काकुच्या आईसारखी अख्या जगात कोणी करू शकणार नाही, भरली वांगी माझ्या मोठी आत्याच्या हातची आणि पीठ पेरून भाज्या माझ्या सासुबाई अशा करतात कि खातांना पोळीची गरजच नाही वाटणार.
माझ्या आईच्या हातचे नारळी पाकाचे लाडू....अहाहा!
I wish कोणीतरी माझ्या पण हातच्या चवीची आठवण काढावी Happy

आमच्या आईच्या हातची ओल्या खोबर्‍याची चटणी अतिशय फेमस आहे. रोज किंवा एक दिवसाआड असतेच असते. भारतात गेलं की एक दिवस ब्रेकफास्टला चटणी सँडविच असतं. ते म्हणजे एकदम पक्वान्नं. आईच्या हातचेच कणकेचे लाडूही मस्त चविष्ट असतात.

आरती खूप छान लिहिलंयस.

आमचे एक शेजारी आहेत परब म्हणून. त्यांच्याकडून कोंबडीवडयाचे ताट आले कि आम्ही त्या वड्यांवर तुटून पडायचो. वडे आमच्याकडेही होत पण त्यांच्याकडे होत तसे आतुन मऊ, लुसलुशीत आणि त्याचवेळेस बाहेरून कुरकुरीत असे वडे आमच्याकडे कधीच झाले नाहीत. आमचेही चांगलेच होत पण त्यांच्यासारखे नसत. काही वेगळेच होत त्यांचे वडे.

अशा पदार्थांच्या पाकृ मागून उपयोग नाही कारण हे पदार्थ आपल्याकडेहि होत असतात. फरक त्या विशिष्ट व्यक्तीच्या हातांनी केलेल्या चवीत असतो. आपला पदार्थही उत्तम होतोच पण त्या व्यक्तीच्या हातची ती चव जमत नाही.

अस आठवणीतल नाव सर्वात पहिले डोक्यात येत ते म्हणजे माझ्या आप्पाजींच...
स्वयंपाकामधे ते माझे गुरु पण जशीच्या तशी रेसिपी फॉलो केली तरी चवीत फरक पडतोच पडतो..
मला वाटत कि भाजीत टाकायचे मसाले, अगदी कांदा, मिरची, लसुण कसे वाटतो यावर सुद्धा टेस्ट बरीच अवलंबुन असते..

त्यांच्या हातची बनलेली डाळ वांग्याची भाजी, आणि तळलेल्या लाल मिरच्यांची चटणी.. आहाहा.. तशी चव कुठच नाही.. महत्वाच म्हणजे ते म्हणतात कि त्यांची लेगसी मी समोर चालवणार म्हणुन त्यांना माझ्या पाककौशल्याच(?) कोण कौतुक..अन मला मात्र त्यांनी बनवलेला स्वयंपाक खावासा वाटतो..

अजुन एक.. मागे आंब्याची/कैरीची लुंजी (http://www.maayboli.com/node/53163) हि पाकृ टाकली होती मी इथे.. ती मला माझ्या मावशीने शिकवलेली.. जेव्हाही करते किंवा अगदी नाव जरी ऐकते तेव्हा पहिले तिच आठवते.. तिला जाऊन ३ वर्ष झाले पण तिची आठवण मात्र तेवढीच टवटवीत आहे..

नवरात्रात कन्या खिलान्याची प्रथा उत्तर हिंदुस्थानियांमध्ये असते. माझी मैत्रीण/शेजारीण माझ्या मुलीला बोलावयची ती प्लेट घेऊन घरी यायची. मुलगा तिच्यापेक्शा तीन वरषानी मोठा . दोघ मिळून पुडी, भाजी, चणे व हलुवा चाटून पुसुन खायचे. तिला जेव्हा कळलं ती अजून एक प्लेट द्यायची. आम्ही चौघ खायचो. ती घर सोडून गेली . मी हेच सगळं दोन्ही नवरात्रात बनवते पण ती चव नाही ... तुर्तास एवढंच ....

मस्त लेख. माझ्या धाकट्या मामीसारखा चहा बनवायचा प्रयत्न मी गेले कित्येक वर्षे करते आहे. खाडकन झोप उडवणारा हमखास चहा तिलाच जमतो.

आईसारखी वरणफळं माझी कधीच होत नाहीत.
मंगळूरला आमच्या समोर ज्या राव आंटी रहायच्या त्यांच्याकडे केलेला कुठलाही पदार्थ एकदम खमंग असायचा, पण त्यातही त्यांनी केलेले गुंडपंगले अगदीच खमंग. त्यांच्यासारख्या चटण्यापण मला कधी जमल्या नाहीत.
रत्नागिरीला आमच्याकडे स्वयंपाकाला योगितामावशी येते तिच्या हातचा मसालेभात आणि पुरणपोळ्या. वरची पोळी अगदी पारदर्शक आतलं पुरण दिसेल इतकी पातळ आणि तरीही पोळपाटावरून तव्यावर आणि तव्यावरून ताटत येईपर्यंत अखंड एकसलग दिसणारी भलीमोठी गोल पोळी. योगितामावशी पुरणपोळ्या करायला लागली की मी ताट घेऊन बसते. दूध तूप कशाचीही गरज लागत नाही इतक्या मऊसूत लुसलुशीत पोळ्या असतात.

सासूबाई नाचणीच्या भाकऱ्या छान करतात, मोठ्या मोठ्या आणि पातळ. मोठे दीर आंब्याच्या रसाच्या पोळ्या आणि चकली सुरेख करतात. जाऊबाई आणि मोठी नणंद खव्याच्या पोळ्या मस्त करतात.

चुलत सासूबाईंच्या हातची फणसाची भाजी उत्तम होते, सांडगी मिरच्या घातलेली. शेजारच्या वाहिनी रोजच्या पोळ्या आणि पुरणपोळ्या सुंदर करतात मऊसुत.

बाबा धिरडी मस्त करतात कुरकुरीत आणि तेल-तिखट-मीठ-कांदा-जाडे पोहे एकत्र कालवून दडपे पोहे मस्त करतात. कैरीच्या दिवसात त्यात जोडीला कैरी आणि ओलं खोबरं घालतात.

सुंदर तोंडात विरघळणारे अनारसे खाल्ले की अक्का आजीची (आईच्या आईची ) आठवण येते. सुंदर अनारसे बनवायची.कांदा बटाटयाची रस्सा भाजी (कांदे आणि बटाटे दोन्ही कापून कच्चे एकत्र शिजवून, हॉटेल स्टाईल कांदा ग्रेव्ही मधे उकडलेले बटाटे घालून नव्हे) खाल्ली की बाबांच्या हातच्या भाजीची आठवण येते. आम्ही लहान होतो तेव्हा आई आजारी/आई ट्रेनिंगला गेलेली असतानाची ही खास भाजी होती.
हरभर्‍याची खोबरं आणि मिरची घातलेली घट्ट उसळ खाल्ली की आमच्या कॉलनीतला शबरीमला उत्सव आठवतो. तो पोंगल आणि ही उसळ द्रोणातून..

वाह छान विषय आहे Happy

तिखटमीठाच्या पुर्‍या हा काही विशेष किंवा एक्झॉटिक वगैरे प्रकार नाही. आमच्या घरीही नेहमीच व्हायचा. पण मी घर सोडल्यापासून हा प्रकार माझ्या अगदी लक्षातून गेला आणि मी जवळपास ५-६ वर्ष ह्या पुर्‍या खाल्ल्याच नव्ह्त्या. एकदा माझ्या आत्येभावाच्या लग्नाला गेले होते. लग्नाचा आणि त्यानंतरचा दिवस भरपूर पाहुणे, केटरिंग वगैरे होते. तिसर्‍या दिवशी अगदी घरचे कमी लोक उरलो होतो. तेव्हा नाश्त्याला माझ्या मोठ्या आत्येभावाच्या बायकोने ह्या पुर्‍या केल्या. सोबत घरचं आंब्याचं लोणचं. इतक्या जबरदस्त लागल्या त्या दिवशी. खुप मजा आली.
तेव्हापासून मी घरी कित्येकदा केल्या पण तशी चव जमली नाही किंवा तशी मजा आली नाही. दरवेळी मला राधिकाच्या हातच्याच पुर्‍या आठवतात. आणि सोबत तो लग्नघरचा माहौल.

कांदा बटाटयाची रस्सा भाजी (कांदे आणि बटाटे दोन्ही कापून कच्चे एकत्र शिजवून, हॉटेल स्टाईल कांदा ग्रेव्ही मधे उकडलेले बटाटे घालून नव्हे) खाल्ली की बाबांच्या हातच्या भाजीची आठवण येते. आम्ही लहान होतो तेव्हा आई आजारी/आई ट्रेनिंगला गेलेली असतानाची ही खास भाजी होती.>>> सेम आमच्याकडे पण. आणि पप्पा काहिही मोजून मापून घालायचे नाहित. सगळं अडम धडम Happy
तरी क्लास लागायची ती भाजी. आणि सोबत ब्रेड. कारण पप्पांना पोळ्या यायच्या नाहित.

वॉव आरती! काय मस्त लिहिलं आहेस... मी एकदम कनेक्ट झाले. माझ्याकडे अश्या अनंत आठवणी आहेत. एक वेगळा लेख होईल इतक्या...

मी भाज्या खायच्या बाबतीत नाठाळ. अगदी मोजक्या भाज्या आवडायच्या मला लहानपणी. एकदा सुट्टीत आजोळी राहायला गेले असताना आजीने 'मंजू, पटकन इकडे ये' अशी हाक मारली. मी तिच्याजवळ गेल्यावर लहान बाळाचं कसं त्याच्या नकळत तोंड उघडून पटकन त्याच्या तोंडात घास भरवतात तसं तिने केलं. मी तोंड उघडून काहीतरी खातेय हे माझ्या मेंदूपर्यंत पोचेस्तोवर आजीने तोंडात घातलेल्या पदार्थाची चव जीभेवर उतरली होती. अगदी स्वर्गीय चवीचा पदार्थ होता तो. मला काय बोलायचं सुचेचना.. हे काय आहे असं विचारायचंही आठवलं नाही. पदार्थाचा वासही ओळखीचा नव्हता. आजी आपल्याच घाईत बोलत होती, 'चांगली झाली आहे ना भाजी? मीठ आहे ना नीट? मामाने संगमेश्वरहून सुरण आणलं होतं, म्हटलं आज उपासाला भाजी करावी.'
त्या दिवसापासून मला सुरणाची भाजी आवडायला लागली. पण आजीच्या हातची 'ती' चव आजवर आलेली नाही.

तीच आजी अपेंडीक्सच्या ऑपरेशनसाठी दादरला अ‍ॅडमिट होती. मी आणि बहिण रोज रात्री तिच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जायचो. त्यावेळी भेटीची वेळ संपलेली असायची, पण आम्ही पेशंटसाठी डबा घेऊन जायचो म्हणून आम्हाला थेट प्रवेश मिळायचा. आम्हाला जाम रॉयल वगैरे वाटायचं तेव्हा.. कोणाचं काय तर कोणाचं काय Wink
आम्ही आजीला वाढायचो, तिच्यापाशी बडबड करत बसायचो. तिचं जेवून झालं की ताट वाटी भांडं विसळून डबा घरी घेऊन यायचो. एकदा डबा उघडल्यावर मस्त गुलाबी गुलाबी पदार्थ दिसला. ताटात वाढताना आजीला विचारलं, मी हे खाऊन बघू का? ती 'अगं पेशंटचं जेवण...' असं म्हणेपर्यंत चमचा माझ्या तोंडात गेला होता. ती बीटाची कोशिंबीर होती. त्या दिवसापासून मला बीटाची कोशिंबीर प्रचंड आवडायला लागली. पण ती केली की माझ्या नाकात धन्वंतरी हॉस्पिटलचा वास दरवळतो Wink

आरतीतै मस्त लिहलयसं Happy
आई सगळेच पदार्थ मस्त बनवते पण तिचा पुलाव, मसालेभाताचा एक वेगळाच सुगंध येतो .. काही कारणाने आमच्यात अबोला होता .. तेव्हा माझ्या अपार्टमेंटमधे वरच्या फ्लॅटमधुन सेम तसाच सुगंध आला .. आणि आठवणीनेच डोळे पाझरत होते माझे Sad
तसं गव्हाची खीर(हुग्गी) नि म्हैसुरपाक फक्त आज्जीच्या हातचाच! चंपाकळी , सांडग्याच पीठ, मऊ गुरगुट्या भात नि आमटी हे सगळं मावशीकडे Happy

मस्त आहे धागा.
माझ्या मावशीचा गोड शिरा खास असतो..भरपूर केशर, सुकामेवा, केळ्याचे काप...शिवाय दुधात शिजवलेला. मी रेसिपी घेऊन घरी बनवलाय पण ती चव येत नाही. तिचा डीलक्स शिरा असतो अगदी.

मला तो शिरा आवडतो म्हणून कधी तिच्या घरी गेलं की हमखास करणार. ती घरी येणार असली तर घेऊन येणार. कोणी तिला भेटणार असेल जे शिरा माझ्यापर्यंत पोचवू शकेल तरी करुन तो त्यांच्यामार्फत माझ्याकडे पोचवणार. माझ्या केळवणाच्या वेळी पाच पक्वान्नात एक मानाचं पक्वान्न म्हणून शिरा होताच. मी दीर्घकाळासाठी परदेशात जाणार होते तेव्हा ती भेटायला आली होती तो शिरा घेऊनच. आता परवा काही कामासाठी तिच्या घराजवळ गेले होते तेव्हा फोन करुन कळवलं की मी फक्त अर्धा तास येऊन जाते...अर्ध्या पाऊण तासात पोचते तुझ्याकडे. घरी पोचले तर शिरा तयार होत होता! "तुझा फोन आल्यावर लगेच रवा भाजायला घेतला" ती सहजपणे म्हणाली.

रेसिपी घेऊन , दुप्पट केशर ड्रायफ्रूट घालून ती चव जमू शकेल एकवेळ पण हे प्रेम कुठून आणायचं....

रेसिपी घेऊन , दुप्पट केशर ड्रायफ्रूट घालून ती चव जमू शकेल एकवेळ पण हे प्रेम कुठून आणायचं....>>

ते प्रेम असत ना म्हणूनच तो तो पदार्थ इतका छान होतो. माझी कलीग नेहमी म्हणते आमच्या मेड नीट स्वैपाक बनवत नाही. तिच्या बनवण्यात प्रेमच नसत तर पदार्थ काय धड होणार Happy अगदी पटत मला तिच म्हणन,

सुंदर विषय आहे. धागा आणि प्रतिसाद वाचून खरंच भुक खवळली. Happy

माझी मोठी काकू तिला मी मोठी आई म्हणायचो ती वेंगुर्ल्याची होती. माश्याचे तिखले खुपच सुंदर बनवायची. तिखल्याचे वाटप स्वतः पाट्यावर वाटायची मिक्सरला कधीच तिने हात लावला नाही. आमच्या घरी आई आणि माझी पत्नीसुध्दा तिखले बनवतात पण काकूच्या हातची चव कधीच नाही.

पाया सुप म्हटले की मला आठवते ती आमच्या वरच्या मजल्यावरची आक्का. तिचा नातू आणि मी एकाच वयाचे त्यामुळे एकत्र खेळायचो. हे कुटुंब तेलगु होते त्यामुळे त्यांच्याघरी महिन्यातुन एकदा तरी पाया सूप बनायचे. एकदा आम्ही त्यांच्या घरी खेळत असताना अक्कानी मला पाया सुप प्यायला दिले मला ते खुप आवडले. तेव्हा मी दहा-बारा वर्षाचा असेन मग मी घरी जाऊन आईकडे हट्ट धरला मला असे सुप हवे. ही गोष्ट नंतर आईने अक्काला सांगितली तेव्हापासून त्यांच्या घरी पाया सुप बनले की एक वाटी सुप आमच्या घरी यायचेच.

आज काकू आणि आक्का दोघीही हयात नाहीत पण त्यांच्या आठवणी मात्र चिरंतन माझ्या मनात राहतील.

धन्यवाद आरती हा धागा सुरू केल्याबद्दल.

पदार्थाच्या आठवणी

१ आई च्या हातची शिळ्या पोळीचे सैंडविच

२ बाबांच्या हातचे रानातले झणझणीत वर्हाड़ी मटन/चिकन

३ मित्र पत्नी अन आमची वर्गमैत्रीण असलेल्या मैत्रिणीच्या हातचे खेकडे

४ मित्राच्या आई ने बनवलेली पातळ भाजी

५ दुसऱ्यां मित्राच्या आई ने बनवलेले शेंगोळे

६ आईच्या हातचे साउथ इंडियन

७ आईच्या गरम पोळ्या त्यावर तेल/ तूप काहीही सोडलेले तेलमीठ/ तूपमीठ पोळीचे पोंगे

८ थोरल्या मामीच्या हातची वाफेवरली वांगी

९ चुलत आत्याच्या हातचे डाळ वांगे

१० धाकट्या काकू च्या हातचे कलसलेले वरण

११ दुर्गाची कोल्ड कॉफ़ी

१२ फर्ग्युसन कॉलेज समोर रेश्मा कडली भुर्जी अन अंडा मुग़लई

१३ गूडलक चा बनमस्का इराणी चहा अन ऑमलेट पाव

१४ तिरंगा ची मटन बिरयानी

१५ सोमाटणे फाट्याचा वडापाव

१६ आईच्या हातच्या पुरणपोळ्या

१७ धाकट्या मामीच्या हातची मिसळ

१८ वैशालीचा वडा सांबर

१९ शिवाजीनगर स्टेशन ला शब्बीरचा भुर्जी पाव

२० जंगली महाराज रोड वर मंदिराजवळचा लोणी स्पंज डोसा

२१ सुकांताची थाळी

२३ आईच्या हातची मसाला वांगी

२४ आईच्या हातची वरण फळे

२५ सासुबाईंच्या हातचा गट्टे का पुलाव

२६ चुलत सासुबाईंच्या हातच्या राजस्थानी मिठाया

२७ आईच्या हातचे सगळे काही!

तुर्तास इतकेच आठवते Happy

उन्हाळ्याचे दिवस असले की सरबतं सर्रास होतात आणि सर्रास बिघडणारं सरबत म्हणजे लिंबाचं सरबत Proud म्हणजे फ़्रेश लेमन वापरून केलेलं, कॉन्सन्ट्रेट नाही. मी जेव्हा जेव्हा लिंस करते तेव्हातेव्हा ’एकदा लिंबूरस कमी, एकदा साखर कमी, एकदा मीठ कमी, एकदा पाणी जास्त’ असं होतं. चार ग्लास सरबत करायला मला ऍडजस्टमेन्ट्स करत करत किमान १५-२० मिनिटं लागतात! अशा वेळी आईचं सरबत आठवतं. आईचे अनेक पदार्थ आवडीचे. पण लिंबू सरबत टॉप्स द लिस्ट! एका झटक्यात अमृततुल्य सरबत करते ती!

आणि आत्या एक पदार्थ करायची- खव्याचे गोळे करून घट्ट बासुंदीत सोडायचे. नाव विसरले त्याचं मी. हा पदार्थ इतका उच्च लागायचा की बास. आत्याची आठवण आली की हा पदार्थ ओघाने आठवतो. कसा करायचा हे माहित आहे. पण आत्यासारखा होणार नाही हेही माहित असल्यामुळे कधी करायचं धाडसच केलं नाही. ती आठवण कदाचित डायल्युट व्हायची!

अंगुर बासुंदी :तोंपासु:

माझी एक नणंद आहे गावी. मी घरी कधी बेसनाचे पोळे केले की हमखास तिची आठवण येते. साधेच बेपो पण ती अगदी खमंग करते.
कांपो माझी ताई छान करते. घरी मी केले तर तसे बनत नाहीत. मुलगी नेहमी म्हणते मावशीसारखे नाही झाले.

कुणी वडे-मट्ण केलं की माझ्या आत्याची आठ्वण येते. तिच्याकडे गेलं की आम्ही निघायच्या दिवसाचा किंवा आदल्या दिवसाचा खास पाहुणचार म्हणजे वडे-ंमटण.

अनारस्यांची आठवण लय बेक्कार. Lol आमच्या शेजारच्या काकी ड्यांजर अनारसे बनवायच्या. कडकडीत. आंबुस वास असलेले. त्यानंतर मी अजुनही अनारसे खाल्ले नाहीत.

अजुन आहेत नंतर लिहिन.

Pages