वेताळ टेकडीचे वैभव

Submitted by मामी on 6 December, 2015 - 02:30

नुकतीच पुण्याला एक धावती भेट देण्याचा योग आला. त्या भेटीत सकाळी वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉकला गेलो होतो. काय सुरेख ठिकाण आहे ते. फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे बहुतेक, पण त्यामुळे अतिशय स्वच्छ राखली गेलेय. टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला एक गेट आणि त्यावर राखणदारही आहेत. पार्किंगकरता वर जागाही आहे. आणि मग आत जंगलात फिरण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. तुम्हाला हवी ती निवडा आणि स्वच्छंद फिरा.

शनिवार, ५ डिसेंबर २०१५ च्या सकाळची ही क्षणचित्रं :

आम्ही कर्वेरोडवरून एका रस्त्यानं वर गेलो. पार्किंगपासून आत जाणारी ही पायवाट. मस्त भिजून भाजून पक्की झालेली माती, त्यावर भेगांची नक्षी आणि वाळलेल्या पानांची वेलबुट्टी :

प्रचि १

प्रचि २

ही टेकडीवरची झाडं कोणती आहेत? छान घनदाट झाडी आहे ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला :

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

काही अंतर गेल्यावर एक देऊळ आणि हे विश्रांती, व्यायाम, गप्पागोष्टी करण्यासाठी बांधलेले चौथरे लागतात.

प्रचि ६

प्रचि ७

या ठिकाणाहून जवळच एक चिकार मोठ्ठं तळं आहे. त्यात पाणी फार नव्हते. अधून मधून काही छोट्या पाणथळीच्या जागा होत्या. कदाचित आदल्या आठवड्यातल्या मुसळधार पावसाचा परिणाम असेल. पण हे तळं आणि त्याचा परिसर ऐकूणच अतिशय रम्य परिसर आहे. तळ्यात बरेच विविध पक्षीही दिसले - पाणकावळा, मोठा बगळा आणिही काही होते. बाकीही परिसरात अनेक पक्षी दिसत होते. तांबट पक्ष्याचाही आवज येत होता.

हे तळं बहुधा नैसर्गिक असेलही पण कदाचित त्याचा आवाका वाढवण्यासाठी आजूबाजूनं मुद्दाम खडक खोदल्यासारखेही दिसत होते. तळ्याच्या बाजूनी हेच तोडलेले खडक रचून बांध घातला आहे. तो बांध ओलांडून जाऊ नये अशी तंबी दिलेली एक पाटीही दिसली. तळ्याच्या काठी पूर्वी काहीतरी बांधकामही असावं असं वाटतंय. ते आता तोडलंय म्हणा किंवा पूर्णपणे पडझड झालीये म्हणा. आता फक्त काही अवशेष दिसतात.

तळ्यात सहज उतरता येतं. मुख्य रस्त्यावरून तर एक राजरोस रस्ताच आहे. आतही बराच भाग कोरडा असल्याने चालत फिरता येण्यासारखी जागा आहे.

आम्ही या तळ्याला परतीच्या वाटेवर असताना भेट दिली. त्यामुळे ती प्रचि नंतर.

तळ्यानंतर पुढे पुढे छान गवताळ प्रदेश लागतो. बरचसं गवत वाळलेलं होतं. पण थंडी असल्यानं त्यावर भरपूर दंव होतं. एक गुलाबी रंगाची इमारत आणि त्याभोवती दगडी भिंतही लागली. ती इमारत कसली ते कळलं नाही.

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

आम्ही चालत गेलो ते दुसर्‍या बाजूचा व्हू दिसेल अशा टोकाशी येऊन पोहोचलो. इथून पाषाण, पंचवटी आणि चतु:शृंगीचा परिसर दिसत होता :

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

इथून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. अजून पुढे जाता येतं खरं तर पण आमच्याकडे वेळ नव्हता. पुन्हा मुंबईला परतायचं होतं आणि त्याआधी वैशालीला भेट द्यायची होती. परतीच्या वाटेवर पुन्हा तळं लागलं तेव्हा त्याला प्रदक्षिणा घालून दुसर्‍या बाजूनं जाण्याचा बेत ठरला.

तळ्याला फेरी मारावी या उद्देशानं आम्ही दुसर्‍या बाजूनं गेलो पण तिथे त्या टेकडीमध्ये मोठी भेग आहे. त्यामुळे तळ्याला सलग प्रदक्षिणा शक्य नाही. आमचा तळ्याभोवती फेरी मारण्याचा मार्ग खुंटल्यावर आम्ही त्याच ठिकाणाहून खडकांतून वाट काढत काढत खाली तळ्यात उतरलो. तेवढंच शहरी अ‍ॅडव्हेंचर!

अहाहा ... काय सुरेख जागा आहे ही :

ही तळ्याच्या काठावरून काढलेली प्रचि :

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

तळ्याकडे पाठ करून उभं राहिलं की लांबवर पसरलेलं गवताळ कुरण आणि त्यात अधून मधून असलेली झाडं असं मनोहर दृश्य दिसतं :

प्रचि २४

प्रचि २५

उतरलो तळ्यात :

प्रचि २६

उथळ पाण्यात उगवलेल्या वनस्पती :

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

एका तळुल्यात मस्त कमळासारखी पानं आणि त्याला अगदी छोटुशी पांढरी फुलं होती :

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

रामबाण कापूस :

प्रचि ३४

आता एव्हाना चांगलीच भूक लागली होती. वैशालीच्या हाका ऐकू येत होत्या. मग परत निघालो.

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

वैशालीचा मैसूर डोसा खाऊन आणि फिल्टर कॉफी पिऊन एका छानशा सकाळची समाप्ती केली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईगं! मामी माझी सर्वात आवडती जागा! टेकडी हा सर्वात आवडता विषय व दुखरी नस आहे. फोटो पाहून मस्तही वाटले व किती मिस करते मी हे ही जाणवले! टेक्डी चढत खाणीपाशी येऊन सूर्यास्त बघणे ही अगदी नेहेमीची व आवडीची अ‍ॅक्टिव्हिटी होती माझी..
वेताळ टेकडीच्या बाजूलाच एआरएआय आहे जे माझे बाबांचे ऑफिस. त्यामुळे देखील त्या परिसराशी खूप जवळचा संबंध आहे. तिथे कितीदा आले आहे.. कितिदा मोर दिसले आहेत.. गणती नाही. टेक्डीवर जायला बर्यच वाटा आहेत त्यातली शॉर्ट्कट वाट म्हणजे एआरएआयच्या आसपास गाडी लावून खाणीकडे जाणे.. किंवा सर्वात आवडता रस्ता म्हणजे लॉकॉलेज रोडच्या इथून..कांचनगल्लीमधून सगळी टेकडी चढत जायची. माझ्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला मी तिथे घेऊन गेले आहे. फ्रेंड्सबरोबर हँगआउट म्हणजे जोरात टेकडी चढायची वर गप्पा मारायच्या.. आरामात उतरायची अन खाली येऊन कुठल्यातरी ठिकाणी कॉफी घेऊन घरी जायचे असे २ -३ तासाचा कार्यक्रम.
ओह गॉड.. अ‍ॅटॅक ऑफ नॉस्टॅल्जिया ... Happy

ओह ती खाण आहे हे लक्षात नाही आलं.

मी समजते पावसाचं पाणी साठवण्यासाठी पूर्वीच्या नैसर्गिक तळ्याला खणून अधिक मोठं केलं आहे. पण यात पावसाचं पाणी का साठत नाही आणि का साठवत नाही?

मस्त. आधी पहिले वर्णन व एक दोन फोटो पाहून हे उपहासात्मक लिहीले आहे की काय असे वाटले होते Happy

तेथे एआरएआय होण्याआधी व कोथरूड च्या बाजून वर्दळ वाढण्याआधी पासून आम्ही गोखलेनगर्/मेंढीफार्म (पत्रकार नगरच्या आणखी आत) च्या बाजूने तेथे जात होतो. पूर्वी शिखरावर असलेले वेताळबाबा देऊळ सोडून जवळपास काही असल्याचे आठवत नाही. तळे व खाणही. ते मारूतीचे देऊळ ही आधी होते का लक्षात नाही. मात्र तेथून थोडे उत्तरेला गेले की शंकराचे देऊळ व तेथेच वरती तो एक टॉवर आणि तसेच पुढे मग चतु:शृंगीचे देउळ. मी चतु:शृंगी पर्यंत टेकडीवरून कधी गेलो नाही पण टेकडी उतरून पलीकडे पाषाणच्या बाजूला आणखी शंकराचे देउळ आहे तेथे आम्ही एकदा पिकनिक ला गेलो होतो.

एआरएआय झाल्यावर मग पुढे बराच काळ तेथे जवळ एक सपाट जागा होती, क्रिकेट खेळण्याएवढी. आम्ही टेकडी चढून तेथे बराच वेळ क्रिकेट मॅच खेळून मग पुन्हा खाली उतरायचो. वेताळबाबाच्या देवळाजवळून आजूबाजूचे व्ह्यूज सुंदर दिसत. एकूणच ही टेकडी पावसाळ्यात, धुक्यात खूप सुंदर दिसते. जुलै/ऑगस्ट मधे तर लोणावळ्याजवळच्या डोंगरांवर असते तसेच दृष्य दिसत असे. आताचे माहीत नाही.

हा भाग नंतर भांबुर्डा वनविहार च्या खात्याने मॅनेज करायला सुरूवात केली बहुधा. तेव्हा तेथे मोर व भेकर नावाचे एक हरिण खूप असे. तसेच वेगवेगळे पक्षी व असंख्य प्रकारचे किडे ही असत. एक काचकिडा असे पारदर्शक कवच असलेला, तसेच रेशमी किडे म्हणून एक मखमली लाल रंगाचेही किडे असत. ते आम्ही जमवायचो.

धन्यवाद मामी, टोटली नॉस्टॅल्जिक.

आधी पहिले वर्णन व एक दोन फोटो पाहून हे उपहासात्मक लिहीले आहे की काय असे वाटले होते >>>>> मला तर सगळच वर्णन आणि लेख उपहासात्मक वाटतो आहे.. Uhoh
वेताळ टेकडीवर गेलो आहे.. संध्याकाळी किंव सकाळी लवकर छान वाटत तिथे. एआरएआयच्या बाजूनेही मस्त वाटतं.. पण हे फोटो खरच सुंदर आहेत का? Happy

Parag + 1

पण हे फोटो खरच सुंदर आहेत का? >>> Uhoh

फोटो सुंदर नसतील तर तो माझा दोष. पण लेख उपहासात्मक का वाटला ते लक्षात आलं नाही. कदाचित शीर्षकामुळे असेल. 'वेताळ टेकडीवरची एक सकाळ' किंवा नुसतंच 'वेताळ टेकडी, पुणे' असं शीर्षक असेल तर कदाचित उपहासात्मक वाटणार नाही का?

मला टेकडी खरंच खूप आवडली.

टेकडी भारीच आहे. हीच ती हनुमान टेकडी, ARAI टेकडी. मोर दिसले नाहीत का. अनेक पक्षी इथे नक्की दिसतात. बरेच Raptors पण दिसतात. One of my favourite Place for Bird Photography!!

अहाहा..वेताळ टेकडी आणि टेकडीवरून दिसणारं संध्याकाळचं पुणं..

मोर दिसले नाहीत का. >> +११ कामायनी साइडने टेकडी चढली की हमखास मोर दिसतात. AFP मधे असताना कायम तिथे जाणे व्हायचे. एस बी ऱोडची बजबजपुरी पण झाली नव्हती तेव्हा..

छान जागा आहे मॉर्निंग वॉकसाठी. फोटो आवडले.

लिखाण उपहासात्मक मुळीच वाटले नाही.

वेताळ टेकडी हे पुण्याचे वैभव आहे. इतर पानगळीच्या जंगलांप्रमाणे तिचे खरे वैभव पावसाळ्यातच दिसते.

भर शहरात असलेला पार चांदणी चौका पासून ते फर्ग्युसन कॉलेजापर्यंत पसरलेली ही टेकडी म्हणजे पुण्याकरता ऑक्सीजन पुरवठा करणारी जणू फॅक्टरीच!

ह्याला पुण्यातल्या सकृतदर्शनी वेगेवेगळ्या भागातून (पाषाण, कोथरूड, पौडफाटा, पत्रकारनगर, गोखलेनगर, प्रभात रस्ता वगैरे) जाता येत असल्याने नवीन पुणेकर ही आपापल्या बाजूची आमची टेकडी आहे असे म्हणतात.

गरवारे शाळेत असताना, शाळेतर्फे ह्या टेकडीवर सलग २-३ वर्षे साधारणपणे एकाच भागात वृक्षारोपण करायला गेलो होतो. गरवारे शाळेपासून प्रभात रस्त्याने आणि मग पुढे बालभारतीची खिंड (आता जिला सिंबायोसिसची म्हणून ओळखतात) ओलांडल्यावर डावीकडे वळून पत्रकारनगराहून पुढे जाऊन जो रस्ता आहे त्या बाजूने चढून जायचो. बहुतेक सर्व रोपे वणव्यात जळून जायची किंवा पाण्याअभावी सुकून जायची.

पण अनेक वर्षांनी सगळी टेकडी पावसाळ्यात तरी हिरवी गार दिसते खरी. इथे लहानपणी ससे ही पाहिले होते. ते आता दिसत नाहीत पण भट्क्या कुत्र्यांसकट इतरही प्रतिकुलतेवर मात करत अजूनही मोर मात्र बर्‍याच संख्येने टिकून आहेत. भरवस्तीत पक्षी निरिक्षणासाठी खूप भारी ठिकाण आहे हे! त्या खाणीत साठणार्‍या पाण्यामुळे तयार झालेल्या पाणथळ जागेमुळे हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी ह्या ठिकाणाला आपला अधिवास बनवतात. गेल्याच आठवड्यात इथे एकाच झाडावर १९ अमूर फाल्कन दिसल्याची फोटो नोंद झाली.

मध्यंतरी ही टेकडी फोडून बालभारती ते कोथरूड अशा प्रस्तावित रस्ता करण्याचे चालले होते काही पर्यावरणवादी सजग नागरिकांनी विरोध केल्याने सध्यातरी त्यावर स्थगिती आली आहे.

ह्या टेकड्यांमुळेच अजूनही सुंदर आहे पुणे !

हर्पेन, मस्त माहिती. आम्ही ज्या गाडीरस्त्याने वर गेलो त्या रस्त्यावर टेकडीच्या पायथ्याशी झोपडपट्टी होती. आणि कर्वे रस्ता अगदी जवळच होता. पण यापलिकडे नक्की कोणत्या बाजूने वर गेलो हे मला सांगता येणार नाही.

मामे तू गाडीरस्त्याने वर गेलीस म्हणजे ARAI च्या बाजूनेच चढलीस. ही पौड फाट्याजवळची बाजू

तिकडे बाजारात नवीन येणारी कोणतीही गाडी सर्वप्रथम बघायला मिळते. सगळ्या चारचाकी गाड्यांना टेस्टींग साठी इकडेच यावं लागतं म्हणे. बाहेर पार्कींग मधे लावलेल्या असतात अशा गाड्या आणि कंपनीचं किंवा मॉडेलच नाव नसतं मग बघून अंदाज बांधायचे

खरंतर तू पुण्यात येऊन गटग न करता गेलीस याबद्दल णिषेध करायचा होता पण टेकडीबद्दल लिहिलंस त्यामुळे पहिल्या प्रतिसादात राहूनच गेलं... तर तुझा णिषेध Proud

आम्ही पण आलो अस्तो की टेकडीवर नाहीतर गेलाबाजार वैशालीत तरी Happy

मामी , माझ्या लेकाची शाळा होती टेकडीच्या पलीकडच्या पायथ्याला. अन ही टेकडी त्यांच्या शाळेचा अविभाज्य भाग! क्रॉस कंट्री, फोर पोल्स, क्वारी, व्हाईट रॉक , ब्लॅक रॉक अशी काही नामकरणंही आहेत. मोर भरपूर आहेत टेकडीवर. अन्य पक्षीही भरपूर. गेल्या १० वर्षात वनखात्यानी , टेकडीवर येणार्‍या रेग्युलर वर्दळीच्या मदतीनी बरेच उपक्रम राबवलेत. अन मस्त केलाय परीसर.

लहानपणी ससे ही पाहिले होते. ते आता दिसत नाहीत >> दिसतात रे. मह्हिन्याभरपूर्वीच गेलो होतो तर पळाला एक ससा. ग्रे रंगाचा.

१९ अमुर वेताळचे का महात्माचे असा एक संशय आहे. असो. Happy

लहानपणी ससे ही पाहिले होते. ते आता दिसत नाहीत >> दिसतात रे. मह्हिन्याभरपूर्वीच गेलो होतो तर पळाला एक ससा. ग्रे रंगाचा.>>> सहीच ! ससा म्हटल्यावर पांढरा शुभ्र असा डोळ्यासमोर येतो आपल्या त्यामुळे लहानपणी देखिल असा राखाडी / करडा ससा समोर आल्यावर बराच वेळ लागला होता मला तो ससाच होता हे स्वतःला पटवायला Proud

छान निवांत ठिकाण.चांगले लिखाण फोटो पण सुंदर आलेयत . हिवाळ्यामुळे गवताच्या पिवळेपणात थोडा फिक्का किरमिजी रंग मिसळू लागलेला दिसतोय त्यामुळे व्हॅन गॉगची काही चित्रे आठवली . तळ्यातील पांढरी फुले कुमुदिनीचीच असणार .अस वाटतंय . ही पाणथळ जागा स्थलांतरीत पाहुण्यांनी गजबजली की खूपच प्रेक्षणीय होत असेल.

Pages