शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी

Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08

गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.

काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.

ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवाहाच्या विरुद्ध क्रान्तीकारक मुद्दाम काही केल नक्की नसेल. Because that was never the idea. However if time comes one was made able and tough to climb nigara falls against water Lol

हाहा दिवा द्यायचा राहिला! ऑफ कोर्स सुदैवाने त्या stereotypes मध्ये आपण (भारतीय समाज) अजून इतके घुसलो नाहीयोत! ही एक अशीच गंमत.

आठवीच्या आठवणी लिहिता लिहिता फार मोठी पोस्ट झाल्याने ती तीन भागांत विभागून टाकत आहे.
महेश, तुम्ही प्रचिती बद्दल लिहा असे सुचवले आहे तर त्याबद्दल माझी आठवण. मला प्रचितीच्या कार्यालयाची जागा फार आवडायची. स्वागत कक्षाच्या बरोब्बर वरची खोली. तिथून अखंड भारताचा नकाशा खूप छान दिसतो. बाकी साखर शाळेबद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेतच.
पुन्हा एकदा, writing down these memories is in itself very rewarding. I feel like I am creating a pensive of happy memories Happy

आठवी भाग १

आठवीत चारुता ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही वर्षभर एक वेगळा उपक्रम राबवला! महिन्यातले एकाआड एक शनिवार वर्गातल्या चौघी जणी दुपारची शाळा सुटल्यावर ताईंबरोबर त्यांच्या घरी जायचो. तिथे अख्खी दुपार घालवायची आणि मग संध्याकाळी घरी परत जायचं! ह्या दुपारच्या वेळात आम्ही काहीतरी कलाकारी करायचो आणि शिवाय एखादी कमी कटकटीची पाककृती बनवायचो. ह्याशिवाय ताईंशी आणि त्यांच्या घरच्यांशी अखंड गप्पा असायच्याच! अशाप्रकारे आम्ही सगळ्या जणी त्या एका वर्षात ताईंच्या घरी जाऊन आलो. हा खरंच खूप छान उपक्रम होता. आता वाटतं की ताईंनी केवढी मोठी commitment केली होती आमच्यासाठी! त्याशिवाय आम्ही चारुता ताईंबरोबर सहाध्याय दिनाला निवारा वृद्धाश्रमात देखील गेलो होतो.

तसं एकदा कधीतरी आम्ही एका एका ताई आणि सरांना आमच्या बरोबर मधल्या सुट्टीत डबा खायला बोलावलं होतं. मधल्या सुट्टीत आम्ही वरच्या उपासना मंदिरात डबा खायचो. दर आठवड्याला दोन मुली वर्ग रक्षक असायच्या. म्हणजे प्रार्थनेच्या वेळी आणि मधल्या सुट्टीत त्यांनी वर्गातच थांबायचं. तशी रक्षण करण्याची खास गरज नव्हतीच पण ती एक जबाबदारी होती जी आम्ही घ्यायला शिकलो. डबा खाण्यापूर्वी वदनी कवळ घेता (नवीन) म्हणायचो आणि सहना ववतु ह्या श्लोकाने शेवट करून मग खायला सुरुवात करायचो.

आठवीत वर्षा सहलीला यु.वि. तल्या तायांबरोबर तिकोन्याला गेलो होतो. आधी रस्ता चुकलो मग बरोबर रस्त्याने वर गेलो. वर पोहोचताना इतका जोराचा वारा सुटला होता की काही अंतर अक्षरशः रांगून गेलो नाहीतर वाऱ्याने उडून गेलो असतो! पाऊस सुरु झालाच! रेनकोट शोभेलाच उरला होता. पाण्याच्या डबक्याच्या मधोमध उडी मारून इतरांच्या अंगावर चिखल उडवत चाललो होतो. शेवटच्या पायऱ्या खूप निसरड्या झाल्या होत्या. त्या चढून वर पोचलो आणि खाली पवना धरणाचे पसरलेलं पाणी पाहून साऱ्याचे सार्थक झाल्यासारखं वाटलं! गडाच्या माथ्यावर ढग उतरले होते त्यामुळे भारी वाटत होतं. गड उतरलो आणि डोळ्यापुढून एसटी निघून गेली! मग एक टेम्पो केला. त्यात उभ्या राहून सगळ्या दुसऱ्या एसटी स्टँडवर पोचलो आणि मग तिथून बस पकडली. भरपूर भिजलो आणि भरपूर मजा केली. वर्षा सहल म्हणजे दुसरं काय असतं!

आठवीत गणेशोत्सवात पहिल्यांदा बरच्या केल्या! मुख्य मिरवणुकीत नाचलो. मिरवणुकीची सुरुवात गजर ते शेवटचं रिंगण आणि ह्या दोन्ही मधला काळ सारं intoxicating! ह्याशिवाय गणपतीच्या काळात वेगवेगळ्या मंडळांसमोर आम्ही पथनाट्य करायचो. गणपतीआधी त्याची तयारी असायची. ही पथनाट्य पथकशः असायची. ह्या निमित्ताने पुण्याच्या अनेक वस्त्यांमध्ये जायचो. शाळेचा गणपती हा घरचाच असायचा. रोज सकाळी आरती, प्रसाद असायचा. शाळेत एकदम मंगलमय वातावरण असायचं!

आठवी आणि नववीत शांतला ताईंच्या मार्गदर्शनाखाली केलेले शास्त्र विषयातले प्रकल्प खूप लक्षात आहेत. चौघी/पाच जणींच्या गटाने मिळून हे प्रकल्प केले होते. Brainstorming करून प्रकल्पाचा विषय ठरवायचा, मग ताईंशी चर्चा करून त्याची उद्दिष्ट आणि साधारण पद्धत ठरवायची आणि मग कामाला लागायचं. अनंत अडचणी येणारच असायच्या पण त्याने उत्साह आजीबात कमी व्हायचा नाही! आम्ही नैसर्गिक वाळवी प्रतिबंधक कोणते ह्यावर प्रकल्प केला होता. त्यासाठी पुणे विद्यापीठात जाऊन एका प्राध्यापकांना भेटलो होतो. वाळवीच्या स्लाईडस सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या होत्या. त्या सरांनी आम्हाला विद्यापीठाच्या परिसरात फिरवून वाळवीची मोठाली वारुळं दाखवली होती. ह्या वारुळांचा जमिनीच्या वर जेवढा विस्तार असतो त्याच्या दुप्पट तिप्पट जमिनीखाली असतो असे सांगितले होते. दुसरा प्रकल्प गांडूळ खताचा केला होता. ह्या सर्व प्रकल्पाचा report लिहायचो आणि वर्गापुढे त्यावर presentation ही द्यायचो. आमचे प्रकल्प खूप ground breaking नव्हते पण संशोधनाची मुलभूत तत्वे आम्ही त्यातून शिकलो. गटात काम करायला शिकलो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप मज्जा केली!

आमच्या वर्गाला पुस्तकं वाचायला खूप आवडायची. आठवीत इतिहासाच्या तासाला वॉलाँग (ले.कर्नल श्याम चव्हाण) आणि जंग ए काश्मीर अशी दोन पुस्तकं, आणि मराठीला अरुण खोरे यांचे पोरके दिवस हे आत्मचरित्र वाचले होते. ह्याशिवाय आठवीत टीमवी, गणित प्रज्ञा परीक्षा, STS अशा परीक्षा देखील दिल्या होत्या. आठवीत इंग्रजी शिकवायला राजगुरू सर होते. ते एकदम आजोबांसारखे होते. एकदम बेस्ट शिकवायचे. शेवटच्या तासाला त्यांनी आमच्यासाठी मोतीचुराच्या लाडूंचा एक अख्खा करंडा आणला होता! CBSE ची इंग्रजीची पुस्तके अत्यंत सुरेख असतात. त्यातील literary reader मी बराच काळ जपून ठेवले होते.

एक प्रयोग म्हणून आठवीत आम्हाला अलगुज नावाची सुरेख दैनंदिनी दिली होती. त्यात बरीच वेगवेगळी पानं होती. मी ती अजूनही जपून ठेवली आहे. डायरी ऑफ अॅन फ्रँक वाचल्यापासून मी अधूनमधून डायरी लिहित असे. पण तरी माझी आणि बाकी अनेकींची अलगुज मात्र बरीचशी रिकामीच राहिली! The idea was great but somehow it did not fly.

आठवीत आम्ही भूगोलाचा प्रकल्प केला होता ज्यात भारताचा भूगोल अभ्यासला होता. वर्गात चार ओळी होत्या एका ओळीतल्या मुलींनी एक दिशा असं ठरवून भारताच्या चार दिशांची राज्यं वाटून घेतली होती. ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात कोणताही लिहिलेला रिपोर्ट द्यायचा नव्हता. आम्ही जे जे काही करू त्या साऱ्याचं शाळेसमोर प्रदर्शन मांडायचं होतं. आम्हाला कळलेला भारत तिथे न लिहिता दाखवायचा होता. कसा ते आमच्या कल्पकतेवर अवलंबून होतं. मग आम्ही audio clips बनवल्या. तिथल्या लोक कलांचे नमुने जमवले. तिथल्या पाककृती बनवून/आणून ठेवल्या. तिथल्या भाषेची ओळख करून दिली. असं अभिनव प्रदर्शन होतं ते! फार मजा आली हा प्रकल्प करायला! भारताची चार भागांत विभागणी देखील सोपी नव्हती! त्यावरून वल्लभभाई पटेल यांना किती कठीण गेलं असेल ह्याची आपल्याला कल्पना येतेय असं आमचं conclusion निघालं!

आठवी भाग २

ह्या भूगोलाच्या प्रकल्पाच्या प्रदर्शनाच्या शनिवारी मी आणि अजून तिघी जणी नव्हतोच! आम्ही गेलो होतो थेऊरला! साखरशाळेत शिकवायला. त्यावेळी प्रबोधिनीच्या प्रचितीतर्फे उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा चालवल्या जायच्या. ह्या साखर शाळेत आम्ही आठवी आणि नववीमध्ये चार चार दिवस शिकवायला गेलो होतो. मला वाटतं मुलांचा वर्ग मांजरीच्या साखरशाळेत तर मुलींचा वर्ग थेऊरला अशी विभागणी होती. हा एक खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता. बहुतांश उसतोडणी कामगार हे स्थलांतरीत मजूर असतात. उसाच्या सीझनमध्ये ४/६ महिने सहकुटुंब इकडे येतात (साधारण जानेवारी ते एप्रिल). त्यांच्या मुलांची शाळा तेव्हा बुडतेच. आता नेमकी एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा असते. अर्थात ती बुडाल्याने मुलं पास होत नाहीत. पुन्हा गावी परत गेल्यावर परत त्याच इयत्तेत बसावं लागतं. हे असं कसं चालणार? मग शाळा सुटतेच. ती सुटू नये म्हणून ही १०० दिवसांची साखर शाळा प्रचितीतर्फे चालवली जायची. गीतांजली ताई त्याचं काम बघत होती.

साखर शाळेतली मुलं साधारण पहिली ते चौथी मधली असायची. त्यांना शिकवायला खूप मजा यायची. कारण ती बऱ्यापैकी शार्प असायची! एका मुलीने मला खूप आश्चर्यचकित केलं होतं. आम्ही काही मोठ्या मुलांना इंग्रजी शिकवत होतो. त्यांना मुळाक्षरं येत होती. मग स्पेलिंग्स शिकवत होतो. Cat, dog, man असे सोपे शब्द. मग उच्चारावरून त्या शब्दाचे स्पेलिंग काय असेल असा खेळ सुरु झाला. ती मुलगी म्हणाली, “ताई, मी तुझं नाव लिहिणार!” मी म्हटलं, “माझं नाव अवघड आहे कशाला?” पण ती म्हटली मी प्रयत्न करते. काही वेळाने ती पाटी घेऊन आली. त्यावर लिहिलं होतं Ig…. मी तिला विचारलं की, अगं, माझं नाव G पासून नाही J पासून सुरु होतं पण तू आधी I का लिहिलास? त्यावर तिने जे उत्तर दिलं ते इतकं भारी होतं की I was blown away! ती म्हणाली, “ताई तुझ्या नावाच्या सुरुवातीचा जि ह्रस्व आहे ना म्हणून पहिली वेलांटी काढली म्हणून I आधी लिहिला!” I still remember I was speechless! अतिशय हुशार, अतिशय खोडकर आणि खूप जीव लावणारी मुलं होती ती सगळी! त्यांना शिकवताना आम्हीच बरंच काही शिकलो!

थेऊरला वातावरणात सतत मळीचा एक आंबूसगोड वास भरून राहिलेला असायचा. पहिल्यांदा कसेतरी व्हायचे मग त्या वासाची सवय होऊन जायची. आम्ही चार दिवस कारखान्याच्या कामगारांच्या एका बैठ्या चाळीतल्या दोन खोल्यात राहायचो. साखर शाळेत शिकवणारे शिक्षकही त्याच चाळीत राहायचे. बरेचदा गीतांजली ताई तिथेच असायची. आम्ही मिळून स्वयंपाक पण करायचो. सकाळी आणि संध्याकाळी साखर शाळेतल्या मुलांबरोबर भरपूर खेळायचं. दिवसा शाळा. रस्त्याने जाता येता उसाच्या गाड्या भरून चाललेल्या असत. त्यांना मागितलं की उसाची एकदोन कांडकी मिळायची. मग तो उस खात खात गावात भटकायचं, गणपतीच्या मंदिरात, नदीच्या घाटावर! रात्री शाळेतल्या सरांबरोबर गप्पा चालायच्या. एकदा सिनेमाचा विषय निघाला. ती आमची शेवटची रात्र होती. दुसऱ्या दिवशी आम्ही सरांबरोबरच पुण्याला येणार होतो. तर रात्री आमच्या सिनेमाच्या गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या त्या आम्ही झोपताना लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहोचेपर्यंत खेळत होतो! धमाल आली होती!

एके दिवशी ह्या मुलांबरोबर त्यांच्या पालावर गेलो होतो. आमच्यासारख्या मुलांना देखील डोकं वाकून आत जायला लागेल असं बुटकं दार आणि आत बराचसा अंधार! सकाळी सकाळी गेलो होतो तर एक मुलगा सांगत आला की त्यांना पहाटे तीन कोल्ह्याची पिल्लं मिळाली आहेत. मग उसाच्या शेतात ती पिल्लं पहायला गेलो. चॉकलेट ब्राऊन रंगाची ती पिल्लं अगदी कुत्रासारखी फक्त लांबूडकं तोंड असलेली होती. आणि त्यांच्या अंगावर खूप मऊ फर होती. आम्ही मुलांच्या घरी आलो होतो. मग चहा तरी प्या असा आग्रह झाला. तेव्हा खूप गूळ घातलेला कोरा चहा प्यायला होता. पण तो चहा फक्त गुळाने इतका गोड लागत होता असं आता वाटत नाही. त्यात मुलांच्या प्रेमाचा खूप मोठा वाटा होता! पुण्याला घरी आलो आणि आपण किती privileged आहोत ह्याची जाणीव झाली. अशा अनेक जाणीवा प्रबोधिनीतल्या उपक्रमांनी नकळत रुजवल्या. हे खूप मोठे संस्कार प्रबोधिनीने आमच्यावर केले.

तसा आठवीत डिसेंबरमध्ये आमचा एक मोठा संस्कार सोहळा पार पडला तो म्हणजे विद्याव्रत संस्कार. सोप्या भाषेत सांगायचं तर मुंज! म्हणजे पारंपारिक मुंजीत केल्या जाणाऱ्या विधींना फाटा देऊन, मुंजीच्या मूळ उद्देशाला धरून केला जाणारा हा संस्कार. प्रबोधिनीत होणाऱ्या सर्व समारंभांच्या पुस्तिका छापलेल्या आहेत. मात्र विद्याव्रत संस्कार हा केवळ दोन तास चालणारा विधी नव्हता. त्यापूर्वी आम्ही एक महिनाभर त्याच्यासाठी तयारी करत होतो. दर शनिवारी एक अशी पाच व्याख्यानं आम्ही ऐकली. ती ह्याक्रमाने होती – शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, आत्मिक विकसन आणि शेवटचे राष्ट्र अर्चना. ही व्याख्याने आम्हाला प्रबोधिनीच्याच व्यक्तींनी दिली होती. नावाप्रमाणे प्रत्येक व्याख्यानामध्ये व्यक्तिमत्वाच्या त्या त्या पैलूवर लक्ष केंद्रित केलं होतं. फार सुंदर व्याख्यानं झाली होती. मुख्य विद्याव्रत संस्कार हा देखील फार सुंदर सोहोळा असतो. एक दिवस मुलांचा आणि एक दिवस मुलींचा विद्याव्रत संस्काराचा कार्यक्रम होतो. मुलामुलींचे आई वडील देखील ह्या संस्काराच्या वेळी उपस्थित असतात. विद्याव्रतानंतर शनिवारी करण्याची उपासना थोडीशी वेगळी आहे. ह्याची पूर्वतयारी नववी दहावीची मुलंमुली करतात. उपासना मंदिर छान फुलांनी सजवलेलं असतं. आठवीची मुलंमुली उत्सवमूर्ती असतात! ह्या साऱ्याच्या खूप प्रसन्न आठवणी आहेत.

खरंतर मुंज ही मुलं ८-९ वर्षांची असताना केली जाते. पण प्रबोधिनीत पाचवीतच का करत नाहीत विद्याव्रत संस्कार? आता विचार करताना लक्षात येते की पाचवीत वय असलं तरी हा संस्कार करून घेण्याइतकी मानसिक आणि बौद्धिक तयारी झालेली नसते. आठवीत येईपर्यंत प्रबोधिनीत तोवर घेतलेल्या अनुभवांनी एक पाया रचला जातो. ज्यामुळे ह्या संस्काराचा मूळ उद्देश साध्य व्हायला मदत होते.

ह्या संस्कारानंतर मग आम्ही दर शनिवारी खालच्या उपासना मंदिरात उपासनेसाठी जाऊ लागलो. ह्या उपासनेनंतर बरेचदा प्रबोधिनीचे संचालक मा. गिरीशराव आम्हाला मार्गदर्शन करत असत. गिरीशराव खूप सुंदर बोलतात, ऐकत राहावं असं. गिरीशराव विविध विषयांवर बोलत असत. इतिहास, विज्ञान, भाषा किंवा चालू घडामोडी. मला आठवतंय एकदा त्यांनी पोलिओ लसीच्या शोधाची गोष्ट सांगितली होती. Placebo, double blind trial experiments ह्याविषयी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. मला ही शनिवारची वैचारिक मेजवानी फार आवडत असे.

आमच्या नंतरच्या तुकड्यांसाठी सज्जनगडावर एक विद्याव्रत संस्कार शिबीर घेतलं गेलं. जी व्याख्यानं आम्ही दर शनिवारी ऐकली त्यांची शिबिरात सत्र घेतली गेली. जरी आमची वेळची व्याख्यानं खूप छान झाली होती तरी मला अशाप्रकारे विद्याव्रत शिबिराची संकल्पना खूप आवडली. इथे ‘अनेक वर्षांनी मग आम्ही त्या न झालेल्या शिबिराची भरपाई केली’ असं नोंदवून ठेवते Happy

आठवी भाग ३

आमचं त्या वेळी विद्याव्रत संस्कार शिबीर झालं नाही तरी एक अद्भूत शिबीर लगेचच झालं. आठवी आणि नववीच्या मुलींचं तंबूतलं शिबीर. सांगवी गावाजवळ युवती विभागाने ८ दिवसाचं शिबीर घेतलं होतं. ह्या शिबिराची आयोजनापासून स्वयंपाकापर्यंत सगळी जबाबदारी ह्या तायांनी पार पाडली होती. अक्षरशः तंबू ठोकून राहिलो होतो. कंदील आणि टॉर्चच्या प्रकाशात. हे शिबीर पथकशः झालं होतं. प्रत्येक पथकाचा वेगळा तंबू. भल्या पहाटे उठायचं, ब्रश केलं की उपासना. अंधारात उपासनेला सुरुवात व्हायची पण शेवटचा ओंकार संपवून डोळे उघडले की सभोवताली उजेड असायचा. अशी दिवसाची प्रसन्न सुरुवात. मग चहा, आन्हिकं झाली की खेळ. सकाळच्या सत्रात आम्ही बेसबॉल खेळायला शिकलो होतो. मग नाश्ता, मग दिवसभराचे जे उपक्रम असतील ते. वेगवेगळी सत्र असायची. संध्याकाळी पुन्हा खेळाचे सत्र. त्यात अत्यंत चुरशीच्या पथकशः स्पर्धा झाल्या होत्या. मग अंधार पडल्यावर एखादे पद्य सत्र, जेवणे आणि शेवटी प्रार्थना. रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात बाकी सर्वत्र अंधार भरून राहिलेला असताना “मातृमंदिर में चलो” ही प्रार्थना म्हणताना खूप शांत वाटायचं. तंबूतल्या शिबिरात खूप धमाल केली. अनुभवकथनाच्या सत्रांना एक दिवस सुवर्णा ताईंनी बचत गटाच्या कामाविषयी सांगितलं, एक दिवस बागेश्री ताईंनी त्यांच्या दारूबंदीच्या कामाचे थरारक अनुभव सांगितले. एक सत्र पोंक्षे सरांनी पण घेतलं होतं. पण ते कशावर होतं ते आठवत नाहीये.

उद्योग तर असंख्य केले. तिथल्याच एका झाडावर मचाण बांधलं होतं, एक दिवस प्रत्येक पथकाला चूल बांधून त्यावर दिलेल्या शिध्यातून स्वयंपाक करायचा होता. एक भाजी, खिचडी आणि पापड (त्याचा आम्ही मसाला पापड केला). आणि ही स्पर्धा होती! वेळेचं बंधन असलेली. चुलीसाठी दगड शोधण्यापासून सुरुवात होती. मी माझ्या ड्रेसला निखाऱ्यावर गेल्याने भोक पाडून ठेवले होते. मज्जा आली होती.

एक दिवस तायांनी जाहीर केले. आज दुपारचा स्वयंपाक नाही. मग जेवायचे काय? तर आम्ही जवळच्या गावांत जायचे. काम करायचे आणि कामाच्या बदल्यात जेवण करून यायचे! मग काय आम्ही जवळच्या एका छोट्या वाडीवर गेलो. तिथे आमचा हा प्रस्ताव मांडला. एक बाई बाहेर भांडी घासत होती. तिने सांगितले ठीक आहे, भांडी घासा. तासभर त्यांची ती जड पितळी भांडी मन लावून घासली. मग कळले की आज त्यांच्या घरी nonveg चा बेत होता! मी आणि अजून एक दोन जणी पडलो शाकाहारी! आता काय करायचं? मग तिची शेजारीण धावून आली. म्हणाली काळजी नको, आमच्याकडे खा! पण मग काम न करता कसं खायचं? मग आधी जेवलो आणि नंतर तिला शेणाने अंगण सारवायला मदत केली. तिथेच पलीकडे काही छोट्या मुली शाळेच्या गॅदरिंगसाठी नाच बसवत होत्या. मग आमच्यातल्या उत्साही मुलींनी तिथे जाऊन लगेच choreographer ची भूमिका निभावली! तिथल्याच एकीचे निरेचे दुकान होते. मग तिथे जाऊन नीरा प्यायलो. तोवर संध्याकाळ झाली होती. मग तिथल्या सगळ्यांचा निरोप घेऊन, संध्याकाळपर्यंत बाहेर ठेवलेली असल्याने आपण नीरा प्यायलो की ताडी असे गहन डिस्कशन करत शिबिरात परत आलो Lol खरं सांगायचं तर तेव्हा आम्हाला शिबीरच चढलं होतं!

एके दिवशी जवळच्या एका वीटभट्टीवर गेलो. तिथल्या बायकांकडून वीट कशी पडतात हे शिकलो आणि स्वतः काही विटा पाडून बघितल्या. तो साचा माती भरल्यावर भयंकर जड होतो. तो डोक्यावर घेऊन जाणे आणि ओतणे हे किती कष्टाचे काम आहे ह्याची जाणीव झाली. ह्या श्रमाच्या कामाचे दिवसाचे फक्त २० रुपये मिळतात आणि पुरुषांना बायकांपेक्षा जास्ती पैसे मिळतात (जरी सारख्या विटा पाडल्या तरी) हे ही तिथल्या बायकांकडून ऐकलं. आपल्या समाजात काय प्रश्न आहेत हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवांतून असं समजत होतं.

एक दिवस गटचर्चा आणि model making अशी सत्रं होती. गटचर्चेला वेगवेगळे विषय होते. नंतर model making साठी आदर्श गाव असा विषय होता. थोडे फार साहित्य दिले होते. मग आम्ही खपून एक गावाचे मॉडेल तयार केले. मॉडेल खाली जमिनीवरच. त्यातील प्रत्येक जागेवर एक काडी खोचून ही जागा आदर्श कशी अशी एक चिठ्ठी टाकली होती! मला वाटतं सुवर्णा ताई परीक्षक म्हणून होत्या. मग आमच्या त्या अति- आदर्श गावाचे मॉडेल बघताना त्यांनी विचारले, “जर गावातले सगळे लोक इतके चांगले, सज्जन असतील तर मग गावात पोलीस स्टेशन कशासाठी?” आमच्यातल्या एकीचे डोके तेवढ्यात चालले, “ताई, गावातले लोक सज्जन असले तरी बाहेरून चोर येऊ शकतात ना! म्हणून पोलीस स्टेशन!” हे उत्तर ऐकून सुवर्णा ताईंबरोबर आम्ही सगळ्या सुद्धा हसत सुटलो! कल्पक जाहिराती, नाटके रचणे अशी बरीच मजेशीर सत्र आम्ही त्यावेळी केली. एका संध्याकाळी एका क्षितिजावर मावळता सूर्य आणि त्याच्या बरोब्बर उलट दिशेच्या क्षितिजावर उगवता चंद्र असा नजारा पाहिला होता. एका रात्री शिबिराच्या जागी चोर आला! आम्ही रात्रीच्या रक्षणाच्या वेळा वाटून घेतल्या होत्या. रोज एक ताई आणि काही मुली दोन दोन तासांच्या गस्तीवर जाग्या राहायच्या. मध्ये शेकोटी पेटवलेली असायची. तर अशा एका रात्री चोर आला होता. तो माणूस दिसल्याने गस्तीवरच्या मुलींनी आरडाओरडा केला आणि चोर चोरी न करताच पळून गेला! दुसऱ्या दिवशी तो चर्चेचा विषय!

Toilets साठी जरा दूर चर खणले होते आणि आडोसा तयार केला होता. आंघोळीला सुट्टीच होती. फक्त हात पाय तोंड स्वच्छ धुणे ह्यावर काम चालू होतं! पिण्याचं पाणी असंच छोट्याश्या तळ्यातून घेऊन, शुद्ध करून वापरत होतो. कोणत्याही शहरी सुखसोयींशिवाय आणि पूर्णपणे निसर्गाच्या सहवासात ते सात दिवस घालवले होते. शिबिरात एक शब्द एकदम हिट झाला होता – भंजाळणे! कोणत्याही प्रसंगी, सजीव निर्जीव कशालाही फिट बसणारा असा भापो शब्द! थोडक्यात आम्ही सगळ्याच भंजाळलो होतो. एका संध्याकाळी आमचे तंबू गुंडाळून जड मनाने पुणे शहरात परत आलो. संध्याकाळचे सात वाजले असतील. शहरातल्या विजेने झळाळून उठलेल्या लक्ष्मी रस्त्यावरून बस शाळेकडे येत होती आणि अंधाराची सवय झालेले आमचे डोळे तो प्रकाश पाहून भंजाळून गेले! तेव्हा आम्हाला भंजाळणेचा एक नवीन अर्थ कळला!

मला वाटते आठवीत (की नववीत?) पुन्हा एकदा आमची क्रीडा प्रात्याक्षिके झाली होती! त्याच्या तयारीसाठी एक क्रीडा शिबीर झाले होते. म्हणजे सात दिवस फक्त खेळ..शाळा, अभ्यासाचे तास काही नाही. तेव्हा एस पी च्या मैदानावर पडीक असायचो. भरपूर नवीन पद्य शिकलो होतो.

ह्या साऱ्या उपक्रमांबरोबर नेहमीचा अभ्यास, युनिट टेस्टस, अवांतर वाचन ह्या गोष्टी चालू होत्याच! आता विचार करताना वाटतं की केवढ्या गोष्टी करत होतो आपण एका वेळी! त्या मानाने आत्ताचं आयुष्य एकदम एकारलेलं आणि एकसुरी वाटू लागतं! मग आठवीत अनुराधा ताईंनी शिकवलेल्या वि. म. कुलकर्णी यांच्या “आठवते ना” कवितेच्या ओळी आठवतात.

मला तरी नित आठवते गा, आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये या उबगुनी जाता देह आणि मन!
आठवते ना, आठवते ना!

मी ९७ बॅच चा.

शाळेबद्दलच्या आवडणार्‍या गोष्टी:
अभिव्यक्ति, प्रकल्प, शिबिरं, फटाकेविक्री, अभ्यासाला वाजवीपेक्षा अधिक महत्व न देणं.

नावडणार्‍या गोष्टी:
आपण लै शहाणे असल्याची भावना मनात भरवणं, मुला मुलींचे नुसते वेगळे वर्गच नाही तर सर्व अ‍ॅक्टिव्हिटी वेगळ्या.

अँकी नावडत्यां बाबींबद्दल सहमत. Happy
माझ्याबाबतीत तर आधी बुद्धीमान म्हणून प्रबोधिनीत अन नंतर आर्किटेक्ट म्हणून सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स चा वटवृक्ष झाला. Lol काम करायला लागल्यावरच जमीनीवर आले . (अस मला वाटत Wink )

>>>>>> काम करायला लागल्यावरच जमीनीवर आले . (अस मला वाटत .>>>>>>
मी समजत होते माझ्या लेकींचे पाय जमिनीवर ठेवायचं काम मीच केल.मीही जमिनीवर आले.असो.जिज्ञासा खूप सविस्तर आणि छान लिहील आहेस.या निमीत्ताने माझ्याही आठवणीना उजाळा मिळाला.

शोभनाताई, आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय>>>>+++++१११११११११११११११११११११

हैला , पालकसभेत आईला काय काय सांगितल होतं देव जाणे >>>:) Happy Happy

मस्त आठवणी आहेत. एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की तुम्हांला तुमच्या शिक्षिकांची पहिली नांवं माहिती आहेत, त्याने जिव्हाळा नक्कीच वाढत असावा. आमच्या शिक्षिकांना आम्ही नुसत्या आडनांवाने हाक मारत असल्याने किंबहुना तशी सक्ती असल्याने जरा दुरावा ( पक्षी - आदर) वाढतो असं मला वाटतं Wink

संपदा, पूर्ण शाळाच अशी हाक मारत होते.
मला तर कोणाचे आडनाव आठवायचे असेल तर विचार करावा लागेल जरा.
मी अशीच नावे लिहुन बघितले तर आमच्या बॅचला कमाल ३५-३६ मुली होत्या आणि आज मला त्यातली ३४ नावे आठवली. खुप छान वाटले Happy

शब्दाली , मला रोल नंबर प्रमाणे सगळ्या आठवल्या.
संपदा , आता २५-३० वर्षानी ही भेटले की त्या शिक्षकांना मी , माझ्या बहिणी , आमची नाव , अन सध्या काय करतो हे माहित असत. दिस इज अमेझिंग. Happy
मला आठवतय मी सातवीत असताना , गिरीशराव ( तेव्हा प्राचार्य होते) घरी आले होत. सहज भेटायला. मी अन देवयानी ( माझी बहिण , ती पाचवीत होती) भांडत होतो. हरकत नाही चालू द्या ! अस म्हणाले होते Lol

मन प्रसन्न होऊन गेले अगदी.....इतक्या आपुलकीने, श्रद्धेने तसेच निव्वळ स्मरणशक्तीच्या भांडवलावर लिहिलेले हे लिखाण खूप कौटुंबिक असेच उतरले आहे. मायबोली प्रशासक मंडळाने आवर्जून जपून ठेवावे असेच झाले आहे. शाळा मुंबईपुण्यातील असो वा कोल्हापूर सातारा बेळगाव भागातील वा अगदी तालुका पातळीवरील असो....वर्गात अशीच गोड पोरेपोरी असल्यावर शिक्षकांकडून शिक्षणाचे कार्यदेखील केवळ दहा ते पाच एक काम अशा रुपाचे न होता त्याला आपलेपणाची जी झालर लागली जाते तिची तुलना होऊ शकत नाही. इतक्या वर्षानंतर विद्यार्थिनी त्या आठवणी सुंदररितीने रेखीत आहेत हे वाचल्यावर मलाही तीव्रतेने शिक्षकी पेशातच जावून विद्यादानासोबतीने असे विद्यार्थ्यांचे आदरप्रेमही मिळवावे वाटत होते, त्याची आठवण आली. माझ्या दुर्दैवाने काही कारणाने तो रस्ता मला बंद झाला तरी अन्यत्र गेल्यानंतरही माझी शिक्षकाची भावना कधीच दडपून गेली नाही......या धाग्यावरील आठवणी वाचता वाचता मला वाटू लागले की माझ्याच विद्यार्थिनी आहेत हा सार्‍या चिमण्या....गोड चिवचिवाट करणार्‍या....आनंदी !!

ज्ञानप्रबोधिनी हे अप्पा पेंडसे नावाचा शिक्षणतज्ञांनी पाहिलेलं स्वप्न होत. त्याला शैक्षणिक प्रयोगाच रूप देऊन ते प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार होता.त्या दिशेने ठामपणे नियोजनबद्ध वाटचाल होती.अर्थात हे सर्व मी माझी मोठ्या मुलीला शाळेत घातल तेंव्हा माहित नव्हत.माझी पाटी पूर्ण कोरी होती.इथ मी त्या विषयात न शिरता फक्त आठवणी लिहिणार आहे.आमच्या सोसायटीत.एस.पी.कॉलेजमध्ये शिकवणार्या भिडेबाई राहायच्या.सोसायटीच्या गणपती उत्सवात त्यांच्या मुलीनी सोनालिनी "Let My Country Awake" ही कविता म्हटली.इतर सर्व लहान मुलात तिचा वावर उठून दिसणारा होता.तो माझ्यावर प्रभाव टाकून गेला.ती प्रबोधिनीत जात होती.तिच्या आईकडून समजलेल्या माहितीत.एका वर्गात ३० मुली आणि सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोन या गोष्टी मला आवडल्या.मी प्रवेश चाचणी फॉर्म भरायला गेले तेंव्हा फक्त डोक आणि पेन घेऊन येउदे अस सांगितलं होत.भिडे बाईनी स्कॉलरशिप परीक्षा दिली आहे न तिने तेवढ पुरेस आहे.अस सांगितलं. मी हुश्श केल कारण आमच्या बाईसाहेबांच्या कडून अभ्यास करून घेण कठीण काम होत.चवथीपर्यंत महराष्ट्र मंडळाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत ती होती.विविध उपक्रमात बक्षिसे मिळवायची.बालवर्गात असतानाच २६ जानेवारीला संस्थेच्या सर्व विभागांच एकत्रित झेंडावंदन व्हायचं प्रतिज्ञा सांगायचं काम छोट्या मुलांकडे असायचं.हिनी सर्वाना प्रतिज्ञा सांगायचं काम केल होत.परीक्षेचा अभ्यास घेताना मात्र नाकी नौ यायचे.एकदा तर इतिहासाच्या पेपरात कट्टाकट्टी पास झाली. घरी आल्यावर घडाघडा उत्तर दिली होती.मी मारे शाळेत बाईना जाब विचारायला गेले. तर हिने सगळा पेपर लिहिलाच नव्हता.लिहायचा कंटाळा आला म्हणाली.

प्रबोधीनीत तिची निवड झाली आणि पुढे अभ्यास घेण हे काम मला कधीच करायला लागल नाही.आणि स्वत:ची फजिती करून घेण्याची वेळ कधी आली नाही.यांच्या प्रश्नपत्रिका इतक्या innovative असायच्या कि पुस्तक समोर ठेऊण उत्तर लिहायला सांगितली तरी कॉपी करता येणार नाही. त्यामुळे पेपर लिहीण तिला आवडायला लागल.हिला कधी कोणता क्लास लावायला लागला नाही किंवा एक्स्ट्रा अ‍ॅक्टीविटीसाठीही काही कराव लागल नाही.प्रबोधिनीत तर त्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्राच होत्या.

पेटलेल्या पंजाबात,रुपकवर सती प्रकरणानंतर राजस्थानात अभ्यास दौरा,जंगलात तंबू बांधून राहण हे या या मुलींसाठी साहस आणि अभ्यास असला तरी पालकांसाठी,सुखरूप परत येईपर्यंत काळजाचा ठोका चुकवणारा असायचा.कोणी पालक आपल्या पाल्याला शाळेत घालताना अनुभव विचारायच्या तेंव्हा मी सांगायची शाळा उत्तम आहे.पण तुमच हृदय मजबूत असायला हव.सातच्या आत घरात अशी मुलींकडून अपेक्षा असेल,तर जमणार नाही.असे हृदय मजबूत असणारे बरेच निघाले. माझ्या भावानीच त्याच्या मुलीला प्रबोधिनीत घातलं. मध्यंतरी आता अमेरिकेत राहणार्या आरती कामे आत्ताची देशपांडे फोनवर बोलण झाल.

ती म्हणत होती तुम्ही माझ्या आईला शाळेत घालण्यासाठी इतक चांगल सांगितलं.त्यामुळे मला शाळेत घातल आणि आज मी जी काही आहे ती त्यामुळे.मला तर हे आठवतही नव्हत.आठवणी थोड्या भरकटताहेत.व्हाईस मेसेज असतो तशी इथ सोय असती तर तर पटापट सगळ बोलून टाकल असत टाइप करण झेपत नाही आहे.पुन्हा उद्या थोड्या आठवणी लिहिते.

छान वाटले वाचून. भाग्यवान आहेत खरच या मुली. Happy

खेड्यांमधून तर अजून नीट शिक्षण सुध्दा नाहीये दुर्देवाने. Sad आमच्या गावी अजुनही आनंदीआनंदच आहे.

मस्त मस्त पोस्ट्स! वाचायला मजा येत्येय!
अँकी, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. थोडा "माज" होताच शाळेचा पण तो विशेष नुकसान न होता उतरला. आता आदर, जिव्हाळा आणि प्रेम उरलं आहे. co-ed असतं तर अजून वेगळी मजा आली असती कदाचित काय माहिती! त्यात न आवडणारी गोष्ट म्हणजे आमच्यावेळी ह्या गोष्टीचा जो बागुलबुवा केला जायचा त्याने जास्त वैताग यायचा! आमच्यावेळी अशासाठी की आता मुलं मुली बरेच जास्ती बोलतात एकमेकांशी! पण शाळेवर चिडणे हा देखील एक जन्मसिद्ध हक्क होता Happy

शोभना ताई, मस्त आठवणी..अजून नक्की लिहा! बोलून टाईप झालं असतं तर खरंच खूप मोठी सोय झाली असती!

शाळा म्हणजे दुसरं घर असं आपुलकीचं वातावरण असतं शाळेत. ही खूप कमाल गोष्ट आहे पण गिरीश राव, पोंक्षे सर यांच्या सगळी मुलं लक्षात असतात! म्हणजे दरवर्षी लग्न समारंभात आपले काही नातेवाईक भेटतात ना त्यांना देखील मग तू कोणत्या वर्षाला असं उत्तर द्यावं लागतं. पण प्रबोधिनीत कधीही गेलं आणि गिरीशराव भेटले की ते बरोब्बर लक्षात ठेवून आपली चौकशी करणार! मी कुठे आहे, काय करतेय सगळं लक्षात असतं Happy
हेच ताराबाई आणि भय्याजींबद्दल! शाळेची नवीन इमारत झाली तेव्हा असंच एक दिवस बघायला गेलो तर भय्याजींनी स्वतः फिरून सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि मग गच्चीची चावी दिली..आमच्या आवडत्या जागी बसून गप्पा मारायला Happy

इयत्ता नववी – भाग १
नववीच्या खूप आठवणी आहेत पण एक आठवण आहे जी सगळ्या आठवणींपेक्षा सर्वात जास्ती ठळक आणि लाडकी आहे आम्हा सगळ्यांचीच! म्हणून मी ती सगळ्यात शेवटी सांगणार आहे!

नववीत आणि दहावीत इंग्रजीसाठी लक्ष्मी मॅडम शिकवायला होत्या. She was the best teacher for English! सगळ्यात मजेची गोष्ट अशी की त्यांना स्वतःला फक्त इंग्रजीच उत्तम येत होतं. हिंदी खूप जुजबी आणि मराठी नही के बराबर! त्यामुळे आमची सुरुवातीला थोडी पंचाईत झाली! पण लवकरच लक्षात आलं की it was rather a blessing in disguise! तसं आम्हाला इंग्रजी बोलता येत होतं. पण इंग्रजी बोलण्याची फारशी गरज भासत नसल्याने आम्ही बोलत नव्हतो. नाही म्हणायला सातवीत की आठवीत एकदा आमच्या वर्गाच्या डोक्यात भाषा सप्ताह पाळण्याची कल्पना येऊन ती राबवून झाली होती. म्हणजे एक आठवडा फक्त त्याच भाषेत एकमेकींशी बोलायचं! आता मात्र लक्ष्मी मॅडमशी इंग्रजीतून बोलल्याशिवाय पर्याय नव्हता. लक्ष्मी मॅडम शिस्तीच्या होत्या पण लवकरच त्यांच्याशी आमच्या वर्गाची गट्टी जुळली आणि मग त्या किती प्रेमळ आहेत हे पण लक्षात आलं. मग त्यांच्याशी बोलताना जास्ती बेधडक बोलायला लागलो आणि त्याने आमचं इंग्रजी सुधारायला खूप मदत झाली! लक्ष्मी मॅडम खूप सुरेख शिकवायच्या! आमची इंग्रजीची पुस्तकं पण अतिशय वाचनीय होती. Wordsworth, W. Somerset Maugham, Charles Dickens, O. Henry, Shakespear, Rudyard Kipling अशा अभिजात लेखकांपासून ते Anita Desai, Vikram Seth अशा नव्या फळीच्या लेखकांपर्यंत सर्व साहित्याची ओळख ह्या पुस्तकांतून झाली. लक्ष्मी मॅडमनी शिकवलेल्या दोन कविता माझ्या अजूनही खूप चांगल्या लक्षात आहेत. The frog and the nightingale by Vikram Seth आणि The Rime of the Ancient Mariner by Samuel Taylor Coleridge. ह्या दोन्ही कवितांची फक्त काही कडवी आम्हाला क्रमिक पुस्तकांत होती. पण आम्हाला कविता नीट समजाव्यात म्हणून त्या दोन्ही कविता आम्ही पूर्ण शिकलो. Ancient Mariner ही खूप म्हणजे खूप मोठी कविता आहे. ती खरंतर एक मिनी कादंबरी आहे. फार मजा आली होती ती शिकताना! मी अनेक कारणांसाठी पुन्हा नववीत जायला तयार आहे त्यातलं एक कारण म्हणजे इंग्रजीचे तास! खरतर शाळेत असताना माझं इंग्रजी अवांतर वाचन Enid Blyton - Fantastic four च्या पुढे गेलं नाही. ह्याउलट मराठी वाचन खूप चौफेर होत होतं. त्यात अनेक अनुवादित पुस्तकं देखील होती. पण ह्या इतक्या सुरेख इंग्रजीच्या पुस्तकांनी इंग्रजी साहित्य विश्वाची एक सुंदर ओळख करून दिली. मग कॉलेजमध्ये गेल्यावर भरपूर इंग्रजी पुस्तकं वाचली गेली.

नववीत (सुदैवाने) मला अचानक गणिताची गोडी उत्पन्न झाली होती असं आठवतंय! कारण trigonometry आणि log tables! गणिताला जोशी सर होते. आम्ही नववीत गणिताचा एक छान प्रकल्प केला होता. पुण्यातल्या महत्वाच्या स्थानांची/इमारतींची models बनवली होती आणि त्यांचे प्रदर्शन मांडले होते. आमच्या गटाने शिवाजी नगर रेल्वे स्टेशन बनवले होते. त्यासाठी शाळेच्या वेळात शिवाजी नगर स्टेशनला जाऊन सगळी मापे घेऊन आलो होतो. असं शाळेच्या वेळात आपली प्रकल्पाची कामं करायला बाहेर जाणे फार सहज होत असे. ह्या प्रकल्पात पण खूप मजा आली होती. संस्कृत शिकवायला भाग्यश्री ताई होत्या आणि संस्कृत व्याकरण शिकवायला विसुभाऊ. विसुभाऊ खूप खोलात जाऊन व्याकरण शिकवायचे (म्हणजे बाराखडीतल्या प्रत्येक व्यंजनाचा उच्चार कसा करायचा आणि तो तसाच का करायचा वगैरे) आणि त्यावेळी आपल्याला कळतंय की नाही असं वाटत होतं पण शाळा संपल्यावर जवळपास १० वर्षांनी माझ्या एका भाच्याला संस्कृत व्याकरण शिकवायची वेळ आली आणि पुस्तक पाहिल्या क्षणी सगळं लख्ख आठवलं तेव्हा खूप आनंद झाला!

नववीतली अजून एक खास आठवण म्हणजे क्रिकेट वर्ल्डकप! आमच्या वर्गाला क्रिकेटचं भारी वेड! आधीच्या वर्ल्डकपच्या वेळी आम्ही वर्गात writing pad आणि छोट्या बॉलने भारत विरुद्ध इंडिया अशा मॅचेस खेळलो होतो (कारण भारताच्या टीमशिवाय दुसऱ्या कुठल्याच टीममध्ये कोणी जायला तयार नव्हतं!). नववीच्या आमच्या वर्गाच्या खिडक्या ज्या एका बाजूला उघडायच्या तिथे मागे एक बिल्डींग होती. त्यातल्या एका फ्लॅटची गच्ची त्या खिडकी समोर यायची. त्या घरातले आजोबा आणि त्यांचा नातू हे आम्हाला सामील होते. ज्या दिवशी मॅच सुरु असेल त्या दिवशी दर दोन तासांच्या मध्ये त्यांना खिडकीतून हाक मारायची मग ते येऊन आम्हाला स्कोर सांगायचे! असं सेटिंग होतं! एकदा अशीच मॅच सुरु होती. शेवटचा तास आणि तिकडे मॅचच्या शेवटच्या ओव्हर्स. आमचं कोणाचंच वर्गात लक्ष नव्हतं! आणि इतक्यात बाहेरून फटाक्यांची माळ फुटल्याचे आवाज आले आणि आम्ही सगळ्याजणी “इय्ये! जिंकलो!!” असं जोरात ओरडलो होतो आणि टाळ्या वाजवल्या होत्या! मला वाटतं ताईंना कळलंच नव्हतं की अचानक काय झालं ते!

नववीत आम्ही जे प्रकल्प केले त्यात बरीच विविधता होती. कारण आमच्या whatsapp वरच्या चर्चेत आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी आठवत आहेत! काही जणी भविष्यवेध (futurology) प्रकल्पात होत्या. ह्यात एखादा विषय घेऊन त्याच्या भविष्यातील शक्यतांचा अभ्यास करायचा होता. त्यात एका गटाने मराठी कथेचे भविष्य असा विषय घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी थेट शांता शेळके यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली होती! आमच्या प्रत्येकीकडे अशा बऱ्याच संस्मरणीय आठवणी आहेत! काश आम्ही सगळ्या मिळून इथे लिहू शकलो असतो!

आमच्या गटाने समाजशास्त्र विषयात प्रकल्प केला होता. आमचा विषय होता –ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण. मला आठवतंय की त्यासाठी एकदा आम्ही तिघी जणी शाळेतून थेट वेल्ह्याला राहायला गेलो होतो. म्हणजे घरी जाऊन थोडे कपडे/इतर आवश्यक सामान घेऊन आलो आणि स्वारगेटला गेलो. एसटीत बसलो आणि आमच्या बडबडीला सुरुवात झाली. त्या नादात आम्ही तिकीट काढायचे विसरलो! आणि नेमके त्या गाडीत तिकीट चेकर आले! त्यांनी आम्हाला पकडले. सुदैवाने तोवर आमचा स्टॉप आला होता त्यामुळे तिथेच उतरवून चौकशीला सुरुवात झाली! आम्ही त्यांना सांगत होतो की तिकिटाचे पैसे आमच्या हातातच होते पण कंडक्टरने विचारलेच नाही! काही झालं तरी तिघींच्या दंडाचे पैसे काही आमच्याकडे नव्हते (घरून इतके पैसे घेऊन आलो नव्हतो). आम्ही थोड्या घाबरलो होतो पण तरी आमची बाजू आम्ही मांडली. शेवटी त्या भल्या चेकरने केवळ तिकिटाचे पैसे घेऊन आम्हाला सोडून दिले! त्यावेळी आम्हाला इतक्या काय गप्पा मारायच्या असायच्या आता आठवत पण नाही पण ह्या गोड गप्पांमुळे आम्ही चांगल्याच अडचणीत आलो होतो! ती वेल्ह्यातली रात्र चांगलीच लक्षात आहे. वेल्हे म्हणजे प्रबोधिनीचे गाव! त्यामुळे सगळीकडे आम्हाला खूप सहकार्य आणि प्रेम मिळाले. त्या रात्री खचाखच चांदण्यांनी भरलेलं आकाश पाहिलं होतं. आणि गावात चक्री भजन सप्ताह सुरु असल्याने रात्री झोपू शकलो नव्हतो!

नववीत (आणि आठवीत पण बहुतेक) विज्ञान दिनाला NCL, DRDO, IUCAA अशा संस्थांमध्ये गेलो होतो. त्या भेटी खूप नीट लक्षात आहेत. NCL मध्ये glass blowing, polyers, liquid nitrogen वगैरे गोष्टी पाहिल्या होत्या. काही शनिवार आयुकामध्ये खगोल शास्त्रावरची व्याख्याने ऐकायला देखील जात होतो.

नववीमध्ये शांतला ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही सहाध्याय दिनाला सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. त्याच्या आधी का नंतर शाळेत किरण पुरंदरे यांचं पक्षी निरीक्षण आणि त्यांचे अनुभव ह्यावर व्याख्यान झालं होतं. अशी सुंदर व्याख्यानं ह्या ना त्या निमित्ताने शाळेत होत असायची. नववीत असताना डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अभय बंग यांची व्याख्यानं झाली होती (मला हे आजीबात आठवत नाहीये!). कारगिल युद्ध त्यावेळी सुरु होतं तेव्हा प्रबोधिनीचे एक माजी विद्यार्थी जे सैन्यात होते त्यांचे अनुभव कथन झाले होते.

पोंक्षे सर आम्हाला physics शिकवायला होते. पण त्याशिवाय त्यांनी आमचे परिस्थिती ज्ञानाचे तास घेतले होते. मला वाटतं आठवी ते दहावीला आठवड्यातून एकदा परिस्थिती ज्ञानाचा तास असायचा. ह्या तासाला त्या वेळेच्या चालू घडामोडींवर चर्चा, त्याची माहिती अशा गोष्टी असायच्या. हा नेहमी शेवटचा तास असायचा. एका प.ज्ञा.च्या तासाला पोंक्षे सर एक पुस्तक घेऊन आले आणि म्हणाले छोटंसं पुस्तक आहे. आपण वाचायला सुरुवात करू, नाही संपलं तर पुढच्या तासाला संपवू. असं प्रास्ताविक करून सरांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली. पोंक्षे सर अति-उत्कृष्ट अभिवाचन करतात! ते पुस्तक होतं – Richard Bach चं Jonathan Livingston Seagull! तास संपला आणि शाळा सुटल्याची घंटा वाजली तेव्हा गोष्ट अशा ठिकाणी आली होती की कोणीही जागचं हललं नाही. ५ मिनिटं थांबून आम्ही बाकीच्या वर्गांना जाऊ दिलं (कारण खूप गोंधळ होता आणि त्यामुळे ऐकू येत नव्हतं) आणि मग सरांनी पुढे वाचायला सुरुवात केली. त्या दिवशी आम्हाला सरांनी अख्खं पुस्तक वाचून दाखवलं! आज ही एका टेबलावर बसून पुस्तक वाचणारे सर आणि नीट ऐकू यावं म्हणून खुर्च्या पुढे ओढून त्यांच्या भोवती कोंडाळं करून बसलेल्या आम्ही असं चित्र माझ्या डोळ्यांपुढे आहे.

इयत्ता नववी – भाग २
पोंक्षे सरांनी आमच्या वर्गाचे खूप लाड केले आहेत! As a class, we share some of the best memories of our lives with him. Rather he is the sole reason behind creating those memories!! We are truly BLESSED to have him as our mentor. प्रबोधिनीत असणं हेच एक स्पेशल असल्याचं फिलिंग असायचं पण त्याही पलीकडे जाऊन आपला वर्ग काहीतरी सुपर स्पेशल आहे असं वाटायला लावणारी घटना नववीत घडली. ती म्हणजे आमचं पंचनदीचं शिबीर!

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आमचा वर्ग, युवती विभागाच्या दोन ताया आणि पोंक्षे सर, सविता ताई आणि अस्मिता ताई असे सगळेजण चार दिवस कोकणातल्या पंचनदी ह्या सुंदर चिमुकल्या गावात राहायला गेलो होतो. तिथल्या एका वाडीत आमची रहायची व्यवस्था होती. हे आमच्या वर्गाचं एकमेव शिबीर ज्यात आम्ही सगळ्या ३६ जणी उपस्थित होतो. ह्या शिबिराचे संयोजन करण्यात आणि तिथे मार्गदर्शन करण्यात श्री. दिलीप कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा ताई ह्या दोघांचा खूप मोठा वाटा होता. ह्या शिबिराच्या दोन दिवसांची दैनंदिनी लिहिलेली पाने मला नुकतीच घरी आवराआवरी करताना सापडली! त्यावरून शिबिराचे नाव प्रेरणा शिबीर होते असे कळले!

आम्ही पुणे स्टेशनहून दापोलीच्या बसमध्ये चढलो. सलग रिझर्वेशन नव्हतं म्हणून बसमध्ये एकत्र बसलो नव्हतो. काही वेळाने कळलं की ७ सीट्सचं डबल रिझर्वेशन झालंय! मग तो गोंधळ निस्तरून नव्याने बसायला जागा मिळवल्या आणि धमाल करायला सुरुवात झाली. गाणी म्हणत, यक्षप्रश्न सारखे खेळ खेळत दापोलीला पोचलो आणि तिथून एका टेम्पोने पंचनदीला पोचलो. इथे एका सुंदर वाडीतल्या प्रशस्त घरात आमची रहायची सोय होती. ती वाडी, कोकणातली लाल माती आणि प्रसन्न, शुद्ध हवा ह्यामुळे एक जादुई मूड सेट झाला. आता असं वाटतं की हे शिबीर इतकं खास होतं कारण आमच्या वर्गाचं हे असं शिबीर पहिल्यांदाच होत होतं. त्यामुळे अत्यंत बेसिक नियम आणि सूचनांवर शिबीर झालं! आम्ही सगळेच जण सर, ताई यांच्या सकट एकदम निवांत होतो! त्या हवेतच एक सुकून होता जो आमच्या मनात आपोआप उतरून आला.

आम्ही संध्याकाळी पोचलो होतो. फ्रेश झाल्यावर नेहमीप्रमाणे उपासनेने शिबिराला सुरुवात झाली. त्यानंतर जवळच्या कोळथरच्या समुद्र किनारी गेलो. तिथे जायचा रस्ता फार सुंदर आहे. त्या रस्त्यावरून नंतरच्या चार दिवसांत आम्ही खूप हुंदडलो. समुद्रावर गेलो. एक कुठलं तरी इंग्रजी गाणं होतं nursery rhyme सारखं. ते गात गात हातात हात घालून रस्त्यावरून zigzag पावलं टाकत चालायचं, चार पावलं पुढे जायचं आणि एक पाउल मागे अशी काहीतरी वेडी पद्धत वापरून चालायचो आम्ही! पंचनदी ते कोळथर अख्खा रस्ता रिकामा असायचा! समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आणि तिथे आम्ही सोडून कोणीही नाही! मनसोक्त समुद्रात डुंबलो, वाळूत खेळलो. अक्षरशः लहान मुलांसारखी मज्जा केली! समुद्रावरून परत आल्यावर मस्त आंघोळी केल्या आणि पुढच्या सत्रासाठी पडवीत जमलो. त्यात सरांनी आम्हाला चक्र (जयवंत दळवी?) ही दीर्घकथा वाचून दाखवली. महाभारताकडे एका वेगळ्याच नजरेने बघायला लावणारी कथा! मग जेवलो, प्रार्थना म्हटली आणि झोपी गेलो!
दुसऱ्या दिवशी लवकर उठून दिलीप सरांबरोबर निसर्ग वाचनाच्या सत्रासाठी वाडीत हिंडायला गेलो. सरांना सगळी झाडं माहिती होती. मग त्यांच्याकडची माहिती ऐकत ऐकत हिंडलो. निसर्गाचं चक्र कसं चालतं ह्याची जाणीव आम्हाला त्यावेळी झाली. ह्या शिबिरात सगळे दिवस दिलीप सर आमच्या बरोबर होते. आम्हाला भरभरून ज्ञान देत होते.

फक्त चार दिवस होतो आम्ही तिथे पण इतक्या वर्षांनी देखील मला तिथले रस्ते, घरं सगळ्या गोष्टी स्पष्टपणे आठवत आहेत. घरातून बाहेर आलं की वाडीतल्या मातीच्या रस्त्याने खाली यायचं आणि मुख्य डांबरी रस्त्याला लागायचं. उजवीकडे गेलं की शाळा, मग पुढे गाव वगैरे. आम्ही मात्र डावीकडे कोळथरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळायचो. त्या रस्त्याने पुढे गेलं की सप्तेश्वराचं मंदिर होतं. बाहेर आवारात दीपमाळ आणि आत मंडप असं देखणं मंदिर होतं ते. ह्या मंदिरात आम्ही बराच काळ पडीक असायचो. आमच्यासाठी येताना पुण्याहून खूप सुंदर सुंदर पुस्तकं आणली होती. दुपारच्या सत्रात त्या मंदिरात आपली एक जागा पकडून आम्ही सगळे जण पुस्तक वाचनात गढून गेलो आहोत असं एक सुंदर चित्र डोळ्यापुढे आहे.

त्या वाडीत एक गावठी कुत्रा होता. तो सतत आमच्या बरोबर हिंडायचा. आम्ही त्याचं नाव ठेवलं होतं चंपू  एक दिवस सकाळपासून चंपू काहीतरी विचित्र आवाज काढतोय असं आम्हाला वाटलं. आमचं expert diagnosis ठरलं की चंपूला खोकला झाला असावा. मग सर्वानुमते त्याला व्हिक्सची गोळी खायला देण्यात आली. जी त्याने चघळली आणि बाहेर टाकून दिली. ह्यामुळे आम्ही फार disappoint झालो होतो! अशी मजा मजा चालू होती आमची!

एका सकाळच्या सत्रात दिलीप सरांचं अनुभवकथन झालं. पुण्यात शिक्षण, घर, इंजिनियर झाल्यावर टेल्कोमध्ये नोकरी, लग्न, संसार, मुलं, छंद म्हणून वैदिक गणिताचे क्लासेस घेणं असं सगळं समाजमान्य आयुष्य सुरु असताना दिलीप सर आणि पौर्णिमा ताई यांनी पूर्णपणे पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगण्याचा निर्णय घेतला आणि आपला पुण्यातला संसार गुंडाळून इथे कोकणात कुडावळे ह्या छोट्याशा ठिकाणी नव्याने सुरुवात केली. हा निर्णय का घेतला, हे असं जगताना काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली आणि ह्या साऱ्यातून काय मिळवलं असं सगळं दिलीप सरांनी मोकळेपणाने सांगितलं. मला दिलीप सरांनी दिलेलं उदाहरण आजही आठवतंय. आपली प्रश्नांना उत्तर शोधण्याची आधुनिक पद्धत झाडाच्या फांद्यांसारखी आहे. एका प्रश्नाला उत्तर शोधतो आणि त्या उत्तरातून अजून नवीन प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्नांच्या फांद्या आणि पर्यायाने झाड वाढत राहते. आमच्यासाठी हे सत्र म्हणजे एक eye opener होतं. हा असा पर्यावरणाचा आणि जीवनशैलीचा एकत्रित विचार आमच्यासाठी नवीन होता. आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी आपण कशी नष्ट करत आहोत आणि ह्या अधिकातून अधिकाकडे अशा विकासाचे प्रारूप अंतिमतः विनाशाकडे कसे नेईल ही दृष्टी आम्हाला तेव्हा मिळाली. आज आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. हा विकास शाश्वत नाही ह्याची जाणीव जगभर होऊ लागली आहे पण ह्या साऱ्याची जाणीव १५ वर्षांपूर्वी आम्हाला ह्या शिबिरात दिलीप सरांनी करून दिली. तेव्हा गतिमान संतुलन (दिलीप सरांनी चालू केलेलं मासिक) सुरु झालं नव्हतं. ह्या शिबिरानंतर आमच्यापैकी अनेक जणी ह्या ना त्या माध्यमातून पर्यावरणस्नेही चळवळींशी जोडल्या गेल्या. माझ्यासाठी हे शिबीर आणि अनिल अवचट यांचं कार्यरत हे पुस्तक ह्या दोन गोष्टींनी माझा प्रगतीविषयीचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला. I owe a lot to this Shibir.

दिलीप सरांबरोबर आम्ही रोज सकाळी फिरायला जायचो. एक दिवस आम्ही खाडीलगतच्या खारफुटीच्या जंगलात गेलो. तिथे मग ही खारफुटीची झाडं कशी वाढतात. ही सगळी परिसंस्था (ecosystem) कशी काम करते. ह्या साऱ्याची माहिती मिळाली. नंतर चालत चालत आम्ही खाडीच्या तोंडाशी आलो आणि तिथल्या उथळ पाण्यातून तरीने (तर = छोटी नाव) पलीकडच्या किनाऱ्यावर गेलो. आमच्या तरींपैकी एक तर त्या किनाऱ्याला पोचल्यावर सगळे उतरायच्या आधी पाण्यातच उलटली आणि त्या तरीतल्या सगळ्या जणी पाण्यात! आम्हा सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली होती!

एका दुपारी आम्ही सत्यजित रे यांचा पाथेर पांचाली पाहिला. नंतर त्या सिनेमाचं पोंक्षे सरांनी सुंदर रसग्रहण केलं होतं. त्यामध्ये ह्या सिनेमाच्या trialogy बद्दल सांगितल्याचं आठवतंय. त्या सिनेमाचा एक उदास प्रभाव आमच्यावर दिवसभर राहिला. एका दुपारी आमच्यासाठी खास फणसाच्या भाजीचा बेत केला होता. ह्या खास बेतामुळे त्या दिवशी जेवायला उशीर झाला. आम्हाला सगळ्यांना जाम भूक लागली होती. मग वेळ जाण्यासाठी “दिव्य ध्येय की ओर तपस्वी” हे पद्य शिकलो. अशी कडकडून लागलेली भूक आणि चविष्ट फणसाची भाजी! आम्ही जेवणावर ताव मारला! आम्ही रोज आळीपाळीने वाढपाची आणि मागच्या आवराआवरीच्या कामांची जबाबदारी घेत होतो. ज्यांच्यावर ही जबाबदारी असायची त्या सगळ्या मुली नंतर जेवायच्या. आज मात्र आधीच जेवायला उशीर झाला होता. त्यावेळी मग वाढणाऱ्या मुलींना आम्ही आमच्या ताटातले घास भरवले होते असं आठवतंय! Sheer joys of friendship and innocence! ह्या शिबिरात पंगतींमध्ये वाढताना कसं वाढतात आणि वाढणाऱ्या माणसाने भुकेल्या पोटी वाढायचं असतं हे सगळं आम्ही शिकलो होतो.

एक दिवस आम्ही बसने दाभोळला गेलो होतो. एन्रॉनचा प्रकल्प बघायला. आम्ही तो प्रकल्प दुरूनच पाहिला पण तो प्रवास फार अविस्मरणीय आहे! आमच्या परतीच्या बसची वाट पाहत आम्ही बसलो होतो. हा वेळ कसा घालवणार मग त्यावेळी श्रद्धा ताईने गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिची आणि तिच्या मैत्रिणीची खरीखरी गोष्ट! बस आली त्यावेळी आम्ही त्या गोष्टीत पार रंगून गेलो होतो. बसमध्ये तिच्या भोवती कोंडाळं करून आम्ही जीवाचे कान करून गोष्ट ऐकत होतो. त्या गोष्टीचा शेवट फार दुःखी होता. आमचं उतरण्याचं ठिकाण आलं तेव्हा आम्ही सगळ्या रडत होतो. मग आमची ही अवस्था बघून शेवटी श्रद्धा ताईने सांगितलं की मुलींनो रडू नका! ही खरी गोष्ट नाही! It is the best story telling I have ever heard! पण ती मैत्रीची खोटीखोटी गोष्ट ऐकताना आमची खरी मैत्री खूप घट्ट झाली!

शिबिराच्या शेवटच्या रात्री आम्ही सगळ्या खजिना शोध खेळलो. त्याला धमाल आली होती. रात्रीची वेळ, तसा अनोळखी परिसर आणि आमच्याकडे ६ जणीत फक्त २ टॉर्चेस. मला आठवतंय त्या वाडीतून बाहेर जाण्याच्या अंधाऱ्या वाटेवर सगळ्या जणी मला सोडून पुढे निघून गेल्या. मिट्ट काळोख काही दिसत नव्हतं. मी आता पुढे जाऊ की मागे फिरू असा विचार करत होते. तेवढ्यात माझ्या पायाशी आवाज झाला. घाबरून पाहिलं तर चंपू! तो बिचारा माझ्या सोबत थांबला होता! मग मी त्याच्या सोबतीने वाडीबाहेर रस्त्यावर आले. तिथे लाईट होते. चंपूनी मला खूप मदत केली त्या रात्री!

दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याला आम्ही घरून आणलेला खाऊ संपवला. आम्हाला निरोप द्यायला दिलीप सर, पौर्णिमा ताई आणि त्यांची दोन्ही छोटी मुलं असे सगळे आले होते. त्यांचा आणि पंचनदीचा निरोप घेऊन आम्ही सगळे पुण्यात परत आलो. मी ह्या शिबिराबद्दल लिहिलंय खरं पण माझं समाधान झालेलं नाही. कारण पंचनदीचं शिबीर हा शब्दात धरून ठेवता येण्यासारखा अनुभव नव्हता. खरं सांगायचं तर ह्या एका शिबिराने आमच्या नववीच्या वर्षातल्या बाकी आठवणी खूप फिक्कट करून टाकल्या आहेत. कारण नववी म्हटली की डोळ्यापुढे तेच चार दिवस नाचायला लागतात! चारच दिवस होतो आम्ही तिथे पण अतिशय दवणीय भाषेचा आधार घेत सांगायचं तर नववीच्या आकाशातला पौर्णिमेचा चंद्र म्हणजे हे आमचं शिबीर! ज्याच्या चांदण्याची शीतलता आजही आमच्या मनात आम्ही सगळ्यांनी जपलेली आहे!

श्रद्धा , माझी धाकटी बहिण का ?
घरी शेंडेफळ ! मला २०-२२ जणां साठी खिचडी बनवता येते ,२-३ जणांसाठी नाही ( घरी) असा तीचा फेव्ह. डायलॉग !

इन्ना, हो Happy तिच्याबरोबर आम्ही तंबूतल्या शिबिरात आणि पंचनदीच्या शिबिरात एक नंबर धमाल केली आहे!! That story she told us is epic and unforgettable! तिला विचार आम्ही कसल्या वेड्यासारख्या रडत होतो ते Lol

Pages