Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08
गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.
काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.
ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>> च प्रकारे देवनागरीत
>>>>>> च प्रकारे देवनागरीत इंग्रजी लिहिलेली असंख्य गोष्टीची पुस्तकं वाचत बोली बाषा शिकत <<<<<<
अजुनही मिळत असेल असे वाटत नाही. पण ते उपलब्ध असते, तर गेल्या पन्नास वर्षात शिकलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची इंग्रजीबद्दलची भिती/चूकीच्या उच्चाराचा न्युनगंड दूर व्हायला मदत झाली असती.
हे देवनागरीतले इंग्लिश इतर ठिकाणी कधीच बघायलाही मिळाले नाही...
खरय लिंबू काका.
खरय लिंबू काका.
सगळ्यांचे मनापासून आभार! भारी
सगळ्यांचे मनापासून आभार!
तू अजून लिही ना!
माझी (आणि अनेकांची) शाळेतली आवडती जागा! कमान घातल्याचं मलाही आठवतंय! आणि मला उभ्याउभ्या घालता आली नव्हती हे ही आठवतंय!
भारी इन्ना! तुझ्या पोस्ट्स वाचायला मजा येतेय!
शब्दाली, माझी ९४-२००० ची बॅच
शोभना ताई, तुमचे अनुभव वाचायला उत्सुक आहे!
बस्के, घुमट = मेघडंबरी
इयत्ता सातवी आम्हाला सातवीत
इयत्ता सातवी
आम्हाला सातवीत विशाखा ताई वर्ग शिक्षिका म्हणून हव्या होत्या पण सातवीत शाळा सुरु झाली तेव्हा समजलं की विशाखा ताई रत्नागिरीला राहायला गेल्यामुळे शाळेत शिकवू शकणार नव्हत्या. विशाखा ताई नाहीत ह्याचं भयंकर वाईट वाटतंच होतं पण त्यांनी आपल्याला ह्याबद्दल सांगितलं नाही याचं पण जाम वाईट वाटत होतं! पण काय करता! सातवीत आम्हाला शिकवायला मुकुलिका ताई आल्या. त्याची आठवण म्हणजे त्यांनी त्यांचा पहिला तास आमच्या वर्गावर घेतला. तो तास म्हणजे मुकुलिका ताईंची मुलाखत होती. त्या तासाला दादा (नवाथे) वर्गात शेवटच्या बाकावर बसले होते परीक्षण करायला आणि ताईंनी आम्हाला Pythagoras theorem शिकवला होता!
आम्हाला इतिहासासाठी पाचवी ते सातवी प्रबोधिनीने तयार केलेली इतिहासाची पुस्तके होती. सातवीत सुचेता ताई इतिहास शिकवायला होत्या. “गाथा इतिहास की, प्रज्ञाभरे साहस की” असं त्यांनीच लिहिलेलं पुस्तक होतं. ह्यात आम्ही विविध भारतीय साम्राज्यांचा इतिहास शिकलो. ज्यात चोल, मौर्य इत्यादी प्राचीन घराणी ते पेशवे, राजपूत, शीख आदींचा समावेश होता. त्याच बरोबर प्राचीन भारतातले विद्वान चरक, सुश्रुत, आर्यभट्ट आदींची देखील ओळख होती. जेव्हा आम्ही शिखांचा इतिहास शिकत होतो तेव्हा आम्ही गुरुद्वारा बघायला गेलो होतो. तिथे गेल्यावर फार शांत वाटलं होतं. आमच्या आधीच्या एका मुलांच्या तुकडीने जेव्हा गुरुद्वाराला भेट दिली होती तेव्हा त्यांनी गुरु ग्रंथ साहिब सन्मानाने उच्च स्थानी ठेवलेला पाहिला. आमच्या वेळी प्रबोधिनीमध्ये रोज प्रार्थनेनंतर गीता आणि गीताईचे चार श्लोक आम्ही म्हणायचो. अर्थात प्रार्थनेला उभं राहताना गीता गीताई पायांपाशी ठेवावी लागायची. मात्र गुरुद्वारा मध्ये गुरु ग्रंथ साहिब उच्च स्थानी पाहून त्या तुकडीतल्या मुलांना वाटले की आपण प्रार्थनेच्या वेळी गीता गीताई पायाशी ठेवतो ते योग्य नाही. मग त्यांनी विचार केला आणि गीता गीताई ठेवण्यासाठी एक गळ्यात अडकवता येईल अशी छोटीशी पिशवी (sort of cross bag) तयार केली आणि त्यांच्या वर्गाने वापरायला सुरुवात केली. आम्हाला सुचेता ताईंनी ही गोष्ट सांगितल्यावर आम्हाला पण ती पटली. मग वर्गातल्या एकीच्या ओळखीने आम्ही ही वर्गासाठी तश्या पिशव्या शिवल्या आणि वापरायला सुरुवात केली. अर्थात नंतर ही कल्पना शाळेने लगेच उचलून धरली आणि शाळेत सगळ्यांना तशा गीता गीताई ठेवण्याच्या पिशव्या वाटण्यात आल्या! आज मागे वळून बघताना शाळेचं फार कौतुक वाटतं! शाळेची धोरणं आणि नियम शिथिल नव्हते पण लवचिक होते त्यामुळे तुम्ही कोणीही असा तुमच्या उत्तम कल्पना लगेच अंमलात आणल्या जात असत!
मला आठवतंय की पंजाबच्या इतिहासाने आम्ही बऱ्यापैकी भारावून गेलो होतो. त्यातूनच मग स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्या जीवनावर आम्ही एक नाटक केलं. म्हणजे लिहिणे, बसवणे आणि अभिनय सबकुछ आम्हीच. त्या नाटकात लागणारी एक शंकराची शाडूची पिंड देखील आम्हीच बनवली होती. वर्गात आम्ही ३६ जणी. नाटक असं लिहिलं होतं की प्रत्येकीच्या वाट्याला काहीतरी वाक्य येईल! ह्या नाटकासाठी स्टेज म्हणून जे वापरणार होतो ते नेहमी खालच्या उपासना मंदिरात असायचं. पण नाटक तर वरच्या उपासना मंदिरात करणार होतो. मग काय सगळ्यांनी मिळून ते जड स्टेज चार मजले चढवून वर नेलं आणि नाटक झाल्यावर पुन्हा खाली जागी आणून ठेवलं.
आम्हाला भूगोल शिकवायला नीलिमा ताई होत्या. सातवीत आम्ही युरोपचा भूगोल शिकत होतो. त्यातला सगळ्यात मजेचा भाग म्हणजे नीलिमा ताई युरोपच्या बऱ्याच देशांत फिरून आल्या होत्या त्यामुळे त्यांच्या तोंडून युरोपचं वर्णन आणि त्यांनी काढलेले फोटो पाहत आम्ही भूगोल शिकलो. मजा आली. ह्याशिवाय युरोप मधला एक एक देश निवडून गटाने मिळून त्यावर प्रकल्प देखील केला. माझ्या ग्रुपने ऑस्ट्रीया देशावर प्रकल्प केला होता. त्याबद्दल encyclopedia मध्ये तिथे Right to Education act आहे आणि तो अजून आपल्याकडे नाही हे वाचल्यावर ह्यावर चर्चा केली होती. अजून एक असं की त्याच वेळी हा right to education act पास व्हावा म्हणून पुण्यातल्या संस्थांनी एक भव्य मोर्चा काढला होता. त्यात आमचा वर्ग सहभागी झाला होता. त्या मोर्च्याची सांगता शनिवार वाड्यावर झाली होती. आता इतक्या वर्षांनी त्याच कायद्याखाली प्रबोधिनीला कोर्टात जावे लागले असं कळल्यावर हे सगळं आठवलं! पण हे सगळं विषयांतर! ह्या आठवणीतला महत्वाचा शब्द आहे प्रकल्प! तुम्ही कोणत्याही प्रबोधिनीच्या विद्यार्थ्याशी १५ मिनिटांच्यावर प्रबोधिनीविषयी बोलत राहिलात तर हा शब्द येणारच याची गॅरंटी! प्रकल्प हा प्रबोधिनीच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही विषयाची मुळातून गोडी लागायची असेल तर त्यात काहीतरी कल्पक करून पाहिले पाहिजे. म्हणून मग आम्ही सगळ्या विषयांत प्रकल्प करायचो!
आमचा सातवीचा सहाध्याय दिन खरोखरीचा सहाध्याय दिन होता! म्हणजे आठवी आणि नववीच्या मुली त्यावेळी वर्गोद्दीष्ट म्हणून शिल्पकलेचा अभ्यास करत होत्या. त्यासाठी त्यांनी field visits म्हणून पुण्यातली बरीचशी देवळं हिंडून पाहीली होती. त्यांच्या बरोबर मार्गदर्शन करायला वर्गातल्याच एका विद्यार्थिनीचे बाबा (जे शिल्पकलेचे अभ्यासक होते) असायचे. त्यांच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ते दोन्ही वर्ग औरंगाबाद आणि वेरूळला जाणार होते. ह्या सगळ्यात आमच्या वर्गाची वर्णी कशी लागली कोणास ठाऊक! पण तीनही वर्गातल्या मुली मिळून ३/४ दिवस मस्त मज्जा केली. एकतर कुठेही एकत्र प्रवास करायचा म्हणजे आमचे घसे बसलेच पाहिजेत! कारण नुसता प्रवास करायचा नाही तर गाणी म्हणत करायचा असं तत्वच! आम्हाला इतक्या कविता, गाणी आणि अभंग येत होते की फिल्मी गाणी कधी म्हटलीच नाहीत! आणि अशा सहली म्हणजे नवीन गाणी शिकण्याचा चान्स! एकदा एका बस ड्रायव्हरने आम्हाला खाली उतरवण्याची धमकी दिली तेव्हाच आम्ही गप्प बसलो होतो! एकूण वेरूळ ट्रीप मध्ये खूप मजा आली. एका अभ्यासकाच्या नजरेतून कैलास मंदिरातली शिल्पं पाहायला मिळाली. त्यातील काही वर्णनं मनावर कोरली गेली आहेत आणि आजही स्पष्ट आठवतात! मूर्तीचं अनेकवचन मूर्तीच होतं हा शिकलेला पहिला धडा. थंडीच्या दिवसांत गेल्याने बरेच काकडलो होतो हे पण लक्षात आहे!
एक दिवस मुकुलिका ताई वर्गात आल्या आणि म्हणाल्या, “पहा, तुम्हाला भेटायला कोण आलंय!” आणि दारातून विशाखा ताई आत आल्या! मग काय काही वेळ वर्गात नुसता गोंधळ, रडारड, हसू आणि मज्जा! “तुम्ही आमचा निरोप न घेता का गेलात?” असं विचारल्यावर ताई म्हणाल्या की, “मला सांगणं अवघड वाटलं!” आता वाटतं की खरंच अवघड होतं सांगणं. पण ही अचानक, अनपेक्षित भेट त्यामुळेच खूप लक्षात आहे!
सातवीत आम्हाला Media awareness नावाचा एक विषय होता. त्यात आम्ही वेगवेगळ्या माध्यमांविषयी माहिती मिळवायचो. गीतांजली ताई (दाते) शिकवायची. त्यात आम्ही तिच्याबरोबर खूप साऱ्या चांगल्या फिल्म्स पाहिल्या. शनिवारी शेवटचा तास असायचा. आम्ही ह्या फिल्म्स पाहायला दृक्श्राव्य कक्षात जायचो. ही एक छोटीशी खोली होती जिथे पडदे लाऊन पूर्ण अंधार करता यायचा. एक विमानाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या स्पर्धेची गोष्ट सांगणारा जुना इंग्रजी सिनेमा पाहिला होता. त्यात एक विमानांची स्पर्धा होणार असते आणि जिंकणाऱ्याशी एका राजकन्येचं लग्न होणार असतं. तो बघताना पोट धरून हसलो होतो. जुमान्जी पण पाहिला होता. तो संपायच्या आधी शाळा सुटली. पण आम्ही सिनेमा बघण्यात इतके दंग होतो की आम्ही ठरवलं की सिनेमा संपवूनच घरी जायचं! (एव्हाना पालकांना सवय झाली होती. मुलगी एकदा प्रबोधिनीत गेली की यायची वेळ फिक्स नसते!). पुढचा सगळा सिनेमा पाहिला आणि मग घरी गेलो. ह्या विषयातही प्रकल्प होताच! मी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या पुरस्काराच्या बातम्या असा विषय घेतला होता. दोन पेपर निवडून एका महिन्यात कोणत्या पुरस्काराच्या, किती आणि कुठल्या पानावर बातम्या छापल्या जातात ह्याचं सर्वेक्षण करायचं होतं. माझ्या आसपास सगळ्यांकडे सकाळच येत होता. मग मी केसरी वाड्यात केसरीच्या कार्यालयात गेले आणि त्यांची परवानगी मागून केसरीचे एका महिन्याचे अंक तिथे बसून चाळले. (आता वाटतं किती दूरदृष्टीने निवडला होता मी माझा विषय!)
नवनवीन गोष्टींची ओळख करून घेणे हे चालूच असायचं. तेव्हा पेजर हा प्रकार नुकताच लोकप्रिय होऊ लागला होता. मग आमच्या वर्गातल्या एकीच्या वडिलांनी येऊन आम्हाला पेजर कसा वापरायचा, त्याचे काम कसे चालते अशी सगळी माहिती दिली होती. त्याच वेळी मग इंटरनेट, इमेल, मोबाईल हे सगळे शब्द ओळखीचे झाले.
सातवीत आम्ही पहिल्यांदा शाळेच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत खऱ्या अर्थाने सहभागी झालो! आमचा बोथाटीचा गट होता. बोथाटी म्हणजे दोन्हीकडे टोकदार सळ्या असलेली बारीक लाकडी काठी. हे एका प्रकारचं शस्त्र आहे. अर्थात आमच्या बोथाटीच्या दोन्ही टोकांना झिरमिळ्या होत्या! पण ढोलाच्या तालावर बोथाटी फिरवणे आणि शिस्तबद्ध हालचाली करणे ह्याची मजा कळली! शाळेचा गणेशोत्सव म्हणजे काय धमाल असते हे कळायला लागलं होतं! केवळ गणपतीतल्या अनुभवांवर पानंच्या पानं लिहिता येतील!
ह्याशिवाय सातवीत आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलो होतो. त्यात एक परीक्षा अशी नव्हती पण विविध नवीन कौशल्यं शिकायची होती – पुस्तक परीक्षण ते सायकलचे पंक्चर काढणे अशी वेगवेगळी कौशल्यं. पण खरं सांगायचं तर मला ह्याबद्दल फारश्या आठवणी लक्षात नाहीत! It did not stick very well. सातवीत अजून एक गोष्ट झाली की आमचे आणि इंग्रजीच्या ताईंचे काही फारसे पटले नाही. सहामाही नंतर स्मिता ताई त्यांच्या बाळंतपणाच्या रजेवर गेल्या आणि नंतर ज्या ताई आल्या त्यांचे शिकवणे आम्हाला मुळीच आवडले नाही. मग एक दुसऱ्या ताई आल्या पण तेही जमेना. मग काय शेवटी पोंक्षे सर आले आणि म्हणाले काय करायचं? आम्ही नक्की काय केलं ते आठवत नाही पण आता विचार करताना वाटतं की किती लाडावलेली मुलं होतो आम्ही! असो. पण त्यानंतर आठवी ते दहावी आमचे इंग्रजीचे ग्रह अत्यंत उच्चीचे राहिले! We had the best possible English teacher in the world!
आम्ही एकीकडे संस्कृत आणि हिंदीच्या टीमविच्या परीक्षा देत होतो. शिवाय आद्य शंकराचार्य प्रतिष्ठानतर्फे एक पाठांतर स्पर्धा होत असे. त्यात शंकराचार्यांची तीन स्त्रोत्रे दिली जात आणि मग स्पर्धेच्या वेळी चिठ्ठी उचलून त्यातलं येईल ते स्तोत्र म्हणायचं. आमच्या वर्गाने बरीच वर्षं त्यात भाग घेतला होता. ज्या शाळेतली सगळ्यात जास्ती मुलं जिंकायची त्या शाळेला करंडक होता. तो आम्ही एकाहून अधिक वेळा पटकावला होता. ह्या स्पर्धा सारसबागेसमोरच्या शंकराचार्य मठात होत असत. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला खूप छान स्तोत्र शिकायला मिळाली. त्यातली काही लक्षात राहिली आहेत थोडीफार. माझं आत्मषटकम् आवडतं स्तोत्र आहे. त्याशिवाय एकदा आम्ही शाळेच्या वेळात भरत नाट्य मंदिरात एक विनोदी संस्कृत नाटक देखील पाहायला गेलो होतो.
सातवीत आमची वर्गखोली दोनदा बदलली होती. मला प्रबोधिनीतले मुलींचे वर्ग फार आवडतात. मोठ्या मोठ्या भिंतभर खिडक्या, भरपूर प्रकाश आणि एकदम हवेशीर! तर त्या भिंतभर खिडक्यांना ऊन येऊ नये म्हणून पडदे लावायची सोय होती. आम्ही वर्ग बदलून ज्या दुसऱ्या वर्गात गेलो त्या पडद्यांचा दांडा जरा नाजूक झाला होता. जरा जोर लावून ओढलं की सगळे पडदे खाली पडत! एकदा आमच्या हे लक्षात आल्यापासून आम्ही हे अस्त्र वापरायला सुरुवात केली! कोणत्याही तासाला जरा बोअर व्हायला लागलं की खिडकी शेजारी बसणाऱ्या मुली पडदा ओढायच्या की धडाम! मग वर चढून तो दांडा बसवा वगैरे मध्ये १० मिनिटं जायची! अर्थात ही ट्रिक आम्ही सर्वात जास्ती इंग्रजीच्या तासांना वापरली हे ओघाने आलंच!
अशा किती छोट्या छोट्या आठवणी आहेत! शाळेत रोजचा दिवस मज्जा असायची आणि आज हा काल आणि उद्यापेक्षा वेगळा असायचा. त्यामुळे शाळा बुडवणे वगैरे तर शक्यच नव्हते पण रविवारसुद्धा कसाबसा संपवून कधी शाळेत जातोय असं पण व्हायचं कधीकधी! किंवा रविवारी प्रकल्पाच्या कामासाठी शाळेत किंवा कोणाच्या तरी घरी जमायचं आणि मजा करायची! We were very busy and very constructively busy! प्रबोधिनीपण अंगी मुरत जात होतं. मला वाटतं प्रबोधिनीतल्या सहा वर्षांचे दोन भाग करता येतील. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी. आम्ही पाचवी ते सातवी जे जे काही केलं त्याच्या दसपट गोष्टी पुढच्या तीन वर्षांत केल्या, नवीन अनुभव घेतले, त्यातून मोठे झालो, शहाणे झालो. मी मायबोलीवर अशा आठवणी लिहित्येय असं आमच्या वर्गाच्या whatsapp group वर सांगितल्यापासून तिथे कल्ला चालू आहे! हे पण लिही ते पण लिही..आपण इथे गेलो होतो, असं झालं होतं! आणि त्यातून लक्षात येतंय की आठवी ते दहावीच्या आठवणी लिहायच्या म्हणजे कित्ती कित्ती लिहावं लागणार आहे!! तेव्हा आत्ता इथेच थांबते! (आणि हो ह्या आठवणी माझ्या एकटीच्या नाहीत! आमच्या सगळ्या वर्गाच्या वतीने मी लिहित्येय!)
डबल पोस्ट झाल्याचा फायदा घेऊन
डबल पोस्ट झाल्याचा फायदा घेऊन काही सातवीत केलेल्या उपक्रमांबद्दल लिहित असताना राहून गेलेल्या काही गोष्टी इथेच लिहित आहे!
सर्कसला दिलेली भेट – पुण्यात तेव्हा सर्कस आली होती आणि आम्ही काही जणींनी जाऊन तिथल्या कलाकारांच्या भेटी घेतल्या होत्या. असे सकाळी साडे आठ नऊ वाजता गेलो होतो. काहीही दिवे झगमगाट नसताना सर्कशीचा तंबू आणि तिथल्या बाकी तंबूत जाऊन गप्पा मारताना एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटले होते. मग त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही त्या सर्कसचा शो पहायला गेलो. मजा आली पण सकाळची चित्र पण मनात राहिली होती. आम्ही ही सर्कस भेट/मुलाखत छात्र प्रबोधनच्या अंकासाठी घेतली होती. ती छापून आली की नाही ते आठवत नाही. पण सातवीत मी अनुराधा ताईंनी सुचवलं म्हणून राज्य स्तरीय बालकुमार साहित्य स्पर्धेत एक कथा लिहून पाठवली होती जिला दुसरा क्रमांक मिळाला होता. पहिला क्रमांक देखील प्रबोधिनीच्याच सहावीतल्या एकीला मिळाला होता. ह्या दोन्ही कथा छात्र प्रबोधन मध्ये छापून आल्या होत्या. त्याचा बक्षीस समारंभ शाळेतच झाला होता. त्याची इतकी आठवण राहण्याचे कारण म्हणजे त्या समारंभासाठी भा.रा. भागवत आणि त्यांच्या पत्नी लीलावती भागवत प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्याच हातून आम्हाला बक्षीस मिळाले होते. भा.रां.ची पुस्तके अत्यंत आवडत्या कॅटेगरीत असल्याने त्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार ह्याचा भयंकर आनंद झाला होता!
छाप्रची अजून एक आठवण म्हणजे छाप्रची एक स्वतःची अत्यंत सुरेख लायब्ररी होती. त्यात मराठी साहित्यातली उत्तमोत्तम सर्व पुस्तके होती. आमच्या वर्गातल्या काही वाचनवेड्या मुलींनी तीही लायब्ररी लावली होती. मी जवळपास रोज नवीन पुस्तक घेऊन यायचे. रोज शाळेत आल्यावर पहिल्यांदा दुसऱ्या मजल्यावरच्या छाप्रच्या कार्यालयात जायचं, तिथे पुस्तक बदलायचं, सायकलची किल्ली तिथेच विसरायची आणि मग तंद्रीत वर चौथ्या मजल्यावर आपल्या वर्गात यायचं. मग शाळा सुटल्यावर किंवा आता आपल्याला घरी गेलं पाहिजे अशी जाणीव झाल्यावर किल्ली शोधायची आणि मग पुन्हा छाप्रच्या कार्यालयात जाऊन सायकलची किल्ली घ्यायची हा माझा ठरलेला दिनक्रम होता. अधाश्यासारखी पुस्तकं वाचायचो आम्ही!
सातवी ते दहावी आम्हाला आठवड्यातून दोन तास अभिव्यक्तीचे तास असायचे. अभिव्यक्तीचे विविध विषय होते – बांधणी, रांगोळी, चित्रकला, भौमितिक प्रतिकृती, नाट्य, शिल्पकला आणि प्रतिभाशाली लेखन. हे विषय बदलत राहायचे. आधी ह्यात स्वयंपाककला, शिवण असेही विषय होते. मी दोन वर्ष प्र.ले., एक वर्ष बांधणी आणि एक वर्ष भौमितीक प्रतिकृती अशा अभिव्यक्तीत होते. ह्या अभिव्यक्तीच्या तासाला सातवी ते दहावीच्या सगळ्या मुली एकत्र असायचो. मजा यायची! प्र.ले. च्या तासांना पहिल्यांदा जी.ए. कुलकर्णी यांची एक कथा वाचली होती आणि भारावून गेलो होतो. इतके की काही काळ कोणीच बोललो नाही!
मस्त लिहिलय इन्ना आणि
मस्त लिहिलय इन्ना आणि जिज्ञासा !!
जिज्ञासा इतक्या सविस्तर
जिज्ञासा इतक्या सविस्तर पोस्ट्स नाही लिहिता येत मला. मी ८७ मधे दहावी ची परिक्षा दिली. त्यामुले डिटेल डेटा पेक्षाही तिथल्या अनुभवाचे प्रभाव , संस्कार आणि त्याचे खोलवर ठसे आहेत .
. आवांतर कारभार मात्र तसेच .
शिवाय आमच्या पहिल्या काही बॅचेस मधे प्रयोगशिल अवस्था होती. एक लूजली बाउंड स्ट्रक्चर म्हणता येइल. माझ्या धाकट्या बहिणीच्या वेळेपर्यंत ( ९५ची बॅच) बरेचसे स्ट्रक्चर आले होते. अभ्यास, परिक्षा , मार्क याना मी दिली त्यापेक्षा बरी अन मानाची ट्रीटमेंट माझ्या बहिणीनी दिली
आम्ही तिघी बहिणी प्रबोधिनीत शिकलो. त्यामुळे तेव्हा तुलना केली नाही प्रबोधिनी अन अन्य शाळांच्या शिक्षणा बद्दल . पण मुलाचा पाचवी ते दहावी हा प्रवास पाहिल्यावर खरतर माझ्या अनुभवांच वेगळेपण अन माझ्या मी अशी असण्यातला प्रबोधिनीचा वाटा प्रकर्षानी लक्षात आला.
लाइफ स्किल्स, आपल्या लहानश्या सेक्युर्ड जगाबाहेरच्या जगाच भान, प्रश्न पडण्याची , विचारण्याची अन ते सोडवण्याची सवय , अन स्वतःबद्दल्चा जरासा( जरा जास्तच खरतर
) ओव्हर कॉन्फिडन्स ही मी माझ्या तिथल्या सहा वर्षात कमावला
आता बाकिचे लिहा लोक्स!
मी इन्नाच्या नंतरच्या बॅचची
मी इन्नाच्या नंतरच्या बॅचची त्यामुळे एवढे डीटेल्स मलाही आठवत नाहीयेत, पण इन्नाच्या बाकीच्या पोस्टला +१११
अजुन लिहिते थोड्या वेळाने.
इन्ना .. जिज्ञासा .. कस्लं
इन्ना .. जिज्ञासा .. कस्लं भारी लिहताय.. परत शाळेत जावसं वाटतयं
मलाही शाळेत जायचा कधीही कंटाळा आला नाही .. कधी एकदा सुट्टी संपतेय असं व्हाय्च ..
वर्गातल्याच एका
वर्गातल्याच एका विद्यार्थिनीचे बाबा (जे शिल्पकलेचे अभ्यासक होते) असायचे.>> उदयन इंदुरकर का?
त्यांची मुलगी पण ह्याच शाळेत शिकली. तिला आम्ही ससा म्हणायचो दोन दात पुढे होते रॅबिट सारखे.
आता डॉक्टर झाली आहे.
कॉम्प लॅब ( संगणक कक्ष) चा
कॉम्प लॅब ( संगणक कक्ष) चा उल्लेख करायचा राहिला. सतत होणार्या प्रज्ञामानच्या अॅप्टिट्युड टेस्ट्स ( कि अजून काही होतं का ते आठवत नाही. पण परिक्षेचे मार्क नक्की नव्हत) च्या आधारे आम्ही काही जण सातवी आठवीत बेसिक लँग्वेज शिकत होतो. ऑस्बॉर्न नावाचा संगणक होता. आताशा सर्रास वापरल्या जाणार्या एम सी क्यु. स्वरूपाच्या टेस्ट्स बनवल्या होत्या मी . विषय कळला असेल तरच सोडवता येतील असे गुगली प्रश्न . वगैरे . मंजूषा ताईबरोबर ( प्रबोधिनीत टिचर्स ताई अन दादा होते) त्या प्रश्न्पत्रिका बनवताना मीही तो विषय सखोल शिकले हा साईड इफ्फेक्ट ! प्रोग्रम्मिन्ग च खुळच लागल होत त्या काळात. फ्लो डाय्ग्रॅम्स, त्याची लॅन्ग्वेज , लेट , गो टू , इफ देन एल्स, इन्पुट , आउट्पुट , ह्याच भाषेत सगळ चालायच. अगदी जेवायला काय आहे ह्याचा इफ गवार देन गोटू मुरांबा एल्स लूप इफ बटाटा एन्ड प्रोग्रॅम अस काहीतरी यडच्याप.
सगळ्या वर्गांचा रिपोर्ट ( परिक्षेतले मार्क ) डाटा म्हणून इन्पुट करून स्टॅटिस्टिकल अॅनॅलिसीस हा आउट्पुट असा ,त्यावेळेच्या आमच्या कुवतीप्रमाणे लहान तोंडी भला मोठा घास यशस्वी रित्या घेतला होता. लोक्स हे १९८४-८५ मधील आहे . खिडक्या जन्मायचा आधीच.
इन्ना, बरोबर आहे तुझं! माझी
इन्ना, बरोबर आहे तुझं! माझी ताई ८४ ची..तिच्या वेळी पण असंच होतं. आणि शिवाय जितका जास्ती जुना ऋणानुबंध तितक्या जास्ती आठवणी..कारण शाळा कधी सुटतच नाही आपली!
माझ्या बरेच दिवस ह्या सगळ्या आठवणी लिहून काढायचं डोक्यात होतं कारण आता विचार करताना वाटतं की प्रबोधिनीतल्या प्रत्येक batch नी वेगळी धमाल केली आहे. त्या साऱ्याची थोडीशी नोंद करून ठेवावी. जर आत्तापर्यंतच्या सगळ्या batches मधल्या प्रत्येकी एका मुला-मुलीने नुसती त्यांच्या उपक्रमांची यादी जरी बनवली तरी आठवणींचा एक केवढा डेटाबेस तयार होईल! मला वाटतं प्रमासं कडे आपली तशी थोडी माहिती आहेच. पण ती technical असेल.
अमा, हो
खुप सुंदर अनुभव आहेत आणि
खुप सुंदर अनुभव आहेत आणि लिहिताहि सुंदर सगळे .. इन्ना /जिज्ञासा मस्तच ..अजुन लिहा.
वाह, ग्रेट !!! स्मित जमल्यास
वाह, ग्रेट !!! स्मित
जमल्यास प्रचितीबद्दल पण लिहा कोणीतरी.
प्रचिती गट चालू आहे का अजुनही ?
प्रत्येकालाच आपल्या शाळेचा
प्रत्येकालाच आपल्या शाळेचा अभिमान असतो, मी तरी कशी अपवाद असेन
या ६ वर्षातल्या जाणवलेल्या काही ठळक गोष्टी सांगायच्या म्हटले तर -
गंथालय - जिथे ५ वी पासुनच घरी पुस्तके न्यायला परवानगी होती, प्रयोगशाळेत प्रत्येकाला प्रयोग करायला मिळत होते, शनिवारच्या उपासनेआधीचे मौन, संगणक आल्यावर त्याचे शिक्षण आणि आम्हांला जे शिकायला आहे त्याबरोबर तिथल्या पुस्तकात बघुन लिहिलेले प्रोग्रम्स आणि रीझल्ट बरोबर आल्यावर झालेला आनंद, काही खास कार्यक्रमांना म्हणायची ती सर्व-धर्म प्रार्थना, स्मरणिकेसाठी जमविलेल्या जाहिराती, पंजाबसाठी गोळा केलेला निधी आणि आशा भोसलेंच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री, शिवगंगा - गुंजवणी खोर्यात केलेला ५-६ मुलींचे वेगवेगळे गट पाडुन पहिला उन्हाळ्यातला आणि नंतरचा धो-धो पावसातला सर्व्हे, तिथल्या दारुबंदीसाठी काढलेले मोर्चे, प्रबोधिनीच्या गाण्यांसोबत शिकलेली वेगवेगळ्या भाषेतली गाणी - जी अजुनही लक्षात आहेत, ५ वीच्या वर्गासाठी करुन घेतलेली अभंगांची तयारी आणि नंतर गणपतीत शिकवलेला मंत्रपुष्पांजलीचा अचुक उच्चार, सुट्टीतले शिबीर, रोजचे दल, स्व-अध्ययन आणि प्रकल्पाचा समजलेला अर्थ, गणपती विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच सामील झालेले मुलींचे ढोल - बर्ची पथक, शाळेच्या प्रोजेक्टरवर बघितलेल्या फिल्मस, दैनंदिनीची सवय, शाळेचे पूर्ण झालेले बांधकाम आणि "ज्ञान प्रबोधिनी" अशी झळकलेली सोनेरी अक्षरे
या सगळ्यात कलकत्ता - दार्जिलिंग - काठमांडु - अयोध्या - अलाहाबादचा १५ दिवसांचा अभ्यास दौरा तर न विसरता येण्याजोगा
शब्दाली, आता प्रत्येक
शब्दाली, आता प्रत्येक ठळकमुद्दे विस्तृत करून लिही बघू
माझी बॅच २००१-२००७ ची, म्हणजे
माझी बॅच २००१-२००७ ची, म्हणजे मीच सर्वात लहान दिसतोय इकडे
त्यात माझी बहीण आत्ता प्रबोधिनीतच १०वीला असल्याने बहुधा सर्वात रिसेंट आठवणी माझ्याच असाव्यात!
मला इन्ना, जिज्ञासा, शब्दाली इतकं विस्तृत आणि सलग नाही लिहिता येत त्यामुळे मी मला जमेल तशा आणि आठवतील तशा आठवणी/अनुभव टाकत राहेन.
प्रबोधिनीत आता पुष्कळच स्ट्रक्चर आलेलं असलं आणि मार्कांसाठी आता थोडे अधिक प्रयत्न होत असले तरी ते सर्व नाईलाजास्तव झालेले बदल आहेत कारण सीबीएसई चे काही नियम पाळणे बंधनकारक आहे, खासकरून १०वीसाठी! अर्थात अवांतर कारभार अजूनही चालूच आहे. एकंदरीत पण मार्कांना फारसे महत्त्व कधीच दिले गेले नाही. मला आठवतंय कि ५वीचा निकाल लागल्यावर बहुतांशी पालक शॉक मध्ये होते - ४थी शिष्यवृत्ती आणि ९५+% मिळवणारी मुले अचानक ६०% वर आली कि शॉक लागणारच. सध्या एक मस्त योजना/प्रकल्प जो राबवला जातोय (जो माझ्यावेळी पण नव्हता) तो आहे - लेव्हल सिस्टिम! गणित आणि इंग्रजी या २ विषयांना ८वी पर्यंत इयत्तेनुसार न शिकवता त्यांच्या कुवतीनुसार शिकण्याची संधी द्यायची. ५वी ते ८वी या ४ इयत्ता - ८ स्तरांमध्ये विभागल्या आहेत. जर कोणाला गणितात खूपच गति असेल किंवा कोणाचे इंग्रजी खूप चांगले असेल तर लवकर लवकर हे ८ स्तर पार करतो किंवा नेहमीच्या गतिने ८ स्तर पार होतात. यामुळे अनेकदा ज्यांना एखादा विषय खूप आवडतो त्याला लवकर लवकर पुढचे टॉपिक्स शिकता येतात. आणि शेवटच्या स्तराला ठराविक पाठ्यक्रम नाही. त्यामुळे त्या स्तराला मुलं काहीही कमाल विषय शिकतात; अगदी नंबर थिअरी वगैरे. आणि ज्यांची नैसर्गिक आवड गणित/इंग्रजी नाही त्यांनी बेसिक ७ स्तर (सीबीसई ५वी-८वी पाठ्यक्रमाचे) पार केले तरी पुरते. सध्या तरी ही पद्धत २च विषयांपुरती आहे.
किती छान लिहिताय सगळेजणं ...
किती छान लिहिताय सगळेजणं ...
लेव्हल सिस्टिम! गणित आणि
लेव्हल सिस्टिम! गणित आणि इंग्रजी या २ विषयांना ८वी पर्यंत इयत्तेनुसार न शिकवता त्यांच्या कुवतीनुसार शिकण्याची संधी द्यायची. >>> मस्त कल्पना आहे ही. महेंद्र भाईंनी हेसुद्धा सांगितले होते.
खूपच मजा येतीये वाचायला ....
खूपच मजा येतीये वाचायला ....
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडवणारी अतिशय दुर्मिळ शाळा दिसते आहे ही ....
पायस , हे अस ठरवून नाही पण
पायस , हे अस ठरवून नाही पण केमेस्ट्री चा अभ्यास आम्ही काही जणांनी नववीतच दहावीसकट सगळा संपवला होता, अन जास्तीचा वेळ सार्थकी लावला होता भलते उद्योग करण्यात.
केमेस्ट्रीचाच, कॅटॅलिस्ट ची ऑप्टिमम क्वान्टीटी कशी ठरवायची ह्याचे प्रयोग केले होते . त्याच गणिती सुत्र ही ठरवल होतं . काचेची भिंग बनवून टेलीस्कोप बनवले होते. डोक्यात कल्पना सुचायचा अवकाश उद्योग सुरु ! अडल तर विचारायला भरपूर लोक होते. पुस्तक भरपूर होती. ती वापरण्यासाठी , एकावेळी किती ,कोणत्या वयाला कोणती पुस्तकं असे कोणतेही नियम नव्हते. खरतर आता हे सगळ लिहिताना फारच अशक्य अन युटोपियन आहे हे सगळ अस वाटतय , पण दॅट वॉज प्रबोधिनी.
इन्ना -> मला माहिती आहे कि हे
इन्ना -> मला माहिती आहे कि हे न सांगता पूर्वीपासून प्रबोधिनीत होतच आलंय. मी पण हे सगळे उद्योग केलेत. फक्त आता हे सगळं जाणीवपूर्वक ठरवून करण्याचा प्रयत्न होतोय इतकंच!
बाकी मला वाटतं प्रबोधिनीची अशी एकपण बॅच नसेल जिने पुढच्या इयत्तांचा अभ्यास आधीच संपवला नव्हता.
काल मुलगी कॉलेज प्रवेशासाठी
काल मुलगी कॉलेज प्रवेशासाठी मिशन स्टेटमेंट लिहत होती तेव्हा मी तिला इथली उदाहरणे व
फिलॉसॉफी समजावून सांगितली. धन्यवाद.
इंदुरकरांची मुलगी पण आम्ही साखर शाळा चालवतो काय काय उप क्रम करतो ते सांगत असे उत्साहाने. फारच लखलखीत सेन्सिटीव्ह मूल होते ते तेव्हा. आता स्वतः आई झाली.
खरय पायस. माझ्या वेळी इतिहास
माझ्या वेळी
इतिहास सुहासिनी तै शिकवायच्या , अन अविदा.
बायो - वसुधातै
गणित - गिरिश राव , शैलजा तै
संस्कॄत - विसुभाउ
फिजिक्स - मंजुषातै मुंगी
केमेस्ट्री - राजिव रानडे
इंग्लिश - शिला तै , नंतर सुप्रियातै दर्प
संचालक कार्यालयात आप्पा पेंडसे असायचे. त्यांच्याशी ही बिन्कामाच्या जाउन गप्पा मारल्याच्या आठवतायत. (फुलपाखरांबद्दल)
स्वैपाकघरात गोपाळराव असायचे - भुक लागली आहे म्हटल की खाउ मिळयचा.
ग्रंथालयात चित्रातै पुरंदरे.- वाट्टेल तितकी पुस्तके. मला त्या कोपर्यातल्या मासिके / नियतकालिके अन कॉमिक्स चा कोपरा आठवतो. नव आल की , आलय ग अस सांगायच्या हाक मारून .
नॉस्टॅल्जिआ!!
Utopia that's the word! पायस,
Utopia that's the word!
पायस, हो ह्या नवीन लेव्हल पद्धतीबद्दल ऐकलं मी पण. भारी कल्पना आहे.
इन्ना, आप्पांशी गप्पा! हेवा वाटतोय तुझा
हर्पेन, एवढे लिहिले तर बाकीचे
हर्पेन, एवढे लिहिले तर बाकीचे हा बाफ वर आला की पळुन जातील
आम्हांला चित्राताईंनी मराठी अक्षरं कशी काढायची ते शिकवलं होतं, आत्ता जे काही बरे अक्षर येते ते त्यांच्यामुळेच.
बाकी अविदांसोबत केलेले वाद-विवाद आठवतात - वर्ग एका बाजुने बोलत असेत तर ते दुसर्या बाजुने आणि दुसरी बाजु बरोबर आहे असे वाटायला लागले की पलटी होऊन पहिलेच कसे बरोबर हे सुरु - डोक्यात विचारांचा भुंगा.
अप्पांबरोबर जास्त बोललेले मला आठवत नाही, पण नंतर स्मरणिकेचे काम सुरु असताना सुट्टीत सारखे तिथेच असत होतो ते आठवतेय. एकदा ते वर्गावर आले होते तेव्हाच पहिला पाऊस सुरु झाला आणि आम्ही सगळेच गच्चीवर पहिल्या पावसात भिजायला गेलो होतो.
कोणत्याही विषयाचा तास असला तरी सुरु असलेला टॉपिक घरी पूर्ण करायच्या बोलीवर वेगळीच चर्चा सुरु होत असे.
बाकी शिकवायला पुढची मागची बॅच असल्याने इन्नासारखेच सगळे होते, फक्त केमिस्ट्रीला मध्ये बिपाशाताई पण होत्या.
इन्ना म्हणाली तसे - नॉस्टॅल्जिआ!!
शब्दाली सकाळी असायची शाळा
शब्दाली सकाळी असायची शाळा तेव्हा तू होतीस का ?
६.५० ला असायची . बारा पर्यंत. नंतर रसमयीतून ( का स्वैपाकघरातून ) खायला असायच , ऐच्छीक . मी लांबून यायचे म्हणून , जेवायचे तिथे. अन मग पोटोबा भरल्यावर ग्रंथालयात, टीपी करूनच घरी जायचे. मुगाची खिचडी पापड अन लिंबाच लोणच आठवतय.
मला वाटत मी सहावीत गेले तेव्हा बदलली वेळ . आमचा युनिफॉर्म , फक्त शनिवारी असायचा . हिरवी सलवार , पिवळा कुर्ता , अन त्यावर ३ मोठे फुलांचे पॅचेस . एकत्र सगळ्यांना पाहिल की सुर्यफुल उमलल्यासारख वाटायच.
नंतर पांढरा निळा ( माझ्या मते बोअरिंग ) झाला गणवेष . जुन्याचा फोटो मिळतो का पहाते.
हो, मी होते सकाळच्या
हो, मी होते सकाळच्या शाळेत.
शाळा सुटली की ग्रंथालयात पुस्तक बदलुन स्टॉपवर, बस यायला वेळ आहे हे बघुन मागे पुस्तक वाचत बसायचं, आणि पुस्तक वाचता वाचता बस कधी गेली ते कळलेच नाही म्हणुन पुढच्या बसची वाट बघत परत पुस्तक वाचन सुरु
माझ्या सुरुवातीच्या बस प्रवासाची पण एक गंमत आहे पण तसे डायरेक्ट विषयाला धरुन नाही म्हणुन इकडे लिहिले नाही
निळा गणवेष मला पण नाही आवडला
शाळेच्या सध्याच्या
शाळेच्या सध्याच्या गणवेशाबद्दल माझ्या मनात कालच विचार आला होता. मुलींचा निळा आणि मुलांचा गुलाबी म्हणजे प्रवाहाविरुद्ध, क्रांतिकारी वगैरे आपोआपच
इन्ना, सूर्यफुलाच्या गणवेशाचा फोटो असेल तर बघायला आवडेल!
इतक्या गोष्टी आहेत सांगायला की sound to text keyboard असता तर बरं झालं असतं असं वाटतंय!
मुलींचा निळा आणि मुलांचा
मुलींचा निळा आणि मुलांचा गुलाबी म्हणजे प्रवाहाविरुद्ध, क्रांतिकारी वगैरे आपोआपच >>> बरोबर आहे पण ही गोष्ट तेव्हा माहिती नव्ह्ती न
Pages