Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08
गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.
काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.
ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा
हा धागा http://www.maayboli.com/node/2698 इथे काढणं सुयोग्य ठरलं असतं
असो.
पुण्यातील एक अग्रगण्य आणि ध्येयवादी शाळा म्हणून ज्ञान प्रबोधिनी बद्दल आत्मियता आहे.
आठवणी वाचायला आवडतील
>>पुण्यातील एक अग्रगण्य आणि
>>पुण्यातील एक अग्रगण्य आणि ध्येयवादी शाळा म्हणून ज्ञान प्रबोधिनी बद्दल आत्मियता आहे. +१०१
हर्पेन, मी त्या ग्रुपची सदस्य
हर्पेन, मी त्या ग्रुपची सदस्य नसल्याने असे झाले बहुदा.
आता बदल केला.
लगेच केला पण बदल, मस्तच
लगेच केला पण बदल, मस्तच !,दॅट्स लाईक प्रबोधिनीकर !
मी गरवारे शाळेत होतो. आठवीत असताना प्रबोधिनी सोडून एक जण आमच्या शाळेत आला होता. त्यावेळी त्याच्या तोंडून इतकं काही चांगलं ऐकलं आहे की आपापले कॉलेज कुठलेही / कितीही चांगले असले तरी फर्ग्युसन बाबत जसे वाटते की आपण त्या कॉलेजात असायला हवे होते तसे माझे ज्ञान प्रबोधिनी बाबत झाले होते.
त्या काळात एसेस्सी बोर्डासाठी म्हणून तो सीबीएस्सी बोर्ड सोडून आमच्या शाळेत आला होता.
हो, बोर्डासाठी खुप जण आठवीत
हो, बोर्डासाठी खुप जण आठवीत शाळा बदलायचे, त्यामुळे ५ वीत आम्ही ३६ जणी एका वर्गात होतो, ते ८ वीला २९ आणि मग परत १० वीला बदली झालेल्या केंद्रिय कर्मचार्यांच्या पाल्यांमुळे ३० च्यावर संख्या गेली.
बाकीच्या शाळांमधल्या अ, ब, क ... तुकड्या आणि ५०-६० मुले एका वर्गात आणि आमच्या शाळेत एक इयत्ता - एक वर्ग आणि ३० ते ३५ मुली - पाचवीच्या पहिल्या दिवशी गंमतच वाटली होती.
हो शाळेतले सगळेच सगळ्यांना
हो शाळेतले सगळेच सगळ्यांना ओळखतात हे पण भारी वाटायचं
दोन-चार महिन्यांपुर्वी शाळेत गेलो होतो. गच्चीवरून गुरु / शनीची कडी दाखवत होते. अजूनही शाळेचे अभ्यासक्रम बाह्य उपक्रम जोरात चालू असतात.
शब्दाली, बरं झालं धागा
शब्दाली, बरं झालं धागा काढलास! खरंच डोक्यातून निघून गेलं होतं माझ्या. आता जरा बसून नीट व्यवस्थित लिहून काढते. म्हणजे लांबलचक पोस्ट्स टाकता येतील!
अवांतर: हा धागा चालू घडामोडी मध्ये काढणं देखील थोडं समयोचित आहे. ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक आदरणीय आप्पा पेंडसे यांचे २०१५-२०१६ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने स्व. आप्पांचे विचार, आठवणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात ह्या करता काही उपक्रम राबवण्यात येत आहेत.
हा धागा मायबोलीकर प्रबोधक, प्रबोधिकांची आप्पांना श्रध्दांजली ठरेल!
प्रबोधिनीवाले, आम्ही खूप
प्रबोधिनीवाले, आम्ही खूप उत्सुक आहोत. खूप ऐकलेय तुम्हा सर्वांच्या बाबतीत. तसा माझा प्रबोधिनीच्या लोकांशी जवळचा संबंध आला आहे आणि त्यांच्याविषयी नेहमी आदर वाटत आला आहे!
जुजबी प्राथमिक माहिती:
जुजबी प्राथमिक माहिती: (ज्यांना प्रबोधिनी आजीबात माहिती नाही त्यांच्यासाठी)
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : ५१०, सदाशिव पेठ पुणे -३० ह्या स्थानी असलेल्या वास्तूत ही शाळा भरते. शाळा १९६२ साली सुरु झाली. शाळेत पाचवी ते दहावी ह्या सहा इयत्ता आणि प्रत्येक इयत्तेत (कमाल) चाळीस वर्गसंख्येच्या दोन तुकड्या – एक मुलांची आणि एक मुलींची. एकूण पाचशेच्या आतली पटसंख्या म्हणजे फारच छोटुकली शाळा आहे. शाळेत मुलांचे सर्व वर्ग एका मजल्यावर आणि मुलींचे वेगळ्या मजल्यावर. म्हणजे मुलामुलींची शाळा असली तरी प्रबोधिनी co-ed नाही. शाळेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातली मुले प्रवेश घेऊ शकतात. पाचवीत प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश परीक्षा आहे (लिखित + मुलाखत). ही साधारणतः चौथीच्या स्कॉलरशिपच्या धर्तीवर असते. परीक्षेतील प्रश्न हे MENSA (https://www.mensa.org/) च्या कसोट्या लावून तयार केले जातात. शाळेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातील मुले प्रवेश घेऊ शकतात. शाळेचे शैक्षणिक माध्यम हे CBSE board आहे. मी शाळेत असताना मिश्र (इंग्रजी + हिंदी) माध्यमाची शाळा होती. म्हणजे सामाजिक शास्त्र, हिंदी आणि संस्कृत हे विषय हिंदीमध्ये तर गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय इंग्रजीतून. आता बदलून पूर्ण इंग्रजी माध्यम झाल्याचं नुकतच समजलं. आम्हाला आठवीपर्यंत मराठी भाषा होती. नववी आणि दहावीमध्ये मात्र सामाजिक शास्त्र, संस्कृत, विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे पाच विषय होते. म्हणजे पाचवी ते आठवी मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी ह्या चारही भाषा higher level च्या असायच्या. अर्थात हे काही वेगळं आहे असं त्यावेळी आजीबात जाणवलं नाही. आता ही अगदी तोंडओळख म्हणता येईल. कारण प्रबोधिनीचं प्रबोधिनीपण हे तिथे शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाने नाही. पण ज्यांनी ह्याआधी ज्ञान प्रबोधिनी शाळेबद्दल काहीच ऐकलं नसेल त्यांच्याकरीता ही जुजबी ओळख.
शाळेच्या आठवणी लिहिताना एक disclaimer देणे जरुरी आहे. प्रत्येकालाच आपली शाळा ग्रेट आहे असे वाटत असते. त्यामुळे माझ्या पुढच्या लिहिण्यात प्रबोधिनी कशी भारी अशा पध्दतीचे उल्लेख आले तर ती तुलना नसून शाळेबद्दल असणाऱ्या प्रेमातून येणारा शब्दप्रयोग आहे असे समजावे! त्याशिवाय शाळेतले उपक्रम दर वर्षी अभिनव पद्धतीने पार पडत असतात. त्यामुळे प्रत्येक माजी विद्यार्थ्याकडे सारख्याच आठवणी फार कमी असतात!
आज मागे वळून बघताना आत्तापर्यंतच्या आयुष्यात जर जीवन बदलून टाकणारी किंवा वेगळी दिशा देणारी घटना कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझं उत्तर निःसंशयपणे मला प्रबोधिनीत प्रवेश मिळणे असे असेल. आज मी जी काही आहे त्यात माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त सर्वाधिक मोठा वाटा हा माझ्या शाळेचा आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर माझा पिंड प्रबोधिनीत घडला आहे (Made in Prabodhini).
ह्या शाळेतल्या सहा आणि नंतरच्या वर्षांच्या आठवणी कशा सांगू असा विचार केला तेव्हा वाटलं की इयत्तेनुसार सांगणं सोपं जाईल. म्हणजे प्रत्येक वर्षासाठी एक पोस्ट आणि त्यानंतर प्रबोधिनीची माजी विद्यार्थिनी म्हणून आलेले अनुभव एका वेगळ्या पोस्टमध्ये.
इयत्ता पाचवी पुण्यातल्या आणि
इयत्ता पाचवी
पुण्यातल्या आणि काही वेळा पुण्याबाहेरच्या शाळांमधून चौथीपर्यंत शिकलेली मुलमुली जेव्हा प्रबोधिनीत येतात तेव्हा काहीही कळत नसतं! निदान मला तरी कळत नव्हतं! त्यातून मी खोपोलीसारख्या छोट्या गावातल्या शाळेतून आल्याने माझ्या कोणीच मैत्रिणी नव्हत्या. माझ्या वर्गात पुण्यातल्या एकाच शाळेतून आल्यामुळे एकमेकींना ओळखणाऱ्या मुली होत्या. पण काहीच दिवसांत आम्ही सगळ्याच इतक्या घट्ट मैत्रिणी झालो की आम्ही काही महिन्यांपूर्वी एकमेकींना ओळखत देखील नव्हतो हे कोणाला खरं वाटणार नाही! शाळा एकदम आपली वाटायला लागली. इतकी की तुझ्या आधीच्या शाळेचं नाव काय असं विचारल्यावर एकदा मी चुकून प्रबोधिनी असं उत्तर दिलं होतं!
शाळेच्या पहिल्याच दिवशी आम्हाला पद्य शिकवायला नववी दहावीच्या ताया आल्या होत्या. त्यांनी “प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हायला समर्थ मायभूमीला जगी करायला!” हे पद्य शिकवलं आणि आपण प्रबोधिनीत का आलो ह्याचं उत्तर मिळालं! शिकता शिकता पद्य पाठ होतात असंही आम्हाला लगेच लक्षात आलं. किंबहुना ती तशीच पाठ करायची असतात. एक कडवं शिकायचं, म्हणायचं आणि मग दुसरं कडवं शिकायचं, मग पहिलं आणि दुसरं एकदम म्हणायचं! असं करत करत पद्य पाठ होतं! ही खास प्रबोधिनीची गाणी! शाळेतल्याच आजी माजी लोकांनी रचलेली, (मात्र कोणत्याच पद्याखाली कवी/कवयित्री चे नाव नसलेली), देशभक्तीची स्फूर्तीदायी पद्य! ह्या ना त्या निमित्ताने ही पद्य शिकवली, म्हटली जातात आणि फार प्रेमाने म्हटली जातात. गंमत अशी की ह्यातल्या एक दोन पद्यांच्या चाली ह्या जुन्या हिंदी गाण्यावरून घेतल्या आहेत. पण जर त्यावेळी मला हे कोणी सांगितलं असतं तर ह्या चाली मूळ प्रबोधिनीच्या होत्या आणि मग त्या सिनेमावाल्यांनी चोरल्या असं मला वाटलं असतं! इतकी त्या गाण्यांची क्रेझ होती!
ह्या पाठांतरावरून आठवलं की आमचा पाचवीचा पहिला तास शिकवायला दादा नवाथे आले होते. ऋषितुल्य व्यक्तिमत्व! आप्पांची शाळेची संकल्पना ऐकून त्यासाठी शाळेच्या उभारणीमध्ये योगदान द्यायला स्वतःहून सहभागी झालेले हाडाचे शिक्षक. ते वर्गावर आले आणि आल्या आल्या फळ्यावर हा श्लोक लिहिला.
पुस्तकस्था तु या विद्या, परहस्तगतं धनम्|
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद धनम्||
आम्हाला ह्या श्लोकाचा अर्थ समजावला. श्लोक पाठ करून घेतला आणि फळा पुसून टाकला! म्हणाले असंच शिकायचं! त्यावेळी आम्हाला का ही ही कळलं नाही. श्लोक मात्र आजही पाठ आहे आणि आता त्याचा अर्थ नीटच कळतोय!
शाळा सुरु झाली आणि रोजच काही ना काही नवीन घडायला लागलं! एकतर शाळेचा गणवेश रोज नाही! फक्त शनिवारी जेव्हा अर्ध्या दिवसाची आणि सकाळची शाळा असते तेव्हा. शनिवार हा अनेक कारणांनी वेगळा. एरवीच्या वारी सगळ्यांची एकत्र प्रार्थना होऊन शाळा सुरु होत असे. मात्र शनिवारी सकाळी उपासनेनी सुरुवात व्हायची. पाचवी ते सातवीची उपासना वरच्या उपासना मंदिरात तर आठवी ते दहावी खालच्या उपासना मंदिरात. असे का तर आठवीमध्ये विद्याव्रत संस्कार होत असे. तर ह्या उपासनेपूर्वी मौन बाळगणे अपेक्षित असे. त्यात मात्र फार गमतीजमती व्हायच्या. मुलींसाठी मौन पाळणे ही अधिकच कठीण गोष्ट. समोर आपली मैत्रीण दिसल्यावर काल संध्याकाळ ते आज सकाळमध्ये काय झालं हे अगदी ओठांवर येऊन थांबलेलं असे! सो कॉल्ड मौन पाळताना हातवारे करून सांगण्याच्या नादात काहीतरी मज्जा होत असे आणि मग हास्याचे फवारे उडत! साधारणतः २० मिनिटं चालणारी ही उपासना हळू हळू अंगवळणी पडत गेली. प्रबोधिनीची उपासना हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. इच्छा असल्यास आणि शक्य झाल्यास तो प्रत्येकाने जरूर घ्यावा.
पहिल्या काही दिवसांत वर्गात सूचना घेऊन ताराबाई आल्या – वर्षारंभ समारंभ आहे त्याचा शेवटच्या तासाला सराव असेल. तरी सर्वांनी वरच्या उपासना गृहात जमावं. ही कुठली उपासना? मग कळलं की प्रबोधिनीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि शेवट वर्षारंभ आणि वर्षान्त समारंभाने होतो. आपण का शिकतो आहोत आपले उद्दिष्ट काय ह्याची जाणीव व्हावी ह्यासाठी वर्षारंभ आणि गेल्या वर्षांत आपण आपल्या उद्दिष्टाच्या किती जवळ पोचलो ह्याचे सिंहावलोकन करण्यासाठी वर्षान्त. वर्षारंभाला प्रत्येकाला एक स्वतःपुरता आणि एक वर्गाचा मिळून असा संकल्प करावा लागे. अर्थात काय संकल्प करायचा आणि तो कसा पूर्ण करायचा ह्याचं संपूर्ण स्वातंत्र्य होतं! प्रबोधिनीत अमर्याद स्वातंत्र्य दिलं जातं आणि त्याचा गैरवापर होणार नाही असा विश्वास देखील ठेवला जातो. शाळेत असताना हे स्वातंत्र्य आम्ही गृहीत धरून चाललो होतो! म्हणजे वर्ग चालू असताना वर्गातून आत बाहेर करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्या भाषेत बोलावे, कोणी कुठे बसावं ह्याचं स्वातंत्र्य. वर्गातल्या टेबल खुर्च्यांची हवी तशी रचना करण्याचं स्वातंत्र्य (प्रबोधिनीत बाकं नाहीत. टेबल खुर्च्या आहेत. त्यामुळे हे सोपे जाते) आणि अजून अनेक गोष्टी. आमचे वर्गशिक्षक आम्हाला मदत करायचे पण अंतिम निर्णय मात्र मुलांचा असायचा. वर्षान्त समारंभाच्या वेळी वर्गातल्या प्रत्येकाने एक मनोगत लिहून द्यायचं असतं. अमेरिकेत teaching assistant म्हणून काम करताना सेमिस्टरच्या शेवटी जेव्हा मुलांचे course evaluation surveys घ्यायची वेळ आली तेव्हा हा उपक्रम आठवला! अरे हो, अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे प्रबोधिनीत शिक्षिकांना ताई म्हणतात आणि शिक्षकांना सर किंवा दादा.
आमचा वर्ग वर्गाची रचना कशी असावी ह्याबाबत फार वेडा होता! सहावीत एकदा आम्हाला वाटले की खाली बसून चांगला अभ्यास होतो! मग काय उपासना मंदिरातून सतरंज्या घेऊन आलो. वर्गातली सगळी खुर्च्या टेबलं काढून टाकली आणि खाली बसलो! मग लक्षात आलं चपला बुटांमुळे फार कचरा येतो. मग चपला बूट वर्गाबाहेर रांगेने काढून ठेवणे, रोजच्या रोज वर्ग झाडणे, सतरंज्या झटकणे, त्यांच्या घड्या घालणे ह्या सगळ्या कामांची जबाबदारी पण घेतली. एक महिनाभर अशी हौस फिटल्यावर पुन्हा टेबल खुर्च्या! टेबल खुर्च्यांच्या अभिनव रचना हा तर आमच्या वर्गाचा आवडता छंद! एकदा तर हॉटेलमध्ये एका टेबल भोवती चार खुर्च्या असतात ना तशी रचना केली होती. अर्थात ह्यात काही मुलींची फळ्याकडे पाठ होत होती! पण तासापुरतं खुर्ची फळ्याकडे करायची की झालं! मात्र ह्यावरून आम्हाला कधीही कोणीही ओरडलं नाही. अरे वा! आता हे असं करणार का? छान दिसतंय असं ऐकायला मिळायचं!
अभ्यासाव्यतिरिक्त शाळेत अनेक उपक्रमांची जंत्री असायची. पाचवीत आल्यावर वर्गाची ६ पथकांमध्ये विभागणी व्हायची. पथक म्हणजे इतर शाळांमध्ये जशी houses असतात तशी. मुलींच्या पथकाची सगळी नावं माझ्या लक्षात नाहीत पण मी पथक दोन म्हणजे राणी लक्ष्मीबाई पथकात होते. काही उपक्रम हे पथकशः व्हायचे. त्यामुळे आपल्या आधीच्या पाच आणि नंतरच्या पाच अश्या दहा वर्गातल्या किमान आपल्या पथकातल्या मुलींशी ओळख व्हायची. त्याचबरोबर प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी अनुक्रमे युवक आणि युवती विभागामधून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवीत असतात. त्यामुळे यु.वि. आणि तिथल्या ताया आणि दादा हे फार म्हणजे फार लाडके! त्यांच्याबरोबर अभ्यास, खेळ, सहली, शिबिरं ह्या सगळ्या गोष्टी करायचो. अफाट धमाल!
तर अभ्यासेतर उपक्रमांची आधी ओळख करून देते मग त्यातल्या गमतीजमती. वर्गोदिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याचा आठवड्यातून एक वेगळा तास असायचा. आमचं पाचवीचं वर्गोदिष्ट होतं – हस्ताक्षर सुंदर करणे! आम्ही शाळेत असताना राखीविक्री करायचो. आषाढी एकादशीला भजनाचा सुंदर कार्यक्रम होतो. त्याविषयी बरंच लिहीण्यासारखं आहे. आषाढी झाली की गणपतीची धामधूम! मग मुलांची दिवाळीची फटाकेविक्री. मग हिवाळी क्रीडा शिबीरं. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आहेतच. सकाळी प्रार्थनेनंतर दर रोज एका वर्गातून तीन जण सगळ्या शाळेसमोर भाषण करायचे. म्हणजे वर्षातून एकदा प्रत्येकाला एकदा अख्ख्या शाळेसमोर बोलावं लागायचं. अर्थात दर वर्षी प्रत्येक इयत्तेला काहीतरी नवीन असायचं. म्हणजे पाचवीत कविता, नाट्यछटा वगैरे. ह्याशिवाय दरवर्षी वर्गाचा एक सहाध्याय दिन असायचा. म्हणजे कोणत्या तरी ठिकाणी एक दिवसाची सहल. जर वर्गोदिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठे जायचे असेल तर तसा सहाध्याय दिन आखता यायचा. आम्ही पाचवीत सहाध्याय दिनाला खेड शिवापूरचा प्रबोधिनीचा ग्रामोद्योग प्रकल्प पाहायला गेलो होतो. आपली शाळा नुसतीच शाळा नाहीये तर त्या पलीकडे बरंच काही आहे ह्याची पहिल्यांदा जाणीव त्या दिवशी झाली!
हे सगळं छान आहे पण अभ्यासाचं काय? तर हो अभ्यास असायचा आणि तो भरपूर असायचा. पण कधी उरावर बसायचा नाही. आता मागे वळून पाहताना वाटतं की प्रबोधिनीतलं पाचवीचं वर्ष हे दहावीपेक्षादेखील अधिक कठीण होतं. संपूर्ण मराठी माध्यमातून शिकलेल्या आम्हाला एका वर्षात CBSEच्या इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी समर्थ व्हायचं होतं. काही जण इंग्रजी माध्यमातले होते पण त्यांना एका वर्षात पूर्ण मराठी माध्यमाची मराठी भाषा शिकून आत्मसात करायची होती. त्याशिवाय संस्कृत, हिंदी आणि हिंदीतून सामाजिक शास्त्र! पण आम्हाला यशस्वी करायला आमचे शिक्षक खूप मेहनत घेत असत. संगीत शिकवायला मंजुषा ताई, इंग्रजी शिकवणाऱ्या स्मिता ताई, शास्त्र शिकवणाऱ्या शांतलाताई, गणिताचे जोशी सर, इतिहास शिकवायला गीतांजली ताई, मराठीला अनुराधाताई, हिंदीला चारुताताई आणि संस्कृतसाठी आमच्या वर्ग शिक्षिका असणाऱ्या भाग्यश्रीताई. शाळेत दर आठवड्याला एका विषयाची चाचणी परीक्षा असायची. प्रत्येक विषयाच्या एकूण तीन परीक्षा व्हायच्या. त्यामुळे अभ्यास असायचाच. पण त्याचा ताण यायचा नाही कारण शिक्षकांना असलेलं स्वातंत्र्य! अर्थात ते नुसतं स्वातंत्र्य नव्हतं, ती मोठी जबाबदारी होती हे आत्ता कळतंय.
आम्हाला भूगोल शिकवायला पोंक्षे सर होते. सर त्याचवर्षी प्रबोधिनीचे प्राचार्य झाले होते. तेव्हा जुळलेला ऋणानुबंध आजही कायम आहे! आम्हाला प्रत्येक वर्षी सरांनी काहीतरी विषय शिकवला. त्याचबरोबर सरांबरोबर आम्ही खूप मज्जा देखील केली! त्याच्या आठवणी येतीलच! तर आम्ही भूगोल क्रमिक पुस्तकातून शिकलोच नाही! म्हणजे असे काही एक पुस्तक नव्हते. एक नकाशांचे पुस्तक (atlas book) होते आणि एक पुस्तकांची सुंदर मालिका होती (त्याचं नाव मी साफ विसरले). त्यात प्रत्येक पुस्तकातला नायक एक दहा बारा वर्षांचा मुलगा असे जो एका विशिष्ठ भौगोलिक परिसरात राहायचा उदा. टुंड्रा, वाळवंट, आफ्रिकेची सदाहरित जंगलं. मग त्या पुस्तकात त्या मुलाच्या तोंडून त्याच्या एका वर्षाच्या जीवनक्रमाचे वर्णन असायचे. त्याचं आयुष्य कसं असतं, कोणते ऋतू असतात, ते काय जेवतात वगैरे. फार मजा यायची त्या गोष्टी वाचायला! शिवाय atlas च्या पुस्तकांतून आम्ही नकाशा कसा वाचायचा ते शिकलो. आणि मग परीक्षा? त्याची तर अजूनच मज्जा! म्हणजे कोणीतरी सरांना विचारायचं की “सर आता पुढच्या आठवड्यात भूगोलाची युनिट टेस्ट आहे.” सर म्हणायचे “बरं मग?” “मग सर पोर्शन काय असेल?” “पहिलीपासून त्या दिवसापर्यंत तुम्ही जो भूगोल शिकलात तेवढा!” झालं! मग काय अभ्यास आणि कसले २१ अपेक्षित! पेपरमधले प्रश्न आम्हाला माहिती किती ह्यापेक्षा आम्हाला किती कळलंय हे तपासणारे असायचे. अर्थात काही गोष्टी पाठ करायला लागायच्या म्हणजे लागयच्याच! त्यातली मुख्य म्हणजे स्पेलिंग्स! विज्ञान समजण्यासाठी लागणारी इंग्रजी स्पेलिंग्स शांतला ताईंनी आमच्याकडून अक्षरशः गिरवून घेतली आणि स्मिता ताईंनी इंग्रजीचं ग्रामर पक्कं करून घेतलं! जोशी सरांनी गणिताच्या टर्म्स पक्क्या करून घेतल्या (पण तरीही पाचवीत माझं गणित खूप कच्चं होतं! ते हळूहळू सुधारलं.)
आपोआप पाठ होणारी दुसरी सुंदर गोष्ट म्हणजे मराठीतल्या कविता. अनुराधा ताई हातचं न राखता शिकवायच्या! आम्हाला म्हणजे आमच्या वर्गाला कविता खूप आवडतात असं लक्षात आल्यावर त्यांनी अनेक सुंदर कविता आम्हाला अशाच शिकवल्या! कवितेच्या आनंदासाठी, परीक्षेसाठी नव्हे! त्यांच्यामुळे आम्हाला अवांतर वाचनाची गोडी लागली. मग पाचवीत ऑफ तासाला आम्ही ज्युल्स व्हर्नची भा.रा. भागवतांनी अनुवादित केलेली बरीचशी पुस्तकं वाचून काढली. हे सामुहिक वाचन असायचं. प्रबोधिनीचं ग्रंथालय खूप मोठं आहे. तिथे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळी पुस्तकं हाताळता येतात. आमच्या वेळी अंजली ताई ग्रंथपाल होत्या. त्या खूप कडक शिस्तीच्या आहेत असा त्यांचा दरारा! पहिल्याच आठवड्यात त्यांनी वर्गात येऊन सगळ्या सूचना दिल्या होत्या. खरं तर मी पुस्तकवेडी पण का कोण जाणे मला एकटीला जायची भीती वाटली आणि म्हणून मी माझं ग्रंथालयाचं कार्ड बनवलंच नाही. साधारण महिन्यानंतर अंजली ताईंनी माझ्यासाठी वर्गात निरोप पाठवला. मी घाबरत घाबरत गेले पण त्यांनी कार्डाचा विषय काढलाच नाही. उलट आपुलकीने तुला पुस्तकं आवडतात का? कोणती? मग आपल्याकडे कोणती पुस्तकं आहेत असं छान गप्पा मारायला सुरुवात केली. मग तुला ह्यातलं कोणतं पुस्तक हवंय का? असं करत माझं कार्ड बनवून मला सगळं नीट समजावून दिलं! मग काय त्यानंतर रोज एक ग्रंथालयाची फेरी सुरु!
आम्ही पाचवीत असताना प्रबोधिनीने जाणता राजा ह्या नाटकाचे निधी संकलनासाठी प्रयोग लावले होते. मला वाटतं सोलापूरची प्रबोधिनीची वास्तू उभारण्यासाठी. त्याची तिकीट विक्री करण्यासाठी आम्ही अक्षरशः घरोघरी हिंडलो होतो! आमची संवादाची सगळी कौशल्य पणाला लावली होती. शाळेच्या वेळात, शाळेबाहेर जाऊन आपले आपण काहीतरी करू शकतो ही फार मोठी गोष्ट वाटली होती. तेव्हा एकदा मी तिकिटांचे एकूण १० हजार रुपये एकटी दप्तरातून घेऊन शाळेत गेले होते. त्यातून माझा आत्मविश्वास खूप वाढला एवढं पक्कं लक्षात आहे. पाचवीच्या आणखी बऱ्याच आठवणी आहेत. पण आत्ता इथे थांबते. खूप मोठी पोस्ट झाली!
जिज्ञासा, अतिशय सुंदर
जिज्ञासा, अतिशय सुंदर पोस्ट्स. अनेकानेक धन्यवाद
खूप वेगळ्या पद्धतीचं शिक्षण ( पुस्तकी नव्हे ) इथे दिलं जातं हे प्रबोधिनीचे अनुभव ऐकताना नेहेमीच जाणवतं आणि प्रामाणिकपणे ह्या अनुभवांना सामोरं जाऊ द्यायची पालकांची हिमंत होईल का ( अॅडमिशन मिळणे हा पुढचा भाग ) असंही वाटतं उदा. माझ्या मैत्रिणीच्या नवर्याकडून आठवी-नववीत असताना त्यांना फटाके विकत घ्यायला / विकायला महाराष्ट्राबाहेर ( बहुतेक उत्तरप्रदेशात ) पाठवल्याचं ऐकलं आहे. खूप वेगळं, ग्रेट वाटलं हे तरी त्यासाठी पालकांची मानसिक तयारी असणं फार आवश्यक आहे.
शाळा को-एड नाही हे माहीत नव्हतं.
लिहित राहा ... इन्ना आणि इतरांचे अनुभवही वाचायला आवडतील.
मी छात्र प्रबोधनचे काही अंक वाचलेले आहेत. तसेच त्यांची 'क्षितीज नवे मज सतत बोलवी', 'स्वीकारुनी ही नमनेसुमने - नमोस्तुते गुरुदेवा', 'विकसता विकसता विकसावे' ही गाणी शिकले होते. आजही ती म्हणताना एक वेगळंच फिलींग येतं.
माझा ज्ञानप्रबोधिनीशी संपर्क
माझा ज्ञानप्रबोधिनीशी संपर्क आला तो पहिल्यांदा आठवीत असताना कॉम्प्युटर शिकण्याच्या निमित्ताने.. तेव्हा तिथे क्लासेस असायचे... डेबेस थ्री प्लस ही पहिली शिकलेली कॉम्प्युटर लँग्वेज..
आणि नंतर दहावी मधे नॅशलन टॅलेंट स्कॉलरशिप स्पर्धेच्या निमित्ताने.. तिथे मिळणारी पुस्तकं अफाट होती..
आणि मग छात्र प्रबोधन ह्या मासिकाच्या माध्यमातून..
मस्त लिहिते आहेस जिज्ञासा
मस्त लिहिते आहेस जिज्ञासा !
आम्हांला दहावीच्या वर्षाच्या सुरूवातीला शाळेमध्ये प्रबोधिनीचे महेंद्र भाई आणि एक कोणत्यातरी ताई व्याख्यान द्यायला आले होते. खुपच सोप्या शब्दांत बरच उपयुक्त काय काय सांगितलं होतं. पुढे कॉलेजमधले काही मित्रमैत्रिणी प्रबोधिनीतले होते. एकंदरीत प्रबोधिनी पब्लिक कधी रँक होल्डर वगैरे नसायचं. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं आणि प्रभावी असायचं. अॅनालिटीकल स्किल्स, कम्युनिकेशन, नवीन नवीन गोष्टी करत रहाणं , नेतृत्त्व क्षमता ह्यात प्रबोधिनी पब्लिक एकदम छाप पाडून जायचं.
त्यामुळे प्रबोधीनी बद्दल इतकी डिटेल माहिती कोणी देत असेल तर वाचायला नक्की आवडेल. तेव्हा, लिहित रहा.
मी पण प्रबोधिनीचा! माझी पहिली
मी पण प्रबोधिनीचा!
माझी पहिली आठवण दादा नवाथ्यांची आहे. तेव्हा प्रबोधिनी प्रवेश परीक्षेचा भाग म्हणून मुलाखती घेतल्या जात (आता घेतली जात नाही) व माझी मुलाखत दादांनी घेतली होती. पुढे शाळा सुरु झाल्यानंतर दादांनी आवर्जून मला ओळख दाखविली होती. तेव्हा त्याचे अप्रूप जरूर वाटले होते पण आता विचार करता ती खूपच मोठी गोष्ट असल्याचे जाणवते. प्रबोधिनीत प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिले जाते. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार त्याला/तिला संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सगळे शिक्षक सतत करत असतात.
मला संस्कृतची आवड (व गति) आहे हे लक्षात आल्यानंतर मृदुलाताईंनी मला संत्रिकेतील (संस्कृत संस्कृती संशोधिका, प्रबोधिनीचा आणखी एक विभाग) अष्टाध्यायीची प्रत दाखवली होती आणि विश्वनाथ गुर्जर अर्थात विसुभाऊंशी गाठ घालून दिली होते - काही अडले तर विचारायला. मी अजून तरी विसुभाऊंइतके चांगले संस्कृत कुठे ऐकले नाही. मला नाही वाटत आज कोणत्याही शाळेत थेट अष्टाध्यायीतून संस्कृत शिकण्याची संधी मिळत असेल. प्रबोधिनीत सर्व क्षेत्रातील लोक वावरत असतात. तुम्ही फक्त थोडा उत्साह दाखवला कि तुम्हाला प्रोत्साहन/मदत मिळालीच समजा!
वर पोंक्षे सरांचा उल्लेख झाला आहे. सर अजूनही प्रबोधिनीत आहेत फक्त आता ते प्राचार्य म्हणून काम करत नाहीत तर शैक्षणिक साधन केंद्राचे(www.erc-pune.org) प्रमुख आहेत. शिक्षक म्हणून तर त्यांच्या प्रचंड आठवणी आहेतच पण शिक्षण संपल्यानंतर त्यांच्याबरोबर erc मध्ये काही काळ काम करण्याचा योग आला - काही कार्यशाळा घेण्यात मदत व NTS, Olympiads सारख्या परीक्षांना मार्गदर्शन करण्यात मदत. विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करताना किंवा एखादी गोष्ट शिकवताना कसा विचार करावा हे मी त्यांच्याकडून प्रामुख्याने शिकलो. आता विचार केला तर लक्षात येते कि प्रबोधिनीत बहुधा ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने शिकवली जाते - विचार कसा करावा? फक्त जोपर्यंत प्रबोधिनीतून बाहेर पडत नाही तोवर लक्षात येत नाही कि आपण काय शिकलो आहोत. क्षेत्र कुठलेही असो जोवर तुम्ही तर्कसंगत विचार करून प्रश्न विचारता येणे हे गरजेचे आहे. माझी प्रबोधिनीची सर्वात आवडती आठवण हीच आहे - डबा खाण्याच्या सुट्टीत लवकर डबा संपवून आपल्याला हव्या त्या माणसाला गाठून शंका विचारत असलेले माझे मित्र आणि भरून गेलेले ग्रंथालय!
प्रबोधिनीबद्दल फक्त ऐकुन
प्रबोधिनीबद्दल फक्त ऐकुन होतो.... मस्त लिहलयस जिज्ञासा!
मस्त लिहिते आहेस जिज्ञासा
मस्त लिहिते आहेस जिज्ञासा (टेबल फॉर्मेशन आणि जमिनीवर खाली बसून चांगला अभ्यास वगैरे वाचून तोत्तोचान ची आठवण आली)
आता सहावी च्या प्रतिक्षेत
आणि परत पाचवीत बसावंसं वाटलं तर खुश्शाल बस
किंवा मधेच नववी - दहावीत जावंसं वाटलं तरी चालेल.
पायस - अजूनही आवडेल वाचायला
इन्ना कुठे आहे ?
जिज्ञासा व इतर... छान लिहीलय.
जिज्ञासा व इतर... छान लिहीलय.
लहानपणी शालेय जीवनात हत्ती गणपतीपासच्या ज्ञानप्रबोधिनीचा काहीही संबंध आला नाही.
जो आला तो इतकाच की मी पेरुगेट भावे स्कुलचा, अन ज्ञानप्रबोधिनी बद्दल फक्त कुतुहल असायचे, व तिथली शिस्त वगैरे आपल्याला कधीच जमणार नाही हे पक्के ठाऊक असायचे. तिथल्या एकंदरित शैक्षणीक वातावरणाबद्दल बरेच समज/गैरसमज होते, त्यांच्या गुलाबी गणवेषाबद्दल खिल्ली उडविण्याचीच भावना असायची, व आमच्या सर्वगामी खाकीचड्डीपुढे त्यांचे व कॉन्वेण्ट स्कुल वाल्यांचे चित्रविचित्र रंगांचे गणवेश बघता एक प्रकारचा न्यूनगंडही असायचा, की ते वेगळे कोणतरी उच्च वगैरे, अन आपण सर्वसामान्य इत्यादी.
परिक्षेअंतर्गत मिळालेल्या गुणांची हुषारी अजिबात नसल्याने, व अंगभूत हुषारीस तेथिल वातावरणात बरेचदा "उद्धटपणा/आगाऊपणा " या सदराखाली मोजत असल्याने तिथे प्रवेश वगैरे सोडाच, मुख्य दरवाजातुन आत जाण्याचीही शक्यता नव्हती, व आजवर गेलेलो नाही.
मात्र पुढे यांच्यातीलच काही लोकांनी पिंचीमधे प्राधिकरणात अशाच धर्तीची, उद्दीष्टांची ज्ञानप्रबोधिनी सुरू केली तिचा दुरुनचा साक्षीदार मात्र होतो. किंबहुना सुरवातीचा काही काळ एलआयजीमधिल ज्या निवडक लोकांच्या घरात वर्ग भरायचे त्या घरात माझी सासुरवाडीही होती.
एक होते, की पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी सारखे "मार्कांच्या हुषारी" बाबतचे नियम येथे शिथिल केले गेले होते, व जो येईल त्यास शिक्षण हे सूत्र अवलंबले असल्यानेच कदाचित माझी तिनही अपत्ये पहिली ते दहावी याच पिंचीमधिल ज्ञानप्रबोधिनीत शिकली.
उडदामाजी काळेगोरे या न्यायाने सर्वच काही सर्वच काळ सुवर्णासारखे चांगले असु /राहु शकत नाही, हे जरी खरे असले, तसेच कौतुकाबरोबरच काही बाबतीत "कानपिचक्या" देण्याची इच्छाही बळावत असली, तरीही शैक्षणीक क्षेत्रात ज्ञानप्रबोधिनी नावाच्या दीर्घकाल चालत आलेल्या यशस्वी चळवळीने "सुसंस्कारांबाबत" फार मोठा आशावाद निर्माण केला आहे हे निश्चित.
हे जग नालायक्/स्वार्थी/भ्रष्ट लोकांमुळे चालत नसुन मोजक्या उत्कृष्ट/हुषार/नि:स्वार्थी/सचोटीच्या लोकांमुळे चालते हा विश्वास, तर ते मोजके उत्कृष्ट/हुषार/नि:स्वार्थी/सचोटीचे नागरिक घडवायचे कार्य ज्ञानप्रबोधिनी नेटाने अविरत करते आहे ही खात्री, माझ्या मते या शाळेबद्दल पुरेशी आहे.
जिज्ञासा, अतिशय सुंदर
जिज्ञासा, अतिशय सुंदर पोस्ट्स.
माझी पण अनोळखी लोकांशी बोलायची सुरुवात राखी विक्रीपासुनच झाली.
तुझ्या जाणता राजाच्या पोस्ट्स वाचुन मला आम्ही केलेली आशा भोसलेंच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री आणि स्मरणपत्रिकेसाठी गोळा केलेल्या जाहिराती आठवल्या.
मस्त धागा काढलाय.. जिज्ञासा,
मस्त धागा काढलाय.. जिज्ञासा, सुंदर पोस्ट्स +१
शाळेत असल्यापासून एक कुतूहल
शाळेत असल्यापासून एक कुतूहल होते ह्या शाळेबद्दल.
मस्त माहिती !
जिज्ञासा, फारच सुंदर
जिज्ञासा, फारच सुंदर लिहिलंय.....
अजून लिहित रहाणे....
अजून लिहिण्यासाठी प्रोत्साहन
अजून लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार! मलाही आठवणी लिहिताना जाम मजा येत्येय! Reliving the golden days of my life!
पायस, जमेल तितक्या आठवणी जरूर लिहा. विसुभाऊंचे संस्कृत +१११ आम्हाला नववीत संस्कृत शिकवायला होते ते.
शब्दाली, इन्ना, तुम्ही ही लिहा ना! मला जोवर वेळ आहे तोवर मी लिहित राहीन. एकदा मागे पडलं की मग होणार नाही.
प्रबोधिनीची एक गंमत आहे. इथे शाळेत सुरु असलेल्या उपक्रमांचे स्वरूप बदलत राहते पण spirit तेच असते. आम्ही जे उपक्रम केले ते आणि तसेच पुढच्या किंवा मागच्या तुकड्यांनी केले नसतील पण त्यांना आणि आम्हाला जी मज्जा आली ती एकाच quality ची असेल हे निश्चित!
प्रबोधिनीत येण्यासाठी प्रवेश परीक्षा आहे. पण प्रबोधिनीत मार्कांना फारसं महत्व नसायचं. त्यावर काही अवलंबून नसायचं - न कुठल्या उपक्रमातला सहभाग न मैत्री न इतर काही. आणि मार्क तसे कमीच मिळायचे प्रबोधिनीत! मला फक्त ६८% टक्के होते पाचवीत. पण सुदैवाने आई बाबांचा प्रबोधिनीवर आणि माझ्यावर विश्वास होता. त्यांना दिसत होतं की मी खुश आहे आणि मला शाळा आवडतेय. And thankfully that was enough
इयत्ता सहावी: पाचवीत असताना
इयत्ता सहावी:
पाचवीत असताना इंग्रजी माध्यमाच्या मुलामुलींचे इंग्रजीचे आणि मराठीचे तास वेगवेगळे व्हायचे. पण सहावीपासून आम्ही सगळ्या सगळे विषय एका वर्गात शिकू लागलो. सहावीत आम्हाला विशाखा ताई वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या होत्या. त्या गणित शिकवायच्या. अतिशय शांत, मृदू स्वभाव! आमची आणि त्यांची जाम म्हणजे जाम गट्टी जुळली! सहावीमधली सगळ्यात ठळक आठवण म्हणजे गणिताचा महायज्ञ! त्या दिवशी काय झालं होतं कोण जाणे आमचे बरेचसे तास होऊ शकणार नव्हते. विशाखा ताई वर्गात आल्या आणि त्यांनी ही बातमी दिली! काही काळ आनंद प्रदर्शनासाठी जोरदार गोंधळ घालू दिल्यानंतर त्यांनी विचारलं मग काय करणार दिवसभर? बरेच पर्याय पुढे आले पण शेवटी गणिताचा महायज्ञ करण्याची कल्पना मान्य झाली. मग ग्रंथालयात जाऊन जितकी मिळतील तितकी सहावीच्या गणिताची पुस्तकं आणण्यात आली. CBSE board ह्या बाबतीत खूप छान आहे. अनेक प्रकाशन संस्था अभ्यासक्रमानुसार पुस्तके बाजारात आणत असतात. विशाखा ताई काही पूर्ण वेळ थांबू शकणार नव्हत्या. त्यांनी साधारण एक शिस्त लावून दिली आणि मग आमचा वर्ग पुढचे ४-५ तास गणिते सोडवीत होता. मज्जा आली! सहा हजाराच्या वर गणिते सोडवली आम्ही त्या दिवशी! मग दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी सगळ्या शाळेला आमच्या वर्गाचा पराक्रम सांगण्यात आला! आमची कॉलर ताठ!
सहावीचा आमचा सहाध्याय दिन थेऊरला झाला. नुकतीच स्वामी कादंबरी वाचल्याने माधवरावांची समाधी, गणपतीचे देऊळ ह्या साऱ्या गोष्टी अत्यंत भारावलेल्या मनाने पाहिल्या! बस स्टँडवर उभं असताना पेरू घेऊन खाल्ले होते हे लक्षात आहे. नंतर पुढे आम्ही सगळ्याजणी पुन्हा थेऊरला एका वेगळ्याच कारणासाठी राहायला आलो. पण त्या आठवणी आठवीत
सहावीसाठी आमचं वर्गोदिष्ट होतं पाठांतर! आमच्या वर्गाची गाणी आणि कवितांची आवड लक्षात घेऊन हे मिळालं असावं! कविता ताईने आम्हाला भरपूर गाणी आणि कविता शिकवल्या! आम्ही वेगवेगळ्या भारतीय भाषांमधली गाणी सुद्धा शिकलो होतो. आम्हाला physics शिकवायला मंजुषा ताई मुंगी होत्या. त्यांच्या तासाला शेवटची १५ मिनिटं त्या त्यांचे अनुभव सांगायच्या. त्यांनी पूर्वी युवती विभागात काम केलं होतं. त्यांच्या तोंडून आम्ही गाजलेले रूपकंवर सती प्रकरण ऐकले. त्यावेळी १९८७ साली प्रबोधिनीतर्फे काही युवती प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राजस्थान दौऱ्यावर गेल्या होत्या त्यात मंजुषा ताई पण होत्या! त्यामुळे त्यांचे प्रत्यक्षदर्शी अनुभव ऐकणे हा देखील एक थ्रिलिंग अनुभव होता. ‘स्वतः पाण्यात उतरा, अनुभव घ्या. काठावर राहून परिस्थिती कशी समजणार?’ अशी प्रबोधिनीची धारणा ह्या अनुभव कथनातून आमच्यापर्यंत पोहोचत होती.
आम्हाला पाचवी आणि सहावीमध्ये चित्रकला आणि सातवीपर्यंत संगीत असे विषय म्हणून होते. अर्थात सातवीनंतर ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी ह्या विषयांची सोय होतीच. हिंदी शिकवणाऱ्या चारुता ताई आम्हाला चित्रकला शिकवायच्या. चारुता ताई हिंदी शिकवताना खूप कडक असायच्या पण त्यादेखील तासातला काही वेळ गप्पांना द्यायच्या. चारुता ताईंशी गप्पा म्हणजे हास्याचा पूर! एखादी गंमत/प्रसंग रंगवून सांगण्यात त्यांचा हातखंडा! त्यामुळे माझी चित्रकला म्हणजे एक मोठे अंडाकृती वर्तुळ असले तरी चारुता ताईंच्या तासाला मज्जाच यायची! नंतर आठवीत त्या आमच्या वर्ग शिक्षिका असताना आम्ही त्यांच्याबरोबर खूप धमाल केली.
मंजुषा ताई (ही वेगळी) संगीत शिकवायला होती. आमच्यापैकी बहुतेक सगळ्या जणींनी गांधर्व महाविद्यालयाच्या ३/४ गाण्यांच्या परीक्षा दिल्या आहेत ह्याचं श्रेय मंजुषा ताईचं. आम्ही शाळेत असताना आणि त्यानंतर शाळेचा संगीत कक्ष अद्ययावत आणि विविध वाद्यांनी सुसज्ज करण्याचं मोठं काम मंजुषा ताईने केलं. ह्या प्रकारात गाण्याच्या मुली असा एक गट वर्गात तयार झाला होता. विविध आंतरशालेय गाण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे वगैरे गोष्टीत ह्या गटाचा सहभाग असायचा. मंजुषा ताईने गाण्याच्या मुलींना बोलावलं आहे असा निरोप आला की ह्या सगळ्या सटकायच्या!
पाचवीत की सहावीत आमची न्यू इंग्लिश स्कूल च्या मैदानावर क्रीडा प्रात्याक्षिके झाली होती. त्यासाठी जोरदार सराव केल्याचं आठवतंय! रोप मल्लखांब, सायकल कसरती, जिम्नॅस्टिक्स, आगीतून उड्या वगैरे साहसी प्रकार त्यात आम्ही केले होते. एरवी शाळा सुटल्यावर एक दिवसाआड दल असायचं. त्यात वेगवेगळे खेळ, व्यायाम, गणपतीच्या दिवसांत बरच्यांचा सराव असा कार्यक्रम असायचा. हे दल युवती विभागातल्या ताया घ्यायच्या (मुलांचे युवक विभागातले दादा). ह्यातल्या बऱ्याच जणी प्रबोधिनीच्याच माजी विद्यार्थिनी. त्या त्यांचं कॉलेज सांभाळून आमचं दल घ्यायला यायच्या. एकूण मजा असायची. ह्याच तायांबरोबर मग आम्ही पावसाळी सहलीला किल्ले सर करायला जायचो, तंबूतलं शिबीर नावाचा एक अद्भूत प्रकार होता. त्याच्या आठवणी नंतर सविस्तर लिहीनच! ह्या ताया फार लाडक्या! आमच्या friend, philosopher and guide. त्यांच्याबरोबर शाळेतल्या ताईंच्या तक्रारी, चेष्टा, वाद, अभ्यास ते आयुष्य सगळ्यावर गहन चर्चा असं सगळं चालायचं! मग दल ६:३० ला सुटलं तरी टीपी करत ७:३० वाजायचे. मग अत्यंत नाईलाजाने गप्पा आवरून घराच्या दिशेने कूच करायची. सहावीपासून माझ्यासाठी घडलेला मोठा बदल म्हणजे मी शाळेत रिक्षाऐवजी सायकलने जाऊ लागले होते. त्यामुळे अचानक वेळेचं खूप स्वातंत्र्य मिळालं! माझ्या आत्याची दोन्ही मुलं प्रबोधिनीची असल्याने तिला आमच्या ह्या बेभरवशी कारभाराची कल्पना होती म्हणून बरं! नाहीतर प्रबोधिनीतल्या मुलांचे पालक होणे सोपे काम नव्हे!
क्रीडा प्रकाराविषयी लिहिताना एक खंत व्यक्त केल्यावाचून राहवत नाही. गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात असल्याने शाळेला स्वतःचे मैदान नाही. ही एक उणीव तेव्हाही त्रास देत असे. पण मग त्या निमित्ताने आजूबाजूच्या सर्व मैदानांची ओळख झाली. तिथल्या व्यवस्थापकांशी बोलून आवश्यक त्या परवानग्या मिळवणे, मैदानाची आपल्यापुरती निगा राखणे, तिथल्या वेळा पाळणे अशा असंख्य अडचणींना तोंड देत आमचे ताई, दादा (आणि अर्थात त्यांच्यापाठी शाळा) आमच्यासाठी दल घेत असत. महाराष्ट्र मंडळचे मैदान, न्यू इंग्लिश स्कूल, भावे स्कूल, १७ नंबरचे मैदान, नवी पेठ अशा अनेक ठिकाणी असलेल्या मैदानावर आमचे दल भरत असे. तुळशीबागेच्या समोरच्या भाऊ महाराज बोळात पण एक मैदान होते. तिथले दल अगदी वेळेत संपवावे लागे कारण तिथे नंतर संघाची शाखा भरत असे. हे सोडून उपासना मंदिर आणि शाळेची गच्ची ह्या नेहमीच्या यशस्वी जागा होत्याच! इतक्या अडचणी असल्या तरी उत्साह भरपूर! पण तरीही शाळेतली एखादी गोष्ट बदलायची असेल तर मी ही गोष्ट बदलेन! शाळेला एक मोठं, विस्तीर्ण मैदान मिळवून देईन.
सहावीत केलेल्या इतर उद्योगांमध्ये विविध देशांच्या दुतावासांना पत्र लिहून त्या देशांबद्दल माहिती मिळवणे असा एक प्रकल्प केला होता, ह्या शिवाय पुर्वांचलामधल्या काही विद्यार्थ्यांशी पत्रमैत्री देखील केली होती. एकुणात नवनवीन कल्पनांचा विचार करणे आणि त्याची भान विसरून अंमलबजावणी करणे हा गुण अंगी लागायला सुरुवात झाली होती. काहीतरी कामासाठी रविवारी शाळेत चक्कर मारणे देखील सुरु झाले होते. कोणत्याशा बाल चित्रपट चळवळीमार्फत विजय टॉकीजला काही रविवार चार्ली चॅप्लिनचे सिनेमे बघितल्याचं पण आठवतंय.
सध्या शाळेच्या दोन इमारती आहेत एक नवीन आणि एक जुनी. पण मी शाळेत असताना नवीन इमारतीच्या जागी एक बैठी, दुमजली दगडी वास्तू होती ज्यात युवती विभाग आणि सहनिवास(मुलांचं हॉस्टेल) होतं. यु.वि. ही टीपी करण्याची नेहमीची जागा. त्या दोन खोल्यात आम्ही प्रचंड दंगा घालायचो. जसजशी वर्ष गेली तशा आमच्या खास जागा शोधून काढल्या होत्या. डोक्यात सतत चक्र फिरत असायची. त्या गोष्टी discuss करायला ह्या जागा होत्या किंवा मग एकटीने जाऊन निवांत पुस्तक वाचणे/अभ्यास करणे ह्यासाठी. कोणत्याही जागेची एक short forms ची संकेतभाषा असते. तशी प्रबोधिनीची पण आहेच. प्र.मा.सं, संत्रिका, छाप्र, यु.वि. असे जागांचे short forms तोंडी बसले. शाळा ही हळूहळू दुसरं घर होत गेली.
मला वाटतं सहावीतच आम्ही नागपंचमीला रात्री शाळेत राहायला आलो होतो. हे पहिल्यांदा, नंतर मग अनेकदा शाळेत राहायला गेलो. घरून जेवून आलो आणि मग रात्री उपासना मंदिरात बसून मेंदी काढली. गच्चीवर जाऊन तारे मोजले आणि मग बाराच्या पुढे तायांचा ओरडा ऐकून झोपलो. त्याचवेळी नुकत्याच वाचलेल्या तोत्तोचानच्या शाळेसारखी आपली शाळा आहे असा विचार करून मज्जा वाटली होती. रच्च्याकाने तोत्तोचानचा मराठी अनुवाद एका माजी प्रबोधिकेने (चेतना सरदेशमुख गोसावी) केला आहे
मला आठवतंय त्याप्रमाणे आम्ही सहावीत एकदा पोंक्षे सरांशी कशावरून तरी तासभर वाद घातला होता. आमची काहीतरी तक्रार होती आणि सर आमचं म्हणणं ऐकून त्यावर त्यांची बाजू मांडत होते. एका वर्षात आपण आपल्या शाळेच्या प्राचार्यांना “मला/आम्हाला हे पटत नाही/मान्य नाही” असं सांगू शकतो आणि आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाईल एवढा आत्मविश्वास आणि (शाळेविषयी) विश्वास सहावीत निर्माण झाला होता एवढं मात्र नक्की!
सहावी संपताना विशाखा ताईंचं आणि आमचं इतकं गुळपीठ जमलं होतं की आम्ही सगळ्यांनी ठरवून आपल्या मनोगतामध्ये आम्हाला सातवीत विशाखा ताईच वर्ग शिक्षिका म्हणून हव्या अशी मागणी नोंदवली होती! पण त्याचं पुढे काय झालं ते सातवीच्या पोस्टमध्ये!
ज्ञानप्रबोधिनीत मुलांचे आणि
ज्ञानप्रबोधिनीत मुलांचे आणि मुलींचे वर्ग वेगळे ठेवण्यामागची भूमिका काय असावी?
माझा ज्ञानप्रबोधीनीशी संबंध
माझा ज्ञानप्रबोधीनीशी संबंध अनेको वेळा आला.
कॉम्प्युटर बेसिक कोर्स, मग मेन्सा, एकदा नॅशनल टॅलेन्ट सर्च साठीचं केंद्र, प्रचीतीचा १०० दिवसाची शाळा ह्या उपक्रमात भाग घेतल्यावर झालेल्या अनेको मिटींग्ज, मग मुलाची IQ test, मग मुलाची aptitude test, मुलाने समर कॅम्पस अटेंड करणं इ. इ.
आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा एक कुतुहल वाटायचं या शाळेबद्दल आणि इथल्या मुला-मुलींबद्दल. तिथली मुलं-मुली फार नकचढी आणि फॅडिस्ट असतात असा गैरसमज होता. ( लोकहो हलकं घ्या, मी लहान होते तेव्हा. नंतर मी अनेक उपक्रमात भाग घेतले आणि मुलालाही प्रोत्साहन दिलं भाग घेण्यासाठी. )
तुम्ही सगळे गप्पा मारा शाळेच्या, आम्हाला वाचायला आवडेल. बर्याच उपक्रमांमधे भाग घेतल्याने मला काही गप्पांमधेही भागही घेता येइल.
रॉहू, माहिती नाही. कोणा तरी
रॉहू, माहिती नाही. कोणा तरी सिनियर व्यक्तीला विचारावं लागेल किंवा एखाद्या पुस्तकात काही उल्लेख आहे का ते बघावं लागेल.
मनीमाऊ, आता वाटतं की प्रबोधिनीतली मुलं बऱ्यापैकी नादिष्ट असतात! त्यामुळे ती आपल्याच तंद्रीत असतात आणि मग नकचढी वाटतात. पण हे ही खरंच आहे की प्रबोधिनी हा weak point असतो त्यामुळे शाळेविषयी काही ऐकून घेणार नाही असा एक सतत पवित्रा घेऊन फिरतात बिचारी! मला अनेकदा नातेवाईकांच्यात "आली अज्ञान प्रबोधिनी" असं चिडवायचे आणि मी चिडायचे मग घायकुतीला आल्यावर "जाऊ दे का छळता बिचारीला!" असं म्हटल्यावर सुटका व्हायची! "मला बोला पण माझ्या शाळेला बोलायचं काम नाही!" असा फार निरागस वेडेपणा होता तो!
हो जिज्ञासा, खरं आहे तुझं.
हो जिज्ञासा, खरं आहे तुझं. बिचारी तु
ज्ञानप्रबोधिनीत मुलांचे आणि
ज्ञानप्रबोधिनीत मुलांचे आणि मुलींचे वर्ग वेगळे ठेवण्यामागची भूमिका काय असावी?>>> लेकीने ज्ञान प्रबोधिनी मधे प्रवेश घ्यायला नकार दिला त्यातले हे पण एक कारण होते ती म्हणाली "शी वर्गात बॉईज नाहीत " हे कारण ऐकुन माझ्या बाबांना culture shock बसला होता
लेकीने जेव्हा प्रवेश परिक्षा दिली तेव्हा काही खूप छान माहिती मिळली ती नंतर पोस्ट करीन.
मी टाकते थोड्या वेळाने.
मी टाकते थोड्या वेळाने.
मस्त पोस्टी जिज्ञासा.
मस्त पोस्टी जिज्ञासा. तुमच्या तल्या ध्येयासाठी परी श्रम घेण्याच्या मानसिकतेची बैठक कळते आहे.
Pages