बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण त्या गाण्यात काही वावगे वाटत नाही! अगदी अंगभर साड्या आणि अलंकार घातले आहेत. मी सुद्धा फेबु वर "किळसवाणे" असा शब्द वाचला. अंगभर साड्या कधी पासून किळसवाण्या झाल्या काय माहीती.

.

धनि, पेशव्यांच्या काळात पोटं दाखवत फिरवणार्‍या पेशवीण बाई नव्हत्या. पुस्तकानुसार दोन खांद्यावरुन पदर असायचाच, त्यावरून कदाचित कुणी किळसवाणं म्हणालं असू शकेल.

धनि, ओके
एआयबी बदल केलाय
आणि हो अगदी, ते किळसवाणे वगैरे शब्द, सोबत उत्तान हावभाव, कंबर उघड्या टाकून नाचताहेत वगैरे बरेच काही वाचलेले. पण नक्कीच तसे तरी काही नाही.

सीमंतिनी आपण सुचवलेला बदल केला तर माझ्याच हेतूबद्दल शंका जाईल. Happy
अकबर बिरबल जोडी ज्यासाठी प्रसिद्ध आहे त्याच अर्थाने घ्या Happy

पिन्गा गाणे दिपिका आणि प्रिचोने एकत्र केलेला डान्स म्हणून बघितले तर एक बॉलिवुडी कॅची नबर वाटेल पण
त्याला पेशवेकालिन इतिहासाची जोड दिलिय ना! घोड तिथेच पेन्ड खातेय

१) काशिबाई नुर्त्य करत असतिल याची शक्यता ०.००१ टक्के त्यामुळे अस एखास स्वप्न्रन्जन दाखवणे चुकिचच

२) गाण्याची कोरिओग्राफी गन्डलिय ना धड लावणि, ना धड झिम्मा ना कत्थाक

३ )साड्या,ज्वेलरी, कुठुनच त्याकाळातली वाटत नाही!

इतिहसाचा अभ्यास कमी पडलाय एक्तर सलिभचा नाहितर मराठी प्रेक्षकाचा

ह्या लेखात तुम्ही बरीच सेल्फ कॉनट्रॅडीक्टरी विधानं केली आहेत.
एकदा म्हणताय पेश्व्यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याची संधी. मग दिलखेचक नाच बघताना म्हणताय की पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून...
मुळात सिनेमा इतिहास समजायला पहायचा/ किंवा लोकांपर्यंत पोचवायला करायचा असेल तर ' इतिहास' बदलून चालणार नाही. उद्या पेशवे पानिपतात हरलेच नाहीत किंवा 'ध' चा ' मा' करून नारायणरावाचा खून झालाच नाही असं दाखवाल सिनेमॅटीक लीबर्टीच्या नावाखाली. तसं जरूर करा पण मग 'फिक्शन' म्हणा त्याला. आणि अश्या सिनेमातून 'इतिहास' दाखवायची किंवा पहायची अपेक्षाही करू नका.

मुळात काशीबाईचं अधूपण, काशीबाई - मस्तानीची रीलेशन ह्या गोष्टींची इतिहासात नोंद आहे. त्या बदलून कसं चालेल.
शिवाय 'लटपट लटपट' लिहिणारा होनाजीबाळा दुसर्‍या बाजीरावाच्या काळात होता. त्याच्या गाण्याचा उल्लेख पहिल्या बाजीरावाच्या काळात करून कसा चालेल?

त्या गाण्यात ह्या कपड्यांमुळे पेशव्यांच्या संस्कृतीला धक्का वगैरे हा निदान माझा मुद्दा नाही.
पण चित्रपट बनवता आहात, ऐतिहासिक पात्रांवर - घटनांवर बनवता आहात, तर निदान 'त्या इतिहासाशी, त्या काळाशी' तरी प्रामाणिक रहा. आणि ह्या काळाशी प्रामाणिक राहण्यामधे इतिहासातली पात्र, त्यांचे एकमेकांशी डायनॅमिक्स, वेशभूषा, केशभूशा, सेटस, संवादाची भाषा, संगीत, वापरली जाणारी वाद्य अश्या अनेक बाबींचा समावेश आहे.
आणि नसेल काळाशी, इतिहासाशी प्रामाणिक राहता येत - तर आम्ही इतिहास दाखवायला किंवा पहायला सिनेमा बनवतोय्/पाहतोय असं तरी म्हणू नये.
एंटरटेनमेंट, फिक्शन म्हणा की. मग हवी तितकी लिबर्टी सगळ्याच बाबतीत !

रार, पेशव्यांच्या संस्कृतीला धक्का वगैरे नसला म्हटलं तरी त्या काळाशी प्रामाणिक रहायला कपडेही तसेच दाखवायला हवेत. ह्या गाण्यातल्या दोघींच्याही कपड्यांनी त्या काळाशी, इतिहासाशी पूर्णपणे फारकत घेतलेली आहे आणि म्हणूनच खटकतात डोळ्यांना.

सायो, मान्य. पण ते इतिहासाशी फारकत घेतात म्हणून खटकतात..
केवळ ते कपडे , त्या स्टेप्स उत्तान, अंगप्रदर्शन करणारे वगैरे आहेत म्हणून खटकत नाहीत - असा माझा मुद्दा आहे. (रेफरन्स टू "वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही." हे वाक्य ऋन्मेशच्या लेखातले. कारण ह्यापेक्षा असभ्य कपडे, असंस्कृत गाणी सिनेमात असतात, आजच्याच काळात आहेत असं नाही, कायमच होती).

रेफरन्स टू "वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही. >> हे खरं तर मी पण वाचलंय फेबु आणि वॉअ‍ॅ वर. आणि आधी लिहील्याप्रमाणे किळसवाणा तर अजिबात वाटत नाही तो नाच. पेशवेकालीन वाटत नाही असे म्हणा हवं तर. त्यात परत गाण्यात सगळ्या बायकाच दिसतात म्हणजे अशा वेळी खरं म्हणजे साड्या लहान करण्यापेक्षा त्या पदर खोचून वगैरे नाचत आहेत असे दाखवता आले असते.

ही माझी मतं नाहीत, मी ऐकलेली इतरांची काही मतं ( मराठी लोकांची):
१) बॉलिवुड मुव्हीज कडून फक्त मनोरंजन एक्स्पेक्टेड असत! इतिहासाशी प्रामाणिकपणा वगैरे नसतोच बॉलिवुड मधे.
२) बायकांच्या 'लेडिज ओन्ली' फंक्श्न्स मधे त्या काय करायच्या काय नाही याचे पुरावे आहेत का ?
३) जर पेशवेकालीन पुरुष रंगेल होते तर बायकांनी फक्त पोट दाखवलं तर एवढं काय आभाळ कोसळलं .
४) पेशवाई स्त्रियांमधे 'ध चा मा ' करायचं डेअरिंग होतं तर पोट दाखवत नाचणे फार क्षुल्लक धाडस आहे त्यापुढे Happy

माझं पण सायो आणि रार दोघींनी लिहिलय 'इतिहासकालीन वाटत नाहीत ' या मुद्द्याला अनुमोदन , सुपरमॉडेल्स वाटतात दोघी :).( प्रियांका आणि दीपिका आय मीन )

२) बायकांच्या 'लेडिज ओन्ली' फंक्श्न्स मधे त्या काय करायच्या काय नाही याचे पुरावे आहेत का ? >> Biggrin आता नाहीतच पुरावे मग डान्स वर का थांबता. वाटच लावायची आहे इतिहासाची तर गो ऑल द वे!! "सुबह होने न दे" म्हणत मस्त दोनचार अ‍ॅब्ज दाखवणारे मावळे आणा, लेट दि क्रिएटीव्हिटी टच इटस झेनिथ.

गो ऑल द वे!! "सुबह होने न दे" म्हणत मस्त दोनचार अ‍ॅब्ज दाखवणारे मावळे आणा, लेट दि क्रिएटीव्हिटी टच इटस झेनिथ.>>>> Lol

या गाण्यानंतरच्या सीन मधे काय असेल अजून बाहेर आलेलं नाही Proud

भन्साळीबाबाचं काय सांगता येत नाही. उद्या शिवाजी महाराजांवर सिनेमा काढला तर जिजाऊंच्या हस्ते त्यांना गाजर हलवा आणि आलूपराठे खायला घालायला कमी करणार नाही. शिवाय दोन नाही तर सात राण्यांचे डान्स बघाय्ला मिळतील ;).

काही बोलू नका. भन्सालीने मायबोलीवर आयडी काढला असेल तर हे वाचून असे पिक्चर काढायच्या तयारीला लागेल.

भन्साली कशाला आणेल मावळे सुबह होने न दे करायला, २ बायकाच हव्यात कारण मुळात हे त्याचं स्वप्नरंजन रंजन, परवा मी गप्पांच्या पानावर लिहिलं होतं , he's obsessed with 2 women women performing together (dance) Proud

मला आवडलं आणि काही फारसं खटकलं नाही. भन्साळी काकांनी ऐतिहासिक म्हटलंय का काय? माहित नाही. जरी म्हटलं तरी तो विनोद असणार त्यामुळे भलत्या अपेक्षांचं ओझं अज्जिबात त्यांच्या पाठुंगळीवर घालणार नाही.
बाकी होनाजी बाळा यांच्या लावणीचे शब्द वापरले ते खटकलं म्हणजे ती लावणी प्रसिद्ध आहे म्हणून खटकलं? का तशा प्रकारची भाषा खटकली? का कालसापेक्ष खटकलं? कारण ६० वर्षे नंतरच्या शाहिराचे टोटली नवीन शब्द (जर वापरले असते तर) आणि ३०० वर्षे नंतरच्या (म्हणजे आजच्या काळातील) गीतकाराचे शब्द यात गुणात्मक फरक असेल पण कालसापेक्ष काही फरक असू नये.
बाकी क्लिशे बोलायचं म्हणजे, नृत्य ही एक अभिव्यक्ती आहे. त्यांनी 'नाच' केला नसेल पण ते व्यक्त होण्याचं माध्यम आहे. नृत्य महत्त्वाचं नसून त्यातून व्यक्त होणं महत्त्वाचं Proud
बाकी सेन्सॉर आणि भावना म्हणजे गम्मत असते.

भन्साळी काकांनी ऐतिहासिक म्हटलंय का काय? माहित नाही. जरी म्हटलं तरी तो विनोद असणार त्यामुळे भलत्या अपेक्षांचं ओझं अज्जिबात त्यांच्या पाठुंगळीवर घालणार नाही. >
मान्य पण म्हातारी मेल्याचं दु:ख नाही काळ सोकावतो.

एक शक्यता आहे. हे गाणं प्रमोशनल साॅंग म्हणुन चित्रित/प्रदर्शित केलं गेलं असावं. भंसाळीने कल्पनाविलास करुन, थोडा फिक्शनल टच देउन, येनकेन प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याकरता हा खटाटोप केलेला असु शकतो. चित्रपटात हे गाणं कदाचित नसेल...

गाणं मी अजून पाहिलेल नाही पण सिनेमा चा प्रोमो पाहिला आहे
रणवीर कपूर बाजीराव म्हणून मला तरी झेपला नाही.
एकुणातच मराठी लोकांना, ज्यांना पेशव्यांचा इतिहास माहित आहे, हा सिनेमा पचवायला जरा जड च जाणार अस सर्वसाधारण पणे वाटतंय.

दुसर्या बाजूला ज्यांना यातला काहीच इतिहास माहित नाही त्यांच्या साठी एक चांगला मनोरंजनपट म्हणून हा चित्रपट हिट होऊ शकेल अस पण वाटलं

ते गाणे बाजीरावाचे स्वप्न आहे असे दाखवून भंसाळी सगळ्या वादावरच पडदा पाडणार आहे.

दुसर्या बाजूला ज्यांना यातला काहीच इतिहास माहित नाही त्यांच्या साठी एक चांगला मनोरंजनपट म्हणून हा चित्रपट हिट होऊ शकेल अस पण वाटलं >> +१ कमीत कमी दोन बाजीराव होते नि पहिला काय चीझ होता ते तरी महाराष्ट्राबाहेर कळेल.

Pages