बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी +१

तुम्हाला हवं असेल तसा पिक्चर तुम्ही काढा की. कुणी नको म्हटलंय. >> अगदी असंच वाटतंय Lol

आम्ही पैसे दिवून बघायला पण येऊ Wink

पगारे मी तर तुम्हाला कधीपासून सांगून राहिलोय कि इथे बोलणारे बरेच जण आहेत. बाजिराव शुर होता असेल, पण तुमच्यासारखा प्रबोधनाचा सातासमुद्रापार डंका फिरवणारा एकच आहे. तेंव्हा तुम्ही बाजीरावावर वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रबोधन करण्याकडे लक्ष द्या.

मि सुध्दा हा चित्रपट बघणार आहे.भन्सालिने काशीबाईंना नाचायला तर लावलेच आहे अजुन पेशवाइचि कशी टर उडवतो ते बघायला जावेच लागेल.

सेनापति क्रुपया महाराजांची तुलना पेशव्यांशि करु नका.कुठे जनतेला स्वराज्य देणारी शिवशाही तर कुठे आपल्याच जनतेच्या गळ्यात मडके नि कंबरेला खराटा बांधणारी पेशवाई.

अजुन पेशवाइचि कशी टर उडवतो ते बघायला जावेच लागेल.<<< तुमच्याकडून याहून जास्त अपेक्षा नाहीतच. पण अपेक्षाभंग मात्र फार छान होणार आहे.

From the Facebook wall of Priya Prabhudesai

खरेतर बाजीराव मस्तानी यावर एकही शब्द लिहायचा नाही असं ठाम ठरवले होते. मुळात बाजीराव हा ज्या समाजात फक्त मस्तानीच्या मुळे ओळखला जातो त्या समाजाचे आणि त्याच्या क्षुद्र लैंगिक विचारसरणीचे मला काडी इतके सोयरसुतक नाही. आज जागतिक युद्धशास्त्राच्या इतिहासात बाजीराव पेशवे आणि शिवाजी महाराज यांच्या लढाईचा पहिल्या दहा लढाईत समावेश आहे . अजिंक्य राहिलेला पेशवा असा त्याचा गौरव केला जातो , खर्या अर्थाने जो जातिभेदाच्या पलीकडे गेला , मित्रत्वात आणि प्रेमात… जो सर्वसामान्य सैनिकात सुद्धा लोकप्रिय होता त्याच्या आयुष्याचे मस्तानी हे महत्वाचे पण छोटेसे अंग आहे . बाजीराव त्याहून सुद्धा पुष्कळ मोठा आहे .

भन्साळी यांना साधी कादंबरी अभ्यासता आली नाही. देवदासाचा सुद्धा ते मुडदा पाडू शकतात आणि तो मुडदा सुद्धा पारितोषिक आणि पैसे कमावतो तिथेच पडद्यावर येण्याआधी बाजीराव आचके टाकणार हे निश्चित होते....

पिंगा या गाण्याला जो प्रतिसाद किंवा विरोध आहे त्यात मुख्य मुद्दा आहे तो ब्राह्मण पेशव्यांची स्त्री नाचू कशी शकते.... तिला नाचवायची हिम्मत कशी झाली? त्याचा प्रतिवाद हा तर किडलेल्या समाजाचे प्रतिबिंब आहे... आतापर्यंत तुम्ही आमच्या बायका नाचवल्या आता आम्हाला काशीबाई नाचवल्याचे मनसोक्त समाधान मिळूदे. जातिभेद मानणे आणि न मानणे यात निदान वैचारिक अंतर असावेच अशी साधी अपेक्षा आहे... पण प्रत्यक्षात वाद आणि प्रतिवाद पाहीला तर त्याचे बेसिक उत्तर एवढेच आहे की आम्ही मनसोक्त दुसर्या बाजूवर आमचे समाधान होईपर्यंत मिटक्या मारत शाब्दिक बलात्कार करणार...

आज पहिल्यांदाच अॅटनबरो चे आभार मानावसे वाटतात की त्यांनी गांधी बनवला. भन्साळी सारख्या माणसाने त्यांच्या सत्याच्या प्रयोगात धबधब्याखाली भिजलेल्या स्त्रीने स्वप्न दृश्य दाखवून कला आणि कल्पनेच्या स्वातंत्र्याखाली परत एकदा गांधींचा मर्डर केला असता... आणि अभिरुची स्वातंत्र्याच्या नावाने तो मिटक्या मारत चघळला गेला असता. जेव्हा "बहुसंख्य" समाजाच्या नजरेतून प्रसिद्ध आणि पूजनीय व्यक्तीवर लिहिले जाते तेव्हा त्याच्या प्रतिमेचे भान असावे आणि सत्याचा विपर्यास होऊ नये एवढी किमान अपेक्षा भन्साळी कडून होती आणि ती पुरी होण्याची शक्यता कमी आहे. संताप त्याचा आहे आणि रास्त आहे.

एक अतिशय हास्यास्पद मुद्दा चघळला जात आहे.. तो चारित्र्य..

ब्राम्हण बायका आणि रखेल ठेवायचे.
रखेल ठेवणे ही पुरुषी वृत्ती आहे . त्याचा वर्णाशी संबध नाही .
-----------------------------------------------
त्या काळात ते सर्वमान्य होते... ऐपत असेल तर लग्ने केली जायची. सर्व वर्णात.आणि रक्षा असण्याची पद्धत सुद्धा सर्व ठिकाणी होती..उत्तरेत मुसलमान आणि रजपूत यांचे जनानखाने होते. शिवाजी महाराज अपवाद.. पण त्यांच्या लग्नाच्या आठ बायका होत्या. संभाजी रसिक होते... राजाराम याबद्दल बरंच लिहिले आहे. शाहू महाराज यांचे प्रेमपात्र राजकारणात सुद्धा सल्ला द्यायचे.... पेशव्यांची गादी सुद्धा तशी रंगेल. बाळाजी विश्वनाथ यांची एकच रक्षा होती... ती सुद्धा उतार वयात... स्थैर्य आल्यावर. राधाबाईंना हा धक्का होता. त्या संतती ची राणीवशातूनच काळजी घेतली गेली. त्यांना लष्करात नोकऱ्या मिळाल्या. पण हे उद्योग आपल्या पोरांनी करू नये म्हणून त्यांच्या पत्नी ला मोहिमेवर पाठवायची सुरूवात राधाबाईंने केली.
काशीबाई युद्धावर सुरूवातीला गेल्या..... सर्व पेशव्यांचे खर्च अगदी खाजगी सुद्धा त्यात नाटकशाळा सुद्धा आल्या.. यांची सरकारदरबारी नोंद असे.. ती दफ्तरे आजही अभ्यासली जातात पण यात फक्त पहिला बाजीराव आणि पहीला माधवराव यांच्या नावावर काही वावगा खर्च नाही.... मोहीमेतच हा माणूस एवढा व्यस्त होता की वयाच्या छत्तीस वर्षापर्यंत असले शौक त्याच्या नावावर नाही.. मस्तानी त्याच्या आयुष्यात या वयात आली ती पत्नी म्हणून... रखेल म्हणून नाही.

राजपूतांनी आपल्या मुली मुस्लिम जनानखान्यात दिल्याची उदाहरणे आहेत..तुरळक केसीस सापडतील अशा आंतरधर्मीय लग्नाच्या.त्याचे अनुकरण काही हिंदू राजांनी सुद्धा केले . त्यांच्या मुसलमान उपपत्नी ची ही मुलगी मस्तानी. जिला नृत्य गाण्याबरोबर लढाईचे प्रशिक्षण दिले होते...सर्वांत महत्वाचा उल्लेख आहे तो तिच्या खर्चासाठी तिच्या वडिलांकडून दोन गावांचे उत्पन्न तिला दिल्याची नोंद. त्यावरून तिचे स्थान लक्षात यावे . छत्रसाल यांची ही लाडकी कन्या त्याच आदराने पत्नी म्हणून बाजीराव यांनी स्विकारली.. सुरूवातीला त्याचा गहजब झाला नाही.. ती अंतपुरात मिसळून गेली. कदाचित तेव्हा आकर्षण लवकर ओसरेल असे वाटले असावे पण तसे झाले नाही.. मस्तानी ने सुद्धा ब्राम्हणी रितीरिवाजात स्वतःला बसवले. ती जेव्हा गरोदर राहीली.... तेव्हा कदाचित हिचा मुलगा गादी बळकावेल या भितीने तिच्या दुस्वासाला सुरूवात झाली... ती यवनी, तिच्यामुळे अभ्यक्ष भक्षण आणि अपेयपान शनिवारवाडयात केले जाते.. ती नाची असा प्रसार पद्धतशीरपणे सुरू केला. कृष्ण सिंह उर्फ समशेर बहादूर याची मुंज लावण्याच्या बाजीरावांच्या आग्रहाने त्या आकसात भर पडली आणि या सुरेल नात्याच्या विनाशास सुरूवात झाली यात राऊंचाच जेमतेम चाळीशीत अंत झाला...मुद्दाम एवढे रामायण लिहिले कारण बाजीराव यांनी मस्तानी ला पत्नीचा दर्जा दिला.. त्याचेच प्रतिबिंब इथे दिसावे ही माफक अपेक्षा होती... मस्तानी चे कृष्ण जन्माच्या निमित्ताने नृत्य झाल्याचे उल्लेख आहेत... कथ्थक.... त्या नृत्याचा आनंद अगदी राधाबाईंने आणि काशीबाईने सुद्धा पडदाशीन राहून घेतला आहे...हे दाखविले असते तर प्रश्न नव्हताच पण काशीबाई यांना नाचवून भन्साळी यांनी शनिवारवाडयाची तमाशाबारी केली आहे त्याचा राग आहे.... ज्या स्त्रियांचे नख सुद्धा दिसत नव्हते त्यांच्या कलेच्या नावाखाली बेंब्या उघउघड्या टाकायला लावणे याचा संताप आहे..... ज्यांच्या साड्या धारवाड. मध्यप्रदेश आणि पैठण येथून बनविल्या जायच्या त्यांना झिरमिरीत जॉर्जेट सदृश्य काहीतरी नेसायला लावणे ही विकृती आहे . पिंग्या च्या नावाखाली लावणीच्या स्टेप्स तुम्ही देणार आणि त्याचे समर्थन करणार आणि त्यात केवळ एका विशिष्ट समाजाच्या बायकांचे चित्रण आहे म्हणून तुम्ही जिभल्या चाटत पहाणार असाल तर आज समाज एका जनावरांच्या पातळीवर गेला आहे..... जेव्हा ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली जाते तेव्हा याचा सखोल अभ्यास केला जावा ही बेसिक बाब इथे धाब्यावर बसवली आहे....
मला खरोखर भन्साळी यांना एक प्रश्न विचारायचा आहे... उद्या कदाचित तुमच्यावर बायोपिक बनवला जाईल. आज तुमच्या नावात तुमच्या पिताश्रींचे नाव नाही म्हणून लिबर्टी घेऊन लिला भन्साळी चे काम करणाऱ्या नटीला क्लब मध्ये मिनी स्कर्ट मध्ये नाचवले..तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? ©प्रिया प्रभुदेसाई Priya Prabhudesai

>>मि सुध्दा हा चित्रपट बघणार आहे.भन्सालिने काशीबाईंना नाचायला तर लावलेच आहे अजुन पेशवाइचि कशी टर उडवतो ते बघायला जावेच लागेल.

अत्यंत निषेधार्ह प्रतिसाद. पेशव्यांच्या चुकीच्या गोष्टीवर टीका जरूर करा पण "काशीबाईंना नाचायला लावले" हा शब्द प्रयोग खरच अनावश्यक आहे. त्यातून भंसाळी ने हा चित्रपट पेशवे विरोध करायला काढला असेल हा तुमचा भाबडा आशावाद अस्थानी आहे. उद्या तो तुम्हाला आदरणीय एखाद्या व्यक्तीवरही चित्र्पट काढेल व त्यातही असेच काही पाणी घालेल. पेशवाईतील वाईट गोष्टी वर प्रबोधनकारांसारख्यानी अभ्यासपूर्वक ल्हिऊन ठेवले आहे. त्यासाठी भंसाली च्या खांद्यावर बंदूक ठेवू नये.

आणी प्लीज याला आता ब्राह्मण /अब्राह्मण असा रंग देउ नकात कुणीही.

अजून चालूच आहे का ?

फेसबुक वर गेलं तरी हेच. इथे आलं तरी तेच. डोकं फिरायची पाळी येते राव. फेसबुक वर तर आपलं सर्कल चुकतंय का म्हणून पुन्हा नवे फ्रेण्डस जोडले तरी या किंवा त्या बाजूने तेच ते. काही दिवसांपूर्वी वेगळा वाद, तर आता तो वाद कधी झालाच नाही अशा अविर्भावात नवा वाद.

मागे बाबासाहेब पुरंदरेंची वाक्यंच्या वाक्यं फोटो बिटो काढून फिरत होती. त्याला उत्तर देणारेही तेव्हढ्याच हिरीरीने दा विन्सी कोडचे दाखले काय देत, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे दाखले देत. आता नेमकं उलटं झालेलं आहे.

मागच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एका भूमिकेवर रहावं. आमच्याही भावना दुखावतात किंवा नाही दुखावत असा स्टॅण्ड हवा. दुस-याच्या दुखावल्या की हर्षवायू आणि आपल्या दुखावल्या की मग आणखी काही असं कसं चालणार ? प्रत्येकाच्या भावना दुखावतात हे आपल्याकडे सत्य आहे. इतकंच काय इथल्या भांडणाने परदेशात जाऊन या सर्वांच्या पलिकडे जाऊ पाहणा-यांनाही त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. हे थांबवणं आपल्या हातात नाही हे आता स्विकारलं पाहीजे.

कुणी तरी आता मोठ्या मनाने पुढे आलं पाहीजे, या सिनेमाच्या निमित्ताने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याचाही विचार झाला पाहीजे. बायका नाचवल्या म्हणून आनंद नको. ती मजा म्हणून पाहण्यात कसला आलाय आनंद ? थोडं गिल्ट येतंच की. समोरच्याला दुखावणे याला जास्त प्रायोरिटी हे सध्या सोशल मीडीयावर प्राधान्यक्रमाने दिसतंय. स्पष्ट भूमिका घेणारे दोन दिवस कडू लागतात , पण नंतर तेच खरे वाटू लागतात.

दुसरीकडे आता जो वर्ग आक्षेप घेतोय तो सुशिक्षित असल्याने भन्साळी जो सिनेमा दाखवतोय तो इतिहास नाही याची जागृती त्याला करणे अशक्य नाही. मी जाईन तेव्हां "सिनेमा" पहायला जाईन. इतिहास नाही. भन्साळी ला इतिहास मांडायचा असता तर त्याने पुस्तक लिहीलं असतं. त्याला पीरीयड फिल्म त्यातून पोषाखी बनवण्यात इंटरेस्ट असतो. संबंध नसताना गुलाल वगैरे दिसणारच आहेत.

माझा पेशवेकालीन इतिहास अत्यंत कच्चा आहे. या सिनेमाने जराशी आउटलाईन कळेल. कदाचित वाचण्यासाठी वातावरणनिमिती बनेल. स्वामी वाचूनही अनेक वर्षं झालीत. इनामदारांच्या कादंब-याही आठवत नाहीत आता. पण मस्तानीबद्दल नवीन काही कळालं तर त्या संदर्भाने वाचनसाहीत्य शोधता येईल. ती फक्त बाजीरावाची अंगवस्त्र एव्हढंच नसून ती उत्तम योद्धा होती, घोडेस्वारी करायची, तिला तलवारबाजीचं शिक्षण मिळालेलं होतं असं काही काही वाचनात आलेलं. कितपत खरं ते माहीत नाही. पण हा सिनेमा वातावरणनिर्मिती करेल, बाजीराव महाराष्ट्राबाहेर ज्यांना फारसा माहीत नाही त्यांनाही जानून घ्यावंसं वाटेल असं नाही का वाटत ? जयपूरला राजघराण्यासमवेत या सिनेमाच्या गाण्याच्या अल्बमचं रीलीज झालं तेव्हां आख्खं जयपूर लोटलं होतं.

भन्साळीपुढेही व्यावसायिक गणितं असतील. पण एक गाणं वादग्रस्त वाटलं म्हणून थेट सिनेमा बॅन ? तुम्ही काढा ना सिनेमा हवा तसा. बरं असं काही मत व्यक्त केलं की त्याला उत्तरं कशी येतात ?

joshi.jpg

काय संबंध इथे ? असो.

खूपच मोठा प्रतिसाद झाला.
भावना दुखावल्या गेल्यास मनापासून क्षमा मागतो इथेच. मोठ्या मनाने क्षमा करावी.

आशुचँप, सेनापती +१.
नंदिनी +१
नाचवली इ. बोलण्याहून अधिक अपेक्षा पगारे यांच्या कडून नाहीत. सो चालुद्या.
बाकी, पिंग्याला कुठल्या स्टेप द्यायच्या हे संस्कृतीरक्षकांकडून शिकवायला लावायचे म्हणजे कठीण आहे भन्सालीचं. केला त्यांनी भांगडा, इट्स ओके. त्या काळच्या लोकांनी ती यवनी म्हणून अभक्षभक्षण / अपेयपान शनिवारवाड्यात होतं म्हणून कंड्या उठवल्याच ना? एक गाणं दाखवलं तेही पार्श्वभूमी अजून गुलदस्त्यात असताना इतका गोंधळ उडवणे आणि कादंबरीवर आधारित चित्रपटावर इतिहासावर घाला म्हणून उर बडवणे आणि हिंमत कशी झाली टाईप पोस्टी Sad
नसेल आवडत तर बघू नका, बेक्कार आहे म्हणून धागे काढा, कोर्टात जा... कायद्याने जे शक्य असेल ते ते करा, पण तो कृपया बंद पाडू नका.

पगारे, तुमच्या सगळ्या बीबीवरची तीच तीच पिरपिर्/भूणभूण बंद करा हो. वैताग आला त्याचा.

अरे पण असं कसं . त्यांच्या आयडीचा जन्म मुद्दाम याच कारणासाठी झाला असेल तर ?! Happy ते त्यांचं अवतारकार्य करताहेत .

काही लोकांनी खरोखरच नेहमीसारखाच ( तिथे घालण्याएवजी) इथे " पिंगा" घालायला सुरुवात केली तर.... Proud

<<मि सुध्दा हा चित्रपट बघणार आहे.भन्सालिने काशीबाईंना नाचायला तर लावलेच आहे अजुन पेशवाइचि कशी टर उडवतो ते बघायला जावेच लागेल.>>
------ विधान आवडले नाही...

भन्साळी हा काही इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करायला नाही चित्रपट काढत... चित्रपटात माल मसाला असायलाच हवा तरच तो भन्साळीचा चित्रपट.

<< मि सुध्दा हा चित्रपट बघणार आहे.भन्सालिने काशीबाईंना नाचायला तर लावलेच आहे अजुन पेशवाइचि कशी टर उडवतो ते बघायला जावेच लागेल. >>

अत्यंत निषेधार्थ पोस्ट!

सचिन पगारे हा आयडी गेली अनेक वर्षे सरळपणे अथवा आडवळणाने ब्राह्मणविरोधी लिखाण करत आहे. तसेच वरीलप्रमाणे पोस्ट टाकून शक्य तितक्या धाग्यांवरील चर्चेला जातीयवादी (ब्राह्मणविरोधी) स्वरुप देण्याचा प्रयत्न करत आलेला आहे.

ज्याप्रमाणे केवळ एका धाग्यावर ब्राह्मणांच्या बाजूने लिहीणार्‍या श्री. झक्कींचा आयडी उडवला गेला, त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षे सातत्याने ब्राह्मणविरोधी लिखाण करणार्‍या सचिन पगारेंचा आयडी उडवण्यात यावा, अशी मी अ‍ॅडमीनला नम्र विनंती करीत आहे.

अर्र झंपी, 'तिथे' आपल्याला भाव मिळत नाही म्हणून पोटदुखी वाटतं? नेहमी त्या जागेचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही ते?! Proud

मि सुध्दा हा चित्रपट बघणार आहे.भन्सालिने काशीबाईंना नाचायला तर लावलेच आहे अजुन पेशवाइचि कशी टर उडवतो ते बघायला जावेच लागेल.

>>

अर्रर्रर्र, सोल्लिड अपेक्षाभंग होईल ह्यांचा खी खी खी ....

पैशे देऊन पेशवाईचे पैशे बघायला चालले Wink खी खी खी!

उदय तुम्हाला नि विजय कुलकर्नि साहेबांना माझे विधान आक्षेपार्ह वाटले ही बाब मला विचार करण्याजोगी आहे.मात्र भन्सालिने काशिबाईंना नाचायला लावलय हे सत्य आहे त्याला पर्यायी भाषेत कसे लिहायला हवे होते हे जाणुन घेणे आवडेल.पेशवा हा ह्या प्रांताचा मुख्य होता जेव्हा भन्साली एतेहासिक सिनेमे काढतो तेव्हा त्याने सिनेअभिव्यक्तिच्या काहिही खपवणे चुकीचे आहे.माझ्या मते हे नाचाचे द्रुश्य हास्यास्पद आहे त्यामुळे संपुर्ण चित्रपटच हास्यास्पद होणार आहे.

नविन ट्रेलर रीलीझ झाले ...

घोडयावर फडकत चाललेला बाजीराव अन चिलखतात बसवलेली मस्तानी ...कडक!
त्यात घरातला मेलोड्रामा ... ... झ्याक!

आणि संस्कृतीरक्षकांना प्रचंड गोंधळ घालायला मिळेल अस बरच काही !! Wink

पार्टी तो हो गयी बावा Proud

बाहुबलीला मागे टाकेल आकड्यांमध्ये ... काही सीन्स मस्त आहेत!

२०० झाले!

२००+ प्रतिसादी धागे काढण्यात ऋन्मेऽऽष ह्यांचा हातखंडा अधिकाधिक वाढत चालला आहे. त्यांच्या सर्व धाग्यांवरील प्रतिसाद सचिन तेंडूलकरच्या धावांपेक्षा जास्त व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना Happy

पिंगा गाण्याचं शुटींग चालू होतं तेव्हा युनिटमधल्या मराठी लोकांनी, हे चुकीचं आहे असं सं लि भ ला सांगितलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं. ही न्यूज आत्ताच मी 'आय बी एन लोकमत' वर बघितली.

पिंगा या गाण्याबद्दल काही महीन्यापूर्वी रेमो डिसोझाची मुलाखत पाहण्यात आली होती. त्याने सांगितलं की दीपिका आणि प्रियंका यांनी वेगवेगळ्या नृत्यप्रकारांचं शिक्षण घेतलेलं आहे. कथक आणि भरत नाट्यम. त्यामुळं दोघींच्या वेगळ्या स्टेप्स आल्या असत्या. दोघींना सारखंच नृत्य करायला लावायचं तर मध्य काढावा असं सर्वानुमते ठरलं. त्यानुसार नृत्याच्या स्टेप्स ठरल्या. त्या वेळी अर्थात गाण्यावरून उद्भवलेला वाद नव्हता. अलिकडे त्याची मुलाखत पुन्हा घेतली गेली आहे. गुगळल्यास सापडू शकेल.

फेसबूक सभार

Champra Deshpande
5 hrs ·
नुसताच फक्त चाकोरीबद्ध विचार नको. एक साधे पहा – त्या दोघींना वाटले नसेल का कधी, की आपण नॄत्य करावे, आपल्यातल्या कलागुणांचा विकास करावा ? पण, नियमांनी जखडलेले होते आयुष्य त्यांचे. एकीचा तर पाय अधू होता. काय हे असले अधू पायाचे जगणे, असे वाटले नसेल तिला ? पण, त्यांना त्या नाराजीतून मुक्त व्हायला एकविसावे शतक यावे लागले ! त्यांच्यांत म्हणे सख्य नव्हतेच ! अहो, मरणांते वैराणी – मॄत्यूनंतर सर्व वैर, द्वेष नष्ट होतात ! एवढ्या उशिरा त्यांना उत्फुल्लपणे, आनंदाने पिंगा नॄत्याची संधी मिळाली ! त्यासाठी एका देवदूताला भन्साळीचे रूप घेऊन पॄथ्वीवर यावे लागले ! त्याने त्या दोघींच्याही आत्म्यांना आजच्या ब्यूटीफुल नॄत्यांगनांच्या देहांची कोंदणे दिली ! नॄत्यासाठी प्रचंड महाल आणि अनेक सख्या दिल्या ! आणि कोट्यवधी लोक आनंदाने बघतील असे गाणे दिले ! त्या दोघींचे आत्मे किती आनंदित झाले असतील ! कदाचित मुक्तही झाले असतील ! – असा करा ना विचार ! अशा जरा स्त्रीवादी म्हणा वा स्त्रीमुक्तीवादी म्हणा, दॄष्टीकॊणातूनही बघा ना !

--वेगळा आणि सकारात्मक विचार

अरे बापरे, कुठुन कुठे पोचलाय हा धागा. ते गाणे पाहिले तेव्हा ठळकपणे जाण्वले ते , त्या दोघींना नाचता येत नाही. तिथेच पहिली चूक झाली.

बाकी, भन्सालीचे सिनेमे कसे अस्तात हे माहित असल्याने इतिहास, कपडे वगैरे दुर्लक्ष करुनच पहाण्यात येतात. पहिले आवडले होते. साव. नाही पाहिला. हा पण पहायची इच्छा आहे

अन्य कोणत्या राज्यकर्त्यांच्या बाबत जर भन्साळ्याने उगाचच मनघडन काही दाखविले असते तर आत्ता जे अनेक लोक समर्थन करत आहेत (किंवा विरोध करत नाहीयेत) त्यांनी एवढ्या सरळपणाने घेतले असते का ?

Pages