'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.२ : ब्रह्मघोटाळ्याचे पराठे

Submitted by संयोजक on 14 September, 2015 - 01:00

लागणारा वेळ - १ तास

लागणारे घटक -

१) १०-१५ कोवळी तोंडली
२) एक कांदा
३) ७-८ लसूण पाकळ्या
४) २ हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)
५) १०-१२ काड्या कोथिंबीर
६) डावभर तेल
७) अर्धी वाटी डाळं
८) अर्धी वाटी शेंगदाणे
९) पाव वाटी तीळ
११)१ मोठा चमचा धणेपूड
१२) १ लहान चमचा हळद
१३) १ लहान / मोठा चमचा तिखटपूड
१४) १ मोठा चमचा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ
१५) २ मोठे चमचे गोडा मसाला/ किचन किंग मसाला किंवा रोजच्या भाजी-आमटीला वापरू तो कुठलाही मसाला
१६) अर्धी वाटी गूळ
१७) दीड मोठा चमचा मीठ
१८) कणीक (ह्याचं प्रमाण कृतीमध्ये येईल)
१९) पराठे भाजायला तेल
२०) ४ वाट्या पाणी

कृती -

१) चिराचिरी:
- तोंडली धुऊन, निथळून, एकाचे दोन (लांब) तुकडे करून बाजूला ठेवावी.
- कांदा, कोथिंबीर, मिरच्या हे घटक धुऊन बारीक चिरून घ्यावे.
- लसणाच्या पाकळ्या ठेचून बारीक चिराव्या.

२) मिक्सरमध्ये बारीक करणं -
- डाळं, शेंगदाणे (हे आधी खमंग भाजले असतील तर उत्तम), तीळ मायक्रोवेव्ह ओव्हनात १-२ मिनिटं हाय पॉवरवर भाजून, गार करून, ह्या सगळ्यांची मिक्सरमधून (एकत्र) बारीक भुकटी करून घ्यावी.

३) फोडणी -
- प्रेशरपॅनमध्ये तेल गरम करून, (वाटलं तर मोहरी - हिंग घालून,) चिरलेले सगळे घटक, मिक्सरमधून काढलेली भुकटी, मसाले, आमचूर पावडर / गूळ, मीठ घालावं. कुठलाही घटक वेगळा परतण्याची गरज नाही.
- कृतीसाठी लागणारे सगळे घटक आता प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं जास्त आचेवर परतून, त्यात ४ वाट्या पाणी गरम करून घालावं.
- व्यवस्थित ढवळून, झाकण लावून, कुकरच्या १-२ शिट्ट्या झाल्यावर आच बंद करावी.

४) पराठ्यांसाठी पिठाचा गोळा तयार करणं -
- प्रेशर पॅनची वाफ गेल्यावर भाजी थोडी गार होऊ द्यावी. भाजीला पातळ रस्सा तयार झालेला नसावा. कारण फार कणीक घालावी लागेल. साधारण घट्टं पिठल्याची कसिस्टन्सी असावी. रस्सा झालाच तर आटवून घ्यावा लागेल.
-पोटॅटो मॅशरनं तोंडली मोडून घ्यावी किंवा अख्खी भाजी सरळ एकदा मिक्सरमधून बारीक करावी.
-ह्या भाजीची एकदा चव घेऊन बघावी. त्यात आता कणीक घातली जाणार असल्यामुळे पराठ्यांना योग्य प्रमाणात होईल अशा अंदाजानं मीठ, तिखट वरून घालावं.
-भाजीत मावेल इतकी कणीक घालून पराठ्यांसाठी गोळा मळावा.

५) पराठे करणं -
- फार पातळ किंवा अतिजाड नसलेले, मध्यम जाडीचे पराठे लाटावे. अगदी सहज लाटले जातात.
-तवा व्यवस्थित गरम करून, त्यावर आधी पराठे दोन्ही बाजूंनी चांगले शेकून, त्यानंतर वरून तेल सोडून भाजावे.
-पराठ्यांचं वाण अगदी सर्वसामान्य तिखटमिठाच्या पराठ्यांसारखं दिसलं तरी चवीला वेगळे आणि छान लागतात.
-बराच वेळ भाजूनही पराठ्यांचं वाण कच्चं दिसतं. पण ते कच्चे नाहीत हे लक्षात घेऊन टोमॅटोच्या लोणच्याशी, दह्याशी गरमागरम खायला घ्यावे.

'ब्रह्मघोटाळ्याचे पराठे' ह्या शीर्षकामागची कहाणी सांगणं आवश्यक आहे.
तोंडली शिजायला वेळ लागतो. पण मसाल्याची तोंडलंभाजी वेळेअभावी लवकर शिजवणं भाग होतं. त्यामुळे प्रेशरकुक करायचं ठरलं. भाजीला लागणारे कृतीतले सगळे घटक प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं परतून, पाणी घालून प्रेशरकुक केले. प्रेशर निघाल्यावर झाकण उघडलं आणि... ब्रह्मघोटाळा!!! नेमकं का आणि कसं झालं माहिती नाही, पण सगळ्या घटकांचं शिजून एकजीव बदगं तयार झालं! जे काय कुकरात दिसत होतं ते चपातीशी खावसं वाटण्याच्या पलीकडलं होतं. तोंडल्यांच्या अस्तित्वाच्या थोड्या खुणा काय त्या बाकी होत्या. ते सगळं तसंच ठेवून दिलं. शिळा उपमा गिळला, कपभर चहा ढोसला. मग जरा तरतरी आली. Happy
एरवी उरल्यासुरल्या वरण-भाज्या-आमट्यांमध्ये वेळोवेळी कणीक घालून लाटलेले पराठे, थापलेली थालीपिठं आठवली. ह्या तोंडल्याच्या पिठलंसदृश बदग्याला पराठ्यांमध्ये सद्गती देण्याचं ठरवलं....
....घातलेल्या मसाल्यांमुळे आणि इतर घटकांमुळे पराठे नेहमीपेक्षा फारच चवदार आणि वेगळे लागले. तेव्हापासून बरेचदा हे पराठे ठरवून ह्या पद्धतीनं होऊ लागले.

Parathe-1-MBG2015.jpgParathe-4-MBG2015.jpg
बदलण्यासाठी घटक -

तोंडली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया, नंतर "माझाच अंदाज बरोबर होता" असा खोटा क्लेम करता येऊ नये म्हणून योग्य त्या जागी अंदाज व्यक्त करून मी माझ्याच परतीच्या वाटा बंद केल्यात. तुम्ही तिथे पोचलेल्या दिसताय की.

सुलेखा काकुंकडून तोंडल्याच्या भाजीचा गिचका होवू शकणार नाही. मुद्दाम करायचा असल्यास गोष्ट वेगळी. Happy
टॉमेटोच्या लोणच्याचा क्लु घेवून बघायला हवा. Wink

रीया हा घे क्लू ,
त्या खूपच डीटेल मध्ये लिवतात. गूळ आणि मायक्रोवेव खूपदा असतो वापरलेला. Happy

पण आता बदगं वगैरे माळवी गुजराती प्रभाव असलेले मराठी नाही वापरतात... सो मे नॉट बी हर. Happy

नाहितर गूळ चालणार्‍या वैदर्भीयची असू शकते. नाहितर सीकेपी आयडी कडून. Proud

ह. घ्या वैदर्भीय, सिकेपी आणि इतर....

असं फक्त १०-१५ तोंडल्यांची ४ कप पाणी घालून भाजी म्हणजे मला तर स्वप्नील जोशीचीच शंका येते. (कायच्याकै कामं करण्यात दुसरे कोण अव्वल आहे? ;)) मंडळाने थेट त्याच्याकडे साकडे घातले काय? Happy

तोंडलीचे पराठे मला इतके आवडलेले नाही. (हे उगाच कोणी न विचारता पिंक टाकली ) Proud
इतकं गिर्र शिजवून ... कसे लागत असणार?

इथे लैच व्हरायटी येणार आहेत, आगदी भेंडी, गवार पासुन ते रताळे, अर्वी सुरण असे काहिही घालाता येईल Happy

बदलायचा आजुन एक घटक हवा होता असे वाटते

कारल्याने काय घोडं मारलय मग? Wink १०-१५ कोवळी कारली नाहितर तब्येतील बरं म्हणून पडवळ. Proud

>>>बदलायचा आजुन एक घटक हवा होता असे वाटते<< +१

तोंडल्याचे पराठे.. भन्नाटच.

लाल तोंडल्यासारखे जिचे ओठ आहेत ती... बिंबाधरा !!!

आता पुढच्या रेसिपीत संयोजक आपल्याला चकवण्यासाठी भाषेची थोडी सरमिसळ करुन रेसिपी देणार बहुतेक ( आधीच्या दोन रेसिपीजनाही अशी गुगली टाकलेली असू शकते Proud )

फोटोमधल्या डिश, ट्रे टेबल क्लॉथ वरून लागेल का तपास.
घोटाळ्याचे कर्ते उघडकीस आलेच पैजेत Wink
( उगा टीपी करतेय हां , पाकृ मधे मी वाचन्मात्र Happy )

पराठ्यांच्या बाजूला क्रॅनबेरी चटणी सदृश पदार्थ दिसत आहे.

हे अमेरिकेतल्या कोणाचंतरी हस्तलाघव आहे. मृण्यमीच असणार ती.

कवे, अगदी हेच हेच्च माझ्या मनात आलेलं जेंव्हा मी टिनाची रेसीपी म्हणाले. पण संयोजकांनी मुद्दाम केलेले बदल असू शकतात की हे Wink

पराठ्याचं वाण, बदगं हे शब्द महाराष्ट्रात कुठे वापरले जातात हे माहित असेल तर रेसिपी कोणाची हे कळेल :). मी हे शब्द ऐकलेले नाहीत, पण माझा गेस सिंडी / सीमावर ;).

अग्गोबै ! त्या बिंबाधरा शब्दाचा अर्थ आज कळला.

गायन्याकवाले एका आजाराला स्ट्रॉबेरी अ‍ॅपिरन्स असा शब्दप्रयोग करतात.

ते चित्र पाहिलं तर लोक स्ट्रॉबेरी खायचं बंद करतील !

Dinesh is not a fan of dough rolling recipes as he stated numerous times. So he either go for thaapalele or otalele stuff. Can't be his recipe.

My guess - sanyojak has some kind of weird programme which produces weird recipes with weird ingredients Wink

हो दिनेश नसतीलच. पदार्थ बनवताना घोटाळा ...अन त्यातून 'ब्रह्मघोटाळा'. त्यामुळे माझा संशय मृण्मयी वर.

Pages