वैद्यकीय इच्छापत्र

Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 August, 2015 - 03:56

२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे. वैद्यकीय इच्छापत्रा आधारे इच्छामरणाला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी सहयोग ट्रस्ट काम करत आहे. आपण जर हे वैद्यकीय इच्छापत्र संमती व शक्य असल्यास त्यांचे कडे पाठवले तर जनहित याचिकेला जोडता येईल.
सहयोग ट्रस्ट
१, प्रथमेश सहकारी गृहरचना सोसा, प्रभात रोड गल्ली नं ५, पुणे ४११००४
फोन नं- ०२० २५४५९७७७
sahayogtrust.in
वैद्यकीय इच्छापत्र
माझे कुटुंबीय,माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे.

मी------------------------------------------------------------------------------------------------------------------
जन्मतारीख-.--------------------------------------------------- वय------------------------------------------------
माझा पत्ता-----------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१) मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल, आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन अशा अवस्थेत माझ्यावर केल्या जाणार्याच उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करुन माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे
२) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या, जगण्याचा अधिकार या संकल्पनेची, तसेच अविष्कार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मला पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणे व सन्मानाने मरणे या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
३) माझ्या आजारपणात मला जगवण्यासाठी जे उपचार केले जातील त्यासंबंधी स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधीतांसाठी पुढीलप्रमाणे लिहून ठेवत आहे.
अ) मी मरणाच्या दारात असेन ,किंवा गाढ बेशुद्धीत असेन, तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता काहीही उपचार करु नयेत, शरीराला सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करु नये.कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबनाचे ओझे इतरांवर टाकणे आणि जगत राहणे हे मला कीव करण्यासारखे आणि म्हणुनच घृणास्पद वाटते.
ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरु झाले असतील आणि तेही मला सन्मानाचे जिणे जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असे निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणुन हे उपचार ताबडतोब थांबवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत, किंवा बेशुद्धीतून मी बाहेर येण्याची ही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरित्या अन्नपाणी देउन जगवण्याचा खटाटोप करु नये. मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे की,मला अशा परिस्थितीत कृत्रिम रित्या जिवंत ठेवण्याचे सारे उपचार मी नाकारु इच्छितो/ इच्छिते.
ड) मला माहित आहे की,मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल; पण मला ठामपणे म्हणायचे आहे की, याबाबत कायदा असे स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणुस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचे ऐकावे.म्हणुनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणार्या सर्वांना माझी पुन:पुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा.
४) माझ्यावर प्रेम करणार्यान, माझ्याविषयी आस्था बाळगणार्‍या सार्‍यांसाठी या इच्छापत्रातून सांगू पहात आहे की, ज्यावेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखा स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्यावेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्यावेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत मी नसेन, म्हणुनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलिकडे तुम्हाला काही विचार करुन निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणे आणि तसेच सन्मानाने मरणे या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र मी कुणाच्या दबावाखाली नव्हे तर स्वत:च राजीखुषीने करत आहे.
मी-------------------------------------------------------------------------------------------
खाली साक्षीदारांसमक्ष दि. ------------------------------रोजी वैद्यकीय इच्छापत्रावर माझी सही करत आहे.
----------------
सही
साक्षीदार १)---------------------------------------------------------- सही----------------------------------
साक्षीदार २)---------------------------------------------------------- सही----------------------------------
साक्षीदार ३)---------------------------------------------------------- सही----------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देहदान नेत्रदान अवयवदान हे कायदेशीर आहेत. इच्छामरण तसे नाही.म्हणुन स्वतंत्र घेतले आहे. परिसंवादात अवयवदान हाही विषय होता.

इच्छा मरण कायदेशीर असावे. हालअपेष्टा रुग्णांचे तर होतात त्याच बरोबर घरच्यांचे जास्त होतात.

प्रकाश, अवयवदानासंबंधी जी चर्चा झाली असेल, त्याबद्दलही लिहा ना इथे. अजूनही या विषयावर म्हणावे तसे लोकमत तयार झालेले नाही.

डॉ कयानुश कडपट्टी या पुण्यातील जहांगीर हॉस्पीटल मधील हृदयदान केस मधील प्रत्यक्ष सहभागी डॉक्टर व्यक्ति होत्या. पंचेचाळीसीतील एक स्त्री घरात डोक्यावर पडली व नंतर तिचे ब्रेन डेड झाले. तिचा पती व मुलगी यांनी घेतलेला पुढाकार, प्रत्यक्ष त्या स्त्रीने केलेले कॅडेव्हर अवयवदान या विषयी बोलल्या. नातेवाईकांना अवयवदान पचनी पडत नव्हते पण स्त्रीचा पती व मुलगी आपले दु:ख बाजूला ठेवून शेवटी ठाम राहिल्या. त्यांची ही घालमेल झाली होती.
गेल्या एक दीड वर्षात अवयवदान जागृती वाढली आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

चांगली माहिती. पण खरोखर किती लोक तयार होतील आणी घरचे किती सहकार्य करतील यावर काही गोष्टी अवलंबून असतील असे वाटते. घरचे लोक सहजासहजी तयार होणार नाहीत.

माझ्या मोठ्या भावाचे नेत्रदान झाले. वहिनी आणि पुतण्याने त्या दिवशी अगदी ठामपणे हा निर्णय घेतला.
पण तरीही अजून म्हणावे तसे लोकमत नाहीच असे वाटते. कदाचित या बाबतीत धार्मिक मतांचा पगडा असेल.
एकीकडे शरीर म्हणजे जीर्ण वस्त्र असे म्हणायचे आणि मग त्यावर रीतसर अंतिम संस्कार करायचा आग्रह धरायचा.
देहदान हेही अंतिम संस्काराइतकेच पवित्र आहे, हा समज रुजायला हवा.

अवयवदानासाठी ........

http://www.ztccpune.com/

ZTCC, pune
489 Rasta Peth,
Sardar Moodliar Road,
Pune - 411011
Phone (020)-12345678
Fax (020) - 6789012

या वेबसाईट वर मान्यताप्राप्त हॉस्पिटल्सची यादी पण आहे.

अवयवदानासाठी मायबोलीवर धागा आहे का? नसल्यास खरेच हवा. ज्यांनी केले आहे त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी. ज्यांना करायचे आहे त्यांना मार्गदर्शनासाठी.

देहदान हेही अंतिम संस्काराइतकेच पवित्र आहे, हा समज रुजायला हवा.>>> दा , व्वा...काय सुंदर विचार आहे.

अंतरंगी अवयवदाना संदर्भात मायबोलीवर धागा आहे
अवयव दाना संबंधी - काही माहिती
http://www.maayboli.com/node/38727

फिरुनी नवी जन्मेन मी!!! (अर्थात महत्व अवयव प्रत्यारोपणाचे!)
http://www.maayboli.com/node/23686

हे इच्छापत्र बहुतेक तरी न्यायसंस्था वॅलिड ठरवणार नाहीत.
जैनांचे संथारा व्रत बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय राजस्थान हायकोर्टाने दिला आहे.
त्या विरुद्धं अपिल करणार्‍या जैनांचे म्हणणे हे व्रत आरोग्यदृष्ट्या शेवटच्या स्थितीला आलेला मनुष्यच असतो.
तरिही हे अर्ग्युमेंट कोर्टाने व्हॅलिड धरले नाही.

कायदा नसला तरी विशिष्ठ परिस्थितीत हे प्रॅक्टीस मधे आहे. पण हे दयामरण प्रकरण डॉक्टरवर शेकू शकते.
डॉ प्रयागांनी एक किस्सा सांगितला. एका प्रतिथयश वयोवृद्ध व्यक्ती बाबत मल्टिपल फेल्युअर ची केस होती. मुलगा व पत्नी यांनी दयामरणाबाबत अनुकुलता दाखवली. त्याबाबत त्यांनी तसे लिहून दिले. शेवटी आता लाईफ सपोर्ट सिस्टिम काढायचे ठरवले. तेवढ्यात फिल्मि स्टाईल एक मुलगी हॉस्पिटल मधे आली व तिने कुणाच्या आदेशाने हे करता? मी तुमच्यावर कोर्टात केस करीन वगैरे भाषा केली. ती रुग्णाची मुलगी होती. तिला आई व भावाने विश्वासात घेतले नव्हते. मग हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर काही दिवसानी ती शांत झाली व परिस्थिती पाहून तिनेही अनुकुलता दर्शवली.

घाटपांडे , आम्हालाही हे नेहमी करावेच लागते.
पण इथे निर्णय घेणारे रूग्णाचे नातेवाईक असतात.
म्हणजे सध्यातरी कायद्याच्या चौकटीत प्रॅक्टीस करताना एखाद्या रूग्णाने असे लिहून दिलेले अ‍ॅफॅडविट कुणी दाखविले तरी रूग्णाचे जवळचे आणि कायदेशीर नातेवाईक जोपर्यंत DNR किंवा डू नॉट रिसटीटेट अशी विनंती करत नाहीत तोपर्यंत आम्हाला हे करता येणार नाही.
जोपर्यंत नातेवाईकांमध्ये हा निर्णय अमलात आणण्याबाबत एकवाक्यता होत नाही तोपर्यंत हा निर्णय आम्ही अंमलात आणू शकत नाही.

मरणाच्या दारात याच्या संकल्पनाही दिवसेंदिवस बदलत आहेत.
केवळ ब्रेन डेड पेशंटचाच लाईफ सपोर्ट काढू शकतो.
पूर्वी हृदयाचा इजेकहन फ्रॅक्शन १०-१५ पेक्षा कमी असेल तर माणसाला वाचविण्यात काही अर्थ नाही असे म्हणायचे .
आज हार्ट ट्रान्सप्लाण्ट करता येतंय.
उद्या कदाचित ब्रेन ट्रान्सप्लाण्ट किंवा ब्रेन अ‍ॅक्टीवेशन करता येईल.

मध्यप्रदेशात अ‍ॅक्सिडेंटनंतर डेड डिक्लेअर करून मॉर्चूरीत ठेवलेला आणि नंतर अचानक जीवंत सापडलेला एक ट्रक ड्रायवर आमचा पेशंट आहे. बर्‍याच प्रयत्नांनी त्याच्या नातेवाईकांनी त्याला इथे आणल्यावर आम्ही त्याचा हिमोथोरॅक्स ड्रेन केला होता.
तो नंतर चालत घरी गेला.

त्यामुळे 'मरणाच्या दारात' इ. व्हेग टर्म्सना माझ्यामते काही अर्थ नाही.

(पण याबरोबर हे ही इतकेच खरे की मी वरच्या मसुद्यातील भावनेशी पूर्ण सहमत आहे. माझ्या हयातीत या प्रकाराला निसंदिग्ध शब्दांत शब्दांकीत करून कायदेशीर मान्यता मिळाली तर मी असे अ‍ॅफेडविट नक्कीच करेन. मी पूर्वीच माझ्यावर कुठल्या चांचण्या आणि उपचार करू नये याची लिस्ट नवर्‍याकडे देवून ठेवलेली आहे.)

या विषयावर "जगायचीही सक्ती आहे" हे मंगला आठलेकर यांचे पुस्तक या विषयावरच आहे. अत्यंत उत्तम पुस्तक आहे.
http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=537076155293328...

थोडं अवांतर :

या अर्थाचं मी मागेही लिहिलं आहे. पुन्हा एकदा.

अमुक पुस्तक वाचा, म्हणजे तुमचे उद्बोधन होईल, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील इ. प्रकारच्या पोस्टी मला का कोणजाणो इरिटेट होतात.

इथे त्या पुस्तकातून तुम्हाला काय समजलं ते लिहिलं तर बरं होईल. किंवा त्या पुस्तकात अमुक म्हटलेलं आहे, अन त्यामुळे माझं हे मत आहे, असे लिहिलेले वाचायला जास्त आवडेल. "ते" पुस्तकच वाचायचं असेल, तर इथली चर्चा कशाला वाचू मी? अमुक पुस्तकाची जाहिरात करण्यासाठी धागा आहे का?

जी काय चर्चा सुरू आहे, ती सध्याच्या कामातून वेळ काढून वाचणे सुरू असते. त्यातून अधिक वेळ काढून पुन्हा ते पुस्तक मिळवून मग वाचण्याइतका रिकामा वेळ हाताशी असतोच असे नाही. त्यानंतरही ज्या वेळी ते पुस्तक हाती पडेल, त्या क्षणी या चर्चेचा रिलेव्हन्स तितकाच असेल, असे नाही, त्याचप्रमाणे रेकमेंड केलेले पुस्तक छानच असेल असेही नाही.

आपण केलेल्या विधानांना संदर्भ म्हणून एकादे पुस्तक सांगितले तर ते सांयुक्तिक वाटते. पण उगंच, "अमुक पुस्तक वाचा."

नाय बा. नाय जमत वाचाया.

अहो दीड मायबोलीकर ज्यांना वाचणे शक्य आहे, वाचायची इच्छा आहे त्यांच्या साठी आहे. बाकीचे वाचणार नाहीत हे गृहीत आहे.पण ज्यांना इच्छा असून वाचणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी परिचय लिहायला हवा. प्रयत्न करीन. तो पर्यंत प्रिव्ह्यूवर भागवून घ्या!

साती मरणाच्या दारात ह्या विषयावर तरुण माणसासाठी सहमत.

पण जर सत्तरीमध्ये cancer सारखा, ८० मध्ये हृदयाचा आजार किंवा नव्वदीमध्ये साधा जरी आजार झाला तर केवळ जगवण्यासाठी महिनोमहिने रुग्णालयात उपचार चालु असेल तर त्या माणासाचा येवढे कष्ट घेउन जगण्याचा अर्थ राहात नाही.

जरी मरणाच्या दारात याची definition करता येत नसेल तरी परिस्ठिती नुसार कोण मरणाच्या दारात आहे हे ठरऊ शकतो.

आमच्या घरी पुर्वी जेंव्हा वय झाले असेल, उठता-बसता येत नसेल की लगेच संलेखना (संथाराचा मराठी/कानडी शब्द) घेत असत. हल्ली जर वय झालेल्या माणसाची जर जगण्याची १% पेक्षा कमी शक्यता असल्यास त्या व्यक्तीला रुग्णालयातुन घरी परत आणुन त्याची शांतपणे सुटका करण्याचा प्रयन्त असतो. त्यासाठी जवळचे नातेवाई़क समाजाची मदत घेतात. कायदाची पुर्तता होत आहे की नाही ते पण तपासुन घेण्यात येते. .

साहिल,
'एक' माणूस जगवण्याचा प्रयत्न करणे, यापाठी 'माणूस' जगवण्याचा प्रयत्न करणे ही एक कन्सेप्ट असते.
तो कितीही म्हातारा असो.
कितीही असाध्य रोगी असो.
आमच्यासाठी तो 'फाउंटन ऑफ यूथ'चा शोध असतो.

मृत्यूशिवाय जीवन अपूर्ण आहे, निरर्थक आहे. मृत्यूच नसेल, माणसाला मृत्यूचे भय नसेल, तर अनेकानेक इच्छा आकांक्षांना अर्थच उरत नाही.

त्याच वेळी, मृत्यूचे भय वा मृत्यूची कल्पनाही लहानग्यांना वा तरुणांच्या मनात नसते. ती उत्पन्नही होऊ नये याचप्रकारे मानवी मानस व मेंदुतील संप्रेरके काम करीत असतात.

या अशा मनोघडणीमुळे, उत्क्रांतीच्या, प्रगतीच्या अनेक पायर्‍या चढणे मानवास शक्य झाले आहे. एका वयानंतर काँझर्वेटिव्ह अन त्यानंतर, मृत्यूचीच आराधना असे हळूहळू मानवी मनाचे स्थित्यंतर होत असते.

तरीही, एकंदर विचार करता, अन वैद्यकाची प्रगती पाहता, मृत्यूवर, किंबहुना वार्धक्यावर विजय मिळवण्याचे, प्रयत्न सुरूच आहेत. जॉईंट्स, किडन्या, नेत्रभिंगे, त्वचा, हृदयाच्या झडपा बदलतानाच, हृदयही..एकेक अवयव आम्ही एकतर कलम करीत आहोत, किंवा कृत्रीम आरोपण तरी.

मला तरी वाटते, अल्टीमेट वाटचाल ही इच्छामरणाकडेच असावी. मला तरी, शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या मन, व शरीरावर संपूर्ण ताबा असलेल्या स्थितीत जगायला, अन ज्याक्षणी जगण्याची धुंदी उपभोगून झाली, त्याक्षणी भीष्मासारखे, इच्छेने मरण पत्करायला आवडेल.

या परिस्थितीकडे वाटचाल करायची, तर हजारो मरणोन्मुखांना वाचवण्याचा प्रयत्न करताकरताच एकेक तंतू सापडत, आयुष्याची दोरी बळकट करायचा मार्ग स्पष्ट होत जातो. त्यासाठीच आम्ही यत्नशील असतो.

तेव्हा डीएनआर, उर्फ डू नॉट रिससायटेट, इच्छामरण, संथारा इ. हे जरी विचारार्ह व काही प्रकारच्या मनोभूमीकेतून स्वीकारार्ह असले, तरीही आजही चौफेर विचार करायची क्षमता असल्याचे सिद्ध करणार्‍या कोर्टाच्या परिप्रेक्ष्यातून पाहू जाता, त्यावरील बंदी मला तरी शंभर टक्के योग्य वाटते.

"माणूस" जगवण्याचा शक्य तितका प्रयत्न केलाच गेला पाहिजे...

कुणास ठाउक त्या कोमॅटोज बंद डोळ्यांआड अजून थोडे दिवस जगण्याची इच्छा शिल्लक असेलही?

त्याचसाठी नंतर दर्भाचे कावळे, अन "तुझ्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करीन"वाली वचनं दिली जातात ना? Wink

साहिल शहा, मी वर दिलेल्या लिंकमध्ये या संलेखनाबद्दलच बातमी आहे.
राजस्थान हायकोर्टाने त्याच्या विरुद्ध निकाल दिल्याने परवाच गुलबर्ग्यात जैन साधूंनी अजिटेशन केले होते.

इथे लिहिणार नव्हते पण लिहितेच्

मागील महिन्यात माझ्या 80 हुन अधिक वय असलेल्या आजीच निधन झाल. त्याआधी चार पाच वर्षाहुन ती आजारी होती . नंतरच्या दोन वर्षात ती संपूर्णपणे बेड रिडन होती. मुख्य कारण मधुमेह आणि नंतर नंतर विकलांग होत गेलेली गात्रे .या दोन वर्षात तिला प्रचंड त्रास झाला . स्मरणशक्ती नाहीशी झाली. ( एक दोनदा मलाच कोण ग मूली तू अस विचारणा केलेली. पूर्ण बालपण जिच्या सानिद्ध्यात गेल तिच्याकडून हे उद्गार आले तेव्हा गलबलुन आल Sad ) अन्नग्रहण जवळपास बंद. फक्त पातळ पदार्थ . हळूहळू सर्व सेनसेंस बंद होत गेलेले. श्वास आहे म्हणून जिवंत आहे अशी स्थिती.
डॉक्टरांनीही हॉस्पिटलमध्ये admit करून घेण्यास नकार दिलेला . जेवढे दिवस आहेत तेवढे घरीच त्यांना राहू द्यात स्पष्ट शब्दात सांगितलेल. अश्या स्थितीत तीच नर्सिंग करताना , अन्न भरवताना तिला होणारा त्रास पाहून खिंन्न वाटायच. माझी कधी कधी तिला होणारा त्रास पाहून तिच्याकडे पाहायची हिंमत झाली नव्हती . अश्यावेळी हे इच्छा मरणाचे विचार मनात यायचे. समोर परिस्थिती दिसत असताना तिला जगवायची धड़पड़ करून का तिला त्रास अजून देतोय असही वाटायच् .
शेवटी नैसर्गिकरित्या शरीर थकल्याने तीच निधन झाल .

आज या क्षणी मनाला कुठेतरी दिलासा आहे की आम्ही तिला वाचवण्याची पूर्णपणे धडपड केली. तिला होणारा त्रास बघवत नव्हततरीही जे जे शक्य होते ते केले. कारण एकच - कधी ना कधी ती बरी होईल थोड़ा तरी प्रतिसाद देईल अशी असलेली आशा . जे होण अशक्य आहे याची कल्पना होती तरीही आशा सोडलेली नव्हती .

यामुळेच इच्छा मरणाच्या बाजूला असलेला कौल आता कलला गेलाय. कितीही बिकट परिस्थिती असली तरीही जवळच्या व्यक्ति बाबतीत आता ही कन्सेंट निदान माझ्याकडून दिली जाणार नाही. माझ्या स्वताच्या बाबतीत मात्र निर्णय वेगळा राहील. विकलांग परिस्थितितल्या जीवनापेक्षा सुखांताला माझी पसन्ति असेल

कितीही बिकट परिस्थिती असली तरीही जवळच्या व्यक्ति बाबतीत आता ही कन्सेंट निदान माझ्याकडून दिली जाणार नाही. माझ्या स्वताच्या बाबतीत मात्र निर्णय वेगळा राहील>>>>>>> +१

"माणूस" जगवण्याचा शक्य तितका प्रयत्न केलाच गेला पाहिजे...>>>> पूर्णपणे सहमत .

वरची पोस्ट दीड मायबोलीकरांच्या 29
August, 2015 - 23:22 या पोस्टिमुळे लिहाविशी वाटली .

दीड मायबोलीकर म्हणजे डॉ इब्लिस का ? ती पोस्ट फार सुरेख लिहिली आहेत

>>कितीही बिकट परिस्थिती असली तरीही जवळच्या व्यक्ति बाबतीत आता ही कन्सेंट निदान माझ्याकडून दिली जाणार नाही. माझ्या स्वताच्या बाबतीत मात्र निर्णय वेगळा राहील<<

हे वाक्य थोडं सेल्फिश आणि पोलिटिकली करेक्ट नाहि वाटत? दुसरा मरणासन्न यातना भोगत असताना किंवा वेजिटेटिव स्टेटमध्ये असताना केवळ त्याची लिविंग विल नाहि म्हणुन, त्याची पुढे जगण्याची शक्यता नसतानाहि जिवंत ठेवायचं, तो बिचारा माझी यातुन सुटका करा असं सांगु शकत नाहि म्हणुन?

थोडक्यात, स्वत:ला भीष्म व्हायचंय, दुसरे अश्वत्थामा झालेतरी हरकत नाहि...

हे वाक्य थोडं सेल्फिश आणि पोलिटिकली करेक्ट नाहि वाटत? >>> नाही राज , दिमानी लिहिल्याप्रमाणे नंतर इच्छा पूर्ण करीन वगैरेच्या गोष्टी करणय्यापेक्षा त्या व्यक्तीला जगवण्याला प्राधान्य देईन . कोणास ठाऊक त्या व्यक्तिचिही तीच इच्छा असली तर

राहता राहिला प्रश्न भीष्म बनण्याचा तर तो भीष्म बनण्याचा निर्णय आधीच घेतलेला असेल . आणि तो स्वतचा निर्णय असेल

ज्या व्यक्तिने भीष्म बनयाची इच्छा व्यक्त देखील केली नाही तिच्याबाबतीत कन्सेट दिली जाणार नाही

Pages