रात्री नऊ वाजता बस सुटली आणि मी सुटकेचा मोठा नि:श्वास टाकला. 'जय भवानी', 'जय शिवाजी' च्या जयघोषात कुणाला तो ऐकू गेला नसावा, पण वेळच तशी होती. ह्या बसवर आणि त्यापेक्षाही त्या बसच्या उतारूंवर गेल्या काही दिवसांत इतके प्रसंग ओढवले होते (कुणी खोडसाळ म्हणेल की 'ओढवून' घेतले होते.) की आता हा प्रवास सुरु होऊन आम्ही इप्सित स्थळी पोहोचणे हाच मुळी बोनस होता. दोनच दिवसांपूर्वी आम्ही हृषीकेशला गंगेचे रौद्र रूप भयचकित होऊन पाहिले होते. नदीचे शांत, प्रेमळ रूप मी ह्याआधी अनेकदा पाहिलेले आहे, परंतु कालीमातेचा हा संचार मी प्रथमच पाहत होतो. देवभूमी उत्तराखंडवर देवांची अवकृपा झाली होती. वादळी वार्यांनी आणि पावसाने अवघ्या प्रदेशात प्रलय मांडला होता. लाखो लोक जागच्या जागी अडकले होते, तर शेकडो लोक प्राण गमावून बसले होते. आमचा ट्रेक रूपकुंडला होणार होता. पण तेथे आम्ही पोहोचूच शकत नव्हतो. हृषीकेशला पोहोचायलाच आम्हाला अकल्पित वेळ लागलेला होता. आमच्या आधी बेस कॅम्पला गेलेले लोक तेथेच अडकून पडल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. अशा परिस्थितीत आम्ही येथून सटकून मनाली जवळ धानाकुनु येथे ट्रेक करू असे म्हणून हा बसचा सोळा तासांचा प्रवास करायला निघालो होतो.
हृषीकेश सोडल्यावर पावसाने आमचा पिच्छा सोडला होता. सकाळचा प्रवास मोठ्या झोकात झाला. सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या, dumb charades वगैरे चालू करून धमाल उडवून दिली. हिमाचल प्रदेश दिसायला फार टुमदार. छोटीछोटी खेडी सकाळच्या स्वच्छ उन्हात लोभसवाणी दिसत होती. पण नाश्ता वगैरे झाल्यावर सूर्य जसजसा वर चढायला लागला तसा उन्हाचा कडाका जाणवायला लागला. त्यातून आमचे ड्रायव्हर 'रामदेवबाबा' ह्यांनी गाडी कच्च्या रस्त्यावर चढवली. ह्यांना हे नाव उगाच पडले नव्हते. ह्या वल्लीचा फुलटाईम जॉब बहुधा हिमालयात एका पायावर तपस्या करण्याचा असावा. कंटाळा आला म्हणून ते ह्या क्षेत्रात पडले असावेत. बाबाजींच्या जटा ५-६ वर्षे तरी अजलस्पर्शा असाव्यात. बाबाजींच्या शरीरयष्टीकडे पाहून ह्यांना कुठलीतरी सिद्धी प्राप्त असल्याशिवाय हे पन्नास जणांची गाडी चालवू शकत नाहीत असेच वाटत होते. (एवढे म्हटले खरे, पण प्रत्यक्षात त्यांनी गाडी चालवली बरीच छान हे मान्य करायला हवे.)
मला ज्या गोष्टी कळत नाहीत, त्यांमध्ये अजिबात लक्ष न घालायचा माझा इरादा असतो. त्यामुळे बाबाजींनी कच्च्या रस्त्यावर गाडी का चढवली? ह्या प्रश्नाचा मनात फार उहापोह न करता मी चुपचाप बसून होतो. कदाचित बाबाजी रॅली ड्रायव्हर देखील असतील अशी स्वतःची समजूत घातली. दोन-तीन तासांचा प्रवास होऊन एव्हाना दुपारचे तीन वाजले असावेत. मनालीला पोहोचायला रात्री १० वाजतील अशी काहीतरी गणिते मनाशी जमवत होतो. तेवढ्यात 'म्हैस म्हैस म्हैस' असा जरी नाही, तरी 'धाड' असा एक आवाज झाला, आणि त्यानंतर छोटेछोटे आवाज यायला लागले. गाडी थांबवून पाहिल्यावर गाडीची डि़झेल टाकी चॅसिसपासून निसटून खाली पडली हे शुभवर्तमान कळाले आणि माझ्या गणिताचे बारा वाजले. ('ह्यांना मेलं ह्यांच्या गणिताचंच एक पडलेलं' - गाडीतले बरेचसे आवाज)
खरे तर ह्या प्रकारावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा. तूर्तास एवढेच सांगतो, की बर्याच गोष्टी घडून आम्ही तेथे जवळच जेवण केले आणि तब्बल सहा तासांनी नऊ वाजता टाकी पुन्हा बसवून मार्गस्थ झालो. ह्यानंतरचा सर्वच रस्ता घाटाचा होता. जेवणे उरकली असल्याने बरेच लोक झोपेच्या अधीन झाले. मी दिवसभर झोप काढून घेतली असल्याने मी जागाच होतो.
रात्रीची वेळ माझ्या खास आवडीची. (हा लेख सुद्धा रात्रीच लिहितोय.) दिवसातली सगळी लगबग थंडावली, की मला जास्त जोम चढायला लागतो. एक तर रात्री घरातले बाकीचे झोपलेले असतात, त्यामुळे तुम्ही कोणाच्या वाटेत लुडबुडण्याचा धोका नसतो. रात्री बाहेर जाऊन कोणतीही कामे करता येत नसल्याने एका जागी बसायला कोणाचीच आडकाठी नसते. बाहेरचे आणि घरातले आवाज बंद होतात. अशा शांत वेळी विचारांशी वेगवेगळ्या तर्हेने खेळता येते. कधी त्यांना नुसते वार्यावर लहरत ठेवता येते, तर कधी माजलेल्या घोड्यासारखे अनिर्बंध उधळून देता येते. कधी एखादे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून त्यावर वेगवेगळ्या दिशेने बाण मारता येतात. कधी कधी धरतीच्या पोटातून खडक फोडून पाणी उचंबळत असावे तशी एखादी कविता बाहेर येते, तर कधी विंदांच्या कवितेच्या ओळी मनात घोळवत असताना एखादी ओळ हळूचकन मनात येऊन बसते. कधीकधी रात्रीच्या वेळी जुन्या आठवणी येऊन पिंगा घालायला लागतात. कधीतरी भेटलेली माणसे, कधीतरी वाचलेले पुस्तक, कधीतरी ऐकलेला तो दिव्य स्वर ... आयुष्यात गोळा केलेले संचित असे मधून मधून आठवायला बरे वाटते. नुसतेच स्मरणाच्या कप्प्यात जडजवाहिर ठेवून उपयोग नाही. मधून मधून त्यावरची धूळ झटकली की स्वतःलाच ताजेतवाने व्हायला होते.
ह्यातले बरेचसे प्रवासात सुद्धा लागू होते. एक तर अंधार झाला, की डोळ्यांकडून मेंदूकडे वाहणारा माहितीचा मोठा प्रवाह कमी करता येतो. तेवढीच जरा विश्रांती. त्यातून प्रवासात झोप येईलच याचा काही भरवसा नाही. झोप येत नसली की बराच मोकळा वेळ मिळतो. माझ्या तारूण्यपदार्पणाच्या काळात मी वेगवेगळ्या बसेसमधे असा बराच वेळ माणसे, इतिहास, धर्म, विज्ञान, तत्वज्ञान अशा बर्याच काहीशा पराभौतिकीय गोष्टींवर विचार करण्यात घालवला आहे. दिवसाच्या प्रवासात बाहेर बघण्यात मग्न असलेली दृष्टी थोडीशी आत वळवली, की मनाचे बरेच कंगोरे जाणवतात.
ह्याही प्रवासात असेच काहीसे होत होते. ट्रक्सची ये-जा मोठी जोरदार चालू होती. दिल्ली-मनाली रस्त्यावर चंदीगढनंतर अखंड घाट आहे. सुरवातीला त्याचे रूप इतके भयाकारी नाही परंतु ' हा हिमालय आहे, होशियार रहो! ' अशी जाणीव मात्र नक्की झाली. माझे हे पहिलेच हिमाचलदर्शन. त्यामुळे मी बराच उत्सुक होतो. भारताची उत्तर सीमा राखणारा नगाधिराज हिमाचल! सावरकरांसारखी माझी प्रतिभा शीघ्रोत्तुंग नाही, त्यामुळे ' ते पहा भारत! नीलसिंधुजलधौतचरणतल! ' असे काहीसे उद्गार मी काढले नसले तरी भावना तीच होती. दुपारपासूनच घाट चालू झाला होता, तरी त्याचे रूप रात्री फुलून आले. कधीकधी दिसणार्या गोष्टींपेक्षा न दिसणार्या गोष्टींचा भासच जास्त सुंदर वाटतो. त्यात आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. क्लिओपात्रा खरोखर किती सुंदर होती कुणास ठाऊक, पण शेक्सपिअरने तिचे रूपगर्वितेचे रंगवलेले पात्रच जास्त मोहक वाटते. माणसाला जगण्यासाठी स्वप्ने हवी असतात. सगळ्याच स्वप्नांची पूर्ती झाली तर जगण्याची मजा कमी होईल असेही म्हणता येईल.
अंधारात मला शिखरांच्या सीमारेषा फक्त दिसत होत्या, परंतु ती किती दुर्गम असतील, त्यांची उंची किती असेल, थंडी कशी वाढत जाईल अशा विचारांनी मन उत्साहित होत होते. एवढेच नव्हे, तर जसजशी रात्र होत गेली, तसतसा रस्ताही अरुंद होत गेला. त्यामुळे सगळ्याच भावनांवर थोडासा भीतीचा मुलामा चढला. एखाद्या स्वप्नातले असावे असे ते दृश्य ... दोन डोंगररांगांमधील दरीतून बियास नदी खळाळत वाहते आहे, आणि एका डोंगररांगेला चिकटून कमालीची नागमोडी वळणे घेत वर चढत असलेला, मधेच खाली उतरत असलेला रस्ता ... वर आकाशात मधेच चंद्रकोर दिसते, तर कधी डोंगरामागे लपते. खानोलकरांच्या एखाद्या कथेतील स्वयंभू अंधार जणू जिवंत होऊन अवतरलेला. तंबोर्याचा स्वयंभू गंधार तसा हा स्वयंभू अंधार. नाना रूपे घेऊन आलेला काळोख. कुठे सरड्यासारखा डोंगराला चिकटलेला, तर कुठे कड्यावरून थेंब थेंब गळत असलेला थबथबणारा. झाडाखालचा गोठलेला नाहीतर एखाद्या दिव्याला चारी बाजूंनी घेरून टाकलेला काळोख. वातावरणात तरंगत असलेला प्रवाही काळोख. आपल्या जाणीवा अत्यंत प्रखर बनवून टाकणारा. प्रत्येक आवाज, प्रत्येक स्पर्श अंधारात मोठाच वाटतो. शृंगारासाठी म्हणूनच थोडी अंधाराची आवश्यकता असावी. अशाच एका कैलास पर्वतावर शिव-पार्वतीचा शृंगार होत असावा. हे जोडपे तर प्रेमाच्या प्रखरतेची कहाणी. भणंग अशा शिवाला राजकन्या पार्वतीने वरले. त्याला मिळवण्यासाठी कंदमुळे खाऊन कठोर तपश्चर्या केली. भूतनाथाचा सहवास मिळवण्यासाठी तसल्याच कणखरतेची आवश्यकता असते. मऊ मखमलीत वाढलेल्यांना तो सहवास तात्पुरता मानवतो. वेगळेच काही असल्याने त्याची ओढही वाटते. परंतु कायमची त्या जंगलातून वाटचाल करायची हे फक्त पार्वतीला मानवू शकते. शिव म्हणजेच पवित्र. ह्या पवित्र प्रेमाच्या जाणिवेने शहारा आला. कदाचित शिवाचे समस्त गण या दर्यांमध्ये पहारा देत असतील ... छे! ह्या अ़ंधारामुळे वेडावल्यासारखी अवस्था झाली. त्यातून ते अक्राळविक्राळ कडे! अनेक ठिकाणी पहाडावर कोरले गेल्यासारखे पट्टे होते. कदाचित त्या महांकाळ महादेवानेच इकडे येऊन कधी तांडव केले असेल आणि ह्या पर्वतांवर नर्तन करता करता चाबूक ओढला गेला असेल ... सारा परिसर काळोखाची जड शाल पांघरून गुरफटून गेला होता. अशारिरीणी शक्ती तेथे होत्या की नाही कुणास ठाऊक! कदाचित जंगलातून अशा कुठल्या शक्तीचे नसले तरी कुठल्या प्राण्याचे डोळे आपल्यावर रोखले गेले असतील. हिमालयाच्या ह्या उत्कट रूपाने मनाला वेगळीच शांतीसुद्धा दिली. अनादिअनंत तत्वाचा हुंकाररूपी नाद आसमंतात भरून राहिला आहे असे वाटू लागले. मला रुद्र म्हणता येत नाही ह्याचा पहिल्यांदा विषाद वाटला असेल. मला गणपती अथर्वशीर्षाची आठवण झाली. ' त्वमेव प्रत्यक्षम् तत्वमसि | ' तूच साक्षात तत्व आहेस. मी मनातल्या मनात ते म्हणू लागलो. शक्तीतत्वाच्या जाणिवेने वेगळीच स्वस्थता लाभली.
खरेच! हा हिमालय माझ्या देशात असल्याबद्दल नशिबाचे आभार मानायला हवेत. आणि ही तर फक्त हिमालयाची सुरवात म्हणायला हवी. ग्रेटर हिमालय भाग तर किती दुर्गम कड्यांच्या भिंतींनी बनला असेल! भरीस भर म्हणून भूभाग खचणे वगैरे प्रकार तोंडी लावायला आहेतच. उगाच नाही गंगेच्या सखल मैदानी प्रदेशात संस्कृती विकसित झाली. ह्या हिमालयामुळेच थंड वार्यांपासून त्या भागाचे रक्षण झाले असावे. भारतीय संस्कृतीचा ह्या पर्वताशी निकटचा संबंध आहे. देवांचे वास्तव्य येथेच असावे असे प्राचीनांना का वाटले असावे ह्याची कल्पना प्रत्यक्ष पाहून येते. असा हा पर्वतराज आमच्या शिवाजीराजांना मिळाला असता, तर त्यांनी अफजलखानच काय, सगळ्या खानांचा आणि त्यांच्या पिल्ल्यांचा कोथळा बाहेर काढला असता. इतिहासात डोकावून पाहिल्यावर अशी कितीतरी अपुरी स्वप्ने दिसतात. हेमूला बाण न लागता तर? पानपतावर सदाशिवराव भाऊ न पडते तर? नेपोलिअन वॉटर्लूची लढाई जिंकता तर? एवढेच काय, साहित्यात सुद्धा गडकर्यांचे 'भावबंधन' अपुरेच राहिले. बालगंधर्वांच्या ऐन भराच्या काळात उत्तम ध्वनिमुद्रणाची सोय असती तर? अपुर्या गोष्टी मनःचक्षुंपुढे पूर्ण करण्याचा प्रयत्न बर्याच वेळी होतो. अगदी लहानपणी चंद्रकोर अर्धी दिसल्यावर ती मनोमन पूर्ण दिसावी असा खटाटोप असायचा. अर्थात कधीकधी अपूर्णतेतच जास्त मजा असते. ब्रॅडमनची सरासरी ९९.९४ आहे हे ऐकल्यावर मन चुकचुकते, पण त्याच वेळी ह्या गोष्टीत जास्त रस वाटायला लागतो. तीच जर १०७.१६ असती तर ब्रॅडमनबद्दल वाटणार्या कौतुकात फारसा फरक पडला नसता, पण त्याचबरोबर ह्या आकड्याची मन:पटलावर तितकी नोंद झाली नसती. अपूर्णतेतून आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला, तर ती अपूर्णता सुंदर वाटू शकते हे निश्चित. ह्याउलट अगदी आखीवरेखीव गोष्टी कधीकधी मनाला वीट आणतात. (आठवा - पुलंचे 'चौकोनी कुटुंब.) अजून एक उदाहरण पाहायचे झाले तर, सौंदर्याचे 'चाफेकळी नाक' वगैरे निकष सगळ्याच सुंदर चेहर्यांना कुठे लागू होतात? पण कधीकधी त्यामुळेच त्या चेहर्याला वेगळीच शोभा येते. A Few Imperfect Things Can Come Together To Make A Perfect Thing.
एव्हाना बाबाजींनी बर्यापैकी वेग घेतला होता. गाड्यांच्या दिव्यांचे प्रकाशगोलक मागे पडत होते.
"कुळागराची गर्द साउली
त्यातच माझी खोप सानुली
निद्रेविण स्वप्नांच्या ओळी
रेखीत भोगु दे सरळपणा"
अशी काहीशी अवस्था झाली होती. "निद्रेविण स्वप्नांच्या ... भोगु दे सरळपणा" साधासा विचार, साध्याच शैलीत मांडलेला आणि म्हणूनच लोभसवाणा. बोरकरांच्या काही कविता माझ्या अत्यंत आवडीच्या. बघताक्षणी पाठ झालेल्या. त्यातलीच ही एक. 'इतुक्या लौकर येई न मरणा'. हिमराजाचे हे रूप पाहत असताना असेच काहीसे वाटत होते. आत्ताशी तर कुठेतरी तोंडओळख झाली असे वाटले. खरेतर तीसुद्धा नाही. हा इतका विशाल, की जन्मभर फिरत राहिले तरी ह्याची नुसती तोंडओळखच होत राहील.
हा सगळा विचार करता करता झोप डोळ्यांवर चढायला लागली होती. (आम्ही बाकी काही चढणार्या पंथातले नाही.) पहाटेचे साडेतीन कसे वाजले कळालेच नाही. 'अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत्' अशी काहीशी स्थिती झाली. बर्याचदा अशा रात्री मित्रांच्या नाहीतर पुस्तकाच्या सहवासात जातात. बर्याच दिवसांनी अशी एकट्याने रात्र पाहिली. पण आता माझ्यावर प्रवासाचा थकवा हळूहळू अंमल गाजवायला लागलेला होता. त्यामुळे उरलेली रात्र सूर्याच्या पदरात टाकून मी झोपेच्या अधीन झालो. माझ्या संचिताच्या क्षणांमध्ये अजून एका अविस्मरणीय रात्रीची भर पडलेली होती. आयुष्यात अशाच काळजाचा ठाव घेणार्या गोष्टींना महत्व असते. थोडीशी माणसे असतात आयुष्यात ..., काही विलक्षण सुंदर कलाकृती, त्या पाहून मनात आलेले विचार ... The Rest Is Silence.
खुप छान लिहिलंय.
खुप छान लिहिलंय.
व्वा ... आवडले लेखन ...
व्वा ... आवडले लेखन ...
सुरेख लेख.. खूप आवडला.
सुरेख लेख.. खूप आवडला.
सुंदर. अप्रतिम लिहीलयं.
सुंदर. अप्रतिम लिहीलयं.
सुरेख उतरला आहे रात्रीचा
सुरेख उतरला आहे रात्रीचा प्रवास
वाह! सुरेख.
वाह! सुरेख.
सुंदर!!!
सुंदर!!!
फारच छान !!! "कुळागराची गर्द
फारच छान !!!
"कुळागराची गर्द साउली
त्यातच माझी खोप सानुली
निद्रेविण स्वप्नांच्या ओळी
रेखीत भोगु दे सरळपणा"
ही कोणती आणि कोणाची कविता आहे ?
वा ! वा ! माणसे, इतिहास,
वा ! वा !
माणसे, इतिहास, धर्म, विज्ञान, तत्वज्ञान अशा बर्याच काहीशा पराभौतिकीय गोष्टींवर विचार करण्यात घालवला आहे. >> आँ. तुम्हालाही हा आजार आहे? मग तुमचे काही होऊ शकत नाही.

अप्रतिम वर्णन ..... हिमालय,
अप्रतिम वर्णन .....
हिमालय, अंधार, गंधार या सार्या वर्णनात स्वतःला अगदी हरवून गेलो ..... ग्रेट, ग्रेट ...
मनापासून धन्यवाद ... _____/\______
धन्स सगळ्यांना. मला जे
धन्स सगळ्यांना.
मला जे भावलं, वाटलं, ते लिहीलं. तुम्हाला ते इतकं आवडलं हे बघून मला खूप छान वाटलं. ह्याआधी असं लिहायचा फार प्रयत्न केला नव्हता कधी. तुमच्या कौतुकामुळे बरं वाटलं. 
महेश, ह्या ओळी बा. भ. बोरकरांच्या 'इतुक्या लौकर येई न मरणा' ह्या कवितेतल्या आहेत.
रैना,
शायरी फार येत नाही, नाहीतर काहीतरी ह्या 'बीमारी'वर नक्की रचला असता. 
शशांक, खरंच खूप बरं वाटलं.
पुन्हा एकदा धन्स सगळ्यांना.
आह!! क्या बात. मायबोलीवर
आह!! क्या बात. मायबोलीवर वाचलेल्या बेस्ट ललितलेखांपैकी हा एक आहे. अतिशय सुंदर तरल आणि मनापासून लिहिलेला. काहीही नाट्यमय घटनांचे वर्णन न करता केवळ आणि केवळ त्या रात्रीचेच वर्णन असलेला लेख.
मझा आ गया. अजून लिहित रहा.
मस्त.
मस्त.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
अगदी मनापासून लिहिलेलं
अगदी मनापासून लिहिलेलं जाणवतंय..
The Rest Is Silence.. मस्त..
प्रवासातल्या एकटेपणातील
प्रवासातल्या एकटेपणातील एकसंधपणा अप्रतिम उतरला आहे. आणि त्या जोडीला नगाधिराज... वाह!
हिमालय, अंधार, गंधार या सार्या वर्णनात स्वतःला अगदी हरवून गेलो ..... ग्रेट, ग्रेट ...>>> +१
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
सहजसुन्दर लिहीलय. इस्पिकचा
सहजसुन्दर लिहीलय. इस्पिकचा एक्का यान्च्या चीनदर्शन मालिकेत नगाधिराजाचे स्वरुप पाहुनच विस्मीत व्हायला झाले होते. तुमचा अनूभव तरल आहे.
अप्रतिम !! अमर्याद
अप्रतिम !!
अमर्याद हिमालयाच्या साक्षीने घडलेलं हे प्रवाही,मुक्त चिंतन, प्रत्येक नागमोडी वळणावर अनपेक्षित समोर येणार्या नजार्यांसारखेच सुंदर विचार, वाक्यं घेऊन येतंय. तरीही वर कुणीतरी म्हटलंय तसा संपूर्ण अनुभवाचा एकसंधपणा मोडलेला नाही.
सु रे ख !
सु रे ख !
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
सुरेख लिहिलय !! एकही फोटो
सुरेख लिहिलय !!
एकही फोटो नसून केवळ वर्णनातून चित्रमयता उभी केली आहे.
खूपच सुंदर लिहीलय. तो रस्ता
खूपच सुंदर लिहीलय. तो रस्ता आणि ती वेळ डोळ्यासमोर उभी केलीत. प्रवासात झालेला उशीर, निसर्गाचे तांडव, विस्कळीत झालेला कार्यक्रम; ह्यासगळ्यात असले तरल विचार सुचायला कवीमनच पाहीजे!
मला नंदिनी ने लिहीलेल्या
मला नंदिनी ने लिहीलेल्या दुपारीवरच्या अशाच सुंदर लेखाची आठवण झाली.
अप्रतिम! वाचताना तुमचा हेवा
अप्रतिम! वाचताना तुमचा हेवा वाटला खरंतर...लिहित रहा!
पुन्हा एकदा थँक्स सगळ्यांना.
पुन्हा एकदा थँक्स सगळ्यांना.
प्रतिसाद देणार्यांमध्ये मायबोलीवरचे दर्दी वाचक आणि लेखक आहेत, त्यामुळे अजूनच छान वाटतंय. आजही मी हे वाचतो, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तो नजारा क्षणात उभा राहतो! ती मॅजेस्टी लेखातून वाचकांपर्यंत अंशतः का होईना, पोहोचते आहे असे दिसते. विशेषतः केदार आणि पराग ह्यांची मानसरोवरयात्रा मी फॉलो करत होतो, त्यामुळेसुद्धा असे काही लिहिण्याची इच्छा झाली असे म्हणायला हरकत नाही. 
मनीमोहोर किंवा नंदिनी, तो लेख कुठला ते कळेल का?
माझ्या संचिताच्या क्षणांमध्ये
माझ्या संचिताच्या क्षणांमध्ये अजून एका अविस्मरणीय रात्रीची भर पडलेली होती. आयुष्यात अशाच काळजाचा ठाव घेणार्या गोष्टींना महत्व असते. थोडीशी माणसे असतात आयुष्यात ..., काही विलक्षण सुंदर कलाकृती, त्या पाहून मनात आलेले विचार ... The Rest Is Silence.>>
सुरेख!
खूप सुंदर लिहिलय.
खूप सुंदर लिहिलय.
सुरेख लिहीले आहे. आवडले
सुरेख लिहीले आहे. आवडले
अतिशय सुंदर लेख. परवाच वाचला
अतिशय सुंदर लेख. परवाच वाचला होता. आज पुन्हा वाचला. ग्रुपमधुन प्रवास करतानाही बहुतांशवेळी मी एकटीच असते असे मला नेहेमी जाणवते त्यामुळे खुप रिलेट करता आहे.
Pages