शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण फुलवलेला पिसारा छान दिसतो कसे म्हणाय्चे ? फैलाये हुए पंख सुंदर दिखते हे ? >> फैलाये हुए रंगबिरंगे पंख म्हणू शकतो.

हैदोस, हा शब्द अरबी / फारसी मधून आलाय. मुहर्रमच्या वेळेस जो मोठ्याने शोक छालतो त्याला हैदूस म्हणतात.>> माहीतीसाठी धन्यवाद

'गणिका' (वेश्या) ची व्युत्पत्ती काय असावी?
सहज विचार केला.....
'गण' = समुदाय
गणणे = मोजणे
२ शकयता वाटल्या:
१. तिच्याकडे येणारी गिर्हाइके मोजणारी !
२. 'त्या' अड्ड्यावरील समुदायापैकी एक

;;जाणकारांनी प्रका श टाकावा.

पैगंबरांचे नातू हुसेन इब्न अली ( इमाम हुसेन )आणि उमायाद खलिफा यझिद १ यांच्यात करबला येथे लढाई झाली . इमाम हुसेन यानी खलिफाला मान्यता देण्यास न्कार दिला. करबलाच्या वाळवंटात कुफा येथे जात असताना ह्या ७०-८० जणाम्च्या कबिल्याला हजारो घोडेस्वारानी घेरून खलिफाला मान्यता द्यायला जबरदस्ती केली. त्यातल्या लोकाना पाणी सुद्धा द्यायला मनाई केली . या विषम लढाईत इमाम हुसेन यांच्या कुटुम्बातले सगळे मारले गेले त्यात सहा महिन्यांच्या बालकाचाही समावेश होता. हीच ती मोहरमची १० तारीख . ह्याशहिदांच्या स्मरणार्थ त्या दिवशी ताबूत काढून शोक केला जातो. व शहिदांच्या प्रार्थना केल्या जातात. या नातेवाईकांत हुसेन नावाचे नातेवाईक होते. एक नवपरिणीत जोडपेही होते तो नवरदेवही (दूल्हा) मारला गेला. काहींचे मित्र ( दोस्त) मारले गेले. या मातममध्ये ( शोक ) दु:खाने 'हसन .. हुसेन दुल्हा !' ' हाय दोस्त दूल्हा... ! ' आरोल्या दिल्या जात /जातात. त्याचाच अपभ्रंश होउन हैदोस दुल्हा किंवा हैदोस धुल्ला असे शब्द कालौघात रुढ झाले. त्याचा अर्थही बदलला हैदोस म्हणजे गोंधळ एवढाच अर्थ सध्या घेतला जात आहे.....

उपयुक्त आणि योग्य असा खुलासा केला आहे रॉबीनहूड यानी. मुस्लिमधर्मींच्या मोहरम सणात "पीर" बसविले जातात ते याच हसन हुसेन यांचे प्रतिक असून ताबूताच्या दिवशी भक्तांतर्फे जो शोक व्यक्त केला जातो तो करबल्याच्या समयी शहीद झालेल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी.

वरच्या प्रतिसादात फक्त "हुसेन" यांचा उल्लेख आला आहे. इमाम अली हुसेन अलैहिस्सलाम हे पैगंबराचे नातू होते आणि जर त्याना कशाहीमुळे मृत्यू आला तर त्यांच्यानंतर त्यांचे बंधू "हसन" याना प्रमुख केले जाईल असा आदेश होता. पण प्रथम हुसेन आणि त्यानंतर हसन यांचीही कत्तल झाली. दोन पीर या दोन बंधूंचे प्रतिक मानले जातात.

शोकसमयी जी आरोळी देतात ती "हाय दोस्त दूल्हा..."...याचेच नंतर सर्वत्र अपभ्रंशात रुपांतर होऊन "बेताल दंगा = हैदोसधुल्ला" बनून गेले...रुजलेही.

गोंदवलेकर महाराजांच्या एका पदात वाक्य आहे - शुद्ध लीले गंडुष करविले. (घ्यावी सेवा दिनांची दिनानाथा)
त्या गंडुष चा अर्थ काय?

शूम्पी,

छिद्रान्वेषीचा अशोक मामांनी स्पष्ट केलेला अर्थ : http://www.maayboli.com/node/33512?page=7#comment-1974068

यावरून मला आठवलेली गोष्ट : http://www.maayboli.com/node/33512?page=7#comment-1974830

आ.न.,
-गा.पै.

'मराठमोळा' या शब्दाविषयी -

'मराठमोळा' या शब्दाचा अर्थ 'मराठा' या समूहाशी संबंधित रीतिभाती, विशेषतः पडदा-पद्धत.
स्त्रियांना पडद्याआड ठेवण्याच्या या रुढीविरुद्ध आगरकरांनी 'मराठमोळा' हा निबंधही लिहिला आहे.
हा शब्द 'मराठी भाषेशी संबंधित' किंवा 'मराठी बोलणारा / री' या अर्थी वापरला जाणं हे सर्वथा चुकीचं आहे.
मराठमोळा या शब्दाचा संबंध केवळ एका समूहाशी आहे. मराठी बोलणारे सर्व किंवा महाराष्ट्रात राहणारे सर्व 'मराठमोळा' या शब्दाच्या छत्राखाली एकत्र येत नाहीत. त्यामुळे मराठमोळा पदार्थ, मराठमोळी भाषा, मराठमोळा अभिनेता हे प्रयोग पूर्णतः चुकीचे आहेत.

मराठमोळा या शब्दाला दोन संदर्भ असावेत असे वाटाते . कोषात काय आहे माहीत नाही. चिनूक्स म्हणतो त्याप्रमाणे मराठमोळा हा संदर्भ हा मराठ्यांच्या एका ठराविक क्लॅनमध्ये प्रचलीत असलेल्या सनातनी रूढीबाबत वापरला जातो हेही खरे आहे. म्हणजे असे की 'त्यांच्यात मराठ्मोळा पाळला जातो' असे म्हटले जाते /जाई. यात तेच स्त्रियांना एक्सपोजर न देणे . नाकापर्यन्र पदर घेणे, पुरुषांपुढे न येणे.गम्मत म्हणजे एक्सपोजरची कामे पुरुषंना करावी लागत. म्हणजे पिण्याचे पाणी आडा विहीरीवरून भरणे. शेतीचीही मजुरी कामे या बायका करत नसत. त्यांच्या नेसूची पद्धत वेगळीच अंगभर टाचेपर्यन्त घोळदार . असे म्हनजे सामान्य कुणबी स्त्रिया जसे आखूड लुगडे नेसत तसे नाही. साधारणतः सरदार , जमीनदारीशी निगडीत असणार्‍या स्वतःला खानदानी म्हणवून घेणार्‍या मराठा कुटुम्बात ही पद्धत असे. 'प्रतापराजे मुतले वाटते पाळण्यात' अशा प्रकारच्या संस्कृतीत्तले ! Happy
सर्व सामान्य कुणबी मराठ्यांना कुठले असले चोचले परवडायला! हल्ली हा मराठमोळा कुठे दिसत नाही हेही खरे.

पण तरीही मराठमोळे जेवण, भाषा, माणसे हे वर्णन तरीही चुकीचे नसावे असे मला बुवा वाटते. अगदी व्युत्पत्तीशास्त्राच्या कसोटीवर नसले तरी....

ही मोल्सवर्थातली नोंद -

मराठी मोळा or मराठमोळा (p. 632) [ marāṭhī mōḷā or marāṭhamōḷā ] m Ways and practices peculiar to the genuine Maráṭhá. Ex. तुम्ही आपणास पवार म्हणवितां पण तुमच्या घरीं म0 दिसत नाहीं. The peculiar way especially implied by this phrase is The non-appearance of the women of a household before strangers.

माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान

हिमाचलाचे हीरकमंडित शिरभूषण भरदार
वक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान

- कुसुमाग्रजांनी हा शब्द असा वापरलाय इथे. प्रचलित अर्थ घ्यायला काय हरकत आहे?

सहज म्हणून.

खिळ्याला कोल्हापूर भागात सर्रास मोळा म्हणतात. त्याचा काही संबंध असेल का ? जो अर्थ चिनूक्स ने लिहिला आहे त्या अर्थी सर्रास, कुळवंत किंवा शान्नव कुळी असे शब्द वापरतात.

Trends in demographics = "लोकोभ्यास कल" किंवा "लोकसंख्याशास्त्र प्रवाह" हे दोन विकल्प चालत असतील कदाचित.

अशोकमामा,

माझ्या मनातही डेमोग्राफिक्स साठी लोकसंख्या हाच प्रतिशब्द होता. मात्र डेमोग्राफिक्स मध्ये लोकांचं वर्गीकरण ही मूलभूत प्रक्रिया असल्याने लोकवर्गशास्त्र हा प्रतिशब्द म्हणून कसा वाटतो? ट्रेंड्स इन डेमोग्राफिक्सला लोकवर्गजन्य प्रवाह किंवा लोकवर्गकल म्हणता येईल.

आ.न.,
-गा.पै.

गामा_पैलवान....

Demographics चा उल्लेख मी शासनाच्या "कुटुंब कल्याण" आणि "ग्रामसुधार" नामक विभागात ऐकला/पाहिला होता. तेथील एक सेक्शन ग्रामीण भागात जाऊन (सहा लोकांची एक टीम होती, त्यात दोन स्त्रिया असायच्याच) हे लोक तेथील विविध वस्तीतील (भटक्या आणि कायमस्थित....दोन्ही गट) लोकांकडून त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्तर, वय, आजारपण, आरोग्य सुविधा, लिंगाप्रमाणे वस्तीची अवस्था, शैक्षणिक प्रगती, पैसा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न, दुष्काळी कामातील त्यांचा सहभाग..... धर्म (याचे उत्तर त्यानी काय दिले हे न समजल्याने "डॅश" किंवा "डॉट डॉट डॉट" असेही स्वयंसेवकांनी लिहिलेले फ़ॉर्म्स मी स्वत: पाहिले आहे), जात...हे मात्र सांगितले गेले होते....विवाहाचे प्रकार....अशा आणि यासम अनेक माहितीने ते फ़ॉर्म्स भरले जात असत. या सर्व प्रकाराला शासकीय भाषेतच "डेमोग्राफ़िक ट्रेन्ड" असे अहवालात संबोधिले जात असल्याने तो एक वर्गीकरणाचाही प्रकार होऊ शकेल. यातून शासन लोकोपयोगी कामे आखीत राहते....त्यातही शाळा आणि प्राथमिक आरोग्य केन्द्र प्राधान्याने.

पण एक आहे, गामा_पैलवान....ती माहिती गोळा करणा-या टीम लीडरला स्वत:चे मत नसायचे....त्याने फ़क्त यंत्रवत दिलेल्या फ़ॉर्ममध्ये माहिती नोंदवून घ्यायची. त्याचे सार वा अर्थ काढण्यासाठी स्वतंत्र समिती असायची.

अशोक मामा, गामा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मी जिथे हा शब्द वाचला तिथे तो आजपर्यंतची लोकसंख्या वाढ, वाढीचा दर, त्यावरून भविष्यातली लोकसंख्येची (प्रोजेक्टेड) घनता इ.संदर्भात वापरलेला होता ... मग लोकसंख्याशास्त्राचे प्रवाह / कल असंच म्हणावं, नाही का?

गौरी....

माझे मत तर "कल" या शब्दाकडेच झुकलेले असेल. उदाहरणार्थ जर असे वाक्य आपल्या वाचनात आले : "Most of the trends reveal that students prefer science stream after passing 10th Class." याचेच मराठी रुपांतर "दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बर्‍याच मुलामुलींचा विज्ञान शाखेकडे जाण्याचा कल दिसतो..." असेच केले जाते. म्हणजे समाजातील चित्र स्पष्टपणे समोर येते. याच ठिकाणी "विज्ञान शाखेकडे जाण्याचा प्रवाह दिसतो..." असे म्हटले तर नेमका अर्थ त्यातून उघड होत नाही...प्रवाह तिथे योग्यही वाटत नाही.

तेव्हा "लोकसंख्याशास्त्राचा कल" हेच योग्य ठरेल असे मला वाटते. तुमचे मार्गदर्शक अथवा शिक्षक काय म्हणतील त्याचाही तुम्ही विचार कराच अर्थात.

आवडीचे वालभ माझेनि कोंदाटले ह्याचा अर्थ काय? विश्वाचे आर्त ह्या ज्ञानेश्वरांच्या रचनेत ही ओळ आहे.

वालभ म्हणजे काय? माझेनि म्हणजे काय? कोंदाटाले म्हणजे काय?

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा ह्या अभंगातली ही एक ओळ
आम्हासाठी कोण आली धाड : ह्याचा अर्थ काय?

चंद्रिका ही जणू ह्या गाण्यात ही ओळ आहे:
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी

कुमुदबांधव म्हणजे कोण?

कुमुद हे कमळ फक्त रात्री उमलते, चंद्र असेल तर. (मी कधी ते पाहिलेले नाही पण ऐकले आहे.) कुमुदबांधव म्हणजे चंद्र असेल बहुतेक.

वालभ = वल्लभ = लाडका (बिलव्हेड / रोमॅन्टिक पार्टनर अशा अर्थी वापरतात - उदा. रुक्मिणीवल्लभ)
कोंदाटणे म्हणजे दाटणे, गर्दी करणे.

'विश्वाचे आर्त' ही 'अवघेची झाले देह ब्रह्म' या स्थितीचं वर्णन करणारी विराणी आहे. देह आणि ब्रह्म एक झाले, आतबाहेर काही राहिले नाही, तो स्वामी/सखा/जिवलग असा देव चराचराला भरून उरला (त्याने चराचर कोंदाटून टाकले) - असा अर्थ लागतो.

Pages