शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेंडेनक्षत्र गाना.काम वर प्रोफ राम शेवाळकर यांच्या नावाने शोधल्यावर "कानडा वो विठ्ठलू २" हा अल्बम मिळतो. त्यात ह्या प्रोफ शेवाळकर यांनी ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचे निरुपण केले आहे. शब्दार्थांच्या दृष्टीने ते कितपत अचूक आहे माहित नाही पण ऐकायला खूप छान वाटते.
"कानडा वो विठ्ठलू १" पण असायला हवे पण तिथे तरी ते मिळाले नाही.

demographics : statistical data relating to the population and particular groups within it
trends in demographics : लोकसंख्येच्या (विविध) आकडेवारीतून जाणवणारे/दिसणारे/आढळलेले कल

भरत मयेकर, तुम्ही सुचवलेलं भाषांतर मला हव्या असणार्‍या संदर्भामध्ये अर्थाच्या अजून जवळ पोहोचणारं आहे! धन्यवाद!

मी शाळेत असताना हिंदी वाचनाचा सराव व्हावा म्हणून घरी धर्मयुग येत असे. इंग्रजी वाचनासाठी टाइम्स च्या जोडीने इलस्ट्रेटेड वीकली.

त्याच परिवारातलं आजचं म टा हे हे मात्र मराठी ( किंवा कुठल्याच भाषेत ) कसं लिहू नये याचा आदर्श नमुना आहे

मराठमोळी खाद्य संस्कृती म्हटली की डोंबिवलीतील पंडित किचन्सला पर्याय नाही. उडपी, जैन, चायनीज पदार्थांप्रमाणेच मराठमोळ्या थाळीमध्येही वैविध्य आहे, हे इथे पाहून लक्षात येतं. मराठमोळ्या पदार्थांची सर इतर कुठल्याच पदार्थांना येऊ शकत नाही. सकाळच्या वेळी पंडित किचन्समध्ये चक्कर टाकलीत तर इथे मिसळ आणि थालीपीठ नक्की खायला हवं. ते खास आहेतच, पण त्याचसोबत कॉर्न भजी, मटार पॅटीस असे पदार्थही फार रुचकर आहेत. येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे मिळणारी थाळी...
पाककलेचा उत्तम नमुना, त्याचबरोबर टापटीप आणि येणाऱ्या ग्राहकाचे आदराने केले जाणारे स्वागत, ही इथली खासियत. इथे गावरान थाळीची मजा चाखता येईल. गरमागरम भाकऱ्या त्याच्या जोडीला पिठलं, सोबत हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा, वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत, पालेभाजी, मसाले भात आणि कुरकुरीत गरम कांदा भजी आणि वरून ग्लासभर ताक. पण गावरान थाळी शनिवार आणि रविवार यादिवशीच मिळते. इथे स्पेशल थाळी देखील आहे. ज्यामध्ये विविध भाज्या, पोळी, कोशिंबीर, पापड असे सुग्रास अन्न चाखता येते.

तिखट पदार्थांप्रमाणेच येथील पक्वान्नंदेखील अप्रतिम... त्यात उकडीचे मोदक अव्वल आहेत. संकष्टीला येथे २००हून अधिक उकडीचे मोदक संपतात. त्याचबरोबर मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार... असा मस्त बेत असतो.

नको तिथे एलिप्सिस काय , मिसळ आणि थालिपीठ खायला हवं सारखी वाक्यरचना काय , पंडित किचन्स ला पर्याय नाही म्हणजे काय ? बाकी कुठेच पिठलं , भाकरी , भरीत अशी थाळी मिळत नाही ?
तिथे न गेलेल्या पण म टा वाचणार्‍याला मराठी जेवणातलं वैविध्य माहीत नसणार ?

किती पगार मिळत असेल असलं लेखन करायला ? मी अर्ज कुठे करू ?

हा मजकूर त्या पंडित किचन्सवाल्यांनीच लिहून दिलेला असण्याची शक्यता आहे. मराठी वृत्तपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवर मराठीचे जे नमुने वाचायला, ऐकायला मिळतात त्यांच्या तुलनेत हा मजकूर बराच सुसह्य आहे.
------
मला त्या परिच्छेदातलं "चक्कर टाकली" हे वेगळं वाटलं. आजकाल मराठीत सगळ्याच गोष्टी टाकाऊ होऊ लागल्यात की काय? चक्कर मारली किंवा फेरफटका मारला की कसं राकट, कणखर देशात आल्यासारखं वाटतं.

महाराष्ट्र टाईम्सचे मराठी....( ३० जुलै २०१५)
नागपुरात पोहोचण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी चार तिकिटा काढल्या होत्या व बी-१ बोगीत त्या कन्फर्मही झाल्या होत्या

मटात हल्ली अशिक्षीत वार्ता हर नेमण्याची पद्धत आहे

आजचा लोकसत्ता : साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी विवाद्य व्यक्तीची नियुक्ती केली पाहिजे, अशी अपेक्षा साहित्यिक वर्तुळातून शुक्रवारी व्यक्त करण्यात आली.
पूर्वकर्तृत्व असलेली निरपेक्ष वृत्तीची व्यक्ती आणि विवाद्य व्यक्तिमत्त्व असेल अशा व्यक्तीचीच महत्त्वाच्या पदावर निवड केली जावी.एखाद्याविषयी प्रवाद किंवा माफक संशयही नाही अशाच व्यक्तीची नेमणूक करायला हवी. स्वच्छ प्रतिमा महत्त्वाची वाटते. एक वेळ गुणवत्ता कमी असली तरी चालेल, पण त्या व्यक्तीची सर्वमान्यता महत्त्वाची आहे.
- मंगला गोडबोले

विवाद्य शब्दाचा नक्की अर्थ काय?

विवाद्य म्हणजे भविष्यात ज्याच्यावर वाद घालता येऊ शकेल असा.
लिहायचंच असेल तर निर्विवाद्य लिहायला पाहिजे.

जमीनदोस्त ह्या शब्दाविषयी उत्सुकता आहे. एखादी इमारत कोसळून भुईसपाट झाली तर जमीनदोस्त झाली म्हणतात. ह्याचे मूळ जमीन + दोस्त इतके सरळ आहे की अजून काही? असा शब्द उर्दू वा हिंदीत वापरलेला ऐकला नाही.

खुमासदार ह्या शब्दाचा अर्थ काय? शेवटी दार येणारे बहुतेक शब्द मूळचे फारसी असतात. हाही असावा. पण अर्थ काय?

गबर वा गब्बर हा श्रीमंत ह्या अर्थाने वापरला जाणारा शब्द मूळचा कुठला?

अब्दागीर म्हणजे काय?

जमीनदोस्तचा भुईसपाट हा अर्थ फक्त मराठीतच रूढ दिसतो आहे. Happy

अब्दागीर म्हणजे शोभिवंत छत्र/छत्री.

खुमासदार - कल्पना नाही, पण 'खुम' हे (बहुधा कुंभचा अपभ्रंश) मद्याच्या मोठ्या भांड्याला म्हणतात. (खुमार = नशा हा शब्द त्या 'खुम'वरूनच आला आहे.)

मोल्सवर्थ पहा काय म्हणतो.

खुमास हा मूळ अरबी भाषेतला शब्द आहे. मा का देशपांडेंच्या मराठी - इंग्रजी शब्दकोशानुसार खुमास म्हणजे loveliness. खुमासदारचा त्यांनी दिलेला अर्थ excellent, spicy, jolly, fine.

रच्याकने, ह्या माका देशपांड्यांचे अन अत्र्यांचे काही कारणावरून फाटले . त्यावर अत्र्यांनी त्यांच्या विरोधात अग्रलेख लिहिला.. त्याचे टायटल होते .... 'हत तेरी माका ! "

उद्देश : हेतू, आशय
उद्देश्य : वाक्यात ज्या अर्थाला उद्देशून विधान केलेले असते तो
(उद्देश्य- विधेयातलं subject, predicate)

plugged ears / clogged ears.
my ears feel plugged / clogged.

शबलित म्हणजे काय?
पैस मधे दुर्गाबाईंनी वापरलाय हा शब्दं.

... ज्ञानोबाचे हे देऊळ मूळचे अगदी साधे. नाकुठे नक्षी. ना आरास. खांबही साधा पाषाणी खांब आहे. कोरलेला कलापूर्ण स्तंभ हा नाही. निव्वळ टेकू आहे तो. या टेकूचे टेकूपण अद्याप अभंग आहे. कलेने ते शबलित केलेले नाही.
आता आधुनिक्क इमारत भोवती उठली आहे...

शबलित म्हणजे 'सौंदर्य वाढवणे' असा असावा का?
वाक्यामध्ये to adorn अशा अर्थाने वापरला आहे असे भासते. परंतु तो अर्थ अपेक्षित नसेलही.
परंतु शब्दाची उत्पत्ती पाहिली तर अजून प्रकाश पडावा.

नाव "दुर्गा भागवत" समोर आल्या क्षणी त्यांच्याकडील शब्दसामर्थ्याचा प्रभाव मनावर चटदिशी रेंगाळत जातो. पैस आणि ऋतुचक्र हाती घ्यावे आपल्या पोरापोरींनी असे वाटत राहते ते शब्दांचे सौंदर्य त्याना कळावे यासाठीच. पण असो, तो विषय वेगळा आहे.

शबलितचा एक अर्थ = विविध रंगांनी माखणे, बरबटून टाकणे. वाक्यात त्या अर्थाने बाईंनी वापरले असण्याची शक्यता वाटते. खांब पाषाणी आहे...कोरलेला नाही...निव्वळ टेकू आहे. यानंतर "कलेने शबलित केलेले नाही" असा उल्लेख "कुणी कलेच्या नावाखाली त्यावर रंग चढविलेले नाहीत..." असा होईल.

एक नवा शब्द वाचनात आला.
परिसर्ग = परिसर + निसर्ग
इन्ग्लिश मध्ये असे blend words खूप आहेत. मराठीतही व्हावेत असे वाटते.

उपरोध आणि उपहास एकच कि फरक आहे ?>>

उपहास म्हणजे सऱळसरळ टवाळी, कुचेष्टा, तुच्छता, शंकाकुशंका वगैरे.

उपरोध म्हणजे वर वर स्तुती पण आतून ती एक टिका असते. इथे ही टिका मी समाजावर केली आहे.

मी जे उत्तर लिहिले त्याबद्दल कुणी नेमके उत्तर देईन का?

धन्यवाद.

Pages