शेवभाजी

Submitted by दिनेश. on 22 June, 2015 - 04:41
shevabhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१) शेव २ कप भरून
२) १ मोठा कांदा
३) अर्धी वाटी खोबर्‍याचा किस
४) ८/९ लसूण पाकळ्या
५) अर्धा इंच आले
६) आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरच्या
७) १ टिस्पून जिरे
८) २ टिस्पून धणे
९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. )
१० ) तेल
११) फोडणीचे साहित्य ( हिंग, हळद, मोहरी )
१२) कोथिंबीर
१३) मीठ
मुख्य म्हणजे शेव २ कप भरून. हि शेव जाडी आणि तिखट पाहिजे. भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते. याच कारणासाठी अगदी बारीक शेवही वापरता येत नाही. आपल्याकडच्या फरसाणच्या दुकानात हि असतेच. दिवाळीच्या पदार्थातली शेवही वापरता येईल. हि शेव ताजी व कुरकुरीत असावी.
Shevbhajee Shev.JPG

क्रमवार पाककृती: 

नाशिक, जळगाव भागात शेवभाजी फार लोकप्रिय आहे. तिथल्या धाब्यावरचा हा अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे.
धाब्यावर अर्थातच तेल व तिखट जास्त वापरलेले असते.
१) लाल मिरच्या घेतल्या असतील तर त्या आणि तर ताजे मसाले खमंग भाजून घ्या. व त्याची पूड करा
२) खोबर्‍याचा किसही भाजून घ्या
३) कांदा उभा चिरून तेलात लालसर परतून घ्या. ( हल्ली वाळवलेला कांदा मिळतो. तो वापरला तर पटकन भाजला जातो. तो २ टेबलस्पून पुरेल )
४) खोबरे, आले, लसूण व कांदा यांचे बारीक वाटण करा. ( मिक्सरमधे आधी खोबरे आणि मग कांदा, आले, लसूण वाटावे लागेल. )
५) या वाटणात मसाला मिसळा.
६) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मसाला परतून घ्या. त्यात हवे तेवढे पाणी घालून रस्सा उकळू द्या. बेताचे मीठ व कोथिंबीर घाला. ( शेवेत मीठ असतेच, त्या मानाने मीठ घाला. )

७) पाणी थोडे जास्तच घाला कारण शेव घातल्यावर रस्सा दाट होतो.

८) अगदी खायच्या वेळेला त्यात शेव टाका आणि २/३ मिनिटे उकळा.

९) भाकरी किंवा चपाती सोबत खा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

हा रस्सा तिखटच असतो. यात आंबटपणासाठी काहिही ( टोमॅटो, चिंच ) घालत नाहीत. तसेच गूळ वा साखरही घालत नाहीत. हवे तर सोबत कच्चा कांदा आणि लिंबू घ्या.

हा मसाला आधी करुन ठेवता येतो. पाणी न घालता वाटला तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमधे अगदी महिनाभरही टिकेल.

ह्याच मसाल्याचे पाणी उकळून त्यात कच्ची अंडी फोडून घातली तर अंड्याचा रस्सा तयार होईल.

कोथिंबीर फोडणीत, रस्सा उकळताना किंवा वरूनही घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
माझाच अंदाज .. चव घेतल्यानंतरचा !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम छान, बाहेर पावसाचा जोर वाढतोय, आणि बाल्कनीतल्या टेबलापाशी बसून दुपारचे जेवण.... हा एकदम खास मेनू होईल

मस्त. मी या भाजीत खोबरं नाही घालत. कांदा, लसूण पेस्ट, मिरची ठेचा, लाल तिखट, गरम मसाला, टोमॅटो व जाड तिखट शेव एवढा मालमसाला पुरतो. आलं कधीतरीच घालते. झणझणीत शेवभाजी व सोबत भाकरी किंवा ब्रेड.

एक्दम लाळगाळू फोटो आहे. आज डब्यात इडल्या असल्याने अशा पदार्थांचे लाळगाळू महत्व अजुनच जाणवायला लागले. Happy

अगदी ऑथेन्टिक दिसतेय! केप्र चा शेवभाजी मसाला मिळतो त्याने वाटा-घाटा न करता पटक्न होते...बर्‍यापैकी ओरिजनल च्या जवळ चव येते.
या भाजी सोबत लिन्बु -कान्दा मस्टच...ही भाजी झणझणित चान्गली लागते.

वॉव माझ्याही आवडीची..
कांद्याचे कालवण आणि भात असेल तर मला त्या भातातही शेव मुरवायला आवडते Happy

माझी एक काकू चाळीसगावची आहे. साक्षात तिच्या हातची ही भाजी खाल्ली आहे.
झ ण झ णी त!!! करतांना पाहीलं तर; कांदा-सुकं खोबरं भाजून वाटण केलं होतं. मग ते परतून त्यात मिसळणाच्या डब्यातले सहा लहान वाटी टाईप कंटेनर जे असतात तसले दोन (२) भरून तिखट घातलं.

असली भाजी होती... २-३ पोळ्या खाणारा ५-६ खाऊन गेला. केवळ अप्रतीम! Happy

दिनेश,

पाकृ आणि चित्रे सुपर्बच! तुम्ही आता लवकरच टीव्हीवर पाककृती दाखवायला लागा.

मला असलेली ह्या भाजीबद्दलची माहिती - मूळ पदार्थ गुजराथचा! तिथून महाराष्ट्रात येताना अर्थातच नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव ह्या भागांमध्ये झिरपत झिरपत आता सर्वदूर पोचलेला आहे. जी चव गुजराथमध्ये मिळते ती इतरत्र मिळणे दुर्मीळ! मात्र अनेक महाराष्ट्रीय ढाब्यांवर बर्‍यापैकी शेवभाजी मिळते. महाराष्ट्राच्या उत्तरेत हा पदार्थ 'लग्नसमारंभ उरकल्यानंतर पाहुणे रावळे गेल्यावर जो एक कंटाळा आलेला असतो त्यावेळी जेवणासाठी करण्याचा पदार्थ' आहे. जसे पश्चिम महाराष्ट्रात पिठले भात किंवा मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे करतात. अस्सल शेवभाजीचे नांव शेव-टोमॅटो असे आहे. Happy

चु भु द्या घ्या

Mast! Aale nahi ghalat majhya mate. Shev agadi serve karatana ghalavi. Jar Shev nasel tar besan ghaTt bhijavoon pencil evhadhi jaaD Shev thoDya pan yaad shijavoon, koraDee karoon, taLoon vaaparavi. Majjaa!

अरे वा.. धन्यवाद.

बेफि, गुजराथमधली ती सेव पटेटा नु शाक ना ? महाराष्ट्रात आल्यावर प्रत्येक गावाने एकेक चमचा तिखट वाढवलेले दिसतेय. हा मसाला प्रत्येक घरी वेगळ्या प्रकारे करत असावेत. एखादा घटक इकडे तिकडे होत असणारच.

मला स्वतःला जास्त तेल आणि तिखटही चालत नाही. माझ्यापुरते हे सौम्य व्हर्जन असते ( पण अगदीच चिंच गुळाची आमटी नाही. ) कुणी खाणारा भेटला असता तर मीही तिखटाचा डबा उपडा केला असता !

शिवाय नाशिक भागातल्या हवामानाचाही इफेक्ट आहेच. त्या हवेत भूकही सपाटून लागते. आणि तिखट खाऊन त्रासही होत नाही.

मला हि शेव एका मित्राने भेट म्हणून दिली होती. त्याला लुआंडा मधल्या एका भारतीय दुकानात मिळाली होती. एरवी मला हा प्रकार करणे शक्यच नव्हते.

योकुने सांगितली तशी 'तिखट'वाली भाजी घरी कामाला येणाऱ्या मुलीने केली होती एकदा. फोडणीत बचकभर तिखट घातलेच, तेलही मजबूत वापरले, शिवाय नंतर वरूनही तिखट घातले ते वेगळेच. मिरची ठेचाही होताच शिवाय. लसूणही भरपूर घातला होता. काय बिशाद त्या भाजीची झणझणीत न झाल्यास! जेवण झाल्यावर उजव्या हाताची बोटे त्या तिखटामुळे हुळहुळत होती. जीभ सुन्न झाली होती. मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनाही बधीर झाल्या होत्या बहुतेक! Happy

>>>जेवण झाल्यावर उजव्या हाताची बोटे त्या तिखटामुळे हुळहुळत होती. जीभ सुन्न झाली होती. मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनाही बधीर झाल्या होत्या बहुतेक!<<<

Lol

दॅट इज महाराष्ट्रीय शेवभाजी Happy

भाजी मस्त दिसतेय. मला ही आवडते पण इतकी तिखट नाही खाऊ शकणार. मी आपली त्यातल्या त्यात जरा तिखट करते.

अस्सल खान्देशी शेवभाजी खातांना घामाच्या धारा वाहिल्या पाहिजेत आणि कानातून धूर निघाला पाहिजे तर ती खरी अस्सल खान्देशी शेवभाजी !! सोबत कांद्याचे काप आणि लिंबू ... तोंपासू

अस्सल खानदेशी शेवभाजी ही संज्ञा गडबडलेली आहे.

शेवभाजी गुजराथी प्रकार आहे. घाम येवो न येवो, धूर निघो न निघो, कांदा मिळो न मिळो, शेवभाजी तरीही वेड लावते Happy

छान ..

बेफिकीर, तुमच्या न्यायाने सामोसे, जिलब्या, श्रीखंड, पुरणपोळ्या ह्यांनां अस्सल आणि अनुक्रमे उत्तर "भारतीय", महाराष्ट्रियन पदार्थ म्हणणे हेही गडबडलेलेच होईल ..

किंवा मग "अस्सल इन्डियन चायनीज् "? Happy

माझ्या आधीच्या कंपनीत शेवभाजी म्हणून वर दाखवलेल्या शेवेची, कांदा-टोमॅटो च्या सुक्या ग्रेव्हीतली भाजी मिळायची. तीही मस्त लागत असे.

सशल,

तुमचा रिप्लाय फार आवडला. Happy

मला असे रिप्लाईज खूप आवडतात.

जे माझ्या रिप्लाईजसारखे असतात. Happy

आपण काय बोलतोय हे आपले आपल्यालाच कळत नसलेले. Proud Wink

>>>सामोसे, जिलब्या, श्रीखंड, पुरणपोळ्या ह्यांनां अस्सल आणि अनुक्रमे उत्तर "भारतीय", महाराष्ट्रियन पदार्थ म्हणणे हेही गडबडलेलेच होईल ..

किंवा मग "अस्सल इन्डियन चायनीज् "?<<<

समोसे - उत्तर प्रदेश

जिलबी - मध्यप्रदेश

श्रीखंड - महाराष्ट्र

पुरणपोळी - महाराष्ट्र

Proud

>>>अस्सल खानदेशी शेवभाजी ही संज्ञा गडबडलेली आहे.

शेवभाजी गुजराथी प्रकार आहे. <<<

ह्या प्रतिसादाचा अर्थ असा की शेवभाजी मुळात गुजराथची आहे, ती खानदेशीयांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे अल्टर केली असली तर तो भाग वेगळा! माझा ह्यावरचा आधीचा प्रतिसाद 'इतपत' क्लीअर नव्हता ह्यावर विश्वास ठेवण्यास उत्सुक! Wink Proud Happy

-'बेफिकीर'!

वा.... मस्त फोटो आणि पाक कृती. नुसत्या फोटो आणि आठवणीने माझ्या तोपासु... Happy

आमच्याकडे (भुसावळला) अगदी झणझणीत केली जाते. खास भाजीसाठी जाड आणि थोडी तिखट अशी "भाजीची शेव" म्हणुनच प्रसिद्ध आहे.

भाजीचा रस्सा तयार करुन ठेवायचा, जेवायच्या ५-६ मिनीटे आधी शेव टाकायची.

Pages